वर्ष होते १९८४. पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची संधी आणि महानगराची भीती अशा दोन कुबड्यांवर लंगडत मी पुण्यात आलो. संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत पहिले काही दिवस गेले. जन्माने पुणेकर नसलेल्यांबद्दलची पुणेकरांची तुच्छता समजून घेण्यात नंतरचे काही दिवस गेले. त्यानंतर वर्गातल्या सहकार्यांनी त्यांच्या गप्पांमधे सहभागी व्हायची परवानगी दिली. त्यांच्या गप्पांमध्ये 'अरे, आज स्कॅन्डल इन बोहेमिया वाचली...',' नेव्हल ट्रेटीला तोड नाही...', 'क्रीपिंग मॅन काहीतरीच आहे हं...', 'माझी आवडती म्हणशील तर यलो फेस...' असं काहीतरी त्यांचं बोलणं सुरु असे. एकदा धाडस करुन हे काय आहे असं विचारल्यावर हे सर आर्थर कॉनन डॉईल यांच्या शेरलॉक होम्सच्या कथांबद्दल आहे हे कळालं. 'कम्प्लीट शेरलॉक होम्स' हे त्या वेळी शंभर रुपयांना मिळणारं पुस्तक त्या वेळी आमच्या वर्गातल्या एका मुलाकडं होतं, आणि ते असं आळीपाळीनं फिरत असे. होम्सकथांची मी आजवर भाषांतरं वाचली होती. मुळातून होम्सकथा वाचणं हे आपल्याला पेलणारच नाही अशी जवळजवळ खात्रीच होती. मग एकदा कधीतरी ते खूप लोकांच्या हातांखालून गेलेलें पुस्तक माझ्या हाती आलं. 'डॉग इयर्ड' म्हणतात तसं झालेलं. ते वाचायला घेतलं आणि त्यात पार हरवून गेलो. इंग्रजीशी परिचय होता, पण ही इंग्रजी म्हणजे भलतीच होती. होम्सही माहितीचा होता, पण या पुस्तकातला होम्स वेगळाच होता. मग झपाटल्यासारखा ते उसनं घेतलेलं पुस्तक वाचत राहिलो. कधीतरी हातात पैसे आले, तेंव्हा स्वतःची प्रत विकत घेतली. मग जेंव्हा जेंव्हा शक्य झालं , तेंव्हा लोकांना या पुस्तकाच्या प्रती भेट म्हणून दिल्या. होम्सकथा पुन्हापुन्हा वाचल्या, त्यांच्यावर चर्चा झाल्या, एकूण आनंदीआनंद झाला.
नंतर कधीतरी दूरदर्शनवर रविवारी सकाळी ग्रॅनडा टेलीव्हिजनतर्फे सादर केल्या होम्सकथा बघायला मिळाल्या. जेरमी ब्रेटचा होम्स पाहिला आणि खरा होम्स असता तर तो असाच असता असे वाटून गेले. तरतरीत नाकाचा, भेदक डोळ्यांचा आणि होम्ससारखाच कमालीचा तीक्ष्ण पण संपूर्ण विक्षिप्त होम्स. स्त्रीदाक्षिण्य आणि मार्दवाचा पुतळा असलेला होम्स. रोमान्ससारख्या कल्पनांना कंटाळणारा, पण तर्क आणि सत्य यांच्या जोडीला आपली विलक्षण बुद्धिमत्ता लावून दुर्जनांचा नि:पात करणारा होम्स. ब्रेटचा होम्स भलताच आवडला. डेव्हिड बर्कचा आणि एडवर्ड हार्डविकचा, दोघांचाही वॉटसन आवडला , एरिक पोर्टरचा प्रोफेसर मोरिआर्टी आवडला, मायक्रॉफ्ट आवडला, मिसेस हडसन आवडल्या, २२१ बी, बेकर स्ट्रीटचे ते घर आवडले आणि 'Once you eliminate the impossible, whatever remains, no matter how improbable, must be the truth. ' हे तर फार म्हणजे फारच आवडले. आधी वाचताना आवडले होतेच, पण आता पुन्हा आवडले. मग रविवारी सकाळी आपापल्या घरात होम्सकथा बघायची आणि ती संपली की पॅराडाईजला येऊन चहा पितापिता त्यावर चर्चा करायची असे काही आठवडे मोठे सुखाचे गेले. मग 'स्पेकल्ड बॅन्ड' मध्ये शास्त्रीय सत्य कसे डोळ्याआड केले आहे, 'ससेक्स व्हॅम्पायर'चे नाव का बदलले असावे, 'ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन' कशी भारी आहे या आमच्या चर्चांवर त्या हॉटेलवाल्या इराण्याने एका पिढीला पुरेल इतकी माया गोळा केली असेल.
अलीकडेच या होम्सकथांच्या डीव्हीडीजचा संपूर्ण संच उपलब्ध आहे असे कळाले, आणि तो मिळवण्यासाठी जंगजंग पछाडले. क्रॉसवर्डमध्ये आपल्याला पाहिजे ते पुस्तक मिळणे म्हणजे दुपारी तीन वाजता चितळ्यांचे दुकान उघडे असण्यासारखेच. बहुतेक भरवशाच्या ठिकाणी लोकांना हे असले काही आहे हे माहितीच नव्हते. म्हटले, ठीक आहे. आता याची मानसिक तयारी करायला हवी. मस्कतमधल्या ब्रिटीश कौन्सिलमधल्या ग्रंथपालिकेला वुडहाऊस म्हणजे कोण हे माहिती नसते. भारतात एम.बी.ए. करणार्या मुलाला शिवकुमार शर्मा कोणते वाद्य वाजवतात हे सांगता येत नाही. 'मोतिलाल' हा अभिनेता लोकांना माहिती नसतोच, पण मोतिलाल नेहरुही माहिती नसतात. म्हटले, ठीक आहे.
हा संच मिळवण्याची इच्छा सहज एका दोस्ताजवळ व्यक्त केली. थोड्या दिवसांनी त्याचा निरोप आला, संच कुरीयरने पाठवला आहे, मिळाला की कळव. मला काय बोलावे ते सुचेना. बरे, किंमतही काही थोडथोडकी नाही. म्हटले, बाबा, पैसे कसे पाठवू कळव. तर हा पठ्ठ्या पैसेही स्वीकारायला तयार नाही. त्याला म्हटलं, अरे असं करु नकोस, तर पाठीवर एक व्हर्च्युअल थाप मारुन म्हणाला, साल्या, पैशाचा माज दाखवतोस काय मला? बघ, बघ. तुला आवडतात ना, तर मग बघ या डीव्हीडीज.
महिनाभर उलटून गेला. पार्सलचा पत्ता नाही. हा म्हणाला, डीव्हीडीज बर्याच वेळा कुरीयरवाले लंपास करतात. बघ आता, तुला मिळाल्या तर नशीब तुझे. नाही मिळाल्या तर ज्याला मिळतील त्याला त्या बघताना बरे वाटेल अशी आशा करुया आपण. नाही का? अखेरीस एक दिवस ते पार्सल मिळाले. त्या डीव्हीडीज कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत, त्या इथल्या डीव्हीडी प्लेअरवर चालतात की नाही या सगळ्या कुशंका दूर झाल्या आणि 'प्ले' बटण दाबल्यावर व्हायोलिनची एक चिरपरिचित सुरावट कानावर आली. एका कोपर्यावरुन एक घोडागाडी वळताना दिसली, रस्त्यात दंगामस्ती करणारी मुले आणि त्यांना दटावणारा 'बॉबी' दिसला. कॅमेरा वर गेला आणि पडदा बाजूला करुन खिडकी बाहेर बघणारा ब्रेट दिसला. त्याने किंचित वळून कॅमेर्याकडे पाहिले आणि त्याच्या सडपातळ अंगकाठीवर, फिकुटलेल्या चेहर्यावर, चापूनचोपून मागे वळवलेल्या केसांवर आणि उंच, सरळ कपाळावर कॅमेरा 'फ्रीज' झाला. पडद्यावर अक्षरे आली 'दी अॅडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स.'
त्या दोस्तासाठी मी ग्लास उंचावला.
अलीकडे संध्याकाळी दमून घरी परत आलो, की काय करावे हा प्रश्न पडत नाही. १९८४ साली चित्रीकरण झालेल्या 'स्कॅन्डल इन बोहेमिया' पासून १९९४ सालच्या 'कार्डबोर्ड बॉक्स' पर्यंत ४१ कथा. आणि ही मर्यादा धरली तरी प्रत्येक कथा किती वेळा बघावी याला मर्यादा नाही. प्रत्येक वेळी ब्रेट अधिकाधिक आवडत जातो, प्रत्येक वेळी आर्थर कॉनन डॉईलला अधिकाधिक कडक सलाम केला जातो. As a rule, the more bizarre a thing is the less mysterious it proves to be. It is your commonplace, featureless crimes which are really puzzling, just as a commonplace face is the most difficult to identify असले काय किंवा I have seen too much not to know that the impression of a woman may be more valuable than the conclusion of an analytical reasoner असले काय... ही वाक्ये मनात मधाचे थेंब टपकावे तशी टपकत राहातात. प्रत्येक कथा प्रत्येक वेळी नव्याने आनंद देऊन जाते. 'दी फॅकल्टी ऑफ डिडक्शन इज सर्टनली कॉन्टॅजिअस' यातल्या 'फॅकल्टी' या शब्दाच्या निवडीत इंग्रजी भाषेची जादू कळत जाते. डॉईल आणि ब्रेट आज जिवंत असते, तर त्यांना घट्ट मिठी मारली असती, असे वाटते.
या होम्सानंदापरता दुसरा आनंद नाही.
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 8:22 pm | क्रेमर
सुरेख प्रकटन. शेरलॉक होम्स वाचतांना हरवल्यासारखे होते. त्या विश्वातून परतावेसे वाटत नाही. असे खूप कमी कलाकृतींबाबत घडते. जेरेमी ब्रेटविषयी पूर्ण सहमत.
शेरलॉक होम्सच्या सर्व कथा जालावर अनेक ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. (एक दुवा)
28 Jul 2010 - 8:31 am | मुक्तसुनीत
सन्जोपराव. क्या बात है. गाडी एकदम फॉर्मात येतेय ! :-)
भारी लेख.
28 Jul 2010 - 10:25 am | विजुभाऊ
मुक्तसुनीत भौ पहिंल्यांदाच या बाबत तुमच्याशी सहमत व्हावे लागतय
:)
27 Jul 2010 - 8:26 pm | नितिन थत्ते
मस्त आढावा.
27 Jul 2010 - 8:31 pm | आवडाबाई
मुळातून होम्सकथा वाचणं हे आपल्याला पेलणारच नाही अशी जवळजवळ खात्रीच होती.
अगदी, अगदी !! मीपण ह्याच कारणासाठी दुर्लक्ष केलंय हो ! आता तुमच्या लेखामुळे वाचायची ईच्छा झालीये !
'कम्प्लीट शेरलॉक होम्स' अजूनही मिळतं का ? हेच नाव?
प्रकाशक कोण ? (बरोबर ओळखलंत, पुण्यात राहते ! ही माहिती असल्यावर मिळायची शक्यता वाढते !)
27 Jul 2010 - 8:45 pm | सन्जोप राव
मला वाटते बरेच आहेत. आता माझ्याकडे जे फक्त शॉर्ट स्टोरीजचे पुस्तक आहे, ते रुपा पब्लिकेशनचे आहे.
27 Jul 2010 - 11:34 pm | मी-सौरभ
मीही आता वाचेन ईंग्रजी ...
मी अनुवाद वाचलेत पन ते शाळेत असताना :(
27 Jul 2010 - 8:35 pm | शुचि
लेखाची भट्टी छान जमलीये सन्जोपराव.
>> तरतरीत नाकाचा, भेदक डोळ्यांचा आणि होम्ससारखाच कमालीचा तीक्ष्ण पण संपूर्ण विक्षिप्त होम्स. स्त्रीदाक्षिण्य आणि मार्दवाचा पुतळा असलेला होम्स. रोमान्ससारख्या कल्पनांना कंटाळणारा, पण तर्क आणि सत्य यांच्या जोडीला आपली विलक्षण बुद्धिमत्ता लावून दुर्जनांचा नि:पात करणारा होम्स. ब्रेटचा होम्स भलताच आवडल>>>>
जेरेमी ब्रेट माझाही अतिशय आवडीचा.
27 Jul 2010 - 8:42 pm | अर्धवट
मलाही मुळातुन होम्स वाचणं अवघड वाटायचं.. पण काही महिन्यांपुर्वी संपुर्ण होम्स चा संच ऑडिओबुक स्वरुपात डाउन्लोड केला आहे... पुढचे काही दिवस तर होम्समय गेले... हे लिखाण खरच कालातीत असावं का?.. पण मूळ कथेच्या १ टक्का पण मजा भाषांतरात नाही ब्वॉ..
अजुनही सहज बोलताना... I am my merely brain Watson!! rest of me is just an appendix अस तोर्यात म्हणावसं वाटतं..
माझी आवडती 'बास्करविल' बाबा
27 Jul 2010 - 8:47 pm | सन्जोप राव
I am my merely brain Watson!! rest of me is just an appendix
असे आपल्याही बाबतीत असावे, असे मलाही वाटते. पण तेवढे कुठले भाग्य!
27 Jul 2010 - 8:48 pm | स्वाती२
मस्त!
27 Jul 2010 - 9:35 pm | पाषाणभेद
होम्स च्या कथा सगळ्याच नाही पण काही वाचल्यात मराठीत. एकदम गुंतून जातो माणूस.
27 Jul 2010 - 9:35 pm | मस्त कलंदर
ब्रेट साठी +१ सहमत... शेरलॉक होम्सच्या कथा म्हणजे खिळवून ठेवणार्या... भाषांतरापेक्षा मूळ वाचणेच चांगले..
मला मध्ये शेरलॉक होम्सच्या क्लासिक सीरीज मधला पार्ट-२ मिळाला होता.. नंतर पहिला पार्ट शोधत असताना आख्खा होम्स एकाच पुस्तकात मिळाला :)
नांवः "क्लासिक शेरलॉक होम्सः कंप्लिट अँड अनब्रिज्ड"
पृ संख्या:११२२
किं: रू ३९९.००
प्रकाशक : पेंग्विन बुक्स
यात अगदी वॅटसन शेरलॉकला पहिल्यांदा भेटतो तेव्हापासूनचा सगळ्या कथा ज्या एकूण नऊ पुस्तकांतून प्रकाशित झाल्या होत्या त्या आहेत. आता एवढं सगळं ११२२ पानांत बसवल्याने फाँट खूपच लहान आहे. हे पुस्तक मला ओडिसी मध्ये मिळाले.
परवा आमच्या इथल्या क्रॉसवर्डमध्ये (जे दुकान अस्तित्वात का आहे असा प्रश्न पडतो कारण तिथे कधीच काही मिळत नाही, अर्थात वरचे पुस्तक तिथे नवह्तेच.. ) तिथे क्लासिक एडिशनमध्ये शेरलॉक होम्सच्या सर्व कथा दोन खंडात असलेल्या दिसल्या. प्रत्येक खंडाची किं. २५० रू. आहे. यातला कागद चांगल्या प्रतीचा आणि फाँटही मोठा आहे.
27 Jul 2010 - 9:43 pm | धनंजय
जेरेमी ब्रेटचा शरलॉक हाच शरलॉक म्हणून मनात बिंबलेला आहे.
(आर्थर कॉनन डॉयलच्या शरलॉकेतर लघुकथा तितक्या प्रसिद्ध नाहीत, पण मस्त आहेत.)
27 Jul 2010 - 10:09 pm | चतुरंग
कॉनन डॉइल ह्याच्या अफलातून कथा आणि ग्रॅनडाचे तितकेच उत्कृष्ट चित्रण ह्यामुळे अतिशय आवडती व्यक्तिरेखा!
ब्रेटबद्दल काय बोलावे? त्याच्यावरुनच होम्स कथा स्फुरल्या असाव्यात की काय असे वाटावे इतके चपखल व्यक्तिमत्त्व!
(माझ्या आवडत्या कथानायकाच्या २२१ बेकर स्ट्रीटला मी भेट दिली होती आणि त्याच्या पुतळ्याचा फोटूही काढलाय. लगेच गावत नाहीये. सापडला की टाकतो.)
(बास्करविल हाउंड्)चतुरंग
28 Jul 2010 - 11:17 am | मस्त कलंदर
मलाही जायचंय एकदा तिथे.. सध्या फक्त नेटावरून त्यांचे म्युझियम पाहिलेय..
27 Jul 2010 - 10:35 pm | तुकाम्हणे
मराठीतून वाचायला नेट वर कुठे मिळेल?
28 Jul 2010 - 12:05 am | आनंदयात्री
अदितीच्या या ब्लॉगवर काही होम्सकथा मिळतील वाचायला.
(ही अदिती म्हणजे ३_१४_विक्षिप्त्_अदिती नव्हे.)
28 Jul 2010 - 5:04 am | शुचि
सन्जोपरावांनी केलेला एक खूप खिळवून ठेवणारा अनुवाद ऑर रादर आधरीत इथेदेखील आहे - http://sanjopraav.wordpress.com/2009/06/15/%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%82-%...
27 Jul 2010 - 10:39 pm | मिहिर
हल्ली फॉक्स हिस्टरी वर पण अधूनमधून लावतात होम्स. तो हाच का?
खरच गुंगून जायला होते होम्स वाचताना.
28 Jul 2010 - 1:12 am | घाटावरचे भट
होय. फॉक्स हिस्टरीवर जेरेमी ब्रेटचाच होम्स दाखवला जातो.
28 Jul 2010 - 12:28 am | राजेश घासकडवी
दूरदर्शनवरची मालिक बघितल्याचं आवडल्याचं आठवतंय, होम्सच्या कथाही पहिल्यांदा वाचताना आवडल्या होत्या. पण माझं तसं प्रेम अगाथा क्रिस्तीच्या प्वॉरॉवर. विद्यार्थीदशेत असताना कित्येक महिने माझा आदर्श सुटीचा दिवस म्हणजे प्वॉरॉची कादंबरी सकाळी लायब्ररीतून घेणे, कुठेतरी ब्रंच हाणणे, हिरवळीवर पहुडल्या पहुडल्या आसपासची समरची वर्दळ पाहाणे, संध्याकाळी कॅफेमध्ये बसून, व नंतर घरी बीअरबरोबर- पुस्तकाची पानं उलगडत त्या कोड्यात अडकत जाणे. ती पुस्तकं संपली तेव्हा मला हळहळ वाटत होती. नंतर प्वॉरॉच्याच लघुकथांवर आधारित सुंदर मालिका चित्रित झाली होती. तीदेखील पुन्हा पुन्हा पाहिली. डेव्हिड सुशे ने प्रचंड ताकदीने ती विक्षिप्त व्यक्तिरेखा उभारली आहे.
हे सगळं तुमचं लेखन वाचल्यामुळे आठवलं. धन्यवाद.
28 Jul 2010 - 12:53 am | आनंदयात्री
वाह .. काय सुरेख दिवस !! स्वप्नवत अगदी !!
28 Jul 2010 - 1:05 am | शुचि
छान लिहीलयत राजेश तुम्ही. पॉइरो मालीका मलाही आवडली. संयत आणि भारदस्त अभिनय.
पण माझा लाडका जेरेमी ब्रेट्चा शेरलॉक होम्स ..... ब्रूडींग, डार्क, इन्टेन्स, ओपिअम घेणारा, मनस्वी ..... अहाहा अणि कलाकार - व्हायलीन काय सुंदर वाजवतो . हा तो जीवघेणा व्हायलीनचा तुकडा. मी हा ऐकताना वेडीपीशी होते.
28 Jul 2010 - 1:13 am | घाटावरचे भट
ग्रेनाडा टेलिव्हिजनचे बरेचसे एपिसोड्स यूट्यूब वर आहेत. जिज्ञासूंनी जरूर पाहावेत.
28 Jul 2010 - 1:59 am | ऋषिकेश
होम्स म्हंजे होम्सच!! जेव्हा तो विचार करतो, बोलतो तेव्हा बाकीचे नुसते पाहात-ऐकत रहातात..
मस्त लेख!!
28 Jul 2010 - 5:13 am | राघव
खूप आवडला लेख. :)
28 Jul 2010 - 7:07 am | शिल्पा ब
लेख आवडला...हल्ली इथे कोणत्यातरी चानलवर असेच एका स्पॅनिश डिटेक्टीवच्या गोष्टी लागतात...नाव विसरले.
28 Jul 2010 - 8:51 am | नगरीनिरंजन
सुंदर लेख!
मी ही 'कंप्लिट शेरलॉक होम्स' ची पारायणं करतच असतो. डॉईलच्या या मानसपुत्रासारखं दुसरं पात्र निर्माण होणे शक्य नाही. एखादी केस आली की उत्तेजित होऊन एखाद्या 'हाऊंड' सारखं त्याचं तहानभूक विसरुन माग घेत फिरणं, त्याची निरीक्षण शक्ती आणि निष्कर्ष काढण्याची त्याची पद्धत, आलेल्या क्लायंटचे निरीक्षण करुन आडाखे मांडणं आणि ते ऐकून क्लायंट आश्चर्याने उडणे वगैरे गोष्टींनी मनावर केलेलं गारुड कधीच कमी होत नाही.
28 Jul 2010 - 9:02 am | प्रचेतस
होम्सकथांचा मराठी अनुवाद 'संपूर्ण शेरलोक होम्स' या नावाने प्रकाशित झाला आहे.
अनुवादक-गजानन जहागिरदार. (किं ७५० रू.)
अनुवाद खूपच सुरेख आहे. जरूर वाचा.
यात सर्व ५६ होम्स लघुकथा आहेत.
पण ४ दिर्घकथांचाचाही (ए स्टडी इन स्कार्लेट, द साइन ऑफ फोर, द हाउंड ऑफ बास्करविलेज आणि व्हॅली ऑफ फिअर) समावेश करता आला असता तर परीपूर्ण झाला असता.
31 Jul 2010 - 4:04 pm | आवडाबाई
धन्यवाद वल्ली दिर्घकथांची नावं दिल्यानद्दल
त्यामुळे शोधून download करायला सोपं गेलं
सध्या ए स्टडी इन स्कार्लेट वाचतीये
आणि आधी ह्या इंग्लिशला घाबरत होतो ह्याचं हसायला आलं :-)
28 Jul 2010 - 10:57 am | स्वाती दिनेश
आढावा मस्तच,
स्वाती
28 Jul 2010 - 2:35 pm | विसुनाना
अनेक पिढ्या 'शेरलॉक होम्स' ने संमोहित केल्या आहेत. या 'काल्पनिक कथा' आहेत यावर विश्वासच बसत नाही.
आर्थर कॉनन डॉयल नामक लेखकाने त्या कल्पिलेल्या नसून डॉ. वॉटसन या प्रत्यक्षातील व्यक्तीने लिहिलेले अनुभव आहेत असे वाटते.
होम्सचे रसग्रहण करणारा हा लेख आवडला.
गंमत अशी की सफाचट शेरलॉक होम्सचा लेखक मात्र स्वतः दिसतो हर्क्युल प्वॉयरो सारखा मिशाळ.
28 Jul 2010 - 11:31 am | सहज
खरच जेरेमी ब्रेट + शरलॉक होम्स समीकरण असे जुळले आहे की इतर कुठला शरलॉक पटत नाही. :-)
मधे नवा शरलॉक होम्स सिनेमा पाहीला अगदी जुन्या शरलॉकशी तुलना करायची नाही व एन्जॉय करायचा ठरवून. ज्या ऑथेंटीक होम्सची ओळख त्या मालीकेमुळे झाली आहे त्याच्याहून सिनेमातला फारच बॉलीवूडी / हटके वाटला. बहुतेक १९८४ मधे तो ग्रॅनडाने आपल्या मनात गोंदवलेला होम्स इतक्या सहज पुसला जाणार नाही.
28 Jul 2010 - 12:15 pm | रामदास
होम्सच्या कथा आधी भाषांतरीत नंतर इअंग्रजीत वाचल्या . याचे सिनेमा रुपांतर बघण्याची इच्छा कधीच झाली नाही.याचे कारण मूळ लेखनाची मनावर असलेली पकड हे असू शकेल. मनोपटलावर असलेला होम्स जर पडद्यावर अपेक्षा भंग करता तर फार वाईट वाटले असते.
किंबहुना वाचलेल्या बर्याच इतर पुस्तकांबद्दल हीच धास्ती असल्यामुळे पडद्यावर कथा बघण्याचे टाळत होतो. उदा: बाँड कथा वाचायला आवडल्या पण सिनेमे नेहेमीच निराश करून गेले.
आता हा लेख वाचल्यावर असे वाटते की तुम्ही एक होम्स कट्टा पुण्यात करावा आणि आम्ही सगळांनी आनंद लुटायल यावं.
28 Jul 2010 - 6:38 pm | सन्जोप राव
यू आर वेलकम साहेब. कळवा. बसू. ब्रेटचा होम्स तुम्हाला आवडणारच, अशी खात्री आहे.
28 Jul 2010 - 7:51 pm | शुचि
कट्ट्याचे फोटो मिपावर चढवावे ही विनंती आणि खास आपल्या शैलीतील वृत्तांत.
28 Jul 2010 - 12:16 pm | मैत्र
मस्त नाव! इतका योग्य शब्दच नाही...
दुर्दैवाने ब्रेटचा होम्स पहायला मिळाला नाही :(
पण लंडनमधली चित्रं, पुतळे यात आणि एकूणात तो अजून थोडा कृश आणि जरासा म्हातारा दर्शवला आहे. वरचा फोटो स्कार्लेटच्या वेळचा तरूण होम्स वाटतो... 'Complete ..' वाचूनच इतकं वेड लावलं आहे इतकी वर्ष की मालिका पहायला तर जबरा वाटेल. आणि भाषांतराला त्या भाषेचा लहेजाच येत नाही त्यामुळे ती सर येतच नाही.
एकच खूप आनंद की बेकर स्ट्रीट स्टेशनला उतरून होम्स चा तो भला मोठा पुतळा - मोठा ओव्हरकोट, त्याची ती विशिष्ट हॅट पाहून जवळजवळ धावत २२१बी बेकर स्ट्रीट शोधलं. त्यांनी मस्त पुण्यासारखा 'नील फलक' लावला आहे.
221b
Sherlock Holmes
Private Detective (Consulting Detective - नक्की लक्षात नाही)
मस्त वाटलं. एक चित्र आहे खाली. आणि आत म्युझियम आहे. जिना उतरून त्याचं घर आहे. ते मात्र उलट वाटतं. कारण होम्स वर राहात होता. अनेक कथांमध्ये खिडकीतून पलिकडच्या फूटपाथवरच्या अस्वस्थ क्लायंटचं निरीक्षण करून त्याचे आधीच आडाखे बांधून आता ही व्यक्ती वर येणार या तयारीत राहण्याच्या घटना आहेत.
होम्स वेड्यांसाठी अनुभव म्हणून खूप सही असला तरी ब्रिटीश पद्धतीनं मार्केटिंग करून पैसे काढण्याचा प्रकार जास्त आहे.
पण क्रिकेटवेड्याला लॉर्डस पाहून जसं भरून येतं तसं वाटलं 221b Baker Street प्रत्यक्ष पाहून...
मस्त लेख !
28 Jul 2010 - 3:29 pm | नंदन
लेख, अतिशय आवडला.
28 Jul 2010 - 3:36 pm | श्रावण मोडक
होम्स फारसा वाचलेलाच नाही. जो वाचला तो असाच आंतरजालावर असलेल्या अनुवादातून. हा लेख मात्र "होम्स वाच," असं सांगणारा निघाला.
28 Jul 2010 - 6:45 pm | प्रभो
आमचं पण असंच आहे... आता घेतो वाचायला.. :)
28 Jul 2010 - 4:01 pm | संजा
शेरलॉक होम्स .
कोणीतरी प्रसिद्ध लेखक दीसतोय !
लेख आवडला.
संजा
28 Jul 2010 - 4:15 pm | बिपिन कार्यकर्ते
मालक, मालक !!!! काय आठवणी काढल्यात तुम्ही... होम्स पहिल्यांदा मला भेटला, मी शाळेत असताना. आठवी मधे वगैरे थोडं थोडं इंग्रजी वाचायचा सराव होत होता. तेव्हा वडिलांच्या तोंडून हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं. मग एक दोन गोष्टी थेट इंग्लिशमधेच वाचल्या. ते भूत अजूनही उतरलेलं नाहीये. उतरेल असं भूत ते नाहीच. त्या नंतर शेरलॉक होम्सच्या कथांचा दोन भागात एक संग्रह निघाला. तो घेतला होता. सगळ्या गोष्टी वाचून झाल्या. ते सालं बास्करव्हिलचं कुत्रं, त्या नाचणार्या बाहुल्यांची अक्षरं, डॉ. वॉटसन सगळंच आवडलेलं. होम्सच्या काही काही सवयी / मेथड्स आज जरा अतिरंजित वाटतात पण... होम्सको सात खून माफ, साला!!!
काही वर्षांपूर्वी माझा त्या शाळकरी वयातला मित्र त्याच्या मुलाला घेऊन लंडनला गेला होता. तेव्हा त्याने त्या २२१ब ला जाऊन त्या दारासमोर फोटो काढून मुद्दाम मला पाठवला होता. लै भारी वाटलेलं मला.
होम्सच्याच बरोबर नंतर ओळख झालेले पेरी मेसन आणि हर्क्यूल प्वॉयरॉ पण असेच मित्र झाले आहेत.
आता एकच करा रावसाहेब... एकदा बसू. डिव्हीडी लावू. आणि ग्लास उंचावून सुरू करू... प्लीज!!! :)
अवांतरः या धाग्यावर प्रियालीच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. होम्स तिलाही आवडतो असे आठवते आहे.
28 Jul 2010 - 4:44 pm | प्रियाली
पण सध्या कम्प्युटर अॅक्सेस फार नसल्याने लेख वाचलेला नाही. वाचला की आवडला की नाही ते कळवते. प्रतिसादांवरून लेख उत्तम असावा असे वाटते. असो.
कोण रे हा मित्र?
28 Jul 2010 - 6:41 pm | सन्जोप राव
आता एकच करा रावसाहेब... एकदा बसू. डिव्हीडी लावू. आणि ग्लास उंचावून सुरू करू... प्लीज!!! :)
कधी म्हणाल तेंव्हा! एकेक बैठकीत एकेक एपिसोड म्हटला तर ४१ बैठका होतील. मोअर दी मेरियर!
28 Jul 2010 - 6:49 pm | क्रेमर
होम्स पाहतांना ग्लासातील द्रव्य पिणे तितकासा चांगला पर्याय नाही (किंवा त्यापेक्षा सरस पर्याय उपलब्ध आहेत) असे नम्रपणे सूचवावेसे वाटते.
28 Jul 2010 - 6:53 pm | सन्जोप राव
होम्स स्वतः जवळजवळ चेनस्मोकर आहे. अल्कोहोलही ते नेहमी घेतो. शिवाय कोकेन.
त्या मानाने होम्स बघताना एखादा ग्लास भरला तर ते क्षम्य ठरावे....
28 Jul 2010 - 8:39 pm | क्रेमर
आणखी अफुही. डॉयलने होम्स पक्का अफिमखोर असल्याचे चित्रण केले आहे. आजच्या काळात होम्सने प्रिस्क्रिप्शनवरच्या औषधांचीही नशा केली असती असे वाटते. होम्सचे एखादे आधुनिक रुपांतरण आल्यास मजा येईल.
तेच ते होम्स बघताना ग्लास भरण्यापेक्षा इतर काही भरल्यास अधिक बहार येईल.
28 Jul 2010 - 6:54 pm | श्रावण मोडक
तुला रे ग्लासांची का काळजी? ते आमचं आम्ही (असं म्हणत या गोटात प्रवेश करतो :)) पाहून घेऊ. हां, आता तिथनं द्रव्य पाठवणार असशील तर गोष्ट वेगळी!!! ;)
29 Jul 2010 - 5:19 am | सन्जोप राव
तिथल्या द्रावांचे आता काही अप्रूप नाही श्रावणसर. हां, आता तिथून द्रव्य पाठवणार असतील, तर मालकांनी तिकडून मनीऑर्डर पाठवली की गुरुजी इकडे एकादष्णी घालतात तसे आपण करु!
29 Jul 2010 - 5:19 pm | श्रावण मोडक
द्रव्यच. द्राव नाही. :) द्रव्य आलं तर द्राव येईलच. :)
29 Jul 2010 - 8:14 am | क्रेमर
श्रामो, का गरीबाची थट्टा करता?
28 Jul 2010 - 4:46 pm | दिगम्भा
रावसाहेब सिद्धहस्त लेखक आहेतच व विषयही भल्याभल्यांना स्फूर्ती देणारा आहे.
त्यामुळे लेखही तसाच सुंदर आणि रसाळ झालेला आहे.
मला वरील प्रतिक्रियांपेक्षा जरा वेगळे सांगायचे आहे.
हल्लीहल्लीच मला होम्सविषयीचा नवा चित्रपट ( २००९) पहायचा योग आला.
बाकी चित्रपट व कथा असायची ती असो पण त्यातले व्यक्तिरेखाटन पाहून एक झटका बसल्यासारखे झाले व पॅराडाइम शिफ्ट का काय म्हणतात त्याची प्रचीती आली.
आणि गंमत म्हणजे ते पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळे असूनही आवडले.
(इथे माझे आणि वरील सर्वांचे अत्यंत भयंकर मतभेद होतील पण प्रामाणिक मत नोंदवतो आहे.)
आपल्याला सवय आहे ती स्टीरियोटाइप्स् ची -
डॉ. वॉट्सन ज...रा बावळ्या व चेहर्यावर काहीसे बुद्दू भाव असणारा, डॉक्टरी सोडून इतर कशाचा गंध नसणारा, होम्सच्या मागेमागे करणारा;
होम्स उंच, सडपातळ,चेहर्यावर बुद्धिमता झळकणारा व दरारा वाटणारा;
आणि इतर असेच होम्सपुढे भारावलेले, जसा लेस्ट्रेड.
पण या नव्या चित्रपटात धक्काच दिला आहे
येथे वॉटसन दिसतो तो देखणा/ स्मार्ट व चलाख, लंडनच्या नागरिकात फिट बसणारा - आणि तो होम्सपेक्षा उंचही दाखवला आहे; (ज्यूड लॉ)
आता यापेक्षा होम्सला वरचढ कसा दाखवणार असा विचार आपण करत असता चित्रपट होम्सकडे येतो - त्याला धीरगंभीर न करता विक्षिप्त जीनिअस दाखवलेचलाख; (रॉबर्ट डाउनी ज्यू.)
अॅक्शन हीरो दोघे आहेतच, पण त्याना लंडनमध्ये स्पेशल हक्क नसलेले सामान्य नागरिक म्हणूनच वावरावे लागते आहे - त्या अनॉफिशियल दरार्याचा मागमूस नाही.
आणि शेवटी लेस्ट्रेड? तो टिपिकल पोलीस इन्स्पेक्टर, त्याला एका बाजूला कधी होम्सला पाठिम्बा देऊन ऑफिशियल श्रेय उपटायलाही काही वाटत नाही नि नंतर तितक्याच साळसूदपणे व थंडपणे होम्सला अटक करायला तो सरसावू शकतो, पोलीसाला डिटेक्टिव्हचा कसला दरारा?
हे लंडनचे व्यवहारी जग आहे, सगळ्या वास्तव गुणदोषांनी भरलेले.
तरीसुद्धा, व्यक्तिमत्वांची मूळ बीजे तीच आहेत
- होम्सचे श्रेष्ठत्व त्याच्या बुद्धिमत्तेनेच सिद्ध होणारे आहे अॅक्शनने नव्हे, आणि वॉटसन स्मार्ट असला तरी मदतनीसच आहे, हीरो निर्विवादपणे होम्सच आहे.
आपल्या स्मरणरंजनातल्या प्रतिमांपेक्षा पूर्णतया वेगळे जग दाखवूनही या होम्सनेही मला जिंकले हे खरे.
मग हे अन्य कोणाला पटो न पटो.
- (एरवी वाचनमात्र)
दिगम्भा
7 Nov 2019 - 3:39 pm | अल्पिनिस्ते
चालवताना आज हा लेख मिळाला. खुप मस्त झालाय.
"Once you eliminate the impossible, whatever remains, no matter how improbable, must be the truth" _/\_
17 Nov 2019 - 12:49 pm | सुमो
अगदी नेमकं.....
काही काळ हीच व्हायोलिन सुरावट माझी रिंगटोन होती.