माझ्या काही थिअरीज आहेत पैकी १ म्हणजे - शिक्षकांची मुलं चांगली निघतात. चांगली म्हणजे त्यांना शिस्त असते वगैरे वगैरे. असो.
माझी आई देखील शिक्षीका होती. मला तिच्याबद्दल आठवेल तसं सांगायचं आहे. प्रयत्न करते. मला वाटतं स्त्रिया-स्त्रियांमधलं सर्वाधिक क्लिष्ट, कडू-गोड, गिल्ट रिडन नातं जर कोणतं असेल तर ते आहे आई-मुलीचं. या सुंदर, अनोख्या, अनवट नात्याबद्दल माझ्या मनात नेहेमीच एक कुतुहल, गंमत अशी संमिश्र भावना आहे.
आई हे १ अजब रसायनच असतं नाही? मायेनी डोक्यावरून हात फिरवत तुम्हाला जागं करणारं आणि दुसर्या क्षणी तुमच्यावर रागानी बरसणारं सुद्धा. तुमचं सगळं भावविश्व व्यापूनही ४ अंगुळं उरणारं.
माझी आई शिक्षीका, आता निवृत्त मुख्याध्यापिका, पाककलेत अतिशय सुगरण अशी. खास कोकणस्थी ,फणसासारखा वरून काटेरी पण आतून गोड असा तिचा स्वभाव होता. मला या स्वभावाला सरावायला बरीच बरीच वर्ष लागली. आम्ही कर्क राशीचे लोक मुळातच रडे जरा फट म्हणताच आमचे डोळे भरून येतात. आईच्या काटेरी बाह्यरूपाला सरावायला बराच त्रास झाला.
आई व्यवहारात अतिशय काटेकोर आणि दक्ष होती. अनाठायी, नको तिथे पैसा कधीच सुटायचा नाही. लहानपणापासून बचतीचं बाळकडू आम्हाला तिनी दिलं. पण हेदेखील सांगीतलं की भरपूर पुस्तकं वाचायची. पुस्तकांवर खर्च करताना हात आखडता घ्यायचा नाही. याउलट कपडे, फॅशन याबाबत ती अगदीच उदासीनच नव्हे तर त्याचा तिला तिटकाराच होता. तिचं म्हणणं हे होतं की हे नवश्रीमंत नटण्यावर जास्त खर्च करतात. यांच्या प्रायॉरीटीजची वाट लागलेली असते. याउलट ज्यांनी पैसा लहानपणापासून पाहीलेला असतो किंवा कष्टाने मिळवलेला असतो ते व्यवस्थित रहातात. सांगायचा मुद्दा हा की एकंदर ती फॅशन वगैरे कमी लेखायची.
आई आस्तिक होती. पण फार देव देव करणारी अजीबात नव्हती. रोज संध्याकाळी स्वयंपाक करताना रामरक्षा म्हणत असे. ती ऐकून ऐकून माझी पाठ झाली होती.
आईला मोजक्याच पण अतिशय जीवलग मैत्रिणी होत्या. ज्या अजूनही तिला भेटतात, रहातात. तिनी कॉलेजमधल्या मोजक्या का होईना मैत्रिणी जपल्या.
माझी काही उदाहरणंच द्यायची तर -
लहानपणी नक्की १००% मी आईवेडी असणार. कारण टीनेज मधे आई हळूहळू मला तोडायला लागली. तिचं म्हणणं हे होतं की मी स्वतंत्र कधी होणार? असं आईवेडं असणं माझ्या वाढीच्या दृष्टीने चांगलं नाही. आता जेव्हा मी काही मुली बघते ज्या त्यांच्या आईची सावली असतात, ज्यांच्या संसारात त्यांच्या आईचा अनाठायी हस्तक्षेप असतो त्यावेळी मला माझ्या आईच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं.
मी माँटेसरीत असताना आमच्याकडे भांडी घासायला १ मामी यायच्या. त्यांनी गौरीचंआम्हाला निमंत्रण दिलं होतं. मी हावरटासारखा गौरीच्या रुखवतातला कानवला मागीतला : (. झाल! घरी आल्यावार जो बेदम मार बसला. अजूनही मी कोणाला काही मागू शकत नाही. हे संस्कार तिने केले.
तिचं सगळच पटलं असही नाही. "कोकणस्थ ब्राम्हण्य" हा तिचा अभिमानाचा मुद्दा होता. मला जातीपातीचा तिटकारा होता. आमची बरीच बोलचाल आणि शेवटी पर्यवसन कटू शांततेत होत असे. दुसरा वादग्रस्त मुद्दा होता तो हा की - माझं म्हणणं होतं की पैशानी सर्वं सुखं विकत घेता येत नाहीत. पैसा हे सुख मिळवायचं साधन नाही. तर तिचं म्हणणं असे की "असेल. पण पैशानी ९९% समस्या सुटतात." यावरून वादविवाद व्हायचे.
तिनी मला खूप काही दिलं. जेवढी माझी कुवत तेवढं जिरलं, मी धरून ठेऊ शकले.
आजच आई आणि मुलगी याच्या नातेसंबंधांबाबत मस्त पुस्तक वाचत होते. माझा ऑलटाईम फेव्हरेट विषय. त्यावरून स्फूर्ती घेऊन हा लेख लिहायला घेतला. शेवटी प्रत्येकाला स्वतःची आई खास वाटते. जशी मला माझी वाटते. ते तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 7:23 am | विकास
छोटेसे स्फूट आहे पण आवडले.
आई हे १ अजब रसायनच असतं नाही?
यातच सर्व आले...
23 Aug 2010 - 7:34 am | चतुरंग
बर्याच आठवणी चाळवल्यात. आईबद्दल कितीही लिहाल तेवढं थोडंच असतं.
(लेखन जरा विस्कळित वाटले. मुद्यांची थोडी फेररचना करुन आणखी थोडे लिहिले असतेत तर आणखीन फुलू शकले असते. तरीही आवडलेच म्हणा.)
चतुरंग
23 Aug 2010 - 8:28 am | स्पंदना
भिडल मनाला शुची.
स्वतः आई म्हणुन किती कन्फ्युजन्स ना तोंड द्याव लागते ते फक्त आईला च माहीत.
पण जरा काही शेकतय म्हंटल की 'ए आय ह्या बघ मला काय म्हंत्यात' म्हणुन गळा काढणारी बाळ आज ही मि. पा. वर पाहिली की खरच मुल आई वेडी असतात हे पटत.
23 Aug 2010 - 8:48 am | प्रकाश घाटपांडे
कुठल्याही नात्यात हे वाद होतात. आंतरजालावर देखील हा कौल टाकून पहा.
जगी सर्व सुखी असा कोण आहे |
विचारी मना तुच शोधोनी पाहे ||
23 Aug 2010 - 8:51 am | इंटरनेटस्नेही
अप्रतिम लेख.
23 Aug 2010 - 8:54 am | पैसा
माझीही आई निवृत्त शिक्षिका आहे त्यामुळे तुमचं एकदम १००% पटलं. फरकाचा मुद्दा एवढाच की माझ्या आईनेही कधी जातीला महत्त्व दिलं नाही. सारस्वत जावयाचं तेवढंच कौतुक केलं. आणि मुलाने रजिस्टर्ड लग्न केलं त्यालाही विरोध केला नाही.
23 Aug 2010 - 9:47 am | झंम्प्या
अप्रतिम लेख
वयच्या २९ व्या वर्षिहि मला एकट वाटल्यवर मि आईच्या कुशित शिर्तो :)
23 Aug 2010 - 11:21 am | अनुराग
शुचि , आवडल!! आई बाबत बोलु तेव्हधे थोडेच. मला माझी आई आट्टवली, छान.
23 Aug 2010 - 11:42 am | स्वाती दिनेश
छान लिहिलं आहे, चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे विस्कळितपणा वाटतो,थोडे बांधिव असते तर लेख अजून खुलला असता,
स्वाती
23 Aug 2010 - 12:43 pm | मितान
स्वातीतैशी सहमत.
पण हे 'शेअरिंग' आहे हे ध्यानात घेतलं की विस्कळीतपणा जाणवत नाही. म्हणून आवडलं.
23 Aug 2010 - 2:42 pm | अनिल २७
असे लेख वाचले कि आई असूनही ज्यांना आईचं प्रेम भेटत नाही त्यांच्या व्यथा जाणवू लागतात.... जखमेवरची खपली निघल्यासारखे वाटते....
23 Aug 2010 - 3:03 pm | अर्धवट
:(
23 Aug 2010 - 2:42 pm | मदनबाण
प्रकटन आवडले... :)
23 Aug 2010 - 4:09 pm | फ्रॅक्चर बंड्या
लेख आवडला ..
23 Aug 2010 - 4:13 pm | मितभाषी
माझ्या काही थिअरीज आहेत पैकी १ म्हणजे - शिक्षकांची मुलं चांगली निघतात. चांगली म्हणजे त्यांना शिस्त असते वगैरे वगैरे.
हे वाचलं आणि लगेच डोळे पान्हावले त्यामुळे स्क्रिनवरील काहीच दिसले नाही. धुकं उतरल्याव पुढ लिहिन काहीतरी
भावश्या.
23 Aug 2010 - 4:39 pm | स्वाती२
छान लिहिलय.
23 Aug 2010 - 6:17 pm | चित्रा
लेख आवडला. तुमची आई कर्तृत्ववान दिसते आहे. तिच्यावरून लिहीलेले हे विचार लेखाच्या स्वरूपात, तुमच्या तिच्या संबंधांच्या स्वरूपात विस्तृत होऊ शकतात. पण मनात आलेले विचार मांडले आहेत तेव्हा ते असेच येतात, विस्कळित, तेव्हा ठीक आहे.
असो. आईबरोबर प्रत्येक मुलीचे स्पेशल असे एक नाते असते.. :) या लेखामुळे आईबरोबरचे अनेक क्षण डोळ्यांसमोरून गेले.
23 Aug 2010 - 6:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख आवडला. माझीही आई शिक्षिकाच होती, पण शिक्षकांच्या मुलांना शाळेत शिक्षकांकडूनच उगाच जास्त रॅगिंग व्हायचं असं वाटायचं, वाटतं.
माझं आणि माझ्या आईचंही विशेष असं नातं होतं असं आता वाटतंय. आपली आई लवकर गेली असेल तर आई मुलीतच आपल्या आईला शोधते असं लहानपणी कुठेतरी वाचलं होतं; माझ्या आईच्या बाबतीत ते अगदी खरं होतं. तिचं निसटलेलं लहानपण ती माझ्यामधे शोधायची हे कळायला मला मात्र खूप मोठं व्हावं लागलं.
23 Aug 2010 - 6:41 pm | मी-सौरभ
तुम्ही एकदम spontaneously टंकून प्रसिद्ध करता असं दिसतं...
कधी कधी असे सुन्दर प्रकटन लिहून झाल्यावर ते जरा नीट बांधून मग प्रकाशित करा अजून मजा येइल.
पु.ले.शु.
23 Aug 2010 - 6:44 pm | ऋषिकेश
वा! सुरेख लेख झाला आहे..
जरा इथेतिथे पळापळ करणार्या विचारांना एकत्र केलं असतं तर अधीक ठाशिव झाला असता हे खरं.. पण हे गप्पा मारल्यासारखंदेखील आवडलं..
23 Aug 2010 - 8:04 pm | वेताळ
माझ्या काही थिअरीज आहेत पैकी १ म्हणजे - शिक्षकांची मुलं चांगली निघतात. चांगली म्हणजे त्यांना शिस्त असते वगैरे वगैरे.
हे वाक्य काळजाला भिडले.पुढचा लेख वाचायला मन कचरले.
मला खात्री आहे. एसी बसगाडीत तुम्हाला नक्कीच गणपती भेटले असणार,त्याशिवाय का इतके सुंदर लिखाण तुम्ही करु शकता.
24 Aug 2010 - 3:15 am | मिसळभोक्ता
माझ्या काही थिअरीज आहेत पैकी १ म्हणजे - शिक्षकांची मुलं चांगली निघतात.
माझ्या शाळेत चाळीस शिक्षक होते.त्यांची साधारणतः शंभर मुले होती असे समजू. त्यातले वीसेक कधीनाकधी तुरुंगात जाऊन आलेले आहेत. बी ए नंतर शिक्षण घेणारे २. बर्याच लोकांना शाळेतच आईची / वडिलांची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागलेत.
तर थोडक्यात, तुमची थियरी चूक आहे.
24 Aug 2010 - 3:46 am | रेवती
चांगली म्हणजे त्यांना शिस्त असते वगैरे वगैरे
काय हे शुचितै? फार हसले गं!;)
24 Aug 2010 - 6:10 am | आमोद शिंदे
छानच लेख!
लेखातला विस्कळीतपणा दाखवून देण्यापेक्षा काही क्षण शुचि बनून विचार करुन पाहिला. तुमचे जग वेगळेच आहे हे नक्की.
24 Aug 2010 - 9:48 pm | विलासराव
लेख आवडला.
आई-वडिल नसले तरी आमचे आजोबा-आजी दोघेही शिक्षक होते.