डांबीस डोंब्या
- - - - - - - -
पहाट झाली आणि पाण्याच्या चकचक चकाकीमुळे डोंब्या डोमकावळ्याची झोप मोडली. "आईने न्याहारीसाठी काय बरे केले असेल?" म्हणून त्याने डोळे किलकिले केले. "क्राऊ-क्राऊ आऊ, काय-काय खाऊ?" म्हणून त्याने आईला हाक मारली. काहीच उत्तर आले नाही.
मग त्याला आठवले. कालच आई त्याला किती रागावली होती - "एवढा मोठ्ठा बगळा झालास, पण तरी आईकडूनच दाणा हवा! उद्या पहाटे उठायचे नि स्वतःच खायचे शोधायला जायचे."
रागवल्यामुळे आई उत्तर देत नसेल ना? त्याने डोळे मोठ्ठे करून बघितले. अबब! झोपेत तरंगत-तरंगत तो आपल्या बिळापासून कितीतरी दूर आला होता. अगदी दूरवर त्याची आई कमळाचे पराग गोळा करत होती, तिला त्याचे कसे ऐकू जाणार? "नैच मागायची न्याहारी आईला" डोंब्या फुरंगटून पुटपुटला.
डुंबत-डुंबत तो थेट पलीकडच्या काठाला पोचला. इतका दूर तो कधीच आला नव्हता. तिथे त्याने बघितले, किनार्यापाशी पत्रावळीवर भाताची एक मूद ठेवली होती. जवळच सूटबूट घातलेले पाच-सात साहेब आणि एक मड्डम होती. त्यांचे लक्ष जाणार नाही असा लपत-छपत डांबीस डोंब्या मुदीकडे सरकू लागला. पण प्रत्येक वेळा लोक "आला, आला, कावळा आला..." ओरडायचे आणि डोंब्या घाबरून पळून जायचा. मग लगेच लोक आरडाओरडा करू लागायचे : "जॅककाका, मी घेतो जिलकाकूची काळजी!", "जॅक डार्लिंग, तुझ्या त्या छोकरीला माफ केले!"...
डोंब्याच्या पोटात कावळे भलतेच कावकाव करू लागले. त्याचा सावधपणा मुडपला. धावत-धावत तो मुदीपाशी गेला आणि मूद पंजात पकडली. लगेच सगळे लोक ओरडले "शिवला, शिवला, कावळा पिंडाला शिवला! किती वायदे करवून घेतले म्हातार्याने... आता घरी जाऊया..."
पण धसमुसळ्या डोंब्याने धरली तशी धपकन पडून मूद मोडली. सगळा भात पाण्यात पार बुडून गेला. डोंब्या बिचारा खजील झाला. त्या किनार्यावर पुढे त्याला एक मोठ्ठे घरटे दिसले. त्यात एकच अंडे होते. डोंब्या म्हणाला "एकच का होईना, याने भूक थोडी तरी भागेल." मग तर गंमतच झाली. अंडे आपोआप गडाबडा लोळू लागले. डोंब्याने टोचा मारताच अंडे टककन तुटले, आणि आतून एक चट्टेरी-पट्टेरी मनीमाऊचे पिल्लू बाहेर आले. पण लगेच पाठीमागे मोठ्ठाली डरकाळी ऐकू आली. "गुर्र-र्र-र्र. कोण आहे तो डोमकावळा माझ्या घरट्यात..." अरे, हे तर वाघिणीचे घरटे होते! आणि अंड्यातले पिल्लू मनीमाऊ नव्हते, हा तर वाघाला छावा होता!" वाघिणीने झडप घातली, तसा डोंब्या पाण्यात सूर मारून थोडक्यात वाचला. घाबरून त्याच्या पोटातले कावळे चिडीचूप झाले. मागे-पुढे न बघता त्याने घरचा किनारा गाठला. सरळ आपल्या बिळात घुसला.
आत आई होती. म्हणाली, "डोंब्या, ठोंब्या - किती उशीर केलास न्याहारीला." कमळाच्या परागाची गरमागरम भाकरी आईने त्याच्यापुढे आदळली. आई कालचे रागावणे विसरले होती वाटते.
डोंब्याच्या कमाईचा भात वाया गेला होता. नि अंडे तर मिळालेच नव्हते. पण आईच्या भाकरीपुढे त्यांची आठवणही डोंब्याला आली नाही. डोंब्या बिळातला सगळ्यात आनंदी डोमकावळा होता!
- - -
प्रतिक्रिया
22 Jan 2011 - 6:33 am | नाटक्या
मला वाटले पिडांकाकांबद्दल काही लिहिले का? .. बघतो तर "काका मला वाचवा!!!"
बाकी चालू द्या
23 Jan 2011 - 8:13 pm | चित्रा
डांबिस (बहुदा मूळचे) डोंबिवलीकर, म्हणून डांबिस डोंब्या असे कोणी लिहीले की काय असे खरेच मला वाटले. हा हा. :))
बाकी, हे प्रतिसादात्मक लिखाण भारी मनोरंजन करून गेले :)
25 Jan 2011 - 3:54 am | पिवळा डांबिस
हाहाहा!
मनोरंजन नाही तर काय!
जॅककाकाचे पिंड काय आणि वाघाचं अंडं काय!!
या धनंजयाला आता विजुभाऊंसारखी स्वप्न पडायला लागलेली दिसताहेत!!!
तरी नशीब हे "क्रमशः" नाही दिलं!!!!
:)
-डोंब्या डांबिस
22 Jan 2011 - 7:13 am | स्वानन्द
>>हे तर वाघिणीचे घरटे होते! आणि अंड्यातले पिल्लू मनीमाऊ नव्हते, हा तर वाघाला छावा होता
>>डोंब्या बिळातला सगळ्यात आनंदी डोमकावळा होता
>>झोपेत तरंगत-तरंगत तो आपल्या बिळापासून कितीतरी दूर आला होता
>>त्याची आई कमळाचे पराग गोळा करत होती
कुठल्या शेंच्युरीची कथा म्हणायची ही!
नवीनच साहित्य प्रकार! लई भारी :D
22 Jan 2011 - 8:01 am | आत्मशून्य
हा हा हा
22 Jan 2011 - 8:32 am | नितिन थत्ते
मस्त.
22 Jan 2011 - 8:43 am | सहज
उत्तर ध्रुवावर पेंग्वीन, वाघीणीचे अंडे = बालकथा प्रतिसाद
बालकथा मजेशीर असतात पण शक्यतो त्या अश्या असाव्यात की त्यातुन उपयुक्त माहीती अगदी सहज लक्षात राहील.
आग्नेय, नैऋत्य, वायव्य , इशान्य ह्या दिशा जेव्हा मी पहिल्यांदा ऐकल्या तेव्हा कळल्या नाहीत की नीट लक्षात राहीले नाही. कधीतरी वायव्य सरहद्द गांधी (इतिहास), नैऋत्य मोसमी वारे (टिव्हीवर हवामान माहीती, उपग्रह चित्र) हे इतर उल्लेखातुन ऐकून, पाहून तसेच घोकंपट्टी केलेला आग्नेय, नैऋत्य, वायव्य , ईशान्य हा क्रम लक्षात असल्याने बरोबर दिशा कळल्या.
काही श्लोक, कथा, अब्रिव्हीएशन ह्या अशाच त्यातील रंजक मुल्य, ताल, सूर यामुळे लक्षात राहील्या तर ते ज्ञान जास्त श्रम न करता लक्षात रहाते. हाच मुद्दा लक्षात ठेवून बालकथा सांगाव्यात इतकेच.
22 Jan 2011 - 10:12 am | मृत्युन्जय
अगदी बरोबर. वायव्य सरहद्दीवरुन मला पण वायव्य दिशा लक्षात रहायला लागली. इशानेकडची राज्ये यावरुन इशान्य लक्षात रहायला लगाली, नैऋत्य मोसमी वार्यांमुळे ती लक्षात रहायला लागली. उरलेली दिशा ती आग्नेय हे ठरवुन टाकले :).
23 Jan 2011 - 9:06 pm | पंगा
उत्तम!
श्री. खान अब्दुल गफार खान यांचा जन्म सत्कारणी लागला म्हणायचा! :D
23 Jan 2011 - 2:48 am | पंगा
हे कोठे दिसले?
23 Jan 2011 - 3:20 am | धनंजय
येथे जवळच.
(त्या ठिकाणी कथेचे भाषांतर चांगलेच आहे. पण माझ्या प्रतिसादाबद्दल भाषांतरकत्रीचा गैरसमज झाला होता.)
23 Jan 2011 - 10:05 pm | पंगा
हा संदर्भ माहीत नसल्यामुळे (थोडक्यातः ती कथा वाचलेली नव्हती.) अगोदर काहीच प्रकाश पडला नाही; केवळ 'हा बहुधा काहीतरी सुसंबद्ध भासणार्या जाणूनबुजून असंबद्ध लिखाणाचा प्रयत्न - आणि अॅज़ फार अॅज़ सुसंबद्ध भासणार्या जाणूनबुजून असंबद्ध लिखाणाचे प्रयत्नाज़ गो, अतिशय चांगला प्रयत्न - असावा' असा ग्रह झाला. आता या संदर्भाच्या प्रकाशात अर्थबोध होत आहे.
संदर्भाच्या प्रकाशात कथा भावली. (तशी निखळ करमणूक म्हणून अगोदरही आवडली होती, परंतु तिचा अपेक्षित तो परिणाम झाला नव्हता हे कबूल करण्यास यत्किंचितही लाज वाटत नाही.) मात्र, हा संदर्भ सांगितल्याशिवाय समजण्यास दुर्बोध आहे, असेही सुचवावेसे वाटते.
कथेतील ज्याककाकाचे पिंड (काय कल्पना आहे! जबरी आवडली.) ठेवायचेच होते (म्हणजे जरूर ठेवावे. हरकत काहीच नाही; उलट ही कल्पना याअगोदर कोणाला कशी सुचली नाही, याचेच आश्चर्य वाटते.), तर ते भाताचे ठेवण्याऐवजी स्पाघेत्ती आणि मीटबॉल्स किंवा तत्सम कशाचे ठेवले असता अधिक सयुक्तिक झाले असते, असे वाटते.
अतिअवांतर: (या मुद्द्यास फारसे महत्त्व नाही, आणि 'मिसळपाव'वर तर मुळीच नाही, पण तरीही, केवळ एक वैयक्तिक कुतूहल म्हणून) 'भाषांतरकत्री' आणि 'भाषांतरकर्त्री' यांपैकी (हा शब्द लिहिण्याची) नेमकी कोणती पद्धत प्रमाण आणि नेमका कोणता टंकनदोष आणि/किंवा स्वभाषेत आत्मविश्वासाने लिहिणार्याचा अधिकार (आणि/किंवा तद्भव शब्द) गणता यावा, याबद्दल किंचित साशंक आहे.
23 Jan 2011 - 10:47 pm | चित्रा
शब्द भाषांतरकार (हा शब्द पुरुषवचनी वाटतो) असा वाचलेला आहे, पण कर्ती किंवा कर्ता असाही वाचल्याचे स्मरते, पण भाषांतरकर्ती किंवा भाषांतरकर्ता या शब्दाचा वापर जालावर झाल्याचे दिसत नाही.
अति-अति-अति अवांतर: पंगा यांची लेखनशैली माझे नेहमीच जरा कुतुहल चाळवते. (मला आवडली नाही तरी) ती तशी असण्याचा त्यांचा अधिकार मी मान्य करते. कितीही अवांतर असले, तरी पंगा यांच्या लेखनातून कधीकधी विचार करण्याची फारच वेगळी दिशा दिसते असे वाटते. पण ही दिशा दिसल्यानंतर किंवा, दिसली असे भासल्यानंतर ती या प्रतिसादांमध्ये दिसणे किंवा (प्रतिसादांमध्ये) दिसल्यासारखी भासणे हे योग्य आहे का नाही, किंवा कसे, याबद्दल मनात एक प्रकारची आशंका उत्पन्न होते. किंबहुना असे अवांतर हे ज्ञानात भर पाडत असल्याने त्याला विरोध करावा का करू नये, किंवा या अवांतरातूनही एखादी नवीन कथा निर्माण होऊ शकेल की काय अशा प्रकारची देखील एक (भय) शंका निर्माण होते.
23 Jan 2011 - 10:57 pm | धनंजय
+१
सध्याच्या तत्सम शब्दांसाठीच्या नियमांनुसार "कर्त्री" आणि मराठी भाषेच्या सहज (आत्मविश्वासाने) बोलण्यानुसार "कर्ती" हे दोन्ही योग्य वाटतात.
("कत्री" हा टंकनदोष आहे, हे सांगणे नलगे.)
((अतिअवांतर : पंगा यांची खरडवही चालू नसल्यामुळे त्यांच्याशी काही अवांतर पण उपयोगी चर्चा करायची असेल धाग्यामध्ये करावी लागते.))
23 Jan 2011 - 11:04 pm | Nile
एका असयुक्तिक विषयावरुन सुरुझालेल्या सयुक्तिक धाग्यावर अशी असयुक्तिक चर्चा सयुक्तिक आहे का नाही अशी एक शंका इथे विचारणे सयुक्तिक होईल की नाही असा एक असयुक्तिक विचार मनात डोकावुन गेला.
अ-सयुक्तिक.
23 Jan 2011 - 9:21 pm | पंगा
म्हणूनच सरकारी हिंदीत या उपदिशांना (इंग्रजीप्रमाणे) दक्षिणपूर्व (=आग्नेय), उत्तरपूर्व (=ईशान्य) अशांसारखी नावे वापरत असावेत काय?
याचा अर्थ हिंदीभाषकांना ही दिशांची नावे मराठीभाषकांहूनही अधिक लक्षात राहत नाहीत (पर्यायाने: हिंदीभाषकांची स्मरणशक्ती मराठीभाषकांहूनही कच्ची) असा, की येथे मराठीभाषकांना हिंदीभाषकांकडून काही शिकण्यासारखे आहे? ;-)
अवांतरः 'पूर्व' म्हणजे जर 'आधीचे', तर त्याच्या बरोबर विरुद्धार्थी 'उत्तर' ही दिशा तिच्या १८० अंशात का नाही? की 'पूर्व'पासून सुरुवात करून ९० अंशाचे थांबे घेत घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वर्तुळाकार जात राहिल्यास, 'पूर्व'च्या 'उत्तर' जी दिशा येते ती 'उत्तर' - आणि 'उत्तर'च्या 'पूर्व' जी दिशा येते ती 'पूर्व' - अशी काही 'वर्तुळाकृती व्याख्या' (मराठीतः सर्क्युलर डेफिनिशन) आहे?
23 Jan 2011 - 2:21 pm | राजेश घासकडवी
धन्या नावाचा एक मुलगा होता. तो खूप छान लिहायचा. तो प्रत्येक शब्द अगदी मनापासून, विचार करून लिहायचा. असे विचारपूर्वक लिहिलेले खूपसे शब्द एकत्र करून तो त्यांची सुंदर लांबलचक वाक्यं तयार करायचा. ती वाक्यं वाचून बहुतेक वेळा लोक 'हम्म्म्म, बरोबर आहे धन्याचं म्हणणं' असं म्हणून माना डोलवायचे. त्याने लिहिलेले कठीण कठीण शब्द कळले नाही तरीही लोक माना डोलवायचे. किंबहुना कधी कधी काय व्हायचं, की ज्यांना ते शब्द कळले नाहीत ते जोराजोरात माना डोलवायचे. कारण तो कमी वेळा लिहायचा, पण जेव्हा लिहायचा तेव्हा इतकं अचूक लिहायचा की त्याची तशी ख्यातीच झाली होती. तो कमी लिहायचा हे एका अर्थाने बरंच होतं नाहीतर लोकांच्या माना दुखायला लागतील की काय अशी काही जणांना भीती वाटायची.
पण एकदा आक्रितच झालं. त्याने मोठ्या प्रयत्नपूर्वक, नेहेमीच्याच विनयशीलपणे काही वाक्यं लिहिली. पण यावेळी माना डोलवण्याऐवजी काहींनी प्रश्नार्थकपणे थोडी मान वाकडी केली. धन्याला ते खूप लागलं. तो हिरमुसला झाला. आपल्या शब्दांचा गैर अर्थ काढला जातो आहे हे त्याला बिलकुल आवडलं नाही. त्याने या प्रश्नाचा नेहेमीप्रमाणेच गंभीरपणे विचार केला. पण त्याला त्यावर काय करावं कळेना. बिचारा धन्या. खट्टू होऊन खिडकीबाहेर बघत बसला.
बाहेर भरपूर बर्फ पडलेलं होतं. त्यामुळे सगळं काही पांढरं शुभ्र दिसत होतं. रस्त्यावरून काळा कोट घालून जाणारा एक माणूस दिसला. त्या काळ्या कोटामुळे त्याला क्षणभर पेंग्विनचा भास झाला. 'छे, इथे पेंग्विन कसे दिसतील' असं म्हणून त्याने ती कल्पना झटकून टाकली. तो माणूस लांब गेल्यावर त्याला अचानक डोमकावळ्याचा भास झाला. त्यावरून तो विचारात पडला. माणूस, पेंग्विन की डोमकावळा यांच्यातल्या परिवर्तनीय किंवा सापेक्ष सत्याच्या आभासी प्रतीतीचा सम्यक आढावा त्याने घेतला. किंबहुना ही प्रतीतं सापेक्ष असल्यामुळे सत्य हे परिवर्तनीय असावं असंही त्याला सम्यकपणे वाटून गेलं. पण हा विचार मांडावा कसा? इतक्या सोप्या भाषेत तर लिहून चालायचं नाही. ती मांडणी कशी करावी यावर विचार करण्यात गढून गेला.
अचानक त्याला एक नामी युक्ती सुचली. या बदलत्या सत्याचं स्वरूप दाखवण्यासाठी सत्य बदलूनच लिहिलं तर? युरेक्क्का असं ओरडून तो भराभरा कामाला लागला. सत्यबदलाचे परिणाम दाखवण्यासाठी त्याने बदलत्या सत्यांची एक कथा लिहिली. ती कथा वाचून तो स्वतःशीच खूष झाला. विशेषतः अतिसोप्या भाषेत लिहिण्याची आपली चलाखी त्याला खूपच आवडली होती. आता तो वाचकांकडून पुन्हा एकदा माना तिरक्या होण्याची वाट पाहू लागला. मान तिरकी झाली रे झाली की तो सत्यच तिरकं आहे हे सांगू शकणार होता. त्याला आतल्या आतच गुदगुल्या होत होत्या.
पण हाय रे दैवा. झालं भलतंच. धन्याने काही लिहिलं की माना डोलवायच्या याची सर्वांना सवय झालेली असल्यामुळे एखादा अपवाद वगळता कोणी माना तिरक्या केल्या नाहीत. मग त्याचा डांबीसपणा लक्षात येणं दूरच राहिलं. अशा रीतीने त्याची अवस्था गळ लावूनही मासे न सापडलेल्या त्या विचित्र नावाच्या परदेशी मुलीसारखी झाली. पेंग्विन किंवा डोमकावळे आपले मासे पळवत तर नाहीत ना अशी शंकाही त्याला चाटून गेली. व तो पुन्हा थोडासा खट्टू झाला.
तात्पर्य - खट्टू व्हायचं नसेल तर तसं न होणं हाच उपाय आहे.
23 Jan 2011 - 5:32 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
धन्या, आय मीन धन्य आहाता गुर्जी!
23 Jan 2011 - 5:44 pm | प्रियाली
नुकतीच उपक्रमावर जिनिअस लोकांची लक्षणे (थोडक्यात) लिहिली होती त्याची आठवण झाली. ;)
घासुंचा प्रतिसाद भारी आहे.
23 Jan 2011 - 5:35 pm | प्रियाली
मी इतर काही न वाचता ही कथा वाचल्याने मला फारसा अर्थबोध झाला नव्हता. धनंजय यांना रात्री झोप येत नसावी आणि म्हणून अशी कथा लिहिली का काय असे वाटून गेले. :) परंतु येथील काही प्रतिसाद वाचल्यावर संदर्भ लागला.
लहानपणी स्नोव्हाईटच्या कथेचे हिमगौरी असे भाषांतर वाचले होते. त्यावेळी युरोपातील देश वगैरे माहित नसल्याने हिमगौरी ही जवळपासच किंवा हिमालयाच्या आसपास राहात असावी असे वाटत असे. (हिमालयही फारसा माहित होता असे नव्हे पण थोडीफार कल्पना होती.) परीकथांमध्येही संदर्भ देताना दिशा, प्राण्यांचे स्वभाव आणि ठिकाणे यांचा योग्य वापर दिसतो. हिमगौरी युरोपातील वनात हरवते तेव्हा तिच्यासमोर वाघ-सिंह येत नाहीत. खारी, ससे, पक्षी असेच प्राणी दिसतात.
ज्या कथेमुळे डांबीस डोंब्याचा जन्म झाला तेथे पेंग्वीनऐवजी ध्रुवीय अस्वल चालून गेले असते या धनंजय यांच्या मताशी सहमत आहे.
असो, संदर्भ लागल्यावर कथा पुन्हा वाचली आणि डांबीसपणा आवडला.
23 Jan 2011 - 6:32 pm | Nile
धनंजय म्हणजे फारच डांबिस ब्वॉ!
23 Jan 2011 - 7:08 pm | विकास
संदर्भ समजल्यामुळे कथाप्रकार एकदम आवडला! जरी बालकथा म्हणले असले तरी बालांकरता कथा म्हणण्यापेक्षा स्वतःतील बालपण जपून ठेवण्यासाठी लिहीलेली कथा आहे असे देखील म्हणता येईल. :)
कधी काळी कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजीला वाघिणीचे दुध म्हणले होते. आता धनंजय यांच्या कथे मुळे कोणी मराठीला वाघिणीचे अंडे म्हणले नाही म्हणजे मिळवली. ;)
23 Jan 2011 - 11:16 pm | सविता
अच्छा...अच्छा......
"उत्तरध्रुवीय प्रदेशात पेन्ग्विन सापडतो"..... म्हणुन "वाघिणीला अंडे" काय......
चान चान........
24 Jan 2011 - 10:13 am | विजुभाऊ
एक शंका:
लोक माशांची अडी खातात , कोंबडीची अंडी खातात , बदकाची खातात मग ते उंदराची अंडी का खात नाहीत
24 Jan 2011 - 11:42 am | टारझन
कारण त्या अंड्यांवर बाऊ असतो म्हणुन !!
24 Jan 2011 - 4:18 pm | विजुभाऊ
फसलास रे टारोबा...उंदीर कधी अंडी घालतात का? ते थेट पिल्लाना जन्म देतात. उंदीर हा सस्तन प्राणी आहे.
अर्थात वरील कथेतील रहाणारा डुंबणारा कावळा बिळात रहातोय ,किनार्यावर वाघ घरट्यात रहातो....तेथील उंदीर कदाचित अंडी देत असतील.
माणसेच फक्त पिंड दान करताहेत ( ते देखील "जील काकू , तुझ्या छोकरीला माफ केले असे म्हणतात) .... या दृष्यात काहितरी अचूक चूक आहे
24 Jan 2011 - 4:21 pm | टारझन
कसं व्हायचं तुमचं विजुभाऊ :) आमचा बॉल बाउण्सर गेला की वो तुमाला :) असो
25 Jan 2011 - 8:47 am | मनीषा
आधी वाचली तेव्हा कथा "ठीक ठीक " वाटली, पण वरील काही प्रतिक्रियांवरुन संदर्भ कळला आणि त्या मुळे कथा आवडली ..
आणि त्यातले ते पिंडदान करणारी फारिनर मंडळी .. मस्तच !