प्रिन्सीची कथा एका गुलाबी हिर्याचा इतिहास आणि एका गोंडस राजकुमाराची शोकांतिका आहे.
या कथेची सुरुवात १९४३ साली मद्रासच्या रेसकोर्सवर झाली. रेसकोर्सवर बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड आणि सितादेवी यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात -लग्नाच्या आणाभाका -शपथा सगळं काही क्रमवार झालं . लाज शरम कुलकी मर्याद वगैरे गुंडाळून ठेवत दोघांनी लग्न करायचं ठरवलं .
असं म्हणायचं कारण असं की प्रतापराव विवाहीत होते. चार अपत्यांचे वडील होते आणि संस्थानाच्या नियमाप्रमाणे दुसरा विवाह करण्याची अनुमती त्यांना नव्हती.
सितादेवी विवाहीत होत्या.आणि त्यांचा जमीनदार पती घटस्फोट देण्याची शक्यता नव्हती.
ज्या नियतीने या दोघांना प्रेमात पाडलं त्याच नियतीने पुढचा मार्ग सितादेवींना दाखवला.
सितादेवींनी धर्म बदलला. त्या मुस्लीम झाल्या. घटस्फोट आपोआप झाला.
घटस्फोटानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्विकारला आणि प्रतापरावांशी लग्न केले.
महाराजांच्या धाडशी लग्नाची खबर युरोपात अनेक वृत्तपत्रांची मथळ्याची खबर झाली.
काहींनी सितादेवींना वॅलीस सिंपसन ऑफ द इस्ट* हे टोपणनाव पण दिले.
या विवाहा निमीत्त महाराजांनी सितादेवींना एक हिर्याचा हार भेट दिला. (हा हार पूर्वी तिसर्या नेपोलीयनने सम्राज्ञी युजीनला दिला होता .
भारतात ब्रिटीशांनी महाराजांना कायदेशीर कचाट्यात धरण्याचा प्रयत्न केला. महाराजही तेव्ह्ढेच खमके. (की निगरगट्ट).
त्यांनी युक्तिवाद केला की ते बडोद्याच्या द्विभार्या प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत.
तो कायदा फक्त प्रजेसाठी आहे .राजासाठी नाही.
ब्रिटीशांनी कायदे तज्ञांचा सल्ला घेतला .त्यांनी महाराजांच्या बाजूने निर्वाळा दिला.ब्रिटीशांनी बरीच धूसपूस -त्रागा करून पाहीला .अखेर ब्रिटीशांनी हार मानली पण सितादेवींना महाराणीचा खिताब देण्यास नकार दिला .
माझ्या राणीला खिताब देणारे ब्रिटीश कोण असा पवित्रा घेत महाराजांनी सितादेवींना महाराणी जाहीर केले.
काही वर्षातच सितादेवींनी पहील्या आणि एकुलत्या एक बाळाला जन्म दिला .
त्याचं खरं नाव सयाजीराव पण टोपणनाव प्रिन्सी .
*****
हा काळ साधारण दुसर्या महायुध्दाच्या अखेरीचा होता. युध्द संपले आणि स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले . चतुर आणि चाणाक्ष सितादेवींनी भारत सोडून परदेशी स्थायीक होण्याचा निर्णय घेतला. मोनॅको नावाच्या एका छोट्याशा पण युरोपातल्या अति श्रीमंतांच्या देशात घर घेतले. हळूहळू बरोडा संस्थानाचा खजीना मोनॅकोत पोहचला. आणि या कथेला एक नविन कलाटणी मिळाली .
महाराज आणि सितादेवींमध्ये वितुष्ट आले आणि घटस्फोट झाला.
प्रिन्सीला सोबत घेऊन महाराणी सितादेवी पॅरीसमध्ये स्थायीक झाल्या. पॅरीसच्या अती उच्चभ्रू समाजाच्या वर्तुळात एक नविन आयुष्याची सुरुवात झाली. हातात रत्नजडीत सिगरेट होल्डर धरणारी स्त्री म्हणून त्यांना पॅरीस ओळखायला लागलं .पॅरीसच्या रंगीत सायंकालीन मेजवान्यांना महाराणीसोबत युवराज प्रिन्सी पण जायला लागला.
जेमतेम दहा बारा वर्षाचा युवराज त्याच्याकडे बघणाराला मंत्रमुग्ध करेल असा होता.
अशाच एका संध्याकाळी वॅन क्लीफ अँड कार्पेल या जगप्रसिध्द पेढीवर एका गुलाबी हिर्याच्या प्रदर्शनासाठी खास निमंत्रीत म्हणून सितादेवी आणि राजकुमार प्रिन्सी गेले होते. प्रिन्सी त्या दिवशी इतका देखणा दिसत होता की त्या नविन गुलाबी हिर्याचे नाव देखील प्रिन्सी ठेवलं गेलं .
____________________________________________
वॅन क्लीफ अँड कार्पेलनी हा गुलाबी हिरा सोथेबीज च्या एका लिलावात एक लाख अठ्ठावीस हजार डॉलरकिंमत मोजून घेतला. त्यापूर्वी ह्या हिर्याची मालकी हैद्राबादच्या निजामाकडे होती. आठव्या निजामानी (उस्मान अली खान) आर्थीक अडचणीला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात हा हिरा विकला असावा असे मानले जाते. ह्या हिर्याची खासियत अशी हा गुलाबी झाक असलेला हिरा संपूर्ण शुध्द हिरा आहे. गुलाबी रंग कार्बन ह्या मूलद्रव्यात भेसळ झाल्यामुळे आला नसून अंतर्गत स्फटीकीय संरचनेच्या काही फरकामुळे आला आहे. वजनानी साधारण साडेचौतीस कॅरेटचा हा हिरा कुशन कट आहे. मुळात गुलाबी रंगाचे हिरे दहा हजार हिर्यापाठी एखादा मिळतो .त्यातून प्रिन्सी सारखा भेसळवीरहीत गुलाबी हिरा लाखातच एखादा असतो पण प्रिन्सीच्या वजनाचा आणि घाटाचा दुसरा हिरा मिळणं जवळजवळ अशक्य आहे.
वॅन क्लीफ अँड कार्पेलनी हा हिरा एका पेंडंट बसवून त्याच्या चौफेर अनेक ब्रिलीयंट हिरे जडवले नंतर प्रिन्सी कुठल्यातरी अज्ञात श्रीमंताच्या घरी गेला.
आता त्याचा पत्ता कुणालाच माहीती नाही.
_______________________________________________
सितादेवींचा प्रिन्सी मात्र त्यांनी आपल्या अतिरीक्त लाडानी वाया गेला. एकेकाळचा मोहक राजकुमार अंमली पदार्थ आणि लैंगीक स्वैराचाराच्या नादानी वाहवत गेला. सितादेवींनी त्याला काबूत ठेवू शकल्या नाहीत .आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रिन्सीनी फ्रान्समध्ये स्वतःचा गळा घोटून जीव दिला. या दु:खानी वेड्यापिशा झालेल्या सितादेवीं कोमात गेल्या आणि वर्षभरात त्यांचेही निधन झाले.
तो राजकुमार आणि तो हिरा आता फक्त इतिहासातील एक उदास करणारी नोंद आहे.
प्रतिक्रिया
29 Oct 2010 - 10:23 pm | पिवळा डांबिस
सुरस, अजब आणि चमत्कारिक कथा!!
29 Oct 2010 - 10:26 pm | विसोबा खेचर
पिडाशी सहमत..
रामदास भावजी, आने दो और भी..
तात्या.
30 Oct 2010 - 2:20 am | धनंजय
सुरस, अजब आणि चमत्कारिक कथा!!+!!
30 Oct 2010 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरस, अजब आणि चमत्कारिक कथा!!+!!
-दिलीप बिरुटे
29 Oct 2010 - 10:38 pm | रेवती
अग्ग्ग्ग्ग!
मस्त लेखन!
कथा संपतासंपता लक्षात राहिला तो वाया गेलेला प्रिन्सी!
हे एवढाले खर्च चालवण्यासाठीचे उद्योग करायचे आणि वर ही प्रकरणं करणे लपवणे यासाठी पंचायती करायच्या!
पूर्वीचे हे प्रकार अजूनही चालूच असतात.
कसा वेळ मिळतो लोकांना कुणास ठावूक!
प्रतापसिंह महाराजांचे पुढे काय झाले?
मला तरी हे सगळं अजब वाटतं.
30 Oct 2010 - 11:02 am | रामदास
ते (बहुतेक) १९६८ साली लंडनच्या त्यांच्या निवासस्थानी गेले.
29 Oct 2010 - 10:41 pm | मृत्युन्जय
रामदास काका तुमचे हे २ लेख वाचुन माझी आता हिरे माणके घेण्याची इच्छाच मरुन गेली आहे. हिरे माणके शापितच म्हणायची.
तुमचे दोन्ही लेख मात्र जबरदस्त.
30 Oct 2010 - 6:08 am | सहज
'ब्लड डायमंड' डॉक्युमेंटरी पाहून हिरा घ्यायची इच्छा गेली होती.
भारतातल्या कोणत्या राजघराण्याने आपली संपत्ती, खजिना शाबूत ठेवला प्रसंगी वाढवला ह्याची देखील माहीती येउ द्या!
ट्रिव्हीया - सितादेवींची कथा वाचून कोण म्हणेल "आय टोल्ड यु सो!"?
सहत्सु
30 Oct 2010 - 9:13 pm | रेवती
मृत्युंजयसाहेबांशी समहत!
एकतर अशी रत्नं वगैरे काही आपण रोज घेत नाही.
कधितरी एखादं घेतलं असतं तर आता नकोच वाटतय!
29 Oct 2010 - 10:45 pm | रन्गराव
एवढं प्रभावी लिवल्यावर आता जो कोणी वाचल त्यो हिरा ईकत घ्यायची हिंमत नाय करनार. आन जे जे मिपाकर (संपादक नक्कीच ;) ) हिरे बाळगून हायेत ते पन ईकून टाकत्याल. ह्याजा मागं मला त्या ओबामा(य)चं कारस्थान दिसतय. त्येला भारतात आल्यावर कवडी मोलात हिरा मिळावा म्हणून त्या बेण्यानं काकासनी लेख लिवाया लावून हिर्याचं मार्केट पाडलया ;)
29 Oct 2010 - 11:54 pm | सुनील
छान!
असेच एकेक हिरे खाणीतून काढीत रहा!
30 Oct 2010 - 12:38 am | चिगो
पुढं-मागं बायकोनी हिर्यासाठी भुणभुण पाठी लावली, तर राकांचे लेख दाखवावे म्हणतो. ;-)
अजब हिरे की गजब कहानी !!
आणखी सुरस कथा सांगा हो काका..
30 Oct 2010 - 1:32 am | निल्या१
>>पुढं-मागं बायकोनी हिर्यासाठी भुणभुण पाठी लावली, तर राकांचे लेख दाखवावे म्हणतो
तुम्ही रकांचे लेख दाखवा बायको तुम्हाला रांकाचे दुकान दाखवेल.
30 Oct 2010 - 4:53 pm | चिगो
दुकानं सगळीकडे असत्यात. अशा "चमकदार भयकथा" असत्यात का कुठं, ऑ? ;-)
30 Oct 2010 - 2:05 am | प्राजु
सुरस आणि वेगळीच चम्त्कारीक कथा. येऊद्या अजून.
30 Oct 2010 - 3:10 am | वाटाड्या...
म्हणजे एक नेहेमीप्रमाणेच एक पर्वणी असते.
आता कळ्ळं की एखाद्याला 'हिरा' आहेस असं का म्हणलं जातं...
पिडांकाका म्हणतात त्याप्रमाणे सुरस आणि चमत्कारीक...
बाय द वे काका, लोकप्रभामध्ये तुमचा जे फोटो आलेला आहे तो तुमचाच आहे का?
- ( पेढीवरचा )वाटीशेठ..
30 Oct 2010 - 6:28 pm | रामदास
तो बोधन चित्तन सारखा दिसणारा मीच आहे.
30 Oct 2010 - 6:49 am | मराठमोळा
रामदास काका,
छान कथा. पण वाइट शेवट एवढेच म्हणतो.
30 Oct 2010 - 7:09 am | शिल्पा ब
एकदम फिल्मी वाटावी अशी गोष्ट...म्हणजे भारतातला सगळा माल मोनाकोला गेला...एक कोणता तो राजकुमार वाया गेला तो मरूनच गेला...हाती काय?
बाकी अशा कथा हिर्याभोवतीच का गुंफलेल्या असतात बरं?
30 Oct 2010 - 7:31 am | मदनबाण
सुंदर लेखन... :)
30 Oct 2010 - 7:42 am | चित्रा
रत्ने भल्याभल्यांना वेड लावतात. मला वाटते अॅगाथा ख्रिस्तीच्या काही रहस्यकथांमध्ये हे वेड लावण्याचा भाग आला आहे.
वरचा फोटो सुंदर आहे, लेखाला शोभेसा.
30 Oct 2010 - 8:41 am | प्रियाली
लेख आवडला.
30 Oct 2010 - 9:22 am | डॉ.प्रसाद दाढे
नेहमीप्रमाणेच रामदासकाकांचा हासुद्धा लेख आवडला..स्वामींच्या झोळीत
आणखीन नक्की कुठली अन किती रत्ने आहेत कुणास ठाऊक..?
पुढील रत्नांच्या प्रतिक्षेत..
30 Oct 2010 - 9:47 am | sneharani
काका, मस्त कथा!
अजुन येवुद्यात अशा कथा!
30 Oct 2010 - 10:38 am | प्रसाद_डी
अधिक माहीती येथे वाचावी.
30 Oct 2010 - 11:04 am | इन्द्र्राज पवार
श्री.रामदास यांच्या माहितीपूर्ण लेखात (जो एका ट्रॅजेडीची कहाणी सांगत आहे...) काहीशी भर घालणे [वा दुरुस्ती करणे] आवश्यक आहे.
आम्हा कोल्हापुरकरांना 'महाराजा प्रतापसिंह ऑफ बरोडा' माहिती आहेत ते कोल्हापूरचे "जावई" या नात्याने. इथल्या सरदार मानसिंगराव घोरपडे यांच्या 'शांतादेवी' या कन्येशी १९२९ साली त्यांचा विवाह झाला होता. वर लेखात श्री.रामदास म्हणतात तसे त्यांना चार अपत्ये नसून चक्क आठ (तीन मुले व पाच मुली) अपत्ये झाली. यापैकी ज्येष्ठ चिरंजीव 'फत्तेसिंगराव गायकवाड' पुढे बडोदा संस्थानाचे राजे बनले....खासदार झाले...बडोदा रणजी क्रिकेटचे खेळाडू होते.. इतकेच काय तर 'Board of Cricket Control of India' चे अध्यक्षही झाले होते. दिल्लीतील एलिट वर्तुळात एक मोठे नाव होते ते.
प्रतापसिंहांचे सितादेवींसमवेतच्या दुसर्या विवाहामुळे मानसिक, शारीरिक (आणि आर्थिकही) स्वास्थ पार बिघडून गेले होते. प्रतापसिंह महाराजांचे निधन १९६८ मध्ये झाले.
सितादेवीची Glamorous कहाणी किती विलक्षण आहे हे श्री.रामदास यानी दाखविले आहेच (फार स्वैराचारी जीवन जगल्या त्या...). मोनॅकोच्या राजाने त्याना व प्रिन्सीना आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केले होते. त्या घटस्फोटीत होत्या इतकाच वर उल्लेख आहे...पण त्यांनाही पहिल्या पतीपासून ३ अपत्ये होती. अर्थात प्रिन्सीबाबत त्या हळव्या असणे साहजिकच होते. प्रिन्सीचा अकाली मृत्यू १९८५ मध्ये वरील कारणामुळे झाला...तर खुद्द सितादेवी १९८९ मध्ये कालवश झाल्या.
सध्याच्या पिढीतील बडोदा घराण्याने त्यांची दखल घेतलेली नाही.
इन्द्रा
30 Oct 2010 - 9:46 pm | शिल्पा ब
छान माहीती.
4 Nov 2010 - 3:50 pm | वाहीदा
सितादेवींना असे स्वैराचारी जगून काय मिळाले ??
क्या खोया?? ...क्या पाया ??
रामदास काकांची चमत्कारीक कथा आवडली .
30 Oct 2010 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार
ह्य रामदसकाकांच्या लेखणीतुन हिरेच झरतात :)
इंद्राचा प्रतिसाद माहितीत भर घालणारा.
31 Oct 2010 - 10:03 am | नंदन
सहमत आहे. लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
1 Nov 2010 - 6:31 am | Nile
सहमत.
30 Oct 2010 - 11:24 am | अवलिया
सुरेख माहिती.
30 Oct 2010 - 1:14 pm | श्रावण मोडक
जय जय रघुवीर समर्थ!!!
31 Oct 2010 - 10:06 am | शाहरुख
कुल !
31 Oct 2010 - 9:32 pm | अरुंधती
सुरस कथा!!
31 Oct 2010 - 10:45 pm | संजय अभ्यंकर
सोन्या प्रमाणे हिर्यांच्या किमती सुद्धा वाढतात का?
त्यांचा सुद्धा सट्टा खेळतात का?
1 Nov 2010 - 11:32 am | रामदास
किमती साधारणपणे डॉलरच्या भावावर अवलंबून असतात. कार्टेलींग मजबूत असते. त्यामुळे भाव बर्याच वेळा स्थिर राहतात.
1 Nov 2010 - 4:19 pm | धमाल मुलगा
हिरे आणि शाप ही जोडी असते म्हणता ती गोष्ट खरी की काय असं वाटायला लागलंच पाहिजे असा किस्सा आहे.
रामदासकाका रॉक्स! (ऑन द रॉक्स नव्हे.)
1 Nov 2010 - 5:06 pm | जयंत कुलकर्णी
मस्त ! खरंच मस्त !
1 Nov 2010 - 9:00 pm | घाटावरचे भट
छान!!
2 Nov 2010 - 12:03 am | राजेश घासकडवी
कथा चांगली आहे. पण रामदासांचं नाव वाचलं की शिंपिणीचे घरटे चा मानदंड आपोआप वापरला जातो. तशा भेदक लेखनाच्या तुलनेत ही कथा गुलछबू स्वरूपाची वाटली. आपल्या हातून अधिक सकस, भरभक्कम यावं अशी इच्छा.
2 Nov 2010 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सत्यकथा असली तरीही प्रिन्सीची गोष्ट आवडली नाही. या कारणासाठी हिरा घेऊ नये असं मलातरी काही वाटलं नाही. रामदासकाकांच्या लेखणीत तेवढी ताकद आहे, पण या वेळेस असं नाही वाटलं.
2 Nov 2010 - 12:45 pm | सहज
कथा? ही तर माहीती आहे. रंजक माहीती. रामदास यांना बर्याच जणांनी मौल्यवान दागीने, खडे, भारतीय संस्थाने, राजघराण्यातील मौल्यवान वस्तुंची माहीती इ. बद्दल लिहायचा आग्रह केला होता त्यातील ही माहीती. एक माहीतीपूर्ण लेख. अशी बरीच माहीती इतरत्र शोधली असता मिळेलही.
त्यामुळे हा लेख स्पेशल रामदास ललीतकथा अॅज सच नाही आहे तरी त्याला रामदासांच्या ललीत लेखनाचा दर्जा, मापदंड, अन्य लेखाशी तुलना चुकीची वाटते आहे.
वरच्या लेखात कुठेही हिरा घ्यावा अथवा घेउ नये यावर काही भाष्य असल्याचे मला तरी दिसले नाही.
4 Nov 2010 - 6:46 pm | कवितानागेश
महाराजा सयाजी राव गायकवाड हेच का?
बडोदा विद्यापीठाला कुणाचे नाव आहे?
27 Jan 2021 - 1:54 pm | NAKSHATRA
काका परत एकदा दंडवत घ्या