बाळाला जर पंख दिले, संस्कार दिले मी शुभंकरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||१||
सहचार-अपेक्षापूर्ती करी, उतरतसे कसोटी अनुदिनी
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||२||
मात्यापित्यांस शांती दिली, कण फेडीले ऋण अपुलेपरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||३||
मित्रास लावला जीव जरी,उत्तेजनही दिधले परोपरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||४||
आदर्श जिणी रमता अनुदिनी,एके दिनी जायचे मिटूनी,
सरणावरती शांत मनानी, जाईन तुला मी सामोरी ||५||
प्रतिक्रिया
20 Sep 2010 - 1:53 am | इंटरनेटस्नेही
चांगली, आय मीन चांगली गेयता असलेली कविता.
20 Sep 2010 - 3:37 am | Pain
तुम्हाला खरोखर असे वाटते का केवळ फक्त कविता आहे?
20 Sep 2010 - 3:52 am | शुचि
प्रश्न कळला नाही. कविताच आहे ही.
20 Sep 2010 - 6:07 am | Pain
तुमच्या जबाबदार्या किंवा विविध कर्तव्ये पार पडल्यानंतर आता मरण आले तरी चालेल/मृत्यू तुमचे काही बिघडवू शकत नाही, असा अर्थ निघतो.
असे तुम्हाला खरोखर वाटते का अशीच वाटली (no reason, just like that) म्हणून कविता केली आहे?
20 Sep 2010 - 6:24 am | शुचि
मॅपींग द जर्नी आफ्टर डेथ" हे एका "सुकी मिलर" नावाच्या सायकोथेरपिस्टने लिहीलेलं पुस्तक वाचते आहे. तिनी २ उदाहरणं दिली आहेत पहील्या धड्यात - (१) एक माणूस ज्यानी श्रद्धेच्या सुकाणूने जीवनाची नाव वल्हवली आणि मृत्यूला लहान वयात शांतपणे सामोरा गेला. (२) दुसरा तर्कदुष्टतेच्या विळख्यात मृत्यूपश्चातच्या जीवनाविषयी नेहमी साशंक राहीला, नाकारतच राहीला आणि ज्याचे शेवटचे दिवस मिझरेबल झाले.
ते वाचता वाचता मी विचार करू लागले, मी मृत्यूला कशी सामोरी जाईन? आणि मला वाटलं माझं बाळ मार्गाला लागलं तर मरणाची मला खरच फिकीर नाही.
अर्थात सर्वांप्रमाणे मलाही वाटतं की मृत्यू तडकाफडकी यावा, क्लेशदायक असू नये विशेषतः जवळच्या व्यक्तींकरता वगैरे वगैरे.
20 Sep 2010 - 6:26 am | सहज
पण खरच अचानक मृत्यु आला तर
१) आपल्या अपत्यांचे संगोपन नीट होइल ह्याची तरतूद (फक्त अन्न, वस्त्र, पैसा नव्हे, शिक्षण, संगोपन, मार्गदर्शन इ इ) केली आहे?
२) आपल्यावर असलेली सर्व देणी व्यवस्थीत फेडली जातील याची सोय पाहीली आहे?
३) आपल्या मालमत्ता, आर्थीक व्यवहाराची सांगोपांग माहिती तसेच कागदपत्रे नीट संकलीत करुन ठेवली आहेत?
४) कोणी विश्वासु व्यक्ती जे लगेच सर्व व्यवहार आपल्या ताब्यात घेउन आपल्या मुलांचा, वृद्ध मात्या-पित्यांचा इ. चा सांभाळ करु शकतील याचे प्लॅनिंग केले आहे?
५) जरी समजा मृत्यु आला नाही व आपण कोमा मधे गेलो, किंवा मेडीकली अनफीट (मेंदु नीट काम करेनासा झाला) तर काय करायचे यावर काही उपाययोजना आखली आहे?
गरीबी हा शाप आहे असे मत नुकतेच कुठे तरी वाचले होते पण आपले आहे ते भौतीक आयुष्य, मुलाबाळांचे विश्व आपल्या अकाली जाण्याने सध्या जितके आहे तितके तरी नीट राहील यावर काही विचार/उपाय केला आहे का?
ओळखीतल्या एका तरुण व्यक्तीचे नुकतेच अकाली निधन झाले त्यामुळे हे सगळे सुचले. रसभंगाबद्दल क्षमस्व पण हे महत्वाचे आहे म्हणुन न रहावून लिहले.
20 Sep 2010 - 6:54 am | शुचि
रसभंग नाही झाला.
वेगळा दृष्टीकोन कळला. Everybody brings something to the table from his/her experience, perception, background.
तुम्ही म्हणता त्या गोष्टी महत्वाच्या आहेतच.
21 Sep 2010 - 2:10 am | चित्रा
माणसाच्या मरणानंतर त्याची मुले वाढतच राहतात. पैसेही मिळवतात. सुखी होतात. कष्ट करतात, सगळे होतच राहते.
माझे पणजोबा खूप सधन नव्हते पण खातेपिते होते. पण अकाली गेले. एकटे माझे तेव्हा आठ वर्षाचे आजोबा आणि पणजी उरले. घरातल्या चुलत मंडळींनी घरी आश्रय दिला नाही, म्हणून आजोबा दुसर्याच्या घरी आश्रित म्हणून वाढले. पण हुशार म्हणून इंग्रजी शिकले, मुंबईला नोकरी मिळवली. नोकरीव्यतिरिक्तही कामे करू लागले. प्रगती झाली. ज्या आईला स्वैपाकीण म्हणून दुसर्याच्या घरी काम करावे लागले ती मरताना समाधानी होती. हे सर्व कामाच्या संस्कारांनी झाले, पणजोबांनी घरी धन ठेवले होते म्हणून नाही. नाहीतरी आपण सगळ्या पद्धतीची माणसे पाहतोच, एवढी व्हरायटी असते कारण प्रत्येकजण वेगळा असतो, वेगळ्या पद्धतीने वाढलेला असतो.
तेव्हा शुचिताईंच्या भावनांशी सहमत आहे. अर्थात याचा अर्थ आर्थिक शहाणपण बाळगू नये असा नाही. पण आपण गेल्यामुळे आभाळ तुटून पडेल ते तात्पुरते असेल, त्यातून बाहेर आली की मुले वाढतील, मोठी होतील, मित्र मिळवतील, पोटापुरते पैसे मिळवतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. आपण मुलांना शंभर टक्के सगळे देऊ शकतो का? त्यापेक्षा नक्की काय गोष्टी कशा/किती प्रमाणात दिल्याने ती त्यांचे आयुष्य उभे करण्यास कार्यक्षम होतील, असा विचार असावा.
असो. अवांतर खूप झाले.
शुचि, कविता आवडली.
20 Sep 2010 - 8:25 am | स्पंदना
शुची कवित अत्त्युत्तम!
थोडा वेगळा अर्थ पण निघतो आहे , अतिशय खोल गुढ काव्य म्हण हव तर.
जाणिव आणि नेणिव या दोन कप्प्यांच्या मध्ये तरंगणार काव्य!
सहज आणि Pain रावांच्या प्रतिसादान अधिक खुलते हे काव्य!
20 Sep 2010 - 5:18 pm | इन्द्र्राज पवार
"मी मृत्यूला कशी सामोरी जाईन?..."
~~ निश्चितच हा एक गंभीर विषय असून तो लेखिकेच्या धाग्यातील कवितेशीच संबंधित नसून फार व्यापक दृष्टीने त्यावर विचार केला जातो. अगदी आदिम काळापासून मानवासमोर या प्रश्नाचे भूत नाचत आले असून ते पृथ्वीच्या अंतापर्यंत धुडगूस घालणारच आहे. या प्रश्नाला कुठले "लॉजिकल" उत्तर असेलच तर 'ज्याचा त्याचा आत्माराम म्हणेल तसा...". अर्थात 'मी मृत्यूला कशी सामोरी जाईन?" या प्रश्नाचे उत्तर कुणी लिहून ठेवले तर ती स्थिती जशीच्यातशीच येईल याच्या शक्यतेचा विचार करायची गरज नसते कारण ती कुणाला अपेक्षितही नसते.
~~ कवयित्रीने वरील भावनेत एक कृतार्थतेची भाषा वापरली आहे, म्हणजे 'मी या दिनांकापर्यंत काही तरी भरीव केले आहे...अन् आता मी 'त्याच्या' स्वागतास तयार आहे, आणि मी त्याला सामोरे जाईन. "कसे" हाच एक भरीव प्रश्न आहे. पण प्रत्यक्षात नियती या कवितेतील भावनेकडे वेगळेपणे पाहात असेल का?...हा एक गहन प्रश्न आहे. सद्याच्या काळात आपल्या छायेत वाढलेले रोपटेदेखील आपल्याशी कृतज्ञ राहिल की नाही याची दाट शंका असते, त्यामुळे 'मी मृत्युला सामोरे जाताना, सर्व काही आलबेल करूनच जात आहे' ही भावना मनी एकप्रकारचे हवेहवेसे वाटणारे फक्त समाधान असू शकते (इथे या मुद्द्यावर फार काही रोखठोक लिहिण्याचा मानस होता....पण राहू दे....पुढे कुठेतरी !)
मृत्यू कसा यावा याचे नेमके गणित नाहीच हे तर सत्य आहे...पण तो कसा यावा, याबद्दल जी.ए.कुलकर्णी यांच्या 'घर' या कथेत फार चांगले लिहिले आहे :
"डॉक्टरांनी त्या क्षणाची वाट पाहत सारा दिवस ढकलत संपवला होता. सिगारेटच्या झुरक्याने त्यांना एकदम सैल, सुखाचे वाटले व ते बाकावर ऐसपैस बसले. आता त्यांना मोकळ्या काचेत प्रकश भरत असल्याप्रमाणे भासू लागेल. ललिताला एकदा तिचे घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोकायंत्राची मला भीती नाहे. केव्हा का बंद पडेना ते ! मग शेजारी सिगारेटचे एक पूर्ण पाकिट असावे, एखादा दरबारी छबिना, चौघडे-तुतार्या वाजवत डौलाने यावा, त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेपवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनतायुगात नि:संकोच सरदारी दिमाखाने चित्रे आणि लेख छापणारे 'नॅशनल जिऑग्राफिक' किंवा 'रीअॅलिटीज" सारखे एखादे मासिक हातात असावे, मग बोलावणे घेऊन येणार्या, तू कसाही ये. तू दार ठोठावून ये अगर आडदांडासारखा आत शीर. असल्या एका सिगारेटमधून आलास तरी चालेल - नव्हे तू तसाच ये ! ते मलादेखील फार आवडेल !..."
असं होत जाईल ?
जरून वाचा 'घर' पूर्णपणे...एकदा तरी ! [तुमचीच कविता आहे गद्य रुपात ही कथा म्हणजे...]
इन्द्रा
20 Sep 2010 - 7:00 pm | मदनबाण
मॄत्यु नंतर नक्की काय होत असेल बरं... ?
सध्या दिपक चोप्रा काय म्हणतात ते समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय...
http://www.youtube.com/watch?v=T_rdYiLAz38
20 Sep 2010 - 8:04 pm | गंगाधर मुटे
आवडली.
20 Sep 2010 - 8:07 pm | पैसा
मृत्युला असं आव्हानच दिलंय नाही?
21 Sep 2010 - 2:24 pm | विसोबा खेचर
एक दिवस प्रत्येकाला जायचे आहे,
छान कविता..
तात्या.
21 Sep 2010 - 2:25 pm | स्वानंद मारुलकर
कविता आणि तुमचे विचारही...