कहाणी सोमवारची
आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ? मी येऊ? असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही, त्या भितीने तो वाळू लागला. तेंव्हा गुरुजींनी विचारले, "खायला-प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का ?
"खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करुन येते वेळेस मला कोणी तरी 'मी येऊ? मी येऊ? असं म्हणतं, मागे पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते.
गुरुजी म्हणाले, "भिऊ नको, माग काही पाहू नको ! खुशाल त्याला ये म्हण! तुझ्यामागून येऊ दे !
मग शिष्याने काय केले ? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला, "मी येऊ ? असा ध्वनी झाला. "ये ये" असा जबाब दिला. मागे काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला.
गुरूजींनी पाहिले, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचे लगीन लावले. त्यांना एक घर दिले. त्यानंतर काय झाले ?
श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, "माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको !"
आपण उठला, शंकराचे पुजेला गेला, हिने थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला.
"अगं अगं दार उघड !"
पुढचे ताट पलंगाखाली ढकलून दिले, हात धुतला, दार उघडले, पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असेच झाले, असे चारी सोमवारी झाले.
सरता सोमवार आला. रात्री नवल झाले, दोघेजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. "हा उजेड कशाचा ? ताटी भरल्या रत्नांचा! ही रत्न कुठून आणली ? ती मनात भिऊन गेली.
"माझ्या माहेरच्यांनी दिली."
"तुझ माहेर कुठे आहे ?"
वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल!" पतीसह चालली, मनी शंकराची प्रार्थना केली, 'मला अर्ध्या घटकेचं माहेर दे!'
ते वेळूचे बेट आले, मोठा एक वाडा आला, कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली, दासी बटकी राबताहेत, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवणं झाली, सासूसासर्यांची आज्ञा घेतली, घरी परतली.
अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला, तेंव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत, एक वेळूचे बेट आहे, तिथे हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला.
नवर्याने विचारले, "इथलं घर काय झाल ?"
"जसं आलं तसं गेलं. अभाय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं, त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपुर्ण झाली." जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां-आम्हांला पावो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
टिप :
ह्या कहाण्या पुरातन असतात. प्रत्येकाला त्यातील विचार पटतात असे नाही. पण ह्या कहाण्या वाचताना त्या केवळ पुरातन कहाण्या आहेत हे लक्षात घेउन त्यावर शंका कुशंकांच्या पोस्ट टाकू नका ही विनंती आहे. ज्यांना आवडतील व नावडतील त्यांनीही ह्यातुन फक्त चांगला बोध घ्यावा हा हेतु आहे.
प्रतिक्रिया
16 Aug 2010 - 2:36 pm | मृगनयनी
धन्यु!!!!!!!... गं जागु! :)
खूप दिवसांनी वाचली मी ही कहाणी!.... खूप छान वाटलं! मनापासून धन्यवाद!
___________________________
आणि "कहाणी" बरोबरच "टीप" सुद्धा खूप आवडली! :)
सर्व (सूज्ञ) मिपाकर त्याचे पालन करतील... अशी आशा आहे! :)
___________________________
जागु, इफ यु डोन्ट माईन्ड..... उद्या मन्गळागौरी"ची कथा वाचायलाही आवडेल आम्हाला...... :)
16 Aug 2010 - 2:49 pm | llपुण्याचे पेशवेll
या कहाण्या माझी आजी एका विशिष्ठ लयीत वाचायची. :) मस्तं वाटायचं ऐकताना.
16 Aug 2010 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त कहाणी, आधी पोथ्यांबरोबर असलेल्या कुठल्याशा पुस्तकात वाचल्याचे अंधुकसे आठवते. पुन्हा एकदा उजाळा मिळाला, धन्यु ग तै :)
अवांतर :- "आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी.." ह्या पहिल्याच वाक्याला नानाची आठवण झाली.
16 Aug 2010 - 3:07 pm | जागु
अग टायपायला वेळ मिळाला तर नक्की उद्या टाकेन नाहीतर नंतर टाकेन.
16 Aug 2010 - 3:16 pm | मृगनयनी
हो चालेल गं! पाऊण श्रावण महिना अजून बाकी आहे! ;)
तुला श्रावण महिन्याच्या मन्गलमय शुभेच्छा! :)
16 Aug 2010 - 3:26 pm | सूड
छान, टायपायला वेळ मिळाला तर श्रावणातल्या इतर कहाण्या पण लिहीणे. ( विशेषत: पिठोरीची, कारण या कहाणीत उल्लेख झालेल्या साती आसरा म्हणजे नक्की कोण हे मला कळतच नाही. जमल्यास ते सांगणे )
16 Aug 2010 - 3:32 pm | परिकथेतील राजकुमार
साती आसरा म्हणजे पाण्याजवळ राहणार्या सात अप्सरा, ज्या लोकांना पाण्यात उडी मारुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात असा काहीसा उल्लेख प्रियालीतैच्या एका धाग्यावर वाचल्याचे आठवते.
16 Aug 2010 - 3:39 pm | सूड
पण हा धागा जरा सांगाल का ? अधिक महिती मिळेल, कारण पिठोरीच्या कहाणीत याच सात आसरा ब्राम्हणाच्या सुनेला मुलं मरु नयेत म्हणून व्रत सुचवतात असा उल्लेख आहे.
16 Aug 2010 - 3:43 pm | परिकथेतील राजकुमार
सापडला बॉ धागा.
हा घ्या.
16 Aug 2010 - 8:43 pm | मदनबाण
विशेषत: पिठोरीची, कारण या कहाणीत उल्लेख झालेल्या साती आसरा म्हणजे नक्की कोण हे मला कळतच नाही. जमल्यास ते सांगणे
साती अप्सरा हे सातही अप्सरा असे आहे.
नागकन्या,देवकन्या सातही अप्सरा घेउन शंकराच्या पुजनासाठी येतात असा उल्लेख त्या कथेत आहे,ही कथा एका गरीब ब्राम्हण स्त्रीची आहे जिची सातही मुले दगावलेली असतात...
17 Aug 2010 - 12:59 pm | सूड
असेल कदाचित, मी वाचलेल्या या कहाणीत, झोटिंगाची बायको त्या ब्राम्हणाच्या सुनेला सांगते की ," नागकन्या,देवकन्या साती आसरांसह शंकराच्या पिंडीची पूजा करतील, खिरीचा नैवेद्य दाखवून 'अतीथ कोण' म्हणून विचारतील " इत्यादि.
17 Aug 2010 - 1:32 pm | मदनबाण
@ सुधांशु तुम्ही म्हणत आहात तोही भाग त्या कथेत आहे.
कहाणी हा लोकवाड;मयाचा एक प्रकार आहे,धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा म्हणजे कहाणी...
अशा कहाण्यांमधे नेहमी एक असते आटपाट नगर अशी सुरुवात असते ( आट = रुंद ,पाट = लांब ) थोडक्यात बर्यापैकी मोठे नगर.
अशा बर्याच कहाण्या आहेत...उदा.कहाणी गोप्द्माची, कहाणी पाच देवांची,कहाणी धरित्रीची,कहाणी दिव्यांच्या अवसेची,कहाणी सोमवारची (खुलभर दुधाची),कहाणी सोमवारची (शिवामुठीची),कहाणी सोमवारची (फसकीची),कहाणी मंगळागौरीची,कहाणी शुक्रवारची (जिवतीची) (या जिवतीची श्रावणात पुजा देखील केली जाते.). इं.
16 Aug 2010 - 3:54 pm | सूड
स्पष्टीकरण कमी आहे, पण माझ्यासाठी तसदी घेतल्याबद्दल धन्यवाद !!
17 Aug 2010 - 12:24 am | प्रियाली
साती आसरा म्हणजे सात अप्सरा. आसरा हे पाण्यात बुडून मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या (बाळंतीण?) बाईचे भूत मानले जाते. रात्री बेरात्री फिरणार्या मुसाफिरांना भुलवून हे भूत त्यांना पाण्याशी घेऊन जाते आणि बुडवून मारते असे म्हटले जाते. अप्सराही पाण्यापाशी राहत असे उल्लेख मिळतात म्हणून यांना आसरा असे नाव पडले असावे. सात आसरांचे पूजन करण्याची प्रथा आहे. त्या साती आसरा. साती आसरा या दुय्यम दर्जाच्या देवता आहेत. त्यांचे पूजन थोडेसे काळी जादू वगैरे प्रकारातील असावे.
17 Aug 2010 - 12:52 pm | सूड
धन्यवाद
16 Aug 2010 - 7:43 pm | वेताळ
बाकी पुर्वीचे देव आताच्या देवांपेक्षा खुपच प्रेमळ होते म्हणायचे.
16 Aug 2010 - 8:22 pm | मनिम्याऊ
''मस्त कहाणी, आधी पोथ्यांबरोबर असलेल्या कुठल्याशा पुस्तकात वाचल्याचे अंधुकसे आठवते''
'भक्तिमार्गप्रदिप' हे या पुस्तकचे नाव.
कहाणी वाचुन मन परत बालपणात गेले...
17 Aug 2010 - 12:50 am | Pain
ज्यांना आवडतील व नावडतील त्यांनीही ह्यातुन फक्त चांगला बोध घ्यावा हा हेतु आहे.
या गोष्टीतून नक्की काय बोध घ्यायचा ? चांगला किंवा वाईट ते नंतर ठरवता येईल.
17 Aug 2010 - 12:52 am | प्रियाली
तळ्यावर आंघोळीला गेलात तर पोरगी गळ्यात पडण्याची शक्यता आहे - हा बोध कसा आहे?
17 Aug 2010 - 1:56 am | Pain
हेहे! आवडला :)
त्या बहीण्-भावाच्या गोष्टीत ती आपले दागिने पाटावर काढून ठेवते आणि मग त्यांचे डोळे उघडतात तस या गोष्टीतून काहीच अर्थबोध होत नाही. किंवा यातील पात्रे कशाचे रूपक म्हणून वापरली आहेत का किंवा कसे अस माझा प्रश्न आहे.
(अवांतरः या कथेत मी येउ असे विचारणारी मुलगी होती आणि देवतांशी संपर्क साधणारी वगैरे.
विरुद्ध उदाहरण म्हणजे धारपांच्या अशोकानंदाच्या समर्थकथेत दरवाजा वाजवल्याचा आवाज येउन कमल सिद्धमूर्ती आत यायला सांगते आणि तो आकार आत येउन तिचा जीव घेतो )
17 Aug 2010 - 9:02 am | llपुण्याचे पेशवेll
ती दागिने पाटावर काढून ठेवते. याचा अर्थ असा आहे की पूर्वी जेव्हा ती बहीण निष्कांचन होती तेव्हा तिला भावाच्या घरात मान नव्हता. पण जेव्हा तिच्याकडे पैसे आले तेव्हा तिला मान मिळाला. म्हणजे तिच्या भावाने बहीणीला नाही तिच्या सांपत्तिक स्थितीला जास्त महत्व दिले. दागिने पाटावर काढून ठेवण्यात अर्थ हाच होता की भावाला दाखवून देने 'तू माझ्यावर मी तुझी बहीण माया केली नाहीस तर या माझ्या संपत्तीवर माया केलीस."
"त्यामुळे पैसा नसेल तर सख्खा भाऊ सुधा मान देणार नाही म्हणून वैभवलक्ष्मीचे व्रत करा आणि संपन्न व्हा" असा त्या कथेचा बोध आहे.
17 Aug 2010 - 9:27 am | Pain
धन्यवाद. हे मला व्यवस्थित माहिती आहेच.
मी उदाहरण दिलेल्या गोष्टीप्रमाणे या धाग्यातील गोष्टीचा अर्थ काय / त्यातून काय बोध घ्यावा असा माझा प्रश्न आहे.
17 Aug 2010 - 9:30 am | शिल्पा ब
कदाचित शंकराची पूजा केल्यावर तो कसा प्रसन्न होतो ते सांगायचे असेल कथेत..
17 Aug 2010 - 9:56 am | Pain
पटत नाही.
मी उदाहरण दिलेल्या गोष्टीचे तात्पर्य "पैसा नसेल तर सख्खा भाऊ सुधा मान देणार नाही" हे सहज सिद्ध करता येण्यासारखे, समाजात आपल्याला पाहता येण्यासारखे आहे.
पण या गोष्टीतूल प्रथमदर्शनी जे निष्कर्ष काढता येतात ते चुकिचे, अॅबसर्ड, निरर्थक असे आहेत. पण लेखक / लेखिका मात्र चांगला बोध घावा असे म्हणतो/ म्हणते. तो काय असावा?
17 Aug 2010 - 10:04 am | शिल्पा ब
गोष्ट समजुन ज्याचे त्याचे निष्कर्ष ज्याने त्याने काढायचे...तुम्हाला काय निष्कर्ष वाटतोय..
आणि पूर्वीच्या काळची गोष्ट आहे...देवाची पूजा करा देव पावेल एवढं लोकांना कळलं कि झालं..
हे तुम्हाला कळलं तर ठीक नाही तर बसा तुलना करत..ह्या गोष्टीत असं अन त्या गोष्टीत तसं
17 Aug 2010 - 2:03 pm | Pain
उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा निष्कर्ष पटत नाही आणि तुम्ही तो सिद्ध करू शकत नाही. असो.
मी लेखक आणि इतर सदस्यांची वाट बघेन.
17 Aug 2010 - 12:52 am | अर्धवट
च्यायला.. करतय काश्मीर धाग्याचं.. झाड बघा रे..
17 Aug 2010 - 1:13 pm | सूड
धाग्याचं काश्मीर म्हणजे काय रे भाऊ ?? ( औत्सुक्यापोटी विचारत आहे, थट्टा होऊ नये ही अपेक्षा)
17 Aug 2010 - 1:03 am | आत्मशून्य
जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां-आम्हांला पावो.
17 Aug 2010 - 7:55 am | स्मिता_१३
छान ग जागुताई !
17 Aug 2010 - 11:58 am | जागु
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
मी टिपेत आधीच लिहील होत की ह्यावर शंका कुशंका नको. त्यामुळे मी अजुन लिहीले तर अजुन फाटे फुटतील.
17 Aug 2010 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार
शंका कुशंका वाल्यांना मरु देत !
तु पुढच्या कथा लिहायला घे बरं.
17 Aug 2010 - 1:16 pm | बिपिन कार्यकर्ते
खूप दिवसांनी वाचली ही कहाणी. लहानपणी श्रावण म्हणजे फुल्टू धमाल असायची. दर सोमवारी अर्धा दिवस सुट्टी. घरी फराळाच्या पदार्थांची रेलचेल असायची. आजी असताना सगळं अगदी साग्रसंगित असायचं. दिव्याच्या अवसेला ओवाळणं वगैरे आणि मग ते तुपाच्या वातीचा हलकासा जळका वास लागलेले पुरण वगैरे खायचं. आजी मागे न बघता 'अतिथ कोण?' विचारायची आणि आम्ही 'मी' म्हणून ओरडायचो... बर्याच वर्षांनी आठवतंय हे सगळं.
माझ्या पुरतं तरी या सगळ्या कहाण्या बहुतेक बोधकथा सारख्याच घेतो मी. विशेषतः ती बहिण भावाची कहाणी ज्यात ती बहिण सगळे दागिने काढून पाटावर ठेवते. न कळत्या वयात ऐकलेल्या या कहाणीने माझ्या मनावर कायमचा परिणाम केला आहे, अगदी खोलवर.