रेल्वेने ऑस्लो मागे टाकले. आता सहा तास रेल्वेतून नॉर्वे बघायचा होता. चित्रातल्या सारखेच दिसत होते सगळे. नॉर्वे ही सुजलाम् भूमी आहे. इतके पाणी मी कुठेच नाही पाहिले. सहजतेने निर्माण झालेली विशाल सरोवरं सर्वत्र दिसत होती. आणि त्या सरोवराच्या काठाशी बिलगलेली नॉर्वेजियन खेडी. लांबच लांब कुरणे हिरव्यागार गवतावर पावसाने मोती शिंपडल्यासारखी चमचमत होती. मध्येच एखादा अवखळ झरा खळाळत यायचा. थोडी जागा सापडली की विसाव्यासाठी पाणी थांबून तळे तयार झालेले असायचे. त्या भोवती आनंदात हसणारे एखादे शेत. शेताच्या एखाद्या कोपर्यात कौलारू घरे. त्या दोनचार घरांची वाडी बघताना राहून राहून "पाडस" मधले ज्योडीचे घर आठवत होते. अगदी तस्सेच दृश्य दिसत होते.
लोकवस्ती खूप विरळ दिसत होती. इथे सरासरी ४ किमी स्क्वेअरमध्ये १२० लोक राहातात म्हणे ! सरोवरांच्या काठावर कितीतरी सुबक घरे दिसत होती. इतक्या काठावर की घरामागच्या पायर्या पाण्यात दिसायच्या. त्या प्रत्येक घराचे वैशिष्ट्य म्हणजे घराजवळ बांधलेली छोटीशी होडी. अगदी हौसेने रंगरंगोटी करून सजवलेली. उन्हाळ्याच्या ४ महिन्यात मासेमारी करून ताज्या माशांनी पोटं नि मनं तुडुंब भरत असावीत. हा भाग सामन माश्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे म्हणे. सामन मासे समुद्रातून नदीत प्रवाहाच्या विरुद्ध पोहत येतात आणि मग अंडी घालतात. त्यामुळे या लहान मोठ्या तळ्यांच्या नि नद्यांच्या प्रदेशात त्यांचा सुकाळ असतो. मत्स्याहारी लोक दुरून येतात ताजे सामन खायला. अर्थात आम्हाला शाकाहारी असल्याने त्याचा काही लाभ घेता आला नाही.
लोकांचे रहाणीमान मात्र सधन असल्याचे जाणवत होते. या खेड्यांमधल्या प्रत्येक घरापुढे आधुनिक कार, सोर्ट्सकार आणि बाईक्स दिसत होत्या. तळ्याकाठच्या एका घरासमोर तर चक्क एक छोटेसे खाजगी विमानही होते ! घराच्या अंगणात वेगवेगळ्या आकाराचे पोहण्याचे तलाव निळ्याशार रंगाने उठून दिसत होते. घराजवळ गोठा. त्यात गायी, हरणं आणि घोडे. याशिवाय कोंबड्या सश्यांची खुराडी आणि कुत्री होतीच. कसे दिसत असतील या घरात रहाणारे लोक ? अंहं ! एकही माणूस दिसायला तयार नाही. हे समोरचं निसर्गदृश्य एखाद्या लँडस्केप सारखं माणसाच्या चित्राशिवाय दिसत होतं.
एका बाजूला उंचच उंच लांबवर पसरलेल्या डोंगर रांगा, त्यातून खेळत येणारे झरे, नद्या, त्यावर बांधलेले चित्रमय पूल आणि लखलखणारी तळी ! एवढा वेळ भान हरपून हे चित्र बघत होते. त्या सौंदर्याची गुंगी यायला लागली. त्यात काल रात्री ४ च तास झोप मिळाली होती. पण पोटात काहीतरी गेल्याशिवाय झोप लागणार नव्हती. सोबत शिदोरी भरपूर होती. तरीपण गरम काही मिळते का बघितले. पॅन्ट्रीत गरम गरम स्पिनॅच पाय मिळाले. शाकाहारी हा एकच पदार्थ होता. ( त्याच्या नावात 'पाय' ! ) पालक आणि चीज भरलेले हे गरम गरम पॅटीस पोटात गेले नि झोपेने जोरदार आक्रमण केले. मन झोपायला तयार नव्हते. आणि शरीर जागे रहायला. बाहेर निसर्गाचा एवढा उत्सव मांडलेला दिसत असताना झोप येणे म्हणजे करंटेपणाच ! बराच वेळ नुसत्या डुलक्या काढल्या. बाहेर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. आता आमचे स्टेशन जवळ आले होते.
स्वभावानुसार रेल्वेच्या डब्यात पसरू दिलेला सहा तासांचा संसार गोळा केला नि उतरलो. आजून मुक्कामाचे ठिकाण दोन तास बस च्या अंतरावर होते. जिथे उतरलो ते स्टेशन अद्नाल्स्नेस. समोर एक मोठ्ठे सरोवर आणि तीन दिशांना डोंगर रांगा. क्यामेरे सरसावले. १० मिनिटात किती बघू नि काय काय टिपून घेऊ असे झाले. शेवटी बसमध्ये बसावेच लागले. आता आम्ही पठारी प्रदेश सोडून पर्वतीय प्रदेशात जात होतो. नदीला नि सरोवरांना अगदी लगटून आमचा रोड वळणे घेत होता. मध्येच बोगद्यातून बस जात होती. ड्रायवरमामा खुषीत दिसत होते. सोबतच्या प्रवाश्यांशी नॉर्वेजियन भाषेत गप्पा मारत होते. बसमध्ये बरेच पर्यटक होते. मध्येच एखादे सुंदर दृश्य बाहेर दिसायचे नि "वाव ! ऑसम् ! ग्रेट ! " असे उद्गार ऐकू यायचे. लगेच बाकी सगळे क्यामेरे तिकडे जायचे ! आपल्याला मिळणारा आनंद असा सहजतेने वाटला जात होता. दुणावत होता. माझ्या पुढच्या सीटवर एक अमेरिकन काका नि एक जपानी काका यांच्या गप्पा चालू झाल्या होत्या. अमेरिकन बडबडे असतातच पण जपानी काकांना स्वतःचा कंपू सोडून गप्पा मारताना बघायला छान वाटत होते. निसर्गाची जादू असेल ही !
मुक्कामाचे गाव आले. आलेसुंद. या गावाच्या नगरपालिकेत पाच आयलंड्स येतात. लोकसंख्या ४२०००. एकूण सात बंदरे असल्याने हे नॉर्वेतले एक महत्त्वाचे मत्स्यव्यापार केंद्र मानले जाते. गिरिंजर फियॉर्डशी जोडले गेले असल्याने पर्यटन व्यवसायातही या गावाचे स्थान महत्वाचे आहे.
आमच्या बसच्या ड्रायवरमामांना आमच्या हॉटेलचा पत्ता माहीत होता. त्यांनी उतरल्यावर कुठून कसे जायचे ते सांगितले. गावात प्रवेश करताच एका सरकारी इमारतीसमोरच्या पुतळ्याने लक्ष वेधले. मासे धरायला गेलेल्या आपल्या प्रियकराची वाट बघणारी एक तरूण मुलगी होती ती. या पुतळ्याच्या चेहर्यावरचे भाव आणि वाट बघणारी मुद्रा एवढी बोलकी होती ! कन्याकुमारीची गोष्ट आठवली नि क्षणभर व्याकूळच झाले.
आज मात्र हातातल्या नकाशाने आणि ड्रायवर काकांनी मदत केल्याने हॉटेल लगेच सापडले. हॉटेलकडे जाणारा रस्ता समुद्राच्या काठानेच जात होता. सध्या तिथे खाद्यमहोत्सव चालू होता. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वाईन्स चा वास वातावरणार भरलेला होता. लोक त्या वेगवेगळ्या पदार्थांवर रांगा लावून तुटून पडत होते. ( हो, हो, आठवले मला पुण्यातले असे महोत्सव ! ) इथे काही शाकाहारी आहे का विचारले असते तर लोक दगड घेऊन स्वतःचे डोके फोडत बसले असते असे वाटले. एवढे तल्लीन होऊन सगळे मासे खात होते. ( इथे शाकाहारी मागणे म्हणजे एखाद्या डिस्को बँडला 'देहाची तिजोरी" वाजवायला सांगणे झाले असते ! )
सामानाचे ओझे हॉटेलवर टाकून परत येऊ असे म्हणून हॉटेलवर पोहोचलो. सामान लावताना डब्यातल्या मेथी पराठ्यांचा घमघमाट आला. मग काय सोबत शेंगादाण्याची चटणी, पराठे आणि वर कणीक लाडू असा उभा आडवा यथेच्छ समाचार घेऊन सगळे ताजेतवाने झालो.
जवळच एका टेकडीवरून संपूर्ण गाव आणि समुद्र असे सुंदर दृश्य दिसते असे कळाले. तिथे गेलो तर काय ओबडधोबड रस्त्यावर टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ५०० पायर्या बांधलेल्या होत्या. आमच्या सोबत सगुणा. तिला उचलून चढणे किंवा बाबागाडी चढवणे दोन्ही शक्य दिसत नव्हते, म्हणून आम्ही दोघे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या बागेत थांबलो नि सोबतचे गीता-माँटी टेकडी चढायला गेले.
थोडावेळ खेळल्यावर तो कन्याकुमारीचा पुतळा जवळून बघून गावात एक चक्कर मारू असा विचार करून निघालो. गाव डोंगरात असल्याने सगळे रस्ते चढउतारांचे होते. काही ठिकाणी दगडी पूल आणि पायर्या बांधून दोन डोंगर जोडले होते. आम्ही मुख्य रस्त्याला लागलो नि पावसाला सुरुवात झाली. हे अनपेक्षित नव्हतेच. हे गाव पावसाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे म्हणतात. एक विनोदही सांगतात. एकदा एका पर्यटकाने गाईडला विचारले, काय रे, पाऊस कोणत्या काळात नसतो ? यावर गाईड उत्तरला , " मला काही कल्पना नाही बुवा. कारण मी फक्त २४ वर्षांचा आहे ! "
तर अशा या पावसाने चांगलीच झोडपायला सुरुवात केली. एका दुकानासमोर निवार्याला उभे राहिलो. अर्धा तास झाला तरी पाऊस थांबेना. कमी पण होईना, शेवटी टॅक्सी केली. १ कि मी च्याम अंतरासाठी भरपूर पैसे मोजून हॉटेलवर परतलो. खिडकीतून रिमझिम पाऊस, समुद्रावर पडणारा दिसत होता. मावळतीचा सूर्यप्रकाश वातावरण अजून भारून टाकत होता. परतणार्या नौका, परतणारे पक्षी आणि परतणारा सूर्य ! मन काही क्षण नि:शब्द झाले.
एवढ्यात माँटी-गीता परत आले. मग कॉफी ( ही हॉटेलमध्ये रहाणार्यांसाठी चक्क फुकट होती ! ) गप्पा, आणि गाण्याच्या भेण्ड्या. ४ वाजता पोटभर खाल्ल्याने उगाच काहीतरी खायचे म्हणून पावसात बाहेर जाण्याची कोणाची तयारी नव्हती. सामान आवरून ठेवले आणि झोपलो.
उद्या निसर्गदेवतेचा एक चमत्कार पहायला जायचे आहे. गिरिंजर फियॉर्ड !
प्रतिक्रिया
7 Sep 2010 - 6:06 pm | स्वाती दिनेश
हा भाग छान झाला आहेच, आता गिरिंजर फियॉर्डची वाट पाहत आहे.:)
स्वाती
7 Sep 2010 - 6:11 pm | मेघवेडा
हां.. आत्ता कसं.. असेच मुबलक फोटो हवेत तर प्रवासवर्णनाला मजा! :) सह्हीच!
7 Sep 2010 - 6:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुं द र!
7 Sep 2010 - 6:25 pm | सुनील
मस्त!
बाकी भाषेचा काही प्रश्न आला की कामचलावू इंग्रजी येत होती सगळ्यांना?
8 Sep 2010 - 12:25 pm | मितान
सध्या इंग्रजी न येणार्या गावात रहात असल्याने काही फरक जाणवला नाही. पण बोटीवरचे लोक, हॉटेल स्टाफ, बस ड्रायवर, रेस्टॉरंट मध्ये, बाजारात आम्ही बोललो त्या सर्वांना इंग्रजी येत होते.
नॉर्वेजियन भाषा डच आणि जर्मन भाषेशी बरीश साधर्म्य दाखवते. डच येत असल्याने लिखित नॉर्वेजियन मजकूर कळत होता.
9 Sep 2010 - 12:31 am | सुनील
धन्यवाद! नोर्वेजियन भाषेची दोन अधिकृत रुपे आहेत असे ऐकून आहे.
7 Sep 2010 - 6:49 pm | विलासराव
अप्रतिम फोटोज आनी त्यापेक्षा अप्रतिम लेखन.
मला तर ही पुर्ण लेखमालाच आवडली हे आत्ताच सांगुन टाकतो.( दोनच भाग झालेत तरीही)
आता येऊद्या तुमच्या सवडिने.आम्ही वाट बघत आहोतच.
7 Sep 2010 - 6:53 pm | विलासराव
पहिल्या भागाची लिंक टाकत चला.
7 Sep 2010 - 7:11 pm | यशवंतकुलकर्णी
ब्येस्ट फोटो ब्येस्ट वर्णन!!!
7 Sep 2010 - 7:17 pm | सहज
नॉर्वेचे दर्शन सुरेख!!!
7 Sep 2010 - 7:27 pm | मदनबाण
हा भाग देखील फार आवडला,परत पुढच्या भागाची वाट पाहत आहे. :)
7 Sep 2010 - 7:30 pm | ऋषिकेश
फोटो बघुनच इतकं प्रसन्न वाटतंय तर तिथे डोळ्याचं पारणं फिटलं असेल यात शंकाच नाही. हा भागही मस्तच. आता गिरिंजर फियॉर्डची वाट पाहतोय
7 Sep 2010 - 7:43 pm | समंजस
सुंदर!! छायाचित्रे आणि वर्णन सुद्धा!!
>> अमेरिकन बडबडे असतातच पण जपानी काकांना स्वतःचा कंपू सोडून गप्पा मारताना बघायला छान वाटत होते.
...काय अमेरिकन सुद्धा बडबडे असतात? [इंग्रजी येत असण्याचा परिणाम असावा ;) ]
7 Sep 2010 - 8:01 pm | मिसळभोक्ता
अमेरिकन लोक संध्याकाळी पाच नंतर खूप बडबडे होतात !
7 Sep 2010 - 8:19 pm | जिप्सी
मितानराव :- हान तेच्या आयला, जाउंदे झाडून! झक्कास लेख !
डिस्को बँडला 'देहाची तिजोरी" वाजवायला सांगणे ------> हसून हसून लोळलो,ह.ह.पु.वा,कॉफी मॉनीटर्वर उडाली ई.ई.(माझ्या डोळ्यापुढं चित्रच आलं,एखादा सेक्साफोनवाला अगदी आळवून आळवून "देहाची तिजोरी" वाजवायलाय हे !)
7 Sep 2010 - 8:41 pm | मस्त कलंदर
जिप्सीतै... उगीच माहिती नसताना कुणालाही भौ आणि राव म्हणत जाऊ नका!!!!!
मितान, छानच लिहिलेयस गं... पुढच्या भागाची वाट पाहातेय!!!
7 Sep 2010 - 8:35 pm | मितान
मितानराव ???? :)) :)) :))
एकूण माझ्या उपद्रवी आणि उचापती स्वभावाला अनुसरून मला कुटुंबातली जेष्ठ मंडळी "मायाराव" म्हणतात त्याची आठवण झाली ;)
8 Sep 2010 - 9:35 am | अर्धवट
जिप्सीतैंना अनुमोदन ;)
मेल्या चांगल्याक चांगला म्हणुक होया..
लेख उत्तम.. सलग लेख आणि नंतर फोटु आले तर मला अधिक आवडेल.. (च्यायला आम्ही करंटे शब्दप्रेमी पडलो ना)
7 Sep 2010 - 8:45 pm | जिप्सी
अर्र अस काय होतयं आजकाल काय कळत नाही,मला नावावरून वाटलं की तुम्ही राव असाल. तर असो ताई ब्येश्ट जमलय बघा तुम्हाला प्रवासवर्णन!
8 Sep 2010 - 12:43 pm | Pain
सहमत.
मितान हे मुलाचे नाव वाटते, आमच्या जुन्या रूम-मेटचे आहे.
या नावाची सदर व्यक्ती जर महिला असेल तर मग हे सुहास, किरण इ. सारखे असावे.
7 Sep 2010 - 9:39 pm | दासवानी
पुन्हा एकदा जातेय अस वाटतय! सगुणाच्या भाषेत म्हणावस वाटतय, "अज्जुन..!"
- गीता
7 Sep 2010 - 9:48 pm | योगी९००
मी सुद्धा गायरांगर फियॉर्ड ला गेलो होतो तेव्हा असा अनुभव आला. (पण लिहिण्याचे लेखन कौशल्य नसल्याने तो अनुभव मि.पा.वर नाही आला)
आणि एक गोष्ट.. त्याला http://en.wikipedia.org/wiki/Geirangerfjord म्हणजे गायरांगर फियॉर्ड असे म्हणतात..
7 Sep 2010 - 9:55 pm | बिपिन कार्यकर्ते
बेष्ट म्हणजे अगदी बेष्टच.
7 Sep 2010 - 11:02 pm | बहुगुणी
ही लेखमाला म्हणजे वृत्त-गण-मात्रा या बंधनांच्या पलिकडलं सचित्र शब्दकाव्य आहे! छान लिहिलं आहे, पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
9 Sep 2010 - 2:34 am | राजेश घासकडवी
आपल्या मनात आलेलं हुबेहुब कोणीतरी म्हणून ठेवलेलं असलं की कसं बरं होतं. नुसतं +१ म्हणायचं.
8 Sep 2010 - 2:41 am | प्राजु
स्वाती ताई ची आठवण झाली.
छान लिहिले आहेस.
8 Sep 2010 - 9:28 am | निखिल देशपांडे
अजुन एक सुंदर भाग
लवकरच पुढचा भाग टाका :-)
8 Sep 2010 - 9:37 am | अर्धवट
>>मध्येच एखादा अवखळ झरा खळाळत यायचा. थोडी जागा सापडली की विसाव्यासाठी पाणी थांबून तळे तयार झालेले असायचे. त्या भोवती आनंदात हसणारे एखादे शेत.
मितानराव.. दं ड व त..
8 Sep 2010 - 9:43 am | चतुरंग
अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि तितकेच रंजक लिखाण, भरपेट जेवणानंतरच्या एकदम जमून आलेल्या मसाला पानासारखा हा लेख आणि सोबतची चित्रे चवीचवीने चाखली!
आतोनात सुंदर निसर्ग माणसाला आधी बडबडायला लावतो आणि मग एकदम अंतर्मुख करतो.
फार छान. आने दो गायरांगर फियॉर्ड......
(डोळे लावून बसलेला)चतुरंग
8 Sep 2010 - 12:44 pm | Pain
प्रवासवर्णन आवडले. फोटो सुंदर आहेत.
आपल्या कन्याकुमारीची गोष्ट काय आहे ?
8 Sep 2010 - 1:33 pm | गणेशा
लिखान आणि फोटो आवडले..
भारतात असताना ही नोर्वेत आपणच फिरतो आहोत अशे वाटले.
नक्कीच भेट देण्यासारखा देश आहे असे वाटते.
सह्याद्रीच्या दरीखोर्यातुन फिरणारे आम्ही अश्या लोभस ठिकानी फिरताना ही छान वाटेल असे वाटते.
नार्वे तुमच्या शब्दचित्रांनी मनात साठवत आहे. -- धन्यवाद
8 Sep 2010 - 1:38 pm | परिकथेतील राजकुमार
फोटोज अँड वर्णनस एकदा अप्रतिमस ;)
गिरिंजर फियॉर्ड येउ द्या पटकन.
8 Sep 2010 - 1:55 pm | Pain
च्यायला, त्या बाई अजून तिथे गेल्या नाहीत, काही पाहिले नाही आणि प्रवासवर्णन लिहा अशी घाई तुझी.
वर्षानुवर्षे अर्धवट टाकलेल्या गोष्टी पूर्ण कर आणि मग लोकांना सांग.
9 Sep 2010 - 12:28 am | बेसनलाडू
(प्रवासी)बेसनलाडू
8 Sep 2010 - 4:31 pm | स्वाती२
मस्त झालाय हा भाग!
8 Sep 2010 - 5:10 pm | धमाल मुलगा
मितानराव ;)
आम्ही फोटु पाहुनच शून्यावस्थेत पोहोचलो आहोत. आपली तर काय ब्रम्हानंदी टाळीच लागली असेल ना?
8 Sep 2010 - 5:55 pm | पुष्करिणी
मितानराव , छानच ..
9 Sep 2010 - 12:21 am | नेत्रेश
पुढचा भाग लवकर येउदे...
10 May 2024 - 10:38 pm | चौथा कोनाडा
अतिशय सुंदर चित्रदर्शी वर्णन आणि प्रचि !