अंतर्नाद

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
5 Feb 2011 - 12:59 pm

कामाच्या ढिगार्‍यातून
मी बाहेर येऊ पहातो.
टेबलवरचे असंख्य
विखुरलेले कागद
जरा बाजूला सारून मी
कॉफी तयार करायला ठेवतो.
नेहमीप्रमाणे.
अगदी यांत्रिकपणे.

सहज खिडकीबाहेर लक्ष जातं
बाहेरच्या निर्मनुष्य मैदानाकडे,
शुष्कपणे पानं ढाळणार्‍या
कडुलिंबाकडे आणि उंच फांदीवर
बसलेल्या पांढर्‍या-गुलाबी पक्ष्याकडेही

परत निघतो कामासाठी
तोच ऐकू येते
एक लांब, सुरेल शीळ.
कदाचित त्याच पक्ष्याची.
कॉफीचा कप घेऊन मी खिडकीत जातो
त्या पक्ष्याला पहायला.
पण ओळखू येत नाही.
कुठल्या कुळातला आहे तो.

परत तशीच शीळ
सुंदर लयदार तान घेतल्यासारखी
मग एकापाठोपाठ एक..
पक्षी गातोच आहे.
सुरावटही सुंदर जमली आहे
सा डिंगडिंगच्या सुरांसारखी,
तरल, मुलायम पण चैतन्यदायी.
कॉफीचे घुटके घेत
मी ऐकतच राहतो.
कितीतरी वेळ...

आता मी काहीच पहात नाही,
ना आतलं.. ना बाहेरचं..
किंवा काही दिसतंच नाही मला
फक्त अनुभवतोय अंतर्नाद
त्या सुरांच्या लयींनी साधलेला

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

5 Feb 2011 - 1:01 pm | ज्ञानराम

छान ....... मन हलके झाले वाचून

प्रकाश१११'s picture

5 Feb 2011 - 7:50 pm | प्रकाश१११

छान .!आवडली..!!

गणेशा's picture

7 Feb 2011 - 6:11 pm | गणेशा

कविता आवडली ..

राघव's picture

12 Feb 2011 - 12:50 am | राघव

फक्त अनुभवतोय अंतर्नाद
त्या सुरांच्या लयींनी साधलेला

हे खूप आवडले!

राघव