ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽ

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
19 Jul 2010 - 10:47 pm

माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे. खरं तर मलाही तिच्याबरोबर विठोबाच्या देवळात जायला आवडायचं. बाकीच्या देवळांमधून अंगारा किंवा कुंकू लावायचे तिथले पुजारी. पण एकादशीला विठोबाच्या देवळात गेलं की तिथले बुवा काळा काळा बुक्का लावायचे कपाळाला. आणि अगदी तालासुरात तिथे किर्तन चालू असायचं. ते मोहमयी वातावरण अनुभवत तासचेतास तिथे काढलेले आठवत आहे.

आमच्या घरी वातावरण धार्मिक असलं तरी कर्मकांडांचं स्तोम किंवा कसलीच बळजबरी नव्हती. पण साबुदाण्याची खिचडी, किंबहुना उपासाचे सगळेच पदार्थ आवडत असल्याने एकादश्या आणि चतुर्थ्या कधी येतात त्या आम्हाला बरोब्बर माहिती असायचं. एखादे वेळेस आजी विसरली तर आम्ही आठवण करून द्यायचो. पण खरी वाट बघायची ती आषाढी एकादशीची. त्या दिवशी घरात अगदी कंपल्सरी उपास असायचा. अगदी स्वर्गिय चंगळ असायची.

अशीच एक एकादशी येऊ घातली होती. मी साधारण साताठ वर्षांचा असेन. आजीच्या बोलण्यात पालखी शब्द दोन तीन वेळेला आला. मला पालखी म्हणजे साधारणसे माहित होते. पूर्वीच्या काळी राजेमहाराजे पालखीत बसत आणि त्यांचे नोकर त्या पालख्या खांद्यावर उचलून त्यांना इकडे तिकडे फिरवत. पण आजीच्या बोलण्यात काही वेगळेच संदर्भ येत होते. वारी, पालखी, पंढरपूर वगैरे. काही तरी धार्मिक संदर्भात बोलणे चालले होते हे नक्की. शेवटी आजीला विचारले तेव्हा मला ही एकंदर चालत वगैरे पंढरपूरला जायची पद्धत कळली होती. आळंदीहून ज्ञानोबाची आणि देहूतून तुकोबाची पालखी निघते आणि मजल दरमजल करत आषाढीच्या बेतास पंढरीत पोचतात. गावोगावाहून अशाच दिंड्या निघतात. लोक दिवसचे दिवस चालत पंढरीला जातात. असं सगळं तिने मला अगदी रंगवून सांगितलं. मला तर हे सगळं अगदी अद्भुतच वाटायला लागलं होतं. पण खरी गंमत अजून पुढेच होती. ती अशी...

आमच्या घराण्याचा आणि या पंढरीच्या वारीचा अगदी गाढ आणि प्राचीन संबंध आहे. आम्ही 'कार्यकर्ते' सगळे सोलापूर जवळच्या कुर्डूवाडीचे. खरं तर कुर्डूचेच म्हणले पाहिजे. कुर्डूवाडी हे स्टेशन आहे. आणि तिथून साधारण ३-४ मैलांवर कुर्डू गाव आहे. गावात कार्यकर्त्यांची बरीच घरं आहेत. काही नांदती तर काही ओसाड. आमचे घर त्या ओसाड क्याटेगरीत. आमच्या पणजोबांपासून गाव सुटले ते परत कोणीच गेले नाही त्या वाड्यात. पण दर चार वर्षांनी तो वाडा अगदी जुजबी डागडुजी होऊन का होईना पण उभा राहतो. आमच्या घरातली मंडळी, अगदी चुलत, आत्ते, मामे सगळं गणगोत... तिथं जमतात. चार दिवस वाडा गजबजतो आणि परत शांत होऊन पडून राहतो.

प्रसंग असतो, संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या पालखीच्या आगमनाचा.

आमच्या कार्यकर्त्यांच्या भावकीत आता बर्‍याच शाखा उपशाखा झाल्या आहेत. पण चार मुख्या शाखा आहेत. आणि पालखीच्या स्वागताची आणि मुक्कामातील सर्व व्यवस्थेची जबाबदारी दर चार वर्षांनी आमच्या घरात असते. आमचे घर म्हणजे, आमच्या (बहुधा) खापर पणजोबांचे वंशज. पालखीचं वर्ष म्हणजे सगळ्या नातेवाई़कांनी एकत्र येण्याचं वर्ष. कधी मधी भेटणार्‍या आज्या, आजोबा, काका, मामा, भावंडं यांच्याबरोबर दोन दिवस घालवायचं वर्ष.

हे सगळं मला कळलं तेव्हा बहुधा माझ्या जन्मानंतरची दुसरी पालखी असावी आमच्या घरातली. तेव्हा काही जाणं झालं नाही. पण नंतर १२ वर्षांचा असताना मात्र अगदी झाडून सगळे गोळा झाले होते. तेहा हा पालखी सोहळा पहिल्यांदा बघितला. त्यानंतरही जमेल तसे जमेल तितके लोक पालखीला जातात. माझे काही काका आमचं पालखीचं वर्ष नसलं तरी मदतीला वगैरे म्हणून जातात. मला नाही जमत. पण २००८ साली पालखी आमच्या कडे होती तेव्हा ठरवलंच होतं की या खेपेस पोरींना घेऊन जायचंच जायचं. ज्या वयात मला या सगळ्याचं अप्रूप वाटत होतं त्या वयात आता माझ्या पोरी आहेत. ती सगळी गंमत त्यांना दाखवायचीच. चुलत भाऊ तर पार अमेरिकेतून येणार होता. सगळेच जण असेच कुठून कुठून येणार होते.

पालखी आमच्या कुर्डूला पंचमी किंवा षष्ठीला येते. पण आमची तयारी मात्र बरेच दिवस आधीच सुरू होते. आता आमचं घर असं तिथे नसल्यामुळे सगळंच सामान जमवण्यापासून सुरूवात असते. आमचे काही ज्येष्ठ काका / काकू वगैरे खरंच उत्साही आहेत. दहा बारा दिवस आधी जाऊन वाड्याची साफसफाई करून घेणे, धान्य भरून ठेवणे, येणार्‍या लोकांच्या रहण्याची व्यवस्था करणे वगैरे कामे अगदी नीट प्लॅनिंग करून पार पडतात. हळूहळू लोक जमायला लागतात आणि वाडा तात्पुरता का होईना परत नांदता होतो.

मोठमोठ्या चुलींवर तेवढीच मोठी पातेली दिसायला लागतात. गप्पांचे फड रंगतात. चहाच्या फेर्‍यांवर फेर्‍या होतात. एखादी आजी आमच्या सोलापूरची खास शेंगादाण्याची (नॉन-सोलापुरी लोक शेंगदाण्याची चटणी म्हणतात, पण सोलापूरात मात्र शेंगादाण्याचीच चटणी म्हणतात. :) ) चटणी बनवते आणि जास्तीत जास्त दोन दिवसात तिचा फडशा पडतो.

... आणि बघता बघता पालखीच्या आगमनाचा दिवस येऊन ठेपतो.

पालखी किंवा एकंदरीतच वारी हा प्रकार अगदी जबरदस्त शिस्तशीर आणि अगदी अचूक व्यवस्थापन असलेला असतो. पालखी यायच्या आदल्या दिवशी पालखीच्या व्यवस्थापकांकडून आगाऊ निरोप येतो. त्याही बरेच आधी पालखी नक्की पंचमीला येणार की षष्ठीला येणार ते पण कळवलेले असते. तर आदल्या दिवशी पालखी साधारण किती वाजेपर्यंत येईल, किती माणसं आहेत वगैरे तपशील कळवले जातात. त्याप्रमाणे सगळी तयारी घेतली जाते. आमच्या तिकडे जोडगहू म्हणून गव्हाचा एक प्रकार आहे. पालखीला त्या जोडगव्हाच्या खिरीचा नैवेद्य असतो. ते ठरलेलेच आहे.पण इतक्या लोकांसाठी खीर करायची, ती पण गुळाची हे एक अवघड कामच असते. वाड्याच्या परसात एक भलं मोठं चुलाण तयार करून त्यावर एक अजस्त्र कढई चढवली जाते. खीर पूर्ण पणे तयार व्हायला साधारण पाच सहा तास तरी लागतात. तो पर्यंत ते सगळं मिश्रण सतत ढवळत रहावं लागतं. खूप ताकद लागते. शिवाय हा सगळा स्वयंपाक सोवळ्यात असतो. तीन चार काका लोक यात तज्ञ आहेत त्यांची ड्युटी तीच. शिवाय भावकीतले अजून काही जाणते लोक मदत करू लागतात. एवढ्या सगळ्या लोकांच्या मेहनतीवर ती खीर एकदाची तयार होते.

मग वाट बघणे सुरू होते. सुवासिनी नटतात. बाप्ये लोक ठेवणीतले कपडे घालून उगाच इकडे तिकडे करत असतात. पोरांना हे गाव, वाडा वगैरे सगळं अगदी परिकथेतल्या अद्भुत जगासारखंच वाटत असतं त्यामुळे त्यांचे काही काही उद्योग चाललेले असतात. आजोबा वगैरे दारासमोरच्या मंडपात बसून गपांचे गुर्‍हाळ घालतात. आज्या घरातल्या सुनांचे विश्लेषण करत बसतात. पण हे सगळे वरवरचे. अगदी आतून कधी एकदा पालखी येते आहे याचीच घालमेल चालू असते सगळ्यांच्या मनात.

साधारण सहा सात वाजता सांगावा येतो, पालखी यायलीय हो... एकच गोंधळ होतो. सगळे जण गावाच्या वेशीकडे जायला निघतात. पालखीच्या स्वागताचा मान कार्यकर्त्यांचा. आमच्या घरातले सर्वात मोठे आजोबा नाहीतर काका पालखीला सामोरे जातात. घरातल्या सवाष्ण्या पालखीला पंचारती करतात. पालखीचा थाट तर काय विचारावा. चांदीचा पत्रा लावलेली, त्यात मधोमध नाथांच्या पादुका विराजमान, अशी ती पालखी अगदी भालदार चोपदार आणि छत्रचामरांच्या समवेत दिमाखात येत असते. तुतार्‍या शिंगं फुंकली जातात. एकच कल्लोळ.

पण मला आजही आठवते आहे, अगदी लख्ख आठवते आहे, मी पहिल्यांदा हा सोहळा बघितला तेव्हा मला अगदी खोलवर स्पर्शून गेलं होतं ते हे वैभव थाटमाट नव्हे, तर पालखीच्या संगतीनं चालणारे साधे सुधे वारकरी. टाळांच्या गजरात, मुखाने भजन किर्तन हरिनाम गात अगदी तल्लीन झालेले वारकरी. डोक्यावर तुळशी घेतलेल्या बाया, गळ्यात जाड जाड टाळ मिरवणारे बाप्ये, अंगावर अगदी साधे मळके, क्वचित फाटके कपडे असलेले वारकरी. त्या दिवशी भरपूर पाऊस पडून गेला होता. गावातले मातीचे रस्ते. घोटा आत जाईल एवढा चिखल. पाय रूतत होते. पण त्या सगळ्या पासून खूप दूर, नाथांच्या मानसिक सान्निध्यात देहभान हरपलेले वारकरी. आयुष्यात बरंच काही विसरलो / विसरेन, पण तो क्षण, जेव्हा मला या वारकर्‍यांचं पहिल्यांदा एवढं जवळून दर्शन झालं तो क्षण, मात्र मी मरेपर्यंत विसरणंच शक्य नाही. मला जेव्हा भान आलं तेव्हा मी त्या तालावर पावली घालत असल्याचं माझ्या लक्षात आलं. आजही ते आठवलं की अंगावर रोमांच येतात.

इकडे पालखीला खांदा द्यायला एकच धावपळ होते. प्रत्येकालाच ते भाग्य हवं असतं. पालखीच्या मार्गावर पायघड्या घालत असतात. ती लांबच्या लांब कापडं इतकी शिताफीने बदलली जातात की बघत रहावं. पालखी कुठंही अडत नाही. पालखी हळू हळू मार्ग काढत नागनाथाच्या, कुर्डूच्या ग्रामदैवताच्या देवळात मुक्कामी पोचते. पालखी बरोबर पैठणच्या संस्थानाचे लोक आणि नाथांचे वंशज वगैरे मानकरी असतात. त्यांची व्यवस्था अगदी उत्तम केलेली असते. पालखीच्या बरोबरच्या सगळ्याच वारकर्‍यांची कुठे ना कुठे सोय ठरलेली असते. मुक्कामाला आल्यावर पालखी खाली उतरवली जाते आणि नाथांच्या पादुका बाहेर काढून त्या एका चौरंगावर ठेवल्या जातात.

आता सुरू होतो तो पूजेचा सोहळा. आमच्याच घरातल्या एखादं जोडपं, सहसा मधल्या चार वर्षात लग्न झालेलं जोडपं यजमान म्हणून बसतं पूजेला. अगदी षोडषोपचार पूजा होते. चांगली एक दोन तास चालते. सगळ्यांना मनसोक्त दर्शन घडतं.

नाथांची थोरवी आठवत, त्यांच्या आयुष्यातल्या घटना आठवत, तसं वागायचा प्रयत्न करायचा संकल्प करत नाथांच्या चरणी डोकं ठेवलं जातं. पादुका तर केवळ संकेतस्वरूप. जो पर्यंत संतांच्या जीवनातून आपण शिकत नाही तो पर्यंत तो नमस्कार नुसताच त्या पादुका नामक धातूच्या अथवा लाकडी वस्तूला असतो. त्या वस्तूची तेवढीच किंमत.

आता मात्र खूप उशिर झालेला असतो, आणि लोकांना परत सकाळी लवकर उठून पुढच्या मुक्कामाकडे जायचं असतं. घरातली ज्येष्ठ मंडळी, काका काकू वगैरे, नाथांचे उत्तराधिकारी जिथे मुक्कामाला असतात तिथे त्यांना जातीने जेवायला बोलावणं करायला जातात. तिथे परत थोड्या गप्पा होतात. विचारपूस होते. वर्षभराने भेटी होत असतात. जुने जाणते ख्याली खुशाली विचारतात एकमेकांची. उत्तराधिकार्‍यांच्या पत्नीच्या हातून कुंकू लावून घ्यायला सवाष्ण्या झुंबड करतात. लेकरांना त्यांच्या पायावर घातलं जातं. इतकं दमून आल्यावरही उत्तराधिकारी आणि त्यांच्या पत्नी शांतपणे आणि हसतमुखाने हे सगळं कौतुक करत असतात, करून घेत असतात. एकदाची मंडळी हलतात आणि आमच्या दारासमोरच्या मांडवात खाशी पंगत बसते. प्रत्येक वारकर्‍याचे जेवणाचे घर ठरलेले असते. मुख्य मंडळी आणि मानकरी आमच्याकडे असतात. गावातली प्रतिष्ठित आणि इतर पदाधिकारी मंडळी पण या मानाच्या पंगतीत सामिल असतात. आग्रह कर करून खीर वाढली जाते. खास पोळीचा बेत असतो. अजूनही तिकडे गव्हाची पोळी म्हणजे सण, एरवी भाकरी. जेवणं उरकतात. उशिर बराच झालेला असतो. सगळी आवरासावर करूण मग घरचे लोक जेवायला बसतात. पालखीचा मुख्य ताण गेलेला असतो. पण अजून सकाळचा निरोप समारंभ बाकीच असतो. म्हणून निजानिज लवकर होते.

भल्या पहाटे सूर्योदयाच्या सुमारास पालखी परत सज्ज झालेली असते. गावकरी परत एकदा पालखी भोवती जमतात. सवाष्णी नाथांना ओवाळतात. पालखीच्या मानकर्‍यांच्या बरोबर असलेल्या सवाष्ण्यांची खणानारळाने ओटी भरली जाते. इशारा होतो आणि पालखी झटदिशी परत एकदा भोयांच्या खांद्यावर अदबशीर तोलली जाते आणि पुढच्या गावची वाट धरते. गावकरी चार पावलं पुढे जाऊन सोबत करतात आणि मग मागे फिरतात. वारकर्‍यांच्या पावलाखालची माती कपाळाला लावत, पालखी गेली त्या दिशेने नमस्कार करत सगळे परत घराकडे परततात.

दर चार वर्षांनी उपभोगायला मिळणारा सोहळा संपलेला असतो. कोणतंही गडबडीचं मंगलकार्य उरकल्यावर येतो तसा एक निवांतपणा, तो कंटाळवाणा नसतो, पण अगदी शांत निवांत वाटत असतं असा, सगळीकडे पसरलेला असतो. आवराआवरी सुरू होते. कधी तरी चार वर्षांनी गाव बघितलेले आम्ही आणि आमची पोरं गावाजवळ आमचं शेत आहे तिथे जायला उत्सुक असतो. पालखीच्या नंतरचा दिवस शेतात घालवायचा हे ही ठरलेलं असतं. सगळं काही साग्रसंगीत होतं.

आणि संध्याकाळ होते. बहुतेक लोक त्याच दिवशी निघतात. नोकर्‍या, पोरांच्या शाळा असतात. जड पावलाने सगळे निघतात. पाया पडणं वगैरे सुरू होतं. म्हातारे कोतारे पोरांना लाडाने जवळ घेतात आणि पोरं तिथून सुटायला धडपडतात. मी पण सगळ्या आजी आजोबा काका काकू समोर वाकतो. मागच्याच पालखीच्या वेळी, माझ्या आजोबांच्या पिढीतले शेवटचे आजोबा, बाबांचे काका अगदी व्यवस्थित तब्येत असूनही निघताना नमस्काराच्या वेळी बाबांना अगदी अचानक म्हणाले होते, "ही माझी शेवटची पालखी." आणि थोड्याच दिवसात ते गेले. ते सगळे काळजात अगदी रूतलेले असते. न रेंगाळता तिथून काढता पाय घेतो, गाड्या निघतात.

रस्त्यात सगळीकडे वारकरीच दिसत असतात. लहान रस्त्यावर गाडीसमोर अचानक एक अशीच छोटीशी दिंडी येते... त्यांना वाट करून द्यायला म्हणून गाडी बाजूला लावतो. दिंडीतले वारकरी माझ्याकडे बघून म्हणतात,

"ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽऽ...."

मी पुढचं बोलायच्या आतच माझी मुलगी नवीनच शिकलेलं ... "हाऽऽऽरी विठ्ठल" म्हणते. मी चमकतो. पण त्याच क्षणी, कार्यकर्त्यांच्या घरात पालखीची सेवा करायला पुढची पिढी तयार होते आहे या समाधानात गाडी परत गियर मधे टाकतो आणि पुढच्या पालखीपर्यंत परत ऐहिक जगात परत येतो.

***

मनोगत: परवा मीमराठीवर प्रसन्नने (पुणेरी) वारी वगैरे वर लिहिलेले वाचले आणि बर्‍याच दिवसांपासून आमच्या गावच्या पालखीवर लिहायचे मनात होते ते परत वर आले. राजे म्हणाला की नुसता प्रतिसाद देण्यापेक्षा एखादा वेगळा लेखच टाका म्हणून खास त्याच्या विनंतीला मान देऊन हे लिहायचा प्रयत्न केला आहे.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रभो's picture

20 Jul 2010 - 1:27 am | प्रभो

सुंदर लेख बिका.....मनापासून आवडला....

माझं मुळ गाव पंढरीपासून ५-७ मैलावरचं करकम भोसे. पणजोबांपासून सुटलेलं गाव...फक्त कुलदेवतेसाठी जातो आजकाल....त्यामुळे वारी/पालख्या जास्त बघायला मिळाल्या नाहीत कधी....पण लहानपणी बार्शीला असताना आणी नंतर सोलापुरात गजानन महाराजांच्या पालखीच्या सेवेत थोडा वेळ सामील होत असे...

मंदीरावरून आठावलं...सोलापुरला घरच्या बरोबर समोर भलं मोठ्ठं दत्त मंदीर आहे....आमच्या कॉलनीतले नाईक काका म्हणून एक गृहस्थ आहेत , ते दर उन्हाळ्याच्या सुट्टीत संस्कार वर्ग घेत...तसंच दत्तजयंतीच्या सुमारास १० दिवस सकाळी गीतापाठ आणी संध्याकाळी हरीपाठ चाले...कॉलनीतल्या मोठ्या पटांगणात मंडप घालून.. दर संध्याकाळी शाळेतून आल्यावर ...हात पाय तोंड धुवुन गळ्यात आजीचे टाळ अडकवून ..गांधी टोपी घालून मी हरिपाठास जात असे..... 'हरिमुखे म्हणा..हरिमुखे म्हणा..पुण्याची गणना कोण करी'.....

मस्तच रे बिका....या लेखामुळे त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या... :)

चित्रा's picture

20 Jul 2010 - 1:38 am | चित्रा

सुंदर लेख बिका.....मनापासून आवडला....

असेच म्हणते. सुंदर लेख. पहिल्या फोटोतील विरोधाभास आवडला. चकचकीत नवीन जमान्यातल्या गाड्या आणि मागे भिंती, जुने दरवाजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2010 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लेख बिका.....मनापासून आवडला....!

-दिलीप बिरुटे

प्रमेय's picture

21 Jul 2010 - 1:08 am | प्रमेय

बिका मस्त लेख आहे!
आमच्या घरासमोरून आणि घराजवळ पालखी उतरायची (अजूनही उतरते!)
त्यावेळेची आठवण आली.
गॅलरीतून त्या बघायची आठवण आली!

अरे प्रतु,
हे कुठले दत्त मंदीर?

प्रभो's picture

21 Jul 2010 - 1:22 am | प्रभो

आहे समोरच... :)

तु घरी आला की दाखवेन..

रेवती's picture

20 Jul 2010 - 1:47 am | रेवती

लेखन मनापासून केले आहे असे जाणवते.
मी एकदाच कुर्डूवाडीला गेले होते.......यत्ता आठवीत असताना!
फोटू पाहून कुणालाही गावाची आठवण यावी!

रेवती

स्वाती२'s picture

20 Jul 2010 - 2:05 am | स्वाती२

मस्त लेख बिपिनदा. नाथ षष्ठी ला आमच्या गावात पालखी निघायची. 'भानुदास एकनाथ' म्हणत पावले ठेक्यात कधी पडायला लागायची ते समजायचे नाही. तुमच्या लेखाने पुन्हा सर्व डोळ्यासमोर उभे राहिले.

नंदन's picture

20 Jul 2010 - 2:07 am | नंदन

सुरेख लेख. मनाने पालखीच्या सोहळ्यात पोचलो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

केशवसुमार's picture

20 Jul 2010 - 2:51 am | केशवसुमार

बिकाशेठ,
सुरेख लेख.. सगळा पालखी सोहळा आणि वाड्यातली धामधूम शब्दांतून जिवंत केलीत..वाचताना सगळं अगदी डोळ्यांसमोर घडत आहे अस वाटले..
(प्रेक्षक)केशवसुमार

समंजस's picture

20 Jul 2010 - 11:04 am | समंजस

एकदम हेच.

मूकवाचक's picture

11 Jul 2013 - 4:13 pm | मूकवाचक

+१

अर्धवटराव's picture

20 Jul 2010 - 2:11 am | अर्धवटराव

साक्षात वारी घडवलीत हो बिपिनदा !!
कुठल्या शब्दात, काय प्रतिक्रिया देउ ??

(गद्गद) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

घाटावरचे भट's picture

20 Jul 2010 - 3:13 am | घाटावरचे भट

सुंदर!!

मुक्तसुनीत's picture

20 Jul 2010 - 3:31 am | मुक्तसुनीत

लेख आवडला.

अशा प्रकारच्या अनुभवांमधे लहानपणीच्या आठवणी, एका समृद्ध परंपरेचा वारसा असल्याची जाणीव , ती जाणीव रुजत जाण्याची प्रक्रिया, वडीलधार्‍यांच्या , वास्तूंच्या रंगगंधानी वाजतगाजत येणार्‍या आठवणी, गतकाळाशी , संस्कृतीच्या संचिताशी जडलेल्या नात्याचे पदर... हे सारे एकमेकांपासून विलग करता येणे अशक्य बनते. धार्मिक-अधार्मिकतेच्या , काळाच्या सीमारेषा पुसट होतात. लेखकाची मूस घडवणार्‍या , समरसून घेतलेल्या अनुभवाला साजेशा निवेदनाची, निरीक्षणांची , संवेदनशीलतेची आणि उत्तम शैलीची साथ मिळाली की असा लेख लिहून होतो.

पारुबाई's picture

20 Jul 2010 - 4:02 am | पारुबाई

खूप सुंदर,छोट्या छोट्या बारकाव्या सकट लिहिला आहे लेख.आपोआप मन तिथे जावून पोचले.

तुमच्या सर्व नातेवाईकांचे कष्ट,उत्साह,श्रद्धा पाहून मन भरून आले.

अजून एक चांगली गोष्ट वाटली आणि ती म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीला हे सर्व दाखवणे योग्य समजलात,तिला प्रत्यक्ष हे सगळे दाखवलेत.
आणि तुमच्या कष्टाचे चीज झाले. श्रद्धा हवीच असते हो जीवनात. ती रुजवण्याचा तुमचा प्रयत्न निश्चितपणे स्तुत्य आहे.

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ..च्या जय घोषाने आनंदित होणारे मन हि अनुभवण्याची गोष्ट आहे.ती एक अविस्मरणीय आठवण तुमच्या मुलीला मिळाली आहे.

मीनल's picture

20 Jul 2010 - 4:23 am | मीनल

मस्त वर्णन.
मला सफेद गाय ,वासरू आवडले. त्या लुकड्या आहेत.
मागच्या काळ्या शेळ्या मात्र चांगल्याच गलेलठ्ठ आहेत.
:))

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

चतुरंग's picture

20 Jul 2010 - 7:16 am | चतुरंग

पांढरी शुभ्र गाय आणि गोर्‍हा अगदी सुबक आहेत! :)

चतुरंग

सहज's picture

20 Jul 2010 - 7:00 am | सहज

लेख कसा असावा याचे अतिशय उत्तम उदाहरण!

हे आमचे गप्पीष्ट बिकाकाका, केवळ जबरदस्त कथाकथन तितकेच प्रभावी लेखन!

छोटा डॉन's picture

20 Jul 2010 - 7:06 am | छोटा डॉन

.

------
(मनात आले, विठ्ठलाने बुद्धी दिली तर अजुन बरेच काही. नाहीतर तुर्तास एवढेच )
छोटा डॉन

चतुरंग's picture

20 Jul 2010 - 7:15 am | चतुरंग

बरेच दिवसांनी तुझे ओघवते, रसाळ शैलीतले आख्यान ऐकायला मिळाले रे! विठोबाच्या देवळात कीर्तने ऐकायचास असे लिहिले आहेस ते तुझ्या लेखनात उतरले आहे.
वारीचा उत्साह हा खरेतर वर्णन करण्याची गोष्टच नव्हे. याचिदेही याचिडोळा ते अनुभवण्याची चीज आहे. परंतु सगळ्यांना ते भाग्य लाभेलच असे नाही त्यामुळे तुझे वर्णन वाचून तिथे पोचल्याचा भास झाला!
---------------------
नगरला दरवर्षी येणारी गजानन महाराजांची पालखी आठवली. पालखीच्या हत्तीला मी ढेप देत असे ते आठवले. छोटी ढेप त्याच्या सोंडेत ठेवताना होणारा खरखरीत परंतु आपुलकीचा स्पर्श अजूनही आठवतो. वारीतली सुरेल आणि खड्या आवाजातली भजने आणि नाचणारे लोक भान हरपूर बघत राहावे असे असतात.
---------------------
पंढरीच्या वारीला एकदा तरी पायी जायचा मानस आहे.

चतुरंग

क्रान्ति's picture

20 Jul 2010 - 8:40 am | क्रान्ति

बिपिनदा, एकाच लेखात मला माहेर, सासर, आजोळची आणि पंढरीची वारी घडवून आणलीस! पालखीच्या पूजेचा सोहळा तर केवळ अप्रतिम! असे प्रसंग म्हणजे मर्मबंधातली ठेव असते ना आयुष्यातली!:)
प्रभो, माझं आजोळ करकमचं आणि मी पण! :)

क्रान्ति
अग्निसखा

सुचेता's picture

20 Jul 2010 - 2:55 pm | सुचेता

+१
बिपिनदा, एकाच लेखात मला माहेर, सासर, आणि पंढरीची वारी घडवून आणलीस! पालखीच्या पूजेचा सोहळा तर केवळ अप्रतिम! असे प्रसंग म्हणजे मर्मबंधातली ठेव असते ना आयुष्यातली!

माहेर लोणंद , सासर पंढरी सध्या मुक्काम आळंदी.

सुचेता

महेश हतोळकर's picture

20 Jul 2010 - 8:51 am | महेश हतोळकर

खूप आवडला!

यशोधरा's picture

20 Jul 2010 - 9:01 am | यशोधरा

मस्त लेख.

ऋषिकेश's picture

20 Jul 2010 - 10:54 am | ऋषिकेश

फारच सुरेख लेखन! नॉस्टॅल्जिक करून गेले

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

स्वाती दिनेश's picture

20 Jul 2010 - 10:58 am | स्वाती दिनेश

सुरेख लेख बिपिन,
स्वाती

अवलिया's picture

20 Jul 2010 - 11:26 am | अवलिया

सुरेख लेखन :)

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

बिपिनदा,वारकरीलोकांसारख आधी तुमच्या पाया पडून मग माउली म्हणत गळा भेट घ्यावी अशी इच्छा झाली. फर्मास लेख.

आळश्यांचा राजा's picture

20 Jul 2010 - 10:44 pm | आळश्यांचा राजा

वा!
समयोचित लेख आणि नितांत सुंदर आख्यान!

नमस्काराच्य वेळी बाबांना अगदी अचानक म्हणाले होते, "ही माझी शेवटची पालखी." आणि थोड्याच दिवसात ते गेले.

कसं कळायचं या लोकांना हे देव जाणे!

उद्या आपल्याकडे आषाढी एकादशी तर इकडे ओरीसात बाहुडा यात्रा - अर्थात परतीची रथयात्रा.

आळश्यांचा राजा

संदीप चित्रे's picture

20 Jul 2010 - 11:33 pm | संदीप चित्रे

पालखीचे दिवस पूर्णपणे डोळ्यासमोर उभे राहिले मित्रा.

धनंजय's picture

21 Jul 2010 - 12:03 am | धनंजय

आजच्या दिवशी हा लेख जोडीने वाचला, आणि थोडे बरे वाटले.

अमोल केळकर's picture

21 Jul 2010 - 9:37 am | अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

इरसाल's picture

21 Jul 2010 - 9:51 am | इरसाल

अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी ..................

निशिगंध's picture

21 Jul 2010 - 10:17 am | निशिगंध

छानच लेख..

मनापासुन आवडला..आमचे गाव मोहोळ तालुक्यातील टाकळी..कुठलीशी एक दिंडी चैत्री एकादशीला परतीच्या प्रवासात नाष्ट्यासाठी सकाळी आमच्याकडे येते.. ती लगबग धांदल आठवली...

____ नि शि गं ध ____

शिल्पा ब's picture

21 Jul 2010 - 10:41 am | शिल्पा ब

छान आहे लेख... मला तर माझ्या गावची आठवण आली...ते मोठ्ठे दरवाजे, आडळ सगळं सगळं ...गाय वासराचा फोटो खूप आवडला.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मितभाषी's picture

27 Jul 2010 - 3:35 pm | मितभाषी

वा वा बिकाशेठ! एकदम फर्मास वर्णन.

भावश्या.
___________________________________________________________

कुळी कन्या पुत्र ।
होती जे सात्विक ।।
तयाचा हरिक ।
वाटे देवा ।।

शानबा५१२'s picture

27 Jul 2010 - 3:46 pm | शानबा५१२

मस्त लिहलय बिपीन भाउ.
हे सोहळे चालु असताना शांत बसुन देवाचा जप करत देवाच्या प्रतिमेला न्याहाळ्ण्यात काय सुख असत हे शिमग्याला गावाला गेलो की कळत.
मी एकदा आजोळी असताना भजनाचा कार्यक्रम तीन घरात जाउन ऐकुन आलो.तेव्हा गावची माणस चहा काय मस्त बनवतात हे तो वीडीओ व त्यातल्या देखाव्यातल साम्य बघुन आठ्वल.

राजेश घासकडवी's picture

28 Jul 2010 - 2:18 am | राजेश घासकडवी

हे वाचायचं राहूनच गेलं होतं की.

छान लेख बिपिन. पालखीचं हृद्य वातावरण - तयारीपासून ते शेवटच्या निरोपांनंतरच्या रिकाम्या क्षणांपर्यत - डोळ्यासमोर उभं राहातं.

आप्पा's picture

10 Aug 2010 - 8:19 pm | आप्पा

मीही आपणास इतरासारखे बिकाशेठच म्हणेन.
छान ले़ख. माझ्या मामी कुर्डुत रहायच्या. आजही दिंडीच्या वेळेस कुर्डुला जातात. त्या कुर्डुला असताना ते देऊळ बघीतले होते. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आजच आपले बरेच लेख वाचतोय.

अभ्या..'s picture

2 Jul 2013 - 12:26 pm | अभ्या..

वा वा माऊली. एकदम फर्मास वर्णन हो.
अगदी जयविजय पण हायेत की वाड्याच्या दारावर
(आणि मुख्य म्हणजे तुम्ही आमचे सोयरेच की ;))

अनिरुद्ध प's picture

2 Jul 2013 - 2:16 pm | अनिरुद्ध प

अगदी मनापासुन अभिनन्दन्,एकदा आई साठी वारिला गेलो होतो,त्यची आठवण झालि.

ब़जरबट्टू's picture

2 Jul 2013 - 2:23 pm | ब़जरबट्टू

सुरेख लेखन.. पुर्ण सोहळा बघितला तुमच्या शब्दातून....

संपादक मंडळाचे (किंवा 'अभ्या' यांचे) मनःपूर्वक आभार!

अप्रतिम लेख आहे. या माणसाच्या पोतडीतून बाहेर पडलेलं काय काय वाचायचं राहिलंय कुणास ठाऊक?

(हा लेख आज वर का आला या उत्सुकतेने नाथ-पालखीबद्दल आंतर्जालावर शोध घेतला तर हे दोन दुवे सापडले, एक थोडासा माहितीपूर्ण, तर दुसरा विषण्ण करणारा!)

स्पंदना's picture

3 Jul 2013 - 5:14 am | स्पंदना

एकदा तरी अनुभववा असा वारसा आहे आपला.
बिका मनात टाळ चिपळ्या वाजु लागल्या ! नाचरी पावल दिसु लागली चिखलात.
धन्यवाद बिका! धन्यवाद!

जेपी's picture

6 Jul 2013 - 12:58 pm | जेपी

तुळजापुरला गजानन महाराजांची पालखी येते . त्यातील हत्ती आणी संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी पिठल भाकरी माझ कायम आठवत राहते

पैसा's picture

6 Jul 2013 - 1:48 pm | पैसा

काय मस्त लिहिलंय! अभ्या धन्यवाद!

अभ्या..'s picture

6 Jul 2013 - 4:09 pm | अभ्या..

नाय हो नाय. ईतका मस्त लेख हुडकायचे श्रेय मला देऊ नकात. तो दखल मध्ये आधी आला. आधी माऊलींचा जयघोष मग बिकासाह्यबांचे नाव बघितले की वाचल्याशिवाय राहावते काय. मग लेख वाचला तर आमच्या मातीतलाच. अगदी आम्च्या सोयर्‍यातलाच, तेंव्हा प्रतिक्रीया आपसूकच गेली. बाकी धागा वर आणायचे श्रेय सारे वरिष्ठ तांत्रिकांचे. ते कायमच दुर्लक्षित राहतात. त्यानांच पुनः पुनः धन्यवाद मिपा सुरु असल्याबद्दल पण.

पैसा's picture

7 Jul 2013 - 9:56 am | पैसा

त्यामुळे निदान उजव्या कॉलमकडे लोकांचं लक्ष असतं हे कळलं. तिथे लिंक देणार्‍या 'तांत्रिका'चं नाव माहित आहे. त्यांना मनापासून धन्यवाद!

सुंदर लिखाण. लहानपणच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या

बापू मामा's picture

9 Jul 2013 - 10:45 pm | बापू मामा

नमस्कार कुर्डुकर कार्यकर्ते.
आम्ही आपल्याच शिवेशेजारचे म्हणजे पिंपळखुंट्याचे.
लेख मस्त जमला.कुर्डुला परत आलात की वाट वाकडी करुन पिंपळ्खुंट्याला जरुर या.

नक्शत्त्रा's picture

11 Jul 2013 - 11:33 am | नक्शत्त्रा

सुरेख िलखान...

मस्तच बिकाशेठ. सुरेख लिहीलंय.

आतिवास's picture

11 Jul 2013 - 5:02 pm | आतिवास

शब्दांतून चित्र अगदी डोळ्यांसमोर उभं राहिलं!