नवी दिशा...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
21 Jan 2011 - 5:25 pm

`येस... आय अ‍ॅम लुकिंग फॊर अ जॉब चेंज'... ट्रेनमध्ये समोरच्या बाकड्यावर बसलेला तो, एव्हढ्या जोरात ओरडला, म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं...
एका कंपनीचा लोगो शर्टच्या खिशावर मिरवणारे ते दोघं बाकड्यावर बसल्यापासून एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते. सहकारी असावेत. कंपनीतल्या कामाला बहुधा दोघंही कंटाळले असावेत.
म्हणूनच, अचानक त्याचं हे वाक्य ऐकून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला तेवढ्यात फोन आला होता.
अलीकडे, प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नाव नोंदवणार्‍यांच्या मागे नोकर्‍या धावून येत नसल्या, तरी कंपनीचून येणारा फोन कॊल्सचा ससेमिरा मात्र मागे लागलेला असतो. मुंबईत लोकलमधून प्रवास करणार्‍या एखाद्या तरी प्रवाशाला असा अनवाँटेड कॊल येतोच, हे मला निरीक्षणावरून पक्कं माहीत होतं.
आत्ताचा त्याला आलेला फोनही तसाच असेल, असं मला वाटलं होतं. बहुधा त्यालाही तसंच वाटलं असावं. कारण, त्याच्या सुरात नोकरीच्या गरजेचं आर्जव अजिबात नव्हतं... कदाचित असे फोन घेऊनघेऊन तो वैतागला असावा. त्याच्या ओरडण्यावरून मला तसंच वाटलं.
... पण पुढच्या वाक्याला त्याचा तो आवाज एकदम बदलला...
`येस सर... आय अ‍ॅम लुकिंग फॊर चेंज’.. तेच वाक्य त्यानं पुन्हा, अजीजीनं उच्चारलं.
आणि पुढे त्यांचं संभाषण सुरू झालं... त्याचा आवाज एकदम मऊ, मृदु झाला होता..
बहुधा फोनवरच इंटरव्ह्यु सुरू होता... मी उगीचच कान लावले. पलीकडचा कुणी त्याच्याशी काय बोलतोय, हे ऐकू येणं शक्यच नव्हतं. मग मी तर्क लढवायला सुरुवात केली.
साऊथ इंडियन शैलीतल्या इंग्रजीतून तो पलीकडच्याशी बोलत होता.
`थ्री इयर्स..' तो नम्रपणानं म्हणाला...
बहुधा, पलीकडून, त्याच्या वर्क एक्स्पिरियन्सची विचारणा झाली असावी.
`सिक्स्टीन'... पलीकऊन आलेल्या पुढच्या एका प्रश्नाला त्यानं त्रोटक उत्तर दिलं... बहुधा, आत्ता त्याला मिळणार्‍या पगाराचा तो आकडा असावा.
`ट्वेंटी टु ट्वेंटी टू...' त्यानं आणखी एक उत्तर दिलं... बहुधा, अपेक्षित पगाराचा आकडा असावा.
आता त्याचं लक्षं, फक्त, पलीकडून कानात घुमणार्‍या आवाजावर केंद्रित झालं होतं.
`फिफ्टीन डेज'... असं तो म्हणाला, तेव्हा त्याचा चेहेरा कमालीचा उजळला होता... शेजारी बसलेला त्याचा सहकारी अचंबितपणे, उतरल्या नजरेनं त्याच्या तोंडाकडे पाहात ते संभाषण ऐकत होता...
बहुधा, माझ्यासारखेच संभाषणाचे तर्कही लढवत होता...
`नो सर... टुडे नॉट पॉसिबल... डे आफ्टर टुमॉरो ओके?' त्यानं अजीजीनं विचारलं, आणि क्षणभर तो थांबला.
त्या क्षणी त्याच्या डोळ्यात मनावरचा प्रचंड तणाव स्पष्ट दिसत होता...
`थॆंक यू सर' असं म्हणून त्यानं फोन बंद केला, तेव्हा तो तणाव मावळून तिथे आनंद उतरला होता...
आता तो खिडकीबाहेर पाहात होता... त्याचे डोळे काहीतरी पाहात, कसल्यातरी स्वप्नात रंगले होते, हे स्पष्ट दिसत होतं...
अचानक तो भानावर आला. आपला एक सहकारी सोबत बसलाय, हे त्याच्या लक्षात आलं, आणि मान वळवून त्यानं त्याच्याकडे पाहिलं.
तो सहकारी, हिरमुसल्या नजरेनं त्याच्याकडे पाहातच होता.
`किसका फोन था?' त्यानं हताश आवाजात विचारलं, आणि याचे डोळे चमकले.
`नही यार, कुछ नही...' त्यानं उडतउडत उत्तर दिलं, आणि तो पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागला...
तो सहकारी गप्पच होता.
मग ह्यालाच कसंतरी झालं...
`मंडेको सब बताऊंगा'... त्याचा हात हातात घेत हा म्हणाला, पण सहकार्‍यानं ते न ऐकल्यासारखंच केलं...
`यार, मेरे लिये भी कुछ होगा तो बताऒ'... तो कसनुसं बोलला... ह्याचं लक्ष नव्हतं. पण त्यानं उगीचच मान हलवली...
तोवर काही स्टेशनं मागे गेली होती.
अचानक ह्याचा तो हिरमुसला सहकारी उठला, आणि त्याचा निरोप घेऊन, घड्याळाकडे पाहात घाईघाईनं उतरायच्या तयारीला लागला...
`अरे यार, साथ मे आनेवाला था ना?' यानं त्याला विचारलं. पण त्यात फारसा आग्रह नव्हताच.
`नही.. तू जा आगे... मुझे यहीपे उतरना पडेगा'... तुटकपणे तो उत्तरला, आणि स्टेशन येताच उतरूनही गेला...
ह्यानं हळूच खिशातला मोबाईल काढला, आणि, तो आलेल्या कॉलचा नंबर डोळ्यात साठवत बसला...
मी त्याच्याकडे पाहातोय, हे त्याच्या आत्ता लक्षात आलं होतं.
नंबर सेव्ह करताकरता त्यानंही माझ्याकडे पाहिलं, आणि तो मस्त हसला...
हळूच त्यानं नकळत मोबाईल कुरवाळला... आणि समाधानानं खिशात ठेवला...
... त्या एका फोन कॉलनं त्याच्या भविष्याला नवी दिशा मिळाली होती.
मला ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट जाणवलं!
http://zulelal.blogspot.com
--------------------------------------

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

लेख आवडला.

अवांतर :
जे आपल्या सहकारी मित्राशी प्रामाणिक आणि स्पष्ठ राहु शकत नाहित त्यांचे भविष्य कितीही उज्ज्वल असले तरी खर्‍या मित्रांचे कुंपण त्यांच्या आयुष्याला कधीच मिळत नाहित...

दिनेश५७'s picture

21 Jan 2011 - 5:38 pm | दिनेश५७

तो त्याचा मित्र नसावा... सहकारी असावा. मैत्री करण्यासाठी निवडीला वाव असतो. सहकारी निवडण्याची संधी सगळ्यांनाच मिळत नाही. नाही का?

गणेशा's picture

21 Jan 2011 - 5:42 pm | गणेशा

आपले हि बरोबर आहे कदाचीत.

बाकी आपण छान लिहिले आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा

चिरोटा's picture

21 Jan 2011 - 6:30 pm | चिरोटा

मस्त निरिक्षण.

`सिक्स्टीन'... पलीकऊन आलेल्या पुढच्या एका प्रश्नाला त्यानं त्रोटक उत्तर दिलं... बहुधा, आत्ता त्याला मिळणार्‍या पगाराचा तो आकडा असावा.

शिक्षणाची एकूण किती वर्षे ? ह्या प्रश्नालाही हे उत्तर असते(अभियांत्रिकी).

स्पा's picture

21 Jan 2011 - 6:52 pm | स्पा

दिनेश दा.
अतिशय उत्तम लेख.........
हळूच त्यानं नकळत मोबाईल कुरवाळला... आणि समाधानानं खिशात ठेवला...
... त्या एका फोन कॉलनं त्याच्या भविष्याला नवी दिशा मिळाली होती.
मला ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट जाणवलं!

हे तर खासच .

(त्या मुलाच्या जागी मीच दिसत होतो मला )

शुचि's picture

21 Jan 2011 - 10:02 pm | शुचि

+१ (अतिशय सुंदर लेख. )

नंदन यांच्या एका लेखात एक वाक्य वाचले होते - "माटे म्हणतात की काही अनुभव हे बचकीने गोळा करायचे असतात तर काही चिमटीने."

हा लेख देखील तसाच एखादं फुलपाखरू हळूवार चिअमटीने अलगद पकडावं तसा त्याचा अनुभव तुम्ही टिपलात.

पिंगू's picture

21 Jan 2011 - 7:46 pm | पिंगू

मस्त लेख आहे..

- पिंगू

मराठे's picture

21 Jan 2011 - 8:12 pm | मराठे

छान लिहिलंय!
त्याच्या सहकार्‍याची अवस्था 'मेरा नंबर कब आएगा!' अशी झाली असेल :) ..
पुलेशु

निशदे's picture

21 Jan 2011 - 8:17 pm | निशदे

डोक्यातल्या विचारांची ट्रेन सुद्धा आवडली.

मुलूखावेगळी's picture

21 Jan 2011 - 8:31 pm | मुलूखावेगळी

छान आहे
मला पन माझे जॉब शोधताना आलेले कॉल्स आठवले

आत्मशून्य's picture

21 Jan 2011 - 10:00 pm | आत्मशून्य

मस्त वाटल लेख वाचून. कंपनी कँपस अथवा क्यूबीकलच्या गॉसीपवर अधारीत कथां थोड्या एकसूरी वाटू लागल्या होत्या. म्हणूनच.

सर्वसाक्षी's picture

21 Jan 2011 - 11:07 pm | सर्वसाक्षी

छोटीशी पण वेगळ्याच विषयावरची कथा