हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा
स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा
कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा
जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला
एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा
किती खोल मी अजून जावे मनात माझ्या
कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा
उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी
चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा
अता एकदा संपावी काव्याची वेणा
मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 7:38 pm | llपुण्याचे पेशवेll
हम्म .. थोडेसे विस्कळीत वाटले. हा विस्कळीत पणा आपल्या विमनस्क मनःस्थितीदर्शक असावा का?
(तळ शोधणारा)पेशवे
6 Aug 2010 - 7:45 pm | अर्धवट
+१
6 Aug 2010 - 7:53 pm | मेघवेडा
सहमत आहे. संवेदनशील वाटणारं काव्य चौथ्या कडव्याला (कडवंच ना? का आणि काही शब्द आहे?) भरकटल्यासारखं वाटलं. उगाच जबरदस्ती रांगेत बसवल्यासारखं वाटलं ते.
बाकी 'जन्म-मरण या दोन मितीच्या प्रतला'बद्दल जाणून घ्यायला आवडेल. कल्पना छान आहे मात्र योग्य वाटत नाही आहे. पटत नाही आहे.
6 Aug 2010 - 9:22 pm | प्रभो
मला जास्त काही समजत नाही तरिही..
(शिकाऊ) प्रभो
6 Aug 2010 - 7:43 pm | चतुरंग
अतिशय सुंदर गजल! :)
हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा
स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा
मतल्यातच एकदम गार!
(स्वप्नलिपीतला)चतुरंग
6 Aug 2010 - 8:13 pm | फुस्स
गझल कशी असावी ? ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
-(आला का आवाज) फुस्स
6 Aug 2010 - 8:15 pm | निखिल देशपांडे
ह्म्म..
थोडेसे विस्कळीत वाटले खरे..
6 Aug 2010 - 9:20 pm | लिखाळ
सुंदर गजल,
मतला, ट्विटर, निष्कर्ष आवडले.
7 Aug 2010 - 3:49 am | मिसळभोक्ता
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला
एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा
केशवसुमारांच्या विडंबनातून कट-पेस्ट झालेले दिसते.
हे वगळल्यास बाकी छान. फक्त शेवटी "दंगा" ऐवजी "गुंता" छान वाटले असते.
7 Aug 2010 - 9:16 pm | धनंजय
अनेक द्विपदी आवडल्या, पण असेच काही वाटले.
तरी अ.अ. परत आल्याबद्दल आनंद वाटतो.
11 Aug 2010 - 12:24 am | अनिरुद्ध अभ्यंकर
मिभोशेठ, धनंजयशेठ,ओगलेशेठ,
प्रतिसादाबद्दल आभार..
मध्ये राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यात ट्विटर वर आयडी काढण्यात जी चुरस लागली होती त्यावरून हा शेर सुचला होता... विडंबनातला वाटला :( हरकत नाही..
शब्दांनी भंडावून सोडणे हा अर्थ अपेक्षीत होता म्हणून 'दंगा' वापरला गुंत्या मध्ये भंडावणे असा अर्थ अभिप्रेत होत नाही असे वाटले..
7 Aug 2010 - 8:13 pm | अविनाश ओगले
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला
एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा
केशवसुमारांच्या विडंबनातून कट-पेस्ट झालेले दिसते.
असेच म्हणतो.
बाकी झकास.
11 Aug 2010 - 12:25 am | अनिरुद्ध अभ्यंकर
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर