दर्शने २.
हा तसा किचकट विषय. म्हणून दोन भागात संपवावयाचा विचार होता. पण काही जणांनी विनंती केली म्हणून आजचा भाग.
आज दर्शनांची सर्वसाधारण माहितीच जास्त विस्ताराने देत आहे.
(१) का रचली :
उपनिषदांमध्ये आत्मा, परमात्मा, जगाची उत्पत्ती, चेतना,दृश्य जगाचे खरे स्वरूप काय, इत्यादींच्या विचाराला सुरवात झाली. पण उपनिषदांमध्ये वैयक्तिक अनुभव/साक्षात्कार आहेत. मला काय वाटले/दिसले/सुचले या बद्दल विवेचन आहे. एकच विषय अनेकांनी अनेक दृष्टीने पाहिला व त्यामुळे निरनिराळी मते मांडली. एका विचारसरणीचे एकाच जागी दर्शन व्हावे म्हणून दर्शनांची रचना झाली म्हणावयास हरकत नाही. बहुतेक सर्व दर्शनांची बीजे उपनिषदांमध्ये आढळतात. सिद्धांत उपनिषदकारांनी मांडले व दर्शनकारांनी ते सुसूत्रपणे एकत्र मांडून दर्शने रचली.
(२) इतिहास : चार कालखंड
(अ) वैदिक काल - संहिता ते उपनिषदांपर्यंत. दार्शनिक सिद्धांतांची मूल तत्वे प्रकट झाली. ब्राह्मणे व आरण्यके यात उहापोह झाला.
(आ) वेदोत्तर काल - या कालात चार्वाक, जैन बौद्ध आदी वेदविरोधी दर्शने निर्माण झाली.
(इ) सूत्रकाल - सनपूर्व ४५० ते सन २५०. न्याय, सांख्य, योग, मिमांसा,वैशेषिक इत्यादि दर्शनांच्या मूल सूत्रांची रचना य काळातील
(ई) भाष्यकाल - इ.स. २०० ते १४५०. मूलसूत्रे ही अल्पाक्षर व साररूप असल्याने कळावयास अवघड. शबर, कुमारील, शंकर, वात्स्यायन, रामानुज, वाचस्पती हे या काळातील महान भाष्यकार. त्यांनी या सूत्रांवर भाष्ये, वार्तिके, टीका रचून त्यातील रहस्ये उलगडवून दाखवली.
(३) विकास :
वेदकालापासून " सत्य काय " हे शोधण्याकरिता पज्ञामूलक व तर्कमूलक अशा दोन प्रवृत्ती दिसून येतात. यांच्या संमिलनाचाही विचार झाला.
प्रज्ञामूलकातून अद्वैत सिद्धांताचे वेदांत दर्शन निर्माण झाले तर तर्कमूलकातून प्रकृती-पुरुषांतील द्वैत सांगणारी सांख्य व योग ही दोन दर्शने.
बहुत्ववादी न्याय व वैशेषिक ही दर्शने याच वेळची. काहींनी वेदांशी असलेले नाते तोडून टाकले. स्वतंत्र तर्कबुद्धीचे लोकायत, स्वादवादाचे जैन व शून्यवादाचे बौद्ध या कालातील.
"तत्त्वमसि" हे उपनिषदातील महावाक्य. तत् = ब्रह्म, त्वं = जीव. या दोघांत एकात्म आहे. याचा साक्षात्कार कसा करून घ्यावयाचा हा प्रश्न उभा राहिला. प्रकृती व पुरुष (जीव व भौतिक जग) हे भिन्न गुणधर्माचे आहेत. त्यांचे यथार्थ ज्ञान झाल्यास हे ऐक्य कळेल असे सांख्य दर्शन सांगते. हा साक्षात्कार झाला तरी तो बौद्धिकच. आनुभविक साक्षात्काराची गरज भागवण्याकरिता योगदर्शनाचा जन्म झाला. म्हणजे सांख्य व योग ही एकाच तत्त्वज्ञानाच्या बौद्धिक व आनुभविक अशा दोन बाजू झाल्या.
जीव व जगत या पदार्थांचे गुण आहेत तरी काय ते पहाणे व त्यांची समीक्षा करणारे दर्शन ते वैशेषिक. पण ज्ञानप्राप्तीची साधने,
प्रमाणे, ती नीट पारखून घेतली तरच योग्य ध्येय गाठता येणार. प्रत्यक्ष, अनुमान इ. प्रमाणांची शास्त्रीय चेकित्सा करणारे दर्शन "न्याय".
एक अडचण उभी राहिली. शुष्क तर्काच्या आधाराने साक्षात्कार होत नाही असे लक्षात आले. श्रुतींकडे वळून, तेथील कर्मकांडाच्या शोधाने हाती काय लागते ते पहाण्याचा प्रयत्न करणारे ते " मिमांसा." पण विचारवंतांना ही कर्मकांडे " फुटक्या नौका " वाटावयास लागल्या. मग पैलतीर गाठावयास केवळ ज्ञानाचीच कांस धरावयाची या धृढ निश्चयातून निर्माण झाले " वेदान्तदर्शन "
(वरील विकासक्रम पं.बलदेव उपाध्याय यांनी तर्ककल्पनेने मांडला आहे, इतिहासाच्या आधारे नव्हे.)
बौद्ध व जैन दर्शने वेदप्रामाण्य मानत नाहीत पण म्हणून त्यांच्यावर उपनिषदांचा प्रभाव नाही असे म्हणणे अनुचित ठरेल. बुद्धाला कर्मकांड नको होते पण कोरड्या ज्ञानाने मुक्ती लाभणार नाही हे जाणून त्याने " आचारमार्गावर " जोर दिला. जैन दर्शनाचा आचारावर जोर आहेच. शिवाय सम्यक ज्ञानाकरिता नय व स्याद् वाद यांचे अवलंबन करावयास पाहिजे असा आग्रह.
वरील आस्तिक-नास्तिक दर्शनांशिवाय निगमावर(तंत्रावर) बेतलेली दर्शने आगमा (वेदा)बाहेरची असल्याने त्यांना नास्तिक म्हणावयास पाहिजे पण ते कर्म, परलोक, वगैरे अनेक गोष्टी मानत असल्याने त्यांना आस्तिक म्हणावयास हरकत नाही. लेबल सोडून द्या. शैव (अनेक)
पांचरात्र हे वैष्णव दर्शन या प्रमाणातील प्रमुख.
ही दर्शने एकमेकांवर तुटून पडतात. पण त्यांमधील मतभेद मानले तरी ती एकमेकांना मारक नसून पूरकच आहेत असे वाटते.
(आजचा डोस जरा जास्त आहे, मान्य. पुढील भागात दोन-तीन दर्शनांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.Thank you कोण म्हणाले ?)
शरद
प्रतिक्रिया
25 Oct 2010 - 7:23 pm | स्वाती२
वाचतेय!
25 Oct 2010 - 11:15 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय स्त्युत्य उपक्रम. शुभकामना.
(विद्याभिलाषी) इंट्या.
25 Oct 2010 - 11:22 pm | विजुभाऊ
दर्शन म्हणजे आचरण या अर्थाने तुम्ही दर्शने लीहिताय का?
एकूणातच काहिही कळाले नाही.
या दर्शनांचा उपयोग काय?
बुद्धाने जे साम्गितले त्याला पाखंड म्हणतात तरिही बुद्धाला अवतार का मानतात?
26 Oct 2010 - 12:13 am | चित्रा
दर्शन म्हणजे आचरण या अर्थाने तुम्ही दर्शने लीहिताय का? एकूणातच काहिही कळाले नाही.
असे विजुभाऊ यांना कशावरून वाटले कळले नाही. शरद यांचे लेख ओळीने वाचावेत म्हणजे अर्थ लागेल.
http://www.misalpav.com/node/15041
'या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे एका सामान्य व्युहात गुंफता येणे शक्य आहे का, याचा शोध घेतांना , मूलभूत तत्वांचा, विशेषत: आत्मतत्वाचा, विचार जात येतो त्याला म्हणावयाचे दर्शन. तत्वज्ञान. साध्या मराठीत फिलॉसॉफी. " (इति शरद)
वरील लेखातही बुद्धाचेही दर्शन म्हणूनच लिहीलेले दिसते आहे. "आ) वेदोत्तर काल - या कालात चार्वाक, जैन बौद्ध आदी वेदविरोधी दर्शने निर्माण झाली."
बुद्धाने जे साम्गितले त्याला पाखंड म्हणतात तरिही बुद्धाला अवतार का मानतात?
हा जर मूळ विचारण्याचा प्रश्न असला, तर त्यावर वेगळा लेख लिहावा, अशी विजुभाऊ यांना विनंती.
येथे दर्शनांमध्ये भारतीय दर्शने आहेत असे दिसते आहे. बौद्ध दर्शन भारतीय आहे याबद्दल तरी शंका नसावी. :)
26 Oct 2010 - 10:15 pm | विसोबा खेचर
लै भारी लेख..! :)
शरदराव, असेच नेहमी छान लिहिते राहा ही विनंती. आपल्या लेख घटकाभर छान करमणूक करतात.. :)
तात्या.
--
दर्शनांची वाटून घोटून केली चांगली गोळी आणि मग बं भोले..! :)
-- काकाजी अभ्यंकर, देवास.
"न पेलणार्या गोळ्या घेऊ नयेत रे श्याम. मग त्या अध्यात्माच्या असोत वा भांगेच्या!" :)
-- काकाजी देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.
27 Oct 2010 - 1:10 am | धनंजय
वाचतो आहे.
उदाहरणे द्याल काय? थोडासा निर्देश केला (फार तपशील नसले तरी चालेल), तर मुळात वाचायला सोयीचे होईल. "भाववृत्त" देवता असलेली थोडीशी सूक्ते सोडली तर संहितेतले उल्लेख मला माहीत नाहीत. ब्राह्मणांबद्दल/ब्राह्मणांचे माझे वाचन फारच थोडे असल्यामुळे त्यांतील दर्शनांबद्दल ऊहापोह कुठलाच माहीत नाही.
27 Oct 2010 - 11:57 am | शरद
वळचणीचें पाणी आढ्या गेलें
दर्शने या विषयावर लिहतांना मी प्रथमच कबूली दिली होती की या विषयाचा माझा अभ्यास नाही. चार पुस्तके वाचतांना जे समोर येते त्यातील काही आपल्या मित्रांनाही थोडक्यात सांगावे असे वाटते तेव्हा असे लिखाण होते. अशी कबूली देतांना संकोच वाटत नाही कारण याचा अभ्यास करावयास एक आयुष्य पुरे नाही. मग लिहूच नये का ? तसेही वाटत नाही. ज्ञानसूर्याचा अभ्यास शक्य नसेल तर मित्रांना कवडसा दाखवावयास काय हरकत आहे ? म्हणूनच त्याच वेळी ठरवले की प्रतिसाद नाही, प्रश्नांची उत्तरे देणे आपणास जमणार नाही. पण तरीही काही साध्या शंका असतील तर ? त्याचे उत्तर हाताशी होते. श्री. धनंजय.( यांना विनंती केली म्हणून त्यांनी "नासदीय सूक्तावर " लिहले होते.) इथेही काही शंका असतील तर त्यांना विचारा असे स्पष्ट केले होते. आता श्री. धनंजय यांनीच प्रश्न विचारल्यावर काय करावयाचे ? असो
पुस्तकातले वाक्य असे " (संहितेत) दार्शनिक सिद्धांतांची मूल तत्त्वे प्रकट झाली. ब्राह्मणे व आरण्यके यात त्यांचा उहापोह झाला. " जरा बिचकलो कारण ब्राह्मणे यज्ञातील कर्मकांडांचा विचार करतात असे आठवत होते. त्यामुळे "आरण्यके " बद्दल बघितले . तेथील उद्धरण असे :
"आरण्यकांचा विषय यज्ञ हा नसून, यज्ञांतर्गत आध्यात्मिक तत्त्वांची मीमांसा हा आहे; यज्ञीय अनुष्ठान हा नसून, तदंतर्गत दार्शनिक विचार हा आहे. सर्व आरण्यके ही ब्राह्मण ग्रंथांची अखेरची प्रकरणे आहेत." मला हे पुरेसे वाटले. श्री.धनंजय यांनी मला काही माहिती विचारणे याला म्हणतात "वळचणीचें पाणी आढ्या गेलें !" काय म्या पामरे बोलावी उत्तरे ..
शरद
27 Oct 2010 - 10:17 pm | धनंजय
आरण्यकांचा अवयव असलेली उपनिषदे आहेत खरी.
ऐतरेय आरण्यकातील काही अध्यायांना ऐतरेय उपनिषद् म्हणतात.