मित्रमंडळी चला परत शाळॆत जाऊ. तुम्हाला आठवतात तुम्ही लिहिलेले निबंध.
काय ते विषय असायचे, एका पेक्षा एक. " माझा आवडता नेता ", " मला पंख असते तर " मी तर असे विषय पाहुनच घाबरुन जायचो. पेपर मधला निबंधाचा पहिला प्रश्न हा माझ्यासाठी नसायचाच. पण तरी कधी कधी एखादा लिहायचो. तसाच तुम्ही सुद्धा लिहित असालच आता परत ते दिवस आठवून निबंध लिहु या. कदाचित तेव्हा नाही जमल ते आता जमेल.
मीच सुरुवात करतो.
मला नुकताच माझा शाळॆत लिहिलेला एक निबंध मिळाला. तोच इथे लिहितोय.
विषय : माझा आवडता पक्षी / प्राणी.
कुमार
नुकतच मला कोणीतरी विचारल की तुझा आवड्ता पक्षी कोणता मी म्हणालो, "माझा आवड्ता पक्षी कावळा". ऎकणार्याच तोंड जरा वेडवाकड झाल.
तुम्हाला सुद्धा विचित्रच वाटत न !
या कावळ्याची व माझी गट्टी झाली तीच मुळी "एक घास काऊचा, एक घास चिऊचा" पासुन.
"कावळ्याच घरट शेणाच व चिमणीच मेणाच" या गोष्टीत, घर वाहुन गेलेल्या त्या कावळ्याला ती चिमणी किती त्रास देते. बिचारा कावळा, मला त्या लबाड चिमणीच केलेल कौतुक कधीच आवडत नव्हत.
त्या चिमणीचा मला फ़ार राग यायचा.
किती बिचार्या ह्या प्राण्यावर माणसानीसुद्धा अन्याय केलाय. त्याला पार खालच स्थान दिलय.
कावळा म्हणे "मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे
वाहवा तयाची करीती, मजला ते धिक्कारिती लोक हे !"
पहा त्याचा काळा रंग हे एकमेव कारण. त्या लबाड बगळ्याला सुद्धा वरच स्थान.
कोणत्याही पक्षानी कपड्यावर घाण केली की लगेच आपण म्हणतो, कावळ्यानी घाण केली. का ? बाकी पक्षी घाण करतच नाहीत का ?
खर तर किती चांगला आहे हा, त्याला तुम्ही काही खायला द्या. तो कधीच एकटा खाणार नाही. काव काव करेल चार मित्रांना बोलावेल व सर्व मिळुन, जे असेल ते, असेल तेव्हढ खातील. हा गुण खर तर माणासानी शिकायला हवा. पंचतंत्रात विष्णुशर्माला सर्व प्राणी पक्षांचे गुण-अवगुण दिसले. पण कावळ्याचा हा गुण त्याला दिसला नाही.
या सर्वाच उट्ट कावळा काढतो ते त्याला पितरांच स्थान दिल जात तेव्हा. तेराव्याला पहा, नेहेमी काव काव करुन सर्व कावळ्यांना जमा करणारा हाच कावळा, कुठे तरी झाडाच्या वरच्या फ़ांदीवर बसलेला असतो व एका डोळ्यानी बघत असतो. कितीही विनवण्या केल्या तरी तो नाहीच बधत. लोकं बिचारे काव काव ओरडातात, काय काय अमिष दाखवत असतात पण जेव्हा त्याला वाटॆल तेव्हाच तो येतो.
लहानपणी पाहिलेले कावळे आठवत नाहीत पण मला आठवतोय ते माझ्या बागेत येणारे कावळे.
मी त्या कावळ्यांना मस्त नाव सुद्धा दिलेली होती. कुमार नावाचा कावळा तर माझा फ़ारच लाडका. आता हे नका विचारु की मला अनेक कावळ्यांमधुन माझा कुमार कसा ओळखु यायचा ते.
कुमार त्याच्या मैत्रीणीबरोबर असायचा व मला खिडकीतुन पाहुन मान वाकडी करायचा व त्याच्या एका डोळ्यानॊ हसायचा. हो हो हसायचाच तो.
आणि हो मला आठवतय तेव्हढे दिवसात त्यानी त्याची मैत्रीण पण बदललेली नव्हती. गॅलरीत मी त्याला खायला द्यायचो. मग तो त्याच्या सर्व कुटुंबाला, त्याच्या मित्रांना बोलवायचा व मी दिलेल साफ़ सुफ़ करायचा. मजा म्हणजे मेलेला उंदिर, कोणतीही घाण खाणार्या या पक्षानी कधीच अशी घाण माझ्या गॅलरीत आणली नाही.
कावळा हा चिमण्या व कबुतरांसारखा कधीही घरात येत नाही. त्याला आपली मर्यादा कळ्ते.
एकदा मी माझ्य़ा खोलीत होतो, कुमार व त्याची मैत्रीण खिडकीत येऊन जोर जोरात ओरडत होती. मी जाऊन बघीतल तर त्यांच्या बरोबर त्यांच एक छोट पिल्लु होत. मला दाखवाण्यासाठी त्यांनी ते आणलेल होत. माझ्या आदिवासी मित्रांमुळे पक्षांची भाषा थोडि थोडी मला समजत होती. त्यांच्या ओरडण्याच्या टोनवरुन त्यांना झालेला आनंद कळत होता. मी लगेच दोन बिस्किटाचे तुकडे गॅलरीत टाकले. त्या पिल्लानी माझ्याकडे बघीतल त्याला बहुतेक आई-बाबा सांगत असतील. "हा आपला मित्र बर का "
एकदा शाळॆत इतिहासाचा कंटाळवाणा तास चालु असताना, मला खिडकितुन झाडावर बसलेला कुमार दिसला. त्याच्या मैत्रीणी बरोबर बसुन मस्त चोचीनी पंख साफ़ करत होता. त्याला मी दिसलो, त्याची व माझी नजरा नजर झाली, आणि त्याच्या नजरेत असा काही आनंद दिसला की बस. त्यानी काव काव करुन त्याचे मित्र बोलावले. आणि वर्गाच्या खिडकीत सर्व जमा झाले. मी बाईंच लक्ष नाही अस पाहुन हळुच माझा डबा उघडला आणि चपातीचे तुकडे करुन खिडकीच्या कठड्यावर टाकले. सर्व कावळ्यांनी काव काव करायला सुरवात केली. माझ्यासारख्या कंटाळलेल्या बाकी मुलांनी लगेच डबे उघडले व कावळ्यांना खायला घालायला सुरवात केली. कंटाळवाण्या इतिहासापेक्षा कावळ्यांच काव काव ओरडण किती छान वाटल. आवाज इतका झाला की बाईंना शिकणच जमे ना. अशी मस्त मजा आली.
पण या पक्षाला भावना आहेत हे मात्र मला फ़ार उशीरा समजल.
माझे वडिल ज्यादिवशी गेले, त्या दिवशी स्मशानातुन यायलाच खुप उशिर झाला होता, रात्री खुप वेळ झोपच लागत नव्हती. सकाळी मी एकटाच गॅलरीत उभा होतो. चिमण्या मी खायला दिलेल खात होत्या. शेजारी TV चालु झाला होता. मला बाबांची खुप आठवण येत होती. आणि तेव्हढ्यात कुमार झाडावरुन उडत आला आणि माझ्याजवळ गॅलरीत येउन कठड्यावर बसला. त्यानी माझ्याकडे पाहिल. त्याच्या नजरेतसुद्धा दुःख होत. आज नेहेमीसारखा तो काव काव करत नव्हता. तो कठड्यावरच माझ्याजवळ सरकला. पण परत आपली मर्यादा संभाळुनच. माझ्या नकळातच माझ्या डोळात पाणी आल. तो मुका पक्षी माझ मुक सांत्वन करत होता.
स्मशानात माझ अनेकांनी कोरड सांत्वन केल होत, त्यापेक्षा हे मुक सांत्वन माझ्या मनाला स्पर्ष करुन गेल.
प्रतिक्रिया
16 Oct 2010 - 8:05 pm | प्रीत-मोहर
कितवितला निबंध आहे हा?
(कितवीतलाही असो ...माझ्या निबंधापेक्षा १००००पट चांगला आहे......निबंधाच नी माझ कायमच वाकड......म्हणुनच संस्कृत विषय घेतला तिसर्या भाषेला......५ ओळींचे निबंध लिहुन ५ मार्क घ्यायचे.....हॅहॅहॅ)
17 Oct 2010 - 6:09 am | गणपा
खरच कावळा म्हणजे एक दुर्लक्षीत पक्षी. एका भाईकाका सोडले तर त्यानंतर तुम्हीच दुसरे ज्यांनी कावळ्या बद्दल आपुलकीने लिहिलयत.
तसा या कावळ्या बद्दल मलाही काही राग लोभ नाही. इतर सर्वांप्रमाणेच हा काऊ माझ्या लहानपणीचा जेवतानाचा सवंगडी. आई कडेवर घेउन भरवताना एखादा घास त्याच्या साठी काढुन ठेवायची मग त्याचं निरिक्षण करता करता माझा कार्यक्रम झटपट आवरत असे.
५वी ६वीत असताना आमच्या घरामागे एक आंब्याच झाड होतं. आम्ही पहिल्या माळ्यावर राहायचो. ते झाड इतक जवळ होत की त्याच्या फांद्या आमच्या गॅलरी जवळ यायच्या. त्या झाडावर एका कावळ्याच्या जोडप्याने घरटं बांधल होत. म्हणजे त्यांनी अगदी पहिली काडी आणण्या पासुनचा मी साक्षी होतो. गंमत वाटायची. घरचे त्यांना नेहमी चपातीचा एखादा तुकडा वा अजुन असच काहीस देत असत.
घरट बांधुन झाल्यावर त्यांनी त्यांच्या संसाराला सुरवात केली. २-३ अंडी दिसल्यावर खात्रीच झाली ;)
मी बरेच वेळ त्या कावळ्याच निरिक्षण करत असे. अंड्यातुन पिल्ल बाहेर आल्यावर त्या कावळ्याने कौतुकाने त्या अंड्यांची कवच आमच्या कुंड्यांमध्ये आणुन ठेवली होती.
एक दिवस माझ्यात कली शिरला. तसा मी प्राण्यांना जास्त त्रास देणारा कार्टा नव्हतो. (३री-४थीत असताना प्रयोग म्हणुन एक कोळी आणी एक माशी मी माझ्या पाटी पुसायच्या स्पंजच्या डबीत एकत्र कोंडले होते. दोघांना एकत्र आणुन एक नवी संकरीत जात तयार करणे एवढाच माझा शुद्ध हेतु होता. माझ्या दीदीने ते पाहील आणि माझ्या विकृतपणा बद्दल माझा लंबकर्ण केला. खर सांगायची सोय नव्हती, त्यामुळे गुपचुप दोघांना सोडुन दिल. ) असो कंस लांबला.
तर काय सांगत होतो की मी तसा प्राण्या पक्षांच्या वाटेला न जाणारा. ते बरे आणि मी बरा. पण एके दिवशी माझ्यात कली संचारला. मी कागदाच विमान केल आणि त्या कावळ्याच्या घरट्याच्या दिशेन ते सोडल. आता कुठल्या पालकाला आपल्या पाल्याच्या जिवावर आलेला प्रसंग आवडेल. कावळ्याने जोरा जोरात फांदीवर चोच आपटुन निषेध केला. मला त्याची गंमत वाटली. मग मी दिवसातुन एखादा कागदी विमान करुन फेकत असे. कावळ्याने रागावुन आमच्या घरी(गॅलरीत) येण सोडल. दिलेल्या भाकर तुकड्याला तो तोंडलावत नसे.
पण माझी कलीगिरी संपली नव्हती. एक दिवशी काय डोक्यात आल माहीत नाही कागदाच रॉकेट केल आणि त्याच्या शेपटाला आग लावुन भिरकावणार तोच पर माझा कर्ण लंब झाला. यावेळी दीदीने प्रकरण हायकोर्टात नेल. पुढे काय झाल ते गुपीत आहे.
पण त्या दिवसानंतर कली पण पळाला.
16 Oct 2010 - 10:04 pm | पाषाणभेद
शालेय विद्यार्थ्याचा निबंध वाटत नाही. त्याने लिहीलेलाच असेल तर तो त्याने आधी कोठेतरी वाचला असला पाहिजे. या शक्यता खर्या नसतील तर त्या विद्यार्थ्याच्या बुद्धीला माझा प्रणाम.
17 Oct 2010 - 10:24 am | निरंजन
हा शाळेतल्या मुलानीच लिहिलेला निबंध त्याला डागडुजीकरुन ब्लॉगवर टाकला होता. मुळ निबंध व हा यात बराच फ़रक आहे.
16 Oct 2010 - 10:15 pm | पैसा
कावळा खूप हुषार असतो. मुख्य म्हणजे कावळे कबुतरांसारखे घराच्या बाल्कनीत आणि खिडक्यांवर घाण करून ठेवत नाहीत.
16 Oct 2010 - 10:31 pm | रन्गराव
तुम्ही हा लेख जरा दहा बारा दिवस आधी टाकायला हवा होता. मिपावर कावळ्यांचा भाव एवढा वर गेला होता सांगतो तुम्हाला, कावळेही तेवढ्या वर उडाले नसतील कधीही ;) असो बेटर लक नेक्स्ट टाईम!
17 Oct 2010 - 12:45 am | चिगो
"....३री-४थीत असताना एक प्रयोग म्हणुन एक कोळी आणी एक माशी मी माझ्या पाटी पुसायच्या स्पंजच्या डबीत एकत्र कोंडले होते. दोघांना एकत्र आणुन एक नवी संकरीत जात तयार करणे एवढाच माझा शुद्ध हेतु होता...."
स्साला, एक जबराट प्रयोग होता होता राहीला राव ! म्हणजे त्या संकरीत प्राण्याकडून स्वतःला चावून (का चाववून ?) घेउन तुम्ही अगदी Spider-man + The Fly असे "डबल-संकरीत सुपर हिरो" झाले असता की !! कमीत कमी त्या नव-संकरीत प्राण्याची एखादी फर्मास पाकृ तरी दिलीच असती तुम्ही आम्हाला.. छ्या, राहुनच गेलं साला सगळं आता.. ;-)
(कृ. ह. घ्या.)
17 Oct 2010 - 5:53 am | शुचि
सर्व पक्षात भावपूर्ण चेहरा कावळ्याचा असतो. नीट पहाल तर खूप भाव दिसतात.
17 Oct 2010 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>सर्व पक्षात भावपूर्ण चेहरा कावळ्याचा असतो. नीट पहाल तर खूप भाव दिसतात.
च्यायला, इतक्या बारीक नजरेने कावळ्याला कधी पाहिले नाही.
माहितीबद्दल आभारी.....!
-दिलीप बिरुटे
17 Oct 2010 - 12:36 pm | Pain
आवरा :D
19 Oct 2010 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार
ओह्ह ! तरीच माझ्या कॅफेत येणार्या मुली माझ्याकडे बघुन 'कसा कावळ्यासारखा बघतोय बघ' असे म्हणत असतात.
भावपूर्ण चेहर्याचा
परावळा
19 Oct 2010 - 7:22 pm | पैसा
"पराचा कावळा झाला!"
17 Oct 2010 - 6:33 am | मराठमोळा
मस्तच लेख!!
माझ्य ओळखीत एक दहा वर्षाचा मुलगा आहे, त्याला पक्षांच फार वेड.
भारद्वाज पक्षी आजकाल बघायला सुद्धा मिळत नाही, याच्या गॅलरीमधे भारद्वाज पक्ष्याची जोडी यायची. हा त्यांच्याशी काय गप्पा मारायचा देव जाणे, पण बरेचशे दुर्मीळ पक्षीही याचे मित्र. इतक्या लहनग्या वयात याने पक्षांचा अभ्यास सुरु केला आणि बरीचशी माहिती मिळवली सुद्धा.
माझ्या घरी सुद्धा ठराविक महिन्यानंतर झुंबरावर बुलबुल पक्षी घर करायचे, कितीतरी पिढ्या याच झुंबरावर जन्माला आल्या, वाढल्या. बुलबुल आई पक्षी संध्याकाळ झाल्यावर पिलांना पंखाखाली घेऊन झोपी जायची, फार छान वाटायचं पाहुन, आई-वडील बुलबुल पक्षी दिवसभर अन्न शोधुन आणाय्चे आणि पिलांना खायला घालायचे, मग पिलं मोठी झाली की त्यांना खिडकीतुन बोलवायचे, ही पिल्लं मग ऊडायला शिकायची, मग खिडकीतुन दुसर्या भिंतीवर.. असं करत करत, ही पिल्लं आपापलं जग शोधायला निघुन जायची. मग काही महिन्यांनी पुन्हा हीच मोठी झालेली पिल्ले आपल्या जोडीदाराबरोबर हजर व्हायची. :)
17 Oct 2010 - 10:26 am | निरंजन
माफ करा हा टोपिक चालू केला. मी नविन सभासद आहे. त्यामुळे चुक़ झाली.
17 Oct 2010 - 11:35 am | पिवळा डांबिस
मनावर घेऊ नका!!
17 Oct 2010 - 12:30 pm | प्रदीप
माफी अजिबात मागू नका. येथे काहीही लिहीले की बरीवाईट टिका होणारच.
तुमचा हा लेख मलातरी 'किशोरकुंज' सदरातला वाटला नाही.
17 Oct 2010 - 5:10 pm | विकास
हा नक्की आपलाच निबंध आहे का जालावरून इतर कुणाचा आहे? कृपया स्पष्ट करावेत.
धन्यवाद.
17 Oct 2010 - 5:15 pm | निरंजन
हा माझाच आहे. चोरी करण्याइतका हा निबंध चांगला नाही....
17 Oct 2010 - 7:37 pm | चित्रा
प्रश्नाचे मनावर घेऊ नका. हल्ली ब्लॉगवर लिहीलेले अनेक लोक उचलताना दिसतात, म्हणून तोच निबंध बाहेर दिसला तर असा प्रश्न विचारला जातो.
लेख चांगला आहे, आवडला. आमच्या घरी लहानपणी मला अभ्यास करताना खिडकीतून कावळे बघण्याचा छंद जडला होता. त्या आठवणी आल्या.
18 Oct 2010 - 9:59 am | विकास
तो ब्लॉग आपलाच आहे ह्या खुलाशाबद्दल धन्यवाद.
कधी कधी ढकलपत्रे तर कधी कधी ब्लॉगबरून उचललेले दिसते म्हणून धोरणात बसणारे आहे ना याची खात्री करून घ्यावी लागते.
18 Oct 2010 - 10:33 am | निरंजन
आपण विचारलत, काहीच हारकत नाही.
18 Oct 2010 - 11:32 am | अवलिया
अरेच्या ! माझा प्रतिसाद उडाला वाटतं
हरकत नाही
चांगले लेखन ! असेच लिहित रहा !!
मजकूर संपादीत
18 Oct 2010 - 9:21 pm | गणेशा
निबंध खुपच जबरदस्त आहे .
लिहित रहा .. वाचत आहे ..
19 Oct 2010 - 9:35 am | स्पंदना
अतिशय टची निबंध!!
अन एक उल्लेख करावासा वाटला म्हणुन करते, ज्याचा गाभा (पिंड) लेखकाचा आहे त्याला त्यच्य वयानुसार लिहिण्याची अट कधीच लागु होत नाही. लहाण वयातही तो त्याच्या वयापेक्षा चांगलच लिहिणार.
19 Oct 2010 - 11:25 am | अविनाशकुलकर्णी
काव काव