प्लीज. पहिला भाग वाचून मगच पुढे वाचा...
........
कराटेचा सर कसाई निघाला. बैलांच्या शर्यतीत त्यांना तोंडाला फेस येईपर्यंत खदेडायचे तशी सकाळी सकाळी त्यानं सगळ्यांची पळत पळत वरात काढली. मग चिखलात लोळवून अंगातली सगळी हाडं दणकावून काढली.
क्लास संपला तेव्हा ढुंगणात लेंडी अडकलेल्या बकरीसारखे अवघडून चालत सगळे बाहेर पडले. रोजच्या येणा-या पोरांची ही अवस्था. मग माझा तर पहिलाच दिवस होता. घरी जाऊन हॉट वॉटर बॅग घेऊन त्यावर बसलो.
पण माझ्याखालीही दगड आहे. मी मुळमुळीत नाही. व्यसनं करत नसलो तरीही मी दणक्या बनू शकतो हे सगळ्या जगाला आणि मराठेला दाखवायलाच हवं होतं. त्यासाठी एकच तारा समोर आणिक गांडतळी अंगार हे सहन करायलाच पहिजे.
मी बाथरूममध्ये मराठेचा विचार करूच शकायचो नाही. तिच्याविषयी फिजिकल विचार करू म्हटलं तरी शक्य नव्हतं. ती दिसली की मनात गाणं यायचं “तू तेव्हा तशी.. तू तेव्हा अशी..तू बहरांच्या बाहूंची…”
ती रोजच वेगळी दिसायची. कॉलेजात केस मोकळे सोडून यायची. तेव्हा तिच्या गोड चेह-याला केसांची मस्त फोटोफ्रेम व्हायची. बाहेर बाबांच्या मागे चेतकवर बसताना केस मागे बांधलेले. तेव्हा मग तिची गोरी मान दिसायची. माय गॉड.
माझा श्वास गपकन आत जायचा आणि बाहेरच यायचा नाही. पुढे डोक्यात सगळी हुरहूर आणि कल्ला. बाकी सगळे सेन्सेस बधीर व्हायचे. मग मी ओमलेट आणखीन तिखट बनवायला सांगायचो.
त्यानंतर लगेचच एक घाण झाली. केमिस्ट्री लॅबसमोर व्हरांड्यात घटना घडली. पिपेटमधून ओढताना हायड्रोक्लोरिक एसिड तोंडात आलं होतो. ते थुंकत मी व्हरांड्यात उभा होतो. तेवढ्यात केमिस्ट्री चा एच. ओ. डी. आला. गुटख्याचे तुषार माझ्यावर उडवत म्हणाला “घरी धंदे माहीत आहेत का तुझे?”
धंदे ? माझे ? अरे गुटखा-फवारणी यंत्रा.. काय बकतोयस तू? माझ्या डोक्यात रागाचा डोंब उसळला. तोंडात एसिड. त्यामुळे नीट बोलवत नव्हतं तरी मी नाराजी आवाजात स्पष्ट आणत विचारलं “कसले धंदे?”
“चांगल्या घराचा दिसतोस. घरी हे चालतं का?”
माझा तोल सुटला आणि मला त्याची पर्वा नव्हती.
“काय ते सरळ सांगा न सर..”
“लेक्चरच्या वेळी कुठे असतोस..? वर्गात कधी दिसला नाहीस आजपर्यंत.”
अरे थुंक-या.. तू स्वत: प्रोफेसर शोभतोस का? तुझ्या वर्गात बसण्याच्या लायकीचं काही आहे का? तुझा विषय तुला तरी समजतो का? गुटखा खाऊन थुथुथु करत बोलतोस. कॅटायनला केशन म्हणतोस आणि एनायनला अनियन म्हणतोस. तुझ्या सारख्याला एच.ओ.डी. करायला काय इथेनॉल पिऊन बसले होते काय तुझे बॉस.
आमची खळबळ नुसतीच मनात. बोलता काहीच येत नाही.
मग त्यानं धमकी दिली. “वर्गात दिसला नाहीस तर परीक्षेला कसा बसतोस ते मी बघतो..!!”
त्यानंतर झक मारत निदान त्याच्या तरी लेक्चरला बसणं आलं.
पहाटे ..म्हणजे जवळ जवळ मध्यरात्रीच उठून कराटे क्लासला जावं लागायचं. त्यानंतर घरी परत येऊन, भरपूर अन्न हादडून मग मला उरलेली झोप ढुंगण वर करून पूर्ण करायची असायची. झोप झाली की आळसुटल्यासारखं दुपारी उशिरा फक्त प्रॅक्टिकलसाठी लॅब गाठायची असं लाईफ होतं. आहार,विहार, निद्रा भरपूर. मैथुनाचा पूर्ण दुष्काळ..
आता लेक्चरला बसायचं म्हणजे लवकर कॉलेजमध्ये जायला हवं. मग झोपेचं काय? तेव्हा कराटेची संध्याकाळची बॅच घेणं प्राप्त झालं. संध्याकाळची बॅच घेतली तरी ऑमलेट चुकण्याची भीती नव्हती कारण अँड्र्यू रात्री बारापर्यंत आसरा द्यायचा.
मग एकदम देवाजीने करुणा केली…एका आठवड्यातच मला दिसलं की मराठेच स्वत: हातवारे करत कराटेच्या क्लासमध्ये आम्हा बक-यांच्या रांगेत उभी होती. माझ्या सोबत कराटे शिकायला मराठे..मराठे सोबत कराटे..?! यमकच जुळायला लागलं की.
मराठे रोज क्लासमध्ये दिसणार म्हटल्यावर मी कुत्र्यागत (ब्राउन्यागत) आनंदी झालो. ब्राउन्याला शेपूट नव्हती. मलाही नव्हती. असती तर मी ती टुकूटुकू हलवली असती आणि वूफ वूफ अशी कुत्रेकुई केली असती.
“केळकर..बेंड डाऊन..स्ट्रेच.. लक्ष कुठाय..” कराटे मास्तर भुंकला.
केळकर हे माझंच नाव असल्याचं माझ्या एकदम लक्षात आलं. मी चिडून खाली वाकलो आणि पाय फाकवले. पण पाय पूर्ण स्ट्रेच होईनात. मग मास्तर मागून आला आणि माझ्या मांड्यांवर आपलं पूर्ण वजन टाकून माझे दोन्ही पाय एकशे ऐंशी अंशात फाकवले. तोंडात आलेली बोंब मी तोंडातच दाबली.
मनातले बोंबलते विचार….सर मी एक पुरुष आहे. माझं लग्न व्हायचंय..आणि कधीतरी आपल्याला मुलं बाळं व्हावीत (प्रेफरेबली मराठेपासून कायदेशीररित्या) अशी माझी मनापासून इच्छा आहे..का माझा निर्वंश करताय आधीच? तुम्हाला काही नाजूक अवयव नाहीत का?…मनातले बोंबलते विचार समाप्त.
“पोट मध्ये येतंय तुझं केळकर..” मास्तर माझा मराठे समोरचा पहिला बोहनीचा अपमान करत खिंकाळले.
मी पोट आत ओढून घेतलं. मराठे क्लासमध्ये येण्याचे तोटे आत्ता दिसायला लागले होते. बॅच बदलावी का?
आधीच आपण सिगारेट गुटखा वगैरे स्टाईल करत नाही. स्टेजवर गातही नाही. आता कराटे मधेही आपण फोपसे आहोत हे मुद्दाम मराठेसमोर दाखवून काय खास होणार आहे?
मला माझ्या मर्दानगीबद्दल जबरदस्त न्यूनगंड.. एकतर मला अजून दाढी मिशी आलेली नव्हती. बरोबरीच्या सगळ्या बाप्या पोरांमध्ये मी एक नाजूक नटरंग. नाजूक तरी कसं म्हणायचं ? अँड्र्यूची ओमलेट खाऊन ढोल्याही झालो होतोच. म्हणजे मराठेचा हात कुठला आणि माझा कुठला यातला फरक फक्त जाडीवरून ठरवता आला असता. मला माझा गोरेपणा आणि नितळ त्वचा यांची चीड होती. मग मी उन्हाळ्यात भर दुपारी गच्चीत चटई टाकून कडक उन्हात झोपायचो. कातडी नुसती भाजून लाल व्हायची. सालडी निघायची..मग एक दोन आठवडेच फक्त किंचित तांबूस काळपट राहायची. परत वरचा थर गेला की गोरा रंग उपटायचाच.
एकदा अतिरिक्त भाजून सगळ्या अंगाला बरनॉल लावायची वेळ आली तेव्हा मी हा काळं होण्याचा नाद थांबवला. पण वाईट वाटत राहिलंच. आम्ही आणलेल्या कॅसेट्समध्ये काळ्या पुरुषांबरोबर गो-या पोरी असायच्या. काळा पुरुष राकट असतो आणि तो गो-या पोरींना आवडतोच हे माहीत असल्यामुळे स्वत:च्या गोरेपणावर चरफडत राहायचं. दुसरं काय?
दुसरा प्रॉब्लेम होता दाढीचा. मलाही जाधव किंवा पाप्या पाटील सारखे दाढीचे खुंट असते तर? ते दिसायला देखणे नसले तरी ही एक मर्दानगीची खूण त्यांच्यात होतीच. मी देखणा असून काय उपयोग. दाढी असती तर मी तर ती दाढी ठेवून आणि थोडा काळा होऊन खूपच आकर्षक पुरुष झालो असतो.
मी असं ऐकलं की दाढी नसलेल्यांनी तशीच रोज दाढी केली की ती उगवते आणि राठही होते. रोज न चुकता खरडत राहिली की आणखीन भरभर उगवते. मग मी एक नवीन रेझर घेऊन आलो. रात्री झोपण्यापूर्वी गालांना साबण लावून ब्लेडनं गाल खरडले. दोन ठिकाणी कापलं. मी ओल्ड स्पाईसचं आफ्टरशेव्ह आणलं होतं. ते लावल्यावरसुद्धा टी.व्ही. वर एक चिकणी मुलगी त्या दाढी केलेल्या माणसाच्या गालाला गाल घासायची.
मी ते गालाला पहिल्यांदाच लावलं आणि चरका बसल्यासारखी आग झाली. कुठे कुठे कापलंय ते नीट समजलं. तीन मिनिटं मी जागच्या जागीच कोकणी जाखडी नृत्य केलं. मग शांत झालो. मला जाणवलं की पुरुष बनण्याची वाट कठोर आहे. आणि ती तशीच असायला हवी. तरच राकट पुरुष बनू शकतो. बायका उगीच नाही भाळत राकट पुरुषांवर. मराठे ही कधीतरी भाळेलच माझ्यावर.
त्यासाठी मग मी हात, पाय, डोकं सगळंच राकट करायचं ठरवलं. आधी विटा आणि नंतर फरशा फोडायची प्रॅक्टिस करायची.
कराटेच्या सरांकडे गेलो. म्हटलं “सर मला हँड्स कडक करायचेत. लेग्ज आणि काफ पण. मला ब्रिक ब्रेकिंग करायचंय..”
सर हसले. म्हणाले ” आधी पोट कमी कर..फिटनेस कर आधी..”
मी भडकलो. आणि घरीच प्रॅक्टिस करायचं ठरवलं. ब्राउन्याच्या डॉगहाउससाठी आणलेल्या विटा मी फोडायचं ठरवलं.
दोन स्टुलांमध्ये ठेवलेल्या विटा थोडासा जोर लावून हाणलं की फुटत होत्या. ब्राउ माझ्या बाजूला उभा राहून भकाभक भुंकत होता. मी प्रत्येकवेळी त्याला ढकलून देत होतो.
मग चार पाच विटा फुटल्यावर मला कॉन्फीडन्स आला. मी बागेतली एक पातळशी फारशी उखडली आणि स्टुलांवर चढवली. जीव खाऊन त्यावर चॉप मारला. हातातून डोक्यात एक जीवघेणी कळ गेली. हळू हळू एकदम अंधारल्यासारखं व्हायला लागलं आणि मळमळल्यासारखं पण. म्हणून घरात येऊन कोचावर पडलो. ब्राउ पण बाजूला येऊन कूं कूं करत येरझा-या घालायला लागला. मग त्याची कूं कूं ऐकून आई बाहेर आली. साग्रसंगीत हाडाच्या क्लिनिकमध्ये जाऊन एक्स-रे काढला. मनगटाच्या सांध्यातच क्रॅक होता. यंव रे यंव..अमिताभच्या शहेनशाहसारखा प्लास्टरमध्ये हात घालून घरी आलो.
To be continued.....
प्रतिक्रिया
7 Nov 2010 - 9:38 am | पप्पुपेजर
१ नबर
7 Nov 2010 - 9:39 am | प्रीत-मोहर
वाचतेय......
7 Nov 2010 - 9:47 am | ईन्टरफेल
छान लिहिले आहे ;-)
7 Nov 2010 - 10:37 am | स्पा
आईशप्पथ... फुल जबराट...................
चला.. काहीतरी कडक वाचायला मिळणार .. येउद्या साहेब...
(राजकार्नावर्च्या चर्चा पाहून डोस्क्याचा पार भुगा झाला व्हता )
7 Nov 2010 - 11:24 am | चिगो
मजा यायला लागलीय..
7 Nov 2010 - 1:29 pm | स्वानन्द
अग्गाया... बिचारा! किती ते सालं फुटकं नशीब :(
कथा मस्तच चालू आहे. येऊ दे पुड्।अचे भाग पटापट...
( यांच्या ब्लॉगचा दुवा मिळाला तर?? सगळी सोन्याची अंडी एकदम!! )
4 Sep 2011 - 11:09 pm | गवि
.
7 Nov 2010 - 1:56 pm | स्पंदना
तुमचा 'कोसला?'
काय त्रास असतोना पुरुष बनण म्हणजे? माझ्या धाकट्या भावान ब्लेडन गाल खरडलेले आठवले .
8 Nov 2010 - 6:17 pm | गवि
:-)
7 Nov 2010 - 2:42 pm | पैसा
"मझा" आला!
7 Nov 2010 - 3:06 pm | झंम्प्या
मित्रा येवुदे...
वाट पहातोय... "शाळा" नंतर असंलं काही धुमशांग वाचायला मिळ्तय....
8 Nov 2010 - 6:16 pm | गवि
zampya.wordpress.com वाले झम्प्याजी का?
तुम्ही तर वाचलंच असेल आधी..
थँक्स..
7 Nov 2010 - 4:33 pm | उल्हास
कड्क आहे
----
तसेच " थंड पिप " टाका की राव येथे
8 Nov 2010 - 6:13 pm | गवि
उल्हासजी.. भावनांबद्दल आभार..
आता मला वाटतं वेळ होईल तसं मिपावर नवीन लिहावं...
ब्लॉग तर आहेच..
7 Nov 2010 - 5:29 pm | चिंतामणी
पण To be continued..... हा अडथळा दुर कर.
लौकर येउ द्या पुढला भाग.
8 Nov 2010 - 6:12 pm | गवि
हो..खरंय चिंतामणी ..मलाही ब्रेक करुन लिहायला आवडत नाही. माझ्या ब्लॉगवर मी तसा निर्णय घेऊन कितीही मोठी पोस्ट असली तरी एकत्रित टाकायला सुरुवात केली. पण कॉमेंट्स मधून येणारं एक मत असं आहे की सलग लांब वाचायला वेळ मिळत नाही.
7 Nov 2010 - 9:05 pm | अनिल हटेला
एकदम वंटास हा भाग पण !!! :-)
पू भा प्र.....
8 Nov 2010 - 6:08 pm | गवि
अनिल हटेलाजी ...धन्यवाद..आपल्या नावाने प्रभावित झालो आहे..
8 Nov 2010 - 12:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पहिल्या (आधीच्या सर्व) भागांची लिंक देत जा म्हणजे शोधाशोध करावी लागणार नाही.
सर्व भाग टाकल्यानंतरच वाचायचं ठरवलं आहे.
8 Nov 2010 - 6:06 pm | गवि
आदितीजी ..अहो फोन वरुन पोस्ट करत असतो नेहमी.
त्यामुळे लिंक देण्याचं तंत्र जमलं नाही.
आता पी.सी. वर बसलोय पण मिपा वर पब्लिश केल्यावर परत एडिट करता येत नाही (हे आता उशिरानं कळलं..)
न्येक्ष्ट टैम ध्यानात ठिवीन..
आता टाकलेयत भाग सगळे..
9 Nov 2010 - 2:00 am | शहराजाद
मस्त
9 Nov 2010 - 5:15 pm | धमाल मुलगा
भारीए राव हे.