खरं तर एवढयातच पुन्हा लिवायचा काही विचार नव्हता. पण "धमु" शी खवखवता "सुशि"चा विषय निघाला, आणि खपली निघाली..
सुशिंना मी पहिल्यांदा केव्हा वाचला, आठवत नाही. पण "शॅबी" हा शब्द मी उगाचच्या उगाच वापरायचो, कारण तो "येता.. जाता" मध्ये वाचला होता. पिसाट हसलो होतो हि कादंबरी वाचुन..
खरंच काय रेंज होती ना या माणसाची स्साली ?
हृद्य पिळवटुन घ्यायचंय, वाचा मग दुनियादारी, कल्पान्त, क्षितिज, दास्तान, झूम...
हृद्याला भोकं पाडून घ्यावीशी वाटतंय? उचला जाई, तलखी, दास्तान, मधुचंद्र, स्वीकार, तलाश, देवकी पैकी कुठलीही..
कोवळ्या प्रेमाची हळुवार फुंकर हवीय, घ्या मग बरसात चांदण्यांची, तुकडा तुकडा चंद्र, कोवळीक वगैरे..
सामाजिक वगैरे हवीय, आहे ना प्रतिकार, कळप आणि बर्याच इतर..
कोर्ट-रूम ड्रामा हवा असेल तर अमर विश्वास हाजीर हो..
थरार/ सस्पेंस हवा असेल तर मंदार एन्ड गँग आहे, फिरोज इराणी आहे.
घाबरायचंय का तुम्हाला, या सैतानघरात. धुकं-धु़कं, मरणोत्तर, समथिंग, माध्यम आहेतच की..
एवढ्यावरच कुठं थकता राव? नुसता टगेपणा हवा असेल, तर "जाता येता" खंडाळा लोणावळा करुन या, नाहीतर "जन पळभर" च्या पहील्या भागात जाऊन जरा आळंदीला पळुन लग्न कशी लावतात हे तर बघा.. ऐतिहासिक भानगडीतले असाल तर, "जमीन-आस्मान" "रुपमती" ला भेटा कि जरा.. आणि हया कादंबर्यातले "लँग्वेज एक्सपेरिमेंटेशन"ही बघा जरा अनुभवून.. बाकीही बरीच यादी आहे अजून...
"देवाघरची फुले" (गोष्ट) वाचुन बघा. निरीक्षण निरीक्षण काय असतं ते कळेल..
आणि एवढं झाल्यावरही तहान भागली नसेल, तर ह्या अचाट माणसाच्या कविता वाचून बघा !!
स्साला एवढी वर्सॅटॅलिटी जर कुण्या विंग्रजी लिवणार्याकडे असती ना तर लोकं डोक्यावर घेऊन नागडी नाचली अस्ती त्याला.. पण आम्ही साले कर्मदरीद्री.. अरे, नुस्त्या खटल्यांच्या भरवशावर पानं खरडणारे तुम्हाला संमेलनाध्यक्ष म्हणुन चालतात आनी आमच्या सुशिंना "नुस्ते लोकप्रिय" म्हणून अनुल्लेखानी मारणार तुम्ही, भडव्यो !?
सुशिंना मी बर्याच आधी वाचलं. कॉलेजमध्ये असतांना पारयणं केली. नंतरच्या धबगड्यात हे वेड जरा मागे पडलं, पण कॉलेजात असतांना मी एका वहीत एकीकडे सुशिंची पुस्तकं (इश्यु केलेली) लिहित असे आणि बाकी सगळ्यांची दुसरीकडे, पण सुशिंचं परड्म नेहमीच जड होतं.
एकदा मी लायब्ररीतून सुशिंच्या तीन कादंबर्या संध्याकाळी इश्यु करून नेल्या आणि रात्रभरात वाचून पुन्हा आणखी घ्यायला सक्काळी लायब्ररीत गेलो. तिथली बाई बोलली, "तू ह्या सगळ्या पुर्ण वाचल्या !?"
मी बोललो," हो, पुर्ण वाचल्या."
ती बोलली ,"झोपला नाहीस का?"
मी बोललो ," झोपलो की थोडा."
तिला विश्वासच बसेना. म्हणे "नक्की"??
मी पुन्हा हो म्हणालो..
शेवटी ती बोलली, "कमाल आहे !!"
........... त्या वेडीला काय ठाऊक, कुणाची आणि किती कमाल आहे ते?.. जाने दो, दिवाना ही जाने दिवाने की हालत....!
प्रतिक्रिया
15 Sep 2010 - 2:49 am | आपला आभि
दुनियादारी ... लैई भारी ...आपण तर एकदम फिदा ...
16 Sep 2010 - 12:09 am | मी-सौरभ
सु.शि. माझेही अत्यंत आवडते लेखक आहेत :)
विशेषतः रहस्यकथा आणि 'दुनियादारी' तर जबराच
15 Sep 2010 - 3:02 am | Pain
सामाजिक वगैरे हवीय, आहे ना प्रतिकार, कळप आणि बर्याच इतर..
कोर्ट-रूम ड्रामा हवा असेल तर अमर विश्वास हाजीर हो..
थरार/ सस्पेंस हवा असेल तर मंदार एन्ड गँग आहे, फिरोज इराणी आहे.
घाबरायचंय का तुम्हाला, या सैतानघरात. धुकं-धु़कं, मरणोत्तर, समथिंग, माध्यम आहेतच की..
एवढ्यावरच कुठं थकता राव? नुसता टगेपणा हवा असेल, तर "जाता येता" खंडाळा लोणावळा करुन या, नाहीतर "जन पळभर" च्या पहील्या भागात जाऊन जरा आळंदीला पळुन लग्न कशी लावतात हे तर बघा.. ऐतिहासिक भानगडीतले असाल तर, "जमीन-आस्मान" "रुपमती" ला भेटा कि जरा.. आणि हया कादंबर्यातले "लँग्वेज एक्सपेरिमेंटेशन"ही बघा जरा अनुभवून.. बाकीही बरीच यादी आहे अजून...
"देवाघरची फुले" (गोष्ट) वाचुन बघा. निरीक्षण निरीक्षण काय असतं ते कळेल..
यातले एकतरी इंटरनेटवर उपलब्ध आहे का ?
15 Sep 2010 - 6:10 am | सन्जोप राव
'ब्लेसड आर दी मीक, फॉर दे शॅल इन्हेरिट दी अर्थ' - जीझस
16 Sep 2010 - 9:35 am | आजानुकर्ण
आमेन! :)
(सुशि न आवडणारा) आजानुकर्ण
सुशि"... बास्सं. आणखी काय !? याच धर्तीवर लोकप्रिय लेखक अरुण हरकारे यांच्या लेखनावर आधारित एची बास्सं आणखी काय? असा चर्चाप्रस्ताव टाकावा काय?
16 Sep 2010 - 6:30 pm | मी_ओंकार
सोबत गिरिजा कीर, मीना प्रभू, झालंच तर वि. आ. बुवा आणि हो महत्वाचे बाबा कदम यांना पण घ्याच त्या प्रस्तावात.
16 Sep 2010 - 6:43 pm | धमाल मुलगा
एवढी मोठी ब्यांडविड्थ घ्यायची म्हणताय, तर मग लीना मोहाडीकरांचंही नाव घ्या की नॉमिनेशनमधे. :D
15 Sep 2010 - 6:24 am | शुचि
आम्ही "हाय कम्बख्त तूने तो पी ही नही ..." गटातले ....
:(
15 Sep 2010 - 7:01 am | गोगोल
धागा उघडला (तोंडाला पाणी सुटून) की आता काहीतरी चांगले वर्णन वाचायला मिळेल. पण हे तर कुठल्यातरी लेखाकाबद्दल बोलतायत.
15 Sep 2010 - 7:47 am | चतुरंग
कॉलेजमधे असताना किंवा कदाचित त्याच्याआधी त्यांची बरीच पुस्तकं मी वाचली आहेत. कॉलेजकुमार असण्याच्या वयात आपल्याला हीरोगिरी करणारे नायक, गुप्तहेर, गुन्ह्याचे शोध वगैरेची ओढ असते. चटपटीत वाचायला मिळावे ही आकांक्षा असते. तरुणाईची वर्णने, प्रेमाचे धुंद त्रीकोण वगैरेचेही एक सुप्त आकर्षण असते. पण ते तितकेच. त्यानंतरच्या वयात जसजसे आपण इतर साहित्य वाचायला लागतो तसतशी ही धुंदी उतरायला लागते (किंवा लागायला हवी). जीवनाबद्दलची तत्त्वज्ञानं वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडी डायलॉग पेरुन वाचकांच्या आंगावर बाण मारल्यासारखी सोडणं म्हणजे जर उच्च लेखन असेल तर असो बापडे. 'दुनियादारी' हे पुस्तक मी दोन तीन महिन्यापूर्वी त्याबद्दल बरेच ऐकून घेतले पण खरं सांगू मजा नाही आला! कदाचित मी त्या वयाच्या टप्प्यावरुन पुढे निघून गेलोय म्हणा किंवा इतर काही पण खरंच मजा वाटली नाही (वेगळ्याप्रकारे मी 'दुनियादारी' शिकलो! ;) )
सुशिप्रेमींना मला दुखवायचे नाहीये पण माझं मत प्रामाणिकपणे मांडल्याशिवाय मला राहवलं नाही.
(कधीकाळी सुशि किंचित आवडलेला)चतुरंग
15 Sep 2010 - 8:06 pm | योगी९००
तुम्हाला सुशि आवडत नाही? म्हणजे तुम्हाला चेतन भगत ही आवडत नसणार...चला आमच्या कॅटागिरीतले कोणीतरी भेटले मला..
थोडेफार बोल्ड/ रोमान्स/सपेंन्स आणि तरुणाईची वर्णने..यामुळे तरूणांना सुशि आणि त्यांची पुस्तक आवडली..चेतन भगत सुद्धा हीच कॅटागिरी आहे. त्याला IT आणि engineeringच्या लोकांनी जास्त वर चढवले असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण IT च्या क्षेत्रात कोणी असा नसेल की त्याने चेतन भगत चे एखादे पुस्तक वाचले नसेल.
सुशिंच्या दुनियादारीबद्दल असेच वाटले. मलाही दुनियादारी काही अतिशय आवडलेले पुस्तक नाही. काही लोकं तर त्याचे पारायण करतात आणि "शोले २० वेळा पाहीला" च्या चालीवर १०-१२ वेळा हे पुस्तक वाचले..एकदा तर सुरूवातीपासून शेवटपर्यंत एका दमात वाचले असे सांगणारे भेटले आहेत. एका नातगलगाने त्याच्या मुलाचे नाव "श्रेयस" ठेवले ते ह्या पुस्तकाच्या नायकामुळेच... मी कॉलेजला असतानाच हे वाचले तरी सुद्धा तितके काही आवडले नाही. कदाचित जास्त प्रसिद्धी झाल्याने अपेक्षा वाढल्या असाव्यात.
सुशिप्रेमींना मला दुखवायचे नाहीये पण माझं मत प्रामाणिकपणे मांडल्याशिवाय मला राहवलं नाही.
मलाही असेच म्हणायचे आहे.
15 Sep 2010 - 8:54 pm | मधुशाला
IT च्या क्षेत्रात कोणी असा नसेल की त्याने चेतन भगत चे एखादे पुस्तक वाचले नसेल.
मी आहे...
बाकी सर्व +१०००००
सुशि कधीच आवडले नाहीत. आणि बाकीच्यांना 'भडव्यो ' वगैरे शिव्या देण्याएवढे तर मुळीच नाहीत.
16 Sep 2010 - 2:16 pm | धमाल मुलगा
कुडं सुशि आणि चेभ तुलना करुन र्हायले तुमी? :)
हां, 'बाकी शून्य'कार आणि चेभ ह्यांची तुलना असेल तर परफेक्ट!
>>थोडेफार बोल्ड/ रोमान्स/सपेंन्स आणि तरुणाईची वर्णने..यामुळे तरूणांना सुशि आणि त्यांची पुस्तक आवडली.
नाय हो दादा. ते बोल्ड रोमान्स साठी काकोडकर आन मेंगाजी काकडे होतं की राव. ;)
सस्पेन्स = येस! बरुबर बोल्लासा. त्यांच्या टैमाला जे लेखन प्रकाशित होत असे त्यावेळी सस्पेन्स थ्रिलर्स तेव्हढ्या पकड घेणार्या शैलीत लिहिणारे आणखी किती आणि कोण होते? है का नाय? :)
हां,आता जर कुणी सस्पेन्स थ्रिलर्स हे गोड गुलाबी/ दु:ख कुरवाळणारे/ रडरड करणारे/निव्वळ उदासवाणे असावेत अशी अपेक्षा ठेऊन असेल तर तो दोष कुणाचा? :)
तरुणाईची वर्णने = एकुण किती पुस्तकात तरुणाईची वर्णने किंवा अगदी पुस्तकंच तरुणाईला वाहिलेली आहेत सुशिंची? :)
>>त्याला IT आणि engineeringच्या लोकांनी जास्त वर चढवले असे माझे वैयक्तिक मत आहे.
लै वेळा सहमत!
>> कारण IT च्या क्षेत्रात कोणी असा नसेल की त्याने चेतन भगत चे एखादे पुस्तक वाचले नसेल.
ओ दादा...शिव्या द्यायचं काम नाय हां! आधीच सांगतोय. ;)
एकवेळ कमलेश वालावलकर वाचेन पण चेभ? च्यायला, लै कवतिकं ऐकुन ते फाईव्ह पॉइंट समवन वाचायचा प्रयत्न केला तर निव्वळ कंटाळाच आला. चतकोरभरही नाय वाचवलं आणि दिलं टाकून.
बाकी, चेतन भगत बद्दल क्रेझ आहे ती 'आम्हीपण विंग्रजी पुस्तकं वाचतो बरं का'वाल्यांची
>>मलाही दुनियादारी काही अतिशय आवडलेले पुस्तक नाही.
हॅपन्स! प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. जो दंगा करणारा असतो, बेफाम, बेफाट, अवखळ असतो तो दुनियादारीत स्वतःला नक्कीच सापडतो.
आता मला कोसला आज्याबात नाय आवडलं. निव्वळ थुकरटपणा वाटला. सो बी इट. ते माझं मत. कदाचित मला कोसला कळलंच नाही. कदाचित माझी ती एकलकोंडी निराशावादी मनोवृत्तीच नाही की ज्यामुळं तो कोशंट आपलासा वाटावा.
शिंपल :)
सोडुन सोडा वो. आमाला बी चांगली मान्सं समत्यात की राव :) आमाला ठौक है, तुमच्या मनाऽऽत काही नाही.
-(नित्या घोडके) ध.
16 Sep 2010 - 4:55 pm | चिगो
च्यामारी, खरंच धमाल हां धमुभौ.. (बाकी ते मेंगाजी काकडे म्हन्जे "पांढर्या कागदावर पिवळं" व्हते)
याच धर्तीवर लोकप्रिय लेखक अरुण हरकारे यांच्या लेखनावर आधारित एची बास्सं आणखी काय? असा चर्चाप्रस्ताव टाकावा काय?
टाका ना राव.. आपण पाणी घालणार नाही येव्हडंच..
16 Sep 2010 - 5:20 pm | छोटा डॉन
आमच्या अतिशय आवडत्या बाकी शुन्य आणि कमलेश वालावलकर ह्यांची कुठल्याही भिकारड्या लेखकाबरोबर तुलना करण्यांना "वपुवेड" लागो, त्यांची गर्लफ्रेन्ड किंवा बायको 'वपुप्रेमी' निघो आणि मुलगा साक्षात 'चेतन भगत्'ची पुस्तके वाचत मोठ्ठा ( आणि मठ्ठ ) होवो असा शाप देतो आम्ही.
अरे कायतरे चव ठेवा च्यायला.
- ( 'बाकी शुन्य'प्रेमी ) छोटा डॉन
16 Sep 2010 - 5:59 pm | धमाल मुलगा
अग्गायायायायाया....
हवं तर तुमच्या क.वा.ला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डे देऊन टाकु आपण. असली शापवाणी काय उच्चारु नका ओ.....
16 Sep 2010 - 7:21 pm | Pain
बाकी, चेतन भगत बद्दल क्रेझ आहे ती 'आम्हीपण विंग्रजी पुस्तकं वाचतो बरं का'वाल्यांची
अगदी बरोबर. आणि तसेच द माँक हु सोल्ड हिज फेरारी याबद्दलाही म्हणता येईल.
16 Sep 2010 - 7:27 pm | धमाल मुलगा
कदाचित.
नक्की ठाऊक नाही कारण माँक नाही वाचलं किंवा चाळलं. त्यामुळं माझं मत म्हणुन नाही सांगता येणार.
:)
23 Sep 2010 - 1:46 am | संदीप चित्रे
सहमत आहे !
सहसा मी पुस्तक अर्धवट वाचून सोडत नाही पण हे पुस्तक काय झेपलं नाही ब्वॉ !
18 Sep 2010 - 3:38 am | योगी९००
छान उत्तर दिलेस धम्या.. (जरी आपली ओळख नाही तरी उगाच धम्या म्हणावेसे वाटले)..
>>मलाही दुनियादारी काही अतिशय आवडलेले पुस्तक नाही.
हॅपन्स! प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. जो दंगा करणारा असतो, बेफाम, बेफाट, अवखळ असतो तो दुनियादारीत स्वतःला नक्कीच सापडतो.
कदाचित आमचा दंगा दुनियादारीत नसावा.. म्हणूनच मला दुनियादारीत मी सापडलो नाही. हॅपन्स !प्रत्येकाचा दंगा प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतो.
तरुणाईची वर्णने = एकुण किती पुस्तकात तरुणाईची वर्णने किंवा अगदी पुस्तकंच तरुणाईला वाहिलेली आहेत सुशिंची?
माझी सपशेल माघार..मी फक्त दुनियादारी आणि सुशिं च्या काही रहस्यमय कथा.(आता एकपण आठवत नाही) वाचल्या होत्या..कमी माहितीच्या आधारे काढलेले माझे विधान मी मागे घेतो..
माझी चुक हीच की मी उगाच सुशि आणि चेभ यांची तुलना केली. मला फक्त एकच म्हणायचे होते की चार माणसे म्हणतात की हे चांगले आहे म्हणून मी चांगले म्हणावे असे मला पटत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर ३ Idiots..पिक्चर तसा बरा आहे पण उगाच १०-१० वेळा पहायच्या लायकीचा नाही. पण जो भेटतो तो ३ idiots ची तारीफ करतो आणि अपेक्षा की मी सुद्धा चार चांगले शब्द बोलावेत...अरे बाबा तितका नाही आवडला....चेभ च्या बाबतीत पण तेच....मी सुद्धा five point someone वाचायचा आणि चेभ ला आवडून घ्यायचा प्रयत्न केला होता.. कंपनीच्या बसमध्ये किंवा कँटीनमध्ये चेभ किंवा तसल्या लिखाणांबाबत बोलणे म्हणजे एक फॅड होते..(आता तरी चेभ लोकाच्या मनातुन उतरतोय असे वाटले)...असेच एकेकाळी सुशिंच्याबाबतीत झाले होते. येताजाता लोकं दुनियादारीवरच बोलायचे..सतत तेच तेच ऐकल्याने मला कदाचित दुनियादारी इतकी आवडली नाही.
बाकी हे मेंगाजी काकडे कोण हो?
18 Sep 2010 - 2:51 pm | विशाल कुलकर्णी
धम्याकाका जाव दे रे... न्हान हायती त्ये आजुन ! त्यास्नी न्हाय कळणार सुशिची जादु ;)
16 Sep 2010 - 7:39 pm | रेवती
मलाही दुनियादारी नाही आवडलं तसंच शोलेही एकदा पाहिल्यावर पुन्हा पहावासा वाटला नाही. शोले तर एका बैठकीत मी पाहूच शकले नाही. पाच मोठ्ठे खादाडीचे ब्रेक्स घेउन संपवला तो सिनेमा.
19 Sep 2010 - 2:21 pm | अर्धवट
रंगा अन् खामा..
मला पण घ्या तुमच्यात..
दुनियादारी अगदी अलिकडेच वाचलं पण तसलं काही अपील व्हायचं वय गेलं असेल निघुन कदाचित म्हणुन कोरडाच राहिलो..
अर्थात ज्या वयात सुशी वाचायचे त्या वयात इतर बरंच काही जाणिवा अजुन विस्तारणारं हातात पडत गेलं.. हे सुदैव की दुर्दैव अजुन नाही ठरवता येत.
सुशि आवडतात
सुशि एक साहित्यीक म्हणून महान आहेत
सुशि महानच आहेत.
ही तीन वेगवेगळी गृहीतके आहेत, त्यावर खुप मोठी आणी वेगळी चर्चा होउ शकते. पण आमचे परममीत्र धमालरावजी यांनी इरोधी पार्टी स्विकारल्यामुळे सपशेल जाहीर माघार घेत आहे.. (हो.. उगाच उद्या खरडटंचाईमुळे जालमृत्यू नको व्हायला आमचा. ;))
15 Sep 2010 - 9:38 am | संदीप चित्रे
आवडत्या लेखकाबद्दल लेख आहे म्हटल्यावर तो आवडणं ओघाने आलंच :)
'सुहास शिरवळकर: असे आणि तसे' हे त्यांच्यावरचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक वाचलंत का?
नसेल तर जरूर वाचा.
मी 'दुनियादारी'वर लिहिलेल्या लेखाची लिंक इथे दिल्याशिवाय राहवत नाहीये :)
15 Sep 2010 - 9:49 am | JAGOMOHANPYARE
घरात आठवडाभर हाच विषय सुरु आहे... बायकोला अगदी बॅरिस्टर अमर विश्ब्वासच्या हिरिरीने पटवून दिले की सुशिंची पुस्तके का वाचायची ते.... आता तिने सुशिंची पुस्तके आणायला सुरुवात केली आहे..काल 'म्हणून' वाचायचे भाग्य लाभले...
आता 'फलश्रुती ' आणायला सांगितले आहे.... स्वतःच्या पुस्तकाबद्दल माहिती देणारे पुस्तक, मराठीतील एकमेव..
15 Sep 2010 - 10:28 am | फ्रॅक्चर बंड्या
सुहास शिरवळकर - माझाही आवडता लेखक ..
आणि लेखही आवडला
बर्याच माहित नसलेल्या पुस्तकांची नावे कळाली ...
धन्यवाद ..
15 Sep 2010 - 10:28 am | चिगो
हे मलाही मान्य आहे की "सुशि" लोक्कांना उच्च्-बिच्च वाटत नाही.. (हे नेमकं काय कंत्राट आहे, कोण जाणे. मी "कोसला" पुरस्कृत वगैरे म्हणुन वाचायला घेतली होती. अतिशय रेटत-कुंथत संपवल्यावर शेवटी मला तिच्यासाठी योग्य नाव सुचलं.... "ढकोसला" ! असो.) माझी चांगल्या पुस्तकाची व्याख्या म्हण्जे "जे वाचावंस वाटंत ते, आणि पुन्हा पुन्हा वाचावंस वाटेल ते".. जाऊ द्या.. रात्री अडीच वाजता डोक्यात आवडत्या लेखकानं थैमान घातल्यावर, झोपेतुन (?) उठून लिवंलय राव... कशाला टेंशन घेता ? म्हणून तर शेवटची लाईन टाकलीय ना..."दिवाना ही जाने...."
15 Sep 2010 - 10:36 am | चिगो
मी वाचला तुमचा "दुनियादारी" वरचा लेख... भन्नाट. थँक्स.. आणि पुस्तक मिळालं की लगेच गट्टम करणार.. तसा मी सुशिं "रवंथ"ही करतो..
@Pain, तोच तर प्रॉब्लम आहे भौ, नेटावर नाही मिळत.
15 Sep 2010 - 11:17 am | विंजिनेर
ह्महम...
सुशिंना त्यांचा एक लॉयल फॅनबेस आहे पण त्या पलिकडे त्यांची लोकप्रियता फारशी गेलेली दिसत नाही.
असो.
मला वैयक्तिक सुशि, गुरूनाथ नाईक (शिवाय ते 'काळा पहाड' वाले कोण?) १-२ पुस्तकांपलिकडे फार आवडले नाहीत.
वर म्हटल्या सारखं इतर प्रकारचे लेखन वाचल्यावर आवडी निवडी कदाचित बदलल्या असाव्यात.
21 Sep 2010 - 4:57 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>शिवाय ते 'काळा पहाड' वाले कोण?
बाबुराव अर्नाळकर ना ??
15 Sep 2010 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार
___/\___ सुंदर लेखन.
मात्र एक गोष्ट खटकली ती म्हणजे लेखनात 'हृदयस्पर्श' चा उल्लेख नाही. "वास्तविक मरणारा तुझ्या दाराशी बेवारशी असतो" सारखी कविता कशी विसरलात मालक ?
समांतरचा देखील उल्लेख नाही. समांतरवर आधारलेली सिरीयल म्हणुन त्या 'कशाला उद्याची बात' मध्ये जी कादंबरीची चिरफाड केली आहे ते बघुन स्फोट झाला डोक्यात.
18 Sep 2010 - 2:56 pm | विशाल कुलकर्णी
पराशी १००% सहमत
अगदी हृदयस्पर्षच्या लौकीक आणि मैत्रालीच्या जोडीशिवाय सुशिचा कोरम पुर्ण होवुव शकत नाही. ढ'कोसला' आवडणार्यांनी ती वाचावी खुशाल, आम्हाला आपला सुशिच हवा ;)
15 Sep 2010 - 2:01 pm | मराठमोळा
लेख मस्त काळजातुन आला आहे नक्की.. :)
पण मी कर्मदरिद्री.. आजपर्यंत एकही सुशि वाचलेलं नाही.. :(
( अगदी खरं सांगायचं तर सुशि वाचुन, जापनीझ सुशि डिश डोळ्यासमोर आली.. :( (आजच दुपारी खाल्लेली ) ) :(
15 Sep 2010 - 3:58 pm | अमोल मेंढे
समांतर आहे का हो कुणाकडे? अर्धीच वाचायला मिळाली होती १९९९/२००० च्या आसपास. अजुन्ही पुर्ण न वाचल्याची हुरहुर आहे.
17 Sep 2010 - 4:07 pm | कानडाऊ योगेशु
शं. ना च्या एका कथा संग्रहात समांतरचेच कथाबीज असलेली कथा वाचली होती.चार-पाच पानासंमांतर""संमांतर" घडवले होते.दोन्हींमधल्या साम्याने मला बुचकळ्यात पाडले होते.(अजुनही राहुन राहुन वाटते कि कदाचित ह्या दोघा लेखकुंनी कुठल्या परकिय कादंबरीवर हात साफ केला असावा.)
अरुण हरकारेंच्या सगळ्या कादंबर्यांची नावे क ने सुरु होतात ना?
सु.शिंची पुस्तके पौगुंडावस्थेत वाचलेली असल्याने तेव्हा ती फार आवडुन गेली.(विशेषतः त्यातील रोमॅन्टीक म्हणा वा लैंगिक वर्णनांमुळे.)
कुणी सु.शिंचे महापर्व वाचली आहे काय?
(प्रौढ बालक) योगेशु
15 Sep 2010 - 4:31 pm | चिगो
मीपण सगळी पुस्तकं नाही वाचू शकलो सुशिंची... काही काही तर हातीच सापडत नाही. एकदा पुण्यातून एकगठ्ठा उचलून आणायचीयंत सगळी, मग राम राम करायला मोकळे इथे बसुन..
15 Sep 2010 - 5:18 pm | गणेशा
येता .. जाता. हे पुस्तक मी २००६ पासुन शोधत आहे, मिळत नाहीये.
सगळे पुणे पालथे घातले होते पण नाहि मिळाले.
क्रुपया कोठे मिळेल ते सांगा.
बाकी तुमच्या मुळे काही नविन नावे कळाल्याने धन्यवाद.
या महिन्यातच घेतो काहि बूक्स.
अवांतर -
पुन्यातुन काही बूक्स लागत असतील तर सांगावे मदत करेन.
मेहता पब्लिकेशन्चे पुस्तक असेन कुठले तर ३० % डिस्काउंट ने घेतो मी . तुम्हाला पण देयीन
प्लस आसाम ला देयीन पाठवून [ :)]
-
23 Sep 2010 - 1:53 am | संदीप चित्रे
'जाता..येता' असं नाव आहे !
15 Sep 2010 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार
सुशींची पुस्तके उत्तम स्थीतीत मिळण्याची काही खास ठिकाणे आहेत :-
१) सकाळी व संध्याकाळी सरस्वती मंदीर प्रशालेच्या प्रवेशद्वारा शेजारी, बाजीराव रोडवर बसणारे श्री. वसंतराव आठवले. ह्यांच्याकडे अनेकानेक जुन्या व दुर्मीळ पुस्तकांचा खजीना मिळु शकेल. काही वेळा हे लक्ष्मीरोड वरिल विज बील भरणा केंद्राशेजारी देखील सकाळी स्टॉल लावतात. ह्याच स्टॉल शेजारी अजुनही एक पुस्तकांचा स्टॉल लागतो. (ह्या वेळच्या संमेलनाचे दिप प्रज्वलन करुन उदघाटन ह्याच आठवले काकांच्या हस्ते झाले होते)
२) मंडई पोलिस चौकी शेजारी गेली अनेक वर्षे चालु असलेले जुन्या पुस्तकांचे दुकान.
15 Sep 2010 - 5:31 pm | llपुण्याचे पेशवेll
मला सुशि म्हटल्यावर खाद्यपदार्थ सुशि आठवला.
15 Sep 2010 - 8:52 pm | अनिल हटेला
सुशि .............
आमचेही आवड्ते लेखक.........:-)
लेख अगदी सुशि प्रेमीनेच लिहीलाये हे पदोपदी जाणवलं...
असो...
जाई,तलखी,बरसात चांदण्याची ह्या आणी बर्याच पुस्तकांची कैक पारायणे झाली आहेत ..
अजुनही होतच रहातील...
दिवाना ही जाने दिवाने की हालत....! हे खास आवडलं...
दीवाना ;-)
16 Sep 2010 - 6:09 am | शिल्पा ब
त्यांचे पुर्ण नाव काय? म्हणजे मागताना काय मागायचे?
16 Sep 2010 - 2:18 pm | धमाल मुलगा
सुहास शिरवळकर (त्यांच्या वडिलांचं नाव न्हाई ठौक बर्हं का! मापी करा. ;) )
16 Sep 2010 - 9:58 am | सविता
हातिच्चा...... मला वाटलं मस्त पदार्थ त्याची रेसिपी, फोटो बघायला मिळणार.
वेलं तशी मला सुशींची पस्तकं चांगली वाटायची त्या वेळी, माझ्या लायब्ररी मध्ये असलेली त्यांची सगळी पुस्तकं मी तेव्हा वाचून काढली.
अमर विश्वास, दारा बुलंद, फिरोझ......... सगळे बरेच माहितीतले.
पण एक तेव्हा ही माहीत होतं आणि आत्ता ही... वाचून बंद केल्यावर फार लक्षात ठेवावं, मास्टरपिस म्हणावं असं काही त्या कथांमध्ये नसायचं. पुस्तक बंद केल्यावर पण कायम मनात राहिलं ते...श्री. ना. , व.पु. यांचेच लेखन!!!!
तरी मी म्हणेन... su.shi. had his own style and hos own fans.
16 Sep 2010 - 1:52 pm | चिगो
सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.. बाकी जे बोलायचे होते ते आधीच्याच प्रतिसादात बोललोय...
16 Sep 2010 - 2:34 pm | धमाल मुलगा
तोडलंस मित्रा...जिंकलंस जिंकलंस! :)
रात्री दोन-अडिच वाजता उठून सुशिच्या आठवणींमुळे काहीतरी लिहायला बसणारा दिवाना म्हणजे साला आपोआपच आपली दोस्तीच झाली राव. :)
बाकी, आपल्याकडं रहस्यकथाकार असा एकदा शिक्का बसला की त्याला साहित्यिक मंडळीत आणी त्यांच्या बगलबच्च्यांकडून त्या लेखकाला अस्पृष्य ठरवत असावेत की काय असा प्रश्नच पडतो. ह्या दुर्दैवाचे धनी एकटा सुशि नव्हता (येस, मी सु.शि.ला अरेजारेच म्हणतो..जवळचा मित्रच वाटतो मला.) अगदी बाबुराव अर्नाळकरांनाही तेच गणित लागू पडतं.
बाकी, 'तो सु.शि.ना? ह्यॅ:! काय साहित्यमूल्य आहे?' वगैरे गफ्फा करणारे स्वतःची साहित्यमुल्यी पुस्तकं थप्प्या रचुन त्यावर बेडशीटं पांघरुन लपवतील आणि असुयेनं अजुनही निघणार्या सुशिच्या पुस्तकांच्या आवृत्यांना नाकं मुरडत राहतील...कोल्ह्याला द्राक्षं आंबट! दुसरं काय?
बॉलिवुडातल्या त्या अंधार्या, मेणचट दिसणार्या तथाकथित आर्टफिल्मांसारखा सुशि तथाकथित 'क्लास' वगैरेच्या भानगडीतच नव्हता. तो आहे 'मास'चा..अगदी जवळचा..आपला!
भेटलं की मनमोकळेपणानं गप्पा मारणारा.. उगं अक्कल शिकवणार्या खडुस मास्तरांसारखा नाही, तर शाळेत खिशातुन चोरुन आणलेल्या गोट्या वर्गात पडताना पटकन ओंजळ धरुन आपल्याशी मैत्री निभावणारा दोस्त!
आता क्लासवाल्यांना 'मास' ला नाकं मुरडायला काही कारण लागतं का? तेच होतं सुशिबद्दल.
>>जाने दो, दिवाना ही जाने दिवाने की हालत....!
+++++++++++९८७६५४३२१०
16 Sep 2010 - 4:23 pm | सुहास..
मात्र एक गोष्ट खटकली ती म्हणजे लेखनात 'हृदयस्पर्श' चा उल्लेख नाही. "वास्तविक मरणारा तुझ्या दाराशी बेवारशी असतो" सारखी कविता कशी विसरलात मालक ? >>>
+१
समांतरचा देखील उल्लेख नाही. समांतरवर आधारलेली सिरीयल म्हणुन त्या 'कशाला उद्याची बात' मध्ये जी कादंबरीची चिरफाड केली आहे ते बघुन स्फोट झाला डोक्यात.
+१००००००००१/-
निदान ??
सॉरी सर ??
16 Sep 2010 - 5:14 pm | चिगो
तेव्हा जे डोस्क्यात आलं ते लिहीलं दोस्ता.. "निदान" म्हणजे ती आयुर्वेदांच्या वैद्य आणि त्यांच्या मुलावर होती तीच ना? असेल तर "साहित्यमुल्य" वाल्यांना दे जरा..
"सॉरी सर" ची कन्सेप्ट तर जबराट. तिला चोरुन त्यावर एक हिंदी पिक्चरही बनला होता. (त्यात त्या ठरकी बॉसचा रोल बोद्या ऋषी कपूरनी केला होता.) पण साल्यांनी नाव नव्हतं टाकलं सुशिंचं (तेवढ्यासाठी टायटल्स पाहीली मी राव !)...
बाकी जे जे राहीलं त्याच्यासाठी सॉरी...
16 Sep 2010 - 2:50 pm | विसोबा खेचर
आमचा पास..!
सुशिंनी लिहिलेलं एक अक्षरही आम्ही वाचलेलं नाही त्यामुळे काहीच भाष्य करू शकत नाही..
(पुलं, श्री ना, दळवी, बाबा कदम, चि वि जो प्रेमी) तात्या.
16 Sep 2010 - 3:23 pm | नीधप
तेव्हा तेव्हा सुशि एन्टरटेनिंग नक्कीच होतं पण मग खूप सारं रिपिटेशन वाटायला लागलं. ऑब्व्हियसही.
अर्थात कॉलेजच्या वयात त्या भाषेनेही गारद व्हायला झालं होतं.
मुलीच्या जातीने टाइप बोलणी पण खाल्ली होती सुशीची वाक्य वापरण्याच्या नादात. हल्ली एवढ्यात वाचलं नाही आणि तेवढंच आवडेलच याची खात्रीही नाही.
हा मात्र लटकंती कन्सेप्ट जाम धमाल होती. इतर गुन्हेगारी कथांपेक्षा वेगळी.
16 Sep 2010 - 3:27 pm | प्राजक्ता पवार
सुशि. माझेदेखील आवडते लेखक आहेत. छान लेख लिहलाए. माहीत नसलेल्या पुस्तकांबद्दल देखील कळले.
तुम्ही दिलेला प्रतिसाद देखील आवडला.
16 Sep 2010 - 6:59 pm | कच्चा पापड पक्क...
सुहास शिरवळकर - माझेही आवडते लेखक ..
समथिग आणि सनसनाटि कोणी वाचल आहे का?
16 Sep 2010 - 7:09 pm | धमाल मुलगा
वा:!
हा काय प्रश्न झाला का राव? :)
17 Sep 2010 - 1:38 am | माजगावकर
यकच नंबर ले़ख मित्रा!! मी पण सुशिंचा अगदी चार पाती पंखा आहे..
रात्री दोन-अडिच वाजता उठून सुशिच्या आठवणींमुळे ऊठून तु हा लेख लिहिलास.. आवडत्या लेखकाशी असलेल्या या तुझ्या मनाच्या प्रामाणिकपणाला आपला सलाम!
मी १६/१७ वर्षांचा असताना मला आठवतंय.. मी कसबा पेठेत रहात असे आणि माझ्याहून एखाद-दोन वर्षांनं मोठी माझी मावस बहिण प्रभात रस्त्यावर.. माझ्या आजोबांकडे पुणे मराठी ग्रंथालयाचं आजीवन सभास्यद्त्व होतं.. एका वेळेस २ पुस्तके घेऊ शकायचो मी.. तर बरोब्बर ९ वाजता सकाळी मी तिथे जाऊन (बहिणीशी बोलुन मग कुठली वाचायची आहेत आता हे आधी ठरवुन) मिळतील ती सुशिंची २ पुस्तके घ्यायचो.. त्यातले एक तिला द्यायला मग सायकल हापसत तिच्या घरी मग आपल्या घरी.. शक्यतो दिवसभरात वाचून संपवायचं अन मग रात्री किंवा दुसर्या दिवशी आम्ही अदला-बदल करीत असु..
अगदी रोज नाही पण जमेल तसं आणि तेव्हा असं करुन आम्ही दोघा बहीण-भावांनी त्या वेळेस मराठी ग्रंथालयात उपलब्ध असलेली सगळी सुशिंची पुस्तके वाचली होती.. नंतर पुढे शिक्षण, इतर व्याप (आणि आजोबा गेल्याने आजीवन सभास्यद्त्व संपल्याने) हा शिरस्ता हळूहळु बंद झाला..
माझ्या एका जिगरी दोस्ताच्या काकाचं तुळशीबागेत दुचाकीचं गॅरेज होतं.. (आता आहे का नाही माहीत नाही.) तिथे सुशि त्यांची बॉबी राजदूत अधूनमधून दुरुस्तीला आणत असत. एकदा त्यानं मला सांगितलं, गाडी आलीये आणि ती घ्यायला स्वतः 'ते' येणार आहेत.. त्या वेळी मी सिंहगड रस्त्यावर रहात होतो.. जिवाच्या आकांतानं सायकल पिटाळत गेलो राव, पण तिथे गेल्यावर कळलं नेमकं, काही कारणास्तव ते येऊ शकणार नव्ह्ते.. मित्र म्हटला "काकानं गाडी त्यांच्या घरी नेऊन सोडायला सांगितली आहे.." मनात म्ह्टलं, इथे येऊ शकले नाहीत म्हणजे निदान घरी नक्कीच भेटू शकू त्यांना.. मग काय, त्याच्या मागे बसून (बसल्या बसल्या जागेवर उड्या मारत) नारायण पेठेत दिलीपराज प्रकाशनाच्या वर असलेल्या त्यांच्या घरी गेलो.. पण माझ्या कपाळ-करंटेपणाचा अजुन एक अनुभव मला नेमका त्याही दिवशी यायचा होता.. नव्ह्तेच ते घरी! असो.. तर अशी आयुष्यात मिळालेली (पुसट्शी का होइना) माझ्या त्या वेळच्या साहित्य-दैवताला भेटण्याची संधी हातातून गेली!!
प्रतिसादाच्या मानानं जास्तच लिहीलं गेलं खरं, पण हा असा मस्त लेख वाचून १७/१८ वर्षांपुर्वीचे 'सुशि'मय झालेले दिवस परत एकदा 'दुनियादारी' वाचायला घेतल्यासारखे एकदम समोर आले..
इतक्या वर्षांनी इथे आहे जवळजवळ मागच्या वर्षापासुन.. कुटूंब नंतर आले.. तिला येताना "अप्पा-बळवंत चौकातून मिळतील तेवढी सुशिंची पुस्तकं घेऊन ये" असं सांगितलं होतं.. जाता-येता, शोला, वास्तविक, दुनियादारी, ह्रदयस्पर्श, आणि इंन्सानियत एवढीच मिळाली..
17 Sep 2010 - 3:50 pm | चिगो
प्रतिसादाच्या मानानं जास्तच लिहीलं गेलं खरं,
अज्याबात नाही भाऊ... त्यांच्या किंवा त्यांच्या पुस्तकांनी वाहावून जाणं, ह्या साठीच मी "दिवानापण" म्हटलंय..
थँक्स. मी हे का लिहीलं, हे तुमच्या सारख्यांनाच समजू शकतं.
17 Sep 2010 - 5:48 pm | विसुनाना
सुशिंच्या झॅन्टामॅटिक रहस्यमय कादंबर्या पहिल्यांदा लहानपणी माझ्या काकांच्या घरी वाचल्या.
मग हळूहळू तरुणाईवरच्या, त्यानंतर गंभीर होत जाणार्या कादंबर्या वाचल्या.
अमुक हे गल्लाभरू,अमुक हे उच्च - असले काही मापदंड न लावता वाचत होतो.
तारुण्यात सुशिंचे लेखन जवळचे वाटत होते. स्वप्नरंजनात्मक असले तरी साहसी आणि मनोरंजक खोटे लेखन, कधी गंभीर असले तरी माझ्या अनुभवमर्यादेतले खरे लेखन.
इतरही लेखक वाचत होतो. पण सुशि वाचायला कधीच अवघड वाटले नाहीत.
म्हणूनच वाचकांची रसना त्यांनी रिझवली असावी.
***
सुशिंची प्रत्यक्ष ओळख झाली. लेखनातून दिसणारा लेखक आणि प्रत्यक्षात दिसणारा माणूस यात काहीच फरक नव्हता.
किंचित बसकट बांधा, मोठे आणि मिश्किल डोळे, गोलसर हसतमुख चेहरा, केसांची देवानंद स्टाईल, सफाचट मिशा, काहीशी पुढे आलेली हनुवटी - अजूनही डोळ्यासमोर आहे. एका जवळच्या नातेवाईकांच्या वाड्यात सुशि त्यांच्या लहानपणापासून येत-जात. त्या नात्याचीही एक जवळीक होती.त्यांचा गुरुवारातला वाडा पाडून बिल्डिंग होणार होती तेव्हा ते डहाणूकर कॉलनीत रहायला गेले होते. तेव्हा त्यांच्या घरी मित्रांसमवेत एक दिवस मुक्काम ठोकला होता. माणूस साधासुधा आणि मोठा गोष्टीवेल्हाळ. मस्त गप्पा मारल्या होत्या.
अशा अनेक भेटी झाल्या.कधीकधी माझ्या गावीसुद्धा.
***
त्यांच्या एका कथेवर मला एकांकिका करायची होती. (मृगया).त्यासाठी त्यांनी दिलेल्या परवानगीचे हस्तलिखित पत्र (इन्लँड) माझ्याकडे आहे.
शीर्षरेषा नसलेल्या वळणदार हस्ताक्षरात खास त्यांच्या स्टाईलने लिहिलेले. शेवटी त्यांची सुप्रसिद्ध लप्फेदार सही - 'सुशि' अशीच.
***
नंतर सुशिंना अभिजन फारसे मानत नाहीत, लेखक म्हणून त्यांना फारसा मान नाही हे कळू लागले. आज मला सुशिंचे ते लेखन आवडेल अशी खात्री नाही. हा माझ्या वाढलेल्या वयाचा, त्यांच्या लेखनाच्या दर्जाचा आणि समाजाच्या मतांचाही परिणाम आहे.
पण त्यांच्या कादंबर्या वाचण्यासाठी लायब्ररीत वेटिंग असे - हे खोटे नाही. त्यांच्या काळात फक्त लेखनाच्या मानधनावर गुजराण करणारा तो मराठीतला पहिला लेखक होता.
'द मीक शाल इन्हेरिट द अर्थ' हे म्हणणे जितके खरे आहे तितके हेही खरेच की 'महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती' - दृक्-श्राव्य माध्यमाच्या महापुराने मायमराठीतील पुस्तकांचे वाचन बंद पडण्याच्या आजच्या काळात मराठी वाचनाला उर्जितावस्था देण्यासाठी पुन्हा मराठी लेखकांत एखादा सुशि निर्माण व्हावा आणि त्याने ग्रंथालयांकडे वाचकांना खेचून आणावे असे वाटते.
***
17 Sep 2010 - 6:20 pm | धमाल मुलगा
ज्जे ब्बात विसुनाना!
मस्त.
17 Sep 2010 - 7:03 pm | प्रभो
असेच म्हणतो.. :)
17 Sep 2010 - 6:22 pm | अवलिया
मस्त प्रतिसाद. :)
17 Sep 2010 - 7:06 pm | चतुरंग
एकेकाळी सुशिंनी वेड लावले होते हे खरेच. लायब्ररीतली त्यांची पुस्तके फाटून, बायंडिंग खिळखिळे झालेले असे आणि नोंदणीकार्डे भरुन गेलेली असत असे वाचनभाग्य फारच थोड्या इतर लेखकांना मिळते हेही खरेच. सुशिंचा आपला असा एक चाहतावर्ग होता आणि आहे हे सुद्धा मान्य करायलाच हवे.
थोडक्यात, त्यांचे स्वतःचे असे स्थान त्यांनी मराठी साहित्यात निर्माण केलेले आहे हे निर्विवाद मग ते कोणाला पसंत असो वा नसो.
चतुरंग
17 Sep 2010 - 8:18 pm | माजगावकर
तुमचा हेवा वाटतो विसुनाना!
कधी बघायला मिळेल का हो?
17 Sep 2010 - 8:21 pm | धमाल मुलगा
>>कधी बघायला मिळेल का हो?
स्कॅन करुन टाकाल का हो इथे? :)
18 Sep 2010 - 9:16 am | नगरीनिरंजन
दुसर्याच क्षणाला बॅ. अमर विश्वासची डॅमलर रस्त्यावरुन भरधाव धावत होती
किंवा
फिरोज इराणीचे हात हलले आणि काही कळायच्या आतच ते चारही जण भुईसपाट झालेले होते.
किंवा
दारा बुलंदची थंड नजर वाळवंटातल्या रणरणत्या दुपारीही त्याला हीव भरवून गेली
अशी आणि अशा टाईपची वाक्यं त्याकाळी (म्हणजे वय वर्षे १४-१६ च्या आसपास) भारी वाटायची पण आता का कोण जाणे, मजा नाही येत ते वाचून.
19 Sep 2010 - 12:27 pm | चिगो
बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण अजूनही ही पुस्तकं वाचतांना "वेळ चांगला गेला"असं वाटतं, आणि ह्या व्यतिरीक्तही त्यांनी बरंच लिहीलय, ज्यासाठी मी "वर्सटॅलिटी" बद्दल बोललोय..
24 Sep 2010 - 10:09 am | विशाल कुलकर्णी
@नगरीनिरंजन.....
एवढ्या सगळ्या विदेशी गाड्यांची नावेही त्या वयात सुशिंमुळेच कळली हो....
त्यात अमरची डॅमलर, गोल्डीची क्रॉसली, फिरोजची स्पीड ब्रेक, मंदारची आता आठवत नाही, पण डॅनीची यलो कलरची पाँटेक मात्र आठवते. :)
फिरोजचे हात हलले.... (त्यामागची ती बैदुलाची कन्सेप्ट कल्लाच होती)...
पण दारा बुलंदने हाताच्या नसा कडक केल्या आणि त्या माजलेल्या रेड्याच्या पोटावर मारला, दुसर्याच क्षणी त्याचा हात रेड्याचे पोट फाडुन आत शिरला हे वाचुन मात्र डोळे फिरले होते... पण आमच्या त्या वयात सुशिंनी काहीही लिहीले तरी ते माफ होते ;)
30 Aug 2013 - 1:46 am | कपिलमुनी
चित्रपटापूर्वीचा सुशिं चा डाय हार्ड फॅन धागा वाचून मजा आली ...
30 Aug 2013 - 3:55 am | धन्या
या धाग्यावर उल्लेख केलेली कमलाकर वालावलकरांची "बाकी शुन्य" आऊट ऑफ प्रिंट असल्यामुळे खुप वाट पाहावी लागली. वाचल्यानंतर थोडं भारावल्यासारखं जरुर वाटलं. पण थोडाच वेळ.
बाकी "बाकी शुन्य", रत्नाकर मतकरींची "अॅडम" आणि किरण नगरकरांची "सात सक्कं त्रेचाळीस" या तिन्ही कादंबर्या एकाच साच्यातून काढल्यासारख्या वाटल्या.
30 Aug 2013 - 5:51 pm | भ ट क्या खे ड वा ला
हृद्य पिळवटुन घ्यायचंय, वाचा मग दुनियादारी, कल्पान्त, क्षितिज, दास्तान, झूम...
हृद्याला भोकं पाडून घ्यावीशी वाटतंय? उचला जाई, तलखी, दास्तान, मधुचंद्र, स्वीकार, तलाश, देवकी पैकी कुठलीही..
कोवळ्या प्रेमाची हळुवार फुंकर हवीय, घ्या मग बरसात चांदण्यांची, तुकडा तुकडा चंद्र, कोवळीक वगैरे..
सामाजिक वगैरे हवीय, आहे ना प्रतिकार, कळप आणि बर्याच इतर..
कोर्ट-रूम ड्रामा हवा असेल तर अमर विश्वास हाजीर हो..
आणि हो , अमर विश्वास च्या पहिल्या कादंबरीत " पेरी मेसन' /,स्टेनले गार्डनर यांचा आधार घेतला हे सांगण्याचा प्रामाणिक पणा पण होता सुशि कडे मला वाटत पुस्तकाचे नाव "वंडर ट्वेल्व "
चिगो तुमच्याशी १ दम सहमत.