"खजिना" चा अनुवाद करताना माझ्याजवळच्या खजिन्याचे विचार मनात येत होते. खरोखर प्रत्येकाजवळ फक्त त्याच्यासाठीचा अमूल्य खजिना असतोच असतो. खरंय हे. विशेषतः आपण निसर्गासोबत एकट्याने अनुभवलेले क्षण.... ते पुन्हा फिरून कधीच येणार नसतात. आणि ते तसे येणार नाहीत याची खूप वेळा आपल्याला जाणीवही नसते. नंतर उरते ती त्या अनुभवाची मनावर उमटलेली नक्षी. असे 'एकट्याचे क्षण' खरंच किती मूल्यवान ! त्या क्षणी त्या अनुभवाच्या संदर्भात झालेला आत्मसाक्षात्कारच असतो तो ! आणि एक साक्षात्कार त्याच क्षणी झालेला असतो " हे पुन्हा कधीच अनुभवणे नाही !"
खूप अवघड होतंय हे सगळं. काही अनुभव सांगते. सहजच.
मी लहान असताना मंजरथला सुटीत रहायला जायची. तिथे आमच्या घरापासून वर गावात जाणारा रस्ता नुसत्या दगडाच्या मोठमोठ्या शिळांनी तयार केलेला होता. उन्हाळ्यातल्या एका दुपारी खेळून परत येत असताना मी पडले. त्या शिळा एवढ्या तापलेल्या होत्या की पडून उठेपर्यंतच्या काही क्षणात माझ्या दोन्ही गुढग्यांवर दोन टपोरे फोड उठले होते. आणि मी न रडता काहीतरी समजल्यासारखी थक्क होऊन त्या रोजच्या पायाखालच्या तापलेल्या शिळेकडे आणि त्या फोडांकडे बघत तशीच उभी होते.
पहिल्यांदाच समुद्र बघत होते. गोव्यात. मस्त खेळ चालला होता. अचानक एका लाटेने मला ढकलले नि जणु काय आख्खा समुद्र माझ्यात शिरला. नाकात, तोंडात आणि डोळ्यात आकांत नुसता. त्याक्षणी भवताल नव्हताच माझ्यासाठी. होता तो फक्त समुद्र. पुढे कन्याकुमारी,ग्रीस्,स्पेन इथेही समुद्र भेटला. पण त्या 'आत शिरलेल्या' समुद्राने काही ओळख नाही दाखवली.
दिवेआगरला एकदा एकटीच फिरायला जाण्याचा शहाणपणा केला होता. अगदी टळटळीत दुपार. श्रीवर्धनहून सिक्स सिटरमध्ये कोळणींच्या सोबत दिवेआगरला पोहोचले. गणपतीचे दर्शन घेऊन समुद्राकडे निघाले. ब्रह्मदेवाचे देऊळ बघायचे होते मला. एका माडापोफळीच्या वाडीतून छोटीशी पायवाट समुद्राकडे जात होती. एखादा किलोमिटरचेही अंतर नसेल ते. जसजशी आत गेले तसतसा उजेड कमी होत गेला. आजूबाजूला केवळ पोफळी नि नारळाच्या बागा. माणूस काय पण कुत्रंही कुठे दिसेना. पावलं आपोआप वेगात पडू लागली. त्या बागांतून वाहणार्या वार्याचा आवाज मी जन्मात विसरणार नाही. त्यात बाजूला खुसफुस ऐकू आली म्हणून बघितले तर एक सापाचे पिलु आपली वाट शोधत होते. 'सळसळ' काय असते ते कळले मला.
हृषिकेशला बराच वेळ कडक उन्हातून चालत गेल्यावर पायांना झालेला गंगेच्या पाण्याचा तो गार स्पर्श !
पुरंदरला जाताना गडाच्या पायथ्याशी असलेली सुगंधित भाताची खाचरं..
जर्मनीत कलोन मध्ये र्हाईनच्या काठावरच्या एका लाकडी बाकड्यावर गाढ लागलेली झोप..
लातूर नांदेड रस्त्यावर एका ठिकाणी जांभळाची खूप झाडं होती पूर्वी. तिथे एका पावसात पाहिलेला जांभळांचा सडा...
पहिल्यांदा चुलीवर सैपाक करताना नाकीतोंडी धूर जाऊन उठलेला कल्लोळ आणि त्यात कवडशात दिसणारे धूलिकण बघताना नव्यानं सापडलेलं कुतुहल...
नव्या घराच्या गॅलरीतून दिसणारा व्याकूळ सूर्यास्त....
पाऊस तर कितीतरी वेळा असा भिडलाय. सखी हरवली तेव्हा भांडला माझ्याशी. पण परक्या देशात एकटी नवर्याचं जिवावरचं दुखणं सांभाळत होते तेव्हा निर्जन रस्त्यावर मनातल्या अनंत भिती नि काळज्यांना या पावसाने अबोलपणे सोबत केली.
इटलीमध्ये मुरानो बेटावर फिरताना भवताली पाणीच पाणी दिसत होते. दूर कुठेतरी जमिनीचा तुकडा नि अजून दूर अंधुक दिसणारे आल्प्स
एवढेच काय ते 'दिसत' होते. एवढा वेळ आनंदात टंगळमंगळ करणार्या मनाने अचानक अस्वस्थतेच्या नदीत उडी मारली. देश आठवला, मातीचा वास आठवला, कडक भाजणार्या उन्हाचा स्पर्श आठवला आणि डोळ्यांना कधी धारा लागल्या कळालंच नाही.
स्वित्झर्लंडमध्ये अशाच एका पायवाटेने र्हाईनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कातरवेळ. सुंदर निर्जन पाऊलवाट. समोरच एक पडके चर्च आणि त्यावरची दिसणारी घंटा.... अचानक पायवाट थांबली. एका स्मशानात ! सगळीकडे थडगीच थडगी. माणसाची चाहूलही नाही. खाली नदी. आणि चर्चच्या घंटेने मोठ्या कर्कश आवाजात त्याचवेळी टोल दिले. भितीचा एक ओरखडा असा चर्रर्र्कन मनावर उमटला तो अजून दिसतो.
परवा जवळच्या मॉलमधुन घराकडे येत होते. भुरुभुरू बर्फ पडत होते. रस्त्यावर दोन दोन वीत साठलेल्या बर्फातून सामानाची गाडी ओढत चालत होते. वार्याची एक गार झुळुक आली नि त्यासोबर भुरभुरणारे बर्फ पूर्ण चेहर्याला स्पर्शुन निसटुन गेले. त्याक्षणी जाणवले. हे पुन्हा कधीच नाही. मैदानात उभ्या असलेल्या बर्फात बुडालेल्या गाड्या, चालणार्यांच्या पावलांनी तयार केलेली बर्फावरची पायवाट, फुलून लाल दिसणारे आभाळ नि त्याखाली केवळ बर्फ अनुभवणारी मी...हे पुन्हा कधीही नाही.
या सर्व वर वर वाईट दिसणार्या आणि अशा अनेक अनुभवात मनाची पहिली प्रतिक्रीया असते वैताग ! पण जेव्हा मनात " हे पुन्हा कधीच नाही " असं येतं तेव्हा आपण भिडतो थेट त्या क्षणाला. ते अनुभवणं किती मोलाचं !
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून..
मी तर केवळ निसर्गासोबतचे सांगितले. त्यात माणसांची भर घातल्यावर तर पूरच येईल.
पण खरंच ! असं वैतागलेल्या क्षणी त्या माणसासोबत तो अनुभव झेलताना मनात " हे पुन्हा कधीच नाही " असे आले तर वैताग कमी होईल का ? मनाला सांगून बघितलं पाहिजे.
प्रतिक्रिया
30 Dec 2010 - 2:38 am | संदीप चित्रे
तुझ्याकडून लिहिला गेलेला अजून एक सु-रे-ख लेख !
30 Dec 2010 - 3:01 am | प्राजु
फार फार सु रे ख!!!
तुझे लेख आले की 'मेजवानी' इतकंच येतं डोक्यात आणि आपोआप क्लिक होतं त्यावर. :) अॅज युज्वल.. सुरेख लेखन
30 Dec 2010 - 4:06 am | बहुगुणी
शब्दा-शब्दा ला दाद द्यायला हवी इतकं उत्कट प्रकटन आहे, खूप आवडलं!
30 Dec 2010 - 10:12 am | स्मिता.
खरंच, शब्दा-शब्दाला दाद द्यावी इतका छान झालाय लेख. वाचता-वाचता मी माझ्या खजिन्याचा विचार केव्हा करायला लागले कळलंच नाही.
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून..
अगदी अगदी!! हे असे साधे-नेहमीचे पण वेगळी अनुभूती देणारे काही क्षण कायम मनात घर करून राहतात. त्याहीपुढे जाऊन मी असं म्हणेन की ते क्षण आपल्याला काहीतरी नवीनच शिकवून जातात. आताही असं होतंय की मनात जे आहे ते शब्दात सांगताच येत नाहीये... तो केवळ अनुभव असतो आणि ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो :)
30 Dec 2010 - 5:44 am | असुर
फार सुरेख!!
प्राजुतैशी सहमत!!!
खरंतर अजून सविस्तर प्रतिसाद द्यायचा होता, पण 'क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी'...
असो!!
--असुर
30 Dec 2010 - 5:45 am | शुचि
लोकांच्याही आठवणी सांग ना मितान . मस्त लिहीतेस. खूप सुंदर लिहीलयस.
30 Dec 2010 - 6:42 am | रेवती
मस्त लेखन!
मगाशी घाईत होते म्हणून नंतरसाठी निवांत वाचायला ठेवून दिला होता.
30 Dec 2010 - 7:14 am | सहज
सुरेख,सहज व मौलीक प्रकटन:-)
30 Dec 2010 - 8:39 am | विनायक बेलापुरे
शब्दातील जादू ..... क्षणभर माझ्या डोळ्यापुढे उभ्या राहिल्या काहि मनात साठ्वलेल्या आठवणी .
सावरकरान्च्या ओळी सार्थ आहेत शीर्षकासाठी.
30 Dec 2010 - 8:55 am | नंदन
सुरेख प्रकटन. लेखाइतकंच शीर्षकही रसिक, समर्पक.
--- अगदी, अगदी. श्रीमंत करून जाणारे असे हे क्षण थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतील. पण त्यांचं इतकं सुरेख प्रकटन वाचून Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away सारखं तद्दन फॉरवर्डणीय झालेलं हे सत्य, कुठेही क्लिशे होऊ न देता मांडणं किती अवघड आहे, हे पुन्हा जाणवलं.
30 Dec 2010 - 9:42 am | सूड
अतिशय सुरेख !!
30 Dec 2010 - 10:23 am | कवितानागेश
नेहमीप्रमाणेच खूप आवडलं.
30 Dec 2010 - 10:45 am | मी ऋचा
मितान ताई, खुप सुंदर लिहिलेय गं!
30 Dec 2010 - 10:51 am | प्रमोद्_पुणे
नेहेमीप्रमाणे छान...
30 Dec 2010 - 11:02 am | दिपक
काय जादू आहे तुमच्या लिखाणात. प्रत्येक वाक्य वाचताना तो अनुभवतोय असे वाटले.
खुप आवडले प्रकटन.
30 Dec 2010 - 11:11 am | नन्दादीप
अप्रतिम...सुंदर लिहिलय मितान...मस्तच......
30 Dec 2010 - 11:24 am | sagarparadkar
अगदी नेमक्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काही अनुभव असे असतात की दुसर्यांना सांगितले तर "त्या काय विशेष ..." असे उद्गार ऐकायला मिळतात. त्यांनी जर ती अनुभूती घेतली तरच त्यांना त्यातली मजा कळेल.
मला दोन सुंदर सकाळ (अनेकवचन काय?) आठवताहेत, त्या पण अशाच निसर्गसुंदर वातावरणातील अद्भुत वाटणार्या. पहिली म्हणजे प्राथमिक शाळेत असताना एकदा कोकणात 'तुरळ' नावाच्या खेड्यात एका दूरच्या नातेवाइकांकडे गेलो होतो तेव्हाची. संध्याकाळी उशिरा तंगड्तोड करत त्यांच्याकडे पोहोचलो. खूपच दमलो होतो, जेवण करून जो झोपलो, ते पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग आली. आणि त्यावेळचा एकूण निसर्गाचा आविष्कार असा काही भावला, की गेल्या जवळ जवळ ३०-३२ वर्षांत मी ती सुंदर सकाळ विसरू शकलो नाहीये.
दुसरी अशीच निसर्गरम्य सकाळ अनुभवली ती इंग्लंडमधील अॅस्कॉट मधे. त्या उन्हाळ्यातल्या पहाटे ३:३०-४:०० वाजताच अशीच पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे जाग आली. 'बी अॅन्ड बी' मधे उतरलो होतो, ते म्हणजे एका सुखवस्तु शेतकर्याचं मळ्यातलं घर होतं. चहू बाजूनी निसर्ग नुसता बहरात आला होता. तेव्हा खरोखर मला अरूण दातेंनी गायलेल्या "या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे" गाण्याचा अर्थ उमगला, अनुभवता आला ...
30 Dec 2010 - 11:37 am | प्यारे१
मायातै,
सुंदर.
अत्यंत छान तर्हेने आपण अनुभवलेले क्षण शब्दात पकडले आहेत.
फक्त आणि फक्त अनुभव... ना कसली तुलना, ना कसली समीक्षा, ना कसली प्रतिक्रिया.
अनुभव 'संपल्या' नंतर हे सगळे सुरु होते.
30 Dec 2010 - 11:58 am | पर्नल नेने मराठे
मायाचे लिखाण न बाकिच्यांचे प्रतिसाद सगळेच कसे उत्तम !!!
30 Dec 2010 - 12:09 pm | नगरीनिरंजन
खूप छान लिहीलंय. वाचताना प्रत्येक क्षणाबरोबर मी ही अनुभवलेले असेच क्षण डोळ्यांसमोर तरळून गेले.
>>असं वैतागलेल्या क्षणी त्या माणसासोबत तो अनुभव झेलताना मनात " हे पुन्हा कधीच नाही " असे आले तर वैताग कमी होईल का ?
हे खासंच. कुठलं कुठलं अध्यात्मिक तत्वज्ञान वाचून मन अलिप्त वगैरे करण्यापेक्षा समरसून प्रत्येक क्षणाचे सुख-दु:ख अनुभवण्याचे हे अध्यात्म कधीही श्रेयस्कर.
30 Dec 2010 - 12:12 pm | sneharani
मस्त लिखाण!
30 Dec 2010 - 12:40 pm | नेत्रेश
हेच लेखन दैनिक सकाळच्या मुक्तपिठ सदरात लिहील्यास काय काय (मसालेवाईक) प्रतिक्रिया येतील हा विचार मनात आला.
30 Dec 2010 - 1:00 pm | स्पंदना
प्रतिसाद लिहायचा म्हणुन काहीतरी लिहिते आहे, खर सांगु ? जस शांत संध्येत आवाज न करता बसाव ना तस वाटल ! काहीही न बोलता बस वाचत रहाव. काही काही गोष्टी हात वा रव लागला तर लुप्त होतात ना? चुकुन हे ही तसच काही असल तर?
30 Dec 2010 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते
<या प्रकटनात एकूण जितकी अक्षरं आहेत, त्याच्या दसपट अभिवादनाच्या स्मायल्या इथे समजून घ्याव्यात>
ही माया, काही बोलायलाच ठेवत नाही शिल्लक. असे प्रसंग अनुभवले आहेत पण ते असं लिहायचं बळ नाही माझ्याकडे.
30 Dec 2010 - 9:54 pm | अर्धवट
अगदी अगदी..
प्रत्येकवेळेला लिहिताना अव्वल आणि शंभर नंबरी.. सकस..
खुप तरल आणि निर्मळ लिहितेस
आमचा रतीब म्हणुनच कोता वाटतो..
बाकी काय बोलणार.. नेहेमीचंच.. महान आहेस...
31 Dec 2010 - 11:39 pm | अर्धवटराव
मनातलं बोललात.
एका सामान्य माणसाचं जगणं देखील असामान्य करुन जातात असले क्षण...
अर्धवटराव
30 Dec 2010 - 1:30 pm | स्वाती दिनेश
माया, तरल, जादूभरं लिहिलं आहेस ग, फार आवडलं..
स्वाती
30 Dec 2010 - 1:50 pm | गणेशा
शांत राहुन तुझ्या शब्दांच्या सरीमध्ये असेच भिजत राहवे असे मनापासुन वाटले ..
तुझे लिखान संपुच नये असे वाटत होते ..
30 Dec 2010 - 1:53 pm | अविनाशकुलकर्णी
खुप सुंदर लेखन....
अचानक मलाही असे अनुभवलेले प्रसंग आठवले....
30 Dec 2010 - 1:59 pm | चाणक्य
लिखाण 'आतून' आल्याचं जाणवतंय
30 Dec 2010 - 3:46 pm | अमोल केळकर
सुंदर लेखन
अमोल केळकर
30 Dec 2010 - 5:18 pm | ५० फक्त
मितान, खुप छान लिहिलं आहे, तुम्ही असंच लिहित राहावं या साठी मी सकाळीच सुर्यनारायणाला सांगुन ठेवलं आहे.
तुम्ही जेंव्हा पुन्हा अशा निसर्गाकडे जाल ना तेंव्हा माझ्यासाठी प्रार्थना कराल ,मला पण असं लिहिता यावं या साठी.
हर्षद.
30 Dec 2010 - 5:20 pm | अवलिया
!
30 Dec 2010 - 5:52 pm | स्वैर परी
अगदी अगदी! काही प्रसंगी चिड्ण्यापेक्षा असा विचार मनात आणावा, 'हे पुन्हा कधीच नाही' आणि क्षणात सगळे बदलुन जाते! विचार आनि क्रुती दोन्हीही! :)
तुमच लिखाण अतिशय सुंदर आहे!
__/\__
---------
30 Dec 2010 - 6:06 pm | मितान
मला जे सांगायचं आहे ते तुम्हा सर्वांपर्यंत तसंच्या तसं पोहोचलं याबद्दल आनंद होतोय. उत्स्फूर्तपणे तुम्हापैकी काहीजणांना आपले अनुभवही शेअर करावे वाटले ही मी मला तुम्हा सर्व वाचकांकडून मिळालेली शाबासकी समजते :)
धन्यवाद ! :)
30 Dec 2010 - 6:07 pm | गणपा
तुझ्या या प्रकटनापुढे छान, मस्त, सुरेख,अप्रतिम आदी सर्व शब्द थिटे आहेत.
30 Dec 2010 - 10:19 pm | चिगो
अत्यंत सुरेख लेख...
30 Dec 2010 - 11:08 pm | सुनील
सुंदर लेख. खजिन्याची उधळण आवडली!
31 Dec 2010 - 10:46 am | टुकुल
जबरदस्त लिखाण.
एकदम डोळ्यासमोर उभे केल चित्र.
--टुकुल
1 Jan 2011 - 6:11 am | अतुलजी
छान लेख...
6 Jan 2011 - 4:27 am | मेघवेडा
माया गं, विशेषणं तरी काय वापरायची आता? तसं बघायला गेलं तर सर्वांनाच असे अनुभव आलेले असतात. पण 'लाईफ इज ब्युटिफुल' म्हणजे काय हे कळायला ती सौंदर्यदृष्टी असायलाच हवी. बारीकसारीक गोष्टींतून आलेले अनुभव किती श्रीमंत करून जातात नाही? तू म्हटलंयस ते -
.
अगदी खरंय. आयुष्य मनसोक्त जगण्याच्या वगैरे कल्पना इतक्या अॅब्स्ट्रॅक्ट आहेत की म्हणजे नक्की काय करायचं किंवा केलं हे प्रत्येकाला शब्दांत व्यवस्थित मांडता येईलच असं नाही. तुझा लेख वाचून हे पुनः जाणवलं नि तू इतका 'क्लिशेड' विषय सहजसोप्या शब्दांत मांडलास याबद्दल कौतुक तर वाटलंच सोबत हेवाही वाटला तुझा फार!
शीर्षकही समर्पक! तुझा हा लेख वाचून मन प्रसन्न झालं बघ अगदी! मस्तच!
17 Jun 2012 - 10:30 pm | मन१
मस्त भिजून निघालो आठवणींच्या प्रवासात...
18 Jun 2012 - 2:41 pm | स्वराजित
"या सर्व वर वर वाईट दिसणार्या आणि अशा अनेक अनुभवात मनाची पहिली प्रतिक्रीया असते वैताग ! पण जेव्हा मनात " हे पुन्हा कधीच नाही " असं येतं तेव्हा आपण भिडतो थेट त्या क्षणाला. ते अनुभवणं किती मोलाचं !
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून.."
अप्रतिम
9 Apr 2014 - 2:36 pm | ब़जरबट्टू
खुप सुंदर लिखाण.... आवडले.. मोहरुन गेलो... :)
मिपाचा सगळा प्राचीन "खजिना" शोधतोय :)
9 Apr 2014 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा
@खुप सुंदर लिखाण.... आवडले.. मोहरुन गेलो...>>> +१ &
9 Apr 2014 - 2:47 pm | आरोही
धन्यवाद त्या निमित्ताने आम्हाला हि चांगले काहीतरी वाचायला मिळाले ...
मस्त आहे लेख मीतान तै ...+)
9 Apr 2014 - 3:34 pm | त्रिवेणी
+१
9 Apr 2014 - 3:42 pm | बॅटमॅन
खूपच सुंदर.
9 Apr 2014 - 5:18 pm | शुचि
वा!! हुजूरपागेता माझ्या शाळेत जांभळाचा असाच सडा पाहिला आहे.
माझ्या लहान मुलीबरोबर सिदधीविनायकला अथर्वशीर्ष ऐकत बसले आहे, तिच्याबरोबर जुहू चौपाटीवर गोल चक्रात बसले आहे.
लहानपणी मैत्रिणॆंबरोबर्चे तर वेधक असंख्य क्षण अनुभवले आहेत .
Very therapeutic piece of writing.
9 Apr 2014 - 9:01 pm | अजया
अप्रतिम गं मितान !
9 Apr 2014 - 9:18 pm | रेवती
पुन्हा वाचतानाही मस्तच वाटलं.
10 Apr 2014 - 11:22 am | कवितानागेश
पूर्वी वाचलाय. कालपासून दुसर्यांदा वाचतेय. :)
9 Apr 2014 - 9:20 pm | मधुरा देशपांडे
पुन्हा पुन्हा वाचत राहावासा वाटेल असा सुंदर लेख.
9 Apr 2014 - 10:54 pm | इनिगोय
खोदकाम करणार्यांचे अनेक आभार! किती सुंदर लिहिलं आहे.. आणि प्रतिक्रियाही साजेशा आहेत.
मितान, नंदन, मेघवेडा ही मंडळी का दिसेनाशी झालीत आता?
9 Apr 2014 - 11:42 pm | बहुगुणी
मितान आहेत सुदैवाने आणि प्रतिसादांतून दिसताहेत, प्रभो आणि नंदन मात्र (इतर अनेक चांगल्या लेखकांप्रमाणेच) मिपावरून अंतर्धान पावले आहेत! त्यांची अनुपस्थिती अल्पकालासाठीच असेल अशी आशा आहे!
10 Apr 2014 - 1:42 pm | इनिगोय
बहुगुणी, आभार, तो लेख वाचला नव्हता.
मात्र तरीही मुख्य पानावर या आणि इतरही काही मंडळींची नावं लेखकांच्या यादीत वाचायला जास्त आवडेल.
9 Apr 2014 - 11:14 pm | सखी
सुरेख! माबोवर वाचलं होतं, पुन्हा वाचतानाही तितकच आवडलं.
10 Apr 2014 - 11:25 am | मितान
एवढ्या दिवसांनी हा धागा वर !!!!
धन्यवाद सर्वांना :)
10 Apr 2014 - 12:03 pm | पिशी अबोली
समुद्राची एक एक लाट अलगद स्पर्श करुन गेल्यासारखं वाटतंय..
10 Apr 2014 - 1:52 pm | प्यारे१
चिंब भिजवणारं... पुन्हा, पुनःपुन्हा!
10 Apr 2014 - 2:05 pm | मनिष
लेख तर सुरेख आहेच, पण शीर्षक 'क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी' तर फारच आवडले.
अवांतरः यावरून गुलजारचे -
अपरिहार्यपणे आठवले. गुलजारनी सावरकरांचे 'शत जन्म शोधिताना' वाचले असेल का? दोन प्रतिभावंत आणि एकसारखीच कल्पना आणि या दोन अप्रतिम ओळी....
11 Apr 2014 - 5:42 pm | शुचि
प्रतिसाद फार आवडला.
10 Apr 2014 - 3:08 pm | आत्मशून्य
हे पुन्हा कधीच नाही भावनेने वाचत असतो, त्यात हा लेख म्हणजे तर.... _/\_
10 Apr 2014 - 5:11 pm | सविता००१
मितान, अप्रतिम लिहितेस गं तू!
11 Apr 2014 - 8:00 pm | जेनी...
अप्रतिम शब्दांकन .... एकेक शब्दात लाखमोलाचा खजिना दडल्यागत
खुप आवडलं...
14 Apr 2014 - 3:12 pm | पैसा
तितक्या वेळा नव्याने आवडले!
6 Nov 2014 - 10:52 pm | इशा१२३
मधुराला धन्यवाद.एक सुरेख खजिना दाखविल्याबद्दल.
मितान अप्रतिम लिहिले आहेस.वाचताना माझ्याहि अनेक प्रवासांच्या आठवणी दाटुन आल्या यानिमित्ताने.
धन्यवाद!