मीरा हसुनी सांगे राधेला
रोजच भेटे श्रीहरी मजला
हेवा मी करू तरी कसला
तो माझ्यातच भरुनी उरला
सकाळी माझ्या शेजेवरी
सूर्यकिरण बनुनी येतो
अल्लड उधळीत उषा
लाडिक चाळा तो करितो
स्नानासाठी मी जाता
माझ्यास्तव तो जल होतो
मी माळंता फुले सुगंधी
तोच तयातुनी परीमळतो
गंध उगळता त्याच्यासाठी
चंदन बनुनी तो झिजतो
माला गुंफता जाईची
तो सूत्र म्हणुनी वावरतो
मी नेसता वस्त्र रेशमी
तो तयातील मार्दव बनतो
मी करिता शृंगार दर्पणी
तो सौंदर्य माझे होतो
मी छेडीता वीणा विरागी
तो तारांचे अंतर बनतो
पायी बांधता मी घुंगरू
नादमधुर तो झंकारून उठतो
रात्री माझ्या गवाक्षातुनी
चंद्र बनुनी पाझरतो
नक्षत्रांचे घेवूनी लेणे
तो नीजभूल बनुनी येतो
माझ्या नयनी निद्रा येता
तो स्वप्नांचे अस्तर बनतो
स्वप्नातुनही मग तो मजला
रूप तयाचेच दाखवतो
प्याला विषाचा ओठी लाविता
जहर तयातील तो बनतो
मृत्यूची पवित्र वाट चालता
तो मोक्षदाता बनतो
माझ्या मधले पंचप्राण तो
हृदयीचा हर एक श्वास तो
मी नाही मीरा नुसती
माझ्यातील चैतन्य रूप तो
मी म्हणजेच कृष्णं असे
त्याच्यातूनही माझे रूप दिसे
तो घेता राधे मिठीत तुजला
मीच मिठीतील मिठास असे
अनुजा(स्वप्नजा)
प्रतिक्रिया
9 Jul 2010 - 3:55 pm | sneharani
सूंदर्...एकदम छान झालय काव्य!
9 Jul 2010 - 6:33 pm | पाषाणभेद
एकदम मस्त.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही