गेले कित्येक दिवस, मराठा आरक्षणाचा मुद्दा बराच गाजत आहे. कोणी त्याला विरोध करतो तर कोणी पूर्ण ताकतीनिशी पाठींबा व्यक्त करत आहे. समित्या नेमल्या जात आहेत, न्यायालयात खटले दाखल केले जात आहेत. आठवड्यातून एकदा तरी या संदर्भात बातमी वाचायला मिळतेच. मुळातच आरक्षण या विषयाचा फिरून एकदा विचार केला पाहिजे. लहानपणी मराठीच्या पुस्तकात “महापुरुषांचा पराभव” म्हणून धडा होता. महापुरुषांनी घेतलेले निर्णय हे कालसापेक्ष होते हे विसरून त्यांचे अंधानुकरण अनुयायांकडून केले जाते, आणि त्यामुळेच या महापुरुषांच्या विचारांचा पराभव दुसरे तिसरे कोणी नाही तर त्यांचे हे अंध अनुयायीच करतात असा काहीसा आशय होता.
आरक्षणाच्या बाबतीत पण थोडेसे असेच झाले आहे असे मला वाटते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाचा हा विचार मांडला नव्हे त्याला सत्तेचा पाठींबा दिला. त्यांचा यामागचा उद्देश सरळ होता. आजपर्यंत बहुजन समाजाची जी परवड झाली आहे ती थांबवणे. त्यांना पूर्ण समाजात मानाचे मिळवून देणे. त्यासाठी शिक्षण, नोकरी यामध्ये आरक्षण दिल्याने बहुजन समाजाला मूळ प्रवाहात सामील करून घेणे शक्य होते. आणि एकदा हे झाल्यानंतर आरक्षणाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करावे असे आंबेडकरांनी घटनेमध्ये स्पष्ट लिहिले होते. इथे पुअनारावालोकन याचा अर्थ मुदत वाढवावी की नाही यापेक्षा खरोखरच आरक्षणाचा काही फायदा झाला का? झाला तर कितपत? त्यामध्ये कोणते बदल केले पाहिजे हा होता. पण तसे न होता आरक्षणाचा मुदतीत वाढ करण्यात आली. एकामागोमाग एक अशा अनेक जाती या आरक्षणाच्या कक्षेत आणल्या जाऊ लागल्या. जणू काही आरक्षण हा एक हक्कच बनला. आरक्षण हा हक्क आहे ही भावना प्रबळ झाली आणि इथेच आंबेडकरांच्या विचारांची हार झाली असे माझ्हे मत आहे. प्रस्तुतचा विचार लिहिण्याचे प्रयोजनही हेच आहे.
या लेखाच्या शीर्षकामध्ये ब्राह्मण शब्द दोन वेळेला योजिला आहे. यातील पहिला गैरब्राह्मण या शब्दाचा मला अभिप्रेत असलेला अर्थ, सरकारदफ्तरी ज्यांची नोंद ब्राह्मण या जाती मध्ये नाही असा आहे. तर दुसरा ब्राह्मण हा शब्द ब्राह्मणी वृत्ती (जिचा उल्लेख वारंवार नेत्यांच्या (?) भाषणात केला जातो) त्याबद्दल आहे. ही ब्राह्मणी वृत्ती म्हणजे नक्की काय? पूर्वीच्या काळी शुद्र वर्णाला ज्ञानापासून तसेच इतर सुविधांपासून वंचित ठेवण्याची, शास्त्राचे ज्ञान घेण्याचा हक्क केवळ विशिष्ट वर्गालाच आहे असे मानण्याची वृत्ती हा होय. यामुळे शुद्रांवर अन्य तीन वर्णांकडून अनन्वित अत्याचार झाले. आपल्याकडे पूर्वापार चालू असलेली चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये जन्मानुसार वर्ण ठरवणे ही चूक राहिल्यामुळे किंवा ती तत्कालीन सवर्णांकडून मुद्दामून तशी घडवून आणल्यामुळे हे झाले हे सर्वश्रुत आहेच. यामुळे आजकाल बरेच विद्वान ही व्यवस्थाच चुकीची आहे आणि बंद केली पाहिजे असे ठासून सांगतात, नव्हे ती कालबाह्य झाली आहे असे सांगतात. मला तसे वाटत नाही. समाजात चार वर्ण राहणारच, फक्त ते जन्मानुसार नव्हे तर कर्मानुसार (किंवा कर्म करण्याच्या क्षमतेनुसार) व्हाव्हेत एव्हडेच. आणि हाच चांगला बदल आता घडू लागला आहे.
पूर्वीप्रमाणे जन्मानुसार चार वर्ण नसले तरी कर्मानुसार ते कायमच राहणार. सद्यपरिस्थितीत सत्ता चालवणारे नेते मंडळी (क्षत्रिय), विद्यार्जन करणारे विद्यार्थी, शिक्षक (ब्राह्मण), व्यापारउदीम करणारे व्यापारी (वैश्य) आणि शेवटी यासर्वांचे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालू राहावेत यासाठी येनकेन प्रकारे मदत करून आपला चरितार्थ चालवणारे (शुद्र) असे हे चार वर्ण स्पष्टपणे दृष्टीस पडतात. पूर्वीच्या काळी, ज्ञान हे समाजातील काही घटकांसाठी मर्यादित असल्याकारणे ते ज्याच्याकडे आहे त्याचे महत्व जास्त होते, त्यामुळेच सत्तेचा लाभ मिळालेल्या क्षत्रियांनी ब्राह्मणाचा आधार घेऊन राजकारण केले. हल्ली ज्ञानापेक्षा पैशांचे महत्व वाढत चालल्याने सत्ताधारी मोठ्या व्यापारी वर्गाला (अर्थात कर्मानुसार वैश्यांना) हाताशी धरून राजकारण करत आहेत. थोडेसे विषयांतर झाले तरी सांगण्याचा उद्देश हाच की काही झाले तरी समाजामध्ये चार वर्ण हे राहणारच.
आंबेडकर प्रभृतींचे म्हणणे हेच होते की हे चार वर्ण हे जन्माने नाही तर कर्माने ठरवले गेले पाहिजेत. त्यासाठी सर्वाना समान संधी मिळाली पाहिजे. म्हणजे एखाद्या माणसाला जन्माने एखादी गोष्ट करण्याचा हक्क मिळाला पाहिजे या ब्राह्मणी वृत्तीला त्यांचा विरोध होता. त्यासाठी त्यांना त्याकाळी योग्य वाटलेला मार्ग म्हणजे आरक्षण हा होय. पण आता आरक्षणामुळे नेमके हेच होत आहे. फक्त आता ब्राह्मण समाज नाही तर ब्राह्मणेतर समाज याची अंमलबजावणी करत आहे. मी जर मागासवर्गीय जातीमध्ये जन्म घेतला आहे तर मला आरक्षण मिळालेच पाहिजे हा अट्टाहास आहे मग माझी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कुवत कितीही मोठी असो. हीच ब्राह्मणी वृत्ती नव्हे काय? जन्माने एखाद्याचा हक्क ठरणे याविरुद्धच आंबेडकरांनी आवाज उठवला आणि आता तोच प्रकार त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे करत आहेत.
१८५७ चा उठाव असफल होण्याचे कारण त्याला सामान्य जनतेचा पाठींबा नव्हता हेच होते. याचे कारण म्हणजे सत्ता कुणाचीही येवो सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर फारसा फरक पडणार नव्हता. सत्ताधीशांबद्दल असलेल्या या अनास्थेच कारण म्हणजे सामान्य जनांचे प्रश्न सोडवण्याबाबत त्यांची असलेली उदासीनता. संख्येने बहु असलेल्या बहुजनांकडे असलेले दुर्लक्ष, त्यांना मुख्य प्रवाहात सामील न करण्याची वृत्ती. त्याकाळी शूद्रांच्या बाबतीत जे झाले ते आता ब्राह्मणाच्या बाबत होत आहे. फरक हा आहे की शूद्रांची परिस्थिती फारच बिकट होती तशी सगळ्या ब्राह्मण समाजाची नाही. पण काही मंडळी निव्वळ द्वेषाखातर तसे पाहू इच्छित आहे. पूर्वीच्या काळी आता सारखी दळणवळणाची साधने नसल्याने पिडीतांना गावाच्या किंवा राज्यांच्या सीमा होत्या. आज तसे नाही त्यामुळे बहुतांश ब्राह्मण समाजातील उच्चशिक्षित तरुणांचा कल भारत सोडून परदेशी स्थायिक होण्याकडे आहे. यामागे इतर काही गोष्टींबरोबरच सरकारबद्दल अनास्था तसेच त्यांच्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता ही सुद्धा आहे.
एव्हडे सगळे पाल्हाळ लावण्याचा उद्देश हाच की आरक्षण हा समाजातील विषमता दूर करण्याचा तोडगा असूच शकत नाही. उलट आरक्षणाचा परिणाम वर उल्लेखील्याप्रमाणे ब्राम्हणी वृत्तीला खतपाणी देण्याचेच काम करत आहे. फक्त ही ब्राह्मणी वृत्ती आता गैरब्राह्मणांच्यात रुजते आहे. आणि पूर्ण समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे. द्वेष पेरला तर द्वेषच उगवणार त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवे. आज मला कुलकर्णी, जोशी हे ब्राह्मण, पाटील, जाधव हे मराठा असे भेद माहित आहेत कारण लहानपणी अगदी पहिलीत असताना हजेरीपुस्तकावर किंवा शाळा सोडताना मिळालेल्या दाखल्यामध्ये जात ब्राह्मण असा उल्लेख आहे. हे थांबणे आवश्यक आहे. लहानपणीच तू ब्राह्मणाचा, तू मराठ्यांचा, तू कुणबी हा भेद मुलांच्या मनावर ठसवणे बंद झाले पाहिजे. पण याउलट जातीनिहाय जनगणना करण्यासाठी ब्राह्मणी वृत्तीचे लोक आग्रह धरत आहेत. आणि असे होत असताना आपल्यासारखा माणूस नुसत्या बघ्याची भूमिका घेण्याशिवाय दुसरे काही करत नाही किंवा करू शकत नाही हीच या सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची शोकांतिका आहे.
प्रतिक्रिया
3 Sep 2010 - 4:36 pm | इंटरनेटस्नेही
ह्म्म्म...
3 Sep 2010 - 4:41 pm | प्रकाश घाटपांडे
हाही ब्राह्मणी कावा! ;)
3 Sep 2010 - 4:51 pm | नितिन थत्ते
जागा राखून ठेवत आहे.
3 Sep 2010 - 4:53 pm | गणेशा
आरक्षण नको असेच मनापासुन वाटत आहे.
काही समाज .. काही जातीय संघटना..काही नेते आरक्षणाची मागणी करत आहेत. परंतु ते सरस्वी चुकीचे वाटते आहे.
परंतु या काही समाजामुळे .. काही संघटनांमुळे .. काही नेत्यांमुळे संपुर्ण त्या जाती व लोक बदनाम होत आहेत.
आणि सुशिक्षित भारताचे असलेले स्वप्न आरक्षित भारत या स्थीती मध्ये येवुन संपत आहे...
आरक्षणाची मागणी म्हणजे स्वताच्या दुबळेपणाचे प्रकटण वाटते ..
समान नागरी कायदा जोपर्यंत अस्तित्वात नसेल तोपर्यंत समाजाचे हे असले धिंदोडे निघतच राहतील ..
आणि आपाप्सातील भांडणे ही असीच जातीनिहाय चालु राहतील ..
नेत्यांची पोटे त्यामुळेच भरत आहेत पण आजकाल सामन्य माणुस म्हणुन जगणार्या लोकांच्या संघटना होऊन त्यांचे ही कार्य याकडेच झुकलेले दिसत आहे ..
परंतु .. सामन्य माणुस गप्प बसण्यापलीकडे काहीच करत नाही.
कारण तो आत्मकेंद्रीत झालेला आहे. तुम्ही आम्हीच पहा ना .. प्रशन पडले म्हणुन फार तर लिखान करतो कारण आप्ली उडी तिथपर्यंत हेच बंधन आपणच तयार केलेले आहे. आणि कदाचीत कोणी मोठी उडी मारायला लागला की त्या त्या संघटना -- समाज -- नेते यांना वरच्या वर .. वर पाठवण्याची व्यवस्था करतात ..
3 Sep 2010 - 5:36 pm | गांधीवादी
कदाचीत कोणी मोठी उडी मारायला लागला की त्या त्या संघटना -- समाज -- नेते यांना वरच्या वर .. वर पाठवण्याची व्यवस्था करतात ..
१०० टक्के सत्य.
3 Sep 2010 - 4:56 pm | ज्ञानेश...
चांगला लेख आहे. भावना समजल्या.
एक प्रश्न-
आरक्षण हा समाजातील विषमता दूर करण्याचा तोडगा असूच शकत नाही.
समाजातील विषमता दूर करण्याचा अन्य कुठला तोडगा असावा असे आपल्याला वाटते? थोडक्यात, आरक्षण नको तर मग दुसरे काय हवे?
3 Sep 2010 - 5:06 pm | प्रकाश घाटपांडे
मग पर्याय कोणता देणार?
3 Sep 2010 - 5:14 pm | अनाम
विषय फार नाजुक आणि राजकारण्यांच्या जिव्हाळ्याचा आणि मतलबाचा आहे.
आरक्षण असावे पण ते जाती धर्मावर आधारीत असु नये.
मधला मार्ग शोधावा जसे हे आरक्षण आर्थीक दृष्ट्या (मुदाम मागासलेल्या हा शब्द टाळत आहे.)पिडीतांसाठी असावे आणि तेही फक्त शिक्षणा पुरते मर्यादित. नोकर्या वा बढत्यां मध्ये कुठल्याच आरक्षणाला मुळीच वाव नसावा.
महिला आरक्षण हा अजुन असाच ज्वलंत विषय आहे.
अजुनही महिलांची समाजातली स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली नाही. शहरांतले अपवाद आहेतच.
त्यामुळे काही पुढारलेल्या महिला म्हणतील की आरक्षण नको. तर ज्यांना नको त्यांनी ते घेऊ नये.
पण हे राजकारणी अस कधीच होउ देणार नाहीत.
आवांतर : जे आरक्षणाच्या बाबतीत तेच बाबरी-अयोध्ये बाबतीत. सोडा मंदीर-मस्जिद-आणि एक चांगल सेवाभावी इस्पितळ काढा राव. हव तर राम-रहिम अस्पताल अस नाव द्या. (हो नाहीतर गांधी- नेहरु घराण्यातली काही नाव आहेतच राखीव ) ;)
3 Sep 2010 - 5:20 pm | बाप्पा
मला वाटते एक दिवस अनाआरक्षीत जागा शिल्लकच राहणार नाहीत. तेव्हा काय कराल? बुध्दीची पात्रता न बघता केवळ मतांसाठी जातीच्या आधारावर आरक्षण देणे चुकीचे आहे. मेंदुची शस्त्रक्रिया करायची झाल्यास तुम्ही आरक्षणातुन कमी गुणवत्ता असलेल्या डॉक्टर कडे जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देउन ज्याने त्याने आरक्षण हवे कि नको ते ठरवावे.
3 Sep 2010 - 5:32 pm | अरुण मनोहर
सगळ्यांनाच आरक्षण द्या. प्रश्नच मिटेल. काशीरामने (आठवा बरे कोण हा थोर पुरुष्?) म्हटले होते, ब्राह्मणांना देखील १०% आरक्षण द्यायला हवे. किती उदार आणि दुरदर्शी नेत्रूत्व!
3 Sep 2010 - 8:20 pm | शिल्पा ब
आरक्षणापेक्षा समान संधी महत्वाची...आणि ती आता सगळ्यांना मिळते आहे तर उगाच स्वतःच स्वतःला कमी लेखून आरक्षण मागण्याची काय गरज?
3 Sep 2010 - 9:05 pm | अविनाशकुलकर्णी
झुंड्शाहि सत्य..लोकशाहि मिथ्या ....
तुमचि संख्या ३.५%
ओरडा..कोण विचारते आहे तुम्हाला
मुकि ला .......ना हाक ना बोंब
3 Sep 2010 - 10:20 pm | अर्धवटराव
नाहिच विचारणार कोणि. झुंडशाहितुन विवेकाकडे नेणारा एखादा उगवला तरच काहि आशा.
तसं बघितल तर समाजीक स्थितीला त्या त्या काळचे समाज धुरीण जवाबदार असतात. आज ब्राह्मण (आणि इतर उच्च वर्णीय) जे काहि भोगतोय त्याला त्यांचे पुर्वज बर्याच अंशी जवाबदार आहेत. सावरकरांसारख्यांनी कानि कपाळि ओरडुन सांगितलं कि जातिभेदाला मुठमाति द्या... पण कोणि ऐकलं नाहि. परिणाम जगजाहिर आहेत.
या समस्येला ब्राह्मणांकडुनच उतारा मिळेल असं वाटतं... आणि तो कसा हे आंबेडकरांनी सांगुन ठेवलय... "गुलामाला गुलामगिरीचि जाणिव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल"... बहुजन समाजात एकदा का प्रखर ज्ञानलालसा उत्पन्न झालि (जी आंबेडकरांना अपेक्षीत असावी) म्हणजे मग ते आरक्षणाच्या कुबड्यांवर अवलंबुन राहाणार नाहित... आणि असा बहुजन वर्ग मग राजकारण्यांच्या हातातले बाहुले देखील बनणार नाहि. हि ज्ञानलालसा त्यांच्या मध्ये ब्राह्मणांनाच चेतवावि लागेल. काम अवघड आहे, खडतर आहे आणि लांब पल्ल्याचे देखील. पण त्याला पर्याय नाहि.
(अज्ञानि) अर्धवटराव
3 Sep 2010 - 10:24 pm | शिल्पा ब
<<आणि असा बहुजन वर्ग मग राजकारण्यांच्या हातातले बाहुले देखील बनणार नाहि
हिच तर गोम आहे...म्हणुनच जातिभेद खदखदत ठेवतात..भले मग ते आंबेडकरांच्या पुतळ्याला कसलेसे हार घालणे का होईना..
3 Sep 2010 - 10:46 pm | अविनाशकुलकर्णी
आरक्षणाच्या कुबड्यांवर अवलंबुन राहाणार नाहित......
आरक्षणाने ज्या व्यक्तिस आरक्षण मिळते व नोकरी मिळते तिच सुधारते...सारा समाज नाहि...मतपेट्या वर नजर असल्याने आरक्षण कमी होणार नाहि....पण त्याची व्याप्ति वाढेल...
3 Sep 2010 - 11:00 pm | अर्धवटराव
आजच्या घटकेला भारतात सर्व समस्यांचे मुळ शेवटी राजकारणात सापडते. लोकशाहित मताला (व्होट या अर्थाने) किंमत असल्याने याला पर्याय नाहि. पण आपण शेळी-मेंढी नाहि तर मनुष्य आहोत हे आत्मभान ज्ञानाने-शिक्षणाने येईल. आणि असा बहुजन समाज थातुर मातुर गोष्टींत अडकण्याऐवजी राजकारण्यांना खर्या समस्यांबद्दल जाब विचारेल. या खर्या समस्या सगळ्या जाति-धर्माच्या लोकांना समान छळतात. तेंव्हा हा ज्ञानाग्नी ब्राम्हणांनीच पेटवायला हवा...
(अ़ज्ञानी) अर्धवटराव
4 Sep 2010 - 1:54 am | Pain
ही ब्राह्मणी वृत्ती म्हणजे नक्की काय? पूर्वीच्या काळी शुद्र वर्णाला ज्ञानापासून तसेच इतर सुविधांपासून वंचित ठेवण्याची, शास्त्राचे ज्ञान घेण्याचा हक्क केवळ विशिष्ट वर्गालाच आहे असे मानण्याची वृत्ती हा होय.
पूर्वीच्या काळी ब्राह्मणांचे काम हे इतर कुठल्याही अठरापगड कामांपैकी एक होते. प्रत्येक जातीतील कौशल्ये इतरांना शिकविली जात नसत. अगदी नजीकच्या काळात छत्रपतींनी पेशव्यांना कारभारी केल्याने आणि पुढे इंग्रजांमुळे भारतात आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे शिक्षणाला जे महत्त्व आले, त्यामुळे ब्राह्मणांना थोडे बरे दिवस आले. नाहीतर पूर्वीचेच रहाटगाडगे सुरु राहिले असते.
कुठल्याही गोष्टीची सुरुवात " एका नगरीत एक गरीब ब्राह्मण राहात होता अशी होते. भिक्षा मागून जगणारे लोक काय दुसर्यावर अत्याचार करणार?
एखादा व्यवसाय, हक्क वंशपरंपरेने चालत येण्याची पद्धत हजारो वर्षांपूर्वीची आहे. जिथे हिंदूच नाहीत अशा देशांमधेसुद्धा. उदा. राज्यपद. मग या वृत्तीला ब्राह्मणी का म्हणावे? क्षत्रिय वगैरे का नाही ? ब्राह्मण सॉफ्ट टारगेट आहेत, कितीही शिव्या द्या, शासनकारभारातून पद्धतशीरपणे बाजूला काढा, दहशत बसवण्यासाठी भांडारकर सारख्या संस्थेची नासधूस करा, चालते. प्रत्युत्तर येणार नाही याची खात्री म्हणून ?
4 Sep 2010 - 2:28 am | अर्धवटराव
हा प्रत्युत्तराचा मुद्दा कळीचा आहे राव. ब्राम्हणांनी संगठीतरित्य प्रत्युत्तर दिले (नजीक भविष्यात अशी शक्यता आहे) तर त्यांच्या विरुद्ध आणखी रान पेटवले जाईल... आणि हे समाजकंटकांच्या पथ्यावर पडेल. प्रत्युत्तर नाहि दिले तर त्यांना आणखी दटावण्यात येईल. आणि दुर्दैव असे कि ज्या बहुजन समाजाच्या उद्धाराच्या नावाखाली हे सर्व चाललय त्यांना कधिच न्याय मिळणार नाहि. इथे ब्राम्हणांची भुमीका फार महत्वाची आहे. बहुजन समाजाचं उद्धारकार्य ब्राम्हणांनाच हाति घ्यावं लागेल. कारण ते बिचारे सगळीकडुन पिळले जातात, वापर करुन फेकुन दिले जातात. आणि खापर ब्राम्हणाच्या माथी फोडलं जातं.
(अब्रम्हण्यम) अर्धवटराव
4 Sep 2010 - 12:40 pm | इन्द्र्राज पवार
या लेखाचे शीर्षक असो, वा मजकुरातील धागाकर्ते श्री.सारंग कुलकर्णी तसेच काही प्रतिसादक यांच्या भावना असोत, त्यात प्रदर्शीत झालेल्या मतांचा आदर राखून मी असे म्हणतो की, आरक्षणाचे हक्क समाजातील ज्या घटकांना मिळालेले आहेत ते घटनेतील तरतुदीनुसार आहेत; आणि जर एक भारतीय नागरिक म्हणून आपण घटनेचे अस्तित्व आणि त्याचे प्रयोजन मानतो तर त्यातील तरतुदींविषयी असलेली कायद्याची पायमल्ली करता येत नाही. मात्र 'घटनेत दुरुस्ती' करण्याच्या मागणीचा हक्क देशातील प्रत्येक नागरिकांचा आहे, पण तिथे कोलदांडा आहे तो 'मतपेटी'चा. तुमचा खासदार तुमची या संदर्भातील न्याय भूमिका मांडणार असेल तर त्याला त्याच्या पक्षाची तशी परवानगी काढावी लागते. शिवाय तुम्हीआम्ही सर्वच इतके जाणकार झालो आहोत की, आजचेच नव्हे तर मागील कित्येक पिढ्यातील राजकारण्यांना "जाती"च्या आधारेच मताचा जोगवा मागणे क्रमप्राप्त आहे, कारण प्रत्येकाने 'व्होट बँक' सील केलेली आहे. ४५ ते ५५ टक्के मतदानावर जर केन्द्र सरकार स्थापन होत असेल तर पोलिंग बूथवर पाळीत उभे असलेल्या मतदारात "कांबळे" किती आणि "कुलकर्णी" किती हे ओळखण्याइतपत सज्ञानी तो उमेदवार असतोच असतो. त्यामुळे सत्तेवर आल्यावर 'कल्याणम् भवती' हा पिलू राग गायचा तर तो कुणाच्या दारात जावून गाणे किफायतशीर ठरते याचा लसावीदेखील सहज निघतो.
आरक्षणाबाबतचा कायदा बदलण्याची भाषा आपण इथेच नव्हे तर अगदी खुल्या व्यासपिठावर करीत असतो कारण त्यात अन्यायकारक तरतुदी आहेत अशी आपली खात्री पटलेली असते. पण अशी एकत्रीत शक्ती ज्यावेळी उभी राहण्याची शक्यता (जी फार कमी आहे) असते त्यावेली तिला दुसरी बाजूही अशी आहे की, घटनेने प्रदान केलेले ते अधिकार बजावण्यासाठी आरक्षणाचा लाभ घेणार्यांनी सत्याग्रहासारखे उपाय केल्यास त्यांना तर दोष देता येणार नाही.... कारण परत तेच....हक्काच्या अंमलबजावणीबाबत असलेली घटनेतील तरतूद.
१९३२ च्या "गांधी-आंबेडकर पुणे करारा" त स्पष्ट उल्लेख होता की, अस्पृश्यता ही जातिसंस्थेचे अपत्य नसून, हिंदुधर्माला उच्चनीच भावनेचा तो प्रादुर्भाव आहे आणि जो धर्मभावनेलाच गंज चढवित आहे, त्याचे फलित आहे. त्यामुळे जातीव्यवस्था ही राखीवतेसाठी राहणे क्रमप्राप्त आहे. जाती नष्ट करणे हे विकृत रोगासाठी शरीरच नष्ट करणे किंवा तण वाढेल म्हणून पीकच जाळून टाकण्यासारखे आहे."
मग पुढे याच अनुषंगाने 'घटना' अस्तित्वात आली आणि ती आज ६० वर्षानंतरही (आरक्षण समर्थनाच्या बाबतीत) तशीच राहिली आहे व राहिलदेखील. त्यामुळे आहे त्या प्राप्त परिस्थितीत जातिभेदाच्या कटू भिंती पार करून आरक्षण संदर्भात काही सुवर्णमध्य काढणे इतपतच शक्य आहे. (जसे रोजगाराच्या संधी वाढविणे आणि आरक्षणाची तरतूद एकवर्ष आड अशी करणे...म्हणजे २०११ साली नोकरीत आज आहे तसे ५२% आरक्षण राहील तर २०१२ ला सर्व १००% जागा "ओपन" [ज्यात पात्र मागासवर्गीय/बहुजन समाजातीलही उमेदवार येतील] साठी राहतील. २०१३ साली केवळ सर्व स्तरावरील "महिला" साठी १००% जागा आरक्षित राहतील. इ. प्रमाणे 'सायकल' रुप देण्याचा विचार करणे शक्य होईल. यात १००% ओपनसाठी त्या वर्षात जी "शैक्षणिक अर्हता वा वर्ग" निश्चित वा अपेक्षित आहे, ती मिळविण्यासाठी बहुजन समाजातील तरूणतरूणी नक्कीच प्रयत्न करतील.
इन्द्रा
6 Sep 2010 - 2:40 pm | गणेशा
सर्व रिप्लाय वाचले ..
अर्धवट यांच्या २ रिप्लाय मधील आलेला एक भाग येथे देतो ..
"
इथे ब्राम्हणांची भुमीका फार महत्वाची आहे. बहुजन समाजाचं उद्धारकार्य ब्राम्हणांनाच हाति घ्यावं लागेल. कारण ते बिचारे सगळीकडुन पिळले जातात, वापर करुन फेकुन दिले जातात
" - अर्धवट
" ज्ञानलालसा त्यांच्या मध्ये ब्राह्मणांनाच चेतवावि लागेल
" -अर्धवट-.
आप्ले वरील दोन्ही मुद्दे पटलेले नाहीत .
ब्राम्हणांनी नाही तर जे जे सुशिक्षित आहेत त्यांनी असे केले पाहिजे .
आणि बहुजन समाज ही पुर्ण पणे अज्ञानी नाहीये.
------------------------------
@ सर्व
बाकी आरक्षण नको .. जाती भेदा बद्दल तिटकारा अशे म्हणने असताना ही आपण ब्राम्हण असा करेण .. मराठा असा करेन असे म्हणुन आपण कीती जातीय प्रेमी आहोत हेच दिसुन येते आहे.
त्यामुळे प्रथम स्वताच्या मनाला बदला .. मग जगाला
7 Sep 2010 - 12:23 am | अर्धवटराव
--आप्ले वरील दोन्ही मुद्दे पटलेले नाहीत .
मला कल्पना आहे त्याची. पण हे सगळं कुठेतरी बदलायला हवं असं तुम्हा आम्हाला सर्वांनाच वाटतं. तेंव्हा आपले प्रयत्न गरजेचे. मार्ग कुठलेही असेनात
--ब्राम्हणांनी नाही तर जे जे सुशिक्षित आहेत त्यांनी असे केले पाहिजे .
होय. आयडीयली हे काम सर्व सुजाण नागरीकांचे आहे. पण आता परिस्थीती अशी आहे कि या आगीचा शेक ब्राम्हणांना जास्त बसतोय, पुढे हि परिस्थीती सुधरण्या ऐवजी जास्तच गंभीर बनेल असं दिसतय. उद्या जर मराठी ब्राम्हण उत्तरप्रदेशी ब्राम्हणांप्रमाणे कंपुबाजी करुन "ईट का जवाब पत्थर से" द्यायचा विचार करेल तर मग सगळच ओम्म्फस्स्स होईल. जातीजातींमधली जी अढी आहे ती जातींनी पुढे पाहिजे आता सोडवली पाहिजे... शेवटी सर्व जाती हिंदु महासागरात विलीन होतील तो सुदीन.
--आणि बहुजन समाज ही पुर्ण पणे अज्ञानी नाहीये.
हीच एकमेव आशा आहे. बहुजन वर्ग बराचसा जागा झालाय. पण त्याला विकासाची वाट दाखवण्याऐवजी वांझोट्या विद्वेषाची वाट दाखवण्यात येतेय. आणि त्यांचे दगड ब्राम्हणांच्या डोक्यावर दगड पडताहेत. मग आता कोणि ब्राम्हण कैवार हाति घेईल, ब्राम्हणांचा जातीय अहंकार प्रज्वलीत करेल आणि आगीत तेल ओतल्या जाईल. हाति काय लागेल ? कोळसा ??
@ सर्व
बाकी आरक्षण नको .. जाती भेदा बद्दल तिटकारा अशे म्हणने असताना ही आपण ब्राम्हण असा करेण .. मराठा असा करेन असे म्हणुन आपण कीती जातीय प्रेमी आहोत हेच दिसुन येते आहे.
त्यामुळे प्रथम स्वताच्या मनाला बदला .. मग जगाला
-- सामाजीक प्रश्नांचा विचार करताना, त्यावर उपाय करताना कोण्या जातीचा उल्लेख करु नये हे एकदम बरोबर आहे. सामाजीक हीत संपूर्ण समाजाचा एक घटक म्हनुनच साधायला हवे. पण अजुन नद्या समुद्राला भेटयच्या आहेत, त्यांचं "नदी" म्हणुन अस्तीत्व कायम आहे. त्यांचे एकसंघ, अभेद्य मीलन हेच तर उद्दीष्ट आहे. त्यासाठीच हा खटाटोप.
(मार्गस्थ) अर्धवटराव
6 Sep 2010 - 3:49 pm | अविनाशकुलकर्णी
ज्ञानलालसा त्यांच्या मध्ये ब्राह्मणांनाच चेतवावि लागेल.
.....
सार्या शिक्षण संस्था बहुजनांच्या..९०% शिक्षक बहुजन समाजातले..पुरोगामी विचाराचा वन्ही त्यांनीच चेतवला...
ब्राह्मण काय करणार? सारी मलई तुम्ही चाटता..पुरोगामी विचार गेली ६० वर्ष राज्य करुन राबवता आले नाहित..
काहि नाहि जमले कि ब्राह्मणांना पकडा व झोडा...
7 Sep 2010 - 12:15 am | अर्धवटराव
अविनाशराव,
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परिस्थीती आहे खरी. आणि हे असेच चालु राहिले तर आणखी पुढील ६० वर्षे त्यात सुधारणा होणार नाहि.
--काहि नाहि जमले कि ब्राह्मणांना पकडा व झोडा..
ब्राम्हणांनी थोडीफार संगठीत हालचाल केली तर त्यांच्या पुरती परिस्थीती थोडीफार सुधरेल. ब्राम्हणांना राजकीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान जरी नाहि तरी जाणवण्या पुरतं अस्तीत्व नक्की प्रस्थापीत करता येईल. शिक्षणात ब्राम्हण कमी पडणार नाहि.. आणि उद्योगात हळुहळु पण नक्की स्थीरावेल. तेंव्हा ढोबळ मानाने ब्राम्हण वाईट परिस्थीतीतुन नक्कीच बाहेर पडेल. पण प्रश्न केवळ ब्राम्हणांचा नाहि... प्रश्न हिंदु समाजाचा, पर्यायाने भारताचा आहे. जातीभेदाची कीड कर्करोग बनुन संपूर्ण शरीर मृत करायच्या आधी शस्त्रक्रीया करणे आवश्यक आहे... आणि हि शस्त्रक्रीया ब्राम्हणांनी सुरू करावी. त्याकरता ब्राम्हणी निशाण फडकवायची गरज नाहि. तर जिथे जिथे अशे प्रयत्न होत असतील तिथे सर्व शक्तीनिशी समर्थन दिले तरी पुरे.
(डॉ.) अर्धवटराव
7 Sep 2010 - 12:45 am | इन्द्र्राज पवार
"ब्राम्हणांनी थोडीफार संगठीत हालचाल केली तर त्यांच्या पुरती परिस्थीती थोडीफार सुधरेल."
श्री.अर्धवटराव.... या विषयावरील आणि त्या अनुषंगाने येणार्या विविध मुद्यावर आपण इथे/अन्य धाग्यावर सविस्तर चर्चा केलेली आहेच आणि एकमेकांची सखोल अशी मते/कल जाणूनही घेतली आहेत. प्रश्न आहे तो 'ब्राह्मणांनी थोडीफार संघटीत हालचाल केली तर..." या सेगमेन्टचा....आणि घोडे पेंड खाते ते नेमके 'संघटीत' या खुंटीशी. मराठा समाज (विशेषतः आमच्यातील धूर्त राजकारणी) हे जाणून आहेत की, राज्याच्या सुमारे ११ कोटी जनतेत ब्राह्मण संख्या आहे ती फक्त ३.९०%....म्हणजे ४ टक्क्याच्या आसपास.
... आता इतक्या कमी मापाच्या सतरंजीवर जो ब्रह्मवृंद बसला आहे त्यात ६०% जागा देशस्थांनी व्यापली आहे. कोकणस्थांना एकेकाळी आर्थिक-सामाजिक स्तरावर नगण्य स्थान होते, पण बाळाजी विश्वनाथांची पेशवेपदी छत्रपतींनी नियुक्ती केल्यापासून 'कोकणस्थां'नी दोन्ही क्षेत्रात जी उसळी मारली तीमध्ये देशस्थांनाच दुय्यम करून टाकले. तेव्हापासून ब्राह्मणातीलच या दोन गटात 'मी मोठा की तो मोठा' हा वाद रटरटत आहेच (आजही आहे हे तुम्ही मान्य कराल). दैवज्ञ आणि कर्हाडे यांचे या टक्केवारीत काय स्थान हे त्यांनाच माहित आणि त्यातही ब्राह्मणांचे दोन्ही प्रमुख गट दैवज्ञाना अजून आपल्यातील मानत नाहीत ही वस्तुस्थिती आहे ना? सारस्वतांच्या तर खाण्यापिण्यावरून तुमच्यातच किती खटके उडत असतात.
त्यामुळे आता संघटीत होऊन 'राजकारण' या प्रश्नावर मराठे आणि बहुजन समाजाच्या अन्य घटकांना (ज्यांची टक्केवारी ६५ च्या पुढे आहे) तोंड द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे? हातघाई तर करता येत नाहे? त्यापेक्षा श्री.अर्धवटराव स्वतःच आपल्या प्रतिसादात म्हणतात, त्याप्रमाणे ~~
"जातीभेदाची कीड कर्करोग बनुन संपूर्ण शरीर मृत करायच्या आधी शस्त्रक्रीया करणे आवश्यक आहे... आणि हि शस्त्रक्रीया ब्राम्हणांनी सुरू करावी"
~~ हा प्राप्त परिस्थितीतील सर्वोत्तम विकल्प आहे.
इन्द्रा
7 Sep 2010 - 3:42 am | अर्धवटराव
--त्यामुळे आता संघटीत होऊन 'राजकारण' या प्रश्नावर मराठे आणि बहुजन समाजाच्या अन्य घटकांना (ज्यांची टक्केवारी ६५ च्या पुढे आहे) तोंड द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे? हातघाई तर करता येत नाहे?
-> मला अजुन या परिस्थीतीचा पूर्ण अंदाज यायचा आहे. लोकसंख्येच्या भरवश्यावर ब्राह्मण बहुजनांवर आणि मराठ्यांवर कडी करु शकत नाहि. जुन्या मताचे / पिढीचे ब्राह्मण आपसातल्या उच्चनिचतेच्या कल्पनांमुळे एकसंघ पण येउ शकणार नाहित. पण नवीन पिढी, जी इतर जातींचा द्वेष सहन करतेय, काहितरी हालचाल नक्की करेल. इतर प्रांतीय ब्राह्मणांशी संपर्क साधेल, सिंधी-मारवाड्यांना जवळ करेल वगैरे... त्याचा परिणाम होवो अथवा न होवो, पण ब्राह्मणी अहंकार नक्की जागृत होईल आणि जातींमधली दरी अजुन रुंदावेल.
या समस्येची सुरुवात कुठेतरी ब्राह्मणांकडुनच झाली आहे... त्याचा अंतही ब्राह्मणांनीच करावा. एकट्या-दुकट्यांनी तो केलाही (जुन्या काळी एकनाथ महाराज, आधुनीक काळात स्वा. सावरकर वगैरे). पण आता वेळ शेवटचा घाव घालण्याची आली आहे. आता जर हा रोग नाहि शमला तर पुढे विध्वंस अटळ आहे...
विषय फार किचकट आहे, आणि माझा अभ्यास कच्चा... पोच यायला अजुन वेळ लागेल.
मला जे काहि वाटतय ते अतिरंजीत असेलही कदाचीत... पण एक संभावना म्हणुन तरी मी या दृष्टीने बघतोय...
(वाईट पहिले बघणारा) अर्धवटराव
7 Sep 2010 - 10:09 am | इन्द्र्राज पवार
"....विषय फार किचकट आहे, आणि माझा अभ्यास कच्चा... पोच यायला अजुन वेळ लागेल...."
~ असे म्हणू नका. तुमचा अभ्यास खरंच प्रशंसनीय आहे (शिवाय त्यापेक्षा त्यातील भावना सच्ची आहेच.) तुमचा अभ्यास कच्चा आणि माझा पक्का अशीही समजून करून घेऊ नका, कारण मीदेखील अजूनही पाठीवर अभ्यासाचे दप्तर आहे अशाच समजुतीने या गोष्टी अभ्यासत असतो. तुम्ही किंवा अन्य एखाद्याने इथे एखादा चिंतनीय मुद्दा मांडला तर उत्तर्/प्रतिसाद देण्याच्या निमित्ताचे त्या प्रश्नाच्या गाभार्यापर्यंत जाण्यासाठी काय आणि किती वाचावे लागेल, हे मी पाहतो इतकेच.
प्रत्यक्षात या वादाचे जे काही मूळ आहे ते निव्वळ आमच्याच धर्ममार्तंडांनी आमच्याच सो-कॉल्ड सुखासाठी आमच्या बोकांडी बसविले आहे, ज्याचे पालन करणे म्हणजे धर्म राखणे ही खुळचट समजूत करून दिली. जग आपले असले तरे ते पूर्ण अर्थाने आपले नाही, थोडेफार अनुकूल आहे, अन् जितके अनुकूल आहे तितक्या मर्यादेतच आपण आपली जीवनशैली बनविली, बसविली, तर मला वाटते तेढीची मर्यादादेखील संकुचित होऊन जाईल.
इन्द्रा
7 Sep 2010 - 8:36 am | Pain
या समस्येची सुरुवात कुठेतरी ब्राह्मणांकडुनच झाली आहे... त्याचा अंतही ब्राह्मणांनीच करावा. एकट्या-दुकट्यांनी तो केलाही (जुन्या काळी एकनाथ महाराज, आधुनीक काळात स्वा. सावरकर वगैरे). पण आता वेळ शेवटचा घाव घालण्याची आली आहे. आता जर हा रोग नाहि शमला तर पुढे विध्वंस अटळ आहे...
आत्तापर्यंतचे सगळे सत्ताधारी (राजे-रजवाडे, जहागिरदार, वतनदार इ.)जास्त जबाबदार आहेत. जर सत्तेचे पाठबळ नसेल तर काही करता येत नाही. तसेच सगळ्यात जास्त फायदाही त्यांनीच उपटला आहे. असे असताना ब्राह्मणांच्या डोक्यावर सगळे खापर का ?
जर काही करायचे असेल तर सगळ्यांनी केले पाहिजे.
7 Sep 2010 - 10:55 pm | अर्धवटराव
मित्रा,
मी कोणाच्या डोक्यावर खापर फोडायचा विचार नाहि मांडत आहे... तर आजच्या पिढीच्या डोक्यावर पडणारि खापरे पुढल्या पिढीच्या डोक्यावर न पडावे यासाठी काय करता येईल याचा उहापोह करतोय. ज्यांना त्रास होतोय आणि पुढेहि होणार हे निश्चित आहे त्यांनीच आपण होऊन पुढाकार घेऊ नये काय ? आणि इलाज देखील असा असावा कि समस्या मूळापासुन संपावी, पुन्हा तिने डोके वर काढु नये.
(खापर्या) अर्धवटराव
7 Sep 2010 - 7:45 pm | अविनाशकुलकर्णी
उद्या जर मराठी ब्राम्हण उत्तरप्रदेशी ब्राम्हणांप्रमाणे कंपुबाजी करुन "ईट का जवाब पत्थर से" द्यायचा विचार करेल तर मग सगळच ओम्म्फस्स्स होईल.
अस नाहि होवु शकत..मनात आले तरी...उत्तरप्रदेशी ब्राम्हण संख्या १५% इतकी आहे इथे ति जेमतेम ३% आहे..त्यातुन बराच तरुण वर्ग परदेशी..उरलेले म्हातारे कोतारे काय देणार....ईट का जवाब पत्थर से
7 Sep 2010 - 11:02 pm | अर्धवटराव
सद्य परिस्थीतीत असा जवाब देणे होणार नाहि. पण कालप्रवाहाचि दिशाच अशी आहे कि या फ्रस्ट्रेशनचा उद्रेक नक्की होईल. असलं काहि होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे...
महाराष्ट्रातील ब्राह्मण संख्या कमी असेल, पण संकटकाळी मांजर देखील प्रतीहल्ला करते... या संघर्षातुन फायदा कोणाचाच होणार नाहि... एक थोडीफार भरत आलेली जखम पुन्हा भळभळायला मात्र लागेल.. कधीही न भरुन येण्या करता.
अर्धवटराव
7 Sep 2010 - 11:08 pm | नितिन थत्ते
जरा कुठे झळ लागू लागली आहे तर केवढा थयथयाट!!!!!
8 Sep 2010 - 6:58 am | अर्धवटराव
फटाक्याची वात जळताना दिसतेय साहेब... आता काय स्फोट व्हायची वाट पहायला सांगताय का ??
(आळशी) अर्धवटराव
8 Sep 2010 - 7:56 am | नरेश धाल
आजकाल मिपावर काय ह्या बिनभेजाच्या चर्चा चालू आहेत देव जाने.
आणि त्यात जास्त वाईट ह्याचे वाटते कि काही जेष्ठ लोक सुद्धा भाग घेत आहेत,
इतिहास पुनर्लेखन काय, ब्राम्हण X मराठे काय ,
8 Sep 2010 - 12:20 pm | विजुभाऊ
१८५७ चा उठाव असफल होण्याचे कारण त्याला सामान्य जनतेचा पाठींबा नव्हता हेच होते
असहमत......
तो उठाव असफल झाला याचे मुख्य कारण होते एकसूत्रतेचा अभाव आणि निर्नायकी स्थिती.
असाच एक असफल उठाव म्हणजे व्ही पी सिंगाचे सरकार असताना मंडल आयोगाच्या विरुद्ध दिल्लीत झालेली विद्यार्थ्यांची आत्मदहने.
त्या लढ्याला चाम्गले नेतृत्व मिळाले असते तर आज स्थिती वेगळीच दिसली असती
8 Sep 2010 - 8:46 pm | गणेशा
अजुनही ब्राम्हणांनी असे केले पाहिजे .. बहुजन असे आहेत .. कोणत्या जातीने संघटन करुन काय कील पाहिजे
असेच चालु असेन तर एकजुट ती कोणाची करताय .
फक्त एक जात - एक संघटना यावर काही अवलंबून नाहीये.
. कारण ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असा वाद घालुन उगाच आपल्यातच भांडणारी ही मराठी माणसे पाहिले की लाज वाटते.
अजुनही .. सर्व एकजुटीचे कोणी बोलुच शकत नाहीत.
ब्राम्हण म्हणणार आम्ही एकत्र येवुन असे करु .. हे मराठ्यांनी .. बहुजनांनी खुप केले .
बहुजन - मराठा बोलणार ब्राम्हणांनी सगळा घात केला .
हे असेच चालणार आहे का ?
सर्व एकजुटीचा मुद्दा जोपर्यंत निदान आपल्या स्वताच्या मनातुन येत नाही .
त्यांनी जाती बंद झाल्या पाहिजेत .. हे असे झाले पाहिजे हे पोकळ बोल बोलु नये असे मनापासुन वाटते.
असो थांबतो येथे
आणि ब्राम्हण - मराठा - बहुजन वाद घालण्यात स्वारस्य नाहीये.
या लेखाला हा माझा शेवटचा रिप्लाय .
जय महाराष्ट्र
8 Sep 2010 - 10:17 pm | अर्धवटराव
हे असले प्रकार कुठल्या विवेकि मनाला भावतात जी... आपण अपेक्षीलेली एकजूट होईल तो भाग्याचा दिवस !!
(प्रतीक्षेत) अर्धवटराव