राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो...
शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम् पापम्' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच! "मैत्रीण' असणं वगैरे गोष्टी वर्ज्यच होत्या, साधं वर्गातल्या मुलीशी बोलणंही दुरापास्त होतं. शाळेच्या व्हरांड्यात मुलं-मुली घोळक्यानं गप्पा मारताहेत, एकत्र नाटकं-सिनेमे बघताहेत, टाळ्या देऊन खिदळताहेत, अशी दृश्यं पाहिली, की आपण शाळेत भोगलेल्या "नरकयातना' नको नको म्हणताना आठवतात.
आम्ही सातवीच्या वर्गात होतो. आमचा वर्ग जाम दंगा करायचा, त्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला एका बेंचवर एक मुलगा-एक मुलगी असं बसवण्यात आलं होतं. केवढा घोर अपमान, अन्याय वाटला होता आम्हाला तेव्हा! तेव्हा आम्ही एकमेकांशी घेतलेली खुन्नस, बेंचवर आखून घेतलेली हद्द वगैरे गोष्टी ब्लॉगवर लिहिल्या आहेतच.
वर्गात मुला-मुलींच्या जोड्या लावायची फॅशन होती. कुणी मुलगा एखाद्या मुलीच्या जागेवर बसला, की त्याला तिच्या नावानं चिडवलं जायचं. किंवा साधारणपणे मुलग्यांमधला हुशार क्रमांक एक आणि मुलींमधली हुशार क्र. 1, अशा क्रमानेही जोड्या लागायच्या. एकमेकांच्या नावांमधली सामायिक अक्षरं शोधून त्यानुसार जोड्या लावल्या जायच्या. शेजारी पाजारी किंवा एकाच भागात राहणाऱ्या मुलामुलींच्या जोड्या लावायला तर सोप्पंच होतं. एकाच भागात राहत असलो, तरी शाळेत एकत्र वगैरे जाण्याची सोयच नव्हती. साधं एखाद्या मुलीच्या मागून गेलो, तरी हा मुलगा आपल्या मागे लागलाय की काय, असा संशय या मुलींना यायचा. "दहशतवाद' त्या काळीही फोफावलेला होताच!
अशा चिडवाचिडवीला वैतागून मग त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे राखीपौर्णिमेचा "पवित्र' सण होता. आपल्याला ज्या नावाने चिडवलं जातं, त्या मुलाला राखी बांधली, की भानगडच मिटून जायची. मग कोण कशाला धाडस करतंय चिडवायचं? असे आगंतुक "भाऊराया' बनायला काही लोक अगदी उतावीळ असायचे, तर काहींच्या हृदयाची अगदी शंभर शकलं व्हायची.
वर्गातून गायब होऊन किंवा आवडत्या मुलीला टाळून या दहशतवादातून सुटण्याचा मार्ग होता. पण शाळेत होणाऱ्या सामूहिक रक्षाबंधनाचं काय? संघाच्या माध्यमातून शाळेत येणाऱ्या गोंड्याच्या राख्या प्रत्येकाच्या हातावर दिसल्याच पाहिजेत, असा शाळेचा दंडक होता. जणू सगळ्या मुलींचा संभाव्य तेजोभंग टाळण्याचा घाऊक मक्ताच शाळेने घेऊन टाकला होता! जेवढी मुलं, तेवढ्या राख्या वर्गात मागवल्या जायच्या आणि मग प्रत्येकाला समोर बोलावून एकेका मुलीनं त्याच्या प्रेमभावनांच्या सामूहिक कत्तलीचा साग्रसंगीत सोहळा पार पडायचा! तरीही शक्यतो आपली आवडती मुलगी आपल्याला राखी बांधायला येऊ नये, म्हणून मुलं जागांची अदलाबदल, बेंचखाली दडून राहणं, वगैरे वगैरे उपद्व्याप करायचे. कश्शाकश्शाचा म्हणून निभाव लागायचा नाही.
अर्थात, राखी बांधून घेण्यातही एक गंमत होतीच म्हणा! आपल्याला मुलगी राखी बांधतेय, म्हणजे इतरांपेक्षा जास्त भाव देतेय, असाही एक सर्वमान्य समज होता. हातावर राख्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढा तो मुलगा मुलींचा लाडका, असंही एक गृहीतक होतं. त्यातून मुलीच्या नाजूक हातातून राखी बांधून घेताना होणारा अलगद स्पर्शही त्या वयात मनाला मोहरून टाकायचा, ही गोष्ट अलाहिदा! शिंगं फुटली, तशी राख्यांची जागा "फ्रेंडशिप बॅंड'नी घेतली. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली त्यांचेही पेव फुटायच्या आतच आम्ही कॉलेजातून बाहेर पडलो होतो!
मनगटांतील राख्यांची आणि अपवादात्मक परिस्थितीत फ्रेंडशिप बॅंडची सद्दी संपली आणि लग्नाच्या वेळी हातात बांधलेला हळकुंडाचा दोरा हातात बांधला. दुसऱ्या दिवशी तो उतरवला असला, तरी आयुष्यभराची बेडी हातात पडली ती पडलीच!
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 8:46 pm | धमाल मुलगा
तुला आज ऑनलाईन पाहिलं तेव्हाच माझ्या मनात आलंच होतं की हा येऊन नक्की राखीपोर्णिमेवर लिहिणार..म्हणजे जखमांवर ( ;) ) काहीतरी खुसखुशीत लिहिणार!
मजा आली. (आणि काही खपल्या निघाल्या, रक्त भळाभळा भळाभळा वगैरे...आणि हुश्श! आता सुटलो रे बाबा त्या टेंशनमधुन असाही निश्वास सोडुन झाला.)
येत जा रे दादा गप्पाटप्पा करायला...छान वाटतं तुझे लेख वाचले की. डोका सगळा रिफ्रेश होऊन जातो बघ.
24 Aug 2010 - 12:50 am | आपला अभिजित
धन्यवाद रे धम्या!
मला माझ्यावर जेवढा विश्वास नाही, तेवढा तुझा माझ्यावर आहे.
असो.
(आणि काही खपल्या निघाल्या, रक्त भळाभळा भळाभळा वगैरे...आणि हुश्श! आता सुटलो रे बाबा त्या टेंशनमधुन असाही निश्वास सोडुन झाला.)
खराय रे बाबा!
येत जा रे दादा गप्पाटप्पा करायला...छान वाटतं तुझे लेख वाचले की.
येइन हो. जरा पोटापाण्याची कामं निभावली की येइन मग पोटभर गप्पा मारायला!
25 Aug 2010 - 7:32 pm | धमाल मुलगा
मुरलेला पुणेकर झालास हों!
हाणला ना आम्हाला टोला? ;)
25 Aug 2010 - 7:59 pm | रेवती
नाही नाही धम्या!
शेवटचं वाक्य वाचून तात्यांची आठवण झाली.
अगदी कोकणातल्या लोकांनी हाणलेला टोला आहे तो!
25 Aug 2010 - 8:01 pm | यशोधरा
कोकणातले लोक टोमणे हाणतात होय गं रेवती? :(
-कोकणातली
25 Aug 2010 - 8:13 pm | रेवती
अगं अगं रागावू नकोस!
पुणेकरांना हाणून हाणून इतके बोथट केले आहे.....सगळेच तसे कसे असतील!;)
तसंच हे खास कोकणी वाटतं.......सगळेच कोकणी तसे कसे असतील हे मान्य आहे ना!;)
25 Aug 2010 - 8:16 pm | यशोधरा
हों तर! कोकणी माणसें असतातच खास हों! :)
उदा. - मीच बघेंनास! :D :D
25 Aug 2010 - 9:25 pm | धमाल मुलगा
आणि त्यात पुन्हा, तो स्वतः 'रत्नांग्रीच्या मधल्या आळीतला' आहे! म्हणजे खरं तर मी फारच बोथट टाकलाय. ;)
23 Aug 2010 - 9:07 pm | मृत्युन्जय
एका शाळासोबत्याचा रडता चेहेरा डोळ्यासमोर आला आणि मन भरुन आले :). बिचार्याला भर वर्गात राखी बांधली गेली होती. १०० लोकांसमोर त्या मुलीने कानाखाली वाजवली असती तरी इतका हमसाहमशी रडला नसता तो.
बाकी आम्हाला शाळेत कोणी राखी बांधली नाही. कारण मुळात आमच्यापासुन कधी कोणाला धोका वाटलाच नाही. आणि भाव देण्याच्या बाबतित उलटीकडुन नंबर लावले असते तरच कदाचित मी वर्गबंधु झालो असतो.
23 Aug 2010 - 9:15 pm | मेघवेडा
हा हा हा! मस्तच!
23 Aug 2010 - 9:21 pm | झंम्प्या
आम्हाला ह्या असल्या समर प्रसंगांना कधीच तोंड द्याव लागल नाही कारण... १० वी पर्यंत आमची मुलांची शाळा होती.. :( हे सगळा आम्ही मिस करतो कायम..
आमच्या कधीच जोड्या लावल्या गेल्या नाहीत किवा कोणीही कधीच राखी बांधायला सुद्धा नव्हत...
:(
23 Aug 2010 - 9:31 pm | नितिन थत्ते
>>१० वी पर्यंत आमची मुलांची शाळा होती..
माझी पुण्याची मामेभावंडं "अरे हॅड्, आमच्या शाळेत मुली नाहियेत" असे अभिमानाने (सातवी पर्यंत ;) )सांगत असत ते आठवले.
सातवी नंतर आम्ही सांगायचो, जे काय सांगायचे ते. :)
23 Aug 2010 - 9:44 pm | रेवती
हा हा हा!
मजेशीर लेखन.
आमची शाळा मुलींची होती म्हणून असं काही घडलं नाही.
ती मजा आपण मिस् केली असंही वाटत नाही कारण त्यात मजा असते हेच माहित नव्हतं.
अभिजित, तुमच्याकडे यावर्षी राखीपौर्णिमा छान साजरी झाली असणार.
छोट्या निमिषनं राखी बांधून घेतली का?
24 Aug 2010 - 12:53 am | आपला अभिजित
अभिजित, तुमच्याकडे यावर्षी राखीपौर्णिमा छान साजरी झाली असणार.
झाली?
राखीपौर्णिमा उद्या आहे म्याडम! (मला अर्धचंद्र लिहिता येत नाही म्हणून हा `म्याडम' शब्दप्रयोग हो!)
24 Aug 2010 - 1:39 am | रेवती
क्यालेंडरात उद्या राखीपोर्णिमा आहे पण आज सगळीकडे (मिपा, इसकाळ वगैरे) राख्या बघून आजच झाली की काय असे वाटले.
23 Aug 2010 - 10:12 pm | Nile
आमच्या रक्षाबंधानाच्या आठवणी अशाच काहीश्या आहेत.
पहिली ते पाचवी मुली म्हणजे शत्रु! पण नंतर मुलींची चांगली गट्टी जमली होती, इतकी की दरवर्षी रक्षाबंधनाला कोपरापासुन मनगटापर्यंत जागा उरत नसे राखी साठी. वर्गातील एक नंबरचा डांबरट मुलगा असल्याने असेल किंवा मुलींशी गट्टी असेल म्हणुन असेल, पण दोन चार खडुस मुली सोडल्या तर सगळ्या मला राखी बांधत असतं, (हाय रे दैना! ;-) ) एकदा तर आजारी असल्याने शाळेत गेलो नव्हतो तर मुलींनी घरी येउन राख्या बांधल्या! आता कोणी राखी बांधणारं नसल्याने असेल, ते दिवस पुन्हा यावेत असं वाटतं. आताशा तर पोस्टाने सुद्धा येत नाहीत राख्या. ;-)
24 Aug 2010 - 2:01 am | नुपूर
व्यनितून राखी पाठवते आहे. स्वीकार व्हावा.
नुपूर
24 Aug 2010 - 2:04 am | Nile
हा हा हा! जरुर. धन्यवाद. ओवाळणी कशी द्यावे बुवा आता? ;-)
24 Aug 2010 - 2:07 am | नुपूर
अकाउंट नं पाठवू का??? ;)
24 Aug 2010 - 3:27 am | मिसळभोक्ता
एकदा आम्हाला कुणीतरी अकाउंट नंबर पाठवला होता.
24 Aug 2010 - 6:13 am | आमोद शिंदे
तुम्ही एका वर्षभरात भारतातील देवळाला, घरगुती पूजेसाठी भटजींना किंवा आध्यात्मिक गुरूंना एकंदरित अंदाजे किती दक्षिणा दिली असेल? ह्यात आणखीन एक क्लॉज टाकला असता तर अजून मज्जा आली असती. ;)
24 Aug 2010 - 1:01 am | आपला अभिजित
फक्त मुलांची किंवा फक्त मुलींची शाळा असलेल्यांबद्दल मला सहानुभूती, करुणा, कीव...सगळं काही आहे.
मला आजही फक्त मुला-मुलींची शाळा हा प्रकार डोक्यात जातो.
पुण्यातल्या अनेक प्रमुख शाळा अजूनही त्याच अवस्थेत आहेत. या मुलांचं कसं होणार, कुणास ठाऊक!
मी मुलीसाठी शाळा शोधताना एकत्र शिक्षण देणारी शाळाच हवी, असा प्रथम निकष ठेवला होता. आणि गंमत म्हणजे, तशी आणि जवळची, मराठी माध्यमाची असे निकष लावल्यावर फक्त एक-दोनच पर्याय निघाले. असो!!
24 Aug 2010 - 7:02 am | विश्वनाथ मेहेंदळे
फक्त मुलांच्या शाळेत असलेल्यांबद्दल सहानुभूती, करुणा, कीव यातील काहीही करू नका अभिजित साहेब. ती पोरं काय दंगा घालतात आणि कित्ती मज्जा करतात ते "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे".
तपशील इथे हवे असतील तर सांगा (मग धागा केवळ पुरुष वाचनमात्र करावा लागू शकेल कदाचित) नाहीतर खव व्यनी आहेच.
(फक्त मुलांच्या शाळेत असलेला) वि. मे.
24 Aug 2010 - 8:51 am | सहज
पाचवी ते दहावी मी फक्त मुलांच्या शाळेत होतो. यात करुणा, कीव, सहानुभूती असण्यासारखे काय कळले नाही.
24 Aug 2010 - 8:56 am | नितिन थत्ते
कीव करण्यासारखे काही नाही.
पण सेग्रिगेटेड शाळेत जाणार्या मुलांचा कॉलेजमध्ये गेल्यानंतरचा अनुभव को-एड शाळेत शिकलेल्या* मुलांपेक्षा वेगळा असेल हे नक्की.
*को-एड शाळेत मुलामुलींनी एकमेकांशी बोलणे हे पाप समजले जाण्याचे असेल तर ती शाळा सेग्रिगेटेड शाळा म्हणायला हरकत नाही.
24 Aug 2010 - 5:37 am | असुर
आईग्ग!!!
'उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या ह्या ' अगदी हेच म्हणावसं वाटलं.
एका को-एड शाळेत आयुष्याची सोनेरी दहा वर्ष घालवली मी, हे असले प्रसंग फार आले. बर, प्रसंग इतका बाका असायचा कि राखी बांधून घेणे हा अपमान, आणि नकार देणे म्हणजे संशयाला कारण! पहिली ७-८ वर्षे लै लै अपमान सहन केले राव.
ओवर द पिरियड आम्ही बदनाम झालो! पूर्वी सत्तू नावाचा एक दरोडेखोर होता म्हणे, इकडचा रॉबीन-हूड! अमीरोंका जल्लाद, गरिबोंका रखवाला वगैरे! मायला, आम्हीपण तसेच, शाळेतल्या शिकवणार्या 'ठाकुर' आणि 'ठकुरायन'चे कर्दनकाळ!
त्यामुळे शेवटी शेवटी आमची इमेज इतकी बरबाद झाली, की पोरी राखी बांधायला पण यायच्या नाहीत. त्यांना 'त्या चांडाळचौकडी बरोबर दिसलात तरी शिक्षा होईल' अशी तंबी मिळालेली म्हणॅ...
त्याचाही फायदा असा झाला की शेवटची दोन वर्ष कुण्णाकुण्णाची जबाबदारी शिरावर आली नाही आणि दहावीत बरे मार्क पडले. :-)
24 Aug 2010 - 9:40 am | प्रकाश घाटपांडे
एक व्यंग चित्र आठवते. एक टंच मुलगी पर्स मधुन राखी काढत असल्याचे पाहुन एक रोडरोमिओ जीव मुठीत धरुन लांब पळतो आहे.
25 Aug 2010 - 6:04 pm | अरुंधती
हा बघा अजून एक रक्षा बंधन इफेक्ट!!!!
25 Aug 2010 - 6:14 pm | असुर
__/\__ धन्य!!
येक लम्बर फोटू हाये.
--असुर
25 Aug 2010 - 9:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त लिहीलं आहेस रे अभिजीत!
आमच्या शाळेतही असे प्रकार चालायचेच. वर्गातला एक मुलगा बिल्डींगमधेच रहायचा त्याच्याकडून या बातम्या मिळायच्याच. पण पुन्हा वर्गात याची आणि माझी ओळख नाही असं वागायला लागायचं!