चंद्रकोरीपरी कोवळें हासणें
कोणत्या कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन काव्यात केले नाही ? सर्व काव्यालंकारांचा उपयोग खरे तर त्यासाठीच. ( सुवर्णालंकार परवडत नाहीत म्हणून म्हणून तर कवींनी उपमा-उत्प्रेक्षा यांना काव्यालंकार असे गौरवावयास सुरवात केली नाही ना ? प्रियेला अर्पण करावयास खिशाला चाट नाही) तरीही प्रत्येक कवी वर्णनात आपली खासियत दाखवावयाचा प्रयत्न करतोच. वसंत बापटांच्या संस्कृत अभ्यासाचा व मराठी लावणीच्या बाजाचा त्यांच्या पुढील कवीतेत मनोहर संगम झालेला दिसून येतो.
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें, पारिजातकाचे ओठ
आहे-नाहीं असें पापणीकांठाला लागले काजळबोट
करपल्लवीला अशोकपानांचा नाजुक बसंती रंग
दक्ष वक्षावरी आस्तिक स्वस्तिक, सावध सांवळें अंग
अभिसारासाठीं जरा झगमग असूं दे धुसर वेषा ...
यौवनाच्या उंच लाटांना कशाला बंदिस्त लक्ष्मणरेषा ?
सैरभैर वाटा निर्जन रानांत, मनांत वादळी हवा ...
पंख फुलारून कधीं घुमायाचा घुमा हा माझा पारवा ?
कळी मौनमुग्ध, अनोखा सुगंध,राखणकुशल कांटा
तरीहि बुल्बुल चुंबून गेल्याचा होणार आहे बोभाटा
अशा क्षणासाठीं अक्षय पुण्याची करावी कुरवंडी सये
दान देतेवेळीं हिशेबठिशेब भल्यानें पाहूंच नये !
वदनाला चंद्राची उपमा देणे आता काही आल्हाददायक वाटत नाही, अतिपरिचयाद. पण हासणें, तेही चंद्रकोरीप्रमाणें कोवळें यात एक नवी सुचना द्यावयाची आहे. चंद्राचे किरण कोवळेंच, पण चंद्रकोर म्हणण्यात त्या चंद्राचे उमलते वय दाखवले आहे. नायिका नवयौवनसंपन्न आहे हे अगदी सुरवातीपासूनच सुचवावयाचे आहे; सांगावयाचे नाही. पारिजातकाचा नैसर्गिक रंग,आहे-नाहीसे काजळ, रंग सावळा असला तरी तळहातांचा अशोकपल्लवीचा बसंती रंग (नाही, मी चुकलेलो नाही, करपल्लवी व अशोकपल्लवी सारखीच नाजुक आहेत), दक्ष वक्ष, सारे सारे तेथेच लक्ष वेधत आहेत. पण तरीही खरी गम्मत पुढच्या विशेषणात आहे. सावध. ती अल्लड/अजाण आहे, म्हणूनच सावध आहे. खैर. उद्या तीही "जाणती" होणार आहेच पण आजघडीला तरी ती "सावध" आहे.
दुसर्या कडव्यात कवी तिला काही सुचना करत आहे, काही प्रश्न स्वत:ला विचारत आहे. अभिसारासाठी वेष धुसरच पाहिजे, तिला माहित नसेल म्हणून सल्ला व त्या बरोबरच जरा झगमग असली तरी चालेल ही सवलत. तर हा पारवा "घुमा" आहे, त्याचे पंख फुलवावयाचे असतील तर मनातील वादळी हवेला , सैरभैर वाटांना थोडा आवर घालावयास पाहिजे हे स्वत:लाच बजावत आहे.
ही दोन कडवी झाली अभिजात संस्कृतची पडछाया. तिसरे कडवे मात्र खास मर्हाटमोळी आहे. कळी मुग्ध आहे, प्रणयसुगंध तिला अजून माहित नाही आणि कोणीतरी जाणकार "आत्याबाई" तिच्यावर नजर ठेऊन असणार हे सर्व कवी जाणून आहे .तरीहि "तारुण्यसुलभ" बोभाटा होणार आहे याची त्याला खात्री आहे. म्हणूनच तो मोठ्या मानभावीपणाने तिला सल्ला देत आहे, " जाऊं दे, दान देतांना कसला विचार करतेस ? पुण्य अक्षय असले तरी अशा क्षणासाठीच त्याचा विनियोग करावयाचा असतो." पहा. या कडव्यात लावणीकाराला साजावे असे रोखठोक सल्ले ( व कठोर वर्णही ) आले आहेत !
१९६२ च्या " अकरावी दिशा" या काव्यसंग्रहात ही कविता आहे. पण त्या आधीच कॉलेजमध्येच आम्हाला ती पाठ होती. आजही आहे, पण थोड्या फरकाने. दुसरी ओळ
"आहे-नाही असे काजळ पिऊन धुंदीत पापणीकांठ "
अशी म्हणत होतो व पुस्तकातही तसे लिहून ठेवले आहे. आता मासिकात (सत्यकथेत ?) ती तशी असावी कां ? आणि नंतर संग्रह करतांना बदलली गेली ? बापटांना विचारावयाचे राहून गेले. आपणास काय जास्त उचित (Fit) वाटते ?
शरद
प्रतिक्रिया
10 Aug 2010 - 6:44 pm | चित्रा
रोमँटिक कविता. लावणीसाठी थोडी जास्त संस्कृतप्रचुर वाटते का?
अजिबात माहिती नव्हती.
शरदकाकांकडून अशाच कवितांच्या ओळखी होत राहोत.
10 Aug 2010 - 7:14 pm | अर्धवट
जंगी सहमत..
मला 'आहे-नाहीं असें पापणीकांठाला लागले काजळबोट' हेच उचीत वाटतय..
10 Aug 2010 - 7:18 pm | प्रसन्न केसकर
विषेशतः खानदानी बैठकीची लावणी. लावणी ही छंदोबद्ध गेय रचना असते एव्हढेच बंधन तिला आहे. ते मात्रागणवृत्त आहे. लावणी शॄंगारिकच हवी, उत्तान हवी असेही नाही. बर्याच लावण्या आध्यात्मिक असतात त्यांना भेदिक असे म्हणतात.
11 Aug 2010 - 3:05 am | बेसनलाडू
लावणी संस्कृतप्रचुर असण्याबरोबरच उत्तान नसलेली असू शकते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नटरंग चित्रपटातील 'अप्सरा आली' हे उत्तान नसलेल्या लावणीचे उदाहरण म्हणून मान्य व्हावेसे वाटते.
(अनुत्तान)बेसनलाडू
10 Aug 2010 - 8:35 pm | क्रेमर
दक्ष वक्षचा अर्थ काय असावा?
10 Aug 2010 - 10:10 pm | धनंजय
वशीकरण करणारी कविता. आवडली.
एक शंका : लावणीत साधारणपणे मात्रागणवृत्त असते ना? येथे अक्षरवृत्त दिसते आहे. (६+६+६+२)
अर्थात शरद यांनी हिला लावणी म्हटलेच नाही असे आता लक्षात आले. आशयाबाबत लावणीचा बाज + संस्कृतचा अभ्यास अशी वेगळीच कविता आहे, असे कदाचित म्हटलेले आहे.
11 Aug 2010 - 3:06 am | बेसनलाडू
लेखन, कवितेचे रसग्रहण, विवेचन - जे काही म्हणाल ते - आवडले.
चंद्रकोरीपरी कोवळे हासणे यातून जेव्हा प्रेयसी हसली तेव्हा तिच्या सुहास्य वदनाला प्राप्त होणारा चंद्रकोरीसारखा आकारही सुचवायचा आहे का (खालील चित्रात दर्शविल्याप्रमाणे), असा विचार मनात आला.
पारिजातकासारखे ओठ म्हटल्याने कोवळेपणा, नाजुकता त्यांतूनही प्रतीत होतेच आहे. चंद्रकोरीप्रमाणे, चंद्रकलांप्रमाणे उन्नत होणारे वय, स्वभाव यांबद्दलचे तुमचे स्पष्टीकरण मान्य आहे.
(हसरा)बेसनलाडू
15 May 2020 - 7:30 pm | अनुस्वार
अकरावी दिशा ही संपूर्ण कविता वाचायला मिळेल काय? मूळ कविता संग्रहाची छपाई बंद झाली आहे.
धन्यवाद.
15 May 2020 - 9:51 pm | गणेशा
आहे-नाही असे काजळ पिऊन धुंदीत पापणीकांठ
हे जास्त योग्य वाटते आहे..
कारण,
सये.. काजळ नाजुकसे लावलेस तू,
ते काजळ जणू तुझ्या पाणीदार डोळ्यांनी पिऊन
ते पापणी काठ धुंदीत आहेत
असा अर्थ होतो.
मला हाच आवडला.
----------==
आहे-नाहीं असें पापणीकांठाला लागले काजळबोट
यात ही जरी तसाच अर्थ असला तरी काजळ पिऊन धुंद असणारे पाणी दार डोळे यातून व्यक्त होत नाहीत.
फक्त थोडेसे काजळ लागलेल्या पापण्या तुझ्या असेच सांगितले जाते.
म्हणून आधी सांगितलेली ओळ, जी तुम्ही आधी म्हणत होता तीच या काव्याची जास्त शोभा वाढवते..
काहींना रोख ठोक काव्य आवडते त्यांना दुसरी ओळ जास्त आवडू शकते..
कविता भारीच.