शेरलॉक होम्सचे जग भाग १
पूर्वप्रकाशित: मायबोली आणि माझा ब्लॉग
शेरलॉक होम्स हा विषय बर्याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता. पण थोडंसं बेअरींग येई पर्यंत असे आवाज काढावे लागतात - तंबोरा तबला जुळवताना ते वाजवणारे पहिल्यांदा अर्धा-पाऊण घंटा बेजार होतात ना तसं. ह्याट!! साला अजून एक किस्सा सुचला या तंबोरा-तबल्यावरून. आज शेरलॉकचा उध्दार होणार नाही असं दिसतंय. पण थोडक्यात आवरतो. बर्याच लोकांनी वाचलाही असेल. इंग्रजी अमलात एका नवाबानं व्हाईसरॉयच्या स्वागतासाठी मैफिल ठेवली. ते आले सगळे, वाजणारे - गाणारे आणि सुरू केली त्यांनी आपापली वाद्यं एका ताला-सुरात लावायला. टंग..ठॉक.. ठॉक..दुडडुम्बाक...थँक...ढिगांग...हे चालू असताना नवाबानं व्हाईसरायला सहज अदब म्हणून विचारलं कोणत्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडेल आपल्याला? व्हाईसरॉय गडबडला. त्याला काही माती कळत नव्हतं भारतीय संगीत काय असतं ते. तो म्हणे हे काय, हे टंग..ठॉक.. ठॉक..दुडडुम्बाक...थँक...ढिगांग... हेच मस्त वाटतंय...हेच वाजवा. आता नवाब तो नवाब. व्हाईसरॉयला जे आवडतं तेच संगीत. त्यानं वाजवणार्यांना दिला आदेश - तुमचं हेच चालू राहु द्या. आणि ती मैफिल तंबोरे-तबले लावता लावता निघणारे आवाज ऐकूनच पार पडली.
आता ब्रिटीश कालखंडात झालाच आहे आपला प्रवेश तर याच वाटेनं थोडं पुढं २२१बी, बेकर स्ट्रीट, लंडन इथं जाऊया. जगातील इंग्लिशच्या जवळपास सर्व वाचकांना शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसनचा हा पत्ता माहित आहे. सर आर्थर कॉनन डॉयल या लेखकानं १८८७ साली पहिली डिटेक्टीव्ह कथा प्रकाशीत केली. शेरलॉक होम्ससुध्दा स्वत:ला जगातला पहिला "कन्सल्टींग डिटेक्टीव्ह" म्हणवतो. इंग्लंडमधील रेल्वे पटरीवर धावायला लागून पंच्याऐंशी वर्षे उलटली होती, स्टेशनबाहेरच्या दगडी-चिर्यांच्या रस्त्यावरून व्हिक्टोरिया बग्ग्यांची खडखड करीत ये-जा चालु होती. एव्हाना तारयंत्रेही वेळेवर आणि हव्या त्या माणसाला तारा पाठवू लागली होती, बर्हिवक्र भिंगातुन सुध्दा बरेच काही दिसत होते आणि सॅम्युअल कोल्टच्या रिव्हॉल्व्हर्स वापरून इंग्रजांचा नेमही बराच सुधारला होता. स्कॉटलंड यार्डच्या कर्कश्श शिट्ट्या वेळी अवेळी ऐकू येत होत्या; शिवाय टाईम्स, मॉर्निंग पोस्ट, ऑब्झर्व्हर इ. सारखी वृत्तपत्रेही योग्य त्याच आणि वेळच्या वेळी बातम्या छापत होती. औद्योगिक क्रांतीतून पैदा केलेला माल घेऊन इंग्रजी जहाजं जगाच्या कानाकोपर्यात ये-जा करीत होती. जगभरातील छोटे-बडे राजे रजवाडे, राण्या लंडनमध्ये चकरा मारत होत्या; लंडनच्या गुढ गंभीर वाटणार्या पेढ्या जगभरातील हिर्या-माणकांनी बहरून गेल्या होत्या. सेशन्समध्ये असणारे कोर्ट खून-बलात्कारातील गुन्हेगारांना पंधरा दिवस-महिनाभराच्या आत फासावर लटकावण्याचा हुकूम पास करून कचाकच पेनांची निबं तोडत होते. आर्थर कॉनन डॉयल हा डॉक्टर पहिल्यांदा भारतात येऊन अफगाण युध्दात जेझाईल बुलेट खाऊन लंडनच्या धुकेजलेल्या हवेत परत गेला होता.
शेरलॉक होम्सचे जग भाग २
शेरलॉक होम्सच्या कथा, मालिका जगात सगळीकडे उपलब्ध आहेत - कुणालाही त्या वाचता, पाहाता येऊ शकतात आणि त्यात रंगून जाता येते. शेरलॉक होम्सच्या समग्र कथांचा अनुवाद गजानन जहागिरदार यांनी केलेला आहे आणि जालावरच्या काही हौशी अनुवादकांनीही मस्त अनुवाद केले आहेत. ते इथे, इथे , आणि या इथे आणि हे इथे एक वाचायला मिळतील. म्हणून मी शेरलॉक होम्सच्या कथा भाषांतरीत न करता शेरलॉक होम्सबद्दल, त्याच्या जगाबद्दल लिहू इच्छितो. हे रसग्रहण नाही हेही मागच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
शेरलॉक होम्स आणि त्याचे जग हे एका माणसाचे स्वप्न होते जे नंतरच्या बर्याच माणसांना पाहायला आवडते कारण ते सुंदर आहे. तो गूढ वाटणार्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो कारण ते गूढ काल्पनिक आहे आणि ते गूढ नसून सत्यच असल्याचा भास उत्पन्न करणारी जबरदस्त शैली सर ए. सी. डॉयलकडे होती. जिज्ञासूंना शेरलॉक होम्सच्या जन्माची कथा खुद्द सर आर्थर कॉनन डॉयलच्या तोंडून इथे ऐकायला मिळेल. शेरलॉक होम्स च्या निर्मात्याला वास्तविक गूढे किती उकलता आली असती हेही एक गूढच आहे. मला आता नेमका संदर्भ आठवत नाही, पण लोकमान्य ते महात्मा या सदानंद मोरे यांच्या ग्रंथात इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आपली क्रांतीकारक मंडळी रचत असलेल्या कटांचा (अर्थातच साहेबाच्या नजरेतून), इंडिया हाऊसपासून जवळच असलेल्या २२१बी, बेकर स्ट्रीटला पत्ता नव्हता असा एक टोला हाणलेला पुसटसा आठवतो (मराठी लंडनर्स, थ्रो लाईट प्लीज!) . इथे सदानंद मोरेंचा नेमका रेफरंस पॉईंट काय आहे हे ज्यांच्याकडे लोकमान्य ते महात्माचे खंड आहेत त्यांनी सांगावे. होम्सच्या कथांचा सूत्रधार असणारा डॉक्टर वॉटसन हे पात्र दुसरेतिसरे कुणी नसून स्वत: सर डॉयल हे आहेत. तेच खरा शेरलॉक होम्सदेखील आहेत. पण तसा त्यांनी दावा केला असता तर आफत झाली असती (खर्या क्लाएंट्सची रांग लागली असती दारासमोर) कारण होम्सची कथामालिका स्ट्रॅण्डमधून प्रकाशित होत असताना लंडनवासियांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. सर ए.सी. ना होम्स या पात्राच्या निर्मितीची प्रेरणा जोसेफ बेल या वैद्यकिय प्राध्यापकाकडून मिळाली जे त्यांच्या रूग्णांबद्दल फक्त त्यांच्याकडे पाहूनच त्यांच्या रोगाचे निदान करीत, त्याचे राष्ट्रीयत्व, व्यवसाय, पूर्वेतिहास सांगत.
शेरलॉक होम्सचे जग भाग ४
अगदी सर्व प्रकारे हास्यास्पद ठरायला तयार राहुन पुन्हा एकदा मी हा भाग लिहायला घेतो आहे. सर आर्थर यांनी केलेले आध्यात्मविषयक लिखाण मी अद्यापपर्यंत वाचलेले नाही. पण त्यांना कसले तरी सायकिक एक्स्पेरियन्सेस होते, त्यांनी त्याबद्दल लिखाण केले आहे, व्याख्याने दिली आहेत आणि त्यांच्या हयातीत जागतिक साहित्य वर्तुळात त्याबद्दल बरेच प्रवाद निर्माण झाले असल्याचे जिज्ञासू वाचकांनी खुद्द त्यांच्याच तोंडून मी दुवा दिलेल्या यूट्यूबवरील चित्रफितीत ऐकले असेल. यासंदर्भात सर आर्थरचे लिखाण वाचले असेल त्या वाचकांनी कृपया प्रकाश टाकावा. ए स्टडी इन स्कार्लेट हे समग्र शेरलॉक होम्समधील प्रकरण वाचत असताना मी हा भाग लिहायला घेतला आहे. शेरलॉक होम्स आणि वॉटसन या व्यक्तीरेखा सर आर्थरच्याच सावल्या आहेत, त्या दंतकथा आहेत, त्यांचा चाहता वर्ग आहे - आणि या व्यक्तीरेखा या चाहत्यांसाठी खर्या आहेत. एकूणच शेरलॉक-वॉटसन-डॉयल आणि त्यांचे जग यातून तयार झालेल्या रसायनात सत्य आणि काल्पनिकता यांचा बेमालूम मिलाफ आहे, तो झिंग आणतो. मी सर डॉयलच्या या जगाकडे पाहात असताना ते एका कॅलिडोस्कोपचे रूप घेते - या कॅलिडोस्कोपचा केंद्रबिंदू कधी सर डॉयल असतात, कधी होम्स तर कधी वॉटसन.
लंडन विद्यापीठातून एम.डी.ची पदवी घेतलेल्या डॉक्टर वॉटसनला सहायक सर्जन म्हणून भारतात असलेल्या रेजिमेंटमध्ये रूजू होण्यासाठी मुंबईत पाठविण्यात येते. त्याच्या रेजीमेंटने तो भारतात येण्यापूर्वीच युध्दग्रस्त अफगाणिस्तानात म्हणजे कंदाहारला कूच केलेले असते. मैवंदच्या तुंबळ लढाईत त्याच्या खांद्यात गोळी घुसल्याने तो सैन्याच्या कामी बेकार ठरतो, त्याला पेशावरच्या इस्पितळात काहीकाळ ठेवून त्याचे आरोग्य न सुधारल्याने सैनिकी मेडिकल बोर्ड डॉक्टर वॉटसनला त्याच्या आरोग्यात सुधारणा करून घेण्यासाठी लंडन पाठवते. आडव्या-तिडव्या पसरलेल्या इंग्लंडमध्ये कुणीही त्याचा नातेवाईक नाही - खिशात अकरा शिलींग आणि सहा पेन्स ही दिवसाकाठीची कमाई आणि खांद्यात जेझाईल बुलेटच्या वेदना यांच्यासोबत तो लंडनच्या रस्त्यांवरून निरर्थक भटकतोय - आणि सध्या त्याचा मुक्काम स्ट्रॅण्ड भागातील हॉटेलात आहे. पैसे संपत असल्याचे जाणवताच तो कमी खर्चिक भागात मुक्काम हलविण्याच्या तयारीत आहे किंवा त्याला हॉटेल सोडून स्वत:ची जागा शोधावी लागणार आहे.
लंडनमध्ये असाच निरर्थक हिंडत असताना स्टॅम्फर्ड नावाचा कुणीतरी जुना परिचित त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. लंडनच्या त्या अफाट, अनोळखी गर्दीत या स्टॅम्फर्डच्या तोंडावरील हसू डॉ. वॉटसनला सुखावून जाते. डॉ. वॉटसन बार्टसमध्ये शिकत असताना हा स्टॅम्फर्ड त्याच्या हाताखाली ड्रेसर असतो; तो काही त्याचा जीवाभावाचा दोस्त नसतो पण वॉटसनची जखमी मन:स्थिती स्टॅम्फर्डला मिठीच मारायला भाग पाडते - स्टॅम्फर्डलाही आनंद होतो. खुशीखुशी में वॉटसन साहेब उनके इस पुराने आदमी को खानेपर चलने की दावत देते है आणि बग्गीतून ते हॉटेलच्या दिशेने निघतात.
डॉ. वॉटसनची हालहवाल विचारताना स्टॅम्फर्डला कळते की त्याला राहायला स्वस्तातल्या जागेची गरज आहे. स्टॅम्फर्डला दिवसभरात घडलेल्या योगायोगाचे आश्चर्य वाटते कारण त्याचे आणखी दुसर्या माणसासोबत सुध्दा स्वस्तातल्या राहाण्याच्या जागेबद्दलच बोलणे झालेले असते. वॉटसन स्टॅम्फर्डला एकदम उसळून या दुसर्या माणसाबद्दल विचारतो. तो माणूस इस्पितळातील रासायनिक प्रयोगशाळेत कामात गुंतलेला आहे आणि सुंदर अशा खोल्यांचा सूट मिळूनही एकट्याला भाडे परवडत नसल्याने त्या घेता येत नसल्याबद्दल आज सकाळीच त्याने स्टॅम्फर्डसमोर नाराजी व्यक्त केलेली असते.
हे ऐकून डॉक्टर वॉटसन स्टॅम्फर्डला सांगतो की खरच त्या माणसाला सूट मध्ये कुणी पार्टनर हवा असेल, तर त्यासाठी वॉटसनच योग्य माणूस आहे. एकाकी राहाण्यापेक्षा त्याला एखाद्या पार्टनर सोबत राहाणे मस्त वाटते.
वाईनचा चषक ओठाला लावलेला असताना त्यातून विचित्रपणे डॉक्टर वॉटसनकडे पाहात स्टॅम्फर्ड उद्गारतो "तु अजून शेरलॉक होम्सला ओळखत नाहीस, ओळखत असतास तर कदाचित तो पार्टनर म्हणून तुला तो नको असता"
वॉटसनला काहीतरी भानगड असल्याचा वास येतो आणि स्टॅम्फर्डला तो तसे विचारतो. शेरलॉक होम्सबद्दल काही भानगड नाही, मी तसे म्हणालो नाही, पण तो विचित्र माणूस आहे - त्याला विज्ञानाच्या विशिष्ट शाखेत भलती उत्सुकता असल्याचे, आणि एवढे वगळता त्याची बाकी इतर काही भानगड नसल्याचे स्टॅम्फर्ड सांगतो. मग तो काय वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी आहे का ही डॉक्टर वॉटसनची पुन्हा एकदा पृच्छा. नाही, मला काहीच माहित नाही त्याचा नेमका इंट्रेस्ट काय आहे तो पण तो शरीररचना शास्त्रात निष्णात आहे तो प्रथम श्रेणीचा केमिस्ट आहे हे मी विश्वासपूर्वक सांगू शकतो, पण तो कोणत्याही औपचारिक वर्गाला बसत नाही. त्याचा अभ्यासविषय भलता विस्कळीत आणि जगावेगळा असल्याचे, त्याच्या जगावेगळ्या ज्ञानामुळे प्रोफेसरमंडळीही अचंबित होतात असे स्टॅम्फर्ड वॉटसनला सांगतो. तो नेमकी काय झक मारतोय हे तु त्याला कधीच विचारले नाहीस का हा वॉटसनचा पुढचा प्रश्न. नाही, तो नेमके काय आणि कशासाठी करतोय हे त्याच्या तोंडून वदवून घेणे सोपे नाही, पण तो चुकून-हुकून त्याच्या विचित्रपणाच्या झटक्याच्या अमलाखाली असेल तरच त्याबद्दल बडबडू शकतो असे स्टॅम्फर्डचे उत्तर.
मला या माणसाला भेटायला आवडेल, मला असाच अभ्यासू आणि झक्की माणूस पार्टनर म्हणून आवडेल कारण मला सतत बकबक करणारा आणि अतिउत्साही साथीदार नकोय, मी अफगाणिस्तानात अशाच वातावरणात राहून आलोय, माझी आणि शेरलॉकची कशी भेट घडू शकेल? वॉटसन.
तो प्रयोगशाळेत नक्की भेटतोच भेटतो - तो एकतर कित्येक आठवडे तिथे येत नाही किंवा तो सकाळपासून रात्रीपर्यंत तिथेच पडिक असतो, तुला जमणार असेल तर खाणं-पिणं झाले की आपण तिकडेच निघू - खाल्लेले अन्न आणि पिलेल्या वाईनमुळे स्टॅम्फर्डही रंगात आलेला असतो.
टांगा पलटी होण्यापूर्वी आपण त्याची भेट घेऊ असे वॉटसन बोलतो आणि इतर फालतू विषयाकडे ते वळतात जे कथेत दिलेले नाहीत.
हॉटेलपासून इस्पितळाच्या रस्त्यावर स्टॅम्फर्ड डॉक्टर वॉटसनला त्याच्या होऊ घातलेल्या पार्टनरबद्दल आणखी तपशील पुरवतो.
तुमचं जमल नाही तर नंतर मला फुकट दोष द्यायचा नाही, मी त्याला प्रयोगशाळेत चुकून-हुकून भेटलो तेव्हा मला त्याच्याबद्दल जे थोडेफार कळले ते तुला सांगितलेय, त्याच्यासोबत राहाण्याचा सुलेमानी किडा तुझ्या डोक्यात वळवळलाय, नंतर माझ्या डोक्यावर खापर फोडायचे नाही - स्टॅम्फर्ड.
तसे काही नाही, आमचे जमले नाही तर तिथेच मामला खतम करू, पण स्टॅम्फर्डा खरे सांग, तु या बाबतीत राहुन-राहुन तुझ्या काखा का वर करतोयस? आपण ज्याला भेटायला जात आहोत तो एखादा माथेफिरू तर नाही ना? जरा भडाभडा सांग - वॉटसन.
जो देखा-समझा जाता है वो हमेशा ही लफ्जों में बयॉं किया नही जा सकता मिस्टर वॉटसन, मेरी नजर में होम्स कुछ ज्यादाही पेचिदा चीज है - वो कभीकभी गर्मखूनी से, काफी सख्ती से पेश आता है. मी त्याला एकदा एका मित्राला आग्रहाने अफू खाऊ घालण्याच्या आवेशात पाहिले आहे, हा काही नशाबाजी करायचा आग्रह नव्हता, अफू खाल्ल्यावर माणसावर अगदी अचूक, तंतोतंत परिणाम काय होतो ते पाहाण्याच्या कुतूहलाचे भूत त्याच्यावर स्वार होते. आणि हे कुतूहल शांत करण्यासाठी, मला खात्री आहे - त्याने स्वत: विषदेखील प्यायला कमी केले नसते.
ही अपिअर्स टू हॅव ए पॅशन फॉर डेफिनीट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज. (त्याला कसलेतरी अंतिम आणि अचूक ज्ञान मिळवण्याची मस्ती आहे ) स्टॅम्फर्ड.
इथे स्टॅम्फर्ड आणि डॉक्टर वॉटसन या दोघांच्याही मुसक्या बांधून त्यांना माझ्या खोलीतील पुस्तकांच्या कपाटात कोंडतोय. एवढ्या एका वाक्याकरिता वरचा बेवकूफपणा करावा लागला.
दी पॅशन फॉर डेऽऽऽफिनी॑ऽऽऽऽऽट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज
शेरलॉक होम्स नावाचे हे पिल्लू त्याचा ओरिजीनल फादर सर आर्थर कॉनन डॉयलची ही आकांक्षा होती - डेफिनिट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज. बुध्दी, तर्क, विचारशक्तीच्या वाटा आडवाटांनी डेफिनिट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेजचा शोध घेणार्यांच्याच हातून दंतकथा निर्माण होतात. भारताच्या कोट्यवधी पिढ्या याच शोधात खलास झाल्या. कृष्ण, शंकराचार्य, गौतम बुध्द, महावीर, विवेकानंद, रजनीश/ओशो, जे. कृष्णमूर्ती, यु.जी. कृष्णमूर्ती या त्यातल्या काही ठळक दंतकथा आहेत. शेरलॉक होम्स आणि मंडळी हीदेखील एक कल्ट आहे, संप्रदाय आहे. त्यांचा मार्ग तथाकथित सायंटिफिक आहे - कारण स्पष्ट आहे. त्याची मुळे पश्चिमेत आहेत. पण पूर्व असो की पश्चिम दी पॅशन फॉर डेऽऽऽफिनी॑ऽऽऽऽऽट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज अगदी सारखी असते. ही पॅशन जगातल्या इतर कुठल्याही संसर्गजन्य गोष्टीपेक्षा लक्षावधीपट संसर्गजन्य असते. हा संसर्ग झालेल्या लोकांनाच सांप्रदायिक म्हणतात. इथे फरक फक्त एवढाच आहे की शेरलॉक सारख्या लिजंड्ससमोर खून, चोर्या, घोटाळे यासारखी ढोबळ वाटणारी गूढे ठेवली जातात तर आपल्या भारतीय मंडळींसमोर "आत्मा म्हणजे काय?", "देव आहे का?", "स्वर्ग आहे का?", "सिध्दी आहेत का? कशा मिळवता येतील?" असले जास्त वैयक्तिक गुढ प्रश्न विचारले जातात. मानवी जीवनाच्या सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल असल्या विभाजनामुळे मानव जातीचा प्रवास दोन विरूध्द दिशांना होत असलेला दिसत असला तरी त्यांचा संगम एकाच बिंदूत होत असतो. वर उल्लेखिलेल्या भारतीय लिजंडसना "आत्मा म्हणजे काय?", "देव आहे का?", "स्वर्ग आहे का?", "सिध्दी आहेत का? कशा मिळवता येतील?" असले प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी ज्ञानापासून मुक्त व्हावे लागेल अशी उत्तरे दिलेली आहेत - ती भारतीय पटलाचा विचार करता ठिक आहेत. सर डॉयलने केलेली शेरलॉक या पात्राची शुध्द तार्किक मांडणी पाहाता त्याने जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा आग्रह धरायला हवा. पण तो म्हणतो - "I consider that a man's brain originally is like a little empty attic, and you have to stock it with such furniture as you choose. A fool takes in all the lumber of every sort that he comes across, so that the knowledge which might be useful to him gets crowded out, or at best is jumbled up with a lot of other things so that he has a difficulty in laying his hands upon it. Now the skilful workman is very careful indeed as to what he takes into his brain-attic. He will have nothing but the tools which may help him in doing his work, but of these he has a large assortment, and all in the most perfect order. It is a mistake to think that that little room has elastic walls and can distend to any extent. Depend upon it there comes a time when for every addition of knowledge you forget something that you knew before. It is of the highest importance, therefore, not to have useless facts elbowing out the useful ones."
शेरलॉक उकलीत असलेली कोडी भौतिक स्वरूपाची असल्याने भौतिक कोडी सोडविण्यासाठी मेंदूरूपी खोलीत किमान आवश्यक फर्निचर ठेवायला त्याची ना नाही. फक्त आवश्यक तेवढीच आणि तितकीच साधने त्याला लागतात. कोपर्निकसने मांडलेला सौरमालेचा आराखडा जाणून घेणे त्याच्या लेखी बेकार गोष्ट आहे. तो म्हणतो -
You say that we go round the sun. If we went round the moon it would not make a pennyworth of difference to me or to my work.
प्रतिक्रिया
25 Aug 2010 - 10:18 pm | चिंतामणी
आभार . इथे, इथे , आणि या इथे आणि हे इथे या बद्दल.
पण भौ, नोस्टालजीक झालो शेरलॉक होम्सची आठवण काढल्याने.
25 Aug 2010 - 10:22 pm | निखिल देशपांडे
अजुन लेख सविस्तर वाचायचा आहे..
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे.
पण भाउ भाग१, २ नंतर ४ मिस झाला का काय???
25 Aug 2010 - 10:25 pm | यशवंतकुलकर्णी
बघतो
25 Aug 2010 - 10:37 pm | मस्त कलंदर
शेरलॉक होम्सच्या कथा म्हणजे जीव की प्राण. कधीही हातात घ्यावेसे वाटणारे पुस्तक म्हणजे शेरलॉक होम्स.
मी डान्सिंग मेन पासून या कथा वाचायला सुरूवात केली. बर्याचशा वाचल्या पण या दोघांची मोट कुठे बांधली गेली हे पुष्कळ दिवस कळत नव्हते. समग्र शेरलॉक होम्स विकत घेतलं, आणि पहिलेच प्रकरण "स्टडी इन स्कार्लेट" वाचताना कळाले की दोघे कसे भेट्ले ते!!!
आढावा आवडला.
अजून येऊ देत.
26 Aug 2010 - 12:39 am | संदीप चित्रे
सध्या मी ऑफिसला जाता-येताना शरलॉक होम्सच्या कथांची ध्वनीमुद्रणे (ऑडियो बुक्स) ऐकतोय. शरलॉक होम्सच्या गोष्टी वाचून झाल्या, टीव्ही सीरियल पाहून झाली आणि आता ऑडियो बुक्स ऐकतोय :)
आज तुमचा हा लेख पाहून आनंद झाला आणि बरीच चांगली माहितीही मिळाली.
विशेषत: 'डेफिनेट अँड एक्झॅक्ट नॉलेज'ची भारतीय संदर्भातकी तुलना खूपच आवडली.
मिपाकर संजोप रावांनी लिहिलेला 'होम्सानंद' हा लेख तुम्ही वाचला आहे का?
नसेल तर इथे जरूर वाचा.
26 Aug 2010 - 12:47 am | यशवंतकुलकर्णी
अरे, अरे क्या बात है साहब...संजोप राव (अजूनपर्यंत ओळख नाही झाली यांची) यांच्या होम्सानंदमधून तर हे लिहायची बुध्दी झाली...म्हणून तर त्यांच्या होम्सानंद-मैफिलीत माझाही एक पेग घेऊन आलोय धावत पळत. ती भारतीय संदर्भातली तुलना अजून पाणी घालून लांबवता येईल, पण बघू कसा प्रतिसाद मिळतोय ते.
धन्यवाद म्हणू का? नाही म्हणत.
26 Aug 2010 - 2:09 am | धनंजय
भाग १चा पूर्वार्ध खासच
26 Aug 2010 - 5:40 am | सन्जोप राव
लेखाचा पहिला परिच्छेद वाचताना आलेली कपाळावरील आठी हळूहळू निवळत गेली. लेख आवडला. होम्स हा स्कॉचसारखा आहे. नुसता, किंवा फारफारतर बर्फाचे एकदोन तुकडे. सोडा, फरसाण, वेफर्स असले आले की त्याची चव बिघडते.
26 Aug 2010 - 4:04 pm | यशवंतकुलकर्णी
चिंतामणी, निखिल देशपांडेसाहेब, मस्त कलन्दर, संदीपचित्रेसाहेब अटकमटकवाले (तुमचा ब्लॉग कधीच लावलाय आमच्या ब्लॉगसूचीत), धनंजय, सन्जोप राव - सर्वांचे खूपखूप आभार!!
होम्स हा स्कॉचसारखा आहे. नुसता, किंवा फारफारतर बर्फाचे एकदोन तुकडे. सोडा, फरसाण, वेफर्स असले आले की त्याची चव बिघडते
१००० टक्के सहमत!
26 Jun 2011 - 1:12 am | आत्मशून्य
होम्स आपलं फेवरीट कॅरॅक्टर आहे, बी.बी.सी एच डी वर नूकतेच ९० मीनीटाचा १ असे शरलॉक नावाच्या सीरीयलचे ३ एपीसोड सतत प्रसारीत होत असतात ते आवर्जून बघावे. त्यांनी शरलॉक होल्म्स व डोक्टर वॉटसनचं आजच्या काळाशी अत्यंत मस्त अॅडेप्टेशन केलय. प्रोफेसर मॉरीऑटी तर अप्रतीमच. सदरील सीरीअल मागच्या वर्षीच प्रदर्शीत झाली होती, आता लवकरच त्याचा दूसरा सीजन प्रसारीत होइल.
26 Jun 2011 - 2:45 am | पिवळा डांबिस
यशवंतराव, लेख मस्तच आहे...
शेरलॉक होम्स हा आमचाही वीक पॉईंट!!!!
त्याच्या जितक्या कथांवर हात पडला त्या अधाशासारख्या वाचून काढल्या....
टीव्ही सिरियल, पिक्चर पाहून झाले....
पण अजून तृप्ती नाही झाली!!!!
:)
माझा सर्वात आवडता शेरलॉक होम्स हा जेरेमी ब्रेटने रंगवलेला....
८०च्या दशकातला, मला वाटतं बीबीसी किंवा ग्रानाडाच्या सिरियल्समधला!!!!!
त्यातले त्याचे डोळे आणि त्यामधून ओसंडणारं त्याच्या बुद्धिमत्तेचं तेज एखादा बाण घुसावा तसं काळजात घुसतं....
चला, आता पुन्हा पब्लिक लायब्ररीत जाऊन त्या जुन्या सिरियल्स आणून पुन्हा एकदा पारायण केलं पाहिजे!!!!
म्हणजे इतर कामं बोंबलणार आता!!!
:)
28 Jun 2011 - 9:28 pm | इंटरनेटस्नेही
संपुर्ण शेरलॉक होम्स हे पुस्तक, माझ्या माहितीप्रमाणे गजानन क्षीरसागर यांनी अनुवादित केले आहे.. गजानन जाहागिदार यांनी नाही.
उत्तम लेखन! आवडले!