घाल घाल पिंगा वा-या - कमलाकर भागवतांना विनम्र आदरांजली..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
27 Sep 2010 - 9:36 pm

मी प्रभादेवी येथील जी एम ब्रेवरीज मध्ये नौकरीला असतानाची गोष्ट..

सर जिमि विल्यम आल्मेडा हे आमच्या कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक.. तिथे त्यांना भेटायला नेहमी एक वयस्कर गृहस्थ यायचे.. त्यांचं नाव कमलाकर भागवत. ते जिमीसाहेबांचे दोस्त. मी एकदा काही कामानिमित्त जिमी साहेबांच्या केबीन मध्ये गेलेला असताना तिथे भागवत साहेब बसलेले होते.

"हा आमचा अभ्यंकर..गाण्यातला दर्दी आहे पण त्यामुळेच काही वेळा कामात चुकतो..!" जिमीसाहेबांनी मिश्किलतेने भागवतसाहेबांशी ओळख करून दिली..त्यानंतर जेव्हा जेव्हा भागवतसाहेब कार्यालयात यायचे तेव्हा प्रथम माझ्याशी गप्पा मारायचे..

"काय, अलिकडे कुणाची मैफल ऐकलीस?"

आम्ही गाण्यावर अगदी मनमुराद बोलायचो..सवडीने केव्हातरी नक्की त्यांच्याचवर एखादा लेख लिहायचा विचार आहे.. पण तूर्तास मूड नाही आणि वेळही नाही..

संगीतकार कमलाकर भागवत. माझ्या गणगोतातलेच एक. अलिकडेच वारले. तूर्तास त्यांचं व्यक्तिचित्र रंगवणे पेन्डिंग ठेवतो..

काही महिन्यापूर्वी त्यांच्याच एका अप्रतिम गाण्याचं मी मिपावर मुखपृष्ठ लिहिलं होतं. ते इथं पुन्हा देतो आणि त्यांना विनम्र आदरांजली वाहतो..

(भागवतसाहेबांचा लाडका) तात्या.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घाल घाल पिंगा.. (येथे ऐका)

सुमन कल्याणपुरांचा अत्यंत सुरेल, थेट काळजाला भिडणारा आवाज

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात..

भादव्यातच जेमतेम वर्ष झालेल्या सासरी सखा तरी कोण मिळणार? त्यामुळे वार्‍यालाच सखा मानलं आहे आणि त्याच्याशी संवाद साधला आहे..

'सुखी आहे पोर' सांग आईच्या कानात..

अतिशय म्हणजे अतिशय हळवी ओळ! इतका सुंदर रिषभ आणि गंधार फार क्वचितच पाहायला मिळतो. 'रे सख्या वार्‍या, माझ्या माहेरी गेलास तर घरात इतर काही मंडळी असतील, वडीलधारी मंडळीही असतील.. त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.. तसाच थेट माजघरात जा. तिथं माझी आई असेल.. माझं इकडचं सुख हळूच, हलकेच तिच्या कानात सांग.. खूप सुखावेल रे ती..! लगेच तुला खरवस किंवा बेसनाचा लाडू खायला देईल! खूप छान करते रे माझी आई बेसनाचे लाडू!

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?

धाकटा दीर असावा तसा संवाद आहे हा वार्‍याशी.. 'अरे माझं माहेरही खूप समृद्ध आहे रे.. तेथल्या परसातला पारिजातक मी इथं बसून पाहते आहे.. मला हवी आहेत रे ती सारी फुलं!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

इथे शब्द संपतात..!

मराठी भावसंगीतातलं एक अतिशय सुरेख गाणं..नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचं यापरीस हळवं मनोगत ते कोणतं?!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतप्रतिभा

प्रतिक्रिया

>> धाकटा दीर असावा तसा संवाद आहे हा वार्‍याशी.. 'अरे माझं माहेरही खूप समृद्ध आहे रे.. तेथल्या परसातला पारिजातक मी इथं बसून पाहते आहे.. मला हवी आहेत रे ती सारी फुलं! >>

तात्या फारच सुंदर हो!
अमृताची शिंपण असतात तुमचे लेख म्हणजे. इतके कोमल, भावस्पर्शी असतात ना.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

27 Sep 2010 - 10:03 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

...मला आठवतं...माझी आइ गायची मी लहान असताना...
आणि तिच्या डोळ्यात का पाणी यायच ते मला अत्ता कळ्तय...
अगदी असंच माहेर मलाही लाभलय्...अगदी कपिलेपासून ...पारिजातकापर्यंत!
..... आणि त्यात्ली शेवटची ओळ्...अशी आहे,,
...फिरुन फिरुन सय येई...जीव वेडा होतो
चंद्रकलेचा गं शेव ओला चिंब होतो.....
मी अजुन ही बर्‍याचदा गाते.....आणी प्रत्येक वेळी गाताना कंठ दाटून येतोच येतो!

खरच हो जाई....
माझे आवड्ते एक अतिशय सुन्दर गीत...

मनाला स्पर्श करणारे ....

पारुबाई's picture

27 Sep 2010 - 10:29 pm | पारुबाई

नितांत सुदर गाणे

मन कधी माहेरी जावून पोचले कळलेच नाही.

निवेदिता-ताई's picture

27 Sep 2010 - 10:33 pm | निवेदिता-ताई

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

मन एकदम हळव झाल हो, माझ्यावर माझ्या मायची खुप दाट माया होती हो.........
कंठ दाटून आला.

मस्त कलंदर's picture

27 Sep 2010 - 10:48 pm | मस्त कलंदर

लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती, की काहीतरी होतं आणि वार्‍याच्या अंगाला खाज सुटते.. मग तो वारा वेळूच्या बनात जाऊन अंगाची खाज शमवतो. त्या गोष्टीच्या शेवटी असा धूसर दिसणारा वारा, वेळूचं बन असलेलं चित्र होतं नि भरीस भर म्हणजे त्या धूसर आकाराला चेहरा ही होता.. मग मी आईकडे तसा दिसणारा वारा दाखव असा हट्ट धरला होता!!!! आधी रूसणं, मग फुगणं मग आईचा थोडाफार रॅंडमायझेशन अल्गोरिदम प्रयोग.... सगळं सगळं झालं.. तेव्हा आईने हे 'घाल घाल पिंगा वार्‍या...' शिकवले होतं.
आमच्या घराला अंगण होतं पण परसदार नव्हतं. घरी फुलांचं झाडही नव्हतं. मग बिचारा वारा येणार कसा? आणि तो आला नाही तर माझी आई मला तो दाखवणार कसा? माझं तेव्हढ्यापुरतं समाधान झालं. पण त्यानंतर जेव्हा आम्ही आजोळी गेलो, तेव्हा कुणालाही न भेटता अस्मादिक सरळ परसात!!! तिथे जास्वंदीचं आणी विलायती चिंचांचं झाड होतं. तिथं जाऊन मी बराच वेळ वारा कधी तिथे पिंगा घालायला येतो याची वाट बघत बसले होते. :(

अतिशय सुन्दर गाण्...काही काही कविता इतक्या लहाणपणी शिकवुन खरच वाया जातात्...जशी ही घाल घाल पिंगा वार्‍या...किंवा 'सायंकाळची शोभा' .
हे गाण तर अप्रतिम चालीच, अलवार पदर उघडणार, म्हणता म्हणता कंठ दाटवणार्..काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार, हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार्..तर एका लेकराच आई वरच लडीवाळ प्रेम दाखवुन जात.

तात्या तुमच रसग्रहण तर खासच! __/\__

चिगो's picture

28 Sep 2010 - 10:47 am | चिगो

मी हे गाणं आज पहील्यांदा ऐकतोय. मन दाटून आले. कदाचित लहानपणापासून घरापासुन दुर राहावे लागल्याने असेन (शिक्षण, नोकरी), पण गाणं एकदम मनाला भिडलं. आणि माझ्या "माहेरी" पारीजातक, गाय सगळं आहे म्हणून जास्तच आवडलं.. बाकी तात्यांचं लेखन म्हणजे मेजवानी असते वाचकांसाठी..

टुकुल's picture

28 Sep 2010 - 11:39 am | टुकुल

नेहमीसारखच छान.

--टुकुल

सुरेख गाणे.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2010 - 2:14 pm | बिपिन कार्यकर्ते

छान गाणे!! भागवतसाहेबांना विनम्र श्रध्दांजली.

सहज's picture

29 Sep 2010 - 11:04 am | सहज

छान गाणे!! भागवतसाहेबांना विनम्र श्रध्दांजली.

कमलकार भागवत आणि सुमन कल्याणपुर या द्वयीची इतर अनेक प्रसीध्द रचना, भावगीते आणि भक्तीगिते, आहेत. त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही.

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात (इंदिरा संत)
उठा उठा चिउताई सारीकडे उजाडले (कुसुमाग्रज)
चक्रवात पक्षी वियोगे बहाती (संत नामदेव)
जेथे जातो तेथे तु माझा सांगाती (संत तुकाराम)
देह जावो अथवा राहो, (संत नामदेव)
देह शुध्द करुनी भजनी -भजावे (जनार्दन महाराज)
बुडता आवरी मज (संत तुकाराम)
मायेविण बाळ क्षणभरी न राहे (संत तुकाराम)
ॐकार प्रधान रुप गणेशाचे (संत तुकाराम)
दिनांचा कैवारी दुःखिता सोयरा(अशोकजी परांजपे)
नाम आहे आदी अंती, नाक सर्व सार (अशोकजी परांजपे)
समाधी घेउन जाई ज्ञानदेव (अशोकजी परांजपे)
दिपका मांडिले तुला, सोनियाचे ताट (बा.भ. बोरकर)

यशोधरा's picture

28 Sep 2010 - 6:38 pm | यशोधरा

सही यादी दिली आहे!

श्रावण मोडक's picture

28 Sep 2010 - 3:41 pm | श्रावण मोडक

विसोबा खेचर एरवी अनेकदा पाट्या टाकतात हे सिद्ध करणारे लेखन!
आता व्यक्तिचित्र एरवीच्या सारखे उरकू नका. हा लेख लिहितानाच्या सुरातच लिहा.

मेघवेडा's picture

28 Sep 2010 - 5:35 pm | मेघवेडा

सुंदर!

भागवत साहेबांना विनम्र श्रद्धांजली.

नागपाड्याला रहात असताना काही काळ भागवत साहेब आमचे शेजारी होते.
त्या काळी चाळीतल्या समस्त बाळगोपाळांना जमवून, ते पेटीवर विविध गाणी वाजवायचे.

त्यांचा गळाही सुरेल होता.

तात्यांनी त्यांची आठवण मी.पा वर जागृत केली.

तात्यांनू धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

29 Sep 2010 - 10:56 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकजनांचे व वाचनमात्रांचे मन:पूर्वक आभार...

तात्या.

विलासराव's picture

29 Sep 2010 - 12:04 pm | विलासराव

भावस्पर्शी गाणं आहे हे .
आवडल आनी आमच्या मायची आठवन येऊन डोळे भरुन आले.

तात्यांनी या अतिशय सुंदर गाण्याची आठवण करून दिली. धन्यवाद तात्या !!