नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
10 Sep 2010 - 6:14 pm

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग १
नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग २
नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३
गायरांगरला भेट देऊन परत आलेसुंड गावात उतरलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. जड सामान काल थांबलेल्या हॉटेलमध्ये ठेवले होते. पण चेक आउट सकाळी केले होते. आज रात्री १२ च्या बोटीने निघून उद्या दुपारी ३ वाजता बर्गन ला पोहोचायचे. आज रात्री बोटीवर झोपण्यासाठी केबिन्स मिळाल्या होत्या. बोटीवर रहायचा नवाच अनुभव आज मिळणार होता त्यामुळे सगळे उत्साहात होतो.
पण एक छोटी अडचण होती. आता ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत वेळ कसा घालवायचा? सुदैवाने कालसारखा आज पाऊस नव्हता. पण लवकरच अंधार पडल्यावर गावातले प्रेक्षणीय स्थळ दिसणार नव्हते. मग ठरवले की जेवण करून रात्री दीपगृहाजवळ जाऊन रात्रीच्या बर्गन चे फोटो काढायचे. ( ट्रायपॉड चे ओझे त्याचसाठी वागवित होतो ! )
भरपूर वेळ आहे म्हटल्यावर एखादे भारतीय रेस्टॉरंट शोधूया असे ठरवले. गाव एवढे लहान की अर्ध्या तासात देशी रेस्टॉरंट सापडले सुद्धा !!! तिथे निवांत वेळ घालवत काहीबाही जेवलो. साडेदहाला दीपगृह शोधायला बाहेर पडलो. थंडी होती. सगुणाला पांघरुणात लपेटून बाबागाडीत झोपवून दिलं आणि जॅकेट घालून आलेसुंडच्या निर्मनुष्य रस्त्यांवर चालू लागलो. नुकतीच पौर्णिमा होऊन गेली होती. स्वच्छ आभाळात चंद्र आम्हाला सोबत करत होता. दीपगृहाजवळ पोहोचलो. सगळे शहर तिथून नजरेच्या टप्प्यात येत होते. भरतीचा समुद्र, लख्ख चंद्रप्रकाश आणि समोर निवांत झोपलेले शहर. काल पाहिलेली टेकडी दिव्यांनी लखलखत होती. अगदी टेकडीच्या माथ्यावर चंद्र दिसत होता. शांत स्निग्ध. किती दिवस झाले अशी शांतता अनुभवून ? वाहनांचे आवाज नाहीत, टी व्ही ची बडबड नाही. माणसांच्या चाहुली नाहीत. फक्त समुद्राची गाज आणि वार्‍याची शीळ.. ! मोठा श्वास घेतल्याचाही आवाज कानांना स्पष्ट जाणवावा अशी शांतता. पुन्हा मन देशात उडालं. कुठल्याश्या गडावर भर दुपारी मंदिराच्या गाभार्‍यात ऐकलेली शांतता मनात दाटून आली. खरं तर समोरची अर्धचंद्राकृती दिव्यांची माळ बघून मुंबई आठवायला हवी होती. मातीच्या मनात मातीच्याच आठवणी रुजल्यात त्याला काय करणार !

chandra

ratra

ह्म्म. ट्रायपॉडवर फोटो टिपण्याच्या कसरती सुरू झाल्या. कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला. मग कॅमेर्‍याचं पोट रिकामं आणि मनाचं पोट फोटो काढून भरल्यावर सामान घ्यायला कालच्या हॉटेलकडे गेलो. सामान घेईपर्यंत आम्हाला नेणार्‍या बोटीचा भोंगा ऐकू आला.

आजची बोट कालच्या वरताण होती. अजून मोठी. उत्साहात चेक इन करायला गेलो. तर कळलं की आमच्या केबिन्स खिडकीच्या नाहीत ! आणि सकाळी ९ वाजता त्या सोडायच्या पण आहेत. भलंबुरं वाटून घेण्याच्या मूडमध्ये कोणी नव्हतंच. गुमान आमच्या केबिनमध्ये गेलो. तिथे दोन बेड, दोन कपाटं, लिहिण्याचा टेबल, आणि बाथरूम अशा सर्व सुविधा होत्या. फ्रेश होऊन झोपलो. रात्री कुणीतरी हलवल्यामुळे जाग आली. जरा दचकूनच जागी झाले. अशी झोपल्याझोपल्या रूमसह हलण्याचा अनुभव आधी कुठे बरं आला होता? ह्म्म्म.. लातूरला भूकंपाच्या वेळी ! एक क्षण लागला हे आठवायला आणि हा भूकंप नसून आपण नॉर्वेतल्या एका बोटीवर आहोत याचे भान यायला. होय. आमची बोट कसल्याश्या आनंदात अक्षरश: डुलत चालली होती ! एखाद्या प्रचंड मोठ्या झोक्यावर असल्यासारखं वाटत होतं. पोटातलं अन्न पण आनंदात नाचायला लागलं होतं. कधी बाहेर पडेल सांगता येत नव्हतं. आख्खी बोट डावीकडे उजवीकडे कलंडत होती. मध्येच खर्रर्र असा खडकांना घासल्याचा आवाज यायचा. मनात जहाजाच्या कप्तानाला शिव्या घातल्या. जोरदार दणका बसल्यावर बस ड्रायवरला नाही का देत आपण शिव्या ? तशा. एकदा तर वाटलं हा झोपला तर नसेल ? आणि म्हणून बोट भलतीकडेच जऊन खडकांवर आदळतेय वगैरे ! भरीत भर टायटॅनिक आणि इतर काही चित्रपट पण याच वेळेला का आठवावेत !!! तब्बल दोन तास बोटीचे हे निशानर्तन चालले होते. आणि मनाचे , कल्पनाशक्तीचे व्यायाम ! कधीतरी आपोआप झोप लागली.

सकाळ प्रसन्न होती. लख्ख ऊन पडलं होतं. आवरून नाश्ता करून डेकवर गेलो. तिथे हेलिपॅड होतं ! जॅकूझी आणि सोनाबाथ वगैरे चैनीच्या गोष्टी पण होत्या. आजही डेकवर गेलं की सूर्यफुलाच्या शेतात गेल्यासारखं वाटलं. सगळे लोक सूर्याकडे तोंड करून निवांत पडले होते. आम्ही पण जागा घेतल्या.

lok

समोर समुद्र खेळत होता. अधुनमधुन समुद्रातूनच डोंगर कडे मान उंच करून आमच्याकडे बघत होते. समुद्र पण कसा बहुरूपी असतो नाही. काल रात्री चंद्रप्रकाशात तो ज्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन विश्वासाने स्वप्नात रममाण व्हावं अशा मित्रासारखा दिसत होता. रात्री बोट हलत असताना कुटिल जादूगारासारखा वाटत होता. कोणत्याही क्षणी गायब करू शकेल असा. आणि आज सकाळी रांगत रांगत खोड्या करत घरभर खेळणार्‍या बाळासारखा निरागस हसत होता. असं वाटलं या समुद्राला उचलून घेऊन त्याच्या जावळांवर हात फिरवावा ! आजही अधुन मधुन बेटांवर लहान मोठी खेडी वसलेली दिसत होती. कालच्यापेक्षा आजचा समुद्रमार्ग बराच मोठा होता. रुंद होता. तरीही एखाद्या डोंगराला बोट जेव्हा वळसा घालून जाई तेव्हा खडकाला घासल्याचा आवाज येत होता.

ghar

ghare

ghare

rasta

आजचा वेळ फार लवकर गेला. बर्गन शहर दिसू लागले. बर्गन हे नॉर्वेतले आकाराने २ क्रमांकाचे मोठे शहर. ४०० वर्षांपासून अत्यंत महत्त्वाचे व्यापारी बंदर. अनेकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पुन्हा पुन्हा जोमाने उभे राहिलेले हे शहर एके काळी युरोपची व्यापारी राजधानी म्हणून ओळखले जायचे. जहाजातून उतरून बाहेर रस्त्यापर्यंत येताना अगदी मोठ्या विमानतळावर उतरल्यासारखे वाटत होते.

नकाशानुसार चालत जाऊन हॉटेल गाठले. थोडे खाऊन बाहेर पडलो. हॉटेल अगदी गजबजलेल्या परिसरात होते. जुन्या काळातल्या फिशमार्केटचा हा भाग आजही तितकाच प्रेक्षणीय आहे. जागोजागी थुईथुई नाचणारी कारंजी, त्याभोवती आकर्षक आकारात वाढवलेली हिरवळ आणि फुलांच्या वेली संध्याकाळच्या उन्हात वातावरण प्रसन्न करीत होत्या. गावातील प्रसिद्ध दर्यावर्दींचे आणि शिलेदारांचे, कलाकारांचे पुतळे या भागाला वेगळाच दिमाख प्राप्त करून देत होते.

आम्हाला जायचे होते फ्लोइएन डोंगरावर. तिथून संपूर्ण बर्गन शहराचा नजारा अप्रतिम दिसतो. वर जाण्यासाठी तिथली प्रसिद्ध केबलकार, फ्लोइबानन फ्युनिक्युलर घ्यायची होती. अतीशय तीव्र चढावरून समुद्रसपाटीपासून ३२० मीटर वर घेऊन जाणारी ही सुविधा जुन्या तंत्रज्ञानाची कमाल मानली जाते. अवघ्या ५ मिनिटात आम्ही फ्लोइएन डोंगरमाथ्यावर गेलो.
वाटेत अजून एक अप्रूप पाहिले. एवढ्या तीव्र उतारावर घरांची गर्दी ! तिथपर्यंत जायला अगदी अरुंद रस्ते. खरोखरीच नॉर्वे मध्ये ओस्लो नंतर इथेच एवढी दाट लोकवस्ती बघायला मिळाली.
वरून दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्याची चित्रेच बोलकी आहेत.

karanje

shahar

raste

पावसाला सुरुवात झाल्याने लवकर खाली उतरावे लागले. जेवून हॉटेलवर परत आलो. उद्याचा दिवस जास्त धावपळीचा आहे. लवकर झोपले पाहिजे. त्या आधी बाजारातून आणलेले साहित्य वापरून चौघांनी पटापट सँडविचेस बनवून घेतली. जवळची शिदोरी संपली होती नि उद्याच्या धावपळीत जेवण शोधायला वेळ मिळणार नव्हता.
आता उद्या फ्लाम.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

सुरेख! :)

खूप छान! वाचनखूणेची सोय मिळाली की नक्की साठवणार हे धागे. बयो, तब्येतीत लिही.

मेघवेडा's picture

10 Sep 2010 - 7:03 pm | मेघवेडा

असेच म्हणतो!

कडक वर्णन नि कडक फोटू! हा भागही खासच!

वरच्या दोन्हीही उर्मट लोकांशी सहमत आहे... :)

धमाल मुलगा's picture

10 Sep 2010 - 6:24 pm | धमाल मुलगा

मी काहीच प्रतिसाद देणार नाही....
म्हणजे, देऊच शकत नाही. शब्दांनी साथ तर द्यायला हवी की नाही?

फ्लाम वृतांत वाचण्यास आतुर... :)

विलासराव's picture

10 Sep 2010 - 6:35 pm | विलासराव

वाचतोय. आहेच तुमच्याबरोबर प्लामला.
फोटोज नेहमिप्रमाणे अप्रतिम.

अंगावर शहारे येतील असे शब्द वापरून नेमकं वर्णन कसं करावं हे तुझ्याकडून शिकायला हवं.
फोटू अप्रतिम आणि लेख छान!
तुझ्या मुलीचं नाव अगदी गोड आहे.

चतुरंग's picture

13 Sep 2010 - 10:01 pm | चतुरंग

माझ्याकडे आणखी शब्द नाहीत!

रंगा

पाषाणभेद's picture

10 Sep 2010 - 6:49 pm | पाषाणभेद

पुढारलेल्या देशांतल्या शहरांच्या रचनेत, घरांमध्ये साधारणपणे सौंदर्यदृष्टी दिसते. शहराची स्कायलाईन तर एकदम छान असते.
लेख छानच. लेखमालेचे पुस्तक काढा.
@यशोधरा@: वाचनखुणेची सोय मिळाली की सांगा.

सुनील's picture

10 Sep 2010 - 6:48 pm | सुनील

नेहेमीप्रमाणेच सुंदर.

मृत्युन्जय's picture

10 Sep 2010 - 6:58 pm | मृत्युन्जय

मी फोटो पाहिलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्य खोलीतुन दिसणारे ते तळे आणि मधोमध असलेले कारंजे मला दिसलेले नाही आणी जहाजातुन काढलेले ते चिमुकल्या गावाचे फोटो तर अजिबात बघितलेले नाहीत. त्यामुळे जळजळ होण्याचा प्रश्नच नाही.

असले लेख लिहित जाउ नका हो तुम्ही आणि फोटो तर अजिबात टाकु नका. लगेच ऑफिस सोडुन सुट्टीवर जायची इच्छा होते आणि सुट्टी मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे लै चिडचिड होते. :)

बाकी नॉर्वे राहण्यासाठी महाग आहे म्हणे. खरे का? खर्च किती आल

योगी९००'s picture

10 Sep 2010 - 7:02 pm | योगी९००

नॉर्वे रहाण्यासाठी खुपच महाग आहे..

बाकी प्रवासवर्णन खुपच छान्..माझे पण फोटो टाकायचा मोह होत आहे..पण त्या बरोबर इतके सुंदर वर्णन नाही जमणार म्हणून जरा थांबतो..

सहमत.;)
मायाची ही मालिका वाचून लग्गेच नॉर्वेला जावेसे वाटत आहे.

विलासराव's picture

10 Sep 2010 - 7:12 pm | विलासराव

फोटो न पहाताच दिला होता असे समजावे.
मी फोटो पाहिलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्य खोलीतुन दिसणारे ते तळे आणि मधोमध असलेले कारंजे मला दिसलेले नाही आणी जहाजातुन काढलेले ते चिमुकल्या गावाचे फोटो तर अजिबात बघितलेले नाहीत. त्यामुळे जळजळ होण्याचा प्रश्नच नाही.
असेच म्हणतो.

बेसनलाडू's picture

11 Sep 2010 - 3:07 am | बेसनलाडू

असले लेख लिहित जाउ नका हो तुम्ही आणि फोटो तर अजिबात टाकु नका. लगेच ऑफिस सोडुन सुट्टीवर जायची इच्छा होते आणि सुट्टी मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे लै चिडचिड होते.
खरे आहे. पोटापाण्यासाठी (आणि कदाचित अशा मजेसाठी/देशाटनासाठी) चाकरी करून पैसे मिळवायचे आणि ते मिळवताना भटकायला, मजा करायला मिळत नाही, म्हणून हळहळायचे, असे हे नोकरीचे दुष्टचक्र आहे खरे!
(नोकरदार)बेसनलाडू

सुंदर वर्णनाची आणि फोटोंची लेखमाला.

प्राजु's picture

10 Sep 2010 - 8:59 pm | प्राजु

जबरदस्त!!!!! :)

अर्धवटराव's picture

10 Sep 2010 - 10:16 pm | अर्धवटराव

काय मस्त लिहीता हो तुम्ही !!
मझा आला.

अर्धवटराव

संदीप चित्रे's picture

10 Sep 2010 - 11:41 pm | संदीप चित्रे

फोटो तर अजिबातच पाहिले नाहीत,
लगेच उठून नॉर्वेला जाऊन यावं असं तर अजिबात म्हणजे अजिबातच वाटलं नाही.
'मातीच्या मनाला मातीची आठवण', 'सूर्यफुलाचं शेत' अशी वाक्यं तर आवडलीच नाहीत.
--------------
पुढच्या भागाची वाट बघतोय का? ह्हॅ.. कशाला बघायची ? :)
-------------
अवांतरः
मितान -- ह्या लेखांचा आणि फोटोंचा एकत्रित 'कोलाज' करता आला तर जरूर बघ.
एकमेवाद्वितीय होईल.
अति अवांतर -- 'मस्त कलंदर'ला तिच्या 'रिकामपणाचा उद्योग' म्हणून हे कोलाज करण्यासाठी पटवता आलं तर बघ :)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Sep 2010 - 11:38 pm | बिपिन कार्यकर्ते

मायावी दुनिया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मितान's picture

11 Sep 2010 - 12:43 pm | मितान

सर्वांचे आभार :)

एक गोष्ट सांगायची राहून गेली. फोटोत दिसणार्‍या कारंज्याची. हा फ्लोईएन डोंगरमाथ्यावरून दिसणार्‍या कारंज्याचा फोटो आहे. हे शहर समुद्रात माती टाकत, त्याला मागे हटवत हटवत वसवले गेले. पण शहरात त्या समुद्राचे अस्तित्व ठेवायचे म्हणून हे छोटेसे तळे तसेच ठेवले. ते समुद्राच्या पाण्याचे आहे. खारे पाणी !
मला ही कल्पना खूप भावली. निसर्गाबद्दल अशी कृतज्ञता क्वचित दाखवली जाते.

चौथा कोनाडा's picture

14 May 2024 - 12:25 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुंदर चित्रदर्शी वर्णन आणि प्रचि !


भरतीचा समुद्र, लख्ख चंद्रप्रकाश आणि समोर निवांत झोपलेले शहर. काल पाहिलेली टेकडी दिव्यांनी लखलखत होती. अगदी टेकडीच्या माथ्यावर चंद्र दिसत होता. शांत स्निग्ध. किती दिवस झाले अशी शांतता अनुभवून ? वाहनांचे आवाज नाहीत, टी व्ही ची बडबड नाही. माणसांच्या चाहुली नाहीत. फक्त समुद्राची गाज आणि वार्‍याची शीळ.. ! मोठा श्वास घेतल्याचाही आवाज कानांना स्पष्ट जाणवावा अशी शांतता. पुन्हा मन देशात उडालं. कुठल्याश्या गडावर भर दुपारी मंदिराच्या गाभार्‍यात ऐकलेली शांतता मनात दाटून आली. खरं तर समोरची अर्धचंद्राकृती दिव्यांची माळ बघून मुंबई आठवायला हवी होती. मातीच्या मनात मातीच्याच आठवणी रुजल्यात त्याला काय करणार !

वाह, क्या बात ! सुंदर !!!!