फक्त शिकले सवरलेलेच नाही, तर कित्येक अशिक्षीत, अर्धशिक्षीत कामगार देखील दूरच्या देशात नशीब काढायला जात असतात. भारतात असतांना कदाचित काही कष्टकरी कामगारांना संघटनांचे पाठबळ शोषणापासून वाचवीत असेल. पण पुष्क्ळदा बाहेर देशात अशा तळागाळातल्या कामगारांचे हित बघायला कुणीही नसते. काही लोक असे सहजपणे म्हणून जातील, "काम आणि कष्ट केल्याशिवाय का पैसा मिळतो?" हे जरी खरे असले, तरी पैसा फेकून माणसाचे यंत्र बनवता येते का? आणि त्यासाठी किती पैसा पुरेसा आहे?
काही पूर्णवेळ घरात रहाणार्या मेड्स कडून तर अशी अपेक्षा केली जाते की २४ तास ती आमच्या घरात रहाते म्हणजे जास्तीत जास्त काम घेऊन २४ तासाचा पैसा वसूल केला पाहीजे.
ह्या कवितेतून एका अनिवासी मोलकरणीची अशीच कोंडी दाखवायचा प्रयत्न केला आहे.
चाल- "पोर खाटेवर मृत्युच्याच द्वारा"
किंवा "गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या"
दूर सोडुनिया अंतरीची माया
आणि जमवाया कष्ट करुनी माया
आली आशेने कर्ज फेडवाया
मोलमजुरीने भूक भागवाया
तिथे घरटे चिमुकले सुबक छान
असे पुढती पसरले माळरान
पक्षी करती किलबील गोड गान
आठवीता हरपले तिचे भान
क्षणी जागी होऊन हडबडूनी
आणि सार्या कामास निस्तरूनी
जरा बसली क्षण चार विसावूनी
तोच आली मा.लकीण तरवरूनी
काम सोडुन का बैसलीस स्वस्थ?
दाम मोजतसे तुला सढळ हस्त
सर्व मेडची या कामचोर फक्त
नाही यांना नौकरी प्रती शिस्त
बाई जेवण ते पूर्ण मी बनवले
केर काढूनी ओटेही स्वच्छ धुतले
जरा दोन क्षण शांतसे मिळाले
सुरू करते मी काम जेही उरले
चाल - कठीण समय येता कोण कामास येतो.
संपली सर्व कामे तरी विसावा मिळेना
सवकली म्हणे मेड ती कामही करेना
गर्जली मालकीण कण काम कमी होना
पिळून तिला पूर्ण धन वसूली हवी ना?
प्रतिक्रिया
6 Jun 2008 - 9:05 am | बेसनलाडू
मिपावरील आधीची 'टिपिकल' विडंबने नि बरेचदा त्यातल्या कैच्या कै छाप आचरटपणाला मिळणारे आंधळे उत्तेजन हे निराशावादी चित्र तुमच्या अशा सुंदर विडंबनांमुळे मागे पडू लागलेय,याचे बरे वाटते आहे. विडंबनही गेय आणि सहज उतरले आहे.आणि मुळात मोलकरिणीचे नि तिच्या गंभीर आर्थिक व सामाजिक स्थितीचे जे चित्रण तुम्ही विडंबनासारख्या माध्यमातून घडवले आहे,त्याने अधिक संतोष वाटला.
(संतुष्ट)बेसनलाडू
6 Jun 2008 - 11:32 am | आनंदयात्री
हे विडंबन आहे ?
कोणत्या गाण्याचे ?
अरुण मनोहरांनी कृपया समज्/गैरसमज दुर करावा.
6 Jun 2008 - 2:05 pm | अरुण मनोहर
आनंदयात्री, आपण अगदी बरोब्बर मुद्दा काढला आहे. हे विडंबन मूळीच नव्हे. ही एक स्वतंत्र कविता आहे. फक्त चालीवर म्हणता यावी म्हणून माझ्या जुन्या आवडत्या कवितेची चाल लावली आहे. ही कविता वृत्तबद्ध असल्यासारखे वाटते. पण मात्रा वगैरे मोजण्याच्या फंदात मी पडलो नाही. मूळ कवितेचे वृत्त कोणते होते हे कुणी रसीक सांगू शकेल का?
---वृत्तछंदी.
6 Jun 2008 - 2:06 pm | बेसनलाडू
मूळ रचनाकर्त्याच्या खुलाशाबद्दल धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू
या रचनेस विडंबन समजल्याबद्दल/संबोधल्याबद्दल क्षमस्व.
(क्षमाप्रार्थी)बेसनलाडू
6 Jun 2008 - 12:15 pm | विसोबा खेचर
मिपावरील आधीची 'टिपिकल' विडंबने नि बरेचदा त्यातल्या कैच्या कै छाप आचरटपणाला मिळणारे आंधळे उत्तेजन हे निराशावादी चित्र
ज्या मंडळींनी या आधी मिपावर विडंबने केली होती त्याला आचरटपणा म्हणणे आणि ज्या मंडळींनी त्याला प्रतिसाद दिले त्याला आंधळे उत्तेजन म्हणणे हे आपले वैयक्तिक मत आहे असे आम्ही समजतो! परंतु जर हे विधान सरसकट असेल तर तो आम्ही सदर मिपाकरांचा अपमान समजतो! आणि हा अपमान सहन केला जाणार नाही! तरी याबाबत वैयक्तिक की सरसकट यासंदर्भात काय तो स्पष्ट खुलासा करावा, आणि जर हे आपले सरसकट विधान असेल तर ते मिपाकरांचा अपमान समजला जाऊन येथून उडवून लावण्यात येईल याची नोंद घ्यावी!
तरी २४ तासांच्या आत काय तो खुलासा करावा अन्यथा आपल्या प्रतिसादातील वरील वाक्य उडवून लावले जाईल याची नोंद घ्यावी!
अर्थात, तसे आपले वैयक्तिम मत असल्यास नवल नाही! मिपावर असलेल्या काही छुप्या मनोगतींकडून हेच अपेक्षित आहे! :)
आपला,
(मिपाच्या अस्तनीतले निखारे ओळखून असलेला!) तात्या.
6 Jun 2008 - 1:32 pm | बेसनलाडू
माझे मत वैयक्तिकच आहे (कारण ते माझे आहे :D). ते स्पष्टपणे,नेमके,स्वतःच्याच सदस्यनामे मांडले आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारीही घेतो आहे.
धन्यवाद (बाकीचा प्रतिसाद सोईस्कररित्या संपादित केलात त्याबद्दलही! म्हणजे मिपानेही मनोगताचा गंडा बांधला म्हणायचे ;) ).
(आभारी)बेसनलाडू
6 Jun 2008 - 2:10 pm | रामराजे
बरोबर तात्या... मी पुर्णपने सहमत आहे!
6 Jun 2008 - 9:26 am | संदीप चित्रे
अजून काय लिहू !
6 Jun 2008 - 11:24 am | नरेंद्र गोळे
वा! छानच आहे हो
6 Jun 2008 - 11:44 am | स्वाती दिनेश
अनिवासी मोलकरणीची कोंडी मनाला भिडली,
दूरदेशातच नव्हे तर अगदी मुंबईतही कोकणातून घरकामासाठी ,मुलांना सांभाळायला '२४ तासांची बाई' म्हणून राहिलेल्या १३/१४ वर्षांच्या मुली पाहिल्या की बाल्य आणि तारुण्याच्या सीमारेषेवरच्या त्या मुलींना असे घरापासून दूर राहिलेले पाहून कुठेतरी आत तुटतं, काही जण त्यांना घरातल्यासारखे वागवतातही तर काही जण त्या म्हणजे एक यंत्र आहेत,जणू रोबोच! असे ही वागवतात.. अशा मेड आणि त्यांच्या मालकिणी आठवल्या आणि खिन्न झाले.
स्वाती
6 Jun 2008 - 1:59 pm | नारदाचार्य
अर्थात, लेखक त्याचा खुलासा करतीलच.
ही स्वतंत्र रचना वाटते. फक्त एखाद्या गाण्याच्या चालीवर ती केली आहे म्हणून ते विडंबन ठरेल, असे नाही.
रचना चांगली जमली आहे हे निश्चित.
6 Jun 2008 - 2:33 pm | मन
अमेरिकेत?
मी तर लैच पुढारलेलं समजत होतो त्यांना.
असो. मूळ कविता/गाणं माहित नाही. तरीही अर्थाच्या दृष्टीनं हे लेखन आवडलं. मनाला भिडलं.
(मी स्वतः मिपा वर विडंबनं फारसं वाचत नाही. कारण त्यात मला रस नाही.
पण मला रस नाही म्हणून "ती गोष्ट आचरट आह" असं म्हणणही मला आवडत नाही.
फार तर एवढच म्हणु शकतो "विडंबन प्रकार मी स्वतः वाचत नाही. मात्र ही कविता आवडली."(अर्थात ही त्या अर्थानं विडंबन नाहीच.)
....
.....
वैयक्तिक मत!
)
आपलाच,
मनोबा
6 Jun 2008 - 2:53 pm | अरुण मनोहर
माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत २४ तास लीव्ह इन मेड ठेवायचे अती अती श्रीमंत लोकांनाच जमते. अमेरिकेत रहाणारे मिपाकर खरे खोटे सांगू शकतील. मूळ कविता इकडे एकलेल्या काही हौरर स्टोरीज वरुन बनवली होती. वाचकांना वाचून त्यातल्या त्यात बरे वाटेल की मालकीण भारतीय नव्ह्ती.
6 Jun 2008 - 7:19 pm | चतुरंग
मानवी सर्व्हिस ही कायदेशीररीत्या घ्यायची म्हटली तर खूपच खर्चिक असते. २४ तास मेड ही फक्त अतिश्रीमंत, धनाढ्या लोकांची चैन असू शकते.
सर्वसामान्यपणे आठवड्या/पंधरवड्यातून एकदा साफसफाईला कर्मचारी बोलावून त्याच्या/तिच्याकडून सफाई काम करवून घेणारे लोक असतात.
त्यांचा ठराविक वेळाचा मेहेनताना दिला की काम संपले.
बाकी घरातली/अंगणातली रोजची सर्व कामे ही यंत्राने (डिशवॉशर, कपड्यांचा वॉशर्-ड्रायर, लॉन मोवर इ.) होत असली तरी ती आपल्यालाच करवून घ्यावी लागतात त्यामुळे घरातल्या सर्वांनाच सकाळी उठल्यापासून भरपूर काम असते! :)
बाकी काही ठिकाणी भारतातून येणारी काही कुटुंबे बरोबर तिकडच्याच गावाहून, ओळखीतून मोलकरणी घेऊन येतात त्यांना फॅमिली मेंबरसारखे घरातच ठेवून घेतात. काही नीट वागणारेही असतात बरेचजण पिळून काम करुन घेतात. पोटाच्या चिमट्याने, पैशाच्या आशेने असे काम लोकही करत राहतात.
शेवटी ही एक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे देशकालाच्या सीमा ओलांडून त्याची वेगवेगळी रुपे वेगवेगळ्या वेळी दिसत राहतात.
चतुरंग
6 Jun 2008 - 3:02 pm | विसोबा खेचर
खरंच मनाला भिडणारी कविता केली आहे.
आपल्या पदरी कुणी जरी नौकर म्हणून असला तर त्याच्याकडून रितीने जे काही असेल ते काम जरूर करून घ्यावे परंतु त्यातदेखील 'माणूसकी'चा अँगल हा हवाच! त्याला/तिला 'ढोर' समजू नये!
तात्या.
6 Jun 2008 - 7:31 pm | चतुरंग
मोलाने काम करुन घेणे म्हणजे गुलामगिरी नव्हे ह्याची जाणीव असलीच पाहिजे!
चतुरंग
7 Jun 2008 - 11:22 pm | प्रभाकर पेठकर
कविता मोलकरणीचे मनातील विचार अधोरेखित करणारी असली तरी आपण बहुतांशी 'नोकरदार' वर्गही थोड्याफार प्रमाणात ह्याच अनुभवातून जात असतो. आपला बॉस, मॅनेजर जो कोणी असेल तोही आपल्याला दिलेल्या वेतनाच्या मोबदल्यात 'पिळून' काढीत असतो. 'मालक' आणि 'नोकर' हे नातेच असे आहे.
8 Jun 2008 - 6:29 pm | अरुण मनोहर
सर्वांनी दिलेल्या प्रतिसादासाठी आभार.
9 Jun 2008 - 8:47 pm | धनंजय
गेय हे चांगले, अर्थपूर्ण हे खास.