ऑगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अन् तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मैतरांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा!
एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते. या आठवणी आयुष्यभर पुरतात, वेळी अवेळी स्मरतात अन् कधी कधी त्या मैत्रीसाठी छानशा ओळीही स्फुरतात. तर अशी ही मैत्री अवीट गोडीची, अजोड जोडीची अन् अनिवार ओढीची..
या मैत्रीने आम्हांस काय दिलं? मित्रत्वाचं मोठ्ठं सर्कल दिलं, मित्रप्रेम चिरकाल दिलं अन् शाश्वताचं भान हरकाल दिलं. मित्रांनी जशा चांगल्या गोष्टी दिल्या तशा वाईट वाटाही दाखवल्या. काही मित्र सोवळे होते तर काही फार निराळे होते. काही 'असे' होते, काही 'तसे'. 'अशां'च्या जवळ जातांना बिकट वहिवाट दिसायची तर 'तशां'च्या सान्निध्यात धोपट मार्गाने जाऊन चुकणं व्हायचं, तरीही पुन्हा धडपडत वाटेवर यायचं, यात कमालीचा रोमांच होता. जीवनपथाचा प्रत्येक मैल असल्या अविस्मरणीय दगडांनी पूर्ण झालाय...
मैत्रिणीही होत्या! खळाळून हसणाऱ्या, मुळुमुळू रडणाऱ्या, कोणाच्यातरी आठवणींत कुढणाऱ्या. त्यातील काही अकालीच विखुरल्या, काही अज्ञातवासात शिरल्या तर काही आजपर्यँत पुरून उरल्या! त्या आजही फोन करतात, आयुष्याची उजळणी मांडतात, 'ते दिवस मजेचे होते' असेही अश्रू त्या कधीकधी सांडतात. त्यांना धीर देणं हे एकच काम आता उरतं. हे आयुष्य असंच बेफिकीरपणे पुढे संपत जातं याची जाणीव करून द्यावी लागते. परंतु तरीही त्या सर्वांची उणीव प्रकर्षाने जाणवत रहाते. वाटतं, ही मैत्रीही खूपच परिक्षा पाहते...
आणि त्या सर्व परिक्षार्थींना मैत्रदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात! देऊ यात...
प्रतिक्रिया
1 Aug 2010 - 1:53 pm | गोगोल
त्यापेक्षा तुम्ही डाइरेक्ट प्रसंग / अनुभव का नाही शेअर करत?
आम्ही आपापल्या परिनी जी काही ती अब्स्ट्रॅक्शन्स बनवू.
1 Aug 2010 - 1:59 pm | अप्पा जोगळेकर
अॅब्स्ट्रॅक्ट आहे.
+१
कोणीतरी ओव्हरराईड करा ना.
1 Aug 2010 - 8:10 pm | डावखुरा
गोपाळ गणेश आगरकर हे टिळकांचे अत्यंत घनिष्ठ मित्र होते..त्यांनी अनेक कामे एकत्र केली.त्यानी सुखातच नव्हे तर दु:खातही एकमेकांना साथ दिली."सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय?"असा लेख आगरकरांनी वृत्तपत्रात लिहिला होता.सरकारविरुद्ध ईतक्या जळजळीत भाषेत लेख लिहिल्याने आगरकरांना शिक्षा होणार,याची कल्पना टिळकांना होती.आगरकर प्रकृतीने अशक्त असल्याने तुरुंगवास त्यांना पेलवणार नाही, हेही टिळकांना माहिती होते. म्हणुन वृत्तपत्राचे संपादक या नात्याने ती जबाबदारी स्वतःवर घेउन टिळकांनी तुरुंगवास भोगला आणि आपल्या मैत्रीचे पांग फेडले.
1 Aug 2010 - 9:11 pm | बिपिन कार्यकर्ते
ही नविनच माहिती कळली. हा अग्रलेख टिळकांचाच आहे असे म्हणले जाते. या बाबत काही पुरावा आहे का?