जन्मभराचं ऋण !

जिप्सी's picture
जिप्सी in जनातलं, मनातलं
21 Sep 2010 - 2:11 am

रविवार दुपार. असाच निवांत पडलो होतो,शुक्रवारी रात्री ट्रेकला निघून रविवारी सकाळीचं परत आलो होतो,आणि जेवून झाल्यावर मस्त झोपायच्या तयारीत होतो. आणि दार वाजलं! आत्ता एवढ्या दुपारी कोण आलं असेल ? असा विचार करतच दार उघडलं तर एक सेल्समन ! जेल साबण आणि फ्लोअर क्लिनर वगैरे घेउन आलेला होता. चेहेर्‍यावर अतिशय दमलेला भाव, उन्हातनं आल्यामुळं घामाघूम झालेला. मी त्याला आत घेतलं,फॅन लावला आणि पाणी आणायला आत गेलो.पाणी भरत असतनाच मला त्याच्या जागी मीच दिसायला लागलो.
२००४ साल असावं, मी पुण्यात येउन सुमारे वर्षभर होउन गेलेलं होतं,ज्यासाठी आलो ते अजूनही गवसतं नव्हतं,जीवाची नुसती तगंमग चाललेली होती. खिशात पैसा नाही,काहीतरी करून वेळ मारून न्यायचं चालू होतं. त्याचवेळी टाईम्स ऑफ ईंडीया साठी सर्व्हे करायचं काम मिळालं. सकाळी १०:००च्या सुमाराला एफ.सी. रोडवरच्या टाईम्स ऑफ ईंडीयाच्या ऑफिसातनं फॉर्म्सचे गठ्ठे घेउन निघायचं आणि ठरलेल्या भागात जाउन घरोघर फिरून,ते कोणता पेपर वाचतात्,का वाचतात, टाईम्स कधी वाचलाय काय? टाईम्स वाचायला आवडेलं काय ? असे प्रश्न असलेले फॉर्म्स भरून घ्यायचे.
काही काही ठिकाणी वॉचमन आत घ्यायचाचं नाही,काही ठिकाणी माणसं दारातूनच हाकलून लावायची. चार्/पाच मजले चढून एकेका बिल्डिंगमधे जायचं,पाठीवर ४०० फॉर्म्सचं ओझं(रविवारी५००फॉर्म्स),आणि एक सुद्धा फॉर्म भरला जायचा नाही. काही काही ठिकाणी चांगल्या घरातली माणसंसुद्धा टर उडवायची,वाट्टेल ते बोलायची,पण दिवसाच्या ८० रु.साठी ते सगळं पचवायचं.
अशाचं एका दुपारी विमान नगरात फिरत होतो,सकाळ्पासून फार फॉर्म्स नव्हते भरले गेले,उलट २-४ जणांच्या शिव्याचं खाउन झालेल्या होत्या.उन्ह नुसतं मी म्हणत होतं,पोटात आग पडली होती,पण कालचं रुमचं भाडं दिलेलं होतं,खिशात फक्त संध्याकाळच्या बससाठी पैसे होते,त्यामुळं तसाच पाय ओढतं चालतं होतो.एका घरापुढं उभा राहीलो बेल वाजवली,२दा,३दा. जरावेळानं एक आजी बाहेर आल्या,काय पाहीजे काय काम आहे अशी चौकशी केली,टाईम्स ऑफ ईंडीया,सर्व्हे वगैरे काहीच त्याना कळालं नाही,मोडक्या तोडक्या मराठीतं म्हणाल्या,मला रे बाबा त्यातली काही माहीती नाही,आमच्या घरी आमचा मुलगाआणि नातूच पेपर वाचतातं. मी काहीचं न बोलता परत फिरलो,तेव्हढ्यात त्यांनी परत हाक मारली,मला आत यायची खूण केली,मी घरात जाउन सावरून एका खुर्चीवर बसलो,आजी आत गेल्या,ग्लासभर पाणी आणि एक वाटी घेउन बाहेर आल्या. माझ्या हातात देउन म्हणाल्या,आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे,त्याच्यासाठी त्याला आवडतात म्हणून गुलाबजाम केलेले होते,असं म्हणून माझ्या हातात वाटी ठेवली, माझे डोळे भरून आले,२च दिवसांपूर्वी माझा वाढदिवस चहा आणि पार्ले बिस्किट खाउन साजरा झाला होता,त्याची आठवण झाली. घशातून घास खाली उतरेना,पाण्याबरोबर गुलाबजाम कसेबसे गिळले आणि तिथनं निघालो.
आता दाराशी कोणीही सेल्समन आला, की हे सगळं आठवतं आणि त्याला पाण्याबरोबर काही ना काही नक्की दिलं जातं.बायकोला हयाचा अर्थच कळत नाही,पण मी मात्र त्या दारातल्या प्रत्येकात स्वत:लाच बघत असतो,आणि एक आजन्म न फिटणारे ऋण आठवतं असतो.

पुढच्या वेळी तुमच्या दारावर एखादा सेल्समन येईल तेंव्हा तुम्हाला हे आठवेलं?

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

घरे पडले हृदयाला :(
माझा नवरा नेहमी सेल्स्मन आदि व्यक्तींकडून वस्तू घेत असे (असे म्हणते कारण भारतात असतानाची गोष्ट आहे). त्याला खूप वाईट वाटत असे त्यांच्याबद्दल. त्यानीही खूप वाईट दिवस पाहीले आहेत म्हणून असेल कदाचित.
पण तुमचा लेख वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं खरं.
__________________________________________

अवांतर - आवर्जून तुमचे सर्वच्या सर्व लेख वाचून काढले.

सगळे आवडले. "मैत्र जीवाचे" मधले " आज मागं वळून बघताना असं वाटतं की , की किती किती दिलं या भटकंतीनं मला ?असंख्य आनंदाचे क्षणं दिले, मारलेल्या हाकेला "ओ" देणारी ,काहीही अपेक्षा न ठेवता घासातला घास काढून देणारी माणंसं दिली,भरपूर फी मोजूनसुद्धा मिळ्णार नाही अशी बरीच शिकवण या सगळ्यातून मिळाली. हीच माझी 'ईस्टेट' आहे ...जीवनभरासाठी !" लिहीणारे तुम्हीच

"माझी मास्तरकी" वाचून सुन्न झाले होते. अशा लेखांना मी प्रतिसाद देत नाही कारण - I believe in - One who is hurt most is most silent. पण तो लेखही काही औरच अनुभव होता.

पारुबाई's picture

21 Sep 2010 - 3:16 am | पारुबाई

खूप चांगला संदेश देत आहात तुम्ही या माध्यमातून.

तुमच्या स्वतःच्या वागणुकीतून चांगला आदर्श मांडत आहात.

अजून एक गोष्ट कराल ?

त्या आजींना एकदा भेटून तुमची कृतदय्नतेची भावना आणि तुम्ही हा पसरवत असलेला संदेश या बद्दल सांगाल ? प्लीज.

बेसनलाडू's picture

21 Sep 2010 - 6:08 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

पैसा's picture

21 Sep 2010 - 3:00 pm | पैसा

एक सांगू, त्या आजीबाई आता शोधून सापडतील असं काही सांगता येत नाही. त्यानी सुरु केलेली साखळी आपण पुढे चालू ठेवायची. एवढंच पुरे. फक्त सेल्समन असं नाही, जिथे शक्य आहे, तिथे, निदान दुर्लक्ष केलं नाही तरी खूप झालं!

प्राजु's picture

21 Sep 2010 - 3:21 am | प्राजु

छान उतरला आहे लेख. अगदी हृदयापासून आला आहे. खूप आवड्ला.

गणपा's picture

21 Sep 2010 - 5:05 am | गणपा

मुंबईत एकट्या रहाणार्‍या वृध जोडप्यांवर वा दुपारी घरात तरुण मंडळी नसताना होणारे हल्ले (बरेच वेळा नोकरांकडुन होतात.) यामुळे दारात आलेल्या सेल्समन/तिर्‍हाईत माणसाकडे जरा संशयाच्या नजरेतुनच पाहिल जात.
पुर्वी काही ठराविक ओळखीचे सेल्समन यायचे. त्यात एक अपंग महिला आणि एक शाळकरी मुलगा उदबत्त्या विकायला यायचे. एकजण चादरी/ बंगाली साड्या विकायला यायचा. आई नेहमी त्यांच्या कडुनच काहीना काही घेत असे. कधी कधी तर गरज नसता नाही . ते थकलेले जीव दुपारच्या रणरणत्या उन्हात थंडपाणी पिउन, दोनघटका विश्रांती घेउन परत नव्या जोमाने कामाला चालु पडायचे.

जिप्सी मनातुन थेट उतरलेला हा लेखही आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2010 - 8:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख खरंच आवडला.

आमच्या घरी, इतर अनेकांप्रमाणे, लहानपणीच घराला बाहेरून जाळीचं दार बसवून घेतलं; आम्ही लहान मुलंच घरी असायचो म्हणून! पण तरीही काही ठराविक लोकांकडून वस्तू विकत घेतल्या जायच्या. उपयोगाच्या वस्तू विकायला आलेल्या लोकांकडून मी ही गोष्टी विकत घ्यायचे; पण तेव्हा कधी साधं पाणी द्यायचंही सुचलं नाही. :-(
कष्ट करून सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करणार्‍या या सेल्समन लोकांचा राग मात्र कधीच आला नाही.

सध्यातरी म्हणायला पुण्यात असले तरी स्वतंत्र संस्थानातच रहात असल्यामुळे अनोळखी लोकांना आतपर्यंत येताच येता नाही. पण तुमच्या लेखातला शेवटचा प्रश्न नक्कीच आठवत राहिल.

शिल्पा ब's picture

21 Sep 2010 - 5:20 am | शिल्पा ब

तुमचे लेख आवडतात...मलाही मी कालेजात असताना असेच काहीसे काम केल्याचे आठवले...त्रास तर होतोच...पण एक मुलगी म्हणून मला कोणी हुडूतपणे वागवले नाही इतकेच.

एकदा एक मुलगी अशीच दुपारी आली होती...मी आम्हाला काही नकोय म्हणून सांगितले आणि इथे सेल्समन वगैरे लोकांना आत येण्यास परवानगी नाही असेपण सांगितले...दुसरे कोणी तिला ओरडू नये म्हणून...ती एकदम चवताळून "आम्ही management ट्रेनी आहोत सेल्समन नाही " असे म्हणाली...तिचा वैताग मला समजला..म्हणून इतरांना समजेलच असे नाही...कोणीच दार न उघडल्याने तिला जावे लागले.

नगरीनिरंजन's picture

21 Sep 2010 - 5:34 am | नगरीनिरंजन

मनाला स्पर्शुन गेलं. मी मॅनेजमेंट शिकत असताना मार्केट रिसर्च प्रोजेक्टसाठी असाच फिरलेलो आहे त्यामुळे हे किती कष्टाचे आणि त्रासदायक काम असते त्याची थोडीफार कल्पना आहे.
फिरत्या विक्रेत्यांचं काम अवघड खरंच, पण बर्‍याच लोकांना त्याचं काय? त्या आजींसारखे लोक आहेत या जगात ही कृपाच म्हणायची.

सहज's picture

21 Sep 2010 - 6:11 am | सहज

भावना पोहोचल्या पण महानगरीय संस्कृती जरा वेगळीच आहे.

ज्याची त्याची जाण ज्याची त्याची रिस्क!

रेवती's picture

21 Sep 2010 - 6:45 am | रेवती

सुंदर लेख!

मदनबाण's picture

21 Sep 2010 - 7:30 am | मदनबाण

लेख आवडला...

प्रभो's picture

21 Sep 2010 - 7:45 am | प्रभो

आवडला... :)

प्रमोद्_पुणे's picture

21 Sep 2010 - 9:41 am | प्रमोद्_पुणे

छान लिहीले आहे..

सविता's picture

21 Sep 2010 - 9:50 am | सविता

सुंदर....

आनंदयात्री's picture

21 Sep 2010 - 9:55 am | आनंदयात्री

काय छान लिहतोस रे जिप्श्या !!
हा जिप्श्या साला मिपा २०१० चं फाईंड आहे.

निखिल देशपांडे's picture

21 Sep 2010 - 1:31 pm | निखिल देशपांडे

+१ सहमत
खरोखर छान लिहिले आहेस.

नंदन's picture

22 Sep 2010 - 10:46 am | नंदन

सुरेख लेख!

हा जिप्श्या साला मिपा २०१० चं फाईंड आहे.

--- सहमत आहे.

इन्द्र्राज पवार's picture

21 Sep 2010 - 10:28 am | इन्द्र्राज पवार

"पण मी मात्र त्या दारातल्या प्रत्येकात स्वत:लाच बघत असतो,..."

~~ ही जाणीव तुमच्यातील प्रगल्भता तर दर्शविते, कारण आज तुम्ही जरी होंडा सिटीतून फिरत असला (जरी फिरत नसला तरी, तो दिवस दूर नसेल....) तरी दुपारच्यावेळी केव्हातरी हळूच काच खाली करून आपल्यासारखाच एक धडपड्या किंवा रणरणत्या उन्हातदेखील कंपनीचा नियम म्हणून टायकोट घालूनच, कपाळावरून ओघळणारा घाम पुसत, औषधाच्या नमुन्याची जडशीळ कातडी बॅग एकदा त्या हातात तर थोड्या वेळाने त्या हातात हेलकावत नेणारा एम.आर. दिसला तर तुम्हालाही त्याच्यात ४००-५०० फॉर्म्सचे ओझे घेऊन कुठे अपार्टमेंटच्या गेटवर लटकलेली ती संतापजनक पाटी "सेल्समननी आत येऊ नये..." पाहणारा एक युवा दिसत असेल.

फार 'टची' लिखाण आहे आणि इतक्या जिवंतपणे अनुभव रेखाटन झाले आहे की, मला वाटू लागले जणू काही ह.मो.मराठे यांची "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी....." ही अशाच एका हतबल, अचानकच धाडदिशी बेकारी आलेल्या व घरी वाट पाहणार्‍या गर्भार पत्नीला ही बातमी कशी सांगायची व त्यातील दाहकता सहन तरी कशी करायची या संभ्रमात पडलेल्या तरूणाची जीवघेणी घालमेलच वाचत आहे की काय !

"पुढच्या वेळी तुमच्या दारावर एखादा सेल्समन येईल तेंव्हा तुम्हाला हे आठवेलं?"

~~ आठवेल असे म्हणण्याची आवश्यकता नाही.....कारण हे लिखाण वाचण्यापूर्वीपासून कायमचे लक्षात ठेवले आहे....तुम्हाला गुलाबजाम देणार्‍या आजीसारखीच माझीही एक आजी आहे, आणि तीने जाणीवपूर्वक घरातील अन्य सर्वांना "तुम्ही त्यांच्याकडून काही घ्या अगर ना घ्या; पण निवांतपणे त्याला/तिला दोन मिनिटे सांगू द्या. भर उन्हातून आलेल्या अनोळखीला एक ग्लास थंड पाणी दिल्याने तो जो मनोमनी दुवा देतो, तो नक्कीच तुमच्या पुण्य खात्यात जमा होतो." ~~ हे विशेषतः आपल्या छोट्या मुलाला/मुलीला घेऊन पापड, लोणचे, मेतकूट मसाले, असे काहीबाही घेऊन येणार्‍या स्त्री च्या बाबतीत कटाक्षाने पाळले जाते.

"२च दिवसांपूर्वी माझा वाढदिवस चहा आणि पार्ले बिस्किट खाउन साजरा झाला होता"...

~~ या प्रखर अनुभवाची जातकुळी फार मोठी आहे, जिप्सी. येणारा वाढदिवस तुम्ही जरी ५ स्टार्स हॉटेलमध्ये साजरा केला तर अंतर्यामी त्या गर्दीत, पक्वानांची रेलचेल असलेल्या टेबल्स जवळून जाताना कुठेतरी त्या एका पार्ले बिस्किटाची याद आली तरीदेखील "आपले पाय कायम जमिनीवरच राहतील" ही भावना तुमच्यातील 'माणुसकी' तेवती ठेवण्यास समर्थ आहे.

इन्द्रा

स्मिता_१३'s picture

21 Sep 2010 - 10:37 am | स्मिता_१३

अतिशय सुरेख लेख जिप्सी.

तितकाच सुरेख प्रतिसाद इंद्रा. आयुष्यात पाय जमिनीवर रहाणे फार फार महत्वाचे.

तुमच्यातील आणि आमच्यातलीही 'माणुसकी' तेवती ठेवण्यास समर्थ आहे.
खुप छान

चिगो's picture

21 Sep 2010 - 11:08 am | चिगो

खरंच 'टची' लेख आहे.. छान लिहीलयं. आणि इन्द्राचा प्रतिसादही सुरेख.. आज सुखात जगतांना काल पाहीलेल्या दु:खाची जाणीव ठेवावी (खंत नको), मग मनातली माणुसकी जिवंत राहते..

मितान's picture

21 Sep 2010 - 11:46 am | मितान

उत्तम लेख ! आवडला :)

जिप्सी, मनापासून आलेले लेखन. आवडले.
लिहिता रहा.

अनामिक's picture

21 Sep 2010 - 6:05 pm | अनामिक

+१
टची लेखन.

गांधीवादी's picture

21 Sep 2010 - 12:52 pm | गांधीवादी

लेख खूप चांगला आहे.
लेखात दिलेले वर्णन ज्यांनी केवळ वाचले आहे त्यांच्या माहित नाही, पण ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

>>२च दिवसांपूर्वी माझा वाढदिवस चहा आणि पार्ले बिस्किट खाउन साजरा झाला होता,
आमच्या इथे याला जंगी पार्टी म्हणतात. २-3 कप फक्कड चहा आणि १२ रुपयाचे दोन बिस्कीट पुडे , व्वा काय मज्जा असते. आम्ही आमचे वाढदिवस अजूनही अशेच साजरे करतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'लिखाण' बंद केले आहे ||

अवलिया's picture

21 Sep 2010 - 12:52 pm | अवलिया

सुरेख लेखन !!

पुढच्या वेळी तुमच्या दारावर एखादा सेल्समन येईल तेंव्हा तुम्हाला हे आठवेलं?

- नक्कीच आठवेन ..
---------
कोणी लहान मुले ,म्हतारी मआणसे काही विकत असतील तर मला न लागणार्या वस्तु ही मी जास्त प्रमाणात विकत घेतो ..
कारण एकच त्यांच्या चेहर्‍यावर एक दिवसाची तरी आनंदाची लकीर उमटली जावी.
सेल्समन ला खरे सांगाय्चे तर मी नकोच असे सांगत आलोय. कारण एखादी वस्तु आवडली नाही तरी किंवा घ्याय्ची नसली तरी का थांबवले मग असे उद्धट बोलणार्यांचाच जास्त अनुभव आहे.. तुमच्या नजरेतुन त्यांच्या कडे पाहण्याचा प्रयत्न नक्की करेन पण अनुभव वाईट आला तर तसे नाही वागु शकणार

बाकी तुमचे सर्वच लेख प्रेरणादायी असतात ..

मनापासुन धन्यवाद तुम्हाला.

विसोबा खेचर's picture

21 Sep 2010 - 2:24 pm | विसोबा खेचर

छान..

भडकमकर मास्तर's picture

21 Sep 2010 - 4:06 pm | भडकमकर मास्तर

अनुभव मांडावा तो असा...
छान लिहिलं आहे ....

स्वाती२'s picture

21 Sep 2010 - 4:54 pm | स्वाती२

लेख आवडला.

नावातकायआहे's picture

21 Sep 2010 - 5:16 pm | नावातकायआहे

सुरेख लेखन!

छान. आवडले. गणपा व सहजकाकांशी सहमत आहे. :)

सुनील's picture

21 Sep 2010 - 6:46 pm | सुनील

लेख आणि इंद्रा यांची प्रतिक्रिया आवडली.

सूड's picture

21 Sep 2010 - 8:57 pm | सूड

>>पुढच्या वेळी तुमच्या दारावर एखादा सेल्समन येईल तेंव्हा तुम्हाला हे आठवेलं?
नक्कीच !!

जिप्सी's picture

22 Sep 2010 - 9:42 am | जिप्सी

सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे मनपूर्वक आभार !
इंद्रा :- ('नेहमीसारखच') बेस्ट प्रतिसाद !

गुंडोपंत's picture

22 Sep 2010 - 11:50 am | गुंडोपंत

लेखन मनाला भिडले, आवडले! तुमचे आधीचेही लेखन आवडलेच आहे. तुमच्या लेखनात साधी सोपी सहजता आहे. तुम्ही अजून लिहायला हवे!

स्पंदना's picture

22 Sep 2010 - 11:51 am | स्पंदना

अतिशय सुन्दर लेख जिप्सी!!

आप्ल्याला मार्केटिंग ची मंडळी पण अशीच फोन करुन त्रास देतात अस मला वाटायच पण मध्यंतरी 'द्रुष्टी' नावाची अंधासाठी काम करणारी संस्था आपल्या बर्‍याच कॉल सेंटर साठी तेथील मुले पाठवते हे ऐकल अन तेंव्हा पासुन फोन वर पलिकडे ' तस' कोणी असेल तर अस वाटुन थोड हळुवार नकार देण सुरु झाल.

डावखुरा's picture

23 Oct 2010 - 10:51 pm | डावखुरा

जिप्सी आपला अनुभव काळजाला भिडणारा आहे...
तसेच ईंद्रांचा प्रतिसादही तसेच वरील सर्वांशी सह्मत...

इंटरनेटस्नेही's picture

24 Oct 2010 - 1:04 am | इंटरनेटस्नेही

जिप्सी आपला अनुभव काळजाला भिडणारा आहे...
तसेच ईंद्रांचा प्रतिसादही तसेच वरील सर्वांशी सह्मत...

+१

अप्पा जोगळेकर's picture

24 Oct 2010 - 10:30 am | अप्पा जोगळेकर

जबरदस्त लिहिलं आहे. श्रीमंतीत लोळलो नाही तरी आजवर आर्थिक दारिद्र्य देखील अनुभवलेले नाही. त्यामुळे वाचून अंगावर काटा आला. पाठीवर सिलेंडर घेउन फिरणारी गॅस एजन्सीची माणसे, उदबत्त्या विकणारे, साबणचुरा,शांपू विकणारे ,एम-आर हे सगळे एकाच होडीतले प्रवासी होतं.
२च दिवसांपूर्वी माझा वाढदिवस चहा आणि पार्ले बिस्किट खाउन साजरा झाला होता,
खल्लास.

मी जिथे राहतो तिथे बाजूलाच एक बैठ्या घरांची वस्ती आहे. त्या वस्तीत राहणारे लोकं इतके नीच आहेत की -
एखादा सेल्समन्, हातगाडीवाला, फळविक्या, कुल्फीवाला आला की त्याच्याभोवती मुद्दाम कोंडाळं करतात आणि हे कितीला,ते कितीला असं उगा विचारत बसतात. आणि त्यांची लहान-सहान पिलावळसुद्धा त्या विक्रेत्याच्या आजूबाजूला कल्ला करत६ राहतात आणि हळूच एखादी वस्तू उचलतात आणि स्वतःच्या बैठ्या घराच्या पत्र्यावर ठेवून देतात. हे करताना त्या पोरांना आईबापांचा फूल सपोर्ट असतो आणि मग तो विक्रेता गेला की कसा चु* बनवला म्हणून हसत हसत ताळ्या देतात.