बसरा ते बावला

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
5 Jul 2010 - 1:39 am

सतराव्या शतकाच्या सुरुवातीनंतर हिर्‍याचे महत्व वाढत गेले. त्या आधी हिर्‍याचे मोल कमी होते असे नाही पण दागीन्यामध्ये मोत्यांचा वापर खास करून बसर्‍याचा वापर होत असे.
मोती म्हणजे बसरा.चोखा मोती .त्यात जीवन आणि पातळ जीवन असे दोन प्रकार .
त्यानंतर बदला मोती .थोडेसे खडबडीत कमी गोल असे.
काळे मोती कागाबाशी तर बाकी सगळे गावशाही .
कधी कधी लांबोळक्या नूर मोत्याचा वापरही केला जायचा.
फिकट रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या मोत्यांना पण वेगळीशी नावे होती. हुर्मुजी म्हणजे गुलाबी.लालसर म्हणजे गुळधानी .थोडी फिकट पांढरी छटा पण काळी नव्हे असे शुक्री मोती . शुभ्र पांढरा नाही पण पिवळाही नाही म्हणजे खुलता मोती.
ही रंगाप्रमाणे केलेली वर्गवारी आणि खास मराठी नामकरण खांबेट्यांच्या मौक्तीक चिकीत्सेत आहे.
भारतात होर्मझ -तलाई मनार अशा वेगवेगळ्या आखातातून मोती यायचे .कपूरथळ्याच्या महाराजांकडे मोती ज्या खणात भरलेले असायचे त्यात कोपरापर्यंत हात बुडायचे असाही एक उल्लेख आहे.
पण त्या काळी हिर्‍याच्या खाणी आणि खास करून आकाराने मोठ्या हिर्‍याच्या खाणी गोळकोंड्यात असूनही मोत्यांचा गवगवा जास्त होता. मोत्यातल्या पाण्याची झळाळी जास्त मोहवत होती .हिर्‍याच्या तेजाचे लोळ उलगडले ते सतराव्या शतकात पैलू पाडण्याचे तंत्र बदलल्यानंतर .
भारतीय शास्त्राप्रमाणे जे पैलू पाडले जायचे त्यामागची भूमीका हिर्‍याचे मूळ व्यक्तीमत्व टिकवून ठेवणे ही होती. हिर्‍याच्या प्रकाश लिळा त्यात पूर्णपणे उलगडल्या जायच्या नाहीत. भारतात पैलू दोन तीन प्रकारानी पाडले जायचे त्याला बिलंदी आणि परब अशी नावे होती.
युरोपात ब्रिलीयंट कट चा शोध लागला आणि हिर्‍याचे नशीब पालटले.
अजूनही मुंबई बाजारात ब्रिलीयंट कट ला देशी नाव बिलीयन कट हेच आहे. बाकी रोझ कट म्हणजे गुलाब घाटी आणि लोटस कट म्हणजे कमळ घाटी. टपोर्‍या कटाला (काबुचान ) मदारघाटी किंवा पोट्या.
पण ब्रिलीयंट कट म्हणजे क्रांती . आपल्या डोळ्यासमोर हिरा म्हटला म्हणजे जे चित्र उभे राहते तो म्हणजे ब्रिलीयंट कट.अशा प्रकारचा पैलू पाडताना हिर्‍यातल्या प्रकाशाच्या लिळेला पूर्ण न्याय देणारा कट .या नंतर युरोपीयन बाजारात भारतीय हिर्‍यांची मागणी प्रचंड वाढली.

हिरे जन्माला येतात तेच काहीतरी दंतकथा घेऊन. कोहीनूर आपला कोहीनूर म्हणून आपल्याला माहीती आहे पण बरेच हिरे असे आहेत की कोहीनूरचे भाऊबंद म्हणजे गोळकोंड्याच्या खाणीतून आलेले आहेत. पांढरा शुभ्र कोहीनूर -निळा होप -हिरवा ड्रेस्डेन यादी अमर्यादीत आहे.शुध्द कार्बनचा कोहीनूर .बोरॉनची मिसळ झालेला गहीरा निळा होप तर नैसर्गीक किरणोत्सर्गानी हिरवा झालेला ड्रेस्डेन.
आज फक्त इंदोर पिअर्सची कथा वाचा .
१९२५ साली जानेवारीतल्या एक संध्याकाळी मलबार हिलच्या लिटल गीब्ज रोडवर अब्दुल कादेर बावला नावाच्या एक श्रीमंत मुस्लीम व्यापार्‍याचा गोळ्या झाडून खून झाला. त्यावेळी त्याच्या सोबत मुमताझ नावाची एक त्याची रखेली होती .ही घटना बघणार्‍या काही ब्रिटीश आर्मी अधिकार्‍यांनी काही आरोपींना जागीच पकडले आनि एका सनसनाटी खटल्याला सुरुवात झाली.
मुमताझ इंदूरहून पळून आली होती. बावलाची आवडती तवायफ. इंदूरच्या तुकोजीरावाच्या मनात पण ती भरली होती. काही वर्षापूर्वी तुकोजीरावांनी तिला आपल्या जनानखान्यात ठेवले.बावला पण तेव्हढाच धीट .त्यानी इंदूरहून मुमताझला परत सोडवून आणले.सूड म्हणून मारेकर्‍यांनी बावलाचा खून केला. या खूनाचे सुत्रधार होते इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर. खटला दोन वर्षे चालला. आरोपींतर्फे जीना सारखे वकील लढत होते. पण प्रत्यक्ष पुरावा असल्यामुळे काही आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशीची शिक्षा झाली. आता खर्‍या पेचप्रसंगाला सुरुवात झाली. तुकोजीरावांचे नाव आरोपींमध्ये आले. बर्‍याच खलबतानंतर तुकोजी रावांना एकतर खटल्याला सामोरे जा अथवा राज्य सोडा असा पर्याय देण्यात आला
तुकोजीरावांनी सिंहासन सोडले आणि अल्पवयीन यशवंतरावांना गादीवर बसवले.
शक्य तो दूर रहा असा मैत्रीपूर्ण सल्ला ब्रिटीशांनी दिला असल्यामुले ते युरोपात गेले.स्विट्जरलंड मध्ये अ‍ॅनी मिलर नावाच्या अमेरीकन बाईशी लग्न केले .अ‍ॅनी मिलर राणी शर्मीष्ठादेवी झाली या प्रसंगी तुकोजीरावांनी आपल्या नव्या आणि तिसर्‍या पत्नीला जे हिरे घेतले ते इंदोर पीअर्स नावानी प्रसिध्द आहेत. प्रत्येकी सेहेचाळीस कॅरेट वजनाचे हे दोन हिरे काही वर्षांनी बाजारात पुन्हा विक्रीला आले कारण तुकोजीरावांनी शर्मीष्ठादेवींना घटस्फोट दिला.
हॅरी विन्स्टन नावाच्या ते खरेदी करून विकले. परत विकत घेतले. परत विकले.सध्या एका उद्योगपतीकडे आहेत.
बघा हा फोटो .

झालंच तर हॅरी विन्स्टनचं नाव पण लक्षात ठेवा .कारण प्रत्येक मोठ्या हिर्‍यासोबत या जव्हेर्‍याचं नाव जोडलेलं आहे. आपण तर खास लक्षात ठेवू कारण आपल्या त्र्यंबकेश्वराचा नासक (नाशीक ) डायमंड त्याच्याच संग्रहात होता.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

5 Jul 2010 - 1:56 am | पुष्करिणी

मस्त रोचक माहिती..

काही काही हिरे दुर्दैवी असतात असं म्हट्लं जातं त्यात तथ्य आहे का?

पुष्करिणी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2010 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मस्त रोचक माहिती..

-दिलीप बिरुटे

रामदास's picture

5 Jul 2010 - 9:48 pm | रामदास

अनेक आहेत.होपच्या सोबत राजीव गांधींचा फोटो बघीतल्यानंतर मी पण दचकलो होतो.

सुनील's picture

5 Jul 2010 - 2:51 am | सुनील

सुंदर पण लेख मध्येच संपल्यासारखा वाटतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रियाली's picture

5 Jul 2010 - 3:19 am | प्रियाली

लेख उत्तम जमत असताना मध्येच संपल्यासारखा वाटला पण माहिती उत्तम असल्याने आवडला.

असो. हा बघा अस्सल होप डायमंड. (अस्सल म्हणजे मी क्लिकलेला)

DSC02276

कोहिनूरसारखाच दर्या-ए-नूर हा प्रसिद्ध हिराही गोळकोंड्याच्या खाणीतला. नादिरशहाने उत्तर भारत लुटला तेव्हा तो इराणला सोबत घेऊन गेला. आता हा हिरा इराण्च्या शाही दागिन्यांत आपली वर्णी नोंदवतो.

रामदास's picture

5 Jul 2010 - 9:45 pm | रामदास

म्हणजे न संपणारी कहाणी आहे.मीर जुमला ते हॅरी विन्स्टन पाचशे वर्षाचा प्रवास आहे.

घाटावरचे भट's picture

5 Jul 2010 - 3:28 am | घाटावरचे भट

मस्तच लेख...

टारझन's picture

5 Jul 2010 - 3:46 am | टारझन

मस्त लेख आहे :) ऑल क्रेडिट टू रामदास सर :)

अवांतर : मागं यकदा एलिफंटा केव्हज् ला फिरायला गेलोवथो .. हे एवढाल्ले मोठे हिरे मिळायचे तिकडे ... :) १२० रुपै वगैरे म्हणतवथा ... मी ८० वं आडुन बसलेलो ... १०० पतुर पर्यंत आलावथा त्यो पण ... त्यामुळं ती डिल झाली नाही :)
मग यकदा व्हिटी च्या तिकडंबी पाहिल्यासारखे झालं मला पण घाईघाईत घ्यायला जमलं न्हाई :)

- (मिपाचा कोहिणुर) टारझन
हे आपलं कैच्च्याकैच्च !

बहुगुणी's picture

5 Jul 2010 - 3:48 am | बहुगुणी

शिवाय तुकोजीरावांसारखे ऐतिहासिक संदर्भ असल्याने आणखीन रोचक झाला आहे लेख.

"आज फक्त इंदोर पिअर्सची कथा वाचा" असं म्हणताय म्हणजे पुढे आणखी बरंच काही पोतडीतून निघणार आहे अशी आशा आहे, येउ द्यात. शक्य असल्यास प्रत्येक हिर्‍याचे आणि माणिक-मोत्याचे फोटो अंतर्भूत करा म्हणजे एक उत्तम माहितीस्त्रोत संग्रहित करता येईल.

धन्यवाद!

रेवती's picture

5 Jul 2010 - 4:16 am | रेवती

ग्रेट झालाय हो लेख!
अगदी सेहेचाळीस कॅरटचा आणि माहितीपूर्ण!
रत्नांची माहिती देणारी ही लेखमालिका सुरु झाली असे आम्ही (पामरांनी) समजायचे का?

रेवती

आनंदयात्री's picture

5 Jul 2010 - 10:12 pm | आनंदयात्री

>>रत्नांची माहिती देणारी ही लेखमालिका सुरु झाली असे आम्ही (पामरांनी) समजायचे का?

हे वाक्य आणि वरचा दुर्दैवी हिर्‍यांचा उल्लेख परस्परसंबध असणारा वाटला.
रामदासांच्या लेखमाला अश्याच दुर्दैवी हिर्‍यांसारख्या .. त्यामुळे याला लेखमाला नको म्हणायला. खंडायची अकाली, आणि आपण मुकायचो त्यांच्या वाचनाच्या आनंदाला !

सहज's picture

5 Jul 2010 - 5:33 am | सहज

हॅरी विन्स्टनवर एक लेख येउ दे.

हिस्ट्री ऑफ ब्लड डायमंडस अशी एक लेखमाला तयार दिसते तुमच्याकडे. :-)

सही!

Pain's picture

5 Jul 2010 - 9:40 am | Pain

ब्लड डायमंडस हे नव्हेत, ते आफ्रिकेतले, एक पिक्चर येउन गेला लिओनार्डो डिकॅप्रियोचा त्यावर.

सहज's picture

5 Jul 2010 - 9:50 am | सहज

धन्यवाद पेन. "ब्लड डायमंड" हे शब्द फक्त अफ्रिकेतील नव्हे / हॉलीवूडपटाबद्दलच नव्हे, तर गेल्या काही शतकात जगात इकडून तिकडे हिंसात्मक / लूटमार / फसवणूक प्रवास झालेल्या हिर्‍यांची श्री रामदास यांच्याकडे असलेल्या माहीतीच्या खजिन्याबद्दल बोलत होतो.

बाकी ब्लड डायमंडस अफ्रिकेतील घटना, चित्रपट याबद्दल एक चर्चा झाली होती आपण दोघे त्यात सहभागी होतो. :-)

Pain's picture

5 Jul 2010 - 1:16 pm | Pain

"जगात इकडून तिकडे हिंसात्मक / लूटमार / फसवणूक प्रवास झालेल्या "अच्छा अस होय...मी फक्त आफ्रिकेतलेच तेवढे ब्लड डायमंड अस समजत होतो. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद!

स्पंदना's picture

5 Jul 2010 - 7:08 am | स्पंदना

बिलियन कट!!

अरुंधती's picture

5 Jul 2010 - 8:23 am | अरुंधती

मस्त लेख आणि रोचक माहिती! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

भाग्यश्री कुलकर्णी's picture

5 Jul 2010 - 8:31 am | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त माहिती मिळाली.अजुन वाचायला आवडेल.

मराठमोळा's picture

5 Jul 2010 - 10:52 am | मराठमोळा

जवळ असावी अशी माहिती देणारा लेख.
धन्यवाद. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

भोचक's picture

5 Jul 2010 - 12:12 pm | भोचक

अ‍ॅनी मिलर राणी शर्मीष्ठादेवी झाली या प्रसंगी तुकोजीरावांनी आपल्या नव्या आणि तिसर्‍या पत्नीला जे हिरे घेतले ते इंदोर पीअर्स नावानी प्रसिध्द आहेत. प्रत्येकी सेहेचाळीस कॅरेट वजनाचे हे दोन हिरे काही वर्षांनी बाजारात पुन्हा विक्रीला आले कारण तुकोजीरावांनी शर्मीष्ठादेवींना घटस्फोट दिला.

क्या बात है. रामदासकाका, मस्त माहिती मिळाली. थोडं अवांतर, या मिलरबाईंना हिंदू करून घेत त्यांचा विवाह तुकोजीरावांशी झाला. करवीर पीठाचे तत्कालीन शंकराचार्य यांनी नाशिकला सोमेश्वरजवळ हा विधी पार पडला. या शंकराचार्यांचा तिथे आश्रम आहे. तिथे या सगळ्याची नोंद आहे. विशेष म्हणजे तुकोजीरावांना या बाईंशी लग्न करायचे होते, प्रसंगी त्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारायची तयारी होती. सावरकरांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी या बाईंच्या हिंदूकरणासाठी पुढाकार घेतला होता.

(भोचक)
जाणे अज मी अजर

स्वाती दिनेश's picture

5 Jul 2010 - 12:46 pm | स्वाती दिनेश

हिर्‍या मोत्यांसारखीच मौल्यवान माहिती!
अजून वाचायला आवडेल,
स्वाती

गणपा's picture

5 Jul 2010 - 1:21 pm | गणपा

काका मस्त माहिती मिळाली.
अजुन असले हिरे माणकं पाचु काढा तुमच्या पेटार्‍यातुन.
मालिकाच होउन जाउदे :)

ऋषिकेश's picture

5 Jul 2010 - 1:59 pm | ऋषिकेश

मस्त माहिती आहे.

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

धनंजय's picture

5 Jul 2010 - 6:05 pm | धनंजय

मस्त लेख

ऐतिहासिक संदर्भ असलेली रंजक माहिती मिळाली. अशी किती गुपिते ह्या हिर्‍यांपायी दडलेली असतील असे वाटून गेले.
पुढची रत्नं काढा ना राव पेटीतून!

चतुरंग

jaypal's picture

5 Jul 2010 - 6:19 pm | jaypal

अनमोल रत्ने आणि माहितीचा खजिना आमच्या समोर मांडत आहात त्या बद्दल धन्यवाद.
fsdfsd
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

धमाल मुलगा's picture

5 Jul 2010 - 7:19 pm | धमाल मुलगा

रामदासकाकांचा लेख म्हणजे आजवर वाटायचं बावन्नकशी सोनं! आज कळलं, च्यायला, हे तर बिलियन कट आहे :)

अभिज्ञ's picture

5 Jul 2010 - 11:40 pm | अभिज्ञ

रामदासकाकांचा लेख म्हणजे आजवर वाटायचं बावन्नकशी सोनं! आज कळलं, च्यायला, हे तर बिलियन कट आहे
अगदी अगदी
रामदासांचा प्रत्येक लेख आवर्जुन वाचावा असाच.

अभिज्ञ.

समंजस's picture

6 Jul 2010 - 11:32 am | समंजस

आणखी लेख येउद्यात या विषयावर!! :)
[हिरा/मोती आपल्या कडे का नसेना, त्याबद्दल वाचूनच दुधाची तहान ताकावर भागवून घेउ] :(

श्रावण मोडक's picture

6 Jul 2010 - 11:42 am | श्रावण मोडक

इतकं सारं लिहून झालं आहे की, पुढे काही लिहिण्याची गरज नाही!

सर्वसाक्षी's picture

6 Jul 2010 - 4:04 pm | सर्वसाक्षी

रामदास शेठ म्हणजे भारी आसामी. सोने, हिरे, मोती..

आपक्या वैविध्यपूर्ण वाचनाला दाद दिली पाहिजे.

चित्रा's picture

6 Jul 2010 - 6:25 pm | चित्रा

सुंदर लेख.

परवाच फ्रेशवॉटर पर्ल्सचे एक साधे ब्रेसलेट घेतले - केवळ रंगावर भुलून.