देशपांडे गल्लीत त्यांचं घर...
तिथं देशपांडेंचा मोठा वाडा... वडिलोपार्जित! म्हणुनच ती देशपांडे गल्ली!
तिथंच शेजारी असलेल्या पाटलांच्या त्या दोन मजली घरात, वरच्या मजल्यावर ह्यांचं बिर्हाड.
शेजारी आणखीही काही भाडेकरु...
त्या गल्लीत किराणा मालाचं एकमेव दुकान पाटलांचं..
त्या दुकानाच्या मालकांचच हे घर...
पुढं दुकान, मागं घर, आणि वरचा मजला भाड्यानं दिलेला...
तर... तिथला जिना चढुन दुसर्या मजल्यावर यायचं आणि उजवीकडे पहिलंच घर यांचं...
तो जिना चढुन वर आला...
दरवाजा उघडुन आत जाऊ लागला, तेव्हा दाराचा जोरात आवाज झाला.. "कररर्र......... "
"किती आवाज होतोय... तेल घालायला हवं.... " त्याचं त्यालाच वाईट वाटलं...
बरं झालं ही नाहीये...
हिचं लक्ष गेलं असतं तर, "किती वेळा सांगायचं? प्रत्येक गोष्ट नीट ठेवायला हवी...
आता हा दरवाजा. पावसाच्या दिवसात जरा लक्ष दिलं की झालं..
वर्षभर कोणी म्हणतं का तुम्हाला?
आता दोनतीन महिने बघायचं... ओला झाला तर पुसायचा....
त्या कड्यांना, खिट्टीजवळ जरा तेल घालायचं, झालं.... पण तुम्ही म्हणजे..."
ते आठवुन त्याला हसु आलं..
सात वाजुन गेले होते..
बाहेर अंधारुन आलं होतं..
काहीही म्हणा, "आज थंडीही नेहेमीपे़क्षा जास्तच होती. " घरात शिरता शिरता त्याच्या मनात विचार....
"अचानक थंडी पडली की पंचाईतच होते.... म्हणुनच तर लवकर परत आलो.."
बरं झालं ही नाहीये...
हिचं लक्ष गेलं असतं तर, "किती वेळा सांगायचं? ती 'शबनम' असते ना बरोबर??
मग बरोबर तो स्वेटर घेऊन जावा.. किंवा एक शाल घेऊन जावी. कोणाला कळणार पण नाही..
आणि कळलं तर कळलं... त्रास कोणाला होतो?? तुम्हालाच ना?
वर्षभर कोणी म्हणतं का तुम्हाला?
आता दोनतीन महिने बघायचं... थंडी वाटली तर न्यायचा बरोबर.... एक नाही दोन स्वेटर आहेत....
आणि थंडीच का आहे?? पावसाळ्यातही तेच तुमचं.. तुम्ही म्हणजे..."
हे आठवुन त्याला परत हसुच आलं..
तेवढ्यात दार वाजलं..
उघडंच होतं तसं, त्यानं नुसतं लोटुन घेतलं होतं....
दार उघडताच आलेल्या एका वार्याची झुळकेनं, त्याला परत एकदा त्या थंडीची आठवण करुन दिली...
त्यानं मागे वळुन पाहिलं.... "अगं... तु होय.. आलीस?? आत्ताच आलीयेस का? "
"मी मगाशीच ऑफिसमधुन आले. आता थोडं सामान आणायला खाली गेले होते... " सुनबाई म्हणाली....
"आत्ताच आलात का तुम्ही?? " आणि, मी जरा जीमला चालली आहे...
चहा करुन दिला असता, पण आत्ता उशीर करत बसले, तर परत येऊन स्वैपाक नाही करता येणार....
आणि मग तो वैतागेल.... तोही येईलच इतक्यात... तयारी केली आहे, उरलेलं तेवढं जीमहुन येउन करते..
चहा तेवढा आज, तुम्ही करुन घ्याल ना प्लिज??"
"हो हो.. तु जा अगं... " तो हसुन तिला म्हणाला..
सुनबाई निघुन गेली..
खुंटीला अडकवलेला आपला स्वेटर काढुन, त्यानं झटकला..
बिछान्यावर ठेवला..
दाराची कडी लावली. परत तो आवाज झालाच... "कररर्र......"
"मागे एकदा... असाच काहीतरी कारणानं गावाला गेलो होतो... नाशिकला..
३-४ वर्ष तरी झाली असतील नक्कीच..
दोनच दिवस गेलो होतो.. पण जेवणाचे हाल...
आणि तिथली थंडी.... आलो ते आजारीच... थेट ३ ताप...
बाईसाहेब तर रडायच्याच बाकी राहिल्या होत्या!"
त्याला थंडी आणि स्वेटरवरुन सारं आठवलं आणि परत हसु आलंच...
तो न्हाणीघरात गेला.. हातपाय धुतले..
मग बाहेरच्या खोलीत आला.
मगाशी काढुन ठेवलेला स्वेटर घातल्यावर थोडं उबदार वाटलं...
स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवुन घेतला.... आलंही होतं घरात... स्वारी खुष!
दोन बिस्कीटंही काढुन घेतली... बशीत ठेवली.
आणि हे सगळं घेऊन तो बाहेर आला. आरामखुर्चीत बसला..
"बघ... बाहेर थंडी आहे. पण मी नीट स्वेटर घातलाय...
आणि बघितलंस, चहा पण केला आहे. छानपैकी 'आलं' घालुन..
बिस्कीटंही आहेत. एक मारीचं आणि एक क्रीमचं....
सुनबाई म्हणते "नुसतं मारीचं कशाला खाता?? त्यात काय मजा आहे??
तुमच्यासाठी ही नवी क्रीमची बिस्कीटं आहेत बघा.. जास्ती गोडपण नाहीयेत... " .
आणि तुझं नेहेमी "आपलं मारीच बरं..."
म्हणुन दोन्हीचं एकेक..
जेवायचं आहेच ९-९:३० ला..
एवढं खाऊन झालं, की दरवाजाच्या त्या खिट्टीला तेलही घालतो.... खुष ना मग तरी???"
हसत हसत, भिंतीवर लावलेल्या तिच्या तसबिरीकडे बघत तो म्हणाला...
"काय? हे मी एकटाच बोलतोय, की सारं आठवतंय तुला?? "
प्रतिक्रिया
26 Sep 2010 - 5:22 pm | मस्त कलंदर
:(
ती नसेल असे का कुणास ठाऊक सुरूवातीलाच वाटून गेलं होतं.
26 Sep 2010 - 6:47 pm | पैसा
लिहिलय छान.
27 Sep 2010 - 5:42 am | राजेश घासकडवी
एखाद्याच्या आयुष्यातली पंधरा मिनिटं - घरात शिरून चहा करून घेईपर्यंतचा साधा प्रसंग - आणि दार करकरणं, थंडी वाजणं यासारखे क्षुल्लक वाटणारे अनुभव घेऊन सुंदर रंगवलं आहे. दर क्षणाला तिची आठवण येते. तिची काळजीची, हक्काची तक्रार करायला आता ती नाही हे जाणवत राहातं. दुःख नाही, पण पोकळी आहे हे कुठलेही कढ न काढता दाखवलेलं आहे.
वर मस्त कलंदरनी म्हटल्याप्रमाणे ती नाही हे आधीपासूनच जाणवतं. त्याने फार प्रचंड फरक पडत नाही. पण कथेला शेवटच्या वाक्यात कलाटणी देण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असं वाटतं. (पहिल्याच काही वाक्यात हे सांगितलं असतं तरी परिणाम बदलला नसता) तुम्हाला ती रंगवण्याची कला आहे, तेव्हा अधिक लिहीत राहा.
27 Sep 2010 - 6:28 am | शिल्पा ब
एकदम भावनिक... :-(
लिहित रहा...लेखनशैली आवडली.
27 Sep 2010 - 12:05 pm | निखिल देशपांडे
मस्त लिहिलयं
वरती घासकडवींचा प्रतिसाद सुद्धा चांगलाच.
27 Sep 2010 - 2:54 pm | मेघवेडा
तंतोतंत असेच म्हणतो.
आवडले लेखन. अजून लिहा! :)
27 Sep 2010 - 5:05 pm | अस्मी
छान लिहीलंय....आवडलं.
असंच अजून लिहित राहा.
- अस्मिता
27 Sep 2010 - 4:52 pm | sneharani
मस्त लिहलयं!
:)
27 Sep 2010 - 4:54 pm | बिपिन कार्यकर्ते
छान लिहिलंय.
27 Sep 2010 - 5:12 pm | मितान
खूप छान :)
अजून लिहा..
27 Sep 2010 - 8:53 pm | ऋयाम
मस्त कलन्दर , पैसा , राजेश घासकडवी , शिल्पा ब ,निखिल देशपांडे ,
मेघवेडा , मधुमती , sneharani बिपिन कार्यकर्ते , मितान
सर्वांचा आभारी आहे, वाचल्याबद्दल आणि आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल :)
>ती नसेल असे का कुणास ठाऊक सुरूवातीलाच वाटून गेलं होतं.
त्रयस्थाकडुन पाहिलं तर सर्वकाही छान चाल्लंय असं दिसत असलं, तरी काही काही गोष्टी नंतर समजतात.
ज्यात दु:खही असु शकतं असं मला दाखवायचं होतं..
अर्थातच 'साहेबांची' उमेद आणि पॉझीटीव्हनेस दाखवायचा होता...
... कदाचित, ते वाक्य शेवटी न टाकता आधीच सांगायला हवं होतं... काय माहित??
सर्वांचा आभारी आहे, प्रोत्साहनाबद्दल!
@ ऋयाम. :)
28 Sep 2010 - 10:24 am | रणजित चितळे
एकदम मस्त वाटले वाचुन