एका म्हातार्‍याची गोष्ट...

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
28 Jan 2011 - 8:34 am

मनुष्य का जगतो याचे उत्तर भल्याभल्यांना सापडत नाही, कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना समाधानकारक उत्तर मिळेलच याची खात्री नाही. पण अशा स्थितीत कूणीतरी काहीतरी मनाशी करायचे ठरवुन त्याप्रमाणे आयुष्यभर वर्तन करतात. तोच त्यांचा जीवनाचा हेतु असतो. तेच त्यांच्या आयुष्याला त्यांच्या दृष्टीने सार्थकता देणारे असते. केलेले प्रयत्न यशस्वी होतातच असे नाही. ज्यांच्या भाळी आपल्या आयुष्यात केलेल्या प्रयत्नांना आलेले फळ पहाण्याचे भाग्य असते अशी माणसे दैवी मानली जातात. पण असा प्रयत्न अयशस्वी असलेले त्या त्या समाजाला वाटत असलेल्या आदर्शांप्रमाणे वर्तन करत असतील तर ते त्या समाजाचे आदर्श होतात. समाज त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले किंवा नाही यांचा विचार न करता त्यांना आदर्श मानतात.

पाच हजार वर्षांपूर्वी एका खंडप्राय देशात एक संस्कृती जन्माला आली. आधुनिक युगाच्या विसाव्या शतकात तिचे आदर्श, तिचे वागणे, तिच्या धारणा सर्वसामान्य सभ्य मानलेल्या लोकांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरल्या. खरे तर ७ एप्रिल १७७५ ला सॅम्युअल जॉन्सनने Patriotism is the last refuge of a scoundrel हे वाक्य जगातील मानवांना सांगितले होते. पण इंग्रजी शिक्षणाचा प्रचंड अभाव, नवे न शिकता जुन्या पुराण्या गोष्टींना कवटाळून रहाण्याची वृत्ती त्यामुळे म्हातार्‍या माणसांचे ऐकावे, त्यांना मान द्यावा, त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घ्यावा असला विचार करणारी काही माणसे त्या देशात होती. त्यांना राष्ट्रभक्ती म्हणजे फार काही थोर काम आहे असे वाटायचे. अशा प्रकारचे वातावरण असतांना त्याचा गैरफायदा घेतला जाणारच. तेव्हा सुद्धा असेच झाले.

तर मी सांगत होतो त्या काळातली हकिगत. कधीची म्हणता? फार काही जूनी नाही. पण आज जेव्हा मी शांतपणे त्या घटनेच्या काळाकडे पहातो तेव्हा असे वाटते फार फार युगे लोटली. जणू त्रेता युगातलीच हकिगत. कित्येक हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या काल्पनिक कथा जणू काही काल परवा घडल्या आहेत अशा पद्धतीने त्या कथांच्या नायकांना त्या देशात देव म्हणून मानले जाते. पण केवळ काल परवा घडलेली सत्य गोष्ट जणू त्या देशात घडलीच नसावी की काय असे वाटत आहे.

लोकांच्या भावना भडकावून, त्यांना पद्धतशीरपणे राजसत्तेविरुद्ध लढायला प्रवृत्त करुन आपली पोळी भाजुन घेण्याचे प्रकार या जगात आधी काय झाले नाहीत? धर्माची, राष्ट्रभक्तीची नशा करवुन जनतेभोवती आपल्या सत्ताभिलाशाचा पाश आवळला जात नाही का? जगात सर्वत्र हेच आजवर होत आले नाही का? पण त्या खंडप्राय देशात असा विचार कधी कुणाच्या मठ्ठ मेंदूत आलाच नाही. बिचारे आपले आपल्या नेत्यांच्या सांगण्यावरुन लढत राहिले. कधी तलवारीने कधी स्वतःच्या छातीची ढाल करुन. मेले. कित्येक त्यात हकनाक मेले. खरे तर असल्या क्षुल्लक कारणाकरता मरण पत्करण्याची तयारी असलेले असभ्य आणि असंस्कृत लोक मेलेलेच बरे. नाही का?

तर मी सांगत होतो त्या खंडप्राय देशातील तरुणांना भडकावणार्‍या एका म्हातार्‍याची गोष्ट. तेव्हा त्या खंडप्राय देशात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा यांचा अर्क असलेले महान ब्रिटिश वंशीय लोक राज्य करत असत. कुठलेही चांगले काम करायचे म्हटले की त्याला विरोध हा असतोच. त्यात ही त्या खंडप्राय देशातले बुरसटलेल्या विचारांचे लोक असल्यावर काय विचारता? त्यांनी अगदी पणच केला की हे सभ्य लोक त्या देशात नकोच नको. पण असे केवळ नको म्हणुन कसे चालेल. तुम्ही इथे राहू नका असे सांगितले तरी मागासलेल्या देशांना सुधरवण्याचे असिधारा व्रत घेतलेले ब्रिटिश आपली एका दैवी कामगिरीसाठी नेमणूक झाली आहे हे जाणून होते. त्यांनी दुर्लक्ष केले. पण जेव्हा काही मंडळी जास्तच आगाउपणा करायला लागले तेव्हा त्यांना योग्य ते शासन त्यांनी केले. पण म्हणतात ना कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच ! कुणीच सुधारायचे नावच घेत नव्हते. मात्र काही काही जण फार चांगले काम करत असत. सभ्य आणि सुसंस्कृत ब्रिटिशांनी त्यांच्या कामगिरीची योग्य दखल घेऊन त्यांना रावबहादूर वगैरे पदव्या दिल्या. इनाम दिले. ज्यांनी कसुर केली त्यांना शिक्षा केली. अशाच शिक्षांमधे एक होती जालीयानवाला बागेत केलेली शिक्षा. तिथे किती जणांना शिक्षा केली हे इतिहास संशोधक सांगतीलच पण आपल्याला सध्या त्याच्याशी देणे घेणे नाही. आपण आपली म्हातार्‍याची गोष्ट चालू ठेवू.

तर सांगायची गोष्ट ही की अशा प्रकारे बुरसटलेल्या, पाच हजार वर्षांपुर्वी मरुन बेपत्ता झालेल्या, त्याच त्या रुढी आणि परंपरांचे जोखड घेऊन जगणार्‍या समाजाला सुधरवतांना ज्याप्रमाणे बैलाला आसुड मारुन जुंपावे लागते तसे आसुडाचे फटके मारावेच लागतात. दोन चार किरकोळ वळ उमटणारच. त्याचे एवढे वाईट वाटुन घेण्याची गरज नाही. पण त्या देशातल्या काही वाह्यात मंडळीना हे पटले नाही. त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपले म्हणणे मांडणे चालू ठेवले. शेवटी एक समिती नेमुन काही सुधारणा करता येईल हे पहाण्याचे ठरवले. पण नतद्रष्ट ते नतद्रष्ट ! तेच हो त्या देशातले लोक. आता काय म्हणे तर त्या समितीत त्या देशातला एक पण माणुस नाही. लायकी तरी होती का कुणाची त्या महान सभ्य आणि सुसंस्कृत ब्रिटिशांच्या मांडीला मांडी लाऊन बसायची ! म्हणे समितीत जागा हवी ! असे कधी होते का ! ते काही नाही. समिती येईल. तुमचे काय म्हणणे असेल ते त्यांना सांगा असे सभ्य आणि सुसंस्कृत ब्रिटिशांनी ठणकावुन सांगितले.

आली. समिती आली. ठिकठिकाणी फिरली. बुरसटलेले लोक काळ्या फिती लावत. त्यांना परत जा असे झेंडे दाखवत. समितीच्या सभ्य आणि सुसंस्कृत सदस्यांनी मोठ्या मनाने हा अपमान सहन केला. सगळीकडे ते गेले. फिरले. सगळीकडे हेच. तरी त्यांनी काही मनावर घेतले नाही. पण शेवटी काही झाले तरी ते माणुसच ! एखादा एकदा आपल्याला काळे झेंडे दाखवतो. दोनदा दाखवतो. सहन करतो. पण रोज रोज काय हे बिनडोकासारखे. अरे तुम्हाला काही कामधंदे नसतील पण आम्हाला आहेत ना ! चिडणारच कुणी पण. तेच झाले. असेच एका ठिकाणी एक म्हातारा समोर आला. मागे त्याने चिडवलेली लोकांचा समुह. छे. त्या खंडप्राय संस्कृतीत असलेले हेच म्हातारे सगळ्या अनर्थाचे मूळ आहेत. यांना शिक्षा देउन आटोक्यात आणले म्हणजे ह्या खंडप्राय देशात महान ब्रिटिश सभ्यता आणि सुसंस्कृत विचारसरणी आणता येईल असा विचार करुन समोरच्या शांत उभे असलेल्या समुहावर उगा दोन चार लाठ्या मारल्या. अहो ! दोन चार टाळकी फुटतील पण लोकांना अक्कल तर येईल ! झाले. अगदी तसेच झाले. त्या म्हातार्‍याच्या वर्मी मार लागला आणि त्यानंतर केव्हातरी त्याच्याच मुळे मरुन गेला.

त्या खंडप्राय देशाला सुधरवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील याची हळू हळु कल्पना त्यानंतर सभ्य आणि सुसंस्कृत ब्रिटिशांना आली. शेवटी एक दिवस त्यांनी मरा लेको जे करायचे ते करा असे म्हणुन त्यांनी त्या देशाला सुधरवण्याच्या आपल्या व्रताला अर्धवट सोडून काढता पाय घेतला. आणि त्या खंडप्राय देशातली तीच ती बुरसटलेली, मागासलेली संस्कृती त्यांच्या जुन्या पद्धतीने धंदड तत्तड ढोल वाजवत बसली. त्या खंडप्राय देशात त्यानंतर सभ्य आणि सुसंस्कृत लोक उरले नाहीत असे नाही. ब्रिटिशांनी अनेकांना सभ्यता आणि सुसंस्कृती यांचे पाठ देउन शहाणे केले होते. मात्र आजही तिथली बुरसटलेली माणसे शांतताप्रिय सभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या कानात दडे बसतील अशा आवाजात भारत माता की जय, वंदे मातरम् अशा आरोळ्या मारत बसतात. देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती ह्या आदिम कालातील गोष्टी आहेत हे त्यांना कळलेच नाही अजुन. नाहीच सुधारणार ते. अजुनही त्यांना इंग्रजी सभ्यता आणि सुसंस्कृती यांचा गंध नाही. कपाळावर गंध लावुन कॉम्प्युटर वापरतात. देवाला नमस्कार करुन यंत्र चालू करतात. स्वतः सर्व काही करुन देवाची कृपा म्हणुन हात जोडतात. हा देश माझी आई आहे असले काही बाही बोलतात. त्यांना सुधरवण्याचे, सभ्य आणि सुसंस्कृत बनवण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले हेच खरे ! असो. संपली आमची गोष्ट.

अरे हो ! त्या म्हातार्‍याचे नाव सांगायचेच राहीले. बुरसटलेले राष्ट्रभक्त त्यांना पंजाब केसरी लाला लजपतराय असे म्हणतात. आणि दर जानेवारीच्या २८ तारखेला त्यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहतात. वाहु द्या ... आपल्याला काय !

राजकारणसद्भावना

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

28 Jan 2011 - 8:51 am | नरेशकुमार

वेड्यांचा देश. सगळी वेडी.
म्ह्या वेड्याकडुन एका वेड्याला आदरांजली !

नितिन थत्ते's picture

28 Jan 2011 - 9:03 am | नितिन थत्ते

लालाजींची आठवण काढल्याबद्दल आभार.
लालाजींना आदरांजली.

(अवांतर : ब्रिटिशांना गोळ्या घालण्या ऐवजी त्यांच्यापुढे निदर्शने करणार्‍या आणि "नेभळटपणे" लाठ्या खाणार्‍या लालाजींची भलामण पाहून "राष्ट्रातले" क्षात्रतेज लुप्त होत चालल्याची जाणीव+खात्री झाली आणि जीव घाबरा झाला).

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 9:12 am | llपुण्याचे पेशवेll

थत्त्यांचा प्रहार योग्य ठीकाणी बसला म्हणायचा काय?

बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही.

आता लेखाबद्दल.
भारतीय हे अत्यंत नालायक नीच होते. त्यांचे देव राम कृष्ण इ सर्व काल्पनिक होते. इतकेच काय तर शिवाजी सारख्या दरोडेखोराच्या खोट्या पराक्रमाच्या कथा रचून मूर्खासारखे त्याच्या मागे जात असतात. उद्या हे लोक दाऊद इब्राहीम दर्गा बांधून हाजी दाऊद म्हणून त्याला पूजतील . काही सांगता येत नाही. ब्रिटीशांनी किंवा मुसलमानांनी यांना पूर्ण का सुधरवले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

लाला लजपतराय याना श्रद्धांजली.

भारतीय हे अत्यंत नालायक नीच होते. त्यांचे देव राम कृष्ण इ सर्व काल्पनिक होते. इतकेच काय तर शिवाजी सारख्या दरोडेखोराच्या खोट्या पराक्रमाच्या कथा रचून मूर्खासारखे त्याच्या मागे जात असतात. उद्या हे लोक दाऊद इब्राहीम दर्गा बांधून हाजी दाऊद म्हणून त्याला पूजतील . काही सांगता येत नाही.


खी: खी: खी:
आजकाल पुपेंचे असे औपरोधीक स्वगत ऐकून भलते हसू येते.
बाकी अशा शाब्दीक श्रध्दांजल्या वाहायला आम्ही काही राष्ट्रपती भवनाचा स्टाफ नाही.. त्यामुळे नो श्रध्दांजली..
ईतिहास घडवणार्‍यांनी घडवला, मागे जे राहिले त्यांनी बुड्वला!

सहज's picture

28 Jan 2011 - 11:55 am | सहज

थत्त्यांचा प्रहार योग्य ठीकाणी बसला म्हणायचा काय?

हेच विचारतो.

बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही.

सहमत.

बाकी मुळ लेख ही मनापासुनची आदरांजली आहे की लालाजींच्या जयंतीचा आपल्या लेखनकंड शमनार्थ व कुठल्या अन्य आव्हान/ वादविवादाकरता वापर आहे? हा प्रश्न विचारत आहे. कोणाचे कसले वाद असतील तर ते आपल्या जागी, त्या करता उगाच लालाजींच्या जयंतीचा गैरवापर नको.

अवलिया's picture

28 Jan 2011 - 12:10 pm | अवलिया

>>>>बाकी मुळ लेख ही मनापासुनची आदरांजली आहे की लालाजींच्या जयंतीचा आपल्या लेखनकंड शमनार्थ व कुठल्या अन्य आव्हान/ वादविवादाकरता वापर आहे? हा प्रश्न विचारत आहे. कोणाचे कसले वाद असतील तर ते आपल्या जागी, त्या करता उगाच लालाजींच्या जयंतीचा गैरवापर नको.

सहमत आहे. म्हणूनच तुमचा वरचा प्रतिसाद अस्थानी आहे. धन्यवाद.

बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही

.

असं कसं काय? मग सर्वसाक्षींनी काय फक्त प्रार्थना किटकांचे फोटूच टाकायचे का?

ऋषिकेश's picture

28 Jan 2011 - 9:17 am | ऋषिकेश

लाला लजपतराय यांना आदरांजली

लाला लजपतराय यांना आदरांजली

अमोल केळकर's picture

28 Jan 2011 - 9:27 am | अमोल केळकर

लाला लजपतरायांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
'आदरांजली '

अमोल

विजुभाऊ's picture

28 Jan 2011 - 10:16 am | विजुभाऊ

लाल बाल पाल त्रयी मधल्या लालाजींची आठवण ठेवल्याबद्दल श्री श्री श्री अवलियाजी ना धन्यवाद

आमोद शिंदे's picture

29 Jan 2011 - 8:27 am | आमोद शिंदे

शुद्धलेखण प्रेमी इजूभाऊ,

अवलियाजी हा शब्द अवलिया-जी असा लिहायचा असतो णा?

लाला लजपतराय यांची आठवण करुन दिल्याबद्द्ल शतशः धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

28 Jan 2011 - 12:56 pm | मृत्युन्जय

स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मृतीस आदरांजली.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2011 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

छान लेखन नाना..
लेखनातल्या गाळलेल्या जाग भरुन वाचले, त्यामुळे कळले आणि पटले.

लाला लजपतराय यांना आदरांजली.

कुणी कसल्या ही उद्देशाने हा लेख लिहिला असेना का..
पण लालाजींची आज जयंती आहे हे विस्मरण झाल होतं. उगाच खोट कशाला बोलु?
त्यांची आठवण करुन दिल्या बद्दल अवलिया यांचे आभार.
त्या कणखर म्हातार्‍यास मानाचा मुजरा.

स्पंदना's picture

28 Jan 2011 - 1:40 pm | स्पंदना

हेच म्हणेन.

तस मला अवलियांच लेखण आवडत. असेल उपहास पण तो ही सह्ही.

पैसा's picture

28 Jan 2011 - 9:42 pm | पैसा

गणपा आणि अपर्णाशी सहमत.

श्रावण मोडक's picture

28 Jan 2011 - 1:52 pm | श्रावण मोडक

चक्क बऱ्याच काळानं अवलियांचं हे असं चांगलं लेखन. सूर्य कुठं उगवलाय आज?

लालाजींना भावपूर्ण आदरांजली.त्यांच्यासारख्या अनेकांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र देशात राहत आहोत याचे भान ठेवलेच पाहिजे.

तरीही लेख वाचून का माहित नाही पण पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील गच्चीची आठवण झाली.चाळीचा मालक गच्ची ताब्यात घेणार असतो आणि चाळकऱ्यांचा त्यांना विरोध असतो.तेव्हा काय करायचे यासाठी विचार चालू असताना आचार्य बाबा बर्वे उभे राहतात.त्यांची सुरवात : "भारतीय संस्कृती महान आहे.प्राचीन काळातील ऋषिमुनींनी किती गहन प्रश्नांची उत्तरे देऊन ठेवली आहेत" आणि इत्यादी इत्यादी.त्यावर चाळीतला कोणीतरी म्हणतो "अरे पण या सगळ्याचा गच्चीशी काय संबंध"! नंतर आचार्य अर्धा-पाऊण तास वेदकालीन जंगलांमध्ये वाट चुकून मग गच्चीविषयी बोलू लागतात (हे शब्द माझे नाहीत तर पु.लं च्या कथाकथनात आहेत). निदान चाळकऱ्यांना गच्चीविषयी सभा आहे हे माहित तरी होते तेव्हा आचार्य काही वेळाने तरी गच्चीविषयी बोलू लागतील हे त्यांना माहित होते.इथे तर हा लेख नक्की कशाविषयी आहे ते आधीच माहित असायचे काही कारण नव्हते.तसेच सुरवातीला भारतीय संस्कृतीच्या खोऱ्यात भटकून नंतर लेख निघाला लालाजींवर!!

स्वाती२'s picture

28 Jan 2011 - 5:03 pm | स्वाती२

आदरांजली!

sneharani's picture

28 Jan 2011 - 5:16 pm | sneharani

लाला लजपतराय यांना आदरांजली!!
छान लेखन!

प्राजक्ता पवार's picture

28 Jan 2011 - 5:57 pm | प्राजक्ता पवार

लाला लजपतराय यांना आदरांजली .

लाला लजपतराय यांना आदरांजली .

चिगो's picture

28 Jan 2011 - 9:35 pm | चिगो

लालाजींना आदरांजली..

रेवती's picture

28 Jan 2011 - 9:46 pm | रेवती

लालाजींना आदरांजली.

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2011 - 12:10 pm | स्वाती दिनेश

लालाजींना आदरांजली.
स्वाती

प्राजु's picture

28 Jan 2011 - 11:36 pm | प्राजु

सुरेख!!! नाना.. हॅट्स ऑफ!!
लालजींना आदरांजली.

निनाद's picture

29 Jan 2011 - 4:10 am | निनाद

लालाजींची योग्य आठवण दिल्या बद्दल धन्यवाद!

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 6:06 am | नरेशकुमार

आश्चर्य आहे. २४ तास उलटुन गेले तरी लालांजीचे पोस्ट-मार्टेम चालु झाले नाही.
स्वगत : मीपावरच आहे ना मी नक्कि ?

’लाल, बाल आणि पाल’ या त्रयीतील लाला लजपतराय यांना आदरांजली. त्यांचा वाढदिवस माहीत नव्हता तो सांगितल्याबद्दल अवलियाजींना धन्यवाद!