मी मराठी (अर्थात माझं इंग्रजी आणि मी )

फटू's picture
फटू in जनातलं, मनातलं
19 May 2008 - 1:41 am

साधारण १९८७ - १९८८ काळ असावा. आम्ही तेव्हा चड्डीत होतो. ('चड्डीत्त र्‍हा ना भौ' मधलं चड्डीत नाही. आम्ही तेव्हा चार पाच वर्षांचे होतो. म्हणजे चड्डीतच होतो. ) तेव्हा रामानंद सागरांची रामायण ही मालिका दूरदर्शन वर लागत असे. तो काळ दूरदर्शन चा सुवर्णकाळ होता असे म्हणतात (आता दुरदर्शनची पार दुर्दशा झाली आहे .) असो. तर ही रामायण मालिका पाहायला मी माझ्या काकान्च्या घरी जात असे. आमचं गाव कोकणातलं खेडेगाव. आख्ख्या गावामध्ये फक्त एकच दूरदर्शन संच होता. ( आणि तोही कृष्ण धवल. बहुतेक क्रावून कंपनीचा असावा.) त्यामुळे आख्खं गाव काकान्च्या घरी त्या वेळेला जमा व्हायचं. मालिका सुरू होण्यापूर्वी त्या मालिकेच्या प्रायोजकांची जाहीरात यायची. या जाहीरातींना गोरेगावच्या शाळेत जाणारी मुलं 'आडुटाइज' म्हणायची. हाच माझ्या आयुष्यात मी ऐकलेला ख~या अर्थाने पहीला इंग्रजी शब्द. तर त्या 'आडुटाइज' मधली ती निरमाची 'इसके झागने जादू कर दी' ही जिंगल (?) संपली की कानावर सूर पडायचे 'सीता राम चरित अती पावन...' आणि मग सुरू व्हायची पूर्ण भारतवर्षाला वन्दनीय असणा~या मर्यादा पुरुषोत्तमाची कहाणी.

आम्ही चौथी 'पास' झाल्यावर गोरेगावच्या शाळेत जाऊ लागलो. (यथावकाश या गोरेगावच्या शाळेला 'हास्कुल' म्हणतात आसं कळलं ) पण आम्ही आमच्या गावातल्या शाळेत असताना ऐकलं होतं की गोरेगावच्या शाळेत 'बेंजो' वर बसतात. पण हे 'बेंजो' कुठे दिसेनात. (आम्ही ज्याला बेंजो म्हणायचो ते बेंजो नसून बेंच, बसायची बाकडी आहेत हे कळायला आम्हाला सहा महीने लागले.) आम्ही पाचवीत असताना ब तुकडीत होतो. परंतु सहावी सुरू झाल्यावर आमची हुशारी (?) पाहून आमच्या आदरणीय शेख सरांनी आम्हाला सहावी अ मध्ये बसवलं. अकरा वाजता शाळेत जाण्यापुर्वी सात ते दहा या वेळात गुरं चारायला नेणारा एक खेड्यातला मुलगा आपल्या हुशारीच्या जोरावर पांढरपेशांच्या (म्हणजे नेमकं काय, हे मला आजही कळलेलं नाही ) पोरांसोबत अ वर्गात शिकू लागला. आणि अ वर्गात बसण्याचे दुश्परिणामही दिसू लागले.

... झालं अस की आमच्या एका खडूस बाईंचा (माफ करा, मॅडम चा) तास चालू होता. तास चालू असतानाच आमच्या बाकावरील मित्राची मागच्या बाकावरील पोराशी काहीतरी विचारांची देवाणघेवाण चालू होती. त्या दोघांच्या बोलण्यात तिस~याने तोंड घातलं. 'मला डिस्टर्ब करू नका रे' अस काहीतरी तो म्हणाला. तो 'डिस्टर्ब' शब्द काही मला कळला नाही. (आम्हीही ते संभाषण ऐकत होतो हे सांगणे न लगे ). आमची जिज्ञासा अर्थात जाणुन घेण्याची इच्छा काही आम्हाला स्वस्थ बसू देईना. लगेचच मित्राला विचारलं 'डिस्टर्ब' म्हणजे काय रे. आणि आमचं दुर्दैव अस की नेमकं त्याच वेळी आमच्या मॅडम नी आमच्याकडे पाहीलं. त्यानंतर काय झालं असेल हे सांगण्याची गरज नाही. त्या प्रसंगाने आम्ही इतके 'डिस्टर्ब' झालो की आजही कधी आमची जिज्ञासा (किंवा जाणून घेण्याची इच्छा ) कितीही अनावर झाली तरी कुणाला काही विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. मुकाट्याने घरी येऊन शब्दकोश पाहतो किंवा गूगलवर धाव घेतो...

बहुतेक मी तेव्हा आठवीत होतो. मधली सुट्टी झाली होती. डबे वगैरे खाऊन सारे गप्पा मारत होते. बोलता बोलता एक जण म्हणाला की, 'तिने त्याला प्रपोज केले' (आम्हाला 'वन पीस' राहायचं असल्यामुळे नामां ऐवजी सर्वनामांचा वापर केला आहे ) वाक्य खूप लहान होतं. दोन नामे आणि एक क्रियापद. पण क्रियापद इंग्रजी असल्यामुळे आणि आम्हाला त्याचा अर्थ माहिती नसल्यामुळे 'तिने' 'त्याला' नेमकं काय केलं हे कळेना. 'डिस्टर्ब' चा अनुभव पाठीशी असल्यामुळे कुणाला विचारलं वगैरे नाही. सन्ध्याकाळी घरी आलो. शब्दकोश उघडला. 'प्रपोज' चा अर्थ पाहीला. आणी आम्ही चक्क हादरलो. 'टु प्रपोज' म्हणजे लग्नाची मागणी घालणे अस होतं. आठवीतल्या मुलीने आठवीतल्या मुलाला लग्नाची मागणी घातली हे काही मला झेपेना. आणी मी तो विषय तिथेच सोडून दिला.

दहावीची परिक्षा संपली. निकाल लागला. मला ७६% गुण मिळाले होते. बोलता बोलता एक मित्र म्हणाला की मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे. आई शप्पथ, 'डिस्टिन्क्शन' हा शब्द मी तेव्हा पहिल्यांदा ऐकला. पुन्हा अर्थ माहीती नसल्यामुळे मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे हे कळेना. शब्दकोशात पाहिल्यानंतर कळलं की मी 'विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत' उत्तीर्ण झालो होतो.

पुढे अकरावीला विज्ञान शाखा घेतली. अभ्यासक्रम इंग्रजीत होता. पण इथे मात्र फारसं अडलं नाही. सगळे विषय इंग्रजीतून असल्यामुळे मी 'अभ्यासाच्या' इंग्रजीला चांगलाच सरावलो. पुढे अभियांत्रिकीला गेलो. इथेही इंग्रजीची अडचण जाणवली नाही. 'तांत्रीक' इंग्रजी भाषा मला अगदी व्यवस्थित जमायची. गोची व्हायची ती अतांत्रीक इंग्रजी बोलताना. यथावकाश चार वर्षानी आम्ही 'अणुविद्युत आणि दूरसंचार अभियंता' झालो. संगणक अभियंता म्हणून काम करू लागलो.

एक दिवस आम्हाला कळल की अमेरिकन ग्राहकाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आमची निवड झाली आहे. एका सुदिनी (किंवा दुर्दिनी ) आमची ग्राहकाशी दूरध्वणीय मुलाखत 'शेज्यूल' झाली आहे. आणी आमचे धाबे दणाणले. आम्हास अमेरिकन उच्चार कळत नाही हे आम्ही चांगलेच ओळखून होतो. (ए एक्स एन, एच बी ओ, झी मुव्हीज हे चॅनेल आम्ही फक्त 'पाहायचो' ) परंतु यावरही आमच्या सुपीक मेंदूने तोडगा काढला. ती मुलाखत आम्ही स्पिकर फोन वरुन दिली. आमच्या सोबत आमची एक अमेरिकन इंग्रजी उच्चार कळणारी मैत्रीण होती. ग्राहकाने काही विचारलं की ती ते फळ्यावर लिहायची. आणी आम्ही तो फळ्यावरचा प्रश्न वाचून उत्तर द्यायचो. (ती मुलाखत व्यवस्थीत पार पडून पुढे आम्ही त्या प्रकल्पावर काम करू लागलो, हे सांगणे न लगे)

पुढे अमेरिकेत आलो. ग्राहकाच्या कार्यालायातून काम करू लागलो.आमची ग्राहक इतकी सुसाट वेगाने बोलायची की काहीच कळायचं नाही. अशा वेळी आम्ही फक्त 'ओके', 'येस', 'नो' यातलं काहीतरी एक म्हणायचो. (आणि झालेलं संभाषण नंतर लिखीत स्वरुपात ई पत्राद्वारे तिच्याकडून मागवून घ्यायचो. त्यामुळे ती तेव्हा काय म्हणाली होती हे कळायचं आणि बोलताना झालेल्या चुका नन्तर ई पत्राद्वारे सुधारून घ्यायचो)

आता मात्र 'ईंग्लिश' शिकण्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला कळून चुकले. आणि आम्ही इंग्रजीवर मेहनत घ्यायला सुरूवात केली... आणि चक्क महिन्याभरात जाणवलं की आपण खूप व्यवस्थित इंग्रजी समजू आणी बोलू शकतो.

तर अशी ही माझी इंग्रजी भाषा शिकण्याची कहाणी...

आज इंग्रजी भाषेची बिलकुल अडचण जाणवत नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मी मराठीच वापरतो. माझं ओर्कूट वरील प्रोफाइल बर्‍यापैकी मराठीत आहे. माझा ब्लॉग पूर्णपणे मराठीत आहे. अगदी काल जेव्हा मी फिरायला सिक्स फ्लॅग डिस्कवरी किन्गडमला फिरायला गेलो तेव्हा तिथे शर्टवर तिथले कलाकार चित्र काढून देताना पाहिले. मी त्यातल्या एका कलाकाराकडून माझ्या शर्टवर मराठीतून नाव लिहून घेतलं. सुरुवातीला त्या अमेरिकन चित्रकाराला माझं मराठी नाव कागदावर लिहून दाखवूनही जमेना. पण मी चिकाटी सोडली नाही... आणि त्याला ते जमलं... (...शेवटी मी त्याला मराठी लिहायला लावलं)

मी जगाच्या पाठीवर ज्या भूमीत असेल, तिथल्या संस्कृतीबद्दल, लोकांबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर असेल... पण त्याचबरोबर मला अभिमान असेल माझ्या मराठी भाषेचा, माझ्या मराठी पणाचा...

असशील जरी तू भाषा सार्‍या जगाची
नसेल कुणात हिंमत तुला बोलण्याची
तरी जेव्हा आईची आठवण येईल कधी
आठवेल तेव्हा मला माझी माय मराठी

(आणि जाता जाता त्या शर्टाच चित्र... ज्याच्यावर आम्ही अमेरिकन चित्रकाराकडून मराठीत आमचं नाव लिहून घेतलं. शर्टाच्या आतमधला 'प्राणी' म्हणजे अस्मादिक आहोत... माझ्या मिसळ पावावरच्या रसिक मित्रानी ( आणि मैत्रिणींनी ) अभिप्राय द्यावयाचा झाल्यास फक्त या लेखावरच द्यावा. अस्मादिकान्चा चेहरा राणीच्या बागेतील ब~याच प्राण्यांशी साम्य दाखवतो हे आम्ही जाणून आहोत...)

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

मन's picture

19 May 2008 - 2:37 am | मन

अगदि "शेम्-टु-शेम" ष्टोरि आह्ये की राव आपली.(अन् जवळपास आपण करीत असलेले/केलेले "उपाय" सुद्धा.)
फरक इतकाच की इथं मिल्टन कीन्स राहुन आम्ही अजुनही आंग्ल भाषा न शिकता राहुन दाखवलयं. :-) ;-)

आपलाच,
(Ambition is the poor excuse for not being enough lazy.) असं मानणारा,
मनोबा

भडकमकर मास्तर's picture

19 May 2008 - 4:05 am | भडकमकर मास्तर

हा लेख चांगला झाला आहे...
अवांतर : कोणताही अभिनिवेश न बाळगता सरळ मनाने लिहिलेले लेख मस्त वाटतात...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण's picture

19 May 2008 - 7:03 am | मदनबाण

मास्तरांशी पुर्णपणे सहमत.....

मदनबाण.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2008 - 4:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा लेख चांगला झाला आहे...
अवांतर : कोणताही अभिनिवेश न बाळगता सरळ मनाने लिहिलेले लेख मस्त वाटतात...

वरदा's picture

19 May 2008 - 4:45 am | वरदा

सहज लिहिलय एकदम्...सिक्स फ्लॅग ला गेला होतात न्यू जर्सीत असता की काय तुम्ही?

मुक्तसुनीत's picture

19 May 2008 - 6:53 am | मुक्तसुनीत

लेख प्रामाणिक आहे. त्यातील अनुभवाच्या खरेपणामुळे , विशेष म्हणजे प्रतिष्ठेच्या रूढ कल्पनांना झुगारून , आपल्याला जाणवलेल्या आपल्या मर्यादांचा दिलखुलासपणे उल्लेखांमुळे एकदम प्रत्ययकारी वाटेल असा.
मात्र इंग्रजी भाषेचा वापर दिखाऊपणाकरता करणे हे जसे त्याज्य , तसेच त्या भाषेमधल्या ज्ञानाचे थोडे कण तरी आत्मसात करण्याकरता त्या भाषेशी जवळीक साधणे इष्ट. ही जवळीक साधताना काय जाणवले , कसल्या अडचणी आल्या , त्यांच्यावर मात कशी केली याबाबतसुद्धा लिहायला हवे.

छोटा डॉन's picture

19 May 2008 - 8:10 am | छोटा डॉन

सतिशराव,
छान जमला आहे लेख, अजुन येऊ द्यात असेच म्हणतो ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग's picture

19 May 2008 - 7:10 am | चतुरंग

प्रामाणिक लेखन. प्रचलित व्यवस्थेतून जाताना येणार्‍या अडचणी मोकळेपणाने मांडण्याचे धाडस वाखाणण्याजोगे. बाकी मुक्तसुनीतशी सहमत.

चतुरंग

केशवसुमार's picture

19 May 2008 - 11:57 am | केशवसुमार

म्हणतो..
लिहित रहा.. पुलेशु..
केशवसुमार

यशोधरा's picture

19 May 2008 - 8:22 am | यशोधरा

आवडला लेख. प्रामाणिकपणे लिहिलय. मीही मराठी माध्यमातून शिकले आहे. जरी व्याकरण दृष्ट्या इंग्लिश व्यवस्थित होतं/ आहे, आणि लिहिताना काही अडचण जाणवायची नाही तरी कॉलेजमधे गेल्यावर सुरुवातीला बोलता यायच नाही तेवढ्या सफाईदारपणे. शेवटी तेही जमलं. न्यूनगंड न बाळगणं महत्वाचं. असो.

अमेरिकन माणासाचा हात देवनागरी लिपीत वळवलात?? है शाब्बास!! :)

स्वाती दिनेश's picture

19 May 2008 - 11:47 am | स्वाती दिनेश

प्रामाणिक कथन नर्मविनोदीपध्दतीने मांडले आहे,आवडले.
स्वाती

राजे's picture

19 May 2008 - 11:54 am | राजे (not verified)

वा ! छान !

लेखन पध्दत आवडली !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कलंत्री's picture

19 May 2008 - 1:22 pm | कलंत्री

आपले कथन आवडले. आपल्या प्रगतीसाठी मनपूर्वक अभिनंदन.

मराठीच्या माध्यमाच्या मुलांसाठी मात्र काहीतरी भरीव करायला हवे हे मात्र कोठेतरी जाणवत होते.

गणा मास्तर's picture

20 May 2008 - 11:13 am | गणा मास्तर

मी पण सतीश आणि यशोधराप्रमाणे मराठी माध्यमातुन शिकलो. मला पण ईन्जिनीर होइपर्यन्त तान्त्रिक इन्ग्रजी यायचे
पण बोलता येत नव्हते. पुढे मी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर तीन महिन्यात अगदी फाडफाड इन्ग्रजी बोलु लागलो.
मला तर मराठीतुन शिकल्याचा फायदाच झाला. मराठीच्या माध्यमाच्या मुलांनी कसलाही न्युनगन्ड बाळगु नये. त्यान्ची आकलन शक्ती चान्गली असते.
पालकानी पण मुलांना मराठी माध्यमात घालावे असे मला वाटते. मराठीच्या माध्यमाच्या मुलांना फक्त थोड्याशा सरावाची गरज असते.

अप्रतिम लेखाबद्द्ल धन्यवाद सतीश .
शुद्ध्लेखनाच्या चुका माफ कराव्यात.

अनिकेत

चेतन's picture

19 May 2008 - 2:48 pm | चेतन

लेख मस्तचं जमलायं....

लगे रहो....

पुढच्या लेखनाला शुभेच्छा....

इंग्रजी ऐकण्याला थोडाफार सरावलेला... (चेतन)

अवांतरः तुझ्याप्रमाणे मलाही गोरेगावच्या शळेतले "दिवसाचे तारे चांगलेच आठवले"

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2008 - 5:04 pm | प्रभाकर पेठकर

प्रामाणिक लेखातून अस्सल भावनांचे प्रकटीकरण मनाला स्पर्शून गेले.
यशोधरा ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे न्यूनगंड न बाळगणं महत्वाचं. हे अतिशय महत्वाचे. आत्मविश्वास आणि चिकित्सक बुद्धी माणसाला प्रगती पथावर साथ देते. एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर ती ताबडतोब मित्राला/सहकार्‍याला विचारली तर आपले अज्ञान एका पुढेच उघडे पडते पण त्याने समजावून सांगितल्यावर त्याला त्या ज्ञानापुरते 'गुरू'चे श्रेय दिल्यावर आपल्याला कमीपणा वाटत नाही. ज्ञानात भर पडलेली असते. पुढचे अनेक अवघड प्रसंग टळतात.

मनस्वी's picture

19 May 2008 - 7:05 pm | मनस्वी

छान लिहिलंय रे सतीश.. आवडलं.

ताबडतोब मित्राला/सहकार्‍याला विचारली तर

काका, हल्लीचे सहकारी (अपवाद वगळता) खूपच डांबिस असतात.

एकदम सहमत .....
कधी कधी सहकार्‍यांना knowledge sharing (यासाठी योग्य मराठी शब्द काय?) म्हणजे त्यांच्या एकाधिकारशाहीला (मोनोपॉलीला) धक्का पोहोचावणारे वाटते.

( नोकरीत एकाधिकारशाहीचा चांगला अनुभव असणारा आणि तशा सर्वांना पुरुन उरलेला) ...कुंदन

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2008 - 9:20 pm | प्रभाकर पेठकर

काका, हल्लीचे सहकारी (अपवाद वगळता) खूपच डांबिस असतात.

हल्लीचेच नाही ही सर्वकालीन समस्या आहे. माझ्या काळातह होतीच. पण आपण माणूस परखूनच मैत्री करीत असतो. आणि 'गुरू' निवडण्याचे स्वातंत्र्यही आपल्या हातात असते. जग १००% वाईट नाही असा माझा विश्वास (आणि अनुभव) आहे.

अनिल हटेला's picture

19 May 2008 - 5:12 pm | अनिल हटेला

छान !!!

आमुचे इन्ग्रजी सुद्धा इतकेच सून्दर आहे..

आनी आम्ही तर चीन नावाच्या ज्या देशात आहोत तीथे तर

चायनीज भाशा च बोलावी लगते..

असो ...

बाकी वृत्तान्त पून्हा कधी~~~~~

मात्र लेख खरच मस्त वाटला.....

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2008 - 6:23 pm | बिपिन कार्यकर्ते

छोटीशीच घटना पण तुम्ही मस्त मांडली ती... आवडली.

बिपिन.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 May 2008 - 9:14 pm | llपुण्याचे पेशवेll

मला पण अशा इंग्रजी शब्दांबद्दल बरेच कुतूहल होते. कारण बहुतवेळा त्याचा मुळ उच्चार हा थोडा मराठीकरण होऊन समोर येई.
उदा. डिस्टॉप म्हणजे डिस्टर्ब.
आणि घरी तर मराठीचा आग्रह असल्याने मला तर बरेच शब्द मराठीतून माहीती होते.
उदा: डीश अँटेना ला बशी नभोगता(चायला कसा आणि कोणी काढला हा शब्द कोणास ठाऊक)
रेडीओ ला अर्थातच आकाशवाणी. टी.व्ही. ला दूररर्शन.
कॉलेज ला महाविद्यालय. रोड ला रस्ता.(रोड, स्ट्रीट आणि वे मधे नक्की काय फरक असतो कोण जाणे. कदाचित रस्ता, मार्ग, पथ सारखे शब्द असतील ते)
तसेच चहाची किटली आणि तीर्थाची झारी का असाही मला प्रश्न मला पडत असे. कारण रचना तर दोन्हीची सारखी असते फक्त आकारात फरक. असो तर थोड्या फार फरकाने मी पण सतिशसारख्याच अनुभवातून गेलेलो आहे. :)

अवांतरः डेक्कन कॉलेजच्या एका सुपरीटेंडंटची म्हातारी आई कोकणात सर्वाना अभिमानाने सांगत असे "आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे".
पुण्याचे पेशवे

गणा मास्तर's picture

20 May 2008 - 11:14 am | गणा मास्तर

मी पण सतीश आणि यशोधराप्रमाणे मराठी माध्यमातुन शिकलो. मला पण ईन्जिनीर होइपर्यन्त तान्त्रिक इन्ग्रजी यायचे
पण बोलता येत नव्हते. पुढे मी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर तीन महिन्यात अगदी फाडफाड इन्ग्रजी बोलु लागलो.
मला तर मराठीतुन शिकल्याचा फायदाच झाला. मराठीच्या माध्यमाच्या मुलांनी कसलाही न्युनगन्ड बाळगु नये. त्यान्ची आकलन शक्ती चान्गली असते.
पालकानी पण मुलांना मराठी माध्यमात घालावे असे मला वाटते. मराठीच्या माध्यमाच्या मुलांना फक्त थोड्याशा सरावाची गरज असते.

अप्रतिम लेखाबद्द्ल धन्यवाद सतीश .
शुद्ध्लेखनाच्या चुका माफ कराव्यात.

अनिकेत

ऋचा's picture

20 May 2008 - 11:29 am | ऋचा

मी सुध्दा मराठी माध्यमातच शिकले आहे.
१० पर्यंतचे शास्त्र,गणित मराठीत
११ मी शास्त्र शाखा घेतली आणि आमची बोंबाबोंब सुरु झाली :''(

मी सहामाहीत नापास झाले ~X(

पण प्रयत्न पुर्वक मी पुढच्या सर्व परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत गेले. (१ वर्ष देखील फुकट न घालवता)

आज मी उत्तम इंग्रजी बोलू शकते :B

कल्याणी पेटकर - पोरे's picture

20 May 2008 - 12:12 pm | कल्याणी पेटकर - पोरे

"मी जगाच्या पाठीवर ज्या भूमीत असेल, तिथल्या संस्कृतीबद्दल, लोकांबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर असेल... पण त्याचबरोबर मला अभिमान असेल माझ्या मराठी भाषेचा, माझ्या मराठी पणाचा..."

अगदी मनातलं लिहिलं त!!
लेख सुरेख झालाय.

--कल्याणी

प्रकाश घाटपांडे's picture

20 May 2008 - 2:57 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्या टायमाला बेल्ह्यात (आमच्या गावाला) पहिली ते सातवी पोत्तर जिवन शिक्शन मंदिर बेल्हे लाकुड काम नं १ अशी पाटी असलेली म्हन्जे प्राथमिक शाळा असायची व देव गुर्जी व्ह्ते. ५ वि ते ७ वी. तव्हा हायस्कूलला आमचे गुरुजी पवाराचा वाडा म्हनायचे. आन आमाला ८ वी पासून विंग्रजी होते ते हायस्कूल मदि गेल्याव. ए बी शी डी आम्ही ८ वीला शिकलो.८ वी ९ वी विंग्रजीचा कंडेस्ड कोर्स होता. ज्यात ५ वी ते ९ वीच इंग्रजी अभ्यासक्रम क्व्हर केला होता.आन दहावीला परत सम्द्यांबरुबर यसयस्सी. पुन्यात मामाकड यायचो तव्हा म्हनायचे तुमचा रिजर्ट कधी हाय? मला काय समजायच नाय. मंग अंदाजपंजे समजाया लाग्ल की ते पास्-नापास कवा असतय अस इचारतात. यकदा हायस्कुल मंदी एका सरानी चाचणी घेताना विचारल व्हाट इज युअर सरनेम ? म्ह्नल हित हायस्कुल मदी प्रत्येक इशयाला वायले सर असत्यात. हा कंच्या सराच नाव इचारतो. आन इचारत असन तर तो अपॉस्ट्रोफी यस का नाही म्हनत? हा क्लास टीचर च त नाव इचारत नाही ना? मी म्हन्लो माय सर्स नेम इज कर्णे. त्यानी पुना पुना इचारल आमि पुना पुना सांगातल. मंग त्यानी सांगातल कि सर नेम म्ह्जी आडनेम. पन पुस्तकात शब्दच गेला नव्हता मला मंग मी काय करनार?
सायन्सला क्वालेज मदी शिकायला पुन्यात आलो. वेळापत्रकावर लिहिल होत zoology, botany आता मपल्याला बायोलॉजी शब्द गेला होता केमेस्ट्री माहित होता. पन हे झुलॉजी आन बॉटनी काय भानगड हाय काय कळना? बर लोकान्ला इचाराव त मंग आपल्या न्यानाचे वाभाडे काडनार ही शहरी मुल. कोन नुमवी तर कोन न्यु इंग्लिश स्कूल मदुन आलेली प्वॉर. म्हन्ल गप र्‍हावं . पहिल्या तासाला (ज्याला झूलॉजी म्हन्ल होत त्या)येक नकटी बाई आली आन काय काय बडबडबडायला लागली. मपल्याल त काय सुदर ना. पन मंग चित्र दाखवल्याव समजाया लागल कि हे जीवशास्त्रातलंच आहे. आन आपल्याला झालेल आहे. एकाला इचारल फायलम म्हजे काय? तो निस्ता पघायला लागला. गनिताला बि असच. अल्जिब्रा आन जॉमेट्री . ते सायमल्टेनियस इक्वेशन आल. त्याला इचारल कि सायमल्टेनियस म्हन्जे काय? त्याची सम्जुन सांगायची विच्छा दिसली पन त्याची गाडी " यु सी.....इट्स अ सॉर्ट ऑफ इक्वेशन यु नो......"
फळ्याव काडल मंग समाजल कि हे एकसामायकि समिकरन हाय. बाहेर आल्याव गेट कुठ आहे आपन कुठ आहोत? या बोल्डिंगी कंच्या कंच्या? काय सुदराना भौ!
त्यात आमचा शानपना म्हन्जे हायर इंग्लिश व लोअर जर्मन घेतल अकरावीला स्वारी एफ वाय जे सी. आन बी तुकडी म्हजी डी पेक्षा भारी आन ए पेक्षा म्हने हल्की. वार्षिक मदी जर्मन ला मंग कंपास झालो. आन हायर विंग्रजी काठाव. तांत्रिक विंग्रजी मंग समजायला लागल. हळू हळू भाषा त्यातल्या त्यात शुद्ध असली तरी टोन गावठीच होता. त्यात हळू हळू बदल व्हायला लागला. ज्योतिषाच्या नादापायी बारावी नंतर एफवाय बीएस्सीच वर्ष वाया घालवलं नंतर ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा न एक वर्ष वाया घालवल. अशी पंचवार्षिक योजना आमच्या बीएस्सीची झाली.
गावाकडून आल्याचा न्युनगंडही हळु हळु गेला. आता अहंगडाने पछाडले जाउ नये याची काळजी घ्यावी लागते.
प्रकाश घाटपांडे

डोमकावळा's picture

20 May 2008 - 5:44 pm | डोमकावळा

मराठी माध्यमात दहावी पर्यंत शिक्षण घेवून पुढे अकरावी-बारावी पब्लिक स्कुल (आता याला मराठीत काय म्हणायचं ? :-/ ) मध्ये शिकायला आलो त्यावेळी माझा सुद्धा असाच अनुभव आहे.

गणिताच्या पहिल्या तासाला वर्गात सरांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय अस विचारलं तेव्हा मला एकदम गोंधळल्यासारखं झालं होतं. सरांच्या एकंदरीत लक्षात आल्यावर त्यांनी जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरण सांगितलं तेव्हा जरा कुठे हायसं वाटलं. :)

शितल's picture

20 May 2008 - 6:50 pm | शितल

तुमचा मराठी ते इ॑ग्रजी प्रवास अतिशय मस्त शब्दात तुम्ही वर्णन केला आहे.

सिक्स फ्लॅग डिस्कवरी किन्गडमला जाण्याचा आमचा मागच्या विका॑ताचे प्लॅनि॑ग होते पण पावसामुळे रद्द झाले, कदाचित ह्या विका॑ताल पुर्ण होईल.

वरदा's picture

21 May 2008 - 2:55 am | वरदा

इथे येणारेस? माझ्याकडे ये बरं का....

धनंजय's picture

21 May 2008 - 12:03 am | धनंजय

फार आवडला. नर्मविनोदी आहे, प्रामाणिक आहे. लेख हृदयाशी संवाद साधून जातो आहे.

चित्रा's picture

22 May 2008 - 1:22 am | चित्रा

खुसखुशीत. लेखन खूप आवडले.

मराठी माध्यमातून दहावी केल्यानंतर एकदम कॉलेजमध्ये गेल्यावर गणित विषय इंग्रजीतून शिकताना एकदम धक्का बसला त्याची आठवण झाली. फाड फाड इंग्रजी बोलणारी एक आगाऊ (वाटलेली) मराठी बया मला लॅब पार्टनर मिळू नको दे असा धावा केल्याचे आठवते :-) माझ्या दुर्दैवाने तीच माझ्या वाट्याला आली. आणि आधीच इंग्रजीच्या मार्‍यामुळे गांजलेली असताना ही काय नवी ब्याद असे वाटले. तिलाही तसेच वाटले असावे. नंतर मात्र आम्ही चांगल्या रूळलो.

मुंबईत बालमोहन शाळा मला वाटते मराठी शाळेतील मुलांना दहावीनंतरच्या उन्हाळी सुटीत कॉलेजात लागणार्‍या इंग्रजीचे किंवा तत्सम काही साध्या "स्टडी स्किल्स"चे धडे द्यायची असे ऐकल्याचे आठवते. खरेच असे होते का हे माहिती नाही. आहेत का इथे कोणी बालमोहनवाले लोक?!

सुमीत's picture

22 May 2008 - 8:30 pm | सुमीत

अनुभव आणि ते सुद्धा १०० ट्क्के खरे, मनापासून आवडले तुझे लेखन.

गणा मास्तर's picture

23 May 2008 - 6:05 am | गणा मास्तर

खरेच अशा स्टडी स्किल्सची फक्त गरज आहे. थोडे ईंग्रजी संवाद कौशल्य मराठी शाळांत शिकवले पाहिजे.
खरेतर मराठी माध्यमातुन शिकुन आपला काहीच तोटा झाला नाही. उलट मात्रुभाषेमुळे विषय चांगले समजले.
आजची मराठीची अवस्था बिकट आहे. इथे बघा
http://www.misalpav.com/node/1845

http://www.misalpav.com/node/1837

मराठी माध्यमातुन शिकलेले आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेले लोक आपल्या मुलांना मात्र ईंग्रजीत शिकवतात.
आपण घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतो असे त्यांना का वाटत नाही?
की मराठीचा अभिमानच उरलेला नाही.

भडकमकर मास्तर's picture

23 May 2008 - 10:00 am | भडकमकर मास्तर

तुमचा उद्देश लक्षात आला...
घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतो
मग त्यांच्याशी घरी इंग्रजीत बोलले पाहिजे...
आमच्या इमारतीत एक पूर्ण मराठी कुटुंब त्यांच्या तीन वर्षाच्या पोराशी " गो देअर.... कम हिअर..... वी विल गो हां बाबा.... व्हॉट डू यू वाँट?" असे सतत बोलताना दिसते.... माझी बायको म्हणते की हे ऐकून वाटते कुत्र्याशी बोलताहेत...

आता घरी मराठी शिकवणे सोपे का इंग्रजी हे ज्याचे त्याने ठरवायचे असे म्हटले तर काय चूक? शाळेत पोरगा इंग्रजी शिकेल, बोलेल, आणि घरी झक मारत मराठीच बोलेल, वाचेल आणि लिहील....

मग मराठी शाळा बंद पडतील, त्याचे काय?
मला दोन्ही बाजू पटतात, मला एवढे मात्र नक्की वाटते, घरी मराठी शिकवणे सोपे, वाचून घेणे , लिहून घेणे जास्त सोपे...

( गोंधळलेला) भडकमकर

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गणा मास्तर's picture

23 May 2008 - 12:37 pm | गणा मास्तर

लोक मुलांना लहानपणीच ईंग्रजी माध्यमात घालतात आणि मग तुम्ही सांगितल्यासारखे" गो देअर.... कम हिअर..... वी विल गो हां बाबा.... व्हॉट डू यू वाँट?" चालू होते.
ते चुकिचे आहे या मताचा मी देखिल आहे. अशी मुले पुढे " मिल्क दे , मी डॉगला घाबरतो "असले धेडगुजरी मराठी बोलतात.
जो तो आपापल्या हुशारीवर पुढे जात असतो. मी ईंग्रजी स्वताहुन शिकलो. माझ्या घरी कोणालाही ईंग्रजी बोलता येत नाही.
आपण घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतोहे वाक्य त्या लोकांसाठी आहे जे मराठीतुन शिकले पण मुले मागे पडू नयेत म्हणुन मुलांना ईंग्रजी माध्यमात घालतात. ते लोक असा विचार का करत नाहीत की आपण जसे ईंग्रजी स्वताहुन शिकलो तसे मुलेही शिकतील. मुले ८-१०वीत गेल्यावर ईंग्रजी संवाद कौशल्यासाठी मदत करावी. सोबत थोडा सराव करावा. असे केले तर मराठी शाळा पण टिकतील, मराठीपण टिकेल आणि ईंग्रजीची भितीपण वाटणार नाही.

आपला अनिकेत

पंकज चव्हाण's picture

23 May 2008 - 9:28 pm | पंकज चव्हाण

फारच छान मला भर् पुर आवड्ले

गिरिजा's picture

28 May 2008 - 3:27 pm | गिरिजा

आज इंग्रजी भाषेची बिलकुल अडचण जाणवत नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मी मराठीच वापरतो.

मी सुद्धा!! :)

वाह.. छानच लिहिल आहे.. आणि शर्टावरील कलाही छान आहे..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------