कणेकरांचं 'मेतकूट' आणि 'आंबटचिंबट' वाचल्यानंतर या माणसाला लागलेली मृत्यूची चाहूल डोळ्यासमोर दिसते. आता त्यांना दिलीपकुमारचे चित्रपटही पहावेसे वाटत नाहीत, म्हणजे त्यांच्यासारख्या अट्टल युसुफचाहत्याचा हा जिवंतपणी झालेला मृत्यूच. असे दिवसेंदिवस शुष्क होत टप्प्याटप्प्याने मरण्यापेक्षा रसरशीतपणे एकदाच मेलेले काय वाईट?
-----------------------------------------------------------------------------
'मी लहानपणी दूध पीत असे' या वाक्यात 'मी' च्या जागी 'तू' हा कर्ता केला तर हे वाक्य कसे होईल असा प्रश्न आम्ही लहानपणी ज्यालात्याला विचारत असू. 'तू लहानपणी दूध पीत होतास' असे उत्तर आले की खदाखदा हसत एकमेकांना टाळ्या देत असू. तर मग 'मी लहानपणी दूध पीत होतो' चे रुपांतर काय असा दुसरा प्रश्न असे. 'तू लहानपणी दूध पीत असस' हे बरोबर उत्तर कुणालाच देता आले नव्हते.
-----------------------------------------------------------------------------
मीना प्रभूंची पुस्तके म्हणजे एक अजब कंटाळा आहे. 'नवर्याच्या पैशाने' वगैरे संदर्भ सोडून द्या. पण या बाईला एक जबरदस्त 'अॅटिट्यूड' आहे. एरवी इजिप्तमध्ये जाऊन तिथल्या लोकांना मुस्लिम धर्म किती मागासलेला, बुरसटलेला आहे यावर व्याख्याने देणे म्हणजे कमाल आहे. आणि माहिती वगैरे म्हणाल तर आजकाल काय विकिपिडिया वाचून कुणीही लिहू शकतो. प्रवासवर्णन आणि एखाद्या ठिकाणाबद्दलच टूरिस्ट गाईड यात काही फरक असावा की नाही?
-----------------------------------------------------------------------------
बालूशाही बर्याच लोकांना आवडत नाही, कारण चांगली बालूशाही फार कमी ठिकाणी करतात. तुपकट पिठाळ गठ्ठा म्हणजे बालूशाही नव्हे. खरी बालूशाही तुपाचा स्वाद असलेली, पण खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी असते. आधी असली फर्मास बालूशाही, मग ताजी तळलेली खमंग पापडी, तिच्याबरोबर तळलेल्या आणि मिठात घोळलेल्या हिरव्या मिरच्या आणि मग अर्धा कप दाट चहा असे करुन एक सिगरेट ओढली की मी मरायला मोकळा झालो.
-----------------------------------------------------------------------------
'नटरंग' फालतू आहे. अतुल कुलकर्णीच्या वाढवलेल्या आणि उतरवलेल्या वजनाचेच इतके कौतुक असेल तर अदनान सामीही थोर आहे. नाच्याच्या भूमिकेत गणपत पाटलांनी जे बेंचमार्किंग केले आहे, त्याच्या जवळपास जाणेही कुणाला जमलेले नाही. अतुल कुलकर्णीला तर नाहीच नाही.
----------------------------------------------------------------------------
खालच्या दामले काकूंचं वय आता पंच्याहत्तर तरी असेल. त्यांच्या त्या किरट्या आवाजात त्या त्यांच्या कुठल्या तरी ऑस्ट्रेलियातल्या भाचीचं पाईल्सचं ऑपरेशन किंवा त्यांच्या इंदूरच्या पुतण्याची पीएचडी यावर कुणालाही जिन्यात गाठून तासनतास पिळत असतात. त्यांची मान भरतनाट्यम केल्यासारखी नाचत असते आणि त्यांच्या ब्लाऊझमधून मागच्या बाजूने ब्रेसियरची पट्टी बाहेर आलेली असते.
-----------------------------------------------------------------------------
मेसमधलं जेवण अगदी भिकार असे. पण रात्री उशीर झाला की स्वामी सकाळचं उरलेलं उप्पीट, शिरा असलं काहीतरी आणून जेवत असलेल्या लोकांना वाढत असे. ते आंबलेलं, तेलकट उप्पीटच त्यातल्या त्यात बरं लागे. मी आणि शिर्के म्हणून मुद्दाम उशीरा जेवायला जात असू.
-----------------------------------------------------------------------------
अलाहाबाद संगमावर ते किळसवाणं पाणी बघून मला अजिबात अंघोळ करावीशी वाटली नाही. 'बाबूजी, यहां तो सौ जन्मोंके पाप धुल जाते है' असं म्हणणार्या नाविकाला मी 'क्या मै आपको इतना पापी लगता हूं?' असं फटकारलं होतं.
-----------------------------------------------------------------------------
आता नेमाडे बास. कोसला, जरीला, हूल, झूल. फिनीतो. हिंदूबिंदू बकवास. धाडकन पाण्यात मुटका मारायचा आणि पाणी उडवून मजा बघायची या ट्रिक्सना आम्ही फसणार नाही. नेमाडे, यू आर हिस्टरी.
-----------------------------------------------------------------------------
मदनमोहनला गाणी रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओही मिळू नये म्हणून महिनोनमहिने काम नसताना स्टुडिओ आणि वादक बुक करुन ठेवणार्यांमध्ये शंकर जयकिशनही होते म्हणे. रईस खान यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर मदनमोहन यांनी त्यांच्या कुठल्याच गाण्यात सतार वापरली नाही म्हणे. आपल्या फिटनेसबद्दल जागरुक असणार्या मदनमोहनला काही महिन्यांत मरण्यासाठी किती दारु प्यावी लागली असेल? आणि इतकी दारु पिण्यासाठी त्याच्या जिवाला केवढ्या कळा लागल्या असतील?
-----------------------------------------------------------------------------
इंग्रजी ही काही आपली भाषा नाही. दहातले किमान सहा स्वतःची ओळख करुन देताना 'मायसेल्फ अमुकतमुक' असं म्हणतात. ('चष्मे बद्दूर' मधला रवी वासवानीही असेच म्हणतो. याला म्हणायचं ऑब्झर्वेशन. सई परांजपे, तुस्सी ग्रेट हो.) आता या वाक्यात क्रियापद कुठे आहे? इंग्रजी ही काही आपली भाषा नाही.
----------------------------------------------------------------------------
'मजरुह लिख रहे है वो अहले वफा का नाम, हम भी खडे हुवे है गुनहगार की तरह' या एकाच गाण्यात मजरुह यांनी आपलं नाव गुंफलं आहे. हे गाणं आणि 'रहते थे कभी जिनके दिल में' हे गाणं यात माझा नेहमी गोंधळ होतो.
----------------------------------------------------------------------------
गणेशोत्सवातच्या मिरवणुकीत सगळ्यात बीभत्स डान्स करणारं मंडळ कुठलं यांची एक स्पर्धा ठेवली पाहिजे. अलकाच्या चौकात आपल्या चड्डीचं इलॅस्टिक पुढे ताणून धरुन त्यातून मोदक काढून वाटल्यासारखी अॅक्शन करत नाचणारा एक तरुण काही वर्षांपूर्वी मी पाहिला होता. असले 'आऊट ऑफ दी बॉक्स' विचार करणारेच समाजाला पुढे नेत असतात . या तरुणांना पुढे योग्य दिशा मिळत असेल की नाही कुणास ठाऊक!
-----------------------------------------------------------------------------
लाह्याच्या पिठाचा लाडू खाऊन कित्येक वर्षं झाली. गूळ घातलेल्या दुधात लाह्याचं पीठ भिजवलं की झाला लाडू. लाह्यांची भाजलेली चव फार मस्त लागते.
----------------------------------------------------------------------------
स्त्रीपुरुषांचे अनैतिक संबंध ही काही अचानक फोफावलेली चळवळ नाही. साठीच्या दशकात एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना नायकाच्या आईचं काम करणार्या नटीला नायकाचं काम करणार्या नटाकडून दिवस गेले होते म्हणे. 'जिस देश में गंगा बहती है' च्या शूटिंगदरम्यान पद्मिनीबरोबर मजा करायला मिळावी म्हणून तिच्यावर पाळत ठेवणार्या तिच्या आईला देण्यात येणार्या दुधात राज कपूर झोपेचं औषध टाकत असे म्हणे. 'होटों पे सच्चाई रहती है, जहां दिल में सफाई रहती है' चं चित्रीकरण करताना त्याला या अनुभवाचा उपयोग झाला असेल काय?
प्रतिक्रिया
18 Aug 2010 - 6:29 pm | योगी९००
ट्विटर वर टाकण्याऐवजी इकडे टाकले काय..??
बाकी वाचायला मजा आली..बरीच नवी माहिती कळाली. छोटे लेख कसे लिहावे याचे उत्तम उदाहरण्..एका ओळीचे धागे काढणार्यांसाठी हा एक आदर्श ठरावा...!!!
18 Aug 2010 - 6:28 pm | धमाल मुलगा
काय हो हे रावसाहेब?
सगळं ठीक आहे ना?
-(काळजीत) ध. :)
18 Aug 2010 - 7:09 pm | श्रावण मोडक
अजिबात काळजी नको. रावसाहेबांची जालीय लेखनातून जी ओळख झालेली आहे त्यानुसार काहीही गडबड नाही. शीर्षक बोलकं आहे. मजकुरात काही 'दिशा' आणि 'दशा'ही आहेत, असे वाटतेय.
आता हे वाटणं म्हणजे भर दिवसा होणारे भास असतील तर मात्र मला मेंदू तपासावा लागेल हे नक्की. ;)
आता रावसाहेबांनी येऊन सांगू नये की यात असं काही नाही. नाही तर माझा पोपट व्हायचा.
18 Aug 2010 - 7:33 pm | धमाल मुलगा
हां, मग ठीक आहे.
एकुणच मजकुर त्यांनी फार 'कोसला' आहे त्यामुळं जरा घाबरलो इतकंच.
17 Sep 2010 - 3:55 pm | चिगो
ह्येच...
17 Sep 2010 - 4:57 pm | धमाल मुलगा
खी खी खी! ;)
18 Aug 2010 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकाटाआ
-दिलीप बिरुटे
18 Aug 2010 - 7:05 pm | श्रावण मोडक
अलीकडेच 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' वाचली का?
वरच्या मजकुरात नेमाड्यांचा उल्लेख नसता तरी मी हाच प्रश्न हे वाचून केला असता हे नक्की. :)
18 Aug 2010 - 7:12 pm | मनिष
मेणचट आहे!
लगेच टंकून मोकळे झालात?
मेरुमणी म्हणावे असे ह्यांचे लिखाण...
नॉट उप टू द मार्क सर!
पॉसिबल आहे की मिड-लाइफ क्रायसिस असावा.
जरा पहिलेसारखे लिहा की राव!
18 Aug 2010 - 7:14 pm | धमाल मुलगा
बा मनिषा,
साष्टांग प्रणिपात तुला!
ठार मेलो.
18 Aug 2010 - 7:26 pm | मी-सौरभ
फोटो हार सकट टाकावा काय ?????
18 Aug 2010 - 8:07 pm | स्मृती
झ - का - स!
19 Aug 2010 - 4:53 am | नंदू
झ - का - स!
रावसाहेब,
सार्वजनिक जळ्जळीकडे दुर्लकक्ष करा. अजुन येऊद्या.
नंदू
18 Aug 2010 - 8:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मी मागेच सुचवल होतं कि मि.पा. वर एक वमनकक्ष असावा...
दैनंदिन मळमळ बाहेर काढायला नाही मिळाली तर हे असं होतं मग..
संपादक सो||.. सुचणेचा फेर्विचार करन्यात यावा.पब्लिकला अजिर्न होउन राह्यलं ना भौ!
बाकी...
लाहीपीठ खाउन बरेच दिवस झाले...खरंच...
19 Aug 2010 - 3:55 am | असुर
+१
हे वाचून जाई तैंच्या वमन कक्षाला आमचा जाहीर पाठिंबा!!!
-- असुर (ओके)
19 Aug 2010 - 7:41 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. सामुहीक पान झाल्यावर सामूहिक वमनाचीही सोय पाहीजे.
18 Aug 2010 - 8:12 pm | चतुरंग
'पिकदाणी' असं हवं होतं. बाकी चालू द्या!
(पानवाला)चतुरंग
18 Aug 2010 - 10:47 pm | बिपिन कार्यकर्ते
मला आवडलेलं आहे. नक्कीच.
!!!
18 Aug 2010 - 10:48 pm | बेसनलाडू
वर्षाव आवडला. आणखी बरसत रहा.
(ओलाचिंब)बेसनलाडू
18 Aug 2010 - 10:50 pm | अनामिक
वर्षाव आवडला. पण याला ट्विट म्हणावे का?
18 Aug 2010 - 11:00 pm | चिन्मना
रावसाहेब, हे तुमचे ट्विटस् आवडले. आता नियमित टाकणार का पण?
18 Aug 2010 - 11:23 pm | ऋषिकेश
छे हे काही लिखाण आहे का? उगाच र ला ट जोडायचा. बाकी अशा चार ओळी काय कोणीही लिहील. लोकं उगाच एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचतात झालं. काय तर म्हणे कधी पुलं डोकावतात तर कधी जीए.. साधं ट्वीटरवर खातंही नाही म्हणे यांचं!!!
***अवांतरः असा हा "जळक्यां"चा वर्षाव आवडला :) ***
18 Aug 2010 - 11:33 pm | निशदे
आवडला...........भाग २,३,४,...........करायला हरकत नसावी........येउ द्यात......
19 Aug 2010 - 12:08 am | मुक्तसुनीत
अवांतर धाग्याला अवांतर प्रतिसाद द्यावा काय ;-)
अवांतर १ : http://www.misalpav.com/node/8859 या धाग्याची अंमळ आठवण झाली.
अवांतर २ : "आता सन्जोपराव बास. जीए इत्यादि इत्यादि फिनीतो. वर्षावबिर्षाव बकवास. धाडकन पाण्यात मुटका मारायचा आणि पाणी उडवून मजा बघायची या ट्रिक्सना आम्ही फसणार नाही. सन्जोपराव , यू आर हिस्टरी.!" (कृहघ्या !)
19 Aug 2010 - 12:09 am | वारा
ही सारवासारव कशासाठी काय कळले नाही राव.
(या प्रतिसादाची पुर्ण जबाबदारी आम्च्याकडे राहीली)
हेच आदर्श धरायचे का लोकांनी....
हा नेभळटपणा आहे की पळ्पुटेपणा आहे?............
काय म्हणायच काय आहे?
अस कन्फुज करुन सोडुन द्यायच शोभत का?
विशय काय चाललाय? कोणाच्या मनात काय चाललय याची जबाबदारी तुम्हाला कशासठी? (समस्त संपादक व चालक सभासदांना उद्देशुन)
कोणी तुम्हाला भिती दाखवतय का?
ईतके कमजोर आणि हलके आमचे प्रिन्सिपल आहेत का?
काही फरक पडत नाही हो....मजा घ्या...तुमच कोणीही काहीही बिघडवु शकत नाही.नुसते मनाचे खेळ आहेत..
19 Aug 2010 - 2:03 am | घाटावरचे भट
आंय???
19 Aug 2010 - 2:22 am | राजेश घासकडवी
संज्ञाप्रवाह नदीच्या ओघाप्रमाणे न वाहाता आजकालच्या साउंडबायटी, ट्वीटरी संस्कृतीला साजेसा थेंबाथेंबाने येतो. पावसाच्या माऱ्यापेक्षा एखाद्या जर्मन डिझाइनच्या शॉवरहेडप्रमाणे, नियमित कोरलेल्या थेंबतुकड्यांनीच म्हणा ना. मग अनुभूतीच कातरली जाते. आणि हाती येतो तो अशा आठवांचा, निरीक्षणांचा, तक्रारींचा, विचारांचा वर्षाव.
या लेखावरूनच स्फूर्ती घेऊन एक (वर्षाव) माझाही....
19 Aug 2010 - 6:48 am | नंदन
--- असेच म्हणतो. बाकी मदनमोहनबद्दलची माहिती नवीन असली तर फारसं आश्चर्य वाटलं नाही.
19 Aug 2010 - 9:54 am | वेताळ
लिहित चला.. तुमचे लिखाण वाचायला आवडते .
19 Aug 2010 - 10:06 am | दिपक
वर्षाव का ढगफुटी..?
19 Aug 2010 - 10:19 am | समंजस
छान! आवडलं! नेहमी पेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीचं लिखाण(संजोपरावांच्या इतर लिखाणांच्या तुलनेत)
19 Aug 2010 - 10:46 am | नगरीनिरंजन
मीना प्रभू, नेमाडे, कणेकर या बाबतीत बाडिस.
'माझं लंडन', 'डॉलरच्या देशा' वगैरे लिखाणातून आपल्या कियासू* प्रवृत्तीचं किळसवाणं प्रदर्शन करणारे प्रभू आणि कणेकर आणि केवळ इतराना उच्चरवात तुच्छ लेखून मोठेपणाचा आभास निर्माण करणारे नेमाडे यांना लेखक म्हणणे म्हणजे कारकुनाला गणपती म्हणण्यासारखे आहे.
-(मळमळ होत असलेला) नगरीनिरंजन
*कियासू => मूषकदौडीत आघाडीवर राहण्यासाठी जीवाचं रान करण्याची प्रवृत्ती.
19 Aug 2010 - 10:51 am | निखिल देशपांडे
वर्षाव नक्कीच आवडला
19 Aug 2010 - 10:59 am | विसुनाना
या लेखातला 'मी' अनेकांच्या मनात लपून बसलेला असतो. काही लोकांमध्ये तो अधिक उघडपणे दिसतो. काही लोकांमध्ये छुपा असतो. असा नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यामागे 'नैराश्य' असावे.
'अहंगंड + न्यूनगंड + नैराश्य' यांचं संमिश्रण दाखवणारा हा लेख एक आरसा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अस्वस्थ करणारे लेखन.
19 Aug 2010 - 11:53 am | मन१
मस्तच...
विस्कळित पण मोकळे, टप टप पडणारे विचार...
कुठल्या थेंबाचा म्हणाल तर कुठल्याशीच संबंध नाही.
आणि म्हणाल तर कुठलाच थेंब दुसर्यापासुन वेगळा नाही.
अनुभवणारा "तो" आणि टप टप पडणारा "तो" एकच एक...
रुप वेगळ , आकार वेगळा...
आतला "तो" तोच...
19 Aug 2010 - 11:57 am | अर्धवट
सहमत..
पण 'तो' कॉपीराइट चा उल्लेख राहिला काय ;)
26 Aug 2010 - 11:23 am | विसोबा खेचर
मस्त.. :)
हे जबरा.. :)
वर्षाव - भाग २ ची आतुरतेने वाट पाहात आहे,
तात्या.
26 Aug 2010 - 11:59 am | रामदास
हा एक प्रयोग असेल तर तो यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही असे वाटते .
आता अशा फॉर्मॅटमध्ये जे लिखाण होते त्याला इंग्रजीत काय म्हणतात ते धनंजय सांगतील किंवा त्यांनी सांगावे अशी विनंती.
मला बिझीबीच्या (बहराम काँट्रॅक्टर) यांच्या शनिवारच्या कॉलमची आठवण झाली.
फॉर सॅटरडे फ्यु स्ट्रे थॉट्स ...ऑल माय ओन वर्क... अशी सुरुवात करून अशा पद्धतीने पुढचे लिखाण व्हायचे.
तरीपण रावसाहेब, तारा जुळलेल्या दिसत नाहीत. एकदा जाणत्या माणसाकडून जवारीचे काम करून घ्या म्हणजे लेख मागच्या बाजूने बाहेर पडलेल्या ब्रेसियरच्या पट्टीसारखा वाटणार नाही .
26 Aug 2010 - 7:45 pm | प्रदीप
चे लिखाण बहारदार असायचे. तो आणि त्याचा बोल्शेक की काहीतरी नाव असलेला कुत्रा.. त्याकाळी आफ्टरनून कधी एकदा घेतो आणि बिझी बी चा कॉलम वाचतो असे व्हायचे. पण ते लिखाण हलकेफुलके असायचे, रावांचे अलिकडील बरेचसे लिखाण -- हे धरून- कळकट्ट होऊ लागले आहे असे वाटते.
17 Sep 2010 - 6:23 pm | विनायक प्रभू
असाच प्रयोग रामदास भौ नी केला तर बहार येइल.
26 Aug 2010 - 2:28 pm | विजुभाऊ
'मी लहानपणी दूध पीत असे' या वाक्यात 'मी' च्या जागी 'तू' हा कर्ता केला तर हे वाक्य कसे होईल असा प्रश्न आम्ही लहानपणी ज्यालात्याला विचारत असू. 'तू लहानपणी दूध पीत होतास' असे उत्तर आले की खदाखदा हसत एकमेकांना टाळ्या देत असू. तर मग 'मी लहानपणी दूध पीत होतो' चे रुपांतर काय असा दुसरा प्रश्न असे. 'तू लहानपणी दूध पीत असस' हे बरोबर उत्तर कुणालाच देता आले नव्हते.
"तू लहानपणी दूध प्यायचास " हे योग्य आहे
'तू लहानपणी दूध पीत असस'
तुम्हाला "पीत असे" असे म्हणायचे आहे काय? उदा तू लहानपणी दूध पीत असे त्यावेळेस ....... अशा प्रकारचे वाक्य तयार होऊ शकेल. "असस " हे क्रीयापद मराठीत तरी प्रथमच ऐकीवात आले.
बाकी रामदासांशी पट्टीत सहमत
17 Sep 2010 - 6:13 pm | दत्ता काळे
वर्षाव आवडला.
तरीपण रावसाहेब, तारा जुळलेल्या दिसत नाहीत. एकदा जाणत्या माणसाकडून जवारीचे काम करून घ्या म्हणजे लेख मागच्या बाजूने बाहेर पडलेल्या ब्रेसियरच्या पट्टीसारखा वाटणार नाही .
- ह्याबाबत 'तारा कश्या जुळलेल्या नाहीत' हे श्री. रामदास ह्यांच्याकडून वाचायला आवडेल.