माऊलीच माझ्या शेतात भजन गाई
पीक वार्यावर हालेडूले, मागेपुढे होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||धृ||
शाळू, बाजरी, मका अन गहू
विठ्ठलाचे रूप किती मी पाहू
सारं शेतं माझं पांडूरंग होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||१||
विहीरीचे पाणी होई चंद्रभागा
सावळा विठू दिसे निळ्या आसमंता
कशाला मग मी पंढरीसी जाई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||२||
कशाला गरज लागे टाळचीपळ्यांची
नको कशाला गरज अबीरबुक्याची
हातातला विळा वाजवीतो टाळी
कपाळाला लागे बांधावरची भुई ||३||
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई
मजूर वारकरी निंदणी करती
पीकातले पाप कापून काढती
पुण्यवान पीक तरारून येई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||४||
पीक वार्यावर हालेडूले, मागेपुढे होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०९/२०१० (अनंत चतुर्दशी)
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 9:33 pm | शुचि
सुंदर. : )
>> मजूर वारकरी निंदणी करती
पीकातले पाप कापून काढती
पुण्यवान पीक तरारून येई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||४|| >>
खासच
22 Sep 2010 - 9:39 pm | पैसा
कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी.