कोल्हापूर आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाते अतूट आहे. महाराजांनी त्या काळात कोल्हापूरच्या डोंगराळ भागात चहा, कॉफी, कोरुड, रेशीम किड्याचेही प्रयोग करुन पाहिले होते, असे म्हणतात..
महाराजांच्या याच जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील हुंबवली गावच्या सह्याद्रीच्या पठारावर श्री. टेकवडे नावाच्या एका प्रयोगशील शेतकर्याने ४० एकर जमिनीवर चहाचा मळा फुलविला आहे. महाराष्ट्रात चहा होऊ शकत नाही असा टी बोर्डाचा दावा होता. इथे तर चहाचा हिरवागार चहा मळा फुलला आहे, आणि उत्तरेकडील आसाम, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडूची चहामधील मक्तेदारी टेकवडेंनी मोडून काढली आहे. श्री. टेकवडे यांनी २००२ मध्ये चहाची लागवड केली आणि आंतरपिके म्हणून ऑस्ट्रेलियन बोन्मामिन या झाडाची लागवड करुन भरघोस उत्पादन घेतले आहे.
कष्ट आणि शेतकर्यांची इच्छाशक्ती असेल, तर चहाची मक्तेदारी आपण महाराष्ट्रात मोडून काढू शकतो, असे टेकवडे म्हणतात. कोल्हापूर परिसरात पाण्याचा निचरा होणारी डोंगराळ जमीन भरपूर आहे. अशा ठिकाणी हा चहाचा प्रयोग करण्यासाठी शेतकर्यांनी पुढे यायला पाहिजे, असेही त्यांना वाटते.
निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त, कॅल्शीयमचे प्रमाण कमी पण लोह आणि मॅगेनीज युक्त अशी जमीन असली तर चहाचे उत्पन्न चांगले येते. चहासाठी जमिनीतील जस्ताचे प्रमाणही महत्वाचे आहे. यासाठी मातीपरीक्षण होणे महत्वाचे आहे. झिंक सल्फेटच्या ४.४ किलो प्रती एकरच्या फवारणीमुळे जस्ताची कमतरता कमी करता येते.
जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ३० बाय ४५ सें. मी. खड्यात चहाची लागवड केली जाते. १.२ मीटर बाय १.२ मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रोपांची लागवड करता येते. चहाची लागवड एकदाच करावी लागते. या बागेची आयुमर्यादा साधारणपणे ५० वर्षे आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वारंवार करावा लागत नाही. चहाच्या बागेसाठी सुरुवातीला पहिल्या तीन वर्षासाठी साधारणत: ७३ हजार ८७६ रुपये खर्च येतो. मात्र पहिल्या तीन वर्षात उत्पादन मिळत नाही. चौथ्या वर्षापासून पुढे एकरी ८ हजार ते १६ हजार किलो कच्ची पाने इतके उत्पन्न मिळू शकते. आंतरपीक म्हणून बागेत काळी मिरी, वेलदोडे, काजू, सुपारी अशी पिके तर चहा रोपांना सावली मिळावी म्हणून सिल्व्हर ओक, खैर अशी झाडे लावून उत्पन्न घेता येते.
नवीन काहीतरी करण्याच्या उर्मीपोटी श्री. टेकवडे यांनी हा प्रयोग केला. चहा लागवड त्यांनी यशस्वी करुन दाखवल्यामुळे परिसरातील शेतकर्यांना रोजगारही मिळाला आहे. आसपासच्या शेतकर्यांनाही ते चहा लागवडीसाठी मार्गदर्शन करीत असतात. आपल्या बागेतच त्यांनी चहा प्रोसेसिंग युनिट उभारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा या तालुक्यातही चहा होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी या क्षेत्रातही मुसंडी मारुन कोल्हापूरचे नाव चहा उत्पादनातही येईल या दृष्टीने प्रयत्न करावे अशी टेकावडेंची अपेक्षा आहे.
(सौजन्यः महान्यूज)
प्रतिक्रिया
8 May 2010 - 11:57 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
9 May 2010 - 11:58 am | अन्या दातार
>>>पहिल्या तीन वर्षासाठी साधारणत: ७३ हजार ८७६ रुपये खर्च येतो.
प्रत्येक वर्षी ७३,८७६ की तीन वर्षात मिळुन ७३८७६????
9 May 2010 - 2:27 pm | पक्या
माहितीबद्दल धन्यवाद.
ज्या जमिनीत इतर काही पिकवणे अशक्य होते अशा जमिनीत ही चहाची लागवड केलेली असेल तर उत्तम.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
9 May 2010 - 9:38 pm | प्राजु
अरे वा!!
श्री. टेकवडे यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
उत्तम माहिती. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
10 May 2010 - 10:38 am | भारद्वाज
श्री. टेकवडे यांचे हार्दीक अभिनंदन
एका जाहिरातीची कॅचलाईनः सुवासिनीने कुंकवाला नि मर्दाने चहाला... नगं म्हनू नये
17 Sep 2010 - 6:51 pm | अन्या दातार
ही कॅचलाईन मगदूम चहाची!
मलाही खूप आवडते. लोक जेंव्हा चहा नको म्हणतात तेंव्हा एक तर कसंतरीच होतं आणि ही ओळ आठवतेच!
18 Sep 2010 - 3:52 pm | चिंतामणी
एका जाहिरातीची कॅचलाईनः सुवासिनीने कुंकवाला नि मर्दाने चहाला... नगं म्हनू नये
हंमममम
हा माझ्या वडीलांचा आवडता डॉयलॉग. ते खूप चहा पीत असत. घरी कोणिही आले की चहाचा आग्रह करून "अग, चहा टा़क" अशी ऑर्डर दिली जायची.
कोणीही चहा प्यायचा का असे विचारले तर उत्तर कायम होच असायचे.
आई कघी चिडुन म्हणायची "किती चहा पिता. कघीतरी नाही म्हणा." त्यावर त्यांचे उत्तर असायचे "सुवासिनी कधी कुंकवाला नाही म्हणते का?अ'
10 May 2010 - 3:44 pm | महेश हतोळकर
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची आठवण झाली. सुरुवातीला त्यावरही अशीच चर्चा झाली होती.
18 Sep 2010 - 1:09 am | शिल्पा ब
छान माहिती...पण पाण्याचे काय? किती पाणी लागते? आणि चव कशी आहे?
या चहाचे मार्केटिंग सुद्धा जोरदार केले पाहिजे अन पाकेजिंग सुद्धा आकर्षक पाहिजे तरच शहरी भागात हा चहा जोरदार खपला जाईल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
18 Sep 2010 - 11:05 am | सुत्रधार
श्री. टेकवडे यान्चि भेट होउ शकते का?
18 Sep 2010 - 11:50 am | सहज
चांगली बातमी!
पण धागाप्रवर्तकांना एक विनंती दोन, तीन वर्षांनी पुन्हा एकदा ह्या चहाचा आढावा घ्या. काही वेळा अश्या चांगल्या बातम्या ऐकल्या आहेत पण असे बरेचसे उद्योग काही ना काही अडचडींमुळे नंतर बंद पडले आहेत. आदिवासी तरुणांनी मिळून टोमॅटोचे उत्पन्न व त्यातुन केचप बनवुन विकले होते पण दोन तीन वर्षानंतर त्या प्रकल्पात अडचणी येउन बंद पडल्याची बातमी ऐकली होती त्या पार्श्वभूमीवर श्री टेकवडे यांच्या अभिनंदनाचा धागा इतकेच स्वरुन न राहो अशी इच्छा.
मागे एकदा गंगाधर मुटे यांनी असेच वांग्याचे भरमसाठ यशस्वी पीक घेउनही नंतर विक्री तोटा स्वीकारला होता, त्याची कथा जालावर वाचली होती.
शेतीतले अभिनव प्रयोग वाचायला चांगले वाटतातच पण त्या प्रकल्पाचे पुढे काय होते याबाबत तितके विशेष ऐकीवात नाही. वर्तमानपत्रांनी / अश्या बातम्या देणार्या पत्रकारांनी अश्या प्रयोगशील शेतकर्यांच्या प्रयत्नांना पण त्यातही त्यांच्या अडचणींना योग्यवेळी आवाज दिला तर कदाचित फायदा होईलही व प्रकल्पाला कोणी जाणकार वाचकांकडून योग्य वेळी मदत मिळेल.
अर्थात कोल्हापूरचा शेतकरी तुलनेत सक्षम आहे असे ऐकले आहे (चू.भू.दे.घे.)
श्री. टेकवडे यांचे अभिनंदन व अनेकोत्तम शुभेच्छा.