शेतकरी गीत : काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
7 Jul 2010 - 8:55 am

शेतकरी गीत : काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||धृ||

औंदाच्याला बरसला बरसला पानी
मातीचा सुवास आला गर्द हिरव्या रानी
पळापळी करतात खोंडं माजेल ओलं वारं पिऊन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||१||

विहीरीच्या पान्यामंदी चाले मोटर तासंतास
पाटामधून पानी जाई खालच्या शेतास
वखरणी करतात बैलं वैरण खावून
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||२||

डोईवर पदर हिरवी साडी लेवून
कारभारणी येईल आता न्याहारी घेवून
घाम गाळून कामं करतो हाती येवूदे धन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||३||

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०७/२०१०

वीररसप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

7 Jul 2010 - 10:45 am | अवलिया

माननीय पाभेजी,
माननीय सदस्य
मिसळपाव.कॉम

आपली कविता वाचली. आपल्याला प्रतिभेचे दैवी देणे आहे, त्यामुळे मनातल्या भावना चपखल शब्दांत मांडण्याचे आपल्याला कसब प्राप्त झाले आहे. आपल्या हातुन साहित्यसेवा अविरत घडावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या साहित्यिकांच्या साधनेमधे व्यत्यय येतो, त्या गोष्टींना जबाबदार असलेल्या प्रवृत्तींचे निराकरण लवकर होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

दृपलसारख्या कंटेट म्यानेजमेंट सिस्टीम्समुळे हे संकेतस्थळ उभे राहिले आहे त्याबद्दल मी दृपलचा तसेच दृपलटिमचा आभारी आहे. श्री तात्या अभ्यंकर यांच्या प्रयत्नाने हे संकेतस्थळ स्थापन झाले मी त्यांचा आभारी आहे. त्याला अनेक इतर संकेतस्थळे कारणीभुत ठरली, मी त्यांचा आभारी आहे. संपादकांनी केलेले कार्य थोर आहे. त्यांचा महिमा अपार आहे. त्यांचे गुणगान करण्यास मानवी वाणी पुरेसी नाही याची जाणीव आहे. पण तरीही आभार हे मानलेच पाहिजेत. सर्व संपादकांचा मी आभारी आहे. हा प्रतिसाद वाचणा-या वाचकांचा मी आभारी आहे. ज्यांचे ज्यांचे आभार मानणे आवश्यक आहे अशा सर्वांचा मी आभारी आहे. सर्वात महत्वाचे हे संकेत स्थळ चालु ठेवणा-या श्री नीलकांतचा मी आभारी आहे.

खरोखर आज मोठा मंगल दिवस आहे. सर्व संपादकांच्या आशीर्वादाने आणि कृपाकटाक्षाने मी हा प्रतिसाद लिहु शकलो आहे. हा प्रतिसाद टिकला आहे. माझे सर्व संपादकांना साष्टांग नमन आहे. माझी खात्री आहे, संपादकांची अशीच कृपा माझ्यासारख्या अल्पमती, निर्बुद्ध बालकावर राहिल. अजुन काय लिहु? शब्दच सापडत नाहीत. मुढावस्था म्हणजे काय याचा मला आज प्रत्यय येत आहे.

सर्वांचे मंगल होवो, शुभ होवो हीच कामना..

आपलाच

नाना उर्फ अवलिया.

संपादकांचा महिमा अपार । संपादकांची थोरवी अपार ॥
कसे मानु त्यांचे आभार । मी तर केवळ पामर ॥

स्पंदना's picture

7 Jul 2010 - 11:09 am | स्पंदना

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान

हे विषेश आवडल..आमीबी शेतकरीच हुतो..पर आता माती सुटली बघा!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

मीनल's picture

7 Jul 2010 - 7:02 pm | मीनल

कविता आवडली.
त्यातील स्थळ, काळ, पात्र( Setting,time, characters) सहजी समजण्यासारखे आहेत.
यमक तर आहेच पण मात्राही जुळल्यासारख्या आहेत असे वाटते.ही गेय असावी.
फार मोठा गहन असा आशय प्रत्येक कवितेत असायलाच हवा असे नाही.
ही साधी, सोपी कविता आवडली.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

पक्या's picture

7 Jul 2010 - 10:16 pm | पक्या

कविता आवडली.
पाभे..आतापर्यंत किती कविता केल्या आपण. आणि त्यातील काही काही उत्तम जमल्या पण. उत्तम चाली लावता आल्या तर चांगली गाणी तयार होतील.
जय महाराष्ट्र , जय मराठी !