बकुळीची फुले..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
1 Dec 2010 - 9:39 pm

बकुळीची फ़ुले..

भर दुपारी , मालू अंगाणात पडलेल्या वाळलेल्या काटक्या गोळा करत होती. उद्या सकाळी बंबाला जळण तरी होईल! काठ्या वेचता वेचता ती अंगणात एका बाजूला गंभिरपणे उभ्या असलेल्या बकुळीच्या झाडापाशी आली. नकळतच तीने वर पाहिले.. बकुळ! ......
************
"आऽऽऽऽई!! हे बघ... कित्ती फ़ुलं आली आहेत बकुळीला. उद्या आई याचा लांबच्या लांब गजरा कर मी शाळेत घालून जाईन. तुला माहितीये का.. अगं.. वर्गात एकीच्या जरी केसांत बकुळीची वेणी असेल ना.. तर दिवसभार घमघमाट असतो !! आणि ना...." जाई अखंड बडबडीत होती आणि मालू तिच्याकडे कौतुकाने पाहता पाहता तिच्यासाठी ताट वाढत होती. जाई ७ वीत होती. श्रीनिवासराव आणि मालती बाईंच्या संसारवेलीवरचं हे एकमेव फ़ूल. जरा उशिरानेच झालेलं. मालती लग्न करून आली या घरी आली तेव्हा हे घर, परसदारचं अंगण, केळी, पपई, पेरू, नारळ यांची झाडं, एक विहिर आणि सगळ्यात खास असं म्हणजे पुढच्या अंगणात असणारं हे बकुळीचं झाड. दरवर्षी बहरणारा हा बकुळ.. मालूला वेड लावलं होतं या बकुळाने. त्याचा बहर असेल तेवा खाली पडलेली ताजी फ़ुले गोळा करायची आणि ती एकापाठोपाठ एक दोर्‍यामध्ये गुंफ़ून त्याची वेणी करून केसांत माळायचा तिला छंदच लागला होता. श्रीनिवास राव शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. आणि त्याच शाळेत सातवीच्या वर्गात जाई होती. शाळा जवळ असली तरी जाई डबा घेऊन जात असे. श्रिनिवास राव मात्र घरी येत असत जेवायला. आणि मग जेवता जेवता शाळेतल्या गोष्टी, जाईची प्रगती ई.ई. गोष्टीची चर्चा होत असे.
घराच्या समोर असणार्‍या रस्त्याच्या पलिकडे सुषमा .. रहात होती. मालूची मैत्रिण. मालू तिच्याकडे शिवण शिकायला जात असे. कधी कधी काही वडे, भजी, चहा, चिवडा, लाडू, पुरणपोळ्या यांची देवाणघेवाणही होत असे.
"मग!! आज काय दिलंय सख्ख्य मैत्रीणीने मालू तईंना?" श्रीनिवास राव मालोची थट्टा करत कधी कधी.. पण दोन्ही कुटुंबामध्ये घरोबा होता.
सुषमाचि वैभवी जाईच्याच वर्गात होता, त्यामुळेही असेल कदाचित.. पण हि दोन्ही घरे खूपच एकमेकात मिसळली होती...

"आऽऽई, वैभवी साठी सुद्धा एक वेणी तयार करून ठेव. उद्या आम्ही दोघीही बकुळीची वेणी घालून जाऊ शाळेत. येते मी. अछा!" जाई फ़ाटकापाशी उभ्या असलेल्या वैभवीकडे पहात पाठीला दप्तर आडकवत पळाली सुद्धा.

******************
मालूने जमलेल्या काठ्या चुलीशेजारच्या कोनाड्यात आणून ठेवल्या. आणि 'चहा तरी करावा' असं म्हणत तीने स्टोव्ह वर आधण ठेवलं. चहा-साखर-दूध घालून ती चहा तयार होण्याची वाट पाहू लागली.

*********************
"मालूताई काय गं, ही बकुळीची फ़ुलं इतकी पडतात. एवढा कचरा होतो अंगणात, तुला कंटाळा नाही का येत .." चुलीवरच्या चहाच्या आधणात फ़ुंकून साय बाजूला करून दूध घालणार्‍या सुषमाने विचारलं.
"कचरा!! छे गं.. हा बकुळ आहे म्हणून अंगणाला, घराला शोभा आहे माझ्या..! आत्ता सुद्धा बघ.. इतक्या उन्हांत सुद्धा अंगणात किती गर्द सावली आहे.. हा बकुळ 'यांनी' त्यांच्या लहानपणी लावला आहे.. एखाद्या वडीलधार्‍या सारखा आहे तो.. जाईला, यांना आणि मला ... सगळ्यांनाच खूप वेड आहे बकुळीच्या फ़ुलांचं. बहर असला की घर, अंगण सगळंच कसं सुगंधीत होतं... " मालू भारावल्या सारखी बोलत होती आणि सुषमा तिच्याकडे मुग्ध होऊन पहात होती.. इतक्यात.. सूं सूं सूं.... !!!

****************
चहा उतू गेला तशी मालू भानावर आली. पटकन चहाचं पातेलं खाली उतरवलं. एका कपात चहा गाळून घेऊन मालू पुन्हा बाहेर दरवाज्यात पायरीवर येऊन बसली. बकुळ तसाच गंभीरपणे उभा होता...आपला डेरेदार भार सांभाळत!!

***************
श्रीनिवास राव अंगण झाडून घेत होते. खाली जमलेल्या बकुळीच्या फ़ुलांना ओंजळीत घेऊन पायरीवर स्वतःच्याच तंद्रीत चहा घेत बसलेल्या मालूवर त्यांनी ती उधळली. मालू एकदम दचकली आणि कपातला चहा तिच्या अंगावर सांडला... पाठोपाठ समोरच्या अंगणात बसलेल्या सुषमाचा जोराने हसण्याच आवाजही आला.. आणि मालू एकदम गोरीमोरी झाली.

**************
दचकल्यामुळे चहा सांडला होता पण समोर सुषमाही नव्हती आणि अंगणात श्रीनिवासरावही नव्हते.. मालूने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आणि साडीवरचा चहा झटकून ती आत गेली. नळाखाली साडीवरचा चहाचा डाग धुता धुता सहजच मनांत आलं तिच्या,"काय करू या बकूळ फ़ुलांचं आत मी. बकुळ सुद्धा आजकाल बहरत नाही पूर्वीसारखा. कसा बहरेल? त्याचं कौतुक करणारं कोणीच नाही राहिलं..."

********************
"मालूताई, आज दुपारपासून फ़ार अंधारून आलंय बघ. वीजांचा पाऊस होणार असं दिसतंय.. दोरीवरचे कपडे आत घेते, सकाळी मागच्या दारी ज्वारी पसरली होती ती पण आत घेते.." असं म्हणत सुषमा लगबगीने समोरचा रस्ता ओलंडून घरी गेली. मालूही मागच्या दारी वाळत असलेले कपडे आणायला गेली. ती जेमतेम घरात आली असेल नसेल... बाहेर प्रचंड वारा सुटला. शेजारच्या गोठ्यावरचा पत्रा ऊडून गेल्याचा जोरात आवाज झाला तशी मालू बाहेर आली. रस्त्याच्या पलीकडे असलेलं सुषमाचं घर अक्षरश: दिसत नव्हतं इतका धुवाधार पाऊस होता. वार्‍याचा वेगही खूप होता. मागच्या दारी केळी , पपई उन्मळून पडल्या होत्या.
बघता बघता रस्त्यावरुन लाल पाण्याचे लोट वाहू लागले. अंगणातही गुडघाभर पाणी साचले. अंगणात असलेली छोटी छोटी रोपं कधीच पाण्याखाली गेली होती. साधारण ३ तासांनी पावसाचा जोर कमी झाला जरासा. मालू खूप घाबरली होती. घरात सगळीकडे पाणी साचले होते. कोणाला हाक मारावी तर बाहेर पडणेही अशक्य होते. कारण बाहेर रस्त्यावरुन वाहणार्‍या पाण्याला प्रचंड ओढ होती. जाई, श्रीनिवासराव कुठे असतील, कसे असतील या काळजीने मालू अर्धी झाली होती. सहजच तिचे लक्ष समोर गेले आणि ती नखशिखान्त शहारली. सुषमाच्या घराची पडझड होती. भिंत कोसळली होती. घराबाहेरचा गोठा अस्ताव्यस्त झाला होता. गाई-गुरे बेपत्ता होती. आणि सुषमा...... ! मालूला सुषमाचा विचार आला आणि ती मटकन खाली बसली.. तशीच त्या घरात साचलेल्या पाण्यात! पण लगेचच जाई, श्रीनिवासराव यांच्या विचारांनी तिला घेरलं.

पाऊस पूर्ण असा थांबलाच नाही.. ती रात्र.... अखंड तो कोसळतच राहिला. गावातल्या ओढ्याने केव्हाच पात्र ओलांडलं होतं. रात्रभर ती एकटी त्या बकुळीच्या सोबतीने जागत राहिली. डोळ्यांत प्राण आणून, देवाचा धावा करत, जाई आणि श्रीनिवासरावांसाठी झुरत राहिली. पहाटे पहाटे कधितरी पाऊस थांबला. थोडसं फ़टफ़टलं तसं तिला जाणवलं की तिच्या घराच्या आसपास जिवंतपणाची काहीही खूण दिसत नाहिये. सगळीकडेच हाहा:कार झाला होत.. उजाडल्यावर ती पाण्यातून वाट काढत बाहेर आली रास्त्यावर. बर्‍याच घरांची पडझड झाली होती. हळू हळू लोक रस्त्यावर येऊ लागले. सगळेच भेदरलेले! कोणाच काय झालं तर कोणाचं काय! अख्खं गाव बुडालं होतं पाण्याखाली. वेड्यासरखी इकडे तिकडे जाई, श्रीनिवासराव दिसतात का म्हणून पहात होती. "म्हादा, यांना आणि जाईला पाहिलंस का कुठे?" म्हादा खाली मान घाऊन पाण्यातून वाट काढत निघून गेला. "गोदा.. अगं जाई दिसली का गं?" मालू रडत होती.. "शाळेची भिंत पडलिये.. बाय माजे! काय सांगू कुटं हाय जाई.." शाळेची भिंत ओढ्याला लागूनच होती.. त्यामुळे.. काय झालं असेल हे तिला लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. तिचा धीर सुटला.. आणि ती तशीच पाण्यात कोसळली. गोदा आणि म्हादाने तिला उठवत तिच्या घरी आणून सोडलं. हळूहळू तिच्या लक्षात आलं की तिच्याही घराची पडझड झालीये.. परसदारी असलेल न्हाणी घर आणि संडास कोसळले आहेत.
दोन दिवसांनी पाणी उतरलं. पण या दोन दिवसांत जाई आणि श्रिनिवास राव यांपैकी कोणीही घरी आलेलं नव्हतं. तीने जाई च्या इतर मैत्रीणी, शाळेचे इतर शिक्षक, शाळे मध्ये, गावांत बर्‍याच ठिकाणी जाऊन पाहिले.. पण त्या दोघांचा कुठेही पत्ता नाही लागला. कोणी म्हणालं ते ओढ्यातून वाहून गेले, कोणी म्हणालं ते कोसळलेल्या भिंतीखाली गाडले गेले.. पण ते दोघेही कुठेहि सापडले नाहीत. त्यांची प्रेतंही सापडली नाहीत.

*******************************************
"दोन वर्षं होऊन गेली या गोष्टीला. सुषमा सुद्धा गेली मला सोडून.. तिचं निदान प्रेत तरी पाहिलं मी.. पण माझी जाई... आणि 'हे'..!!!! " मालूला खूप जोरात रडावं वाटत होतं. जाई आणि श्रीनिवास राव कधितरी येतील.. या आशेवर ती जगत होती. कोणत्याही पाहुण्याकडे जाण्यास तिने नकार दिला होता. एकटी रहात होती त्या बकुळाच्या साक्षीने आणि सोबतीनेही.
संध्याकाळ झाली तशी एक छोटिशी पिशवी घेऊन मालू बाहेर पडली. त्या घटनेनंतर ती रोज संध्याकाळी सिद्धेश्वराच्या मंदीरात जात असे. तिथे तिला मन:शांती मिळत असे. जगण्यासाठी शक्ती मिळत असे. तिथे त्या देवळाच्या प्रांगणात खेळणारी मुलं, तिथे येणार्‍या-जाणार्‍या बायका, तो घंटेचा गंभीर नाद.. हे सगळं तिच्या जीवनाचा भाग झालं होतं आता. नेहमीप्रमाणे ती बाहेर पडली. मंदीरात आली. आज सिद्धेश्वराची मूर्ती काही वेगळीच भासत होती तिला. थोडा वेळ तिथे बसून ती घरी परतायला निघाली. आज का कोण जाणे तिला वाटले 'शकूच्या घरी डोकावून जाऊ." शकू ही शाळेत काम करणार्‍या शिपायाची बायको. ती तिच्याकडे गेली. शकू कोणाची तरी समजूत घालत होती. "असं नगं करू बाय, मला जायाला पायजेल. म्या नवस बोलली व्हती. मला जाया पायजेल.." ती जिची समजूत काढत होती ती एक ८-९ वर्षाची मुलगी होती... सोयरा!! शकू ने मालू ला पाहिले आणि एकदम उठून बाहेर आली. "या बाई...! बरं झालं तुमीच आला, नायतर म्याच येनार व्हती तुमच्याकड." मालू ला काही समजलं नाही.
"बाई ही सोयरा. माज्या धाकल्या भावाची पोर. गेल्यावर्षी हिची आय सोडून गेली हिला.. भावानं दुसरं लगीन केलं अन म्या हिला हिथं घ्यून आली. धनी (शिपाई) आत्ता बरं झाल्यात, साळंची भिंत अंगावर पडून लकवा मारल्याला त्यास्नी म्हायतच हाय की तुमाला!! त्योच नवस बोलल्याली मी आंबे जोगाईला. मला जायाला पायजेल. माजी दोनी प्वॉरं रोज सकाळी उठून कामावर जात्यात.. मंग हिला कुटं ठीऊ. तीच्या बा कडं ती जायला तयार न्हाय. हिला आन धन्याला दोघास्नी कसं सांबाळू प्रवासात? हिला तुमी घ्याल काय ठेउन ४-५ दिस?? बकुळीची फ़ुलं लई आवडत्यात हिला. तुमच्याकडं हायच की झाड.. र्‍हाईल ही तुमच्याकडं.." शकूने एका दमात आपली कथा आणि व्यथा मांडली. मालूला थोडं आश्चर्यच वाटलं आणि हसूही आलं. शकूने खूपदा तिच्या अडीनडीला तिला मदत केली होती. त्यामुळे मालूने तिला नकार देण्याचा प्रश्न येत नव्ह्ताच. प्रश्न होता तो सोयराचा. ती कशी राहिल? रडायला लागेल का? हाच..
"हरकत नाही शकू.. तू आताच पाठव तिला माझ्यासोबत." मालू म्हणाली. शकूने तिचे ४-५ दिवसांसाठीचे कपडे भरले एका गाठोड्यात आणि सोयराला मालूसोबत पाठवून दिले.
घरी आल्या आल्या बकुळीचा मंद सुगंध आला आणि सोयराची कळी खुलली.. "अय्या! बाई तुमच्याकडे बकुळीचं झाड हाय??" सोयरा आश्चर्याने म्हणाली. मालूला हसू आलं.
चांदण्या हळू हळू हजेरी लावत होत्या. मालूला आज बकुळ नव्याने बहरलाय की काय असं वाटलं.. सोयरा बकुळीची जमतील तितकी फ़ुले गोळा करण्यात मग्न होती. मालू तिच्याकडे कौतुकाने पहात होती ... आणि बकुळ!! बकुळ नेहमी प्रमाणेच आपला पसारा सावरत उभा होता, पण या दोघींकडे आळिपाळीने पहात... प्रसन्नपणे!

संपूर्ण!!

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

1 Dec 2010 - 11:37 pm | डावखुरा

मस्तच ओघवते वर्णन जाई आणि बकुळ मस्त फुलवली..
पण मधेच उडवली... :(
>>>>>>>>मालू तिच्याकडे कौतुकाने पहात होती ... आणि बकुळ!! बकुळ नेहमी प्रमाणेच आपला पसारा सावरत उभा होता, पण या दोघींकडे आळिपाळीने पहात... प्रसन्नपणे!
-हे वाक्य मस्तच कथेत बरीच उलाढाल झाली पण .....

हम्म्म्म...
कथा छान झालिये पण प्रसंग वाईट!
बकुळीच्या फुलांचं सगळ्यांच्या आयुष्यातलं महत्व खूप होतं असं दिसतय.

स्पंदना's picture

2 Dec 2010 - 7:09 am | स्पंदना

डोळे भरले वाचता वाचता!!

अरुण मनोहर's picture

2 Dec 2010 - 7:45 am | अरुण मनोहर

छान लिहीले आहे.

नगरीनिरंजन's picture

2 Dec 2010 - 8:02 am | नगरीनिरंजन

शैली छान आहे. वर्तमानात भूतकाळाच्या आठवणी वारंवार येणे हे ही चांगले दाखवले आहे पण भवतालाचे आणि मनःस्थितीचे सविस्तर वर्णन करायचा कंटाळा केला असे वाटले.

गणेशा's picture

2 Dec 2010 - 3:18 pm | गणेशा

मस्त लिहिलेले आहे ..

सूड's picture

2 Dec 2010 - 7:37 pm | सूड

मस्त लिहीलंय !!

प्राजु's picture

3 Dec 2010 - 12:12 am | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार! :)

मदनबाण's picture

3 Dec 2010 - 9:19 am | मदनबाण

छान लिहलयं... :)

मालूने जमलेल्या काठ्या चुलीशेजारच्या कोनाड्यात आणून ठेवल्या. आणि 'चहा तरी करावा' असं म्हणत तीने स्टोव्ह वर आधण ठेवलं.
मालूताई काय गं, ही बकुळीची फ़ुलं इतकी पडतात. एवढा कचरा होतो अंगणात, तुला कंटाळा नाही का येत .." चुलीवरच्या चहाच्या आधणात फ़ुंकून साय बाजूला करून दूध घालणार्‍या सुषमाने विचारलं.

आणि 'चहा तरी करावा' असं म्हणत तीने स्टोव्ह वर आधण ठेवलं. चहा-साखर-दूध घालून ती चहा तयार होण्याची वाट पाहू लागली.

नक्की चुलीवर चहा आहे ? की स्टॉव्हवर? की मलाच काही धड समजलं नाहीये ?

अतिशय सुंदर आणि ओघवती कथा ............... :)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2010 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार

नेहमीप्रमाणेच लाजवाब लेखन.

प्राजु's picture

4 Dec 2010 - 9:40 am | प्राजु

मदनबाण, स्पा , परा धन्यवाद मनापासून. :)

अवलिया's picture

5 Dec 2010 - 12:28 pm | अवलिया

मस्त लेखन !

जातवेद's picture

14 Jun 2020 - 7:21 am | जातवेद

कोकणातल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ही कथा वाचली आणि डोळे भरून आले.

रातराणी's picture

15 Jun 2020 - 11:39 am | रातराणी

कथा सुंदर असूनही आवडली असं म्हणवत नाहीये. :(