(कै . कवी बोरकर आणि त्यांचे वाचक , मागितली तरी क्षमा करणार नाहीतच , म्हणुन मग क्षमा न मागताच लिहीतो.)
माझ्या 'गोव्या'च्या पुडीत,
गड्या, तुतारी वाजते,
नसानसातून जणू ,
ब्रम्ह फुगडी खेळते.
माझ्या संभाजी बिडीत,
झाले केवड्याचे श्वास,
फुले मेंदूत मोगरा,
दिवेलागणीचे भास,
माझ्या मनाच्या मातीत,
फुले तंबाखूचे मळे,
झाले आभाळ चुन्याचे,
दाढेआड चंद्र खेळे.
माझ्या रस्श्याच्या वाटीत,
मटणाचा महामेरू,
पोटा लागली तडस,
चला फुलचंद मारु.
माझ्या जगत्या कुडीत,
आले माहेराला सारे,
घ्यावा जीवाचा जोगवा,
सारी उघडली दारे.
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 12:13 am | लिखाळ
हा हा हा .. मस्त..
गोव्याच्या पुडीत, दाढेमागचा चंद्र वगैरे मस्तच :)
अम्म्ह !!
3 Aug 2010 - 12:13 am | चतुरंग
माझ्या संभाजी बिडीत,
झाले केवड्याचे श्वास,
फुले मेंदूत मोगरा,
दिवेलागणीचे भास,
हे एकदमच रापचिक! ढिंगच्याक! ;)
(माणिकचंद)चतुरंग
3 Aug 2010 - 12:17 am | प्रभो
नसानसातून जणू ,
ब्रम्ह फुगडी खेळते.
काटा कविता रे.......
-प्रभो घोडावत
3 Aug 2010 - 12:23 am | मी-सौरभ
माझ्या मनाच्या मातीत,
फुले तंबाखूचे मळे,
झाले आभाळ चुन्याचे,
दाढेआड चंद्र खेळे
माज्यासाठी पन थोडी घे अन् वाईच चुना जास्त टाक :)
3 Aug 2010 - 12:25 am | केशवसुमार
अडगळशेठ,
एकदम ज ह ब ह र्या हा कविता..
काय वर्णन केले आहे.. हा हा हा..
अजून येऊ दे..
(साधा पान कत्री सुपारी इलाईची खुषबू )केशवसुमार
3 Aug 2010 - 12:50 am | केशवसुमार
माझ्या फेणीच्या ग्लासात
गडे स्वर्गीचे अमृत,
पुढे बाईच्या आशेने
सार्या-बेवड्यांचे हात||
3 Aug 2010 - 1:07 am | क्रेमर
संगमनेरहून जातायेता दिसणारी दोन सुवचने आठवली.
तुझ्या इतकाच प्यारा मला गाय छाप जर्दा.
3 Aug 2010 - 7:10 am | नाटक्या
मी चुकून माझ्या 'माव्याच्या' पुडीत वाचले... पण कविता संपुर्ण वाचल्यावर एकंदर काही फरक पडला नाही हे लक्षात आले.. लगे रहो :-)
3 Aug 2010 - 7:45 am | निरन्जन वहालेकर
जबरी विडम्बन ! लगे रहो अडगळ भाई ! ! !
माझ्या एकशेवीस-तीनशेत
खोल दरियाचा भास
धूलीवंदनाचा दिस नाही आज
झाली मोठी पंचाईत.
3 Aug 2010 - 9:55 am | बहुगुणी
माझ्या गुटख्याच्या पुडीत
रात्र सकाळी जागते
पोखरून हे शरीर
वर व्याजही मागते
एक दोनच बिडीत
लागे केवढी ती धाप
घर निघाले मोडीत
दुरावले मायबाप
गेले आयुष्य मातीत
पान-तंबाखूचे ठेले
झाले लिंपण चुन्याचे,
दाढेआड दु:ख गळे.
वीसा-वीसाच्या नोटेत
वाहे वारूणीचा वारू
कुठे भागली तहान
आता कुणा हाक मारु?
गेला जन्म हा बुडीत
बसे काळजाला मार
कसा छातीचा रोग हा
रया बिघडली पार
किती सांगू, कुणा कुणा
अरे नको रे व्यसने
काही क्षणांचे हे वेड
उधळून टाकी जिणे
3 Aug 2010 - 9:57 am | प्रभो
शेरास सव्वाशेर!!
4 Aug 2010 - 3:15 pm | Nile
हेच म्हणतो.
विडंबने म्हणुन दोन्ही छान. एक व्यसनेची चटक दाखवणारं, दुसरं व्यसनाचे परिणाम!
3 Aug 2010 - 10:28 am | विंजिनेर
_/\_
दाहक वस्तुस्थिती. :(
अडगळ भाऊ तुमची विडंबन प्रतिभा बहरत राहो पण व्यसनांचा असा मस्करीतूनही उदो उदो करू नका.
इतर विडंबकांना लोक सांगून थकले. तुम्ही नवीन आहात. कदाचित ऐकाल. बाकी "पिणारे पितातच" ह्या युक्तिवादाचा चावून झालेला चोथा मला पुन्हा बघायची इच्छा नाही
3 Aug 2010 - 1:00 pm | लिखाळ
वा .. मस्तच :)
3 Aug 2010 - 10:14 am | आजानुकर्ण
श्री. अडगळ,
विडंबन फार आवडले.
3 Aug 2010 - 12:30 pm | अवलिया
जबरा !
3 Aug 2010 - 7:21 pm | पाषाणभेद
काटा किर्र रापचीक
4 Aug 2010 - 3:10 pm | महाबळ
विडंबन छानच ...तंबाखु किमान एक महिनाभर मुखात न पडल्याचा परिणाम...
पण बरच आहे...व्यसनापरी व्यसन पण सुटेल आणि चांगलं विडंबन पण वाचयला मिळेल...
लोभ आहेच ...वाढत रहावा,
----------------------------------------
आपला कृपाभिलाषी
महाबळ
4 Aug 2010 - 3:11 pm | महाबळ
विडंबन छानच ...तंबाखु किमान एक महिनाभर मुखात न पडल्याचा परिणाम...
पण बरच आहे...व्यसनापरी व्यसन पण सुटेल आणि चांगलं विडंबन पण वाचयला मिळेल...
लोभ आहेच ...वाढत रहावा,
----------------------------------------
आपला कृपाभिलाषी
महाबळ
4 Aug 2010 - 8:53 pm | नाना बेरके
माझ्या जगत्या कुडीत,
आले माहेराला सारे,
घ्यावा जीवाचा जोगवा,
सारी उघडली दारे.
4 Aug 2010 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अडगळ आणि बहुगुणी दोघांचीही विडंबनं झक्कास!
6 Aug 2010 - 9:08 pm | गंगाधर मुटे
छान विडंबन.