मनातल

प्रभा's picture
प्रभा in जनातलं, मनातलं
2 Nov 2010 - 9:47 pm

दसरा झाला आणि बघता बघता दिवाळी समोर येऊन ऊभी राहिली. घराची आवराआवरी, साफ़सफ़ाई करताना मुख्य ऎवज असतो घरातील रद्दी! आजकाल मुख्य पेपर + त्याच्या खंडीभर पुरवण्या यांनी बघता बघता रद्दीचा डोंगर होतो. रद्दी आवरताना पुन्हा एकदा नजरेखालून पेपर जातातच. नवरात्राच्या नऊ दिवसातील पेपर व त्यांच्या पुरवण्यांमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या मंडळांच्या देवींची चित्रे, फ़ोटो व त्यांची वर्णने असतात. हे वाचून खूप चांगले वाटते म्हणूनच टाकून मात्र देववत नाही. पण त्या पेपरांचा काही उपयोगही करता येत नाही. कारण ते वापरणार कसे? कपाटात खाली कसे घालणार? फ़राळाच्या डब्यात कसे काय देवीला खाली घालणार? कचर्‍याच्या डब्यात खाली कागद टाकताना वाटते चुकून देवीचा फ़ोटो असलेला पेपर तर नाही गेला? गणपतीच्या दिवसात पण असेच होते. गणपतीच्या दहाही दिवसात बाप्पाचे वेगवेगळे सुंदर फ़ोटो, देखावे यांनी सगळे पेपर भरलेले असतात. माझ्या माहितीत अशी खूप माणसे आहेत ते ही सर्व चित्रे कापून ठेवतात. पण एवढे फ़ोटो ठेऊन त्याचे करायचे तरी काय? आणि दरवर्षी या फ़ोटोत वाढच होणार. ते फ़ोटो चुरगळले गेले, चुकून कचर्‍यात टाकले गेले तर मनाला सतत टोचणी लागते ते वेगळेच.
याला काही उपाय नाही का? म्हणजे वेगवेगळ्या मंडळांनी बसविलेल्या गणपतींचे, देवींचे फ़ोटो न देता नुसती वर्णने करायची.(कल्पना करायला ही नको वाटते ना?) अर्थात आजकालच्या Marketing च्या जमान्यात पेपरला फ़ोटो आले की जास्तीत जास्त लोक तिथे प्रत्यक्ष भेटी देण्याची शक्यता असते. असेलही. पण फ़ोटो न देता नुसती वर्णने पण प्रभावीपणे करता येतात की. आता उदाहरण द्यायचे झाले तर "अष्टविनायक" चित्रपटातील "अष्टविनायका तुझा महिमा कसा? दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा" या गाण्यात अष्टविनायकांचे इतके सुंदर वर्णन खेबुडकर साहेबांनी केले आहे की मूर्तीमंत आठही गणपती डोळ्यासमोर उभे रहातात. असेही खेबुडकर साहेबांच्या प्रभावी प्रतिभेचे प्रत्यंतर आपण प्रत्यही घेतच असतो. मी तर असे ऎकले आहे की हे गाणे जेंव्हा त्यांनी लिहीले तेंव्हा प्रत्यक्ष ते अष्टविनायकाला एकदाही गेले नव्हते. "जे न देखे रवी ते देखे कवी" म्हणतात ते उगाच नाही.
दिवाळी झाल्यावर ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण येईल पण येशूख्रिस्ताच्या फ़ोटोनी पेपर एवढे कधीच भरत नाहीत. बकरी ईद, रमझान ईद वगैरेच्या बाबतीतही तसेच. असे का? बरे आपल्याकडे सगळ्या देवांच्या बाबतीत हे घडत नाही. म्हणजे दत्तजयंतीला दत्ताच्या फ़ोटोंनी एवढे पेपर भरत नाहीत. शंकर, राम, मारुती या सगळ्या देवांच्या बाबतीतही त्यांच्या त्यांच्या उत्सवाला एवढे फ़ोटो कुठे येतात?
गणपती बाप्पाला तर आपण इतका जवळचा मानतो की त्याला आपण आपला मित्रच करून टाकले आहे. म्हणूनच My friend Ganesha सारखे सिनेमे निघतात. देवी तर काय सार्‍या दुनियेची आईच आहे. आणि आई नेहमी जवळचीच असते. म्हणजे एव्हढा जिव्हाळा/जवळीक देवाप्रती निर्माण झाल्यावर त्यांच्या चित्रांची/फ़ोटोंची आपल्याकडून जाणते/अजाणतेपणाने विटंबना होऊ द्यायची का?
पूर्वीच्या काळात ऋषिमुनी घनदाट अरण्यात जाऊन किंवा डोंगर द्र्‍याखोर्‍यात जाऊन एकाग्र मनाने नामस्मरण/जप करीत खडतर तपाचरण करायचे. इतकी एकाग्रता असायची की अंगावर मुंग्यांनी वारुळ केले तरी त्यांची समाधि भंग पावत नसे असे पुराणात दाखले आहेत. त्यांच्यासमोर कोठलीही मूर्ती नसायची. पण आपल्या सारख्या सामान्य लोकांचे मन एकाग्र होण्यासाठी, एक दिशा मिळण्यासाठी त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेची सुरूवात करून दिली. म्हणजे लहानपणी आपण मूळाक्षरे गिरवून लिहायला शिकतो. एकदा लिहायला येऊ लागले की आपण सुलेखनाचा आधार सोडून देतो. मोठेपणी परिक्षेला जाताना काही कोणी मूळाक्षरे गिरवून जात नाही. पूर्वीच्या ऋषिमुनींना आपल्याकडून हेच अपेक्षित असावे. एकदा का मन एकाग्र झाले की आपल्याला स्वत:च्या अंतरंगात डोकावून स्वत:मध्ये दडलेला देव सापडेल असे त्यांना वाटले होते. पण आपण मूर्तीचा/फ़ोटोंचा आधार सोडतच नाही. म्हणूनच एव्हढी व्रतवैकल्ये, पूजाअर्चा करूनही, देवळांपुढे रांगा लाऊनही, जास्त पैसे देऊन स्पेशल दर्शन घेऊनही कोणी समाधानी होताना दिसत नाही. असे आपले मला वाटते.
असो.
आगामी दिपावली मिपा च्या सर्व सभासदांना सुखाची, समृद्धिची, भरभराटीची जावो हीच सदिच्छा.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

2 Nov 2010 - 11:03 pm | Dhananjay Borgaonkar

छान लिहिलं आहे.
हे मात्र खर की नामस्मरण करायला कुठलीही मुर्ती डोळ्यासमोर लागत नाही.
मन स्थिर असल की झाल. अर्थात हेच खुप अवघड आहे :)

शुचि's picture

2 Nov 2010 - 11:51 pm | शुचि

लेख आवडला.

मदनबाण's picture

3 Nov 2010 - 6:48 am | मदनबाण

सुंदर लेखन... :)

सुधीर काळे's picture

3 Nov 2010 - 8:14 am | सुधीर काळे

सुरेख लेखन. तुझे मुद्देही विचार करायला लावणारे आहेत. वाचायला मजा आली!
आपण निर्माल्य जसे नदीत टाकतो तशा प्रकारचा, पण वातावरणावर दुष्परिणाम न करणारा असा एकादा पर्याय शोधला पाहिजे हे मात्र खरे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2010 - 9:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आपण निर्माल्य जसे नदीत टाकतो तशा प्रकारचा, पण वातावरणावर दुष्परिणाम न करणारा असा एकादा पर्याय शोधला पाहिजे हे मात्र खरे! <<
निर्माल्य नदीत टाकून पाण्याचे प्रदूषणच होणार. आमच्या बिल्डींगमधले सगळेच निर्माल्य झाडांमधे टाकतात. गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेसही निर्माल्य जास्वंदीच्या झाडाखाली नाहीतर मोगर्‍याच्या झुडपात जायचं. असं केलं तर पाण्याचं प्रदूषण टळेल. नाहीतरी झाडावरची फुलं आपण खुडली नाहीतर ती झाडांतच पडणार.

प्रभामावशी, मी नास्तिक असले तरी तुमचा विचार मान्य आहे. अशा वेळेस देवदेवतांची चित्रं असलेली वर्तमानपत्रंही निर्माल्य समजून झाडांत टाकलेली चालेल का? जिवतीच्या कागदाचं नेहेमी काय करतात? माझी आई तो कागद इतर निर्माल्याबरोबरच झाडांतच टाकायची.

ए.चंद्रशेखर's picture

3 Nov 2010 - 8:51 am | ए.चंद्रशेखर

आमच्या लहानपणी वर्तमानपत्राचे विविध उपयोग करत असत. मुंबईच्या चाळींच्या वर्‍हांड्यांच्यात लहान मुलानां पेपरवरच उकिडवे बसवत असत. भेळवाला पेपर च्या तुकड्यावरच भेळ देत असे. माझी आई तळलेल्या दिवाळीच्या पदार्थांमधले तेल निघून जावे म्हणून ते वर्तमानपत्रावरच ठेवत असे. पण यातल्या कोणालाच कधी प्रभाताईंची अडचण आली नाही. नव्या युगाचा महिमा दुसरे काय?

"विविध कार्यक्रमां"साठी वापरल्या जाणार्‍या general वर्तमानपत्रांच्या तुकड्यांबद्दल प्रभाताईंनी लिहिले नसून देवादिकांच्या चित्रांबद्दल लिहिले आहे व नास्तिकातले नास्तिक हिंदूसुद्धा अशा देवादिकांच्या चित्रांवर लहान मुलानां 'उकिडवे' बसवत असतील असे मला वाटत नाहीं.

जाहिराती, बातम्या यात वापरलेली देवाधिकांची चित्रे व फोटू हे आपण म्हणता तसे general वर्तमानपत्रांच्या तुकड्यांत कोठेही असतात. वर्तमानपत्रांचा वरील प्रकारचा वापर करणारी मंडळी पेपर हातात घेऊन त्याचा चतकोर फाडताना मी अनेक वेळा बघितलेले आहे. ते काही त्या चतकोर तुकड्यावर काय लिहिले आहे? कोणाचा फोटू आहे हे थोडेच बघतात. या माझ्या निरिक्षणामुळेच प्रभाताईंच्या अडचणीबद्दल मला काळजी वाटते.

प्रभाआत्या, लेखन चांगले झाले आहे.
असाच प्रश्न मला देवांची क्यालेंडरे वर्षाच्या शेवटी टाकून देताना पडायचा.
हातातून पैसे पडत असलेल्या लक्ष्मीचा फोटू तसेच अतिशय गोड चेहेर्‍याचे शंकरपार्वती आणि मध्ये असलेला गणपती वगैरे...
काही लोक यांच्या फ्रेमा वगैरे करवून घेत आणि भिंतीवर लावत. आमच्याकडे तसे कधी झाले नाही.
बरं, नंतर बघू काय करायचे ते असे म्हणत म्हणत भरपूर गठ्ठा झाल्यावर खरी पंचाईत झालेली आठवते.

लग्नाच्या आमंत्रण पत्रिका बद्दलही हाच प्रश्न पडतो नेहेमी ... गणपतीचा छानसा फोटो असतो त्यामुळे फेकता येत नाही पण अशा किती साठवून ठेवणार ?

चिगो's picture

3 Nov 2010 - 10:13 pm | चिगो

चांगल्या मुद्यावर चर्चा चालली आहे. काय करता येईल बरे !?