"चॅक्क! त्यो न्हाई देत. शेतीचा टुकडा लिव्हुन मागतो चारचव्वल मागिटलं तरी." धायगुडे हताशपणे म्हणाला.
"जाव द्या! हुईल काय व्हायचं त्ये. काडतो कायतरी युगत." असं म्हणुन तो परत कान खाजवत सुन्नपणे बसला.
------------------------------------------------------------------------------------------------
रात्री पडल्यापडल्या डोक्यात चक्रं चालुच होती..कुणाकडुन काय मदत मिळंल का, कुठं जावं, कुणाला मागावं ह्याची चाचपणी करता करता अचानक तुकामामाचं नाव आठवलं.तुकामामा तसा सख्खा नाही, पण बंड्यावर त्याचा भारी जीव. तुकामामाच कायतरी मदत करेल ह्या विचाराच्या समाधानात धायगुड्या उद्याच मामाकडं जाऊ म्हणत झोपुन गेला.
दुसर्या दिवशी येरवाळीच सगळी कामं आटपून बंड्या दुधेबावीला तुकामामाकडं जाऊन थडकला. अवचितच बंड्याला आलेला बहुन तुकामामा जरा गडबडला..
"आरं ये ये ये...कसा हैस रं लेकरा?, आसा आवचितच आलासा, काय समदं बरं हाय न्हवं?" मामानं सरबत्ती सुरु केली. तसा हाश्शहुश्श करत धोतराच्या सोग्यानं घाम पुसत पडवीलाच टेकून बंड्या जरा हसला.. "आरं हो हो हो...मला आत तरी यिऊ देशीला का न्हाई? समदं बैजवार हाय बघ, नगं घाबरु!" असा धीर देत सप्पय बसला.
चहापाणी झाल्यावर इकडतिकडच्या गप्पा करता करता, बंड्यानं मुद्द्याला हात घातला, "मामा, वाईच जरा नड व्हती..काय दोनेक हजाराची जुळनी व्हईल का?" असं म्हणुन सगळा पाढा वाचला.
तुकामामा येरबाडलाच.. म्हणला, "गड्या, तु बी असा टाईम काडून आलायसा! ह्या साली पावसानं कशी वढ दिलीया पघतुयास न्हवं? त्यात सुंद्रीचं सनवार करायचं, जावयबाप्पू येनार म्होरच्या म्हैन्यात..गाठीच्या सगळ्या पत्त्या त्यातच उडनार की रं!"
असं म्हणल्यावर बंड्याचा चेहरा काळवंडलाच.."मग न्हाई होत म्हन्तासा?"
तुकामामालाही जरा गलबलल्यागत झालं. तंबाखू मळतामळता विचार केला अन म्हणला,"बंड्या, आसं कर, ही आपली दुभती बांडी गाय जांभुळगावच्या बाजारात काढून टाक. काय यील तो पैका ठिव तुझ्याकडं. जमल तसं आपन परतीचं बघु! काय?"
च्च...पिचकारी मारुन मान हलवत बंड्या म्हणाला, "काय मामा, आरं घरचं धन त्ये! आसं बाजारात कसं काडायचं? आन काडायचंच तर तुज्या गायीपरास माझी शेरडं इकतो की रं! इतका कशाला रं जीव लावतु मला? र्हाव दे, मी आणि कुठं जुळणी व्हती का बघतु." असं म्हणुन तो उठलाच. मामाच्या पाया पडायला लागला, तसं मामा म्हणाला, "आरं, आलाय तसा र्हा की रं, आत्ता कुटं उनाचं निगालास? चल जेवायला बसु.."
"नगं मामा..ज्येवायला यीन नंतर कदी. सद्या जरा ह्या जुळनीचाच घोर लागलाय! तेच बघतु जरा काय जमतंय का." म्हणुन निरोप घेऊन बंड्या निघाला.
गावाकडं परत येता येता डोकं भिरभिरायला लागलं तसं वाटेत नदीकाठी थांबून त्यानं जरा तोंड खंगाळलं, हातपाय धुतलं तसं गार पाण्यानं जरा बरं वाटलं. तिथंच एका झाडाच्या सावलीत बंड्या सैलावला. हाताला चाळा म्हणुन आसपासचे खडे नदीत मारतामारता विचार चालु होतेच...तेव्हढ्यात एकदम 'बऽऽम्म भोले...' असा आवाज ऐकुन तो दचकला. कोण वराडलं म्हणुन वळुन पाह्यलं तर रीपेवरच्या झाडीच्या सावलीत एक बैरागी ठाणं जमवुन बसला होता.. "बच्चा, दगड संपायचं न्हाईत, का नदी भरुन जायची न्हाई! चिंता काय अशी सुटती का? " असं बैराग्यानं म्हणल्याबरोबर बंड्या बुड झटकत उठलाच... हात जोडुन साधुबाबापाशी गेला. त्याला नमस्कार करुन बसता बसता सोबतच्या कुबडी कमंडलुलाही हात जोडुन घेतले आन तिथंच बुवाच्या पायाशी आलकट पालकट घालुन बसला.
साधु म्हणाला, "आव बच्चा..आशी चिंता करुन ती सुटती का? शांत हो बेटा.. घे प्रसाद घे!" असं म्हणुन झोळीतुन मळकटलेला खोबर्याचा एक तुकडा त्यानं बंड्याच्या हातावर ठेवला.
सदर्याला खोबरं पुसुन ते तोंडात टाकत बंड्या बोलता झाला, "काय करु म्हाराज, सगळीकडनं धडका मारुन पाह्यलो की..रस्तंच घावंनात आता!"
"बऽऽम्म भोले....देवाला शरन जा बच्चा! तुजी नड दूर व्हायाच पायजे."
"पन कसं म्हाराज? द्येव बी गरीबाचा न्हाई र्हायला.."
"खामोऽश..द्येवावर इश्वास ठिवावा मान्सानं. भलंच होतंय बाबा!" असं म्हणुन साधुनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "पैका काय येतो न जातो...द्येव मत्वाचा. पैकाच पायजे न्हवं तुला? "
"व्हय की जी.." असं म्हणुन धायगुड्यानं सगळी रामकहाणी साधुला ऐकवली. तसं साधुबाबा दाढीवरुन हात फिरवत हसला, आणि म्हणाला, "मी हाय ना? नगं भिऊ आता! सगळं येवस्तित करुन दिल्याबिगर मी शांत न्हाय बसायचु!"
"कसं म्हाराज?" बंड्या म्हणला.
"तुजा इश्वास हाय? तर आपुन तोडगा काडू..दशरत राजाच्या पुत्रकामेश्टी यज्ञापरास म्होटा तोडगा काडू.." साधु बोलला.
बंड्या उतावळाच झाला...दोन्ही हातानं तोंडात मारुन घेत म्हणाला, "चुकलं म्हाराज,चुकलं माजं. द्येवाला रागाच्या भरात वाकुडवंगाळ बोल्लो! काय कराय पायजे?"
साधु मंद हसत म्हणाला, "हा घ्ये माजा कमंडलु..जा जरा पानी भरुन आन."
लगोलग कमंडलु उचलुन धायगुड्यानं नदीकडं धाव घेतली. चांगला खंगाळुन, मग पाणी भरुन आणलं, साधुच्या पायाशी कमंडलु ठेवत पुन्हा नमस्कार करुन सप्पय बसला.
साधुनं चुळकाभर पाणी हातात घेतलं आणि मंत्र पुटपुटत शिंपडायला सुरुवात केली..म्हणाला, "बच्चा, आज सातीआसरा तुज्यावर खुश हैत दिसतंय. तुला मदत कराया त्यांनी मला आत्ता इनंती क्येली. अन भेट बी धाडली..ही घ्ये!"असं म्हणुन हवेतुन हात फिरवत शंभराची नोट काढुन बंड्याच्या हातावर टेकवली.
बुवा भलताच पावरबाज दिसतोय, डायरेक शंभराची पत्ती हवेतुन काढली असा विचार करुन बंड्या साधुच्या पायावरच लोटांगण घालुन पडला, म्हणाला "म्हाराज, काय तुमी म्हनाल तसं करु.. तोडगा काडा, लै उपकार व्हत्याल"
मंद हसत साधु म्हणाला, "आरं तुलाच मदत करायला भोलेनाथानं मला हितं धाडलं असनार! मग त्याबिगर मी कसा जानार हितुन? बरं, तोडगा करायचा तर जरा खर्च व्हनार, तुज्या घरातच मला यावं लागंल..दोन म्हैन्याचं व्रत करावं लागंल..जमत आसलं तर सांग!"
डॉक्टरच्या बोडक्यावर ढीगभर पैसा ओतण्यापेक्षा देवदेवस्कीला असा किती खर्च होईल हा विचार करुन बंड्या गडबडीतच म्हणला, "द्येवाचं काम, त्याला कशाला न्हाई म्हनु? चालतंय की..जमवु आपुन! चला म्हाराज, आसंच चला घरला, आजच सुरु करु द्येवद्येव."
तसं साधुबाबा पुन्हा दाढीवरुन हात फिरवत हसला. म्हणला, "आशी घाई करुन उपेग न्हाई बच्चा! उद्याचा दिवस चांगला हाय. मी उद्या दुपारी येतो तुझ्या घरी."
कसनुसं तोंड करत बंड्या म्हणाला,"आसं म्हंता? बरं तसं करु...उद्या ज्येवायच्या टायमाआधी गाडी जोडुन येतोच बगा तुमास्नी न्ह्यायला! हितंच आसशीला न्हवं?"
साधुनं मान डोलावत पुन्हा एकदा बम्म भोले केलं आणि हवेतुन चार चिमट्या अंगारा काढून बंड्याच्या हातावर ठेवला..म्हणला, "जा बच्चा! काय काळजी करु नको. आज दिवेलागनीला हा अंगारा घरात सगळ्यांना लाव...पोटुशी हाय तिच्या पोटावर बी लाव! भोलेनाथाला समद्यांची चिंता!!! जा आता...मला समाधी लाऊ दे!"
पुन्हा एकदा लोटांगण घालुन बंड्या खुशीतच घराकडं निघाला.
जाताजाता जांभुळगावाकडं वाट वाकडी करुन बाजारातनं शेवपापडी, थोडा म्हैसुरपाक बांधुन घेतला, आन आनंदात भर दुपारचंच नवटाकभर मारुन मग घरी गेला. आणलेलं सामान घरात देऊन पडवीतुनच गुरकावला..."उद्याधरनं आपल्याकडं सादुम्हाराज येनार हैत. दोन म्हैनं द्येवद्येव करायचंय, घर जरा आवरुन सारवुन ठिवा. आमची लाज नगा काढूसा!" आणि तिथंच गपगार झोपुन गेला.
संध्याकाळी रिवाजाप्रमाणं सगळी मंडळी एकेक करुन पारावर जमली. जो तो आपला धायगुड्याकडं बघतच बसला...गडी काल र्हिंदिसा चेहरा करुन बसला व्हता, आन आज मस कंट्री संत्र्याचं भपकारं सोडत लावण्या गुणगुणत बसलाय! कुणाला काही कळंनासंच झालं.
भैर्यानं त्याच्या पाठीत एक गुच्ची टाकली आणि म्हणाला, "काय रं भाड्या, काल यवडा रडत व्हतास आन आज ल्येका दिवसाचंच इमान हुन आलायसा! काय कुटल्या झागीरदारानं तुला दत्ताक घ्येटला का काय रं?"
तसं पाठ चोळत धायगुड्या म्हणला, "झागीरदाराचं काय कवतिक? भोलेबाबा म्हाराजानं किरपा क्येली आमच्यावर!"
"म्हंजी रं?" तान्या पुढं सरकुन विचारता झाला.
मग बंड्यानं सगळी कहाणी बैजवार तिखटमीठ लाऊन सांगितली. म्हाराजानं कसं हवेतुन थोरली नोट काडुन दिली..जाताना कसा आंगारा दिला सगळं सांगुन झालं.
ऐकता ऐकता तान्याच्या तोंडाचा वासलेला आ तसाच र्हायला..तोंडात जाणारं चिलट थुंकत तो म्हणाला, "आगागागागागा...भलताच पावरबाज दिसतोय गडी! आख्खी थोरली नोट काडली? पोचल्याला बुवा दिसतुया गड्या!"
आता तान्यानं कौतुक केलं म्हणल्यावर त्याला आडवं लावलंच पाहिजे ह्या नियमानं भैर्यानं हात उडवले, "आरं ह्याट्ट! भुरटं आसंल कुनीतरी!"
जन्यानं विचारलं, "आरं पन शंबराची नोट? ती रं कुटुन काडणार अशी हवेतुन?"
भैर्यालाही खरं म्हणजे पटत होतं, पण तान्याला आडवं लावलं पाहिजे म्हणुन तो बोलला होता.
अशीच उलटसुलट चर्चा पार वाढूळ रंगत गेली. शेवटी, आपापल्या अडचणी बंड्याचा वशिला लाऊन म्हाराजाकडुन दूर करुन घेऊ असं ठरवून बैठक मोडली.
धायगुड्या घरात उद्याची तयारी करायला सांगुन, लवकरच जेवुन गुडुप झोपला. बाकीच्यांच्या डोक्यातही साधुम्हाराज पक्का बसला होता. आपापल्या घरी जाताना ज्याच्यात्याच्या नजरेसमोर हवेत तरंगणार्या नोटा दिसत होत्या. कुणाचं काय तर कुणाचं काय अडलेलं काम ह्या पावरबाज बुवाकडुन कसं करुन घ्यावं ह्या तंद्रीतच सगळ्यांची रात्र सरु लागली.
--------------------------------------------------------------------------------------------
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Apr 2010 - 12:44 am | आनंदयात्री
एक नंबर !!
>>"मामा, वाईच जरा नड व्हती..काय दोनेक हजाराची जुळनी व्हईल का?"
>>"काय रं भाड्या, काल यवडा रडत व्हतास आन आज ल्येका दिवसाचंच इमान हुन आलायसा! काय कुटल्या झागीरदारानं तुला दत्ताक घ्येटला का काय रं?"
वैगेरे वैगेरे वाक्यं अगदीच जेन्युन ..
आता चमत्काराला सुरुवात झालिये .. पुढचे भाग येउद्या फटाफट !!
26 Apr 2010 - 12:50 am | इनोबा म्हणे
आत्ता खरी चमत्काराला सुरुवात झाली मालक. रंगत वाढतेय. पुढचा भाग येऊ द्या लवकर.
26 Apr 2010 - 12:51 am | टारझन
भाग २ आणि ३ वाचले. धम्या ... फ्लॉलेस लिखाण !! गावठी लिखाणाचा बाज कसा कन्सिस्टंट ठेवलायेस रे ? मोठा भाग लिहील्यामुळे "क्रमशः" खपुन जातोय :)
- टारझन
26 Apr 2010 - 1:08 am | अंगद
>>मोठा भाग लिहील्यामुळे "क्रमशः" खपुन जातोय
या बाबतीत मी नशिबवान. आज बर्याच दिवसांनी मिपावर आलो आणी पोकळवाडीची कथा वाचायला मिळाली.
धमाल मुलगा काय फर्मास लेखन आहे हो तुमचे. शंकर पाटील नावाचे एक लेखक आहेत, त्यांचेही निरिक्षण असेच अचुक असायचे.
पुढचा भाग कधी येतोय ही उत्सुकता लागली आहे.
मिपावर येणे म्हणजे निखळ आनंद ..
26 Apr 2010 - 5:11 pm | विजय आवारे
गावठी लिखाणाचा बाज कसा कन्सिस्टंट ठेवलायेस रे ? मोठा भाग लिहील्यामुळे "क्रमशः" खपुन जातोय
हेच म्हणतो
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. :)
26 Apr 2010 - 11:09 am | दिपक
धम्या, मोठा भाग टाकलास. मजा आली यार वाचायला. खुप दिवसानी गावरान गोष्ट वाचायला मिळतेय..
26 Apr 2010 - 11:31 am | निखिल देशपांडे
पुढचा भाग???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
26 Apr 2010 - 2:33 pm | नावातकायआहे
ओ गायभने फुडच येउद्याकि राव लौक्कर...
26 Apr 2010 - 4:40 pm | स्वाती२
मस्त! तिन्ही भाग सलग वाचले. आता पुढचा भाग येऊ दे लवकर.
28 Apr 2010 - 1:07 am | चित्रा
असेच म्हणते..
26 Apr 2010 - 6:12 pm | मितभाषी
धमु,
छान. तिन्ही भाग आजच वाचले.
आवडले. :)
पुढील भाग टाका लवकर.
26 Apr 2010 - 6:36 pm | अनिल हटेला
पू भा प्र....
लिखाण आवडले हे वे सा न ल .....
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D
26 Apr 2010 - 7:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
धमालअण्णा पोकळवाडीकर, पुढे काय?
अदिती
26 Apr 2010 - 11:29 pm | छोटा डॉन
खुप दिवसापासुन ही लेखमालिका वाचत आहे.
प्रतिसाद द्यायला मुद्दामुनच वाट पहात होतो.
अशा टाईपच्या आणि ग्रामिण बाजावर बेतलेल्या कथा लिहायला फार मोठ्ठी तयारी लागते, कारण बहुतेक दुसर्या तिसर्या भागात कथेचा आणि भाषाशैलीचा तोल ढासळतो असा अनुभव आहे ...
मात्र आज प्रतिसाद अशासाठी की तिसरा भाग वाचुन आनंद झाला, जमतेय रे धम्या तुला व्यवस्थित, चुकले चुकले ... सेटलमध्ये पेलतेय रे तुला असे म्हणायला हवे. बाकी आत्ताच कुठे कथानक खरे सुरु झाल्यासारखे वाटते आहे, पुढच्या गुंताडाची वाट पहात आहे ...
कथेचा बाज असाच टिकवुन ठेवावा हीच सदिच्छा !!!
लिहीत रहा, वाचतो आहे ...
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
27 Apr 2010 - 2:40 pm | आंबोळी
सहमत
--आंबोळी
27 Apr 2010 - 6:54 pm | मस्त कलंदर
अहो पोकळवाडीकर... पुढचा भाग????
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
3 Feb 2011 - 3:00 pm | घाशीराम कोतवाल १.२
म्होरला भाग कधी येतोय आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या
पुढला भाग ?
3 Feb 2011 - 3:02 pm | नंदन
सहमत आहे :)
3 Feb 2011 - 3:04 pm | प्रीत-मोहर
शमत
5 Feb 2011 - 3:00 am | शहराजाद
मस्त जमलय. मी आधीचे भाग वाचले नव्हते त्यामुळे सलग सर्व वाचता आलं. ग्रामीण बाज छान. सलग वाचतानाही कुठे खटकत नाही.पुढचे भाग लवकर टाका.
19 Jul 2011 - 4:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
म्होर????