ज्युरी पध्दतीने चालवलेला भारतातील शेवटचा खटला
ज्युरी पध्दतीने चालवलेला भारतातील शेवटचा खटला
न्यायाधीश : या शतकातील फौजदारी न्यायालयात चालवलेल्या गेलेल्या अत्यंत महत्वाच्या खटल्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. थंड डोक्याने व विचारपूर्वक, जाणून बुजून केलेला खून अथवा हत्या हा फौजदारी कायद्यातील अत्यंत गंभीर असा आरोप आहे हे आपण सर्व जाणताच. दोन्ही पक्षाचा प्रदीर्घ आणि विद्वत्तापूर्ण असा युक्तिवाद आपण गेले सहा दिवस ऐकलात. या खटल्याच्या सुरवातीला एका माणसाची हत्या झालेली आहे आणि आता एका माणसाच्या आयुष्यापुढे प्रश्नचिन्ह उभे आहे. १०० दोषी सुटले तरी चालतील पण एकही निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये या तत्वाला अनुसरून आपण या युक्तिवादाची चिरफाड कराल अशी या न्यायालयाची अपेक्षा आहे. पण त्याच बरोबर तो दोषी असेल तर त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायला पाहिजे यात आपल्या मनात कसलीही शंका नसेल अशी मी आशा करतो.
दोषी किंवा निर्दोष या पैकी एकच निर्णय आणि तो सुध्दा एकमताने आपल्याला द्यायचा आहे. अत्यंत प्रामाणिकपणे व गंभीरपणे आपण या न्यायप्रक्रियेत सहभागी व्हाल यात मला शंका नाही.
कारकून : सर्व ज्युरी सभासदांनी कृपया आपल्या दालनात जावे..............................
या पुढचे नाटक एका वेगळ्या धाग्यावर “एक विरूध्द अकरा” या नावाने वाचायला, अनुभवायला मिळेल. या नाटकाचा मुळ लेखक आहे श्री. रेजिनाल्ड रोज” आणि नाटकाचे नाव आहे
“12 angry Men”................
न्यायालयातील एक जुनाट खोली. दुपारचे चार वाजलेले आहेत. बाहेर उन मी म्हणतंय. हवेत बर्यापैकी बाष्प भरलेले असल्यामुळे कुंद वातावरण. खोलीमधे मधेच एक लांबलचक टेबल टाकलेले. त्याच्या भिवती १२ खुर्च्या अस्ताव्यस्त मांडलेल्या. एकंदरीत या खोलीत आल्यावर कोणालाही उदासच वाटेल असे एकंदरीत वातावरण. एका बाजूच्या भिंतीत खिडक्यांची ओळ. त्या खिडक्यांची काचेची तावदाने लावलेली. त्यातून फक्त क्षितीजच दिसत आहे. त्याच्या समोरच्या भिंतीवर एक फिरणारा पंखा आणि त्याच्या समोरच्या भिंतीवर एक जूने लंबकाचे घड्याळ. त्या लंबकाची धीर गंभीर हालचाल ही एवढीच हालचाल त्या खोलीत सध्यातरी आहे.
खोलीला दोन दरवाजे. एक आत यायचा आणि एक स्वच्छतागृहात जायचा. एका कोपर्यात पाण्याचे पिंप. टेबलावर कागद, रक्षापात्रे, पेन, पेन्सील इत्यादी साहित्या विखूरलेले.
तेवढ्यात दरवाजा उघडतो. तो उघडल्यावर टेबलावरचे कागद इकडे तिकडे उडतात. उघडलेल्या दरवाजाच्या दरवाजावरची पाटी स्पष्ट्पणे दिसते “ ज्युरी रूम”. सगळे ज्युरी रांगेने आत येतात. दरवाजाबाहेर कंटाळलेला शिपाई आत येतानाच सर्वांना मोजतो. आकडे मोजताना त्याचे फक्त ओठच हालताना दिसतात.
ज्युरींमधले तीन आणि चार आत आल्याआल्याच सिगारेट पेटवतात. ५ आपला पाईप ओढायला लागतो. त्याचा धूर सगळीकडे पसरतो. त्या धुरामधे भिंतीवरच्या त्यांच्या सवल्या अधिकच अक्राळ विक्राळ दिसायला लागतात. २ आणि १२ पाणी प्यायला जातात. ९ स्वच्छता गृहात जातो. बरेचजण खुर्चीत बसून घेतात. काही अवघडलेल्या अवस्थेत उभेच रहातात. सगळे तसे निवांत असतात. एकामेकांना ओळखत नसल्यामुळे एकामेकांशी बोलायचा प्रश्नच नसतो. ७ जो खिडकीपाशी उभा असतो तो एक सुपारीचे खांड तोंडात टाकतो आणि सगळ्यांना हवी आहे का ते विचारतो. पण कोणाचा मूड नसतो त्यामुळे कोणी ती घेत नाही.
७-६ याचा अर्थ ७, ६ला म्हणाला. ७-६,३ याचा अर्थ ७ ६ व ३ यांना म्हणाला. ७- याचा अर्थ ७ सगळ्यांना उद्देशून म्हणतोय.
७-६ साला काय गरम होतय ! एखादा ए.सी. बसावायला काय जाते यांना कोणास ठाऊक ! गुदमरून मरायची वेळ आली होती.
७ खिडकी उघडतो. शिपाई खोली तपासतो, मान डोलावतो आणि बाहेर जायची तयारी करतो.
शिपाई: सगळे आलेत साहेब. मी दरवाजा बंद करतो. काही लागलेच तर मी बाहेर उभा आहे. फक्त दरवाजावर टकटक करा.
तो जातो. बाहेरून दरवाजा बंद करतो. शांतता पसरते. सगळे दचकून दरवाजाकडे पहातात, लॅच लागल्याचा आवाज येतो.
५ – बाहेरुन ते दरवाजा लावतात हे माहितच नव्हते मला. कठीण आहे.
१०- (रुमालात नाक शिंकरत) मग काय वाटले तुम्हाला? लावतातच मुळी.
काहीजण कोट काढतात, काहीजण टेबला भोवती बसतात. एकामेकांशी बोलायचे टाळतात. प्रमुख ज्युरी त्याची जागा घेतो आणि कागदाचे तुकडे करायला लागतो. मतदानासाठी. ते करताना खिडकीबाहेर बघतो.
५-१० अरेच्या तुम्हाला एवढे चिडायला काय झाले? फक्त लक्षात आले म्हणून बोललो. तक्रार नाही.
३- सहा दिवस ! कशाला म्हणतात सहा दिवस ? कल्प्ना आहे का यांना ? खरंतर हे सगळे दोन दिवसातच संपायला हवे होते. आत्तापर्यंतच्या आयुष्यात एवढी बडबड प्रथमच ऐकली, आणि तीही निरर्थक.......
२- (कंटाळवाणे हसत) मला वाटते तो त्यांचा हक्कच आहे. नव्हे सगळ्यांचाच हक्क आहे.
३- सगळ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे बाबांनो ! काही न बोललेलेच बरे त्याबद्दल.
२ त्याच्याकडे बघतो. मान डोलावतो आणि पाणी प्यायला जातो. ८ अजूनही खिडकीबाहेर बघत उभा असतो. ७ उभा रहातो आणि सिगारेट विझवतो.
७-१० त्या चाकूची कथा ऐकलीत की नाही ?असली बोगस कथा ऐकली आहे का कोणी ?
१०- (सगळ्यांकडे बघत आणि अंदाज घेत) तो काय खरं सांगणार आहे का ? अट्टल गुन्हेगार आहे तो. त्याच्या कडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार आपण ?
७-१० हंऽऽऽऽऽ तेही खरंच म्हणा ! तुमची तब्येत ठीक नाही का ? सर्दी ?
१०-७ (नाक शिंकरत) व्हायरल इन्फेक्शन का काय म्हणतात ते झालंय. वैताग आलाय. हल्ली काही समजल नाही की व्हायरल इन्फेक्शन म्हणायची पध्दत आहे.
प्रमुख.ज्युरी- (८ जो खिडकी बाहेर बघत विचार करत उभा आहे त्याला उद्देशून) महाशय आता बसूया का आपण ?
७- हो ! हो ! चला लवकर. आज मस्त सिनेमा लागलाय – चलती का नाम गाडी. बहुदा जगात मी एकटाच रहिलो असेन हा बघायचा ! आणि शिवाय बायको बरोबर जायचय. पण आत्ता या शोला बसूया.
(स्वत:च्याच विनोदावर हसतो.) ८ मात्र तसाच विचारत गढलेला.
प्र. ज्युरी-८ अहो महाशय बसता का आता ?
८- माफ करा जरा विचार करत होतो.
१०-६ काही कळत नाही. वडिलांचा खून आणि तो सुध्दा मुलाने ? चाकू छातीत आणि खेळ खलास ! पण ती त्यांचीच चूक असणार. अगोदर नसते लाड करायचे आणि मुले बिघडल्यावर बोंबलायचे. त्यांना हीच शिक्षा योग्य आहे.
प्र.ज्युरी आता सगळे बसायला काय घ्याल ? आले का सगळे ?
१२- ते आजोबा अजून आतच आहेत. (स्वच्छतागृहाकडे बोट दाखवून म्हणतो)
प्र. ज्युरी त्या दरवाजाकडे बघतो. तेवढ्यात ९ बाहेर येतो. सगळ्यांच्या नजरा बघून ओशाळतो.
९- माफ करा ! जरा उशीरच झाला.
प्र. ज्युरी नाही ! नाही ! ठीक आहे, बसून घ्या.
९ बसून घेतो. सगळेजण प्र. ज्युरीकडे तो काहीतरी बोलेल या अपेक्षेने बघतात.
चला, आलेना सगळे ? आता सुरवात करू. तुम्ही हे प्रकरण दोन प्रकारे निकालात काढू शकता. मला या साठी काही नियम वगैरे करायचे नाहीत. एक तर आपण सर्व सुशिक्षित आहोत आणि एक जबाबदार नागरीक आहोत. तर मी काय सांगत होतो – आपण अगोदर चर्चा करून मतदान करू शकतो, किंवा पहिल्यांदाच मतदान घेऊन मग जरूर पडल्यास चर्चा करू शकतो. पहिल्यांदा मतदान घेतल्यास, कोण कुठल्या बाजूला आहे तेही समजेल. मला कसेही चालेल पण ते तुम्ही पटकन ठरवा म्हणजे आपल्याला कामाला सुरवात करता येईल.
३- चालेल ! मतदानच घेऊया पहिल्यांदा.
प्र. ज्युरी यांच्या सुचनेच्या विरुध्द आहे का कोणी ? नाही ! चला तर हा आरोपी दोषी आहे असे ज्यांचे मत आहे, त्यांनी पहिल्यांदा हात वर करावेत.
७,८ लगेचच हात वरती करतात. काहींचे हात हळू हळू वरती जातात. ८ व ९ यांचे हात मात्र वरती जात नाहीत. हे सगळे बघून ९ हळूच हात वरती करतो.
प्र. ज्युरी मते मोजतो. ९,.. १०...)
हंऽऽ ११ मते- दोषी म्हणतात. निर्दोष मत फक्त एक. आता आपल्याला समजलंय आपण कोठे आहोत ते.
३- कोणीतरी विरुध्द पक्षात दिसतोय. (८ कडे बघून म्हणतो) तुम्हाला तो पोरटा निर्दोष वाटतोय की काय ?
८- (शांतपणे) माहीत नाही ! खरच, आत्तातरी मला सांगता येणार नाही.
३-८ मी तरी एवढा बदमाश माणूस माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही. गेले सहा दिवस तुम्ही जे ऐकलेत ते फुकटच म्हणायचे. अहो सगळ्यांनी जे ऐकलय तेच तुम्हीपण ऐकलय ना ? का तुमचे लक्षच नव्हते त्या सुनावणीत ? तो एक धोकादायक खूनी आहे. हे सुर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ आहे आणि याद राखा, तो सुटला तर तो हे अनेक वेळा सिध्द करून दाखवेल.
८- होऽऽऽऽ पण त्याचे वय फक्त १९ आहे होऽऽ.......आणि...
८ चे वाक्य मधेच तोडत रागाने ३ म्हणतो-
३-८ खून करायला पुरेसे आहे ते. आणि या तुमच्या बाळाने चाकूपण अगदी खोलवर खुपसला आहे बरका, आणि तो ही त्याच्या वडिलांच्या छातीत. किती निरागस आणि गोंडस आहे हे बाळ ! तो खूनी आहे हे सरकारी वकिलांनी अनेक प्रकारे सिध्द केलेले आहे. करू का त्याची यादी ?
८-३ (शांतपणे) नको !
१०-८ त्यांचे जाऊदेत. पण मला एक सांगा, तुमचातरी त्याच्या सांगण्यावर विश्वास आहे का ?
८-१० ते मला सांगता येणार नाही. पण कदाचित नसेलही.
७-८ मग तुम्ही आमच्या विरुध्द का मत दिलेत ते तरी कळेल का ?
८- १२ पैकी ११ मते ही तो दोषी म्हणून पडली. मी ही हात वरती केला असता तर तर हा पोर काहीही विचार, चर्चा न होता सरळ फासावर चढला असता म्हणून. मला नाही पटले ते.
७- (सगळ्यांकडे बघत) मी विचार न करता हात वर केला असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
८-७ मुळीच नाही. असं कोणी म्हटलेलं नाही.
७-८ मी केवळ पटकन हात वरती केला त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. मला कितीही वेळ मिळाला तरी मी हेच म्हणणार आहे की तो दोषी आहे खूनी आहे. आहे ! आहे ! आहे.....
८-७ मला काही तुमचे मत परिवर्तन करायचे नाही. आणि कोणाला काही पटवून सांगायचे नाही. पण मला एक निश्चितपणे वाटतंय की या विषयावर अजून बोलायला पाहिजे. या मुलाचे पुर्वायुष्य जरा लक्षात घ्या. दारू पिणारे वडील, नवव्या वर्षीच आई गेलेली, झोपडपट्टीतील वातावरण. लहानपण असे गेल्यावर कसा वागणार तो ? जगावर असली मुले चिडलेलीच असतात. तुम्ही नाही का तरूणपणी जगाला शिव्या देत समाजवादी होतात ? सगळेच असतात म्हणा समाजवादी तरूणपणी आणि जो पर्यंत स्वत:चा मुलगाही समाजवादी होत नाही तोपर्यंत. मग त्यांचा भ्रमनिरास झालेला असतो. ही मुले अशी का वागतात याचे दुसरे कारण माहिती आहे का तुम्हाला ? मला वाटते समाजातल्या सगळ्या पापांचे खापर आपण जाणते अजाणतेपणे त्यांच्यावरच फोडत असतो. असे असताना त्यांच्यापैकीच एकासाठी चर्चा करायला थोडा वेळ काढला तर काय मोठे आकाश कोसळणार आहे ?
आजूबाजूला बघतो. काही त्याच्याकडे बघतात तर काही नजर चुकवतात. ९ मात्र मान
डोलावतो. ४ केसाचा भांग पाडायला कंगवा हातात घेतो. १२ मागे मान टाकून डोळे
मिटतो.
१०-८ आता स्पष्टच सांगतो. आम्हाला त्याच्याशी, किंवा त्याच्या पूर्वायुष्याशी काहीही घेणे देणे नाही. त्याला न्यायालयात त्याची बाजू मांडायला संधी मिळाली, वकील मिळाला, अजून काय पाहिजे आता ? लाखो खटले दफ्तरी पडून आहेत. याचा खटला एवढ्या लवकर उभा राहिला हेच याचे नशिब समजा. आणि खर्चाचे काय ? करदात्यांच्या पैशाचा उपयोग योग्य कामासाठीच व्हायला पाहिजे. कृपया आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगू नका. ते अशक्य आहे ! माझे निम्मे आयुष्य झोपडपट्टीच्या शेजारी गेले आहे. त्या पोरट्याच्या एकाही शब्दावर मी तरी विश्वास ठेऊ शकत नाही. आणि तुम्हीही ठेऊ नका.
९-१० (हळू आवाजात) काय बोलाताय राव तुम्ही ? एखाद्यावर टाकायचा विश्वास हा तो कुठे रहातो, यावर अवलंबून असतो का ? भयंकर ! भयंकर बोलताय तुम्ही. माणसाच्या रंगावर, नावावर, जातीवर, तो कोठे रहातो यावर तो कसा आहे हे ठरते की काय ? सत्यावर काय तुमचाच जन्मसिध्द हक्क आहे की काय ? का.....
३-९ (त्याचे वाक्य अर्ध्यावरच तोडत) अहो भटजीबूवा तुमचे किर्तन बंद करा...
९-३ पण हे जे काही म्हणत आहेत ते अत्यंत चुकीचे आणि धोकादायक आहे. आपल्या सगळ्यांना आणि समाजाला सुध्दा.
८ ९च्या हातावर हात ठेवतो आणि त्या हाताल थोपटतो. त्या स्पर्शाने तो थोडासा शांत
होतो.
४- मला वाटते, सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून असे वाद घालायला नकोत.
७- बरोबर ! एकदम मान्य !
४- आपल्याला या खटल्यावर चर्चा करायची आहे ना ? मग तीच करूयात. मला वाटतं की आपण आपल्या समोर असलेल्या पुराव्यांच्या आधारेच चर्चा करावी हे बरं.
प्र. ज्युरी हंऽऽ हे मात्र बरोबर बोललात तुम्ही. आपल्याला बरेच काम आहे, आणि आपण असे वाद घालत बसलो तर हे काम संपणे कठीण आहे.
११- कोणाची हरकत नसेल तर ही खिडकी बंद करावी म्हणतो मी ! चालेल ना ? फारच जोराचं वार सुटलय !
१२- आपण ११ जण आहोत. दोषी आहेत म्हणणारे. एक म्हणतोय तो निर्दोष आहे. म्हणजे आपण ११ विरूध्द ते १ आहेत. मी काय म्हणतो, आपण जर यांचे मत परिवर्तन करू शकलो तर प्रश्नच मिटेल. हे सहज शक्य आहे असे मला वाटते. प्रत्येकाला आपला मुद्दा मांडायला एकेक मिनीट पुरेल. दहा पंधरा मिनिटात काम उरकेल. बघा पटतय का ?
प्र. ज्युरी - चांगली कल्पना आहे. सगळ्यांना समान संधी मिळेल.
सगळेजण मान्य आहे या अर्थी मान डोलावतात.
७- ठीक आहे. करूया सुरवात.
प्र. ज्युरी हंऽऽऽऽऽ मला वाटते तुम्हीच पहिले आहात.
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
हे नाटक कोणाला बसवायचे असेल तर लेखकाची पूर्ण परवानगी आहे. फक्त कमित्कमी कळवणे अपेक्षीत आहे.
प्रतिक्रिया
7 Dec 2010 - 4:15 pm | गणपा
या वर आधारीत 'एक रुका हुआ फैसला' हा चित्रपट शाळेत असताना पाहिला होता.
नंतर कळल की तो हेन्री फोंन्डा अभिनीत '12 Angry Men' ची नक्कल आहे.
गेल्याच महिन्यात नेटावरुन उतरतवुन घेतले दोन्ही.
मला तर दोन्ही आवडले.
7 Dec 2010 - 4:21 pm | छोटा डॉन
गणपाशी सहमत.
स्वातीताईच्या सांगण्यावरुन हे दोन्हीही चित्रपट पाहिले होते, दोन्हीही मस्त आहेत.
अलमोस्ट तंतोतंत कॉपी असुनसुद्धा 'एक रुका हुवा फैसला' उत्तम जमला आहे, फक्त त्या 'पंकज कपुर' ची अॅक्टिंग काही ठिकाणी भलतीच भडक, आक्रस्ताळी आणि अनावश्यक वाटली.
- छोटा डॉन
7 Dec 2010 - 4:20 pm | जयंत कुलकर्णी
बरोबर !
आशा आहे आपल्याला हे मराठी रुपांतरही आवडेल !
7 Dec 2010 - 4:22 pm | Nile
१२ अँग्री मेन पाहिला तेव्हाच त्यावर आधारीत लिहावे असे वाटले होते, अर्धवट कथेचा विचार करुन वेळेअभावी ते राहिलंच. तुमचे रुपांतर वाचतो.
7 Dec 2010 - 7:51 pm | शुचि
१ रुका हुआ फैसला फारच मस्त सिनेमा होता.
तुमचं हे रुपांतर आवडत आहे.
7 Dec 2010 - 8:20 pm | कानडाऊ योगेशु
आयला.
मीही परवाच दोन्ही चित्रपट पाहीले.
पण १२ अँग्री यंग मॅन जास्त आवडला.
त्यातील सर्वांचाच अभिनय अगदी नैसर्गिक वाटला.
एक रुका हुवा मधला अन्नु कपुर पाहवत नाही.खराखुरा वृध्द घ्यायला काय हरकत नसायला हवी होती असे वाटले.आणि मूळ इंग्रजी संवादांचे हिंदी मधील भाषांतरीत संवाद बर्याच ठिकाणी अगदी कृत्रिम वाटले.
मूळात १२ अँग्री यंग मॅन पहील्या काही दृष्यातुनच पकड घ्यायला चालु करतो.कोर्टरुमचे आवार..तिथला गंभीरपणा..आणि सायंकाळची वेळ त्यात भरुन आलेले आभाळ ह्यातुनच एक जबरदस्त वातावरण निर्मिती होते.
एक रुका हुवा फैसला मध्ये दुपारची वेळ निवडली आहे आणि खोलीतील जी एकमात्र खिडकी उघडी असते तिथुन लख्ख सूर्यप्रकाश आत येतोय असे वाटते.. पंकज कपूर ने ह्यात केलेला अभिनय पुन्हा बर्याच सिरियल/चित्रपटात रिपिट केलेला असल्यामुळे बर्याच ठिकाणी इर्रिटेटींग वाटला.(कदाचित पंकज कपूरचा हाच पहिला चित्रपट पाहीला असता तर ही अॅक्टींग आवडलीही असती.)
8 Dec 2010 - 11:53 am | आत्मशून्य
हा चीत्रपट पण बघावा... कायद्याचे बोला हा याच्यावरूनच उचलला हाय.......
8 Dec 2010 - 12:07 pm | नन्दादीप
याच पद्ध्तीने जर कसाबला शिक्षा दिली तर......!!!!
बिचारा सुटेल तरी भारतिय (थंड) न्यायव्यवस्थेच्या कचाट्यातून्.....काय तो वकील आणि काय त्याचे ते युक्तिवाद...
देवा क्षमा कर रे त्या वकीलाला....
8 Dec 2010 - 12:17 pm | विजुभाऊ
पंकज कपूर अभिनीत " ये मंझील वो तो नही " पहा.
तो नेहमीच अभिनयात एखादी लकब आधार म्हनून वापरतो.
त्याचापहीला पिक्चर बहुधा " जाने भी दो यारो " असावा. त्यातील बिल्डर तरनेजा अभिनय करताना त्याचे ते छद्मी हास्य बरेच काही सांगून जाते