फ्लॅंडर्सची फुलं (भावानुवाद)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
20 Sep 2010 - 4:34 am

नुकताच धनंजयने केलेला फ्लँडर्साच्या रणामध्ये हा उत्तम अनुवाद वाचला. धनंजयने आकारबंध जसाच्या तसा ठेवून, कवीप्रमाणेच मोजके शब्द वापरून ते भाषांतर केलेलं आहे. मात्र ती बंधनं पाळताना मूळ कवितेची धार थोडी बोथट झाली असं मला वाटलं. ती धार तशीच ठेवण्यासाठी मी भावानुवाद केलेला आहे. अर्थातच त्यासाठी कवितेचे काही शब्द, रचना व संकल्पना बदलाव्या लागल्या आहेत. (उदाहरणार्थ मूळ कवितेत खड्ग, भाले यांचा उल्लेख नाही...) ओळी वाढलेल्या आहेत. मूळ कवितेतलं मीटर बदलून आलेलं आहे.

या दोन अनुवादाच्या अनुषंगाने कवितेचं भाषांतर, रूपांतर म्हणजे काय ही चर्चा व्हावी अशी इच्छा आहे.

फ्लॅंडर्सची फुलं

केशर पिवळ्या फुलाफुलांच्या आज बहरल्या बागा
क्रुसाक्रुसांच्या रांगांमधल्या भरून गेल्या जागा
फ्लॅंडर्सच्या कुरणांवर लपते अमुचि मूक निशाणी
स्वैर वरूनी पक्षी फिरती, अजून त्यांची गाणी
कानी पडती खाली भेदुन सरबत्तीची गाज
रक्तथेंब मोहरून झाले केशर पिवळे आज

मुडदे आम्ही जरी अता पण कोणे एके काळी
प्रभा भोगली, सांज पाहिली या देही या डोळी
प्रेमाने किति चषक रिचवले, किती पाजले प्याले
अधिर अधर स्पर्शाने डोळे किती लाजरे झाले
भोगुन, साहुन अता पहुडलो फ्लॅंडर्सच्या या माळी
केशर पिवळ्या ठिपक्यांची अन हिरवी चादर ल्याली

उचला खड्गे, झेला भाले, सोडु नका शत्रूला
क्लांत हतांनी देतो घ्या जी अम्ही वाहिली ज्वाला
उंच धरूनी पेटत ठेवा अमुच्या दग्ध मशाली
शपथ तुम्हा फ्लॅंडर्सच्या भूची प्रतारणा जर केली
स्वस्थ न राहू, उखडुन येऊ क्रुसाक्रुसांच्या रांगा
केशर पिवळ्या फुलाफुलांच्या जरी बहरल्या बागा

________
In Flanders Fields
By: Lieutenant Colonel John McCrae, MD (1872-1918)
Canadian Army

In Flanders Fields the poppies blow
Between the crosses row on row,
That mark our place; and in the sky
The larks, still bravely singing, fly
Scarce heard amid the guns below.

We are the Dead. Short days ago
We lived, felt dawn, saw sunset glow,
Loved and were loved, and now we lie
In Flanders fields.

Take up our quarrel with the foe:
To you from failing hands we throw
The torch; be yours to hold it high.
If ye break faith with us who die
We shall not sleep, though poppies grow
In Flanders fields.

कवितावाङ्मय

प्रतिक्रिया

खूप आवडला. माझी आवडण्याची कारणं - गेयता, मधुरता, कवितेशी (कवितेच्या भावाशी) राखलेलं इमान तीन्ही

>> अधिर अधर स्पर्शाने डोळे किती लाजरे झाले>>
.....!!! ... आय हॅव्ह नो वर्ड्स फॉर इट्स ब्युटी

>> शपथ तुम्हा फ्लॅंडर्सच्या भूची प्रतारणा जर केली
स्वस्थ न राहू, उखडुन येऊ क्रुसाक्रुसांच्या रांगा
केशर पिवळ्या फुलाफुलांच्या जरी बहरल्या बागा>>

सुरेख भावानुवाद!!!

चतुरंग's picture

20 Sep 2010 - 5:46 am | चतुरंग

अतिशय गेय, साधा सोपा आणि प्रभावी भावानुवाद.
मीटरचे स्वातंत्र्य, कल्पनांचे स्वातंत्र्य भरपूर घेवूनही मूळ कवितेचा अर्क आणण्यात मास्तर यशस्वी झाले आहेत!
बहोत खूब!

चतुरंग

पैसा's picture

20 Sep 2010 - 8:12 am | पैसा

आणखी लिहिलं तर द्विरुक्ति होईल.

नंदन's picture

20 Sep 2010 - 5:49 am | नंदन

भावानुवाद अतिशय आवडला. निवडलेले मीटरही अधिक जोश/वीरश्रीपूर्ण आहे.

बाकी कवितेचं भाषांतर/रूपांतर करतेवेळी त्यात गद्यापेक्षाही अधिक 'लॉस्ट इन ट्रान्स्लेशन'(!) होत असावं. (संपूर्ण अर्थ समजत नसला तरी) वानगीदाखल गीतांजलीतल्या मूळ बंगाली कविता आणि त्यांचे टागोर/यीट्स द्वयीने केलेले इंग्रजी भाषांतर वाचून पहावे. मूळ कवितांतला अनुप्रास, नादमयात भाषांतरात पार हरवल्यासारखी वाटते. याच विषयावरचं हे सुरेख छोटेखानी स्फुट आठवलं.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Sep 2010 - 7:57 am | llपुण्याचे पेशवेll

मस्तं. तुम्ही केलेला भावानुवाद भावला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2010 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जी, भावानुवाद आवडला.

मस्त कलंदर's picture

20 Sep 2010 - 11:41 am | मस्त कलंदर

आवडला हो भावानुवाद!!!!

श्रावण मोडक's picture

20 Sep 2010 - 1:52 pm | श्रावण मोडक

+३

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2010 - 6:50 pm | नगरीनिरंजन

+ ४

नितिन थत्ते's picture

20 Sep 2010 - 12:05 pm | नितिन थत्ते

आवडला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2010 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावानुवाद आवडला......!

-दिलीप बिरुटे

दत्ता काळे's picture

20 Sep 2010 - 12:11 pm | दत्ता काळे

भावानुवाद आवडला.

विसुनाना's picture

20 Sep 2010 - 3:16 pm | विसुनाना

जॉन मॅक्क्रे जर मराठी भाषिक असता तर त्याने ही कविता अशीच लिहिली असती.

धनंजय's picture

20 Sep 2010 - 5:04 pm | धनंजय

वेगळ्या भावाची फुले ल्यालेला हा अनुवाद आवडला.

भडकमकर मास्तर's picture

20 Sep 2010 - 5:20 pm | भडकमकर मास्तर

सुंदर.. गुरुजी...
मजा आली...
पाठ करून म्हणावीशी वाटली / वाटते आहे...

अजून अशाच कविता येऊद्या

मुक्तसुनीत's picture

20 Sep 2010 - 8:59 pm | मुक्तसुनीत

उत्तम अनुवाद.

प्राजु's picture

20 Sep 2010 - 11:00 pm | प्राजु

साधे सोपे आणी गेय.. तितकेच प्रभावी.
खूप आवडली.

विसोबा खेचर's picture

21 Sep 2010 - 3:30 pm | विसोबा खेचर

किल्लास..!

चित्रा's picture

23 Sep 2010 - 3:52 am | चित्रा

कविता आवडली.

इन्द्र्राज पवार's picture

23 Sep 2010 - 11:57 am | इन्द्र्राज पवार

श्री.घासकडवी यांनी हा एक पायंडा (जो मिपावरील ललितलेखनाच्या सीमा रूंदावण्यासाठी खूप उपयुक्त शाबीत होऊ शकतो) पाडला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे असेच म्हणावे लागेल. एक सदस्य एका 'कविते'चा भावानुवाद देतो, तर दुसरा सदस्य तिथे आपली प्रतिक्रिया न देता त्याने आपल्या 'नजरे'तून ले.कर्नल पदावर काम केलेल्या मूळ कवीने कवितेच्या उद्देश्याला कशा रितीने 'पाहिले' असेल हे कवितेच्या दुसर्‍या भावरूपा - अन् तेही पहिल्या सदस्याच्या कविता अनुवादाला/रुपांतराशी अजिबाट फटकून न वागता - द्वारे इथे प्रकटतो....ह्या सार्‍या बाबी लिलिच्या फुलागत मनविभोर करणार्‍या आहेत.

भावानुवादाचा विचार करताना [मी रूपांतर्/भाषांतर मुद्दाम म्हणत नाही] मीटरचा प्रश्न कळीचा होत नाही, कारण मुक्तकाचे तितपत स्वातंत्र्य घेतले जातेच. १५ ओळींच्या कवितेचा मराठीतील भावानुवाद १८ ओळींचा एवढ्यासाठीच झाला आहे की, मीटरचा गुंता बाजूला ठेवून अनुवादक मूळ कवितेमध्ये प्रकट झालेल्या भावनेपासून दूर गेलेला नाही....किंबहुना दोन्ही अनुवादकांना अजून काही तरी त्या कवितेविषयी सांगायचे आहे असेच वाटत राहिल.

मुळात भावकाव्य हे निर्माण होते ते स्वभावतःच वैयक्तीक अनुभवांची विशिष्टता शोधण्याच्या प्रक्रियेतून. कर्नल मॅक्रे यांनी केवळ २२ वर्षे वयाच्या सैनिकाचा त्यांच्या चक्षूसमोरच झालेला मृत्यु पाहिला, पण त्यामुळे ते 'टॉर्च' खाली ठेवायला तयार नाहीत, ही जाणीव फार फार महत्वाची आहे. युध्दाच्या विफलतेवर बरेच काही बोलले जाते, पण जे बोलतात ते सर्व सैनिकच असतात असा अर्थ होत नसतो. उलटपक्षी 'सैनिक' मनोमनी म्हणत असतो की, 'मी माझ्या कर्तव्यापासून दूर होणार नाही...' आणि सैनिकाचे खरे कर्तव्य काय आहे?....हे खुद्द कर्नलच खालील ओळीत सांगतात :

Take up our quarrel with the foe!
To you from failing hands we throw
The torch; be yours to hold it high!
If ye break faith with us who die
We shall not sleep, though poppies grow
In Flanders fields.

~ जगरहाटी चालूच राहणार आहे...वारा वाहणार, नदी धोधो करीत पुढे जाणार, फुले फुलणार....तो निसर्गनियमच आहे... म्हणून त्यामुळेच तुम्ही शत्रूविरुध्दचा लढा पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे.....या विश्वासाला तडा देऊ नका.

~ अशी या वैयक्तिक अनुभवाची रसिकाला अत्यंत निकटची अशी प्रचीती आपल्या मायमराठीतून श्री.राजेश घासकडवी आणि श्री.धनंजय यानी फार सुरेख शब्दांनी करून दिली आहे यात संदेह नाही.

(श्री.घासकडवी यांच्यासाठी >>>
"उंच धरूनी पेटत ठेवा अमुच्या दग्ध मशाली" (मूळ ओळ सरळसरळ "The torch; be yours to hold it high!" अशी असताना.... पेटत्या torch ला 'दग्ध मशाली' असे रूप देण्याचे प्रयोजन काय? 'दग्ध' ला निगेटीव्ह अशी टिन्ट आहे...."Blasted, marred, spoiled, utterly corrupted, defiled, or ruined" इत्यादी.....आणि इथे कर्नल मॅक्रेंची मशाल तर 'धगधगती'च आहे, त्यामुळे ती 'पेटत ठेवा' असे का म्हणावे?...... ~~ श्री.धनंजय यांनी केवळ 'मशाल' चे प्रयोजन केले आहे...हात 'गळते' आहेत हे मान्य, पण 'मशाल' ही पेटलेलीच आहे.....अशी माझी त्या कवितेबद्दल समजूत आहे. )

इन्द्रा

राजेश घासकडवी's picture

24 Sep 2010 - 12:00 am | राजेश घासकडवी

पेटत्या torch ला 'दग्ध मशाली' असे रूप देण्याचे प्रयोजन काय? 'दग्ध' ला निगेटीव्ह अशी टिन्ट आहे..

यात आम्ही ज्या मशाली धरून ठेवल्या त्या आमच्या मृत्यूमुळे विझत आल्या आहेत. तुमच्या नवीन जोमाने त्या प्रज्वलित करा व पुन्हा त्या पुढे जाऊ द्यात असा अर्थ ध्वनित करायचा आहे. दग्ध मध्ये एक पोळलं जाण्याचा भाव देखील आहे. तो देखील येऊ द्यायचा होता.

या दोन अनुवादाच्या अनुषंगाने धनंजयने आपले विचार माझ्या खवमध्ये मांडले आहेत तेही वाचण्यासारखे आहेत.

इन्द्र्राज पवार's picture

24 Sep 2010 - 1:31 am | इन्द्र्राज पवार

"या दोन अनुवादाच्या अनुषंगाने कवितेचं भाषांतर, रूपांतर म्हणजे काय ही चर्चा व्हावी अशी इच्छा आहे."

~~ इथे तुम्ही साहित्यप्रेमीसाठी एक आवाहन केले होते व केवळ ते केले म्हणून नव्हे तर तुम्हा दोघांनीही इतका सुरेख भावानुवाद पेश केला त्याला दाद द्यावी म्हणून रसिकांनी प्रतिसाद दिले व माझ्यासारख्याने जरी काही वेळाने इथे प्रवेश केला असला तरी मनोमनी खूप इच्छा होती की हा धागा मूळ कविता आणि भावानुवाद यांच्या अनुषंगाने पुढे फुलावा. पण असे असताना (अपील करूनही...) तुम्ही दोघांनी ख.व. वर या विषयाला व्यापक रूप दिले ते किती सदस्यांपर्यंत पोहोचले? तुम्ही जर मला ख.व.पाहा असे सुचविले नसते तर मी खरेच त्या चर्चेतील आनंदाला वंचित राहिलो असतो. असो....ती तुम्हा दोघांची काही वैयक्तिक समजुत झाली असल्याने तो निर्णय संयुक्तपणे घेतला असेल, पण खरं सांगायचं तर तीच चर्चा इथे खुला पातळीवर झाली असती तर चर्चा रुंदावली असती.

~~ 'दग्ध मशाली' चा तुमचा खुलासा मला अजूनही पटलेला नाही (कारण कर्नल मॅक्रे '.....मशाल तुमच्याकडे सुपूर्द करीत आहे...' असे म्हणतात. इथे मशाल हे जिद्दीचे मेटाफर आहे, शरीर विकलांग झाले असले तरी जिद्द तशीच शाबूत आहे, ती तुम्ही जवळ बाळगा, असा काहीसा रोखठोक भाव मूळ कविला अभिप्रेत आहे आणि त्यामुळे ती मशालीच्या रुपातील 'जिद्द दग्ध झाली आहे' असे मानणे बरोबर होणार नाही.) असे असले तरीही एक भावानुवादक म्हणून तुम्ही त्याबाबतीत घेतलेले स्वातंत्र्य मान्य करणे क्रमप्राप्त आहे.

दुसराही एक मुद्दा आहे. वास्तविक तो तितकासा महत्वाचा जरी नसला तरी आता एवीतेवी विषय चर्चेला आलेलाच आहे, तर तोही इथे व्यक्त करतो.

"स्वैर वरूनी पक्षी फिरती, अजून त्यांची गाणी" हा "The larks, still bravely singing, fly" या ओळीचा भावानुवाद. इथे 'लार्क' (जो खरातर शेलीचा 'स्कायलार्क' च आहे...) चा उल्लेख कविने मुद्दाम केला आहे. इंग्लिश आणि फ्रेंच वाङ्मयात 'लार्क' हे निधडेपणाचे प्रतिक मानले जाते....लार्क 'सुपरनॅचरल पॉवर' वा 'सुपरनॅचरल स्पिरीट' दर्शविते असे समजले जाते. 'लार्क ब्रेव्हली सिंगिंग....' हे सैनिकाना 'त्याच्यापासून स्फूर्ती घ्या...' यासाठीचे प्रयोजन आहे...कारण, तुम्ही म्हणता तसे "अजून त्यांची गाणी
कानी पडती खाली भेदुन सरबत्तीची गाज" >> असे का? तर, विश्वात कोणत्याही घडामोडी होत असल्या तरी 'लार्क सॉन्ग इज हेवनली, फ्री, स्पॉन्टेनिअस, फ्लुएंट अ‍ॅण्ड रिच' असेच असते असे तिथले कल्चर मानते...म्हणून 'लार्क' नामाचा अट्टाहास; तसे नसते तर कविने तिथे 'बर्डस' शब्द वापरला असता. 'पक्षी' हे फार जनरल विधान होते.

इन्द्रा

खरडचर्चा व्यापक होत गेली, ती येथे डकवायला हरकत नाही.

सुरुवातीला मी केलेली टीका वाचल्यावर तिर्‍हाइताला असे वाटणे शक्य होते - "माझेच भाषांतर चांगले" या वैयक्तिक ईर्ष्येने मी राजेश घासकडवी यांच्या भाषांतराची टीका करत आहे. मात्र तसे नाही, हे त्यांना आणि मला ठाऊक आहे. (माझ्या भाषांतरात शब्दांची निवड सर्वोत्तम नव्हती हे मान्यच आहे.) म्हणून खरडचर्चा अधिकाधिक मूलगामी होत गेली, व्यापक होत गेली.

त्यांची कविता छान आहेच. मात्र त्यातील जो भावाला अधोरेखित केलेले आहे, तो भाव भाषांतर म्हणून मला पटलेला नाही, अशी माझी टीका होती.

खरडचर्चेतच राजेशनी म्हटल्याप्रमाणे त्यांनाही चर्चा येथे केलेली हवी होती. (म्हणून त्यांची अनुमती येथे अध्याहृत धरलेली आहे.) आता माझीही हरकत नाही. एक-एक करून कालक्रमाने आमच्या खरडी प्रतिसाद म्हणून येथे डकवता येतील. (खरडीत आम्हा दोघांचा एकवचनी उल्लेख असला तरी येथे अनेकवचनी उल्लेख करण्याइतपत एडिटिंग केलेले आहे.)

मी खाली सुरुवात करतो :

"रक्तथेंब मोहरून झाले केशर पिवळे आज"
हा निसर्गसुंदर-वीरश्री भाव (अर्थ नव्हे) मला मुळात तितका प्रकर्षाने सापडत नाही. कदाचित "हिरवेहिरवे गार गालिचे"चा परिणाम असेल, पण हे मीटर माझ्यासाठी आता फार निसर्गरम्य झालेले आहे. त्याचाही परिणाम असेल.

"फ्लँडर्स फील्ड्स" कवितेत भकास-विरक्त भाव असल्यामुळे ती युद्धविरोध्यांनाही प्रेरित करते. मात्र पॉपी सुंदर असल्याचा भाव आहे, हे मान्यच. "फील्ड" शब्दात कुरणाची शांततासुद्धा आहे, आणि युद्धभूमीचा भयानकपणासुद्धा, वीरश्रीसुद्धा. तसा शब्द मराठीत शोधताना मला अपयश आले.

या प्रकारची अव्वल दर्जाची मराठी कविता आहे मर्ढेकरांची "अजून येतो गंध फुलांना"
हा फुलांचा गंध पहिल्या कडव्यात सुखद आहे, पण शेवटच्या कडव्यात भयाण आहे.

"रक्तथेंब मोहरून झाले केशर पिवळे आज" हे थोडं गाळलेल्या जागा भरल्यासारखं केलेलं आहे. मूळ कवितेत दुसरं कडवं अर्धवट आहे असं माझं मत आहे.

भावानुवाद करताना काही छटा भडक होण्याचा धोका असतो. भाषांतरकाराचं स्वतःचं इंटरप्रिटेशन लादलं जाऊ शकतं. तसं करण्यावाचून गत्यंतर नसतं. पुन्हा पुन्हा दोन्ही अनुवाद वाचल्यानंतर मला ते प्रकर्षाने जाणवलं. तुनच्या मोजक्या शब्दांमुळे 'भावगर्भ साक्षात्काराला' जितकी जागा राहाते, तितकी जागा ती कविता खुलवून लिहिल्यामुळे राहात नाही. एकच चित्र वेगवेगळ्या माध्यमांत, वेगवेगळ्या शैलींमध्ये काढल्यामुळे भिन्न भागांना उठाव यावा तसं काहीसं होतं. झालेलं आहे. फुलांवर थोडं अधिक फोकस करणं हे त्यातूनच झालं (म्हणूनच शीर्षक फ्लॅंडर्सची फुलं असं आहे).

फील्ड शब्दाच्या कठीणपणामुळेच मी तीन वेगवेगळे शब्द वापरले. तिसऱ्या ठिकाणी खरं तर रणभू वापरायचं होतं, पण ते नीट जमलं नाही. मला दुसरा कठीण भाग वाटला तो म्हणजे 'वी आर द डेड.' आम्ही कोण, तर आम्ही मेलेले - हे तितकं चपखल बसत नाही. डेड साठी मृत हा शब्ददेखील अर्थाने फिट बसतो, पण तो तितका वापरातला शब्द नाही.

"फ्लँडर्स फील्ड्स" कवितेत भकास-विरक्त भाव असल्यामुळे ती युद्धविरोध्यांनाही प्रेरित करते.

मूळ कवितेतली पॉपीची फुलं मला आठवणींवर चढलेल्या बुरशीसारखी वाटली - त्यांच्या सौंदर्यापेक्षा क्रूस झाकण्याचं काम अधिक महत्त्वाचं. (माझ्या अनुवादात सौंदर्याचा पैलू थोडा अधोरेखित झाला आहे खरा) ती कविता युद्धविरोधकांना दिलासा देणारी का वाटते ते कळलेलं नाही. युद्धापलिकडे जाऊन एखाद्या विधायक कार्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, किंवा अविरत झगडा दिला अशांनी तरुण पीढीला दिलेला संदेश वाटला. वाईट प्रकार (जीव घेणारं युद्ध) थांबवा असं नसून चांगला लढा चालू ठेवायला विसरू नका हा संदेश आहे. आम्ही स्वस्थ निजणार नाही यातून आमची आठवण तुमच्या सदसद्विवेक बुद्धीला टोचणी म्हणून राहील हे कवी सांगतो आहे.

धनंजय's picture

24 Sep 2010 - 2:15 am | धनंजय

दुसरे कडवे तुम्हाला अर्धवट वाटते, हे लक्षणीय आहे. मला ते थिटे वाटत नाही.

(आता रसग्रहणाच्या वेळेला ऐतिहासिक तपशील दुय्यम असतात. पण या कवितेची कवीच्या हातची "फेअर प्रत" उपलब्ध आहे. म्हणजे कवीला पूर्ण कविता म्हणून हीच अपेक्षा असावी. कवीला कविता रचताना एका सैनिकाने बघितले, त्याची आठवणही उपलब्ध आहे. कवीचे वर्तन शोक-शांततेचे होते, कदाचित फर्म-रिझॉल्व्हचे होते. जोश-त्वेषाचे नव्हते.
http://www.arlingtoncemetery.net/flanders.htm
किंवा विकीवरची ऑटोग्राफ प्रत बघ - त्यात कवीला मान्य पाठभेद आहे, पण तो क्षुल्लक आहे.)

कवीचे ऐतिहासिक मत सोडले, तरी मला दुसरे कडवे थोडकेपणामुळे जोरकस वाटते.

पॉपीची फुले मात्र दुहेरी चिह्ने आहेत. जर जित्या सैनिकांनी लढाई पुढे चालवली, तर मेलेल्यांना शांत झोपता येईल, आणि फुले त्यांच्या कृतकर्तव्य शांत झोपेचे चे प्रतीक आहेत. म्हणजे त्या परिस्थितीत बुरशी नसून फुले हवीहवीशी आहेत. मात्र जगणार्‍यांनी कच खाल्ली, तर फुलांचे सौंदर्य मेलेल्यांच्या तळमळीला शमवणार नाही.

मेलेले जमिनीतून उठून पुन्हा त्वेषाने बाहेर येतील ही भावना मला मुळात तितकी दिसत नाही. (जगणार्‍यांकडून विश्वासस्खलन झाले, तर पुरलेले सैनिक फुलांच्या चादरीखाली तळमळतील, इतके मात्र स्पष्ट आहे.) दोन्ही अर्थ लाक्षणिकच आहेत.

युद्धविरोधातल्या लोकांना कविता भावण्याचे कारण हेच - मरे एक त्याचा दुजा भार वाहे, हे प्रकर्षाने जाणवणे. आधीची सुंदर आयुष्ये वाया गेली, नंतर निसर्गाचे सौंदर्यही कडू झाले. कवीचा मुळात युद्धविरोध नव्हता, हे तर आलेच. पण युद्धविरोध असलेल्यांवरती सुद्धा सैनिकाचा कळवळणारा शोक गहिरा परिणाम करतो. "कधी न संपणारे, मेलेल्याकडून जित्याकडे हातोहात सुपूर्त केले जाणारे, हे शोकचक्र थांबलेच पाहिजे, थांबवलेच पाहिजे" अशा प्रकारचा विचार करताना सैनिकाबद्दल दु:स्वास नसून सहानुभूती असते. आणि दु:स्वासाच्या ठिकाणी तशी सहानुभूती उत्पन्न करण्यात ही कविता यशस्वी होते. हा परिणाम कवीच्या हेतूबाहेरचा आहे. पण कवीच्या भावनाचित्रणाच्या प्रामाणिकपणाचा परिणाम आहे.

अर्धवट हे थिटं या अर्थाने नाही, तर कवीने पूर्ण करायच्या आतच प्रेसला गेलेलं या अर्थाचं. मीटरच्या अअबबअ हे यमक पहिल्या व तिसऱ्या कडव्यात पाळलेलं आहे, दुसऱ्यात नाही. पण अर्थात इंग्लिश कवितेतल्या वृत्तांची मला तितकी ओळख नाही.

वी शाल नॉट स्लीप - ने मला तरी मी शांत होणार नाही (तळमळत राहीन), तसंच मी गप्प बसणार नाही हे दोन्ही अर्थ जाणवले. मी लिहिलेल्या अनुवादात एकच निवडला गेला आहे, दुसरा नाहीच असं नाही, पण खूप कमी ठळक झाला आहे. अनुवाद करताना हा धोका असतो.

बुरशी हा शब्द मला लिहितानाच चुकीचा वाटला होता, पण आळसापोटी बदलला नाही. मला ती फुलं एखाद्या घटनेचं दाहक वास्तव संपल्यानंतर शिल्लक राहाणाऱ्या आठवणींना पुसट करणारं, त्या थोड्या रोमॅंटिक करणारं पुट वाटलं. युद्धस्य कथा रम्या या त्या युद्धानंतर, युद्धाबाहेरच्यांनाच वाटतात तसं.

युद्धविरोधातल्या लोकांना कविता भावण्याचं कारण पटतंय, पण ते काहीशा ताणून बसवलेल्या (उत्तम कविता, युद्धाविषयीची, मग युद्ध बंद करा हा संदेश कसा बरं काढता येईल...) विचारातून आल्यासारखं वाटतं. युद्ध हे रूपक (अधिक व्यापक लढ्याचं) वापरणं मी अधिक पसंत करतो.
...
बाकी कवीला अपेक्षित अर्थ व त्यावरून लोकांनी घेतलेला बोध या दोन भिन्न गोष्टी असू शकतील हे पटतं. (खुनाचं रसभरीत व मनापासून केलेलं वर्णन लोकांना हिंसेपासून परावृत्त करू शकेल...)

{हे दोन खरडींचे एकीकरण आहे.}

धनंजय's picture

24 Sep 2010 - 2:23 am | धनंजय

ताणून बसवलेल्या/व्यापक बद्दल ... माझे मत तुमच्यापेक्षा पुरते उलट आहे.

युद्धाची उपमा फार पूर्वीपासून फार आकर्षक आहे खरी. (येथे "उपमा" म्हणजे उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, दीर्घरूपक-अ‍ॅलेगरी - हे सर्व म्हणायचे आहे.) म्हणजे महाभारत ही खरोखरचे लोक भांडल्याची युद्धकथा नसून आत्म्याच्या मुक्तीचे दीर्घ-रूपक आहे, असा अर्थ काढतात, तसे तेवढे नव्हे. आंतरिक आत्मिक उन्नतीच्या चळवळीला "महान जिहाद" ही उपमा काही मुसलमान देतात. तेव्हापासून आजच्या "वॉर ऑन कॅन्सर", "वॉर ऑन ड्रग्स", "वॉर ऑन पॉव्हर्टी"... या सगळ्या बाबतीत उपमा उघड-उघड दिलेली आहे.

मला ही उपमा बहुतेक ठिकाणी वापरलेली गुळगुळीत वाटते. रससिद्धांताच्या दृष्टीने माझे मत असे, (मूळ माझे नाही), की उपमेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही अतिशय जिवंत पाहिजेत. उपमा म्हणजे एक छोटेखानी युक्तिवाद असतो. तुलनेसाठी दिलेली वस्तू इतकी अनुभव-खरी वाटते, की त्याबद्दल रसिकाला प्रश्नच वाटत नाही. आणि त्या उपमानाचे उपमेयाशी संबंधही अतिशय समांतर वाटतात. उपमेय सुंदररीत्या पटते.

सदानकदा "वॉर"ची दिलेली उपमा मला गुळगुळीत का वाटते? उपमा सांगणार्‍यासाठीच ती प्रामाणिक, म्हणजे अनुभव-खरी वाटत नाही. "मोठी चळवळ" या ढोबळ अर्थापेक्षा कुठलीच प्रतिमा जिवंत होत नाही.

नुसता त्वेष असलेले "मेले तर मरू, थडग्यातून पुन्हा युद्धात उतरू" या प्रकारचा भडक उच्चार कुठलाही मित्र-गमावलेला सैनिक मित्राच्या थडग्याशी करत असेल, तर मला आश्चर्य वाटेल. जितके काही सैनिक बोलताना/लिहिताना मी ऐकले-वाचलेले आहेत, त्या सर्वांना मृत सहकार्‍यांबद्दल ठसठसणारा शोक वाटतोच. आता (काँगोमधले नशा चढवलेले बालसैनिक निबर असतात, असेही ऐकले आहे. पण त्या खुंटलेल्या मानवांची गोष्ट आतासाठी सोडूया.) शत्रूबद्दल जहाल राग, युद्ध चालू ठेवण्याबद्दल पूर्ण निश्चय असलेले सैनिकही मित्रशोकाच्या बाबतीत कोरडे नसतात.

म्हणूनच "युद्ध" हा शब्द साउंडबाईट नसून जिवंत उपमा म्हणून सैनिक-कवी वापरतात ती वेगळ्या तर्‍हेने वापरतात. (मला वाटते युद्ध अनुभवलेला सेर्वांतेस युद्धाबद्दल वेगळ्या प्रकारे बोलतो, आणि शेक्सपियर वेगळ्या प्रकारे. तरी शेक्सपियरच्या काळात इंग्लंडाच्या अंतर्गतही बरीच हिंसा होती. शेक्सपियरची पात्रे त्यामुळे अति-रोमँटिसाइज नसतात. टोकाचे निर्मानवीकरण-अ‍ॅब्स्ट्रॅक्शन हवे तर "गुलबकावली" वगैरे रम्यकथा बघाव्यात. त्यातील पात्रे मूर्तिमंत शौर्य, कोमलता, क्रौर्य वगैरे असतात. पण जिवंत व्यक्ती म्हणून बाळपणानंतर कोणालाही पटणार नाहीत.)

मॅकक्रेच्या मूळ कवितेच्या युद्धाचे "जीवनातली चळवळ" असे सार्वत्रिक आणि उदात्त उपमेय मानायला काहीच हरकत नाही. परंतु त्याचा मित्रशोक प्रामाणिक असल्यामुळेच त्याची उपमा जिवंत होते. पटते. प्रामाणिक शोकामुळे आलेला तो जिवंतपणा हरवला, तर ओटावामधल्या वॉर ऑफिसमध्ये बसून खर्डेघाशी करणार्‍या कुठल्या कारकुनाची न-पटणारी कल्पना शिल्लक राहाते. किंवा वॉशिंगटनमधल्या कुठल्या स्पीचरायटरने शोधून काढलेला "वॉर ऑन कॅन्सर".

("कॉमनवेल्थ गेम्ससाठी दिल्ली शासनाची युद्ध पातळीवर तयारी चालू आहे" म्हणजे काय? "जोरात तयारी चालू आहे" यापेक्षा मला काहीही कळत नाही.)

तुम्ही निवडलेल्या भावार्थाबद्दल : मला हे पटत नाही की युद्धाचा काहीएक प्रामाणिक मानवी अनुभव सांगितलेला आहे. उपमानाचा अनुभव प्रामाणिक नसला तर तुझ्या "जीवन" उपमेयासाठी सुंदर युक्तिवाद म्हणून मी कल्पना विकत घेत नाही.

आता तुम्ही म्हणू शकाल की उपमेत प्रामाणिक-खर्‍या-भासणार्‍या अनुभवाची गरज मर्यादित आहे. माझ्या मते तुम्ही असे म्हणणार नाही.
- - -
"जीवन म्हणजे अंतराळप्रवास आहे. वेगवेगळ्या ग्रहमाला दिसतात तशा वेगवेगळ्या कुटुंबसंस्था दिसतात. एखाद्या अनोळखी ग्रहाबद्दल आकर्षण वाटून अंतराळवीर तिथे कायमचे वास्तव्य करतो, तसे आपले कोणाशी तरी प्रेम जुळते, आपण त्यांना जीवनसाथी बनवतो..." छे, छे.
जोवर अंतराळप्रवास हा जिवंत-अनुभव होत नाही, तर त्याची उपमा जीवनाला देता येत नाही. वाटल्यास आपल्या जिवंत ओळखीच्या प्रेमप्रकरणाची उपमा काल्पनिक अंतराळप्रवासाला दिली तर चालेल.
"अंतराळप्रवास म्हणजे प्रेमकथाच. जन्मल्यापासून वेगवेगळे लोक, कुटुंबे भेटतात, तसे पृथ्वीपासून दूरदूर जाता नवीन ग्रह, नवीन ग्रहमाला दिसतात. नवीनच भेटलेल्या व्यक्तीबद्दल अचानक वाटावे, तसे आकर्षण एखाद्या ग्रहाबद्दल अकस्मात वाटते. जीवनसाथी मिळावा तसे त्या ग्रहाचेच आपण कायमचे होऊन जातो..." असे काहीतरी चालेल. मात्र उपमेतले व्यक्ति-प्रेमप्रकरण जिवंत-अनुभवलेले-खरे वाटले नाही, तर उपमा वाया जाते.

मला हे पटत नाही की युद्धाचा काहीएक प्रामाणिक मानवी अनुभव सांगितलेला आहे. उपमानाचा अनुभव प्रामाणिक नसला तर तुझ्या "जीवन" उपमेयासाठी सुंदर युक्तिवाद म्हणून मी कल्पना विकत घेत नाही.

हे वाक्य नीटसं कळलं नाही.

एखाद्या कवितेबाबतीत विरुद्ध मतं असायला काहीच हरकत नाही. मात्र उपमा देताना उपमान आणि उपमेय या दोन्हीचा 'प्रत्यक्ष अनुभव' या अर्थाने जिवंत असण्याची जरूर नाही. उपमान अधिक ओळखीचं असावं हे थोडंफार पटतं. जिवंतपणा हा काळा-पांढरा नसतो, तर जीवाणूंपासून ते संज्ञाशील प्राण्यांपर्यंत उतरंड असते. अनुभवांचंही तसंच आहे. तुझ्याच परग्रहप्रवासाच्या उदाहरणातून तो प्रवास माहीत नसला तरीही समजू शकतो, उपमेचा तोच फायदा आहे. किंबहुना आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान असं अप्रत्यक्षपणेच मिळतं. गोरीला, एप माकडं वगैरे पाहिलेली नसतानाही टारझनची कथा अनेक मुलांना तितकीच आकर्षक वाटते. कारण गोरिलाचं चित्र, त्याच्या भेसूरपणाचं, शक्तीचं वर्णन यावरून इतर माहितीचे तुकडे जोडून कल्पना येऊ शकतेच. (टारझनच्या लेखकाने तर आफ्रिकेचं जंगलदेखील पाहिलेलं नव्हतं) मुद्दा असा की युद्ध म्हणजे काय हे आपल्याला कथांमधल्या वर्णनांवरूनच बऱ्यापैकी कळू शकतं. निदान महान चळवळीला उपमा देता येण्यापुरतं तरी.

मी भावानुवादात थडग्यातून पुन्हा युद्धात उतरू असं म्हटलेलं नाही. भुतं होऊन तुमच्या मानगुटीस बसू असा अर्थ अपेक्षित होता. 'स्वस्थ न झोपू' मध्ये ती प्रेतं थडग्यांत तळमळण्यात - ते तळमळणं आपल्याला जाचेल हीच अपेक्षा आहे.

युद्ध ही उपमा महान चळवळीला घासून गुळगुळीत झालेली आहे याबद्दल वाद नाही. पण त्याचा इथे काय संबंध? कविता लिहिताना घिसीपिटी उपमा वापरू नये, पण तिचं रसग्रहण करताना ती जबाबदारी नाही. 'ही कविता थोर आहे तद्वतच त्यात घिसीपिटी उपमा नसणार' असं काहीसं म्हणतो आहेस का? मुळात कवीने कुठच्या हेतूने कविता केली, त्याने कुठच्या प्रतिमा योजल्या व त्यातून वाचकांना काय अनुभूती मिळाली या दोन भिन्न गोष्टी आहेत.

कवीने काय विचार केला - माझा मित्र इथे गाडला गेला आहे, त्यावर फुलं फुलली आहेत, आणि (इथेच लढायला आलेल्या मला) तो (कवितेचा निवेदक) सांगतो आहे की ही फुलं, हे सौंदर्य दिसतंय खरं पण त्यावर भुलून जाऊ नकोस. जर तू ही लढाई पूर्ण केली नाहीस इतक्या सुंदर जागीही आम्ही तळमळू. ही तळमळ तुला बोचेल.

वाचकाला दोन पर्याय आहेत - कवितेच्या आतच राहून कवीच्या (मित्राच्या) शब्दाला प्रतिशब्द ठेवल्याप्रमाणे कल्पनेला प्रतिकल्पना ठेवून अर्थ काढायचा. किंवा कवितेच्या बाहेर येऊन या प्रसंगावरून वेगळा बोध घ्यायचा. यातली कुठली रास्त? माझ्या मते हे ठरवता येत नाही. [तुमच्या लक्षात आलं असेलच की अनुवाद करताना तुम्ही पहिली पद्धत स्वीकारली तर अर्थ काढताना दुसरी. मी बरोब्बर उलटं केलं आहे.... भाषांतर आणि अर्थांतरातल्या या अंतरामुळेच खरं तर हा मुद्दा सिद्ध होतो. :-)

धनंजय's picture

24 Sep 2010 - 3:23 am | धनंजय

वाचकाला दोन पर्याय आहेत - कवितेच्या आतच राहून कवीच्या (मित्राच्या) शब्दाला प्रतिशब्द ठेवल्याप्रमाणे कल्पनेला प्रतिकल्पना ठेवून अर्थ काढायचा. किंवा कवितेच्या बाहेर येऊन या प्रसंगावरून वेगळा बोध घ्यायचा. यातली कुठली रास्त? माझ्या मते हे ठरवता येत नाही. [तुमच्या लक्षात आलं असेलच की अनुवाद करताना तुम्ही पहिली पद्धत स्वीकारली तर अर्थ काढताना दुसरी.

वाचकाला दोन (टोकाचे) पर्याय (आणि सर्व मधले पर्याय) आहेत हे खरेच. पण भाषांतरकाराला ते पर्याय नसतात.

आता तुम्हाला माहीत आहे की कबाला-भक्तांमध्ये एक विचारसरणी आहे, की जगातील सर्व भूत-वर्तमान-भविष्य वाक्ये तोराह ग्रंथात आहेत. फक्त लिखित प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळाच काहीतरी घ्यायचा, तो तोराहच्या ऐतिहासिक रचनाकाळातल्या अर्थापेक्षा कमालीचा वेगळा का असेना. याचे पुढचे पाऊल म्हणजे प्रत्येक लिखित अक्षर वेगळ्याच ध्वनीचे चिह्न आहे, असे मांडून तोराह वाचायचा. आणखी एक पद्धत आहे, की स्क्रॅबलमध्ये करतो तशी तोराहमधली अक्षरे मिसळून अ‍ॅनाग्रॅम बनवायचे आणि अन्य अर्थ सिद्ध करायचे. (तोराहमध्ये जवळजवळ सगळी हिब्रू अक्षरे आहेत, त्यामुळे हिब्रूमधली सर्व सामान्य लांबीची वाक्ये तयार होतात, हे सहज-सिद्ध आहे.) रसग्रहणाचे हे सर्व प्रकार रसिकाच्या हक्काचे आहेत, याबद्दल दुमत नाही. रसिक रसग्रहण म्हणून हे अर्थ एकमेकांना हे अर्थ सांगूसुद्धा शकतात. पण ही भाषांतरे नव्हेत. स्वतंत्र कलाकृती आहेत. (किंवा जर धर्मोपदेश असेल, तर स्वतंत्र धर्मोपदेश आहे.)

- - -

उपमा जिवंत असण्याबद्दल :
(जिवंत असणे म्हणजे "कवी आणि रसिक दोघांनी अनुभवलेली असणे" असे नव्हे. "कवीच्या कुशल अभिव्यक्तीमुळे रसिकाला अनुभव झाल्यासारखे वाटणे" असा आहे.)

उपमेत उपमान जिवंत करण्याबाबत कमतरता म्हणजे केवळ आळस आहे. एखाद्या शिकाऊ टीनेजरने किंवा कॉलेजातील सॉफोमोरने अशी घिसाडघीची उपमा रचली, तर आपण त्यांना माफ करतो. आपण त्या वयातल्या स्वतःला आज माफ करतो तसेच. (माझी हायस्कूलमधली कवितांची वही आईबाबांना आताच सापडली आणि त्यांनी मला ती दिली. त्यावेळी माझ्या वाचनावर भगवद्गीतेचा पगडा होता. "आत्मा" काय "निर्गुण" काय... वाटेल त्या कविता होत्या. त्यांच्यातला कोवळा-कच्चेपणा प्रामाणिक आहे, म्हणून वाचता तरी येतात. मात्र उपमा अजिबात चालण्यासारख्या नाहीत.)

उपमा जिवंत करण्यात कौशल्य खर्च केलेले नाही, असा एक कवी किंवा कविता मला दाखव, आणि मी तुला दुय्यम दर्जाचा कवी किंवा चांगल्या कवीचे दुय्यम दर्जाचे काव्य दाखवतो. एक उदाहरण येथेच घेऊया :

"उपमा कालिदासस्य" म्हणून गौरव करतात, तर त्याच्या "ऋतुसंहारा"तल्या उपमा इतक्या विसरलेल्या कशा? ऋतुसंहारात जिवंत उपमा त्या मानाने कमी आहेत. शरद्-ऋतू(स्त्रीलिंगी शब्द)च्या वर्णनाच्या पहिल्या कडव्यातल्या पहिल्या ओळीत "कमळासारखा चेहरा" येतो. (या श्लोकाचे इंग्रजी भाषांतर महाराष्ट्र बोर्डाच्या "कुमारभारती" मध्ये होते, म्हणून हा श्लोक आठवला.) :

काशांशुका विकचपद्ममनोज्ञवक्त्रा सोन्मादहंसरवनूपुरनादरम्या।
आपक्वशालिललिता तनुगात्रयष्टिः प्राप्ता शरन्नववधूरिव रूपरम्या॥ ३-१

काशाची वस्त्रे, उमललेल्या कमळांचा सुंदर चेहरा, उन्मादलेल्या हंसांचे बोलणे हा पैंजणांचा रम्य नाद, पिकत आलेल्या साळींसारखी नाजूक वाकलेली शरीरयष्टी, वधूसारखी रूपरम्य शरद्-ऋतू आलेली आहे.

कॉल अ स्पेड अ स्पेड अँड अ क्लिशे अ क्लिशे! यात तीन (की चार) क्लिशे वृत्तात बसवू शकतो म्हणून कुठल्या नवशिक्या कविकिरडूपेक्षा कालिदास महान. (पिकलेल्या वाकलेल्या साळी स्त्रीसारख्या कंबरेत वाकून लचकत आहेत, ही उपमा मात्र तजेलदार, जिवंत आणि सुंदर वाटते, हे कबूल करतो. नाही म्हटले तरी कालिदास अगदीच बंडलपणा प्रकाशित करणार नाही... अशा सौंदर्यस्थळांमुळे ही कविता कालवश झाली नाही.) उमललेले कमळ देखणे असते, आणि वधूचा चेहरा देखणा असतो, इतके ढोबळ साम्य मला कळते. पण त्यांच्या तुलनेचा चित्रमय अनुभव होत नाही. आणि हंसाचा आवाज (इथे ऐकता येईल) ऐकून पैंजणे ऐकण्याची तुलना काहीच्या काही वाटते. हंसाचा आवाज निसर्गात छान वाटतो, आणि पैंजणांचा आवाज वधूच्या पायात छान वाटतो, इतपत ढोबळ साम्य पुरेसे नाही. काश म्हणजे पाणथळ भागात उगवणारे गवत. त्याची वस्त्रे - ठीकठाक उपमा आहे. चालवून घेईन.

त्या मानाने त्याच्या रसिकप्रिय अजविलापातली ही उपमा बघा :
वपुषा करणोज्झितेन सा निपतन्ती पतिमप्यपातयत्|
ननु तैलनिषेकबिन्दुना सह दीपार्चिरुपैति मेदिनीम्॥ ८-३८

शरिरातील इंद्रियशक्ती गेल्यामुळे ती पडली, पडतापडता तिने पतीलाही पाडले. खरेच - दिव्यातल्या तेलाचा थेंब उडतो, तसा तिच्याबरोबर ज्वाळाही जमिनीवर पडते.

(यातून संजोप रावांच्या हल्लीच्या लेखातल्या मुद्दाम-भंपक उपमांची आठवण होऊ नये. त्यांच्यात मुद्दामून कृत्रिमपणा ओसांडतो.)

अजविलापातल्या उपमा सुंदर आहेत, कारण त्या ताज्या आहेत आणि जिवंत आहेत. ज्वाळा घेऊन गळणारा तेलाचा थेंब मी बघितलेला आहे - बघितला नसेल तरी बघितल्यासारखा अनुभव मनःपटलावर होतो. एवढा तेजस्वी बलशाली अज राजा, कोमल इंदुमती पडली तसा तिच्याबरोबर तो पडला तरी कसा? हे कोडे कवितेच्या प्रसंगात अगदी-अगदी सुटल्यासारखे वाटते. ऋतुसंहारातल्या उपमा विसरण्यालायक आहेत, कारण तसल्या घिशापिट्या उपमा मनाला जिवंत अनुभव देत नाहीत. वाटेल त्या सुंदर प्रसंगाचे चारपाच अवयव सांगून "वधू" म्हटले, तरी माझ्या डोळ्यासमोर "सुंदर नटलेली वधू" म्हणून निसर्ग उभा राहात नाही.

- - -

तुम्हाला मर्ढेकर आवडतात. मर्ढेकरांची जिवंत नसलेली उपमा मला दाखवा. (कोणास ठाऊक. दाखवालही. मला मर्ढेकरांच्या सगळ्या कविता लक्षात नाहीत. तुम्ही उदाहरण दाखवल्यास मर्ढेकरांबद्दल माझा आदराचा अतिरेक कमी होऊन "नॉर्मल" होईल, इतकातरी फायदा होईल.)

राजेश घासकडवी's picture

24 Sep 2010 - 2:15 pm | राजेश घासकडवी

भाषांतरकाराचे दोन थोडे वेगळे पर्याय असतात. एक म्हणजे अर्थ संकुचित झाला तरी चालेल पण कवीच्या शब्दांबाहेर जाणार नाही. दुसरा म्हणजे अर्थ कवितेच्या शब्दांच्या मर्यादेपलिकडे गेला तरी चालेल, पण संकोच होता कामा नये. दोन्ही पर्याय धोकादायक असतात. (टाइप वन व टाइप टू एररच्या शक्यता) खमंग थालिपीठचे भाषांतर मध्ये मी याच भाषांतरा-संकल्पनांतरा विषयी विचार करत होतो. जर थालिपीठचं spicy pancake असं भाषांतर केलं तर तो पदार्थ काय आहे याची कदाचित कल्पना करता येईल कदाचित नाही. ते बहुधा 'चुकीचं' नाही. (घटकाभर तो जवळचा प्रतिशब्द आहे असं धरून चालू). पण पदार्थाचं रूपांतर जवळातल्या जवळच्या पदार्थाशी करण्याने त्या थालिपीठाचे इतर गुणधर्म येत नाहीत. याउलट तेच सांस्कृतिक संदर्भ (अमेरिकेसाठी) असलेलं apple pie वापरताही येईल. तसं वापरता आलं तर निश्चितच apple pie चे इतर काही गुणधर्म लागू होणार नाहीत. (उदा. गोड चव) पण लागू पडणारे संदर्भ महत्त्वाचे असतील (त्या वासाने एक जादू होणे, लहानपणापासूनच्या आठवणी जागृत होणे, खाल्ल्यावर आंतरिक तृप्ति मिळणे) तर चवीतला वरवरचा फरक दुय्यम समजून apple pie वापरावा असं माझं मत आहे.

घिसेपिटेपणाबद्दलचे युक्तिवाद पटतात. पण कवीने जो प्रसंग मांडला आहे त्यातून वाचकाने काय अर्थ घ्यायचा इथे ते लागू होतात. दोन्ही अनुवादांतून ठरवल्यास 'युद्ध म्हणजे महान चळवळ - चालू ठेवा' किंवा 'युद्धातून शेवटी हेच हाती लागतं - एक मरतो व मरतामरता दुसऱ्याला लढण्यास उद्युक्त करतो' हे अर्थ काढता येतात. कवीला कुठचा अपेक्षित होता हे काहीसं दुय्यम ठरतं.

कवीने आखलेल्या मर्यादेत राहिले, तर ते वेगळे असते.

उदाहरणार्थ माझ्या भाषांतरावरील हे प्रतिसाद बघा : (प्रतिसाद १, प्रतिसाद २). या प्रतिसादांतून असे दिसते, की काही वाचकांना माझ्या स्पष्टीकरणापेक्षा वेगळा मथितार्थ भाषांतरातून समजला. म्हणजे कवीच्या शब्दांतले वेगवेगळे अर्थपर्याय उपलब्ध राहिले. मी मला हवा तो अर्थपर्याय मी लादलेला नाही, याबाबत हा थोडाफार वस्तुनिष्ठ निर्देश मानता येईल.

माझे स्पष्टीकरणच असंदिग्ध व्हावे म्हणून मी व्याज शब्द किंवा ओळ घातली असती, तर वरील प्रतिसादांत दिसते ते स्वातंत्र्य वाचकापाशी राहिले नसते. (सांस्कृतिक ओळखीचे शब्द भाषांतरासाठी कठिण असतात, अ‍ॅपल पाय... वगैरे मुद्दा वेगळा आहे. तो श्री. इन्द्र्राज पवार यांनी "लार्क" संबधित मांडला आहे.)

मुळातल्या कवीने जे तपशील असंदिग्ध म्हणून दिलेले असतात, आणि जी संदिग्धता रसिक-स्वातंत्र्य म्हणून मोकळी सोडलेली असते, ती जास्तीतजास्त प्रमाणात भाषांतरकाराने राखून ठेवावी लागते. नाहीतर मूलकाव्याच्या स्फूर्तीने केलेली स्वतंत्र कलाकृती म्हणून जबाबदारी/स्तुती घेतली पाहिजे.

इन्द्र्राज पवार's picture

24 Sep 2010 - 9:25 am | इन्द्र्राज पवार

श्री.धनंजय....

"सुरुवातीला मी केलेली टीका वाचल्यावर तिर्‍हाइताला असे वाटणे शक्य होते - "माझेच भाषांतर चांगले" या वैयक्तिक ईर्ष्येने मी राजेश घासकडवी यांच्या भाषांतराची टीका करत आहे."

~~ तुम्हाला असे वाटणे हे तुमच्या मनाचा एक हळुवार कोपरा सदैव जागरूक आहे आणि तो इतरांच्या मतांची (बोथ पॉझिटिव्ह अ‍ॅण्ड निगेटिव्ह...) बूज राखतो, हे दर्शविते. तरीही इथे हे "मि.तिर्‍हाईत" कोण या यक्ष प्रश्न आहेच, आणि त्याचे उत्तर शोधण्याची आवश्यकताही नाही. कारण कथा/कविता/कादंबरी यावर आवडीने चर्चा करणारे, प्रत्यक्ष भाग न घेता त्याचा आनंद घेणारे असंख्य असू शकतात, मग त्यांची वर्गवारी 'तिर्‍हाईता'त होऊच शकत नाही. टीका हे कोणतेही बोचरे अस्त्र नसून ते एक चर्चेचे प्रांगण अधिकाधिक हिरवेगार करण्याचे आयुध आहे, त्यामुळे जरी अशा एखाद्या 'तिर्‍हाईता' ने टीका केली असती तरी तुम्ही दोघे त्याला समर्थपणे उत्तर देण्याइतके सक्षम होता...आहातच.

मात्र तसे नाही, हे त्यांना आणि मला ठाऊक आहे."

~~ हेच म्हणतो, कारण हे अ‍ॅडमिशन महत्वाचे, जे मला माहित होते, आणि म्हणूनच श्री.घासकडवींच्या ख.व. वर [आता इथे डकवलेली] झालेली ही सुंदर चर्चा तिथे वाचताना मला नाही म्हटले तरी थोडे उदास वाटले होते, हे कबूल करतो.

पण आता ठीक आहे....ज्याअर्थी इथे ती चर्चा आणली त्याअर्थी तुम्हाला खुल्या चर्चेचे महत्व पटले आणि त्याचे आम्ही सर्व साहित्य रसिक म्हणून स्वागत करतो.

इन्द्रा

(ता.क. : तुमच्या भावानुवादात तुम्ही 'लार्क' ला 'चंडोल' केले आहे. सर्वसाधारण अर्थानुसार ते नाम बरोबरही आहे. पण मला अजूनही खात्री आहे की, कवीने लार्कचा वापर केवळ अनेक पक्ष्यापैकी एक असा न करता त्याचे 'मिथक' वापरले आहे, जे शेलीला अभिप्रेत होते.)

इन्द्र्राज पवार's picture

24 Sep 2010 - 7:41 pm | इन्द्र्राज पवार

श्री.राजेश म्हणतात : "मूळ कवितेतली पॉपीची फुलं मला आठवणींवर चढलेल्या बुरशीसारखी वाटली - त्यांच्या सौंदर्यापेक्षा क्रूस झाकण्याचं काम अधिक महत्त्वाचं."

याला श्री.धनंजय यांचा खुलासा : "पॉपीची फुले मात्र दुहेरी चिह्ने आहेत. जर जित्या सैनिकांनी लढाई पुढे चालवली, तर मेलेल्यांना शांत झोपता येईल, आणि फुले त्यांच्या कृतकर्तव्य शांत झोपेचे चे प्रतीक आहेत. म्हणजे त्या परिस्थितीत बुरशी नसून फुले हवीहवीशी आहेत. मात्र जगणार्‍यांनी कच खाल्ली, तर फुलांचे सौंदर्य मेलेल्यांच्या तळमळीला शमवणार नाही."

~~ मूळ कवि मॅकक्रे यांनी कवितेत जाणीवपूर्वक 'फ्लॉवर्स' ऐवजी 'पॉपीज्' या एका विशिष्ट जातीच्या फुलाचा उल्लेख केला आहे. दोन्ही भावानुवादकांनी आपापल्या कवितेत 'फुले' (श्री.धनंजय 'रानफुले' म्हणतात) असा 'इन जनरल' वापर केला आहे तो थोडासा 'पॉपी' च्या गुणधर्मावर अन्याय केल्यासारखा आहे. कविता प्रकाशित झाल्यानंतरही त्यावेळी इंग्रजी साहित्यप्रेमींनी "why poppies?" अशाच स्वरूपाच्या शंका निर्माण केल्या होत्या. त्याबाबत खुलासा करण्यात आला : 'पॉपीज्' चे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते तर ज्यावेळी आजुबाजूची अन्य फुले आणि झुडपे कोमेजून जातात, मरतात, त्यावेळी पॉपीज् फुलण्यास सुरूवात होती. पॉपी फूल हे एक प्रकारचे 'अमरवेल' जातीमध्ये मोडते; जे 'जिन्दा दिल' चे प्रतिक आहे. त्यांची बीजे वर्षानुवर्षे जमिनीखाली जिवंत अवस्थेत तग धरून राहू शकतात आणि त्या भागातील अन्य फुलजमात नष्ट होण्याच्या मार्गावर आल्यास पॉपी उमलण्याची निसर्गदत्त प्रक्रिया सुरू होते. नेमका सृष्टीचा हाच योगायोग कर्नल मॅकक्रे यांनी मे १९१५ ला पश्चिम आघाडीवर युद्धादरम्यान पाहिला. मोठ्या संख्येने रक्तवर्णीय पॉपीजनी मैदान फुलून गेले होते. पण 'सातत्याने फुलणे' हेच पॉपीजचे वैशिष्ट्य नाही तर ते नीद्रेचे प्रतिकही आहे. कवितेची शेवटची ओळ 'We shall not sleep, though poppies grow / In Flanders fields' ही त्या प्रतिकातून कवीने घेतली आहे. पॉपीजमधील 'अफू' च्या गुणधर्मामुळे त्याच्यापासून मॉर्फिन घेतले जाते, जे युद्धात 'पेनकिलर' म्हणून जखमी सैनिकांना दिले जात असे....त्यामुळे आलेल्या समाधानाच्या झोपेमुळे पॉपीजचा सातत्याने कृतज्ञतेने त्यावेळी वैयक्तीक पत्रव्यवहारामध्येदेखील सैनिक उल्लेख करीत असत.

अर्थात ही झाली 'फॅक्ट्स' कहाणी. श्री.राजेश व श्री.धनंजय या दोघांनाही पॉपीजचे हे अंग माहीत असेलच पण त्यांनी 'फुले' असाच आग्रह धरला असला तरी मूळ कवितेच्या गाभ्याला धक्का लागला असे मानण्याचे काही कारण नाही. त्यातील आवश्यक तो परिणाम मराठी कविता करतेच.

इन्द्रा