कुंडलीने घात केला

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
8 Aug 2010 - 8:10 pm

कुंडलीने घात केला

कसा कुंडलीने असा घात केला
दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

असे वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला

विचारात होतो, अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला

खुली एकही का, इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?

पटू संसदेचा, तरी दांडगाई
म्हणू का नये रे तुला रानहेला?

दिशा दर्शवेना, मती वाढवेना
कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला?

"अभय" चेव यावा अता झोपल्यांना
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला

गंगाधर मुटे
...................................................
(वृत्त-भुजंगप्रयात)

कवितागझल

प्रतिक्रिया

पॅपिलॉन's picture

8 Aug 2010 - 11:31 pm | पॅपिलॉन

कविता ठीक. पण महाशय, वृत्त - भुजंगप्रयात असे लिहिण्यापूर्वी दुसरी ओळ तरी पुन्हा तपासून पहायची होतीत की! वृत्ताची वाट लागली आहे तिथे!

दिशा शोधण्यातच् - असा अपेक्षित उच्चार असावा.
अर्थात - हे जर खरे नसेल, तर वृत्त चुकलेले आहे. श्री. मुटे यांचे वृत्त तसे बाकी चोख दिसते, म्हणून असा अपेक्षित उच्चार मानून घ्यायला हरकत नाही.

त्याच प्रमाणे "असे वाटते की शिखर् गाठतो मी", वगैरे.

श्री. मुटे यांच्या उच्चारानुसारी मात्रा मोजण्याचे अनुमोदन करतो.

(वृत्ताचे नाव लिहिले नसते तरी चालले असते. सहमत.)

गंगाधर मुटे's picture

9 Aug 2010 - 8:13 am | गंगाधर मुटे

श्री धनंजय

उच्चारानुसार मात्रा मोजणे- सहमत. धन्यवाद.

गंगाधर मुटे's picture

9 Aug 2010 - 8:12 am | गंगाधर मुटे

श्री पॅपिलॉन

दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

यात वृत्त कुठे गडबडले, ते कळले नाही.

सुनील's picture

9 Aug 2010 - 8:50 am | सुनील

माझ्या आठवणीप्रमाणे भुजंगप्रयात हे अक्षर वृत्त असून त्याची प्रत्येक ओळ ही लगागा लगागा लगागा लगागा अशा स्वरूपात (१२ अक्षरे) यायला हवी. हा नियम लावला तर, वर पॅपिलॉन म्हणतात त्याप्रमाणे फक्त दुसरी ओळच नव्हे तर, तिसरी, सातवी आदि ओळीदेखिल ह्या वृत्तात बसत नाहीत, असे दिसते.

बाकी, अक्षर वृत्ते ही फारच नियमबद्ध असल्यामुळे तीत कविता करताना बर्‍याच ओढाताणी कराव्या लागत असाव्यात. साहजिकच, मनातील भावना व्यवस्थित मांडणे हे कठिण होत असणार. ह्यावर मात्रा वृत्त हा उपाय योग्य.

परंतु, आजकालच्या कवींना मात्रा वृत्तात लिहिणेदेखिल त्रासाचे वाटत असावे, कारण जो उठतो तो मुक्तछंदात लिहितो.

वास्तविक, मुक्तछंदात लिहिणे हीदेखिल एक कला आहे, जी फार थोड्यांनाच जमते. बाकीचे उगाच गद्यात लिहून वर मुक्तछंदात लिहिले असे म्हणतात!

गंगाधर मुटे's picture

9 Aug 2010 - 9:52 am | गंगाधर मुटे

भुजंगप्रयात हे अक्षर वृत्त असून त्याची प्रत्येक ओळ ही लगागा लगागा लगागा लगागा अशा स्वरूपात यायला हवी.
हे खरे आहे.
आणि वरील प्रत्येक ओळ
लगागा लगागा लगागा लगागा आहेच.

(दोन लघु मिळून एक गुरू होतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.)

धनंजय's picture

9 Aug 2010 - 12:15 pm | धनंजय

गणिताबद्दल असहमत.
(तुमच्या कानाच्या उत्तम लय-जाणिवेबाबत दोष नाही.)

अक्षरवृत्तांत दोन लघु मिळून एक गुरू होत नाही. (ते मात्रावृत्तांमध्ये होते. जर ४ मात्रांचा गण असेल, तर तो तुम्ही कसाही बनवा लललल, गालल, लगाल, ललगा, गागा . इथे म्हणू शकता की ४ लघू= २ गुरू.)

ह्रस्वापुढे जोडाक्षर आले, तर तो लघू नसून गुरू असतो.
तुम्ही लिहिले आहे
> दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला
मात्र त्याचा उच्चार होतो :
> दिशा शोधण्यातच्चुभा जन्म गेला
= दिशाशो धण्यातच् चुभाजन् मगेला
= लगागा लगागा लगागा लगागा

मात्र येथे चुकले :
> हरेक पथ येथे कुणी हडपलेला?
मराठी स्वभाषक असा कोणीही येथे "लगागा लगागा लगागा लगागा" वाचणार नाही.
> हरेकप्थ येथे कुणी हड्पलेला?
छेछे!

अधोरेखित ठिकाणी एकच लांब ध्वनी मलातरी मराठमोळ्या पद्धतीने म्हणता येत नाही. येथे तुमच्या उत्तम कानाचे तुम्ही ऐकले नाही. चुकीच्या गणितामुळे कानावर कुरघोडी केली.

गंगाधर मुटे's picture

9 Aug 2010 - 2:03 pm | गंगाधर मुटे

शतप्रतिशत सहमत.

पण चुकीच्या गणितामुळे कानावर कुरघोडी केली.

यापेक्षा

आशयाने लयीवर कुरघोडी केली, असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

कारण आता बदलत्या काळात कविता म्हणजे आशय प्रथमस्थानी आणि लयबद्धता द्वितीयस्थानी ठेवणे आवश्यक आहे.

नाहीतर कवितेची सर्वअंगे तंतोतंत पाळण्याइतपत प्रतिभा तरी असावी लागते.

त्यामुळे आपल्या मर्यादा राखून लिहीतांना ही तडजोड स्विकारावी लागते. थोडीफार सुट घ्यावी लागते..

आपल्या विवेचना बद्दल आभारी आहे.