आहेर, भेटवस्तू आणि संकट

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
21 Dec 2010 - 3:29 pm

आहेर किंवा भेटवस्तू देणं-घेणं ही एक फार प्राचीन परंपरा आहे. प्रसंगानुरुप किंवा प्रसंगाशिवाय भेटवस्तू देणं किंवा स्वीकारणं हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे; इतकं अंगवळणी पडलं आहे की वस्तू काय आहे, तिची उपयुक्तता काय आहे, त्या वस्तूची आपल्याला गरज आहे का, त्या वस्तूची किंमत किती आहे वगैरे बाबी लक्षात न घेता आहेर किंवा भेटवस्तू दिल्या-घेतल्या जातात.

आता हेच बघा ना, लग्नातला आहेर किती गमतीदार असतो. अगदी जवळच्या नात्यातलं लग्न नसेल तर आहेर विकत घेतला जात नाही; तो घरातच जुळवला जातो. कुठलीतरी आहेरात आलेली साडी, त्यावरचं ब्लाऊजपीस, असाच कुठलातरी किमान पाच घरे फिरून आलेला मळका शर्टपीस आणि पाकीटात घातलेले १०० रुपये इतक्या स्वस्तात आहेर गुंडाळला जातो.

आमचे एक काका आहेत; ते तर घरातल्या किती लोकांना जेवायला बोलावलं आहे यावर आहेर ठरवतात. एकालाच असेल तर फक्त मुख्य व्यक्तीला आहेर; सगळ्यांना असेल तर वरीलप्रमाणे सगळ्यांना आहेर असा त्यांचा खाक्या असतो. तीन-चार वर्षांपूर्वीची एखादी साडी एखाद्या नामांकित साडीच्या दुकानाच्या पिशवीत घालायची, त्यातच घडी बदलून स्वच्छ भाग वर आणलेला शर्टपीस टाकायचा आणि निघायचे. लग्नात पोहोचल्यावर पाकीटात पैसे घालायचे आणि सगळा आहेर अगदी प्रेमाने द्यायचा. जे आहेर घेतात ते देखील अगदी निर्विकार चेहर्‍याने तो बाजूला ठेवतात. बहुधा तेव्हाच तो आहेर कुणाला द्यायचा याचा ते विचार करत असावेत.

काही अतिउत्साही मंडळी असली पोतेरं झालेली साडी घडी मोडून मुख्य महिलेच्या अंगावर पांघरतात. दीड-दमडीच्या जुनाट साडीच्या बळावर ही मंडळी "नेसायची बरं का आमची साडी, खास पेशवाईमधून आणलीये.." असा आग्रह करून प्रेम, माया, प्रेमळ हक्क इत्यादी सगळ्या भावनांची बरसात करतात. निमूटपणे साडी पांघरून घेणारी स्त्री काही कच्च्या गुरुची चेली नसते; ती निवांत वेळ मिळाल्यावर त्या साडीला घडी करून इस्त्री करून जपून ठेवते, अशीच कुठेतरी खपवण्यासाठी! अशा प्रकारे ती साडी किमान दहा ठिकाणी 'आहेराची साडी' म्हणून मिरवल्यानंतर शेवटी कुठल्यातरी मोलकरणीला दिली जाते.

असा आहेर देतांना खूप काळजीपूर्वक द्यावा लागतो. एकदा आमच्या लग्नात कुणीतरी दिलेली साडी पुन्हा कुठल्याशा समारंभात पुन्हा त्याच व्यक्तीला दिली गेली होती. त्यावरून खूप गोंधळ उडाला होता. त्या काकू पडेल चेहर्‍याने साडी स्वीकारत आहेत असे जाणवल्यावर तपास सुरू झाला. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव टिपण्यासाठी एक वेगळी हुशारी लागते. मग बायकांमध्ये कूजबूज सुरू झाली. विश्वसनीय सूत्रांकडून त्यांनीच आहेरात दिलेली तीन वर्षांपूर्वीची साडी पुन्हा त्यांनाच दिली गेली आहे असे कळले. हे विश्वसनीय सूत्र खूप जबरदस्त असते. दहा वर्षांपूर्वी ठमीच्या लग्नात ठमीच्या आईने ठमीच्या होणार्‍या नवर्‍याच्या भावाच्या सासूबाईंना कुठली साडी दिली होती हे या सूत्रांना बरोब्बर आठवते. आज नवर्‍याने खर्चासाठी दिलेले हजार रुपये क्षणात विसरू शकणारी ही सूत्रे दहा वर्षांपूर्वीची साडीची देवाण-घेवाण नीट लक्षात ठेवतात. एवढेच नव्हे तर मयुरीची काकू मंदारच्या लग्नात बैंगनी हिरव्या रंगाचा शालू नेसून आली होती आणि त्या शालूला पदरावरच्या सोनेरी काठाजवळ बारीक छिद्र पडले होते हे देखील त्यांना पक्के आठवत असते.

"काय मेलं लक्षण, शोभतं का हे? नवरा एवढा ओरबाडून कमवतोय, मुलगा एवढ्या नोटा छापतोय आणि शालूला छिद्र? एक नवीन शालू नाही घेता आला चंपावंन्सना..." असं बोलून हे सूत्र इतर बायकांची सहमती मिळवते. बायका माना हलवतात. असे हे विश्वसनीय 'मंगळ'सूत्र पोलीस सूत्रांपेक्षाही जास्त विश्वसनीय असते. शिवाय चंपावंन्सना नावे ठेवण्याची संधी दवडली तर बाकीच्या बायका काय म्हणतील ही भीती असतेच. असो.

साडीमुळे झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी मग "अहो, ती साडी कशी बरं आहेराच्या सामानात ठेवली गेली लक्षातच आलं नाही. घाईत तयारी केली की असं होतं बघा. माझी नेहमीच्या नेसण्यातली साडी आहे ती...." असं काहीसं बोलून वेळ मारून नेण्याची हुशारी अंगी बाणवावी लागते.

भेटवस्तू देण्याची पद्धत आता चांगलीच रुळली आहे. पूर्वी कुणाकडे खूप दिवसांनी जातांना काही घेऊन जाण्याची पद्धत नव्हती. फार तर घरी केलेले लाडू किंवा खोबर्‍याच्या वड्या घेऊन जायची प्रथा होती. आता मस्त चकचकीत खोक्यात घालून पेढे, मिठाई असला महागडा खाऊ नेण्याची पद्धत रुढ होत आहे. अर्थात अशी पद्धत प्रामुख्याने शहरात जास्त आढळते.

मागे आमच्या वास्तुशांतीच्या समारंभात कुणीतरी एक कुत्र्याचा मोठा मातीचा पुतळा दिला होता. मला हसावे की रडावे कळेना. कुठे ठेवणार होतो आम्ही त्याला? शेवटी आम्ही तो आमच्या घरी काम करणार्‍या बाईच्या मुलाला खेळायला देऊन टाकला. पुनर्वापरास अगदीच अयोग्य अशी ती भेट होती. पण तेच माझ्या मित्राच्या बायकोने एक खूप छान फायबरमध्ये घडवलेले म्युरलटाईप शिल्प दिले होते. ते इतके सुंदर होते की आम्ही ताबडतोब ते बैठकीत लावून टाकले.

खूप निक्षून आहेराला आणि भेटवस्तूंना नकार दिला तरी काही मंडळी अगदी आग्रहाने आहेर देतात. नाही स्वीकारल्यास "तुम्ही जर हे घेतलं नाही तर आम्ही तुमच्या पुढच्या कुठल्याच कार्यक्रमाला येणार नाही" अशी धमकी देतात. अगदी निकराने नाही म्हटलं तर काही लोकांना चक्क राग येतो. मग "गरीबाचं गिफ्ट तुम्ही कशाला घ्याल; तुम्ही मोठ्या लोकांचा आहेर घ्याल. आता आलं लक्षात आमच्या..." वगैरे बडबड करून वैताग आणतात. मग नाईलाजाने त्यांचं गिफ्ट स्वीकारावं लागतं. बरं एवढा आकांडतांडव करून देतात काय तर डागाळलेला शर्टपीस किंवा चुरगळलेली मातकट रंगाची बघताच झुरळासारखी झटकून टाकावी अशी साडी!

आजकाल 'नो आहेर' ची जी प्रथा रुजतेय ती खरच स्तुत्य आहे. तुम्ही काहीच देऊ नका आणि आम्ही पण काहीच देणार नाही असा समंजसपणा असला तर रुसव्या-फुगव्यांना जागाच उरत नाही. कार्यक्रमाला जावं, मस्त जेवावं, लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना भेटावं, निवांत गप्पा हाणाव्यात आणि मजा करावी इतकाच जर स्कोप ठेवला तर समारंभाची लज्जत आणखी वाढते.

त्यातल्या त्यात आहेर किंवा वस्तू देणं-घेणं जर आवश्यक असेल तर मी रोख रकमेला प्राधान्य देतो. उगीच महागड्या वस्तू देण्यापेक्षा जर तितकीच रक्कम दिली तर तिचा विनियोग आपल्याला जशी गरज असेल तसा करता येतो. आमच्या वास्तुशांतीच्या वेळेस आम्ही आहेर स्वीकारणार नाही असे बजावले होते पण एक छोटीशी आठवण म्हणून दहा ग्रॅमचे चांदीचे नाणे प्रत्येक कुटुंबाला दिले होते. साड्या, ब्लाऊजपीस, शर्टपीस असल्या निरर्थक गोष्टींना फाटा देऊन सुटसुटीत परंतु नेमके गिफ्ट दिल्याने सगळेच खुश झाले होते. मी स्वतः शक्य तितक्या ठिकाणी रोख रक्कमच देतो. एका गटाने एकत्र करून रक्कम दिली तर खूप मोठी रक्कम जमा होते ज्याचा हवा तसा उपयोग करणे शक्य होते. प्रत्येकाने वेगळे (कुणी कुत्रा, कुणी भिंतीवरचे घड्याळ, कुणी पुष्पगुच्छ, कुणी शर्टपीस, कुणी गणपतीची मूर्ती ) आणि तितकेच अनावश्यक गिफ्ट दिल्याने गिफ्ट देण्यामागची भावना तर कळते पण ती फक्त भावनाच राहते; तिचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. आमच्या एका मित्राच्या लग्नात आम्ही मित्रांनी रक्कम गोळा केली; ती सात हजाराच्या आस-पास होती. आम्ही आधी मित्राला विचारले की आमच्याकडे इतके पैसे आहेत, तुला कॅश हवी की एखादी वस्तू हवी. त्याने आम्हाला त्याला आवश्यक वाटणारी वस्तू सांगीतली आणि लग्नाच्या आधीच ती त्याचाघरी पोचती करण्यात आली.

गिफ्ट व्हाऊचर हा एक तसलाच निरर्थक प्रकार. मोठ्या शोरूमची किंवा मॉल्सची गिफ्ट व्हाऊचर्स तसं पाहिलं तर महाग पडतात. शंभर रुपयांचं एखाद्या मॉलचं गिफ्ट व्हाऊचर फक्त त्याच मॉलमध्ये चालतं. तिथे बाहेर ऐंशी रुपयांना मिळणारी वस्तू तुम्हाला व्हाऊचरच्या बदल्यात शंभर रुपयांना देतात; म्हणजे वीस रुपयांचा तोटा होतो. शिवाय तिथूनच काहीतरी खरेदी करण्याचं बंधन येतं हा मुद्दा निराळा. त्यामुळे गिफ्ट व्हाऊचर्सदेखील शक्यतो टाळावीत या मताचा मी आहे.

आहेर किंवा गिफ्ट देणं हे एका चांगल्या भावनेपोटी घडणारं कृत्य असतं. थोडी कल्पकता वापरून घेणार्‍याच्या चेहर्‍यावर आनंद आणता येतो. अगदीच वेळ नसला तर कॅश तो हर दर्द का अक्सीर इलाज हैं...

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

आज नवर्‍याने खर्चासाठी दिलेले हजार रुपये क्षणात विसरू शकणारी ही सूत्रे दहा वर्षांपूर्वीची साडीची देवाण-घेवाण नीट लक्षात ठेवतात. एवढेच नव्हे तर मयुरीची काकू मंदारच्या लग्नात बैंगनी हिरव्या रंगाचा शालू नेसून आली होती आणि त्या शालूला पदरावरच्या सोनेरी काठाजवळ बारीक छिद्र पडले होते हे देखील त्यांना पक्के आठवत असते.

जोर्दार हशा आणि टाळ्या!!!!!!!
पुढंचीही सगळी वाक्ये कोट करावी लागतील.. म्हणून लेखाचा गुपचूप आनंद घेतो.. ;-)

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 3:39 pm | छोटा डॉन

एकदम कडक लेख आहे ...
किती वाक्ये कोट करावी आणि किती नाही, अल्टिमेट !

असेच अजुन येऊद्यात, सुंदर लिखाण !

- छोटा डॉन

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2010 - 3:50 pm | इंटरनेटस्नेही

.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा !
जबर्‍या लेख मालक. एकेक वाक्य म्हणजे तडातड उडणारे पॉपकॉर्न आहेत बघा.

आमच्या एका मावसभावाला वास्तुशांतीच्या दिवशी तब्बल १९ गणपती (मुर्ती + फोटो + पेंटींग + घड्याळ) अशा स्वरुपात मिळाले होते. तर एका मित्राच्या बायकोला डोहाळजेवणाच्या दिवशी म्हणे बालाजी तांबेंच्या 'गर्भसंस्कार' पुस्तकाच्या ७ प्रती मिळाल्या होत्या.

समीरसूर's picture

21 Dec 2010 - 4:26 pm | समीरसूर

गर्भसंस्कारच्या सात प्रती? सहीच....

बाकी मित्राच्या लग्नात भेट म्हणून नवरदेवाच्या मित्रांनी कंडोम्सची पाकीटे (बॉक्स म्हणा हवं तर) देण्याचे स्तुत्य उपक्रम ऐकीवात आहेत... ;-)

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2010 - 4:40 pm | नगरीनिरंजन

काही काळापुर्वी केएसचा एक पेश्शल गिफ्ट पॅक यायचा. त्यात काँडोम्स, वंगण, काही 'खेळ' वगैरे असायचे. आता मिळत नाही असे कळाले. तो आहेर आमच्या मित्रमंडळात फार लोकप्रिय झाला होता.

स्वैर परी's picture

21 Dec 2010 - 3:49 pm | स्वैर परी

आपण लिहिलेल्या सर्व मुद्द्यान्शी सहमत!
सामान्यतः बायकांना कुणी कुठल्या दिवशी काय कपडे घातले होते हे नेमके आठवते, का उगिच बायकांना नावे ठेवता हो! ;)
बिचार्या त्या! :)

प्रीत-मोहर's picture

21 Dec 2010 - 3:53 pm | प्रीत-मोहर

बरेच आहेर मिळालेले दिसताहेत ;)

(आहेर न घेणारी )

समीरसूर's picture

21 Dec 2010 - 4:21 pm | समीरसूर

..तर थोडे घेतले. ;-)

सासरेबुवांकडून पहिल्या दिवाळीला काय मिळते याची उत्कंठा होती. कशाला खोटे बोला? त्यांना माझे तत्व माहित होते म्हणून त्यांनी कॅशच दिली होती. (किती हे गोड गुपित आहे). ;-)

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2010 - 3:59 pm | नगरीनिरंजन

फर्मास लेख. विश्वसनीय सूत्रांबद्दलची टिप्पणी तर टोप्या उडवून गेली.
खेड्यापाड्यातल्या काही लग्नात आहेर दिला की ध्वनिक्षेपकातून देणार्‍या व्यक्तीचे नाव आणि दिलेल्या आहेराचे वर्णन मोठ्याने सांगताना पाहिलेले आहे.

समीरसूर's picture

21 Dec 2010 - 4:29 pm | समीरसूर

एक माणूस बसवलेला असतो. त्याच्याकडे आहेराची माहिती लिहून घेणे, आहेर सांभाळून ठेवणे, ध्वनिक्षेपकावर नाव आणि आहेराची रक्कम्/वस्तू जाहीर करणे अशा जबाबदार्‍या असतात. हा माणूस खूप तोर्‍याचा असतो. लग्नात खूप मान असतो या व्यक्तीला आणि ज्याला ही जबाबदारी सोपवली जाते तो खूप 'खास' म्हणून त्याच्याविषयीचा लग्नाच्या मंडपातल्या लोकांमधला आदर दुणावतो. :-)

जबरदस्त एकदम

विश्वसनीय सुत्र तर जबरी..

बाकी ,
उपस्थीती हाच आहेर .. असे माझे मत आहे .. ह्यामुळे घरच्यांकडुन बोलणे खावे लागले आहे ..

अवलिया's picture

21 Dec 2010 - 4:15 pm | अवलिया

मस्त लेखन !!

sneharani's picture

21 Dec 2010 - 4:27 pm | sneharani

मस्त लिहलयं!

प्राजक्ता पवार's picture

21 Dec 2010 - 4:41 pm | प्राजक्ता पवार

लेखन आवडलं .

पर्नल नेने मराठे's picture

21 Dec 2010 - 4:45 pm | पर्नल नेने मराठे

मला ९९% चान्गल्याच भेटी येतात. मी त्या सगळ्या वापरत नाही. २र्याना द्यायला ठेवते.
उदाहरण द्यायचे झाल्यास मला एक सुरेख, महागडी पर्स भेट म्हणुन आली. पण ति एवढी 'हेवी' होती कि तिला शोभेल असा ड्रेस घेणे मला क्रमप्राप्त होते जे मला करायचे नव्हते. म्हणुन ही पर्स एकदा कारणपरत्वे माझ्या फॅशनेबल गुज्जु शेजारणीला भेट दिलि जि तिलाच छान शोभतेय व १-२ दा तिने वापरताना मी पाहिलेय. त्या गुज्जुनेच मला छान क्रोकरी सेट दिलान तो परत एवढा छान कि मी तो तसाच पुढे करायला ठेवुन दिलाय.
आता तुम्ही म्हणाल मग मी कोणत्या भेटी वापरते.
हं, तर मला नॉन्-स्तिक पॅन , भान्डी दिली कि मि ति ठेवुन देते, कारण दर २ वर्शानी लागतातच,तसेच मला शोभणारे ड्रेसेस, टॉप्स दिले तर मी वापरते.
आता १% टक्क्याबद्दल बोलुयात ;). मी साड्या वापरत नाही तरी लोक मला साड्या, ब्लाउज पिसेस देतात जे मी ढुम्कुनही बघत नाही , सरळ सासुबाइना देउन टाकते, त्या बसतात फिरवत. मागच्या वर्शी माझ्या सासरच्या २ जवळच्या नातेव्याइक बायकांनी २घी मिळुन २५०/- प्रत्येकि काढुन ५००/-चा एक जिन्सवर घालायचा टॉप्स दिला. तो इतका बन्डल आहे कि एक्दा घालताच उसवला =)).
विकत घेउन द्यायचे झाल्यास मी हि बरेचदा नॉन-स्तिक पॅन , भान्डीच भेट देते. काही ठिकाणी पैसे घालुन एनव्हल्प देते, लग्न, बारसे, मुन्जी ह्या ठिकाणी. काही ठिकाणी फळे, चोक्लेट्स घेउन जाते. पण फ्लावरपॉट, शोपिस तत्सम भेटी अजिबात देत नाही.

>> मी साड्या वापरत नाही तरी लोक मला साड्या, ब्लाउज पिसेस देतात जे मी ढुम्कुनही बघत नाही , सरळ सासुबाइना देउन टाकते, त्या बसतात फिरवत. मागच्या वर्शी माझ्या सासरच्या २ जवळच्या नातेव्याइक बायकांनी २घी मिळुन २५०/- प्रत्येकि काढुन ५००/-चा एक जिन्सवर घालायचा टॉप्स दिला. तो इतका बन्डल आहे कि एक्दा घालताच उसवला =)).

:-)

मी साड्या वापरत नाही तरी लोक मला साड्या, ब्लाउज पिसेस देतात जे मी ढुम्कुनही बघत नाही , सरळ सासुबाइना देउन टाकते, त्या बसतात फिरवत. मागच्या वर्शी माझ्या सासरच्या २ जवळच्या नातेव्याइक बायकांनी २घी मिळुन २५०/- प्रत्येकि काढुन ५००/-चा एक जिन्सवर घालायचा टॉप्स दिला. तो इतका बन्डल आहे कि एक्दा घालताच उसवला =)).

आपलं वजन वाढल्याचा दोष आहेर देणारांवर काढणे शोभत नाही चुचु जी आपल्याला. पाकिस्तानी निती आहे ही.

टारझन's picture

21 Dec 2010 - 4:50 pm | टारझन

एक नंबर लेखण :)

- टारझन
आमची उपस्थिती हाच आहेर ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Dec 2010 - 5:53 pm | घाशीराम कोतवाल १.२

- टारझन
आमची उपस्थिती हाच आहेर

हो रे बाबा हो तुमची उपस्थीती हाच मोठा आहेर कारण तुझ्यासारखा भीमकाय व्यक्ती
एका पंक्तीत गुलाबजामच अर्धशतक ठोकु शकतो आणी ठोकतो सुध्दा !!!

यशोधरा's picture

21 Dec 2010 - 5:06 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे. चुच्सचा प्रतिसादही एकदम खणखणीत! :D

योगी९००'s picture

21 Dec 2010 - 5:14 pm | योगी९००

आम्ही पण इकडचा आहेर तिकडे करतो...नाहीतरी आहेरात आलेल्या शर्टपीस आणि पॅन्टपीस चे कोणी कपडे शिवत असेल असे वाटत नाही. (टेलर ही आजकाल इतके स्वस्त नसतात).

लेखातले बरेचसे मुद्दे पटले ..मस्त मस्त मस्त

त्यातल्या त्यात आहेर किंवा वस्तू देणं-घेणं जर आवश्यक असेल तर मी रोख रकमेला प्राधान्य देतो. उगीच महागड्या वस्तू देण्यापेक्षा जर तितकीच रक्कम दिली तर तिचा विनियोग आपल्याला जशी गरज असेल तसा करता येतो. हे तर एकदम पटलं. माझेही हेच मत आहे.

आमच्या वास्तुशांतीच्या वेळेस आम्ही आहेर स्वीकारणार नाही असे बजावले होते पण एक छोटीशी आठवण म्हणून दहा ग्रॅमचे चांदीचे नाणे प्रत्येक कुटुंबाला दिले होते.
हे जरा पचायला जड गेलं..जर तुम्ही काही घेणार नसाल तर आलेल्या माणसांना उगाच कशाला लाजवता? उगाच मोठेपणा किंवा दिखावा वाटतो. (माफ करा थोडे स्पष्ट बोललो.). इथे आलेल्या पाहुण्यांना awkward वाटण्याची शक्यता आहे.

समीरसूर's picture

21 Dec 2010 - 5:31 pm | समीरसूर

धन्यवाद, खादाडमाऊ!

शंका रास्त आहे पण ही भेट अगदीच छोटी होती. चांदी आजच्या इतकी महाग नव्हती तेव्हा. त्यामुळे आहेर या लेबलखाली न देता एक आठवण म्हणून आम्ही ही भेट दिली होती. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काहींनी उलटभेट दिली होती पण बहुतेकांनी ती एक साधी भेट म्हणूनच स्वीकारली होती. देतांना आपण कुठला आविर्भाव आणून भेट देतोय यावर घेणार्‍याचे मत बनते.

दिखावा/मोठेपणा वगैरे दाखविण्याचा मानस नव्हता. इतक्या छोट्या गिफ्टद्वारे काय मोठेपणा दाखवणार? नाणे चांदीचे होते, सोन्याचे नव्हे... :-) आणि सुटीचा दिवस नसल्याने पाहुणे इतक्या दूर समरंभासाठी आले होते याची कृतज्ञता म्हणून ते नाणे दिले होते.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

पुढच्या वेळी कधी समारंभ आहे तुमच्याकडे ? ;)

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2010 - 6:15 pm | इंटरनेटस्नेही

हेच म्हणतो!
-
(चांदीप्रेमी) इंटेश.

समीरसूर's picture

22 Dec 2010 - 3:14 pm | समीरसूर

माझ्या निवृत्तीनिमित्त मोठा सोहळा आयोजित करणार आहे घरी. ;-)

जोक्स अपार्ट, सध्या तरी काही नजरेच्या टप्प्यात दिसत नाही. काही असल्यास नक्की बोलावू. :-) नक्की यायचं (आहेर घेऊन ;-))

सखी's picture

21 Dec 2010 - 8:17 pm | सखी

समीरसूर लेख बरासचा पटला, आवडला. परंतू मीही खादाडमाऊसारखाच प्रश्न विचारणार होते. जर तुमची आहेर देण्या-न-देण्याबद्दलची मतं इतकी स्पष्ट आहेत तर तुम्ही परतीचा आहेर देताना स्वत:ला वेगळा न्याय कसा काय लावु शकता बुवा?
आमच्या घरीही अशी १५-२० चांदीची नाणी आत्तापर्यंत जमली असावीत त्यांचे नंतर काय करायचे हा ही प्रश्न येतोच (जसे तुम्ही वर इतके गणपती, शोभेच्या वस्तु जमा होतात असे म्हटले आहे). आधी देवांजवळ ठेवत असु, कारण त्यावर खुपदा एका बाजुला गणपती, लक्ष्मीचे चित्र असते पण नंतर नंतर देवघरही लहान पडु लागले :)
रोख रक्कम देणे मलाही व्यवहारीक वाटते पण पैसे संपुन जातात व लक्षात रहात नाही असेही वाटते. मित्रमैत्रिणिंच्या गटाने मिळुन एक मोठी रक्कम्/मोठी वस्तु/एखादी ट्रिप बुक करुन दिली तर त्यामागची भावनाही नंतर लक्षात राहील, अर्थात हे प्रत्येकवेळीच शक्य होईल असे नाही.

समीरसूर's picture

22 Dec 2010 - 2:58 pm | समीरसूर

सखी,

चांदीच्या नाण्यांचे काय करायचे म्हणून काय विचारता? अहो सरळ दुकानात जाऊन ती नाणी मोडून खणखणीत चांदी घ्यायची. चांदीचा भाव बघता आणि पुढे चांदीची झेप बघता चांदीसारखा गुंतवणूकीस उत्कृष्ट पर्याय नाही सध्या.

तुम्हाला ३ वर्षापूर्वी आलेले १० ग्रॅमचे नाणे तेव्हा कदाचित २०० रुपयाचे असेल; आज त्याची किंमत ४५० रुपयाच्या घरात आहे. सांभाळून ठेवा किंवा अगदीच नकोशी झाली असतील तर मला द्या. ;-)

सखी's picture

22 Dec 2010 - 5:55 pm | सखी

:)

योगी९००'s picture

21 Dec 2010 - 8:20 pm | योगी९००

तुमच्या भावना पोहोचल्या..कृतज्ञता म्हणून तुम्ही काही जरी केले तरी सर्वच जण योग्य अर्थाने घेतील असे नाही. तुमच्या जवळचेच तुमचे असे वागणे समजून घेतील.

देतांना आपण कुठला आविर्भाव आणून भेट देतोय यावर घेणार्‍याचे मत बनते.
हे एकदम बरोबर बोललात..

बाकी दिखावा/मोठेपणा असे म्हणल्या बद्दल परत एकदा माफी.

उलटभेट - हा एक प्रकार आजकाल खुप आहे. ह्यावर ही थोडाफार प्रकाश टाकावा. माझ्या मते आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे उलटभेट..

५० फक्त's picture

21 Dec 2010 - 5:27 pm | ५० फक्त

तालुक्याच्या किंवा खेड्याच्या ठिकाणी लग्न असेल तर लग्नाची एक पत्रिका ढापुन लोकल कुटुंब कल्याण कार्यालयात देउन या. तिथली सगळी मंडळी जातिनं लग्नाला हजर असतात आणि ते पण आहेर आणतात, आणि तो ही भाषणासहित.

माळशिरसला माझ्या चुलतभावाच्या लग्नात हा किस्सा घडला होता.

साहेब,डॉक्टव, नर्स व नर्सोबा व इतर असे ६-७ जण आले होते, ३ डझण निरोधचा डब्बा घेउन, गिफ्ट प्याक न करता, आणि नवरा नवरीला स्टेजवर बरोबर घेउन साहेबांनी एक छोटेसे २ मिनिटांचे भाषण दिलं. विषय - फ्यामिली प्लॅनिंग

लई मज्जा आलि होती.

हर्षद.

स्वाती२'s picture

21 Dec 2010 - 6:52 pm | स्वाती२

:D

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2010 - 6:21 pm | इंटरनेटस्नेही

मी अहेर म्हणुन फक्त खालील गोष्ट स्वीकारणार आहे.:-

१. सिग्नेचर हाफ / फुल किंवा ब्लेन्डर्स प्राईड हाफ / फुल.
२. केरला संपर्क क्रांतीची फर्स्ट एसी टिकीटे
३. एमटीएनएल मुंबई चे ४ एम बी पी एस प्लॅन्चे वार्षिक स्बस्क्रिपशन
४. २०० लिटर स्पीड / पॉवर पेट्रोल.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार

मी अहेर म्हणुन फक्त खालील गोष्ट स्वीकारणार आहे.:-

१. सिग्नेचर हाफ / फुल किंवा ब्लेन्डर्स प्राईड हाफ / फुल.
२. केरला संपर्क क्रांतीची फर्स्ट एसी टिकीटे
३. एमटीएनएल मुंबई चे ४ एम बी पी एस प्लॅन्चे वार्षिक स्बस्क्रिपशन
४. २०० लिटर स्पीड / पॉवर पेट्रोल.

येवढ्या पैशात तुझे अजुन एक लग्न लावुन देता येईल.
बघ विचार कर..

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2010 - 6:45 pm | इंटरनेटस्नेही

येवढ्या पैशात तुझे अजुन एक लग्न लावुन देता येईल.
बघ विचार कर..

खत्री प्रतिसाद! =)) =))

कसला आलाय खत्री प्रतिसाद , इंट्या?
दोन दोन बायकांचे खर्च परडायला नकोत का? आँ?
जा, अभ्यासाला!;)

इंटरनेटस्नेही's picture

22 Dec 2010 - 2:07 am | इंटरनेटस्नेही

कसला आलाय खत्री प्रतिसाद , इंट्या?
लोल्स! वाचुन प्रपोझल अ‍ॅट्ररॅक्ट्रिव्ह वाटले होते मला!
(तरुण) इंट्या.

दोन दोन बायकांचे खर्च परडायला नकोत का? आँ?
अर्रं हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं!
(कॉस्ट अकाऊंटट) इंट्या.

जा, अभ्यासाला!
होSSSS!
(आज्ञाधारक) इंट्या.

:)

स्वाती२'s picture

21 Dec 2010 - 6:51 pm | स्वाती२

मस्त लेख!
मला इथली गिफ्ट रजिस्ट्रीची पद्धत आवडते. वधू-वर किंवा बाळाचे आई-बाबा दुकानात नाव नोंदवतात आणि त्यांना उपयोगी पडणार्‍या वस्तूची यादी देतात. आपल्या बजेटमधे बसणारी वस्तू आपण निवडायची. अगदी सोप डिश, गार्बेज कॅन पासून उशा, चादरींपर्यंत संसाराला उपयोगी गोष्टी यादीत असतात. गिफ्ट रिपीट झाली, आवडली नाही वगैरे भानगड नाही.
इतरवेळी भेट देताना मी शक्यतो ती व्यक्ती ज्या ठिकाणी नेहमी खरेदी करते तिथले गिफ्ट कार्ड देते. किंवा वस्तू दिल्यास गिफ्ट रिसिट घेते म्हणजे वस्तू आवडली नाही, रिपिट झाली तर त्या व्यक्तीला दुसरी बदलून घेता येते. देशात मात्र आहेर म्हणून पैसेच देते.

सहज's picture

21 Dec 2010 - 7:08 pm | सहज

हा हा हा! खुसखुशीत लेखन!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Dec 2010 - 7:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खरे आहे लिहीलेले. बरेचदा मी ही पाकिटातुन पैसेच देते.

उपास's picture

21 Dec 2010 - 7:59 pm | उपास

आवडला..
'घरचा आहेर' हा वाक्प्रचार का पडला असावा ह्याचा प्रत्यय येणारे आहेर येतात बरेचदा.. अजून एक गोष्ट म्हणजे, पत्रिकेत 'कृपया आहेर अथवा पुष्पगुच्छ आणू नये' असे स्पष्ट लिहिलेले असताना काही अतिउत्साही मंडळी आहेर आणतात, तो सगळ्यांच्या देखत यजमानांना देतात. .मग 'घे रे. नको रे..' असे लाडीक नाट्य तिथे घडते आणि समस्त प्रेक्षक वृंदास ओशाळयुक्त अचंब्यात टाकून, घेतला की नाही शेवटी आहेर, अशा विजयी मुद्रेने स्टेज वरुन खाली येतात... काही वेळा तर खुद्द यजमानच आहेर आणू नये असे लिहिलेले असताना चक्क आहेर घेताना दिसतात.. मग रिकामी पाकीटे वेळेला उपयोगी पडतील म्हणून अशी पाकीटे ठेवणारी चाणाक्ष मंडळी तिथेच पाकीटे भरुन देतात..
असं सगळं बघितल्यावर, एक सामाजिक शिस्त आपल्या समाजाला आवश्यक आहे असं वाटून जातंच..
जर तिथे आहेर आणू नये लिहिलं असेल तर मी तरी आहेर नेत नाहीच.. बाकीच्यांनी दिला तरीही.. असो!

योगी९००'s picture

21 Dec 2010 - 8:37 pm | योगी९००

उत्तम निरीक्षण..

'कृपया आहेर अथवा पुष्पगुच्छ आणू नये'
म्हणून लोकं पाकिटात पैसे घालून आणतात. आणि वर म्हणतात की पाकिटात पैसे असे कोठे लिहीले होते.

अवांतर :
माझे एक नातेवाईक कोणाला जर ग्रिटींग पाठवणार असतील तर मुद्दाम फक्त त्या पाकिटावरच नाव आणि शुभेच्छा मजकूर लिहीतात. आतले ग्रिटिंग कार्ड एकदम कोरे असते. त्यांचा उद्देश हाच असतो की घेणारा ते कार्ड परत वापरू शकेल.

समीरसूर's picture

22 Dec 2010 - 3:00 pm | समीरसूर

ग्रीटींग कार्ड हा एक असलाच तद्दन फालतू प्रकार वाटतो. कागदाची नासाडी. उपयोग शून्य! नंतर कुणीच बघत नाही आणि शेवटी फेकून दिली जातात.

त्यापेक्षा दोन इडली-चटणीची पाकिटे द्यावीत. :-)

धमाल मुलगा's picture

22 Dec 2010 - 4:15 pm | धमाल मुलगा

>>त्यापेक्षा दोन इडली-चटणीची पाकिटे द्यावीत.
=)) =))
हाण्ण तिच्यायला!! मी इथं इम्याजिन करुनच फुटलो ना..

समीरसूर's picture

22 Dec 2010 - 3:08 pm | समीरसूर

आहेर किंवा गिफ्ट घेणे हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार असतो.

मी अगदीच आवश्यक असले तर आहेर विकत घेतो आणि तो ही जवळच्याच दुकानात काय जे असेल त्यातूनच आणि ते ही एकाच दुकानातून एकदम सगळे घेऊन बाहेर पडतो...डोक्याला ताप नाही. नाहीतर सरळ कॅश भरायची आणि जायचे. जेवण बकवास असले तर मला आहेर वाया गेल्याचे अंमळ दु:ख होते... :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2010 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला. पंचेस झकासच.
आजकाल आपल्याकडे, निदान शहरांमधे, काय हवं-नको ते विचारून गिफ्ट देतात. एका मित्राच्या लग्नात त्यांना चार इस्त्र्‍या गिफ्ट म्हणून आल्या होत्या. =)) =)) त्याच्या अनुभवावरून बरेच लोकं शहाणे झाले.

असुर's picture

22 Dec 2010 - 12:05 am | असुर

सध्या आहेर वगैरे क्षुल्लक गोष्टींची चिंता करत नाही!

मात्र आपलेवेळी "आहेर,नाहीतर बाहेर" रुल वापरायच्या विचार करतो आहे. आणि एक आहेर-कंट्रोलर नमून "आहेराप्रमाणे मेजवानी" नियमदेखील राबवायचा आहे. याअंतर्गतच नको असलेले आहेर आणि व्यक्ती यांची साभार बोळवण करणेत येईल! =)) =))

--असुर

मेघवेडा's picture

22 Dec 2010 - 2:24 pm | मेघवेडा

आम्हीही हेच तत्त्व राबवणार आहोत. दोन पावलं पुढे जाऊन मी तर असा विचार केलाय की ध्वनिक्षेपकावरून जाहीर करावे, "श्री अबक यांच्याकडून रू. ५१ आलेले आहेत. बंड्या, त्यांना गुलाबजामच्या स्टॉलवर नेऊन सोड रे." "श्री. कखग यांच्याकडून रू. १०१!! बंड्याऽऽ.. बासुंदीचा स्टॉल रे" इ. इ. ;)

बाकी समीरसूर, लेख अगदी झकास हो! कडक पंचेस आहेत एकेक!

पैसा's picture

22 Dec 2010 - 8:53 pm | पैसा

बेळगावकडे खेड्यातून खरोखरच लाऊडस्पीकरवरनं कोणी किती आणि काय आहेर दिला हे जाहीर करायची पद्धत काही वर्षांपूर्वी तरी होती!

कुठल्याश्या मॉलचे किंवा महाग दुकानाचे गिफ्ट व्हाउचर म्हणजे घेणार्‍याला पण नकोसं होत असेल. एक तर महाग वस्तू घ्या वर इंपल्स बाईंग म्हणून आणखी महाग आणि नको असलेल्या गोष्टी घेणं होतं.
असो. पु.लं.च्या कुठल्याश्या पुस्तकातील ट्रिक मस्त आहे. आपल्या नावाचं लेबल घेउन समारंभाला जावं आणि तिथे ठेवलेल्या त्यातल्या त्यात मोठ्या/महागड्या वस्तूला जाउन चिकटवावं.

कानडाऊ योगेशु's picture

22 Dec 2010 - 1:44 pm | कानडाऊ योगेशु

आहेर नाही पण लग्नाच्या पहील्या वाढदिवसाला बायकोने लाडीकपणे मला काय गिफ्ट देणार असे ऐनवेळी विचारले होते.(म्हणजे त्याआधी तिला विचारुन झाले होते तर ती म्हणाली की मला काही नको.मी खुशीत होतो.).वेळ मारुन नेण्यासाठी तिला पाकीटात ५०१ रुपये टाकुन दिले होते. गिफ्ट म्हणुन.. :D (पण नंतर एका महागड्या हॉटेलात कँडेल लाईट डिनरसाठीही न्यावे लागले होते.)

समीरसूर's picture

22 Dec 2010 - 3:04 pm | समीरसूर

मी आणि माझ्या बायकोने एकमेकांना वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवसाबद्दल गिफ्ट द्यायचे नाही असे ठरवूनच टाकलेले आहे. आणि बाहेर जेवायला जायचेच असेही काही नाही. वेळ असला आणि इच्छा असली तर जातो नाहीतर घरीच मस्त गरम पिठलं-भाकरी खातो. नाहीतरी बर्‍याचदा विनाकारण बाहेर हिंडणे-फिरणे, खाणे-पिणे होतेच. त्यामुळे थोड्या समजदारीच्या भूमिकेमुळे खूप ताप वाचतो आणि एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला जातो.

धमाल मुलगा's picture

22 Dec 2010 - 4:16 pm | धमाल मुलगा

>>लग्नाच्या पहील्या वाढदिवसाला बायकोने लाडीकपणे मला काय गिफ्ट देणार असे ऐनवेळी विचारले होते
:D सार्वत्रिक प्रश्न.
आमच्या धर्मपत्नीने आम्हालाही ऐसीच पृच्छा केली तेव्हा आम्ही मात्र गूढपणे मंदस्मित करुन वदलो, 'आत्ता नाही प्रिये, पुढल्या वर्षी..' =))

अमोल केळकर's picture

22 Dec 2010 - 2:23 pm | अमोल केळकर

मस्त लेख

अमोल केळकर

समीरसूर's picture

22 Dec 2010 - 3:11 pm | समीरसूर

सगळ्यांचे मनापासून आभार! :-)

--समीर

प्राजु's picture

22 Dec 2010 - 8:20 pm | प्राजु

मस्त लेख!
या आहेरा वरून होणारे रूसवे फुगवे पाहिले आहेत... आहेर न घेणे आणि न देणे हेच बरं.

विलासराव's picture

22 Dec 2010 - 8:44 pm | विलासराव

आपली उपस्थीती हाच आपला आहेर समजतो.
मी कधीही आहेर देत नाही. कोणी काहीही म्हणो.
घ्यायचा तर प्रश्नच नाही कारण तसा अजुन काहीही छोटामोठा कार्यक्रम मी आयोजीला नाही.( अर्थात आयोजला तरी आहेर आणु नका.)
फारफार जवळची व्यक्ती असेल तर नंतर कधी जेंव्हा मौका मिळेल तेव्हा झकास पार्टी देतो.

मस्त लेख..काहीतरी फुटकळ, अगदी बकवास quality असलेले कपडे, वस्तू वगैरे अशा गोष्टी आहेरात द्यायची पद्धत असते...त्यामुळे उगाच इकडचा कचरा तिकडे करत फिरावं लागतं...त्यापेक्षा नकोच तो प्रकार.

रेवती's picture

23 Dec 2010 - 4:15 am | रेवती

मलाही आहेर पद्धत आवडत नाही.
अगदीच काही द्यायचं असेल तर पैसे द्यावेत.
खूपच ओळखीच्या मैत्रिणींच्या नवीन घरी पहिल्यांदा गेल्यावर, मुलांना वाढदिवशी मी गिफ्ट कार्ड देते.
अजून तरी कपडे अथवा आलेले प्रकार फिरवण्याची वेळ आली नाही म्हणून बरं वाटतय.
मला खरंतर गिफ्ट म्हणून काहीही घ्यायला आवडत नाही. नवर्‍यालाही सांगून टाकलय कि फारशी सरप्राइजेस नकोत.
फारतर तो माझ्या आवडत्या गाण्यांच्या सिड्या देत असतो.....कधीतरीच.
मुलाला वाढदिवशी, ख्रिसमसला प्रेझेंट मिळते पण आम्ही दोघेही आमच्या किंवा लग्नाच्या वाढदिवशी काहीही देत /घेत नाही. एखादी गरजेची वस्तूच असे निमित्त साधून घेतली जाते. ती वस्तू म्हणजे नवा मोबाईल फोन असेल किंवा नवीन सॉक्स असतील. ;)

फारएन्ड's picture

23 Dec 2010 - 5:18 am | फारएन्ड

मजेदार एकदम :)

"नो आहेर" च्या लग्नांत खूप वेळा अर्धवट परिस्थिती पाहिलेली आहे. काही "आहेर नाही बिही काही चालणार नाही" किंवा "आमच्याकडून घ्याच. असं कसं?" वाले नातेवाईक आहेर आणतातच आणि काय वाट्टेल ते करून घ्यायलाच लावतात. त्यांचा पेशन्स आणि स्टेजवर लाईन लागलेली असताना आहेर नाकारण्याचा वर/वधू किंवा त्यांच्या आई-वडिलांचा पेशन्स यात बहुधा असे नातेवाईक जिंकतात :) मग आहेर न आणलेल्यांना आपले चुकले की काय असे वाटू लागते. काही लोकांना मग अशा परिस्थितीत "बॅकअप आहेर" तयार ठेवावा लागतो.

अमेरिकेत असलेली गिफ्ट रजिस्ट्रीची पद्धत चांगली आहे. नवरा-बायको एखाद्या दुकानात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची यादी बनवतात. इतरांनी त्यातून गिफ्ट निवडून त्यांना द्यायच्या.

टिपीकल लग्नातले किंवा इतर सोहळ्यातले आहेर देणे घेणे मलाही तसे आवडत नाही.
पण काहीवेळेस लो़क अशी भेटवस्तू देतात की मी स्वतः ती वस्तू कधी आपणहून विकत घेतली नसती. अशावेळी ती भेटवस्तू छान आनंद देऊन जाते.
उदा. एका मित्राने इतका सुंदर आणि भला मोठा फ्लॉवरपॉट भेट म्हणून दिला. तो दिवाणखान्यात छान शोभून दिसतोय.
पण मी स्वतः कधीही बाजारात जाऊन असा फ्लॉवरपॉट विकत घेतला नसता.
स्वहस्ते केलेल्या वस्तू देण्यातही मजा असते..देणार्‍याचे कौतुक होते. उदा. पेंटींग्ज, कपडे , शिल्पे इ. असे आहेर द्यायला घ्यायला छान वाटतील. पण ते सर्वांनाच जमण्यासारखे नाहिये.
मी बरेचदा मित्रांच्या भेटीगाठीच्या वेळी भरपूर फोटोज काढतो.(ग्रुप मधे बहुतेक जण कॅमेरा विसरुनच येतात , आणला तरी फोटो नीट काढत नाहित , काढले तर प्रिंट करत नाहीत) आणी नंतर त्यांच्या कुठल्याशा कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यास ते फोटो प्रिंट करून अल्बम मधे घालून किंवा एखादा छान आलेला फोटो एन्लार्ज करून फ्रेम मधे बसवून भेट देतो. यजमानास अशी भेट बघताक्षणी आवडते हा स्वानुभव आहे.

समीरसूर's picture

24 Dec 2010 - 9:47 am | समीरसूर

ही भेट आवडली. खूप छान वाटत असेल. :-)

आहेर आणू नये या वाक्याला पर्यायी वाक्य कुठलं लिहिता येईल पत्रिकेत ??

जयन्त बा शिम्पि's picture

22 Oct 2016 - 8:09 am | जयन्त बा शिम्पि

मध्यंतरी १०० रुपयांच्या आसपास मिळणारी, भिंतीवरची घड्याळे, आहेर म्हणुन देण्यासाठी खुप खपत असत.काहीवेळा तर सात-आठ घड्याळे एकाच लग्नात आलेली मी पाहिली आहेत. याद्या करणारा माणुस ' खास ' विश्वासातीलच असावा लागतो. कारण नावे लिहिण्यात, रकमा लिहिण्यात, थोडीशी चुक, महागात पडू शकते. विषेशतः प्रती आहेर देतांना, कोणी व काय आहेर केला आहे याची नोंद व्यवस्थित असेल, तर रुसवे-फुगवे कमी होतात असा स्वानुभव आहे.