लहानपणी मे महीन्याच्या सुट्टीत दुपारी एकमेकांना कोडी सांग, सागरगोटे खेळ, उखाणे घाल, विनोद सांग असे नाना खेळ आम्ही बिल्डींगच्या सावलीमध्ये जमून खेळत असू. कारण ऊन मी मी म्हणत असे त्यामुळे काहीतरी बैठे छंद जोपासावे लागत. काही बोलघेवडी मुलं-मुली गोष्टी सांगत. जरा चवथी, पाचवीमध्ये गेल्यावर विनोद वगैरे कळायला लागले होते. त्यापैकी एक विनोद मला आजही आठवतो. कारण पुढे येईलच. -
एकदा चीन, अमेरीका आणि भारत हे देश बढाया मारत असतात. चीन सुरुवात करतो. चीन म्हणतो आमच्या कुशल तंत्रज्ञानाने आम्ही इतकी बारीक तार बनवली आहे की ती तार साध्या डोळ्यांना दिसतच नाही. केवळ मोठ्या क्षमतेच्या सूक्ष्मदर्शकाने ती पहता येते. मग येते अमेरीकेची पाळी. अमेरीका ती तार घेते आणि त्याला बारीक छिद्र पाडून दाखवते आणि आपले प्रभुत्व सिद्ध करते. भारत काय करतो - ती तार घेतो आणि त्यावर "मेड इन इंडिया" अक्षरे कोरतो.
हा विनोद संपला की माझे बाल मित्र मैत्रिणी खूप हसायचे की कसं उल्लू बनवलं भारताने आणि श्रेय लाटलं या विचारांनी. त्या वयातही देशभक्ती वगैरे कळत असल्याने हर्षाचा अगदी जल्लोष वगैरे होत असे. :) पण मी तेव्हा मनातल्या मनात हा तर्क लढवत बसत असे की - "अरे पण जो कोणी इतकी प्रमाणबद्ध दहा बारा अक्षरं कोरू शकतो त्याला श्रेय हे मिळालच पाहीजे."
म्हणजे तेव्हा माझी तर्काची बाजू भक्कम होती. पण गंमत म्हणजे माझा हा तर्क शब्दात कसा मांडायचा हे मला तेव्हाही कळत नसे म्हणजे मुखदुर्बळता तेव्हाही होती. आणि भरीत भर म्हणजे मला हास्यात सामीलदेखील होता येत नसे. खरं सांगते खूप त्रिशंकू अवस्था व्हायची. काय करावं कळायचच नाही. आतून विचार तर धडका देत आहेत पण शब्द सापडत नाहीत अशी काहीशी अवस्था होत असे.
_______
दुसरी अशीच घटना प्राथमिक शाळेतील म्हणजे दुसरी तीसरी मधील- शाळेत आम्ही मुली क्रमिक पाठ्यपुस्तकातील काही निवडक वाक्य अधोरेखीत करत असू. "गाळलेल्या जागा भरा", "एका वाक्यात उत्तरे द्या" आदि सोप्या प्रश्नांच्या उत्तरांचे संदर्भ सापडण्याकरता हे अधोरेखन नेहमी उपयोगी पडत असे. एके दिवशी झालं काय माझ्या २ मैत्रिणींनी ठरवलं की या मधल्या सुट्टीत आपण संपूर्ण काही धडेच्या धडे अधोरेखीत करायचे. त्यांच्या बालमते ते खूप कामसू आणि अभ्यासूपणाचं लक्षण होतं. पण मला हे कळत होतं की जर संपूर्ण धडा अधोरेखीत केला तर निवडक प्रश्नांची उत्तरं कशी सापडणार? पण दुसरी तीसरीमध्ये मला ही गोष्ट त्या दोघींना समजावून देता येत नव्हती. त्यामुळे या "टीमवर्क" मधून मी तांदळातल्या खड्यासारखी वगळले तर गेलेच परत फितूरीचा शिक्का खूप दिवस टिकला. ही वाळीत टाकलेली स्थिती माझ्या बालमनाला क्लेशदायक होती. परत तीच चिरपरिचीत अडचण, समस्या - काहीतरी सांगायचं आहे पण व्यक्त करता येत नाही, त्यामुळे ना धड सामील होता येतं ना धड शांत बसवतं .
_______
तीसरा प्रसंग साधाच आहे - पत्ते खेळताना पाचवी सहावीत मला माझ्या मैत्रिणीने विचारलं होतं "सगळ्या राण्यांना त्यांचा राजा आवडतो पण चौकट राणीला चौकट राजा का आवडत नाही?" मी खूप डोकं खाजवूनही मला उत्तर सापडलं नव्हतं पण मला ते पत्त्यातल्या राण्यांच मन जाणून घेणारं कोडं खूप खूप अद्भुत वाटलं होतं. त्याचं उत्तर होतं "चौकट राजाला एकच डोळा आहे म्हणून" ते ऐकून थोडं वाईटच वाटलेलं. अपूर्ण, अधुरं कोणी नसावं असं काहीसं.
________
पण आता प्रगल्भता आल्यावर चौकट राजाच मला जास्त आवडतो कारण अपूर्णतेमध्ये पूर्णतेची ओढ तर आहे. असं म्हणतात जपानी लोक घर बांधताना एका वीटेची जागा मोकळी ठेवतात कारण पूर्णतेचा ध्यास रहावो म्हणून. जपानी लोक कशाला आपलच उदाहरण घ्या ना आपण दक्षीणा देतानाही १०० पूर्ण देत नाही तर १०१ देतो कारण सतत वृद्धी होत रहावी ही त्यामागे भावना असते.शंकरांनी द्वितीयेची चंद्रकोर भाळी धारण केली आहे पोर्णीमेची नाही. असो.
सांगायचा मुद्दा हा की बालपणी घडणार्या या साध्यासाध्या गोष्टी लहान मुलांकरता मोठ्याच असतात. मुलाचं भावविश्व पुढे कसं घडणार आहे याची जणू चुणूकच त्या दाखवत असतात. सदर प्रसंगात वेगळं मूल नक्की वेगळं वागलं असतं. कारण प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो. जीवनास येणार्या प्रसंगास सामोरे जाण्याची प्रत्येक मूलाची हातोटी, क्षमता भिन्न असते. आणि हेच सौंदर्य आहे की या विश्वात तुम्ही एकमेवाद्वितीय आहात, तुमच्यासारखा त्या क्षणी, त्या प्रसंगात तस्साच विचार करू शकणारा अन्य कोणी नाही.
प्रतिक्रिया
5 Nov 2010 - 7:45 am | शिल्पा ब
मुक्तक आवडलं...छान लिहिलंय.
5 Nov 2010 - 9:26 am | चित्रा
असेच म्हणते.
मुक्तक आवडले.
5 Nov 2010 - 8:03 am | बिपिन कार्यकर्ते
हम्म!!! वाचतोय.
तो जोक मी पण ऐकला होता, पण असा विचारच नाही केला !!!
5 Nov 2010 - 8:56 am | प्रीत-मोहर
मीसुद्धा!!!
5 Nov 2010 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार
शुचिंचे लेख उंबराचं फूल असतात पण अतिशय वाचनीय असतात.
5 Nov 2010 - 11:48 am | शैलेन्द्र
छान मुक्त्क.... आवडलं..
"एके दिवशी झालं काय माझ्या २ मैत्रिणींनी ठरवलं की या मधल्या सुट्टीत आपण संपूर्ण काही धडेच्या धडे अधोरेखीत करायचे."
आम्हीही हे करायचो, नविन स्केच्पेन मीळाल्यावर, शिवाय ते इतक खराब व्हायच की परीक्षेत वाचावस वाटायच नाही, निक्काल लागायचा..
5 Nov 2010 - 12:03 pm | यशोधरा
छान लिहिलंय शुचि.
5 Nov 2010 - 12:06 pm | इंटरनेटस्नेही
शुचिताई छान मुक्तक! :) प्लीज स्प्लेलिंग्सकडे लक्ष द्यावे.
5 Nov 2010 - 2:10 pm | स्पंदना
किती विचार करायला लावला तुझ्या ह्या लेखान शुची.
पण खर सांगु कधी कधी कळत असुनही दुसर्याच समाधान होत असेल तर न बोलणेच इष्ट ना ग?
5 Nov 2010 - 3:09 pm | चिरोटा
छान लिहिलय.भारत्,चीन्,अमेरिकेचा तो विनोद लहानपणी ऐकला होता.भारता ऐवजी त्यात जपानचे नाव असल्याने तो विनोद न वाटून मुलांनी जपानचे कौतुक केले होते.!
बुलेट ट्रेन्,पायलट पेन बनवणारे काहीही करु शकतात असे वाटायचे.
5 Nov 2010 - 3:06 pm | अवलिया
चांगले मुक्तक !!
5 Nov 2010 - 3:24 pm | स्वानन्द
>>जीवनास येणार्या प्रसंगास सामोरे जाण्याची प्रत्येक मूलाची हातोटी, क्षमता भिन्न असते. आणि हेच सौंदर्य आहे की या विश्वात तुम्ही एकमेवाद्वितीय आहात, तुमच्यासारखा त्या क्षणी, त्या प्रसंगात तस्साच विचार करू शकणारा अन्य कोणी नाही.
हे चांगलं आहे. पण कित्येकदा असं म्हणून देखील मनाचं समाधान होत नाहीच. :(
5 Nov 2010 - 3:48 pm | पैसा
प्रकट चिंतन छान जमलंय.
आता असं मुळीच म्हणायला नको!
5 Nov 2010 - 5:40 pm | सुबक ठेंगणी
ही नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.
5 Nov 2010 - 5:43 pm | प्रियाली
मलाही ही नवी माहिती आहे. अशी वीट कुठे कमी ठेवली जाते? त्यासाठी विशिष्ट जागा वगैरे असते का? (घराची पायरी, खांब वगैरे)
तुम्ही कथा उत्तम लिहू शकाल. प्रयत्न करावा.
5 Nov 2010 - 6:40 pm | शुचि
http://ofbiz.shambhala.com/shop/product/978-0-8348-1516-2?&text=SH_2736
जपानी संस्कृतीमध्ये "मा" म्हणजे अवकाश किंवा रिक्ततेला खूप महत्व दिलेले आढळते. उदाहरणार्थ एखादे वाद्य वाजवताना स्वर निघतात मग येते शांतता मग परत स्वर उमटतात. ही २ स्वरांमधील शांतता जी पाश्चात्य संगीतात दुर्मीळ दिसते तिला जपानी संस्कृतीमध्ये महत्व आहे. रिक्ततेमध्येही काहीतरी "चैतन्यपूर्ण" बाकी उरतं ही या लोकांची श्रद्धा आहे. घर बांधतानाही आपण म्हणतो की वस्तू गोळा करून त्यापासून आपण काहीतरी बनवलं पण जपानी लोक म्हणतात "मा" म्हणजे रिक्तता होतीच तिच्यात फक्त त्यांनी लाकूड, सिमेंट आदि साहीत्य आणून रचलं. इतकं महत्व ते अवकाशाला देतात.
प्रियाली आपल्या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही. "जपानी लोक घर बांधून झाल्यावर एका वीटेची जागा मोकळी सोडतात" हे एकच वाक्य मी काल जालावर वाचलं.
5 Nov 2010 - 6:05 pm | मितान
आवडले :)
6 Nov 2010 - 2:30 am | शेखर
सुंदर लेख शुची
अवांतरः विडंबनासाठी लागणारा कच्चा माल मात्र नाही ;)