दास्तान-ए-आवारगी….Part 4 and last..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
8 Nov 2010 - 4:55 pm

मी “सिक्स्टी राउंड” पळायला सुरुवात तर केली पण जे काही बघितलं होतं ते डोळ्यासमोर येत राहिलं..पाय डगमगत होते..श्वास नीट येत नव्हता..मराठे स्वत:च्या मनानं हे सर्व करत होती? एक्स्ट्रा व्यायाम करायची इतकी गरज होती?

मला एकदम फसवलं गेल्यासारखं वाटायला लागलं. सर तर वयानं खूप मोठे होते. तरीही हे असं?

तिलाही ते आवडत होतं का? असणार. नाहीतर ती कशाला स्वत:हून लवकर आली असती क्लासच्या आधीच? चॉईस होता तिला हे टाळायचा….

मग मी सात आठ दिवस मराठेशी एक शब्दही बोललो नाही. अगदी तिला जाणवेल इतकं अव्हॉईड केलं. माझा संताप झाला होता आणि विचार करून डोक्याचा चिखल. इथे एका वयाने दुप्पट मॅरीड माणसाच्या स्कँडल मध्ये ती अडकत होती. त्यापेक्षा जाधवचा प्रॉब्लेम बरा होता.

लई डाळ नासली सरांनी…एक तर माझ्या मनातल्या त्यांच्या इमेजला मोठा धक्का बसला होता. त्यातून मला आवडणा-या मुलीला ते घेऊन चालले होते.

मी नीट विचार करायला सुरुवात केली. तिला हे सर्व का आवडत असेल? मग माझ्या लक्षात आलं की मला एका मुलीसारखा विचार करता येत नाहीये. इतकं मात्र समजत होतं की तिला सरांकडून मिळणारं स्पेशल अटेन्शन आवडण्यासारखंच असणार. तिला चालू ठरवून मोकळं होणं सोपं आहे.. पण ती सुद्धा आपल्यासारखीच अर्धवट वयाची आहे. ती तर आपल्याहूनही लहान आहे. ती आपली आहे. आपल्याला आवडते तर मग तिला समजून घेताना इतका राग राग कशाला.

मग वाटलं..च्यामारी..असले भिकारचोट मॅच्युअर विचारच आपल्याला नेहमी खड्ड्यात घालतात. आलाय भडवा सर्वोदयवादी सर्वांना समजून घेणारा..

तो जाधव आणि ते सर..दोघेही असला विचार करतात का? ..आणि तरी मराठे त्यांच्याकडे आकर्षित होतेच ना?. मी मात्र बसलोय विचारमैथुन करत. कंचुकी साला.

“केळकर..लक्ष कुठंय?” गोड स्वर कानात शिरला. बघितलं तर केमिस्ट्रीच्या डेमॉन्स्ट्रेटर गोखले मॅडम..

आधीच मोमीनची आज दांडी होती. पार्टनर नसला की एकट्यानं प्रॅक्टिकलची शाटमारी करायला जिवावर येतं.

..साखरेच्या द्रावणाची पोलॅरिटी काढण्यासाठी पोलॅरिमीटरला डोळा लावून मी नुसताच बसलो होतो. ते बघून गोखले मॅडम मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या.

“अं..हो.. चालू आहे रीडिंग..” मी म्हटलं..

“आणि साखरेचं सोल्युशन कुठे गेलं सगळं? प्यायलास की काय ?” त्या म्हणाल्या आणि हसायला लागल्या.

मला खूप बरं वाटलं..मी ही थोडा हसलो.
मी सर्वच पोरींकडे पवित्र दृष्टीनं पाहू शकत नाही. सख्खी बहीण मला नाही. बहीण म्हणून मी फक्त चुलत वगैरे बहिणींकडे बघू शकतो. कारण लहानपणापासून तशी सवय लागली आहे. पण तसं नसताना उगीच मानलेली बहीण हा प्रकार मला जमत नाही. मुळात असली फसवणूक मला करता येत नाही. जी मुलगी आकर्षक आहे तिच्या विषयी मला आकर्षणच वाटतं. मुली म्हणतात ना की “अरे मी तुझ्याकडे ‘तशा’ दृष्टीनं कधी बघितलेलं नाही.” खोटं असतं ते. त्याचा खरा अर्थ असतो ”मी तुझ्याकडे तशा दृष्टीनं पाहिलंय पण सॉरी.. जमत नाही..तू फेल”

मला नक्की माहीत आहे की पोरांचं आणि पोरींच लॉजिक एकच असतं.

आधी बाय डिफॉल्ट समोरच्याकडे “त्या”च दृष्टीनं बघायचं. जर भेटलेला पोरगा साधाबेन्द्रा, अनाकर्षक म्हणजे “तसा” नसलेला असेल किंवा भेटलेली पोरगी चिकणी आयटेम नसेल तर या सगळ्या बंधुभगिनीपणाच्या भावना येतात. मग बनवा बहीण आणि बांधून घ्या राखी. नाटक सालं सगळं.

माधुरी दीक्षित सारखी पोरगी आली कॉलेजात तर मानाल बहीण तिला? मरू दे ते, मराठेसारख्या सुंदर आणि गो-यागोमट्या पोरीला तरी कोणी बहीण मानेल? आणि आपल्याच वर्गात आयला ती बिचारी हेबळे जरा काळी आहे तर झाले सगळे तिचे भाऊ.

मेन सांगायचं म्हणजे आपण काही स्वामी विवेकानंद नाही बुवा.

गोखलेमॅडम पंचवीसच्याच होत्या . तरुण मुलगीच होती ती खरं तर. खूपच आकर्षक होत्या. आणि त्यांच्याकडे माझी नजर चोरून जायचीच. चोरून नाही बघितलं आणि राजरोस बघितलं तर मारच खायला लागेल म्हणून चोरून.

वाकून काही दाखवायला लागल्या की सगळीच पोरं आ करून बघत बसायची. टपाटपा जबडे निखळायचे सगळ्यांचे. इव्हन कोणी प्रोफेसर लॅबमध्ये उभे असतील तर ते ही बघायचे.

त्या हसल्या की छान वाटायचं. मग आजही तसंच वाटलं.

“अरे किती वेळ घेतोयस रीडिंग?” त्या परत म्हणाल्या. “तब्येत ठीक आहे न तुझी?” त्यांनी माझ्या कपाळाला हातच लावला.

हे मला आवडायचं. इतर गुरुजन आम्हा पोरांनाही अहो जाहो करायचे. पण गोखले मॅडम मैत्रीण असल्यासारख्या एकेरीत बोलायच्या. मोकळ्या वागायच्या.

“नाही मॅडम..फिट आहे एकदम मी. ते शुगर सोल्युशन जरा जास्त डायल्युट झालं चुकून. परत करतो.” मी म्हटलं.

“थांब मी पण येते हेल्प करायला. तू फक्त रीडिंग घे.” त्या म्हणाल्या “उशीर झालाय नं खूप..”

बाहेर बघितलं तर च्यायला अंधार व्हायला लागला होता. लॅब एकदम रिकामी.

गोखलेमॅडमसोबत मी एकटाच आहे या विचारानं मला एकदम थरथरल्यासारखं व्हायला लागलं. त्या पोलॅरिमीटरवर झुकल्या आणि बहुधा आयपीसच्या आतली रेष नीट आहे का ते बघायला लागल्या.

मला कळेना की एकदम इतकं अनिवार आकर्षण का होतंय. त्या म्हटलं तर गुरु, मेंटर, मार्गदर्शक होत्या. हे तर रोगट आकर्षण झालं ना?

मग माझ्या लक्षात आलं. आजचा पोलॅरिमीटरचा प्रयोग खूपच किचकट होता. गू घाण शेण प्रयोग तेच्या आयला. खूप खूप कच-यासारखी रीडिंग होती. एकही रीडिंग हवं त्या रेंजमध्ये येत नव्हतं. जर्नल कम्प्लिशन जवळ आली होती. डोक्याची आयमाय एक झाली होती. मला खरंच कोणीतरी मदत करण्याची गरज होती. गोखलेमॅडम नेमक्या त्या वेळी माझ्यासोबत होत्या आणि पुढे होऊन मला त्या गुंत्यातून सोडवत होत्या. मराठेमुळे मी हर्ट झालो होतो त्यावरही त्यांच्या गोड मोकळ्या हसण्यामुळे दुखरी पाठ चेपून दिल्यासारखा इफेक्ट होत होता.

मी ते आकर्षण एक्सेप्ट केलं. पुढे झालो. सर्व रीडिंग पूर्ण होईपर्यंत एक तास लागला. त्या वेळात खूपदा आम्ही एकमेकांना चिकटलो, टेकलो, एकमेकांना स्पर्श ही झाला.

बाकी फार काही नाही घडलं चंद्रलोकच्या अंकातल्यासारखं..म्हणजे रसरशीत ओठ, भरगच्च उरोज वगैरे.. पण एवढं नक्की झालं की लॅबमधून बाहेर पडताना मी मराठेचा सरांसोबतचा व्यायाम अनुभवला होता आणि तिला माफ केलं होतं. तिला आणि जाधवलाही. सरांना मात्र नाही. बांबूच लावणार होतो आयला त्याला.

आता मराठेला आत येता येईल इतका माझ्या मनाचा दरवाजा मोठ्ठा उघडला होता.

दुस-या दिवशी मी कराटे क्लास चुकवला. मोमीनच्या बाबांची सीडी हंड्रेड बाईक घेतली. गियर गाडीचं लायसन माझ्याकडे नव्हतं. पण आतून आतून फिरण्याच्या गल्ल्या मला छान माहीत होत्या. कराटे क्लास समोर बाईक लावून त्याच्या सीटवर बोचा टेकून उभा राहिलो. हातात सिगरेट नसूनही आता काही फरक पडत नव्हता. मला काळापहाड डिटेकटीव्ह सारखं स्टायलिश वाटत होतं.

क्लास सुटला. मराठे बाहेर आली. अंधार चांगलाच झाला होता.

मी मराठेला हाय केलं. तिनंही मला.

“जाधवनं तुला प्रपोज बिपोज नाही ना मारलेलं ?” मी थेट म्हणालो.

ती खूपच दचकली. मग एकदम सावरून म्हणाली, “ए. काहीतरी काय विचारतोस. शी..”

मी म्हटलं, “मग आता मला सगळ्यात आधी तुला सांगायचंय की मला तुझ्यात इंटरेस्ट आहे.”

ती अस्वस्थ झाली. खाली बघायला लागली. मग म्हणाली “वेडा झालायस का तू?”

“हो”, मी मुद्द्याचं आणि खरं म्हटलं, “येतेस बाईकवरून राइड्ला? अँड्र्यूपर्यंत?”

ती थोडीशी हसली. मीही.

“पण माझी सायकल आहे”, ती म्हणाली.

“टाक माझ्या घरी, येताना घेऊ.”

मी बाईक ढकलत आणि ती सायकल ढकलत असे चालत चालत माझ्या घरासमोर आलो. मराठे तिची सायकल आत ठेवत असताना ब्राउनं माझ्याकडे बघून आनंदानं “भूफ्फ” केलं. माझ्यासोबत पोरगी आलेली तो पहिल्यांदाच बघत होता.

मला अर्थ कळला. “होय..तिला घेऊन चाललोय फिरायला. तुला काय करायचंय रे भिकारचोटा. गप बस गुंडाळी करून..”, मी त्याला कुरवाळत हळूच म्हणालो.

ब्राउ कुइं करून खाली बसला.

बाईक स्टार्ट केली. ती स्टार्ट झाली हे मुख्य.

मराठेला म्हटलं, “बस मागे”

कराटेचा ड्रेस होता म्हणून की काय जाणे ती दोन्हीकडे पाय टाकून बसली. माझ्या सुटलेल्या आणि स्ट्रेच करताना मध्ये येणा-या त्याच त्या पोटाला तिनं एक हात, थोडा घट्टच, धरला.

गार वा-यात आम्ही कुत्र्यासारखे सूं सूं करत अँड्र्यूच्या “ओल्ड स्पाईसचा” वास काढत निघालो..

–oo—-oo– –oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo–
दि येंड..खतम..डाव बास..

कथा

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Nov 2010 - 5:11 pm | शुचि

संपूर्ण लेखमालाच सॉलीड वाटली. वाचकावरील पकड कधीच कमी झाली नाही. कॉलेजमधील मुलाच्या डोक्यात रेंगाळणारे, भणाणारे विषय, स्वप्नं छानच उतरली आहेत. भाषा जबरी.

गवि's picture

8 Nov 2010 - 6:02 pm | गवि

अत्यंत आभार शुचि....

गवि's picture

9 Nov 2010 - 4:05 pm | गवि

थँक्स शुचि..

गांधीवादी's picture

8 Nov 2010 - 5:27 pm | गांधीवादी

खत्राड..........

गवि's picture

8 Nov 2010 - 6:02 pm | गवि

:-)

पप्पुपेजर's picture

8 Nov 2010 - 6:08 pm | पप्पुपेजर

मजा आलि लेख वाचुन

पेजर साहेब्..धन्यवाद.. असेच येत रहा..

आवडली बॉस कथा.. जबरी, सॉलीड, ढिंग्च्यॅक वगैरे...
रिझर्व्ह हिय्याफोर्स...मिल्कमेड....हसण्याचं टेबल टेनिस ... सही लिहीलय.

- सूर्य.

गवि's picture

9 Nov 2010 - 4:17 pm | गवि

:-)

ईन्टरफेल's picture

8 Nov 2010 - 7:59 pm | ईन्टरफेल

लय दिसांनी ईनोदी कथा वाचलि
सगळे भाग वाचले
लईईईई भारी ;-)

गवि's picture

9 Nov 2010 - 4:18 pm | गवि

अहो..विनोदी नव्हती हो लिहिलेली..

विनोदी कथा असं म्हणून बराच करुण रस ओतलात की..

पैसा's picture

8 Nov 2010 - 8:06 pm | पैसा

त्या वयाची पोरं कसा विचार करत असतील अंदाज आला....

अगदी खरय.
मस्त कथा. आधी वाचलीच होती. परत वाचून मजा आली.तुमच्या बाकी कथासुद्धा सुपर्ब आहेत.

गवि's picture

9 Nov 2010 - 4:17 pm | गवि

परत वाचावीशी वाटली हे ऐकून आनंद झाला...

आळश्यांचा राजा's picture

8 Nov 2010 - 9:15 pm | आळश्यांचा राजा

आमच्या (अनेकवचनी, आदरार्थी नव्हे!) मराठे आठवल्या आणि डोळे पाणावले!

(फोपशा) केळकर.

(टीनएजर्सचे आत्मचरित्र एवढं छान आणि अचूक सांगू शकणारी माणसं फार भेटली नाहीत महाराज!)

आळश्यांचे राजेसाहेब..आपल्या दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल आनंदच आनंद झाला आपल्या या सामान्य प्रजाजनास..

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Nov 2010 - 10:43 pm | ब्रिटिश टिंग्या

लै भारी! :)

गवि's picture

9 Nov 2010 - 4:14 pm | गवि

धन्स..

झंम्प्या's picture

8 Nov 2010 - 10:50 pm | झंम्प्या

लय भारी जमली भट्टी राव...

खरचं जवानीचे दिवस आठवले...

अजुन एक गोष्ट म्हणजे... बर्याच प्रेमकथांचा होनारा भिकार शोकांत इथे नव्हता.
शेवट रांगडा केलात...

अनिल अवचटांची "शाळा" आठवली.

गवि's picture

9 Nov 2010 - 4:13 pm | गवि

थँक्स झंप्या..

पण मला वाटतं..वाटतं काय्..खात्रीच आहे की शाळा मिलिंद बोकिलांचं आहे.

अर्थात अवचटांनीही शाळेवर त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहेच..("स्वतःविषयी "मधे त्यावर प्रकरण आहे आहे ते म्हणताय का?)

अर्धवटराव's picture

8 Nov 2010 - 11:44 pm | अर्धवटराव

साला.... 'त्या' दिवसांची सफर घडवलीत राव. 'तो जमाना' इतका परफेक्ट आणि नेटका फार कमी जणांना रंगवता आलाय.

(यादगार) अर्धवटराव

गवि's picture

9 Nov 2010 - 4:11 pm | गवि

अर्धवटराव..धन्यु..प्रतिक्रियेसाठी.. येत रहा परत..

चिगो's picture

8 Nov 2010 - 11:54 pm | चिगो

शॉल्लिट.... आयला, मजा आली राव. आणि जबरदस्त निरीक्षण, ते "तू फेल" वालं..

मजा आली ना चिगो....?? बरं वाटलं..

चिंतामणी's picture

9 Nov 2010 - 12:05 am | चिंतामणी

च्या मारी "कहानीमें ट्विस्ट" आणून ............

कात्रज घाट दाखवलास भौ.

गवि's picture

9 Nov 2010 - 4:08 pm | गवि

म्हणजे मी प्रसंगाचा किन्वा वाचकांचा "कात्रज" केला असं वाटतंय का?

असं झालं असेल तर सॉरी ...

शहराजाद's picture

9 Nov 2010 - 2:09 am | शहराजाद

लय भारी.
मजा आली.

गवि's picture

9 Nov 2010 - 4:08 pm | गवि

आभार..

इंटरनेटस्नेही's picture

9 Nov 2010 - 3:49 am | इंटरनेटस्नेही

मस्त!

गवि's picture

9 Nov 2010 - 4:09 pm | गवि

थँक यू..

राजेश घासकडवी's picture

9 Nov 2010 - 4:17 am | राजेश घासकडवी

एखादं चित्र त्यातल्या फराट्यांच्या शक्तीमुळेच केवळ आवडावं तसं झालं. तरुण मुलाचं व्यक्तिचित्रण करताना त्याच्या भावविश्वातली उदाहरणं, भाषा व विचारपद्धती वापरल्यामुळे परिणामकारक झालं आहे. असंच लिहीत जा.

शाळा शी अनेकांनी तुलना केलेली आहे. शाळा मध्ये बाल्य हरवल्याची कथा आहे. इथे तारुण्य, पौरुष शोधण्याचा प्रयत्न वाटतो. तो संदेश तितक्या धारदारपणे आला नाही असं वाटतं. एखाद्या मूलगामी सूत्राभोवती कथा रचून तिला अशा रसरशीत शैलीत इतर अनेक जिवंत पात्रांसह सादर करण्याचा प्रयत्न करावात ही विनंती.

जाताजाता आणखीन एक टिप्पणी. या कथेत जग, व नायकावर होणारा परिणाम हे मुख्यत्वे घटनांतून व नायकाच्या मनातल्या विचारांतून दाखवलेलं आहे. चित्र, रंग, निसर्ग, वास व ध्वनि यांचा काहीसा अभाव आहे. हा दोष म्हणून सांगत नाही. केवळ नोंद करतो आहे. या इतर बारकाव्यांनी कथा अधिक जिवंत झाली असती असं माझं मत आहे.

दोन ओळी कौतुकाच्या आणि दहा टीकेच्या म्हणून कथा आवडली नाही, असं नाही. कथा आवडलीच. किंबहुना म्हणूनच इतकं लिहिण्याचा प्रपंच.

राजेशजी..सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
किती अंमलात आणता येईल माहीत नाही पण आपली निरिक्षणं आवडली.

असेच वाचत रहा ही विनंती..

स्पंदना's picture

9 Nov 2010 - 7:31 am | स्पंदना

चला माझा मागचा अंदाज चुकला.

बर झाल!

अतिशय दिलखेचक लिहिलय. अगदी मागुन घेतलेली गाडी वगैरे. अन तीच नुसत हसण.

गवि's picture

9 Nov 2010 - 3:59 pm | गवि

काय होता तो मागचा अंदाज अपर्णाजी??

बाय द वे.. कॉमेंटबद्दल आभार..

प्रियाली's picture

9 Nov 2010 - 7:47 am | प्रियाली

चारही भाग एकत्र वाचले. भन्नाट. मजा आली. एकदम ओघवते. काही प्रसंग आणखी फुलवता आले असते पण हे आम्हा वाचकांनी सांगणे सोपे असते.

बाकी, त्या पोरीचा आडनावाने केलेला उल्लेख आवडला. अगदी शाळेचे दिवस आठवले.

मुख्य म्हणजे शुद्धलेखन पाळल्याने आणि विरामचिन्हांचा सुकाळ नसल्याने वाचनीय वाटले.

असेच लिहित जा. आणखी वाचायला आवडेल.

गवि's picture

9 Nov 2010 - 4:04 pm | गवि

प्रियालीताई..

पहिल्यांदा कॉमेंटबद्दल धन्यवाद.

हो..फुलवता आले असतेही ..पण मला वाचकांच्या मनात आपापलं कॉलेज, लॅब, रस्ते, आणि आपापली मराठे आपोआप उभी राहील याची खात्री होती. नेहमीच असते. मी फक्त आठ्वण करुन देतो..

मग डीटेल वर्णनाची गरज कमी उरते..

गोष्ट कागदावर नाही तर वाचणा-याच्या मनातच स्टेजवर घडते आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे की तो "प्रयोग" तुम्ही छानच कराल.

श्रावण मोडक's picture

9 Nov 2010 - 11:11 am | श्रावण मोडक

पुढे?

गवि's picture

9 Nov 2010 - 4:55 pm | गवि

पुढे होईलच काहीतरी कधीतरी.

स्पंदना's picture

9 Nov 2010 - 7:03 pm | स्पंदना

हिरो च ओम्लेट होइल अस मी तिसर्‍या भागात लिहिल होत जी, पण ते काय खर नाही झाल जी

लै भारीच की!!!
मुद्दामच पहिल्या ३ भागांना प्रतिसाद दिला नाही! कारण आपल्याकडे अर्धवट लिहून सोडणारे वीर आहेत काही!

पण काय लिहिलंय त्येजायला! कॉलेज आणि फक्त कॉलेज, दुसर्‍या कुठल्या वयात हे असलं काही होऊच शकत नाही! आधी अजिबात अक्कल नसते म्हणून आणि नंतर फार अक्कल येते म्हणून!

आता फर्ष्ट काम म्हणजे: फोनतो मित्रांना, आणि जरा 'प्रेमळ' चौकश्या करतो, जीवाला थंडाई मिळेल! :D

--असुर

अनिल हटेला's picture

9 Nov 2010 - 7:45 pm | अनिल हटेला

पून्हा एकदा चारही भाग एकत्र वाचले !!

एकदम ढिंगच्याक !! :-)

असेच लिहीत रहा भो !!

पुष्करिणी's picture

9 Nov 2010 - 11:49 pm | पुष्करिणी

मस्त कथा, चारही भाग एकदम वाचले . आवडली.

प्रभो's picture

10 Nov 2010 - 12:57 am | प्रभो

कडक!!!!!!

फारएन्ड's picture

10 Nov 2010 - 8:51 am | फारएन्ड

चारही भाग वाचल्यावरच प्रतिक्रिया देतोय, पण चारही आवडले. धमाल आली वाचायला. एक कॉलेजातील तरूण ज्या नजरेने आसपासचे जग पाहतो तसेच ते येथे आल्यासारखे वाटले.

पुन्हा पुन्हा वाचावी अशी लेखमाला ..
और गिटार मुळे वाचायला मिळाली ..

संपुर्ण झपाटल्यासारखे वाचत होतो ..

प्रिंटच मारतो आता.
कंपणीत ब्लॉग ओपन होत नाही याचासर्वात राग आज आला.

असेच लिहित रहा.. आवडीने वाचत आहे ..
- गणेशा

साती's picture

31 Mar 2011 - 11:38 pm | साती

एकदम भारीच आहे राव.
मस्तच. एरवी रोज फोनवरून वाचते मिपा पण आज ही सिरीज वाचून खास प्रतिसाद देण्यासाठी लॅपटॉप उघडला.
अतिचशय मस्त लेखमाला.

भडकमकर मास्तर's picture

6 Apr 2011 - 12:37 am | भडकमकर मास्तर

मी मिस केली होती ही कथा...
झकास आहे...
लेखकाचं अडनिड्या वयातलं ( त्याला वाटणारं तथाकथित) प्रेमाचं अन् आकर्षणाचं रियलायझेशन मस्त आलंय...
शेवटाचा भाग विशेष आवडला...

साबु's picture

6 Apr 2011 - 11:52 am | साबु

गवि... पहिल्या ३ भागान्च्या लिन्का द्या ना...का हे "और गिटार" च आहे? पात्र तीच आहेत म्हणुन विचारले...

बहिरुपी's picture

22 Aug 2014 - 2:15 pm | बहिरुपी

काय खत्री लिहीलयस गव्या! सगळे भाग एका दमात वाचुन काढले...आमचेपण दिवस आठ्वले राव...

मराठी कथालेखक's picture

11 Apr 2016 - 7:54 pm | मराठी कथालेखक

मस्त कथा...

“आणि साखरेचं सोल्युशन कुठे गेलं सगळं? प्यायलास की काय ?” त्या म्हणाल्या आणि हसायला लागल्या.

हे जास्त आवडलं

आनंदयात्री's picture

11 Apr 2016 - 11:18 pm | आनंदयात्री

या कथेच्या पुनर्वाचनाचा आनंद घेतला. काय लिहिता राव गवि तुम्ही!
ब्राउ घ्या मनावर, येउद्या अजून.