गोमू माहेरला आली हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
असं गाणं लहानपणापासून ऐकलं होतं. माझ्या आजीचं (आईच्या आईचं) गाव राजापूर. आईच्या वडलांचं गाव वेरळ. त्यामुळे मी आणि माझे आईवडील हाडाचे मुंबईकर असले तरी भावविश्वात कोकण यायचंच. कधी आईच्या मामाने आणलेला फणस, तर कधी मला न आवडणारं कुळथाचं पिठलं. लग्नकार्याच्या वेळी एकत्र जमलेल्या लोकांकडून ऐकलेल्या गप्पा, होणाऱ्या अतिशय जवळिकीच्या ( पक्षी खोदून खोदून होणाऱ्या - पैसे किती मिळतात, इतकी वर्षं झाली तरी मूल का नाही वगैरे) चौकशा व भुताखेतांच्या गोष्टी - इतपतच कोकणाची माहिती. त्यात कल्पनाविश्वात भर म्हणजे गारंबीचा बापू, पुलंचा अंतू बर्वा वगैरे. पण कोकणात जायची वेळ शाळेच्या गणपतीपुळ्याच्या ट्रिपपलिकडे कधी आली नव्हती. आई काही वेळा जाऊन आलेली आहे, पण त्यावेळी मी एकतर अभ्यासात मग्न होतो, किंवा अमेरिकेत होतो. तिला तिच्या घोवाला कोकण दाखवण्याची खूप इच्छा होती, पण प्रवास (तोही सासुरवाडी) या कल्पनेचाच तिटकारा असल्यामुळे ते कधी कोकणात गेले नाहीत. तिच्या सुदैवाने माझ्या बाबतीत, इतक्या उशीराने का होईना, पण तो योग या भारतवारीत जुळून आला. काही वर्षांपूर्वी माझ्या मामाने दापोलीला घर बांधलं. (मामा प्रत्यक्ष दापोली शहरात राहात नाही, अडीच किलोमीटरवर असलेल्या 'सबर्ब'मध्ये राहातो. त्या गावाचं नाव जालगाव .) तो मला नेहेमी म्हणायचा की एकदा येऊन जा. पण भारताच्या छोट्या ट्रिप्समध्ये सगळ्यांचंच दापोलीला जाणं जमलं नव्हतं. यावेळी मामा मामी जाणार होते, तर मीही जायचं ठरवलं.
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया म्हणत झुकझुक आगीनगाडीने जाण्याचा काही योग नव्हता. प्रवास पुण्याहूनच सुरू होणार असल्यामुळे पर्याय फक्त बसचाच होता. बरेच लोक असते तर कार करून जाणं सोयीचं ठरतं, पण तिघेच जण जायचे असल्यामुळे आम्ही एस्टीनेच जायचं ठरवलं. त्यात तारखा बदलत राह्यल्यामुळे आयत्या वेळी जाऊन रिझर्व्हेशन केलं. त्यामुळे निमआराम बशींमधल्या जागा संपल्या होत्या. मग आम्ही साध्या लाल डबा एस्टीने गेलो. हाही अनुभव खूप वर्षांनी घ्यायची संधी मिळाली.
पोचलो तेव्हा मध्यरात्र होऊन गेली होती त्यामुळे कोकणाचं पहिलं दर्शन झालं ते सकाळीच. पहिलं चित्र उभं राहिलं ते लाल माती, चिऱ्यांचं बांधकाम,निळं आकाश आणि हिरवीगर्द झाडी.
मामाच्या घराचे वास्तुशांतीचे फोटो वगैरे बघितले होते, पण त्यावेळी ते काहीसं ओकंबोकं होतं. आता चारही बाजूंनी गर्द झाडं - आंबे, चिकू, आवळा, पेरू, जास्वंद आणि इतरही कितीतरी - बघून मन प्रसन्न झालं. त्यांच्या दारात दोन बुटकेसे सिंगापुरी नारळदेखील आहेत. मामाचं घर खरोखरच चिरेबंदी आहे, पण वरून सिमेंट/प्लास्टर लावून गुळगुळीत केलेलं आहे. आणि सुखाच्या कल्पनेतलं अल्टिमेट म्हणजे झोपाळा आहे.
एकंदरीत तीन दिवसांचं वास्तव्य असल्यामुळे कुठे खूप हिंडण्याचा बेत नव्हता. आसपासच्या एकदोन गावांमध्ये जाऊन यायचं, भरपूर आंबे वगैरे खायचे, आराम करायचा आणि एकंदरीत कोकणाचा फील घ्यायचा असा बेत होता. मामाची बायको सुगरण, म्हणून मामीने खायची प्यायची चंगळ केली होती. त्यामुळे त्याही आघाडीवर चैनच होती.
पहिला दिवस आराम केला. संध्याकाळी सहज बाहेर फिरायला निघालो. हवेत पावसाचे वेध होते. बाजूला सर्वत्र हिरवळ होती. आणि रस्त्याच्या कडेला करवंदाची जाळी होती. मुठीमुठीने करवंदं तोडून चालता चालता खायला मजा आली. दुसऱ्या दिवशी आंबरस पोळीचं जेवण हाणून अंमळ झोप काढल्यानंतर आम्ही मुरुडला गेलो. मुरुड हे अण्णासाहेब कर्व्यांचं गाव. तिथे त्यांचं स्मारक आहे, व राहात्या वास्तूत त्यांच्या जुन्या छायाचित्रांचा संग्रह आहे. मुरुडचा समुद्रकिनारा हा आजकाल पर्यटकांसाठी खूपच आकर्षक ठरलेला आहे. गावात जागोजागी कोकणच्या मेव्याच्या, रिसॉर्ट्सच्या, पॅरासेलिंगच्या, जाहिराती दिसतात. 'कृपया किनारा स्वच्छ ठेवावा' अशी आवाहनं व त्याकडे पूर्णपणे केलेलं दुर्लक्षही दिसलं. "एकंदरीत कोकणातले लोकही आजकाल पैसे करायला शिकायला लागले आहेत" मामा म्हणाला, "असंच चाललं तर लवकरच कोकणचा कॅलिफोर्निया होईल!” मुंबईत जन्म काढूनही मामा आपली कोकणी मुळं विसरलेला नाही. मुरुडच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही आसूद गावाला निघालो.
आसूद गावाविषयी लिहावं तितकंच थोडं आहे. पेंडसे इथेच राहायचे . बापूची गारंबी हीच. बापूने घेतलेल्या पोफळीच्या बागा दिसतात. राधाबाई भजी तळत बसलेली असे ते ठिकाण बघायला मिळतं. विठोबाला ज्या पुलावरून ढकलून दिला तो पूलही तिथेच आहे. गाव बघितलं की अक्षरश: प्रेमात पडायला होतं. या गावात कादंबरी घडलीच पाहिजे असं वाटतं. एव्हाना मी कोकणाच्या हिरव्या गारव्याला सरावलो होतो. पण आसूद गावात दाबके वाडीत शिरलो आणि इथे माणसं राहातात यावर विश्वासच बसला नाही. आत्तापर्यंत मला इतकी वनराई केवळ ट्रेकला जाताना किंवा नॅशनल पार्क्समध्ये वगैरे जपून ठेवलेली दिसली आहे. हिरव्याकंच झाडांमधून मध्येच घरं उगवलेली, डोंगराच्या चढउताराबरोबर त्याला बिलगून बसलेली. दुर्दैवाने माझ्याकडचा कॅमेरा अतिशयच साधासुधा होता त्यामुळे ती हिरवाई पुरेशा परिणामकारकपणे पकडता आली नाही. पण ही 'गगनचुंबी' झाडं दिसली...त्यांमागच्या गर्द वनराजीने एकंदरीत गावाची कल्पना येते.
आसूदला केशवराजाचं दर्शन घ्यायचं म्हणजे एक दिव्यच आहे. गावातून शंभर एक पायऱ्या उतरायच्या. त्यापुढे पुलावरून जायचं. आणि मग दोनेकशे पायऱ्या चढून डोंगरावर केशवराजाचं मंदीर आहे.
इतके कष्ट घेऊन दर्शनाला जायचं म्हणजे श्रद्धा जबरच असली पाहिजे. मी भारतात आल्यापासून अबरचबर खाण्याची जी पापं केली ती केशवराजाच्या पायाशी जाईपर्यंतच फिटली असावी. कोकणातले लोक काटक आणि बारीक असतात ते काही उगीच नाही. मासे खायचे, भात ढिगल्यांनी रिचवायचा आणि असले डोंगर चढायचे- उतरायचे. कशाला होताहेत रक्तदाब, मधुमेहासारखी शहरी घरबशी दुखणी!
देवळात पोचल्यावर सगळ्या कष्टांचं सार्थक होतं. इतका रम्य परिसर, वातावरणावरच हिरवीगार शांतता पसरवणारी झाडं, गोमुखातून पडणारी पाण्याची धार.
बाजूलाच भिंतीतलं गवाक्ष बुजवून अभावितपणे तयार झालेला गणपती सदृश आकार.
पंधरा मिनिटं नुसतं शांत बसलं तरी सगळे ताण निघून जातात. कोकणात मी तीन देवळं बघितली - तिन्हींचा जीर्णोद्धार होऊन गुळगुळीत गिलाव्याचे खांब, खाली चांगली छान फरशी व रंगरंगोटी केलेली दिसली. आसपास जुन्या चिऱ्याच्या बांधकामाचे अवशेष आहेत. गिलावा आणि फरशा सोयीचे असले तरी ते चिऱ्याचं काळं पडलेलं बांधकाम भक्कम, खानदानी व्यक्तिमत्व असलेलं वाटतं. या दोन्हीचा ताळमेळ दुर्दैवाने चांगला घातलेला नाही, त्यामुळे ती आधुनिक व पुरातन अशी विसंगती डोळ्याला खुपल्यावाचून राहात नाही.
एकंदरीत मामाशी बोलताना, आता खूप लोक मुंबईतून कोकणात परत येताना किंवा निदान गुंतवणुक म्हणून घर घेताना दिसतात असं जाणवलं. दापोलीच्या जवळच काही उच्चवर्गीय वस्त्या, नव्या डेव्हलपमेंटा दिसतात. लाल मातीवर मानवी प्रगतीच्या पाऊलखुणा...
आधुनिक, शहरी दिसणाऱ्या सोसायट्यांमध्ये स्क्वेअर फुटाला 1600 वगैरे भाव ऐकून थोडं दडपल्यासारखं झालं. दापोलीच्या जवळच चिखली आहे - टिळकांचा जन्म झाला ते गाव. दाभोळ फार अंतरावर नाही - तिथून एनरॉनचा प्रकल्प दिसतो . पण ही गावं बघायला जमलं नाही.
मामाच्या गावात आणखीन काही गोष्टी नजरेला आल्या. त्यांच्या सोसायटीत बौद्ध व हिंदू राहातात. बौद्धांचं प्रमाण बहुधा अधिक आहे. मुळात ते अधोरेखित होऊ नये म्हणून हिंदूंनी त्या भागाला श्रीरामनगर असं नाव दिलं होतं. आम्ही गेलो तेव्हा बौद्ध समाजाने नुकतीच मोठी दगडी कमान बांधून मोठ्या अक्षरात 'आंबेडकर नगर' असं लिहिलं होतं. ते मामाला तितकंसं पसंत पडलं नसावं असं वाटलं. अर्थात तो बऱ्यापैकी उदारमतवादी असल्यामुळे व मुळात तिथे फार राहात नसल्यामुळे त्याची मतं तीव्र नव्हती. दुसरी याच संदर्भातली गोष्ट म्हणजे दापोली भागात मुस्लीम वस्ती भरपूर आहे. पण आसपासच्या काही सोसायट्यांमध्ये मात्र मुस्लिमांना घर विकलं जाऊ नये असा अलिखित नियम आहे असं ऐकिवात आलं. असे विचारप्रवाह पुण्यातल्या काही भागातही ऐकलेले आहेत. सेपरेट बट इक्वल ची परिस्थिती भारतात चालू आहे एकंदरीत.
अरे हो, तिथे गेलेलो असताना अनपेक्षित रीतीने आमचे जुने शिक्षक भेटले. पण त्या भेटीचं वर्णन स्वतंत्रच व्हायला हवं.
प्रतिक्रिया
27 Jun 2010 - 8:36 pm | सहज
फार छान लेख.
गावाचा फेरफटका करवलात!
27 Jun 2010 - 8:50 pm | दशानन
मस्तच !
27 Jun 2010 - 9:01 pm | मस्त कलंदर
छान लेख....
+१
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
28 Jun 2010 - 11:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी! झोपाळा म्हणजे सुखाची परमावधी!
गुर्जी, लेख मस्तच आहे.
अदिती
अवांतरः मलाही कुळथाचं पिठलं फारसं आवडत नाही.
28 Jun 2010 - 4:53 pm | नंदन
लेख मस्तच. वरील प्रतिसादाशी स-अवांतर सहमत :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Jun 2010 - 9:06 pm | युयुत्सु
तुमची आजी राजापूरची आमच्या जवळचीच हो.
आणि हो क्यामेरा कोणता...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
27 Jun 2010 - 9:24 pm | sur_nair
१२-१३ वर्षापूर्वी काही मित्रांबरोबर मी कोकण ट्रीपला गेलो होतो तेव्हा दाभोळ ला गेलो होतो. तिथला lighthouse , समुद्रकिनारा, सर्व काही खूपच सुंदर आहे. जुन्या आठवण्णींना उजाळा मिळाला.
तुमच्या लेखाने मला माझ्या मामाच्या घराची (केरळ) आठवण झाली. असंच टुमदार घर, आजूबाजूला नारळ, आंबा, फणसाची झाडे व मामीच्या हातचा खास केरळी स्वयपाक. तुमचा भारताचा प्रवास सुखकर झाला याबद्दल आनंद.
27 Jun 2010 - 9:32 pm | विसोबा खेचर
घासकडवी गुरुजी,
अतिशय सुंदर लेख..
काय? कुळथाचं पिठलं आवडत नाही?? तुमचा जन्म फुकट आहे साहेब! :) एकवार माझ्यासोबत आमच्या देवगडात चला, स्वत:च्या हातानी कुळथाचं पिठलं करून घालीन. नक्क्की आवडेल तुम्हाला!
लाल डब्याची मजा काही औरच.. अनेकदा सातारी तंबाखूचा भक्कम बार भरून परळ-देवगड प्रवास मी याच लाल डब्ब्यातून उभ्याने केला आहे.. रिझर्वेशन वगैरे काही नाही! :)
आसूदचा राजा बिवलकर हा माझा मामा! :)
आसुदातली जंक्शन आसामी!
दाभोळच्या तात्याशास्त्री जोश्यांचं घर हे माझ्या मावस बहिणीचं सासर.. दहावी-अकरावीत असताना मे महिन्याच्या सुट्टीत ८-१० दिवस दाभोळला जायचो.. तेव्हा दाभोळ बंदराजवळची कुंदा पेंडसे पटवली होती मी.. सवडीने लिहीन ती हकिकत केव्हातरी..! :)
खुद्द दापोलीपासून दोन किमिवर असलेले गिम्हवणे.. तेथील आप्पा कर्वे माझ्या चांगल्या परिचयाचे..
दाभोळहून जवळच हणै बंदर. हर्णैचा खोत - गोळे हा माझा अशील.. सध्या तात्याकडे पैसे अडकल्यामुळे दर आठ दिसांनी मला फोन करतो,
"तसं नाही रे तात्या, तुझ्यावर विश्वास आहे.. पण कधी देशील माझे पैसे? एक तारीख सांग.. काळजी करू नको, मला खात्री आहे, तुझ्याकडे दिलेला पैसा बुडणार नाही!" :)
असो..
खाडीपट्ट्यातला लेख आवडला...
एकदा चला आमच्या तळकोकणात! :)
असो, सुंदर लेख..
आपला,
(फुरश्यांचा प्रेमी) तात्या अभ्यंकर.
27 Jun 2010 - 11:10 pm | शानबा५१२
म्हण्जे तिकीट पण नाही का? राहु राहु दे, कंडक्टर काय ड्रायव्हरला रस्ता दाखवण्यात गुंतला होता की काय?
म्हणजे परत कधी नाव पण नाही कढणार! :D
लवकरात लवकर सवड काढा आणि आम्हाला कळवा बर्,नाहीतर घाइत निघुन जाइल लेख.
जबरा लेख आणि तात्यांचा सुपरजबरा प्रतिसाद!!
आगे बढो तात्या.....हमारे भरोसे मत रहो!
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
28 Jun 2010 - 11:15 am | युयुत्सु
+१
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
27 Jun 2010 - 10:11 pm | सुनील
छान लेख. गावीं जाऊन आल्यासारखे वाटले!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Jun 2010 - 8:28 am | Nile
कोकणसफर आवडली, हेवा वाटावा अशीच!
इथे खास दाद द्यायलाच हवी, मस्त!
-Nile
28 Jun 2010 - 8:46 am | रामदास
कुळथाची पिठी आवडत नाही.???
हाय ! कंबख्त तूने पि ही नही.
28 Jun 2010 - 11:32 am | नितिन थत्ते
हमने पी के जाना की मजा नही.
कुळथाचं पिठलं, भाकरी, उकड, वांग्याचं भरीत, सांदणं आदि पदार्थांच्या आठवणींनी बर्याच लोकांना उमाळे येतात. त्या मला आवडत नाहीत.
असो. धाग्यावर हे फार अवांतर आहे.
कोकणातले फोटो छान. आम्हीही जानेवारीत चिपळूण दौरा केला होता. त्याची आठवण आली.
(अतिअवांतरः टिळक नक्की किती ठिकाणी जन्मले होते हा एक शोध घेण्याचा विषय आहे. चिखलीला जन्म झाला हे लहानपणी पाठ केले होते. पण मोठेपणी रत्नागिरीत टिळकांचे जन्मस्थान 'पाहिले' होते. अंतू बर्वा मध्येही नेहरूंना रत्नागिरीत टिळक जन्मले ती खाट दाखवण्यावरून काही उल्लेख आहे).
नितिन थत्ते
28 Jun 2010 - 12:31 pm | राजेश घासकडवी
चला, नाहीतर मी एकटाच मिसळपाव सारखे शहरी पदार्थ आवडणारा, व गावच्या मायेची जातकुळी(थ) नसलेला आहे असं वाटत होतं.
28 Jun 2010 - 11:11 am | स्वाती दिनेश
लेख आवडला, फार छान!
जुन्या शिक्षकांवरच्या स्वतंत्र लेखाची वाट पाहत आहे.
स्वाती
28 Jun 2010 - 12:49 pm | जागु
छानच.
28 Jun 2010 - 4:49 pm | शुचि
लाल माती, झोपाळा, करवंद, केशवराज मंदीर - सगळच अल्टीमेट. भाग्यवान आहात.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
28 Jun 2010 - 4:50 pm | चतुरंग
एकदम नेटकी सफर घडवलीस कोकणची.
झोपाळ्याने आमच्या जुन्या वाड्यातल्या आठवणी जागवल्या. संध्याकाळचा पर्वचा म्हणायला अशाच झोक्यावर बसायचो आजोबांबरोबर ते आठवले.
फोटो आणि त्यावरील टिप्पणी सुद्धा झकास. लाल मातीवरील पाऊलखुणा आवडल्या. मंदिराचा जीर्णोद्धार करताना त्यातले पुरातनपण जपले जाईल ह्याकडे लक्ष न देणे ह्याने मनाला यातना होतात.
बाकी कुळीथ आवडत नाही तर नसो बापडे, हापूस आंबा न आवडणारा एक महाभाग मला माहीत आहे त्यामानाने तुझा अपराध फारच सौम्य म्हणायला हवा! ;)
(जानशीचा)चतुरंग
28 Jun 2010 - 6:33 pm | निखिल देशपांडे
सही लेख
एकदम कोकणाची जोरदार सफर घडवली तुम्ही..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
28 Jun 2010 - 7:13 pm | प्रभो
सुंदर....
घरच्या झोपाळ्याची आठवण झाली!!!
28 Jun 2010 - 7:16 pm | बिपिन कार्यकर्ते
फोटोसहितचं लेखन कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ... छान सफर घडवली. कोकणाची आणि तुझ्या भावविश्वाचीही.
बिपिन कार्यकर्ते
28 Jun 2010 - 7:16 pm | प्रियाली
वर्णन आवडले.
रविंद्र पिंग्यांचा एक धडा होता मराठीला. त्याची आठवण झाली.
मला गणपती नाही दिसला. भाव तेथे देव असे तर नाही. ;)
28 Jun 2010 - 8:00 pm | चतुरंग
(कृपया आता ह्यात हात कुठे, तोंड कुठे, पाय कुठे असे विचारु नका! ;) )
(तृतीयनेत्रधारी)चतुरंग
28 Jun 2010 - 8:23 pm | टारझन
=)) बरोबर आहे.
माझ्या मित्राच्या गावाकडे भिंतीत ३३ कोटी देव एकत्र दिसतात , हे बघा ..
कोणाला दिसले नाहीतर कृपया कोणीतरी हायलाईट/बॉर्डर करुन दाखवा रे :)
- फक्त प्रल्हाद
28 Jun 2010 - 10:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =))
28 Jun 2010 - 11:07 pm | राजेश घासकडवी
:) :)
मला काही आकार दिसताहेत, पण मी ते बॉर्डर करून दाखवणार नाही. ;)
28 Jun 2010 - 8:35 pm | प्रियाली
या हिशेबाने मला हातावर द्रोणागिरी उचलून उड्डाण करणारा मारुतीही दिसला की. म्हणजे, गणपतीतच मारुती दिसू लागला आहे. ;)
28 Jun 2010 - 8:08 pm | नितिन थत्ते
>>मला गणपती नाही दिसला. भाव तेथे देव असे तर नाही.
तसेच. मलाही नव्हता दिसला. पण गणपती पहायचा ठरवल्यावर लगेच रंगाशेठनी दाखवल्याप्रमाणेच गणपती दिसला.
नितिन थत्ते
29 Jun 2010 - 10:36 am | मैत्र
रवींद्र पिंगे - खूप छान ललित लेखक.
प्रियाली - आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मला वाटतंय हे नाव होतं धड्याचं - कोकणातले दिवस.
आणि बालभारतीच्या पद्धतीनं शेवटी कंसात पुस्तकाचं नाव - मुंबईचं फुलपाखरु.
छान वर्णन होतं.
मामाचा गाव आवडला. झोपाळा मस्त आहे.
28 Jun 2010 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फेरफटका मस्तच...!
-दिलीप बिरुटे
28 Jun 2010 - 10:42 pm | स्मिता चावरे
कोकणसफर आवडली, हेवा वाटावा अशीच!
लाल मातीवर मानवी प्रगतीच्या पाऊलखुणा...
इथे खास दाद द्यायलाच हवी, मस्त!
-Nile यांच्याशी सहमत....
29 Jun 2010 - 12:08 am | भडकमकर मास्तर
कोकणसफरीने मजा आली...( आणि लेखकाला उगाच फुटाफुटाला सारखा गहिवर वगैरे न आल्यामुळे विशेष आवडली..)
29 Jun 2010 - 12:26 am | शिल्पा ब
लेख आणि फोटो आवडले...लोक आजकाल मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली काय वाटेल ते बदल करतात आणि मूळ वस्तूचे सौंदर्य बिघडवतात...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
29 Jun 2010 - 12:40 am | बिपिन कार्यकर्ते
अतिशय सुंदर लेखन... बारकाव्यांसहित पण त्यांचं ओझं न होऊ देता उत्तम लेखन.
बिपिन कार्यकर्ते
29 Jun 2010 - 4:42 am | अजबराव
कय म्ह्नजु अजुन
29 Jun 2010 - 4:42 am | अजबराव
कय म्ह्नजु अजुन
30 Jun 2010 - 12:34 am | चित्रा
लेख आवडला. असे काही वाचले की बर्याच आठवणी येतात.
केशवराजचे मंदिर सुरेख आहेच, वर मला वाटते बिट्टीची (पिवळ्या फुलांची) झाडे आहेत. पण जाण्याची वाट अफलातून आहे.
दापोलीच्या कृषिमहाविद्यालयाचा भागही बघण्यासारखा आहे.