स्वातंत्र्य !!
...`गेली सहा दशके आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवतो आहोत. आपली पिढी धन्य आहे, कारण आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो... आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आपण त्या सर्वांचे स्मरण करू या, आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्यांना वंदन करू या... त्या पिढीच्या त्यागामुळेच आपण मुक्ततेचा आनंद मिळवला आहे'...
... प्रजासत्ताक दिनानिमित्त आखलेल्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत एक वक्ता भारावून भाषण करत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून स्वातंत्र्याच्या आनंदाची कारंजी फुलत होती, आणि श्रोतेही माना डोलावून त्याला सहमती देत होते... बाजूच्या स्तंभावर, नुकताच आरूढ झालेला तिरंगाही वार्याच्या मंद झुळुकेबरोबर हलका झुलत होता... ध्वजस्तंभाच्या अवतीभवती पसरलेल्या झेंडूच्या पिवळ्याधमक पाकळ्यांवर पसरलेल्या सकाळच्या सूर्यकिरणांनी पाकळ्या सोनेरी केल्या होत्या... वातावरण अवघे भारून उठले होते... त्या लहानश्या सभागृहात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत होता, आणि त्या भारलेल्या वातावरणात घुमणारे ते राष्ट्रभक्तीने भारलेले शब्द मला मात्र उगीचच बोचत होते... माझ्या डोळ्यांसमोर वेगळेच काहीकाही नाचत होते... मी त्या शब्दाशब्दागणिक अस्वस्थ होत होतो...
सकाळी त्या कार्यक्रमाला निघण्यासाठी मी घराबाहेर पडलो, तेव्हा नुकतीच वर्तमानपत्रं येऊन पडली होती. निघतानिघता मी सहज सवयीप्रमाणे एकदोन पेपरांचे पहिले पान चाळले. प्रजासत्ताक दिनाच्या त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचा पहिला मथळा वाचताच, खरं तर, घराबाहेर पडायचा आणि अगदी खरं सांगायचं तर, झेंडावंदन करायचाही उबग आला... डोकं भण्ण झालं... आजचा आपला दिवस अस्वस्थ, बचैन जाणार याची खात्री पटली, तरीही मी बाहेर पडलोच...
... घरून निघाल्यावर मी ज्या रस्त्यावरून नेहेमी जातो, तिथे एका फूटपाथवर उभ्याआडव्या पत्र्यांनी रचलेली एक झोपडी आहे. पाचसहा फूट रुंद, आणि चांगली बारातेरा फूट लांब... आतमध्ये टीव्ही, फ्रीज, कपाट.. सगळं बाहेरून जाताना सहज दिसतं... झोपडीच्या बाहेर, दोनतीन स्कूटर आणि एक कार पार्क केलेली असते. आत कुणी दोनचारजणं मस्त निवांत लोळत टीव्ही पाहाताना दिसतातच... केव्हाही!
खरं म्हणजे, ह्यात सांगण्यासारखं काहीही नाही... मुंबईत अनेक ठिकाणी अनेकांना असं कुठे ना कुठे पाहायला मिळत असेलच. मुद्दाम सांगण्यासारखं म्हणजे, त्या झोपडीतल्या पसार्यात, मुक्तपणे वावरणारे, प्राणी आणि पक्षी! केव्हाही तिथून जाताना मी मुद्दाम त्या झोपडीत पाहातोच, ते त्यांच्यासाठी! पाचसहा गलेलठ्ठ पोपट आणि साताआठ मांजरं, सुस्तपणे त्या पसार्यात बसलेली असतात. त्यांच्या मालकासारखीच! एखादा पोपट टीव्हीवर, एकदोघं खुर्चीच्या पाठीवर, कुणी चटईवर, तर कुणी चक्क एखाद्या मस्तवाल बोक्याच्या पाठीवर... मला ह्या `सहजीवना'ची नेहेमीच भुरळ पडलेली असते...
... आज घराबाहेर पडल्यावर तिथून जाताना मी सवयीनुसार झोपडीकडे मान वळवली... तेच दृश्य पुन्हा पाहिलं.
पण आज मला भुरळ पडलीच नाही. गंमतही वाटली नाही.
ते सुस्तपणे फिरणारे पोपट, मधेमधे लुडबुडणारी गलेलठ्ठ मांजरं, आणि पसार्यात लोळणारा मालक... सगळं बघताना मला जाम किळस आली...
हे असं होणारच हे कदाचित घराबाहेर निघतानाच ठरलेलं असावं...
कारण, बाहेर पडतापडता वाचलेल्या वर्तमानपत्रांनी माझ्या मनातल्या प्रजासत्ताक दिनाच्या वातावरणावर पाणी फेरले होते... मनमाडजवळ यशवंत सोनावणे नावाच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्याचा तो रॉकेल माफियांनी जिवंत जाळलेला देह, डोळ्यांसमोर येत होता... आज त्यांच्या घरी कसे असेल, या चिंतेनं मी उगीचच व्याकुळ होत होतो...
आता यापुढचा प्रत्येक प्रजासत्ताक दिन, त्यांच्या घरी, असाच, काळा असणार!
... विचारांनी डोकं भणभणत असतानाच मी झेंडावंदनाच्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावली, झेंडावंदन केलं, आणि यंत्रासारखा नंतरच्या सभेला श्रोत्यांमध्ये जाऊन बसलो...
त्या वक्त्याचं भाषण संपताच सण्णकन मला ती झोपडी आठवली... ते मनसोक्तपणे हिंडणारे हिरवेगार, गलेलठ्ठ पोपट डोळ्यासमोर दिसू लागले...
आणि मी बैचैन झालो...
डोक्यात विचारांचं थैमान माजलं...
एक गोष्ट मला पहिल्यांदाच, नव्यानं जाणवली...
त्या पोपटांना कधीही पिंजर्यात बंद केलेलं मी पहिलं नव्हतं...
ते त्या दहा बाय बाराच्या झोपडीत मुक्तपणे, निर्भयपणे संचार करत होते.
... आज मनात आलं,
.. म्हणजे ते पोपट स्वतंत्र, मुक्त आहेत?
त्यांच्याभोवती पिंजरा नाही. ते निर्भय, आश्वस्तही आहेत...
पण ते स्वतंत्र आहेत?
मग ते उडत का नाहीत?... बाहेरच्या, मोकळ्या आकाशात भरारी का मारत नाहीत?
आपल्या मुक्तपणाला ते `स्वातंत्र्य' मानत असतील?
मी उत्तरं शोधू लागलो. मनाशीच...
आणि एकेक धागा नकळत जुळत गेला...
आपणही स्वतंत्र आहोत. आपल्याभोवती आता पारतंत्र्याचा पिंजरा कुठाय?...
... म्हणजे, आपली अवस्था त्या पोपटांसारखी तर नाही?... मुक्त, असूनही कुठेतरी जखडल्यासारखी?...
आपल्याभोवती दीडशे वर्ष असलेला पिंजरा त्यांनी कादून बाजूला केला...
... पण आपण उडू कुठे शकतोय?
... सभा संपली तरी माझं डोकं भण्ण होतं.. तसाच मी बाहेर पडलो, आणि घराकडे येऊ लागलो...
वाटेत एक तरुण दिसला... खिशाला टाचणीनं एक कागदी तिरंगा टोचलेला... हातात एक कागदाची घडी.. इकडेतिकडे पाहात चाललेला...
काहीतरी शोधत असल्यासारखा...
मला पाहाताच समोर आला, आणि हातातला कागद माझ्यापुढे करत त्यावरचा पत्ता मला विचारला...
तिथल्या झेंडावंदनाच्याच कार्यक्रमासाठी तो मुद्दाम कुठून आला होता.
मी घड्याळाकडे पाहिलं.
दहा वगैरे वाजत आले होते.
त्यानं ओळखलं...
`कार्यक्रम उशीराच आहे... मुदामच उशिरा ठेवलाय.. सुट्टी आहे ना... मग लोकं लवकर उठत नाहीत... म्हणून'... तो म्हणाला.
मग मी त्याला पत्ता सांगितला.. माझ्या वाटेवरच होता. आम्ही सोबतच चालू लागलो...
वाटेत एका ठिकाणी मी त्याला बोटानं ती जागा दाखवली...
लाऊडस्पीकरवर लता मंगेशकरांचं ते, ऐ मेरे वतन के लोगो... वाजत होतं.
आणि सातआठ कार्यकर्ते खोळंबल्यासारखे येऊन थांबले होते...
गर्दीची वाट बघत.
स्तंभावरचा तिरंगाही घडीतच थांबला होता... ताटकळत.
http://zulelal.blogspot.com
-------------------------------------
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 10:04 am | सहज
प्रभावी मुक्तक!
दिनेश५७ हे सातत्याने उत्तम लेख लिहतात. मोजका मजकूर पण बिंदूगामी! अचूक वेध.
आता प्रत्येक जण स्वतंत्र आहे व प्रत्येक जण मनमानी करत आहे. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विश्व तर हवे आहे व तेदेखील त्यांच्या स्व:ताच्याच शर्तीवर.
28 Jan 2011 - 10:06 am | यशोधरा
नेहमीप्रमाणेच उत्तम.
28 Jan 2011 - 2:47 pm | गणपा
असच म्हणतो.
दिनेशभौ फार कमी लिहिता पण कोलिती राखतात.
28 Jan 2011 - 10:13 am | llपुण्याचे पेशवेll
छान लेख. "सा विद्या या विमुक्तये" हे भक्त प्रह्लादाच्या कथेतलं प्रह्लादाच्या तोंडी असलेलं वाक्य आठवलं.
28 Jan 2011 - 12:40 pm | गणेशा
मस्त लिहिले आहेत..
बंदिवान नसलेल्या विचारांची फडफड पुन्हा जोराने होउ लागली आहे आपल्या लिखानामुळे ...
28 Jan 2011 - 3:29 pm | अवलिया
मस्त !!
28 Jan 2011 - 4:14 pm | मेघवेडा
वा. नेहमीप्रमाणेच उत्तम प्रकटन.
28 Jan 2011 - 4:20 pm | sneharani
मस्त लेख!
28 Jan 2011 - 11:50 pm | आत्मशून्य
दर्जेदार लेखन.
29 Jan 2011 - 12:47 am | मराठे
अत्यंत मनापासून लिहिलेलं म्हणूनच मनाला भावलेलं मुक्तक.
29 Jan 2011 - 12:54 am | निशदे
दिनेश,
अतिशय सुंदर शब्दात मनातले बोललात. निराश होउ नका...वादळाने केलेला विध्वंस जितका नजरेत भरतो तेव्हढा टिकून राहिलेल्या एखाद्या पणतीचा प्रकाश नसेल कदाचित नजरेत भरत........पण म्हणून तिचे महत्त्व कमी होत नाही. अशा अनेक पणत्या आजूबाजूला दिसत असतात. त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. देशावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. लोकशाहीवरचा तर त्याहून नाही.
:)