५) एका खेळियाने - द फर्स्ट परफेक्ट टेन !!!

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
24 Jun 2010 - 4:36 pm

तुम्ही.. हो हो तुम्ही... तुम्ही म्हणजे मिपाकर....(मी ही आलोच की त्यात... नाही कुठे म्हणतोय) मराठी आहात (निदान मराठी जाणता), नेटिझन्स आहात (म्हणजे किमान साक्षर आहात), येवढ्या साधक-बाधक चर्चांत सामील होता म्हणजे सुशिक्षित - सुसंस्कृत - सुविद्य इत्यादी इत्यादी आहात... इतके छान छान लेख, कविता लिहिता, चित्रं काढता, गाता, दाद देता.... म्हणजे गुणी आणि गुणग्राही आहात. देशा-परदेशात कामं करता म्हणजे तुमची क्षितिजं विस्तारलेली आहेत. नाही हो... लेखाचं शीर्षक चुकलेलं नाही आणि मी काही कुठल्या "समाजवादी" चर्चेला वाचा फोडत नाहिये. हे सगळं म्हणायचा उद्देश इतकाच की तुम्ही वरील सर्व काही आहात म्हणजे तुम्ही मराठी सारेगमप नक्कीच बघत असाल (अथवा "जोरदार टाळ्यांचा", "चाबुक" कमेंट्सचा आणि गायकांच्या तद्दन "स्क्रिप्टेड" पोपटपंचीचा कंटाळा येऊन नुकतंच बघायचं सोडलं असेल). तर सांगायची गोष्ट ही की जर तुम्ही मराठी सारेगमप बघितलं असेल तर तुम्ही हे देखील कबूल कराल की निर्विवादपणे त्यातलं सर्वोत्कृष्ट पर्व होतं ते "लिट्ल चॅम्प्स". हो ना? काय होतं हो असं विशेष त्या पर्वात? फार "तयारीचे" गायक होते? छे !! त्यांना मोठमोठ्या दिग्गज गुरूंची तालीम लाभली होती? नाही. खूप प्रसिद्ध कलाकार होते? काहीतरीच. त्यांची "गायकी" फार अचाट होती? तसंच काही नाही. पण मग असं काय होतं ह्या छोट्या छोट्या पोरांच्यात की उभ्या महाराष्ट्रानी त्यांना डोक्यावर घेतलं? उत्तर एकच - निरागसपणा. दिसण्यातला वागण्यातला आणि गाण्यातलादेखील. म्हणतात ना.... Man is born intelligent...education ruins him. कित्येकदा संस्कार एखाद्या कलाकारतला निसर्गदत्त गोडवा हिरावून नेतात. हे म्हणजे "नॅचरल स्प्रिंग बॉटल्ड वॉटर" सारखं. पण रानातल्या स्वच्छ नितळ झर्‍याचं पाणी प्लॅस्टिकच्या बाटल्यांत भरून तुम्ही त्या पाण्यात "सुधारणा" करता - की वाट लावता त्याची ? एकंदर आपल्याला "निरागसपणा" कधीही भावतो.

आता तुम्ही म्हणाल खेळांत निरागसपणा कुठुन आला बुवा? पण कल्पना करा... एखाद्या खेळाडूला त्या स्पर्धेची (आणि ते देखील ऑलिम्पिक्ससारख्या स्पर्धेची), त्या मानाची, त्या महत्त्वाची, त्या पदकाच्या मोलाची कल्पनाच नसेल आणि जर तो खेळिया त्या खेळाच्या पटावर आपल्या "निरागस" कामगिरीनी आपला ठसा कायमचा सुवर्णाक्षरांनी कोरून गेला तर?? १९७६ च्या माँट्रियाल ऑलिम्पिक्स मध्ये जेव्हा "अनईव्हन बार्स" ह्या कम्पल्सरी प्रकारासाठी "नादिया कोमानेसी" हे नाव जेव्हा पुकारण्यात आलं तेव्हा त्या १४ वर्षांच्या, जेमतेम ५ फूट उंचीच्या चिमुरडीला कल्पनादेखील नव्हती की आपण पृथ्वीतलावरच्या सर्वांत मोठ्या क्रीडा-मंचावर परफॉर्म करत आहोत. भलेभले धुरंधर खेळाडू जिथे खेळण्याच्या दडपणाखाली दबले जातात तिथे ह्या पोरीला "ही स्पर्धा बघायला नेहेमीपेक्षा जास्त लोकं आलेली दिसतायत" ह्या पलिकडे त्या स्पर्धेचं काहीच कौतुक नव्हतं ! तिच्याच शब्दांत सांगायचं तर "I didn’t care about pressure and I didn’t comprehend the consequences". आपल्या प्रशिक्षकांनी सांगितलेलं "रूटीन" कुठेही न चुकता पूर्ण करायचं इतकी सहज - सोपी इच्छा घेऊन नादियानी त्या अनईव्हन बार्स वर झेप घेतली.

पुढचे काही क्षण आलम दुनिया आपले श्वास रोखून जिमनॅस्टिक्सच्या एका नव्या तारकेचा उदय बघत होती. एका थरारक "हॅंडस्टॅन्ड" नंतर नादिया दोन्ही पाय घट्ट रोवून "लँड" झाली आणि प्रेक्षकांच्या कौतुकाचा बांध टाळ्यांचा कडकडाट करत फुटला. तेव्हाचे "लाँजाईन्स" कंपनीने बनवलेले स्कोरबोर्ड्स झाल्या प्रकारासाठी तयार नव्हते ! आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनच्या सल्ल्यानुसार तो स्कोरबोर्ड जास्तीत जास्त ९.९५ चा स्कोर दाखवणार होता. आणि नादियाच्या ह्या अचाट कामगिरीनंतर गुणफलकावर आकडा झळकला "1.00"! इकडे नादिया "लोकं खूप टाळ्या वाजवतायत" म्हणून खुष होती. दूरचित्रवाणीवरची निवेदिका म्हणाली "she was swimming in an ocean of air". संघातल्या एका पोरीने "तिकडे बघ" अशी खूण केल्यावर तिचं लक्ष गुणफलकाकडे गेलं!!! मानवीच नव्हे तर यांत्रिक देखील सीमा ओलांडून रोमानियाची नादिया कोमानेसी जिमनॅस्टिक्सच्या कुठल्याही प्रकारात "परफेक्ट टेन" मिळवणारी पहिली खेळाडू ठरली होती. कोणालाच वाटलं नव्हतं की रोमानियाची एक १४ वर्षीय चिमुरडी साक्षात ऑलिम्पिक्सला "अजून एक स्पर्धा" मानत केवळ चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करून अभूतपूर्व अशी कामगिरी करेल!! नादिया म्हणते "I never thought about making history. I was too busy putting my attention into making it".

आणि जणू काही ही कामगिरी पुरेशी "ऐतिहासिक" नव्हती म्हणून त्याच स्पर्धेत तिने अजून एकदा नाही दोनदा नाही तब्बल सहा वेळा म्हणजे एकूण सात वेळा "परफेक्ट टेन" गुणांची रास ओतली. आतापर्यंत बाहुल्या जमवणार्‍या पोरीला जणू आता ऑलिम्पिक पदकं जमवण्याचा छंद लागला होता. सर्वसाधारण, बीम आणि अनईव्हन बार्स अशी ३ सुवर्ण १ संघिक रौप्य आणि फ्लोर रूटीन मध्ये १ कांस्य अशी पाच पदकं मिळवून नादिया परत घरी आली ती जिमनॅस्टिक्सची राणी बनूनच !

१२ नोव्हेंबर १९६१ रोजी रोमानियातल्या ऑनेस्टी शहरात जॉर्ज आणि स्टेफानियाला एक गोंडस मुलगी झाली. स्टेफानियानी तेव्हा बघितलेल्या एका रशियन चित्रपटातल्या नायिकेच्या नावावरून तिचं नाव ठेवण्यात आलं नादिया (म्हणजे आशा - hope). लहानपणापसूनच पोरीत कमालीची "एनर्जी" होती. धाकला भाऊ एड्रियन आणि ती प्रचंड दंगा करायचे. उड्या मारून मारून घरातल्या कोचाच्या स्प्रिंगा बाहेर आल्या तेव्हा आई बापानी हिची "जिरवायला" नादियाला जवळच्याच एका जिमनॅस्टिक्सच्या वर्गात घातलं आणि वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी नादियानी आपली पहिली "कार्टव्हील" केली. लवकरच बेला कारोलीसारख्या निष्णात प्रशिक्षकाच्या हातात हा हिरा गवसला आणि बेला आणि त्याची बायको मार्ता ह्यांनी नादियाच्या कौशल्याला पैलू पाडायला सुरुवात केली. त्या वयात नादिया आठवड्यातले सहा दिवस रोज चार तास सराव करायची. पोरीला कशाचीच भीती म्हणून नव्हती. तिचा "बॅलन्स" अचाट होता. ४ फूट उंच आणि अवघ्या ४ इंच रुंदीच्या बीम वरून नादिया फेरफटका मारल्यागत चालायची. वयाच्या सातव्या वर्षी बेलानं तिला राष्ट्रीय ज्युनियर जिमनॅस्टिक्स स्पर्धेत उतरवलं. स्पर्धेतली सर्वांत छोटी स्पर्धक नादिया १३ वी आली. स्पर्धेनंतर बेलानं आपल्या चिमुकल्या शिष्येला एक छानशी बाहुली दिली आणि सांगितलं "ह्यापुढे कधीच १३ वं यायचं नाही हा बेटा". आणि पुढच्याच वर्षी बेला कारोलीच्या ह्या ८ वर्षांच्या बाहुलीनं रोमानियन राष्ट्रीय ज्युनियर जिमनॅस्टिक्स स्पर्धा जिंकली !! अर्थातच हा पराक्रम करणारी नादिया सर्वांत लहान खेळाडू होती. दोनच वर्षांत ती रोमानियाच्या राष्ट्रीय संघात निवडली गेली. दहाव्या वर्षी नादिया युगोस्लावियामध्ये Friendship Cup Meet ही आपली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली. बल्गेरिया होऊन ती परत आली ती दोन सुवर्णपदकं आणि खूप सार्‍या बल्गेरियन बाहुल्या घेऊनच. पुढे युगोस्लाविया, इटली, पोलंड आणि हंगेरीतल्या स्पर्धांमध्ये देखील तिनी पदकं मिळवली.

पुढच्याच वर्षी सलग तिसर्‍यांदा तिनं राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धा जिंकली Friendship Cup Meet मध्ये अजून तीन सुवर्णपदकं पटकावली. केवळ १३ वर्षांची असताना खुल्या गटात खेळताना नादियानं नॉर्वेतल्या European Championships मध्ये बॅलन्स बीम, अनईव्हन बार्स, व्हॉल्ट आणि सर्वसाधारण अशी तब्बल चार सुवर्ण आणि फ्लोर रूटीन मध्ये एक रौप्यपदक जिंकलं. युरोपियन स्पर्धेचं खुल्या गटाचं सर्वसाधारण विजेतेपद मिळवणारी नादिया सर्वांत छोटी खेळाडू होती. आणि मग माँट्रियाल ऑलिम्पिक्समध्ये तिनी जो इतिहास घडवला तो आपण पाहिलाच! साहजिकच ह्या कामगिरीनंतर नादियावर प्रसिद्धीचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला. बीबीसी, असोशिएटेड प्रेस, UPI - सगळ्यांनीच तिचा यथार्थ गौरव केला. रोमानियन सरकारनी तर त्या १४ वर्षांच्या चिमुरडीला "Hero of Socialist Labor" हा आपला सर्वोच्च नागरी सन्मान दिला !! आणि हो.. तोपर्यंत तिच्याकडे २०० पेक्षा जास्त बाहुल्या जमा झाल्या होत्या.

पण ह्या कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र काही वाईट गोष्टी घडल्या. ऑलिम्पिक्सनंतर थोड्याच दिवसांत तिच्या आई - वडिलांचा घटस्फोट झाला. तेव्हा रोमानियात हुकुमशाही राजवत होती. रोमेनियन जिमनॅस्टिक्स असोसिएशननं तिला बेला कारोलीकडे शिकायला मनाई केली आणि दुसर्‍या प्रशिक्षकाकडे सराव करायला सांगितलं. आई - वडील विभक्त झालेले आणि बापसारखी माया करणा प्रशिक्षकही दुरावलेला. "ऑलिम्पिक चॅम्पियन" असली तरी १४ वर्षांची छोटी पोर होती हो ती! घडल्या घटनांनी पोरगी पार खचून गेली. आणि तिनी नैराश्याच्या भरात ब्लीच खाल्लं !! तेव्हा नादिया रोमेनियाच्या गळ्यातली ताईत होती. रोमेनियन जनतेच्या खचलेल्या, पीडित चेहर्‍यांवरची स्मिताची रेषा होती. रोमेनियातल्या हुकुमशाही सरकारनं तिला पुन्हा कारोलीकडे प्रशिक्षण घ्यायची परवानगी दिली. पण ७८ च्या जागतिक स्पर्धेत प्रेक्षकांना दिसली ती एक बेढब, फुगलेली, सुटलेली नादिया! आपल्या हातखंडा "अनईव्हन बार्स" वरून ती पडली. पण त्यातही बीम मध्ये तिनी सुवर्णपदक मिळवलंच. ७९ साली तिचं नाव हुकुमशहा निकोल सोसेस्कूच्या मुलाशी जोडलं गेलं. ती प्रसिद्धी, ती लोकप्रियता एक कोवळं आयुष्य खुडत होती. समजायला लागल्यापासून जिमनॅस्टिक्स आणि फक्त जिमनॅस्टिक्सवर प्रेमे केलेल्या एका कोवळ्या आयुष्याची वाताहत होत होती. पण अश्या परिस्थितीतही नादियाची मेहनत, सराव आणि प्रशिक्षण चालूच होतं. सगळी दु:ख, सगळ्या विवंचना बाजूला ठेऊन एका सच्च्या खेळियाप्रमाणे नादिया पुन्हा जिद्दीने सरावाला लागली. ७९ च्या युरोपिय चॅम्पियनशिप्समध्ये पूर्णपणे फिट, जिगरबाज आणि यशासाठी भुकेल्या नादियानी सलग तिसर्‍यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळवून न भूतो न भविष्यति अशी कामगिरी केली. त्याच डिसेंबरच्या जागतिक स्पर्धेत मनगटाला झालेल्या जखमेची पर्वा न करता, डॉक्टरांचे आदेश धुडकावून, हॉस्पिटलमधून पळून जाऊन नादियाने सांघिक प्रकारात बीम वर ९.९५ ची कामगिरी करून रोमानियाला आपलं पहिलं सांघिक सुवर्णपदक मिळवून दिलं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक्समध्ये तिनी २ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं मिळवली.

बहुतेक सर्वच जिमनॅस्ट्सप्रमाणे ८१ साली वयाच्या २० व्या वर्षीच नादिया निवृत्त झाली. बुखारेस्टच्या स्पर्धेत पाच सुवर्णपदकं कमावून तिनी जिमनॅस्टिक्सला थाटातच रामराम ठोकला. दुर्दैवानी तिच्या कारकीर्दीत रोमानियात हुकुमशाही राजवट आणि अराजक होतं. ज्याला संधी मिळेल तो देश सोडून पळून जायचा प्रयत्न करत होता. बेला कारोली आणि मार्थानंदेखील देश सोडला आणि ते अमेरिकेला पळून गेले. पण नादिया त्यांच्याइतकी नशीबवान नव्हती. ती नुसती प्रसिद्धच नव्हे तर नॅशनल आयकॉन होती. तिच्यावर सरकारची करडी नजर होती आणि तिचा प्रत्येक फोन कॉल टॅप केला जात होता. आपल्याच देशात ती बंदिवानाचं आयुष्य जगत होती. तिला कुठल्याही पाश्चिमात्य देशांत जायला बंदी घालण्यात आली. तिला ८४ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक्सला जायची परवानगी देण्यात आली पण तिथेही सरकारची तिच्यावर सतत पाळत होती. मॉस्को आणि क्यूबा सोडून ती कुठेही जाऊ शकत नव्हती. १९८४ ते १९८९ तिनी रोमेनियन जिमनॅस्टिक्स संघाची प्रशिक्षक म्हणून काम केलं. आणि ८९ मध्ये तिला एक संधी मिळाली. कॉन्स्टन्टाइन पानाइत नावाच्या एका इसमाच्या मदतीने, फक्त आपल्या धाकट्या भावाला कल्पना देऊन, आपली सगळी दौलत - आपली पदकं मागे ठेऊन नादिया - जिमनॅस्टिक्सची सुवर्णकन्या - एका सामान्य निर्वासितासारखी ऐन मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत ६ तास चालत हंगेरीच्या सीमेपर्यंत पोचली. तिथल्या अधिकार्‍यानी तिला ताबडतोब ओळखलं आणि तिला ऑस्ट्रियाच्या सीमेपर्यंत जाण्याची परवानगी दिली. ऑस्ट्रियातल्या अमेरिकन दूतावासातून परवानगी मिळवून ती अमेरिकेत मोकळा श्वास घ्यायला दाखल झाली! न्यूयॉर्कहून ती आली ती आपली कर्मभूमी माँट्रियालला. नशीबानी जागतिक जिमनॅस्टिक्समध्ये नादियाचे काही चांगले मित्र होते. बार्ट कॉनर आणि अ‍ॅलेक्झँडर स्टेफूनी तिला खूप मदत केली. तिला अमेरिकेत आणणारा पानाइत मात्र तिचे पैसे घेऊन पळून गेला.

नंतर नादिया माँट्रियालमध्येच कॉनर आणि त्याच्या परिवारासोबत राहिली. पुन्हा जिमनॅस्टिक्सच्या सरावाला सुरुवात केली. बार्ट कॉनर अ‍ॅकॅडमीमध्ये ती मुलांना जिमनॅस्टिक्स शिकवू लागली. तिनी मॉडेलिंगही केलं. पुढे तिने बार्ट कॉनरशी रोमानियातच लग्न केलं. बुखारेस्टमधला हा लग्न सोहळा राजेशाही थाटात पार पडला. अरे हो... एक किस्सा सांगायचाच राहिला ! मॉन्ट्रियाल ऑलिम्पिक्स आधीच्या एका सराव स्पर्धेत नादियानं मुलींचं विजेतेपद मिळवलं. बक्षीस समारंभाच्यावेळी तिथल्या फोटोग्राफरला काय हुक्की आली... त्यानी "जोडा कसा छान दिसेल" म्हणून मुलांच्या विजेत्याला तिच्या गालाचं चुंबन घ्यायला सांगितलं आणि त्यांचा फोटो काढला. त्याला तरी काय कल्पना की पुढे काही वर्षांनी हे दोघं चर्च पाद्र्यासमोर मध्ये एकमेकांचं चुंबन घेतील? कारण तो मुलांचा विजेता होता बार्ट कॉनर !!!

नादियाचं "letters to a young gymnast" हे आत्मचरित्र खूप गाजलं. नादिया सध्या अमेरिकेचीच नागरिक आहे आणि नॉर्मनमध्ये बार्ट कॉनर अ‍ॅकॅडमी चालवते, समुपदेशक आणि जिमनॅस्टिक्स स्पर्धांची म्हणून काम करते. बर्‍याच सेवाभावी संस्थांशी ती निगडीत आहे. सध्या ती आंतरराष्ट्रीय "स्पेशल ऑलिंपिक्स फेडरेशन" ची उपाध्यक्ष आहे. जन्मभूमी रोमेनियात तिचं खूप चांगलं काम आहे. "ऑलिम्पिक ऑर्डर" हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचा सर्वोच्च सन्मान १९८४ आणि २००४ असा दोन वेळा मिळवणारी ती एकमेव खेळाडू आहे.

आंतराष्ट्रीय खेळांमधे आपण नेहेमी दडपणच नव्हे तर यश आणि प्रसिद्धीदेखील हाताळण्याबद्दल बोलतो. कोणाच्या डोक्यात फार लवकर हवा जाते तर कोणी आपलं ध्येय ओळखून कारकिर्दीतल्या चढ - उतारांना मोठ्या धैर्याने सामोरे जातात. हाच तर फरक असतो "चांगल्या" आणि "महान" खेळाडूंमध्ये. चांगले खेळाडू मशालीसारखे तळपतात पण महान खेळाडूच दीपस्तंभासारखे सगळे वादळ- वारे झेलून, सगळ्या संकटांना तोंड देऊन दहा अंगुळे वर उरतात. नादियासारख्या कोवळ्या वयात आंतराष्ट्रीय जिमनॅस्टिक्स गाजवणार्‍या मुलीला दडपण नव्हतं हो.... पण प्रसिद्धीचा झोत, जगभरातून होणारं कौतुक, लोकांचं अलोट प्रेम, लोकांच्या अपेक्षा, देशातली जुलमी राजवट.... भले भले त्या दडपणाखाली नेस्तनाबूत झाले. ज्या वयात पोरी झिम्मा-फुगडी खेळायच्या (आता कार्टूनं बघतात) त्या वयात ह्या सगळ्याला तोंड देताना काय हाल झाले असतील पोरीचे?

पण नादिया ह्या सगळ्या संकटांना पुरून उरली. फीनिक्स सारखी राखेतून भरारी घेत पुन्हा तिनं जग जिंकलं. जिमनॅस्टिक्स सारख्या खूप छोटी "शोकेस लाइफ" असणार्‍या खेळात तिनी असा ठसा उमटवला... आणि असा विक्रम नोंदवला जो कधीच कोणालाच पुसता येणार नाही. कारण जगातली "पहिली परफेक्ट टेन गर्ल" एकच होती, एकच आहे आणि कालांतापर्यंत एकच असेल "नादिया कोमानेसी"!

क्रीडामौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

24 Jun 2010 - 4:59 pm | चतुरंग

कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषुकदाचनं!!
ह्या वचनाचा इतका प्रामाणिक उपयोग केला की यश पाठीमागे धावत येत आरोळ्या ठोकत की "अगं/अरे निघालीस/लास कुठे मला यायचंय ना तुझ्यासोबत!"

(एक मल्लखांबपटू म्हणून मला जिमनॅस्टिक ह्याखेळबद्दल विशेष आदर आहे. नगरसारख्या ठिकाणी आमच्या शाळेत जेव्हा वाघ सरांनी जिमनॅस्टिक्स आणलं ते साल होतं १९७७-७८ - बहुदा नादियाच्या दिग्विजयानंतर जगभर जो जल्लोष झाला त्याचा परिपाक असावा. बीम, अनईवन बार, पॅरलल बार, फ्लोअर हे सगळे प्रकार तेव्हा आम्हीच काय सगळेच अचंब्याने बघत असत. मला आठवतं सरांनी मोठमोठी चित्रांची गुळगुळीत पानांची पुस्तकं मागवली होती त्यात ट्रेनिंग कसं द्यायचं हे शिकवलं होतं सरांनी रात्रंदिवस मेहेनत करुन जिमनॅस्टिकचा संघ घडवला होता. कुठल्याही विशेष मोबदला न घेता केवळ खेळावर आणि मुलांवर निरतिशय प्रेम करणारे असे शिक्षक लाभले हे माझे भाग्य.)

चतुरंग

मनिष's picture

24 Jun 2010 - 5:04 pm | मनिष

नादिया विषयीचे एक सुंदर, रंगीत रशियन पुस्तक माझ्याकडे होते, पुढे ते कुठे हरवले काय माहित? :(

अजून एका खेळियाची सुंदर ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद. लिहीत रहा...खूप आवडतेय ही मालिका! :)

गणपा's picture

24 Jun 2010 - 5:18 pm | गणपा

मस्त रे जेपी.
सुंदर ओळख.
खुपच लहान होतो तेव्हा.
पण ज्यांनी हा इतिहास घडताना पाहिला असेल त्यांचा हेवा वाटतो.
(सचीनच्या वनडे मधल्या अजरामर खेळी बद्दल लोक आमचा असाच हेवा करतील.)

राघव's picture

24 Jun 2010 - 5:32 pm | राघव

केवळ क्लास! खूप सुंदर लेखन.
मालिका अप्रतीम होतेय.. येऊ देत अजून! :)

स्वगतः पुढचा खेळीया कोण असेल बरे?? :-?
राघव

Dhananjay Borgaonkar's picture

24 Jun 2010 - 6:08 pm | Dhananjay Borgaonkar

जे.पी आत पर्यंत तुमच्या लेखातला हा मास्टर पीस आहे.
एक नंबर.
लगे रहो मुन्ना भाई.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jun 2010 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार

जेपी शेठ, तुमचे नाव वाचुन लेख उघडला आणी सार्थक झाले :)
ह्या लेखाबद्दल देखील तुम्हाला परफेक्ट १० !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मस्त कलंदर's picture

24 Jun 2010 - 6:32 pm | मस्त कलंदर

अक्षरशः परफेक्ट १०!!!
एका दमात वचून काढला...

ज्या वयात पोरी झिम्मा-फुगडी खेळायच्या (आता कार्टूनं बघतात) त्या वयात ह्या सगळ्याला तोंड देताना काय हाल झाले असतील पोरीचे?

तिला _/\_!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सहज's picture

24 Jun 2010 - 6:34 pm | सहज

जेपी आणखी एक उत्तम लेख!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2010 - 8:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१०/१०

अदिती

प्रभो's picture

24 Jun 2010 - 6:44 pm | प्रभो

जेपी नेव्हर लेट्स यू डाउन!!!!!
जबरदस्त लेख......नादियाला _/\_...

संदीप चित्रे's picture

24 Jun 2010 - 6:55 pm | संदीप चित्रे

जी माहिती विकीपिडिया आणि यू ट्युबवरही मिळू शकते त्या माहितीला शब्दांचा सुरेख साज गुंफून वाचत रहावंसं वाटतं केल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन मित्रा.

मी स्वतः जिम्नॅस्टिकस कधी फार केलं नाही पण आमच्या शाळेत (महाराष्ट्रीय मंडळ - पुणे) जिम्नॅस्टिक्सच्या (आणि इतर खेळांच्याही) भरपूर सुविधा उपलब्ध होत्या. कुस्ती आणि जिम्नॅस्टिक्स ह्या खेळांत आमच्या शाळेचा विशेष दबदबा होता. ह्या लेखाच्या निमित्ताने शाळेतला तो हॉल आणि त्या सगळ्या सोयी आठवल्या.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

जे.पी.मॉर्गन's picture

25 Jun 2010 - 12:31 pm | जे.पी.मॉर्गन

>>जी माहिती विकीपिडिया आणि यू ट्युबवरही मिळू शकते त्या माहितीला...<<

हा एक भारी प्रकार आहे ना? पूर्वी ज्या गोष्टीची माहिती आहे त्याबद्दलच लिहिता येत होतं... आता ज्याबद्दल लिहायचंय त्याची वाट्टेल ती माहिती बहुतेक वेळा मिळू शकते. ह्या लेखमालिकेसाठी माहिती जमवताना इतक्या नवीन गोष्टी कळतायत... सगळ्यांच्या प्रतिक्रियांबरोबर ती "कमाई" ही खूप आहे !

सगळ्यांनाच धन्यु !

जे पी

श्रावण मोडक's picture

25 Jun 2010 - 12:43 pm | श्रावण मोडक

तुमच्या शैलीला दाद. दहा पैकी आठ माझ्याकडून.
एकूण एक गुण कमी कारण - या आणि अशा लेखनासाठीचे संदर्भ मात्र संकलीत करून देत जा. किमान तुमच्या पानावर तरी ते ठेवा.

भारद्वाज's picture

24 Jun 2010 - 8:42 pm | भारद्वाज

लेख......केवळ अ प्र ति म

विसोबा खेचर's picture

24 Jun 2010 - 9:22 pm | विसोबा खेचर

सुरेखच रे..

संजय अभ्यंकर's picture

24 Jun 2010 - 10:43 pm | संजय अभ्यंकर

मायकल जॉर्डन बद्दल आपल्या लेखणीतून उतरलेला लेख वाचायची ईच्छा आहे.

ज्यांना NBA Finals मधले शिकागो बुल्स वि. यूटाह जाझ, शिकागो बुल्स वि. इंडीयाना पेसर्स सामने पहायला मिळाले त्या भाग्यवंतां पैकी मी एक आहे.

मायकल जॉर्डन ह्या असामन्या खेळाडू बद्दल आपण लिहावे अशी पुन्हा एकदा विनंती.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2010 - 12:04 am | भडकमकर मास्तर

लेखमालेतला अतिशय महत्त्वाचा आणि वैयक्तिक फेवरीट लेख...
अगदी परफेक्ट १०

खरतर जिमनॅस्ट प्रकार भारतात खुपच फेमस झाला तो मुळात नादिया मुळेच. ती खरोखरच खुप निरागस खेळाडु आहे.जि इतके यश मिळुन देखिल जमीनीवरच आहे.
१०/१० हे तिलाच मिळायला हवेत आणि ते मिळाले देखिल.धन्यवाद मॉर्गन साहेब,तुमच्या मुळे अजुन एका आवडत्या खेळाडुची माहिती मिळाली.
नादिया आणि स्टेफी आपल्याला खुप खुप आवडतात.
दोघीनाही खेळताना पहाणे खुपच रोमांचकारी असते.
;) :X

वेताळ

टुकुल's picture

25 Jun 2010 - 2:36 pm | टुकुल

जेपी..
एकदम जबरद्स्त लेखन, वाचायला सुरु केल की कधी संपत ते कळत नाही..

--टुकुल

मारवा's picture

29 Oct 2015 - 11:49 am | मारवा

मिपा क्लासिक-३

नया है वह's picture

29 Oct 2015 - 7:55 pm | नया है वह

एकदम जबरद्स्त

विशाल कुलकर्णी's picture

30 Oct 2015 - 11:18 am | विशाल कुलकर्णी

अप्रतिम लेख !
अतिशय दैदीप्यमान कारकिर्द आणि तरीही तितकेच दुर्दैवी आयुष्य !