पहिल्यांदा राजगड बघीतला तो दिवस आता फारसा आठवत नाही,पण पहिल्यांदाच तो मनात भरलां. नंतर राजगडावर येत राहीलो आणि येतच राहीलो.कंटाळा आला की सॅक उचलावी आणि राजगडाची वाट धरावी,कधी एकट्यानं,कधी मित्रांबरोबर कधी एका दिवसासाठी कधी २-३ दिवसासाठी ,कसंही.
तेंव्हा राजगडावर जत्रा भरलेली नसायची,शनिवारी रविवारी मोजून २५-३० माणंसं गडावर असायची.मुक्कामी रहाणारी तर मोजकीच. ती भिजल्या चिमण्यांसारखी पद्मावतीच्या/रामेश्वराच्या देवळात रहायची.त्या मोजक्या माणसांचा पण कंटाळा आला तर पिशवी उचलायची आणि सरळ चालायला लागायचं,कधी दारं नसलेल्या यात्री निवासात मुक्काम करायचा,नाही तर कधी पाली दरवाज्याजवळ ज्या पहारेकर्यांच्या देवड्या आहेत तिथं पसरायचं.फारचं कंटाळा आला असेलं तर बालेकिल्ल्यातल्या देवळात किंवा तटातल्या गुहेत जाऊन बसायचं.
एकदा पूर्ण गडावर मी एकटाच असताना,रात्री ९.३०-१०.०० च्या सुमाराला,बालेकिल्ल्यावरून उतरून नेढ्यात जाऊन बसलो. बरोबर एका बॅटरीशिवाय काहीही नाही.अमावस्या नुकतीच होऊन गेलेली होती. फेब्रुवारीचा महीना असावा बहुतेक,आकाश अगदी स्वछ होतं.लांब क्षितिजापर्यंत पसरलेलं चांदण आणि नेढ्यात भणाणणारं वारं. रात्र संपून दिवस कधी उजाडला कळलंच नाही.रात्री येणारे तर्हेतर्हेचे आवाज्,रातकिड्यांची किरकिर आणि १ मिनिटभरही डोळा नं मिटलेला मी.
राजगड मी सगळ्या रुतुत अनुभवला. भर पावसात ढगांनी वेढ्लेला राजगड अंगावर घोंगड पांघरून बसलेल्या एखाद्या धनगरासारखा दिसतो. पावसाळ्याचे चार मास गड धो धो पावसात न्हाऊन निघतो,उन्हाळ्यात भुईच्या पोटात दडून बसलेली नाना प्रकारची बीजं,झाडं आपली मान बाहेर काढतात्,नंतर टरारून वर येतात. त्यांच्यामागोमाग निरनिराळे किडे,पाखरं येतात.चिखलातनं,पाण्यातनं खेकडे तिरपं पळत रहातात्.एखादा साप सुळ्कनं ईकडून तिकडे जातो.
मग हळूच श्रावण येतो,आणि त्यामागोमाग भाद्रपद. मगं गडभर पसरलेल्या गुढघाभर गवतातून न्यारीच रंगीबेरंगी फुलं फुलंतातं,मधमाश्या,छोटे छोटे किडे त्यांच्याभोवती घोटाळतं रहातातं. पिवळ्या जांभळ्या फूलांनी गड अगदी फुलून जातो. गडाच्या तिन्ही माच्या हा रंगीत पोशाख चढवतातं.भाद्रपदात शंकरोबा आणि गौराबायांच्या फुलांनी वातावरण रंगून जातं.
ऊनपावसाचा खेळ चालू होतो. सूनबाईच्या नक्षत्रात 'सूनबाई' सळासळा कोसळून जातात्,काही क्षणात आभाळ पुन्हा मोकळं होतं,आणि कोवळ्या उन्हाचं साम्राज्य पसरत जातं.दूरवर इंद्रधनुष्य दिसायला लागतं आणि थोड्याच वेळात पुन्हा एखादी सर एखाद्या उधळलेल्या वासरासारखी येते. पद्मावती तलाव,चंद्रतळं अगंदी तुडुंब भरतात्.गवत वार्यावर डोलत रहातं. लांबपर्यंत गवताच्या या लाटा दिसत असतात. हिरव्याच रंगाच्या शेकडो छटा दिसत रहातातं.
घरोघरचे गणपती बुडाले की थंडी आपले हातपाय पसरायला लागते,मग सूर्य उगवून निम्म्यावर आला तरी धुकं हटतं नाही,दाट धुक्याच्या पांघरूणातून गड किलकिल्या डोळ्यांनी बघतं राहतो.संध्याकाळी सूर्य मावळला की लगेच हुडहुडी भरायला लागते. गडावर शेरडांमाग,जनावरांमाग आलेली पोरं दुपार सरकली की लगेच खाली उतरतात्,त्यांच्या जनावरं हाकताना मारलेल्या हाका,एकमेकांना घातलेले कुकारे बराच वेळ कानावर येत असतात.
मगं गडबडीनं सूर्य बुडतो,वारं घोंगावायला लागतं.मग आपण संजीवनीमाचीवरून उठावं बालेकिल्ल्याच्या रस्त्याला लागावं,तटातल्या गुहेत पोचावं,या गुहेत आत गेल्यावर डाव्या हाताला अजून एक छोटी गुहा आहे. तिथं दिवसभर गोळा केलेल्या फाट्यांची शेकोटी पेटवावी. हळुहळु उब गुहाभर पसरतं जाते,मग काहीतरी शिजवून पोटाला आधार करावा,आणि गुहेतल्या शेकोटीच्या उजेडात बाहेर वाळवणासारखी पसरलेली रात्र बघत निवांत बसावं,मग हळुहळु आडवं व्हावं, हातांचं उसं करावं आणि त्यावर डोकं ठेवून अलगद डोळा मिटावा.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
1 Sep 2010 - 3:39 am | मधुशाला
पुढचा भाग कधी?
1 Sep 2010 - 4:00 am | शुचि
>> सूनबाईच्या नक्षत्रात 'सूनबाई' सळासळा कोसळून जातात् >>
>> भाद्रपदात शंकरोबा आणि गौराबायांच्या फुलांनी वातावरण रंगून जातं.>>
>> थोड्याच वेळात पुन्हा एखादी सर एखाद्या उधळलेल्या वासरासारखी येते. >>
समग्र वर्णनच अफलातून. मस्तमौला आहात. पुढच्या भागाची आतुरतेनी वाट पाहाते आहे.
1 Sep 2010 - 5:02 am | NEWYORKER
अति सुन्दर!
कालाप्रमाने ज्याला जसा वापरावासा वाटला तसा त्याने (गडाने) स्वताला वापरु दिले आणि देईल.
रायगड आणि इतर सगळेच गड किल्ले असेच आहेत. आपली द्रुश्टी च त्याला दरवेळी नवे रुप देत असते. हे माझे व्यक्तीगत मत आहे. तुमच्यातल्या आगळ्या जाणिवेला मोल नाही.
1 Sep 2010 - 7:49 am | जाई अस्सल कोल्हापुरी
लवकर पुढचा भाग पाठ्वा!
1 Sep 2010 - 8:23 am | कुसुमिता१२३
पुढचा भाग लवकर लिहा..!
1 Sep 2010 - 10:01 am | अनुप बंगाली
खुपच छान , जणु काहि स्वतः गडावर आहोत असे वाटले, पुढचा भाग कधी ?
आतुरतेनं वाट बघत आहोत.....
1 Sep 2010 - 10:36 am | विलासराव
छानच लिहीता तुम्ही .
(क्रमश:) पाहुन बरं वाटलं.
अवांतरः एकटे फिरण्यापेक्षा आमच्यासारख्या भटक्यांना बरोबर न्यावं म्हणजे आम्हालाही आनंद मिळेल आणि झालेच तर काही पुण्य तुमच्याही गाठीशी जमा होईल.
1 Sep 2010 - 10:57 am | फ्रॅक्चर बंड्या
अप्रतिम लेख ...
"भिजल्या चिमण्यांसारखी" - मस्तच ..
1 Sep 2010 - 12:14 pm | स्वाती दिनेश
राजगडावर नेऊनच पोहोचवलत,
पुढचा गड कोणता? आणि कधी हेंगायचा?
स्वाती
1 Sep 2010 - 12:45 pm | भडकमकर मास्तर
अप्रतिम..
अशाच जुलैमधल्या एका अंधार्या रात्री पद्मावती देवळाजवळच्या तटावर बसून आकाशदर्शन केल्याचे आठवते...
खूप उंचीवर असल्याने जास्त आकाश दिसते
क्रमशःचा सौम्य निषेध
पुढच्या भागात फोटो हवेत अशी मागणी करतो
( राजगडप्रेमी) भडकमकर मास्तर
1 Sep 2010 - 6:49 pm | प्रभो
मस्त मस्त मस्त!!!!!
फोटू पण टाक रे जिप्सी भावा...
1 Sep 2010 - 9:11 pm | प्रशान्त पुरकर
+१
असेच म्हनतो...
1 Sep 2010 - 9:39 pm | धमाल मुलगा
जोश्या, साल्या...राजगडावरचं तुझं प्रेम शब्दाशब्दातून जाणवतंय.
मस्त लिहितोयस! आणखी नेट लाऊन लिही...खुप लिही! तुझे सगळ्या गडकिल्ल्यांचे अनुभव वाचायचेत..वाचताना सोबत अनुभवायचेही आहेत.
पुढील भागांची वाट पाहतोय.
2 Sep 2010 - 4:16 am | पुष्करिणी
सुंदर, पुढील भागाच्या प्रतिक्षेत
7 Sep 2010 - 1:36 pm | गणेशा
एकदम सुंदर वर्णन
7 Sep 2010 - 4:18 pm | अमोल केळकर
असेच म्हणतो
अमोल केळकर