सप्तपर्णी
सप्तपर्णीच्या झाडाकडे पाहावे तो अचंबा वाटतो. बुंधा तर इतका मोठा, की दोन हात पसरून कवेत घ्यावे तरी शक्य नाही. जुन्या देवरायांमधले हे वृक्ष शाश्वततेची प्रतिके असल्यासारखी पाय रोवून उभी. प्राचीन देवराई, त्यात असा प्रचंड वृक्ष. सप्तपर्णीच्या बुंध्याशी बसून राहावे. अश्या भल्या वृक्षांखाली बोध होत असतो.
उंच झाडांखाली वाढलेल्या गडद पानांच्या वनस्पती आणि बराचसा पाचोळा. पाचोळ्यावर एखादे पान पडावे आणि तळ्यावरल्या संथ पाण्यावर तरंग उमटावे तसे आपल्या मनावर उमटावेत. जमीन मात्र सर्वकाही धारण करते. स्तब्ध असते. अगदी झालेच तर नव्या अंकूरांना थोडे अवकाश मो़कळे करून देते.पण तो तर नियमच आहे.
मनाकडे पाहताना सप्तपर्णीसारखे कुणीतरी स्तब्धपणे, साक्षीत्वाने पाहणारे भासते. विचारांची पार्श्वभूमी असते जमिनीसारखी स्तब्ध पण विचारांच्या हालचालींना, त्यांच्या वाढीला आधार देणारी. जमिनीमधून लवलवणारी वेल वाढावी आणि सप्तपर्णीच्या बुंध्यावरच चढू लागावी अशी विचारांची गती. साक्षित्वाने पाहणाराही कधी गुंतून जाईल कळत नाही. त्या वेलींचे अवकाश वेळीच सीमित केले नाही तर त्यांचीच महती जास्त. मग सुटका नाही.
सर्वसाक्षी वृक्षाच्याही मागे असणारा आणि या सर्वांना अन्न देणारा सूर्य कोण? त्याचाच प्रकाश सर्वत्र पसरला आहे. लख्ख दिसत आहे.
-- लिखाळ
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 6:37 pm | शुचि
छानच.
27 Jul 2010 - 6:37 pm | अवलिया
लिहिलय छान. पण पटकन आटोपतं घेतलं असं झालं.
संगती एखादा फटु डकवला असता तर गोमटं वाटलं असतं
27 Jul 2010 - 6:59 pm | गणपा
अगदी असच म्हणतो.
27 Jul 2010 - 7:33 pm | प्रभो
असेच म्हणतो.
27 Jul 2010 - 7:28 pm | मन
मनोज्ञ मुक्तक आवडल.
28 Jul 2010 - 2:13 am | राजेश घासकडवी
काव्यात्म लेखन. पानांच्या गर्दीतून एखादा प्रकाशाचा कवडसा यावा व त्याने स्वत:ची छोटीशी भूमी प्रकाशित करून टाकावी तसं.
अजून थोडं लिहावं ही विनंती.
28 Jul 2010 - 11:50 am | लिखाळ
स्फुट लिहिण्याचा छोटासा प्रयत्न करुन पाहिला. आपल्याला आवडला हे पाहून बरे वाटले.
मनाचे निरिक्षण करणारा जीव म्हणजे सप्तपर्णी , त्याचे मन म्हणजे जमीन आणि सूर्य म्हणजे परमात्मा असे रूपक योजले होते.
30 Jul 2010 - 4:28 pm | स्पंदना
सुन्दर मुक्तक.
30 Jul 2010 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच. अगदी परत परत वाचावे आणि नवनवीन अर्थ उलगडावेत असं लिखाण. एक नवीनच लिखाळ दिसला. मस्तच. अजून लिही.
31 Jul 2010 - 3:21 am | धनंजय
छानच!
मात्र उपमा समजलीच असे म्हणता येत नाही.
येथे सप्तपर्णी => साक्षीत्वाने पाहाणारा,
की
सप्तपर्णी => साक्षीत्वाने पाहिली जाणारी वस्तू
हे नीट लक्षात आलेले नाही.