'बाभुळझाड' एक सल!

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
29 Nov 2010 - 9:10 am

थोरल्या आईंकडून एक म्हण ऐकली होती,' आउली सारी माया , अन बाभळी सारी छाया असावी' . मोठ आश्चर्य वाटल मला. आता आईची माया सर्वशृत आहे. अन ती कधीच कमी होत नाही हे ही तितकच खर ! पण ,छाया ? बाभळीची? थोरल्या आईंच स्पष्टीकरण मोठ मार्मिक ! "बाभळीला पान गळली तरी काट्या मुळ सावली राहते. सगळी बाभळ जरी बोडकी झाली तरी तिची सावली कायम तश्शीच राहते , असं म्हणत्यात बाय पूर्वीची माणस." थोरल्या आई कधीच कुठल्या ज्ञानाचा हक्क स्वत: जवळ ठेवीत नाहीत. 'असं म्हणत्यात बाई पूर्वीची माणस' म्हणून त्या रिकाम्या होतात. बाभळी कड पहायची नजर अगदी सर्वात पाहिला बदलली ती या म्हणी मुळ ! त्या नंतर एकदा कॉलेज मध्ये एक प्रेम काव्य शिकविताना नायक आपल्या प्रेयसीला घेऊन एका झाडाखाली बसत असे हे वर्णन ऐकून पोरांनी प्रोफेसरला "आम्ही आमच्या प्रेयसीला बाभळीच्या झाडाखाली घेऊन बसणार" असं सांगून वात आणला होता.
तशी बाभळीची ओळख फार जुनी. ९० अंशाचा चा कोन असलेले एकेक जंगी काटे घेऊन त्यावर ज्वारीच्या धाटाचे कडक पान लावून चक्कर चक्कर खेळायचो आम्ही. तोच जंगी काटा पायात शिरला की रक्त काढायचा ! आठवडा भर पाय वर !

अन आज एका जाणकारान हीं वसंत बापटांची ' बाभूळ झाड ' पुढ्यात ठेवली ! एकूण बाभळ काय माझा पिच्छा सोडत नाही ! माझ्या हृदयाला भिडून ठसठसायच सोडत नाही ! हीं कविता हीं तशीच आतवर शिरून ठसठसणारी !

'बाभुळझाड'

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेंच आहे
देहा फुटले वारा फांटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळांत खुपसुन बोटें बाभुळझाड उभेंच आहे
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेंच आहे
जगलें आहे, जगतें आहे
काकुळतीने बघतें आहे
खांद्यावरती सुताराचे घरटें घेऊन उभेच आहे
टक्....टक्..टक्...टक्..
चिटर् फटक्...चिटर् फटक्
सुतारपक्षी म्हातार्‍याला सोलत आहे, शोषत आहे
आठ्वते तें भलते आहे
उरांत माझ्या सलते आहे
आंत काही कळतें आहे, आंत फार जळते आहे
अस्सल लाकूड, भक्कम गांठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेंच आहे.

From

कविता वाचली अन डोळ्या समोर उभा राहिला डुइवरच पागोट काढून घाम पुसणारा वृद्ध. डब्बल हाडापेराचा , सूरकुतलेल्या चेहऱ्याचा , ताठ उभा असणारा वृद्ध! धोताराच्या सोग्यान नातवंडांच नाक पुसणारा, " पाचाच पंचवीस. .....पंचविसाच सव्वाशे होऊदे "म्हणून तोंडभर आशीर्वाद देणारा वृद्ध ! आमच्या लहाणपणी हमखास दिसणारा. का आठवावा तो? कदाचित त्याला पाहताना , ज्यांच्या साठी त्यान उभी हयात विशेष काही विचार न करता घालवली , एक कर्तव्य मनापासून पार पाडलं - त्यांच्या उभारणीच , त्यांनाच आज त्याच्याबद्दल असलेला संकोच! त्याच्या राहण्याचा , त्याच्या असण्याचा , त्याच्या खरबरीत मायेचा संकोच! त्याच्या घनघणीत; सहज किलो दोन किलोच्या पायताणाचा, त्या काळाच्या मोझाईक टाइल्स ना वाटणारा संकोच !! ती भावना ठसठसुन जागृत झाली असावी.

'अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेंच आहे
देहा फुटले वारा फांटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळांत खुपसुन बोटें बाभुळझाड उभेंच आहे'

त्याच्या शरीर यष्टीच काय वर्णन आहे या ओळीत ! जरी थकल तरी एकेकाळच तगडेपण, अजून पुसलं नाही गेल, अन जाणार हीं नाही. कारण शेवटी पुरुष आहे तो , अन या 'पुरुष' शब्दा बरोबर असणारा समर्थपणा त्याला आज पेलत नसतानाही बाळगावा लागतोय ! पण त्याच हेच तगडेपण आता वृद्धापकाळी त्याला झुकुही देत नाही. 'वारा खात गारा खात !' सोसत नाही त्याला आता हे. पानच काय पण काटे हीं पिकले हो, इतकं वृद्धत्व आलय त्याला. गरज आहे एका उबदार हाताची , जे बोट धरून चालवलं, त्या हाताची. पण आता मोठ झालेलं ते बोट त्याच्या अस्तित्वानच संकोचतय !
अन म्हणूनच त्याला स्वत:च्या बळावर उभा रहाव लागतंय !

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेंच आहे

त्याच वृद्धत्वाच हे पुढील वर्णन.! त्या आडमाप शरीरावर आता सुरकुत्यांच जाळ पसरलंय ! अन तो डब्बल हाडाचा नुसता सांगाडा राहिलाय .

जगलें आहे, जगतें आहे
काकुळतीने बघतें आहे
खांद्यावरती सुताराचे घरटें घेऊन उभेच आहे
टक्....टक्..टक्...टक्..
चिटर् फटक्...चिटर् फटक्
सुतारपक्षी म्हातार्‍याला सोलत आहे, शोषत आहे

किती जरी तुम्हा आम्हाला नको असलं तरी त्यान कमवलेल घेऊनच तर आपण जगतोय ? त्याच शिदोरीवर पुढ पुढ चालतोय ? पण या त्याच्या देण्याच ऋण मानण्या ऐवजी आपल्याला त्याच ओझ का वाटतंय? परत फेडीची हीं भावना का जागतेय ? आपला एक एक शब्द , एक एक कटाक्ष त्याला नकोपणाच्या भावनेन सोलून काढतोय. आत बाहे उभा जळतोय !

दोन स्त्रियांमध्ये सासू सूनेच , नणंद भावजयीच थोड द्वेषाच नात असत , त्याला आपण त्या दुसऱ्या घरच्या असल्यान असं वागतात असं म्हणू शकतो, पण पुरुष हे त्याच घरातले असतात. पण सत्तेच स्थित्यंतर एकमेकात आदर ठेवून न होता बरेचदा द्वेषान , किंवा त्वेषान होत. जसे एका कळपात दोन नर मावत नाहीत तस काहीस होऊन जात ! जरास पडते पण घेऊन , लहानपण राखून आदर दाखवत हळू हळू मोठ होण्या ऐवजी ,हातात चार पैसे आल्याचा गर्व, हीं सारी जिवाभावाची नाती झाकोळून टाकतो.

आठ्वते तें भलते आहे
उरांत माझ्या सलते आहे
आंत काही कळतें आहे, आंत फार जळते आहे

आज सार घडून गेल्यावर , जेंव्हा हातात पश्चातापा शिवाय काही उरल नाही, तेंव्हा होणारी ही तळमळ, जिला माझ्या लेखी तरी काहीच अर्थ नाही ! हा सलणारा काटा जरी तुम्हाला उभा जाळत असला तरी जेंव्हा ज्याला गरज होती , त्याच्या साठी तुमच्या कडे प्रेमाचा उमाळ्याचा एक शब्द नव्हता. मी सहानभूती हा शब्द नाही वापरणार, ज्या नात्यात सहानभूती येते ते नात नसलेलच बर असं मला वाटत.
शहरात राहायला येऊन , त्या संस्कृतीच बाशिंग बांधून मिरवणारे आपण , मातीतून उगवलो हेच मुळी विसरून गेलोय. अन मग या संस्कृतीचा भाग होण्याच्या बेहोशीत मागच्या थोड्या मळकट पिढीला मारलेल्या लाथांची हीं एक जळजळीत आठवण.
कवी वसंत बापट पुरेपूर शब्दात उभा करतात एक मायेन ओथंबलेला पण खरबरीत मनाचा , अन ओबड धोबड अंगाचा वृद्ध थकला बाप !

ऋणाईत
अपर्णा

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

29 Nov 2010 - 9:19 am | नगरीनिरंजन

अत्यंत हृदयस्पर्शी रसग्रहण! मातीतून निसटून मातीतल्या माणसांपासून दूर आल्याची तगमग शब्दाशब्दातून व्यक्त होते आहे. अप्रतिम!
_/\_.

धमाल मुलगा's picture

29 Nov 2010 - 2:45 pm | धमाल मुलगा

एक बाभुळ ती काय, त्याच्या आधारानं काय सुंदर फुलवलं आहेस रसग्रहणाला.

अपर्णा, एक सांग बरं, इतकं छान लिहितेस तर, तू नेहमी का नाही बरं लिहीत?

पियुशा's picture

29 Nov 2010 - 9:29 am | पियुशा

व्वा , एकदम सुन्दर!

प्रीत-मोहर's picture

29 Nov 2010 - 11:10 am | प्रीत-मोहर

अप्रतिम............

यशोधरा's picture

29 Nov 2010 - 11:16 am | यशोधरा

सुरेख!

अप्रतिम..

तीस वर्षांनी कोर्टातून सुटलेली आजोबांची शेतजमीन बघायला गेलो होतो तेव्हा आजोबा, बाबा सगळेच निकालाची वाट पाहता पाहता गेले होते वर आणि मी एकटा खाली..

तिथे सगळी बाभळीचीच झाडं. फक्त बाभूळ्..बाकी सारीच टंचाई.

कसल्या आठवणी कुठे जोडल्या जातील काय माहीत.

गवि ते झगडत होते ते त्यांच्या साठी थोडच? तुम्हाला लाभाव म्हणुनच ! कुणी स्वतःबरोबर काही घेउन नाही जात पण मुला नातवंडाची तरतुद म्हणुनच सारा खटाटोप! वेळ अन जिद्द असेल तर साफ करुन घ्या अन पिकवुन दाखवा.

पुन्हा एकदा वाचलं! काय सुरेख लिहिलं आहेस गं!

sneharani's picture

29 Nov 2010 - 2:55 pm | sneharani

मस्त लिहलं आहेस!

डावखुरा's picture

29 Nov 2010 - 3:20 pm | डावखुरा

"नि:शब्द.......................!!"

प्राजक्ता पवार's picture

29 Nov 2010 - 3:33 pm | प्राजक्ता पवार

सुरेख ! छान लिहलं आहेस .

बाबूळ्झाड डोळ्यासमोर उभं राहिलं...........

माझ्या पणजि आजिचि आठ्वण झालि ,..... ति अशिच आहे..... ..

रेवती's picture

29 Nov 2010 - 5:18 pm | रेवती

हृदयस्पर्शी लेखन!

अवलिया's picture

29 Nov 2010 - 5:58 pm | अवलिया

सुरेख लेखन !! बेस्ट !!

गणेशा's picture

29 Nov 2010 - 7:36 pm | गणेशा

अप्रतिम लेखन ...

पैसा's picture

29 Nov 2010 - 7:57 pm | पैसा

तेवढंच सुंदर रसग्रहण! वा:! एकदम आवडलं.

अनामिक's picture

29 Nov 2010 - 8:17 pm | अनामिक

खूप सुंदर रसग्रहण! खूप आवडलं!!

धन्यवाद नगरी निरंजन, धमु भाय, पियु, प्रीत मोहर , यशोधरा, शेहरानी , लालसा, प्राजक्ता, ज्ञानराम , रेवती,अवलियाजी, गणेशा,अन पैसा अन अनामिक. लेखाच्या भावना मनापर्यंत पोहोचल्या यातच सार आल नाही का?

ही कविता मला दिल्याबद्दल श्रीयुत शरदजींचे मनःपुर्वक आभार!

आहाहा! किती सुंदर लिहिलं आहेस गं! मला इंदिरा संतांची 'बाभळी' कविता आठवली.

लवलव हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करीती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी..

झिरमिर झरती शेंगा नाजूक
वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती
रंग नभाचे लोभसवाणे

कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांधावरती
झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू
लागट शेळ्या पायाजवळी
बाळ-गुराखी होऊनिया मन
रमते तिथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन
लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखून अवघ्या
धुंद सुवासिक पिवळे उटणे..

:)

शेवटचे २ परिच्छेद, विशेषत: शेवटून दुसरा समजला नाही.

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:27 am | मिसळभोक्ता

मध्यमवर्गीय पापक्षालन.. दुसरे काय ?